डिजिटल अर्काईव्ह

नानासाहेब स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले नसते आणि एखादा व्यवसाय किंवा नोकरी शांतपणे करीत राहिले असते, तर त्यांच्यातला लेखक अधिक बहरला असता का- याचे उत्तर मात्र ‘नाही’ असेच द्यावे लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीत आलेल्या अनुभवातून, त्या वेळी पाहिलेल्या माणसांतून नानासाहेबांतला लेखक अधिक समृद्ध झाला, असेसुद्धा म्हणावे लागेल. जुन्या परंपरांच्या शृंखलातून मुक्त होऊन स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा जेव्हा नानासाहेबांनी घेतली, तेव्हाच त्यांच्यातला स्वातंत्र्यप्रेमी तरुण जसा जागा झाला तसाच त्यांच्यातला रसिक लेखकही जागा झाला. साहित्याचीसुद्धा मूलभूत प्रेरणा स्वातंत्र्य हीच आहे. 

1955 मध्ये पदवी शिक्षणासाठी मी औरंगाबादला आलो. वडील हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे राजकारण लहानपणापासून कानांवरून जात होते. मराठवाड्यातल्या अनेक राजकीय नेत्यांचा आमच्या घरीही वावर होता, पण मुंबई राज्यात सामील झाल्यानंतर मराठवाड्यातल्या काँग्रेस संघटनेचे स्वरूपच बदलले. वडलांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता आणि जवळजवळ निवृत्तीच घेतली होती. आजवर हैदराबादमध्ये असलेले ‘मराठवाडा’ वृत्तपत्र औरंगाबादहून प्रसिद्ध होणार होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यालयही औरंगाबादला असणार होते. 

या दोन्ही संस्थांचे धुरीण होते अनंत भालेराव. माझ्या वडलांचे ते चळवळीतले मित्रही होते. साहजिकच त्यांच्या घरी आणि ‘मराठवाडा’ कार्यालयात मी अधून-मधून जाऊ लागलो. सहा-सात वर्षांपूर्वीच गोविंदभाई, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव आदींनी काँग्रेसचे राजीनामे देऊन विरोधी गट म्हणून काम सुरू केले होते. अनंतरावांचा ओढा लोकशाही समाजवादी पक्षाकडे होता. नानासाहेब गोरे किंवा एस. एम. जोशी असे कोणी औरंगाबादेत काही कार्यक्रमासाठी आले म्हणजे, त्यांचा मुक्काम अनंतरावांच्या घरीच असे. त्या घराला पाहुण्यांच्या वावराची सवय होती. जिथे सार्वजनिक सभा होत, त्या सरस्वती भुवन मैदानाशेजारीच मी राहत होतो. काही वेळा नियोजन करणारे सभेनंतर एस. एम.सारख्या पाहुण्याची झोपण्याची व्यवस्था माझ्या खोलीवरही करत. राष्ट्र सेवादलाचे कलापथक औरंगाबादेत किंवा मराठवाड्यात कुठे आले म्हणजे त्यांच्याही व्यवस्थेमध्ये आमच्यासारख्यांना सामील करून घेतले जाई. 

माझी विद्यार्थिदशाच चालू होती. राजकारणाचा अभ्यास वगैरे काही नव्हता; पण लोकांचे प्रश्न हिरीरीने मांडणारे, अगदीच साधी राहणी असलेले नेते म्हणून एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांची माहिती होती. आता तर संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ सुरू झाली होती. त्यात ते अग्रभागी होते, त्यामुळे या दोघांबद्दल मनात विशेष आदरभाव निर्माण झाला होता. 

पोलीस कारवाई होऊन हैदराबाद संस्थान मुक्त होण्यापूर्वीपासून नानासाहेबांचा संस्थानातील काही समाजवादी कार्यकर्त्यांशी संबंध होता. वैजापूर तालुक्यातल्या गोवर्धन सराळा बेट आणि आसपासच्या खेड्यांना निजामी अमलापासून स्वतंत्र करून त्यांचे गणराज्य घोषित करणाऱ्या कार्यकर्त्यांना अच्युतराव पटवर्धन आणि नानासाहेब गोऱ्यांचेच मार्गदर्शन होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात यावे, म्हणून वाटाघाटीसाठी करण्यासाठी गोरे आणि एस. एम. हैदराबादला आले होते. तो योग दुर्दैवाने येऊ शकला नाही. त्यानंतर सात-आठ वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि त्यानिमित्ताने या दोघांचे मराठवाड्यात येणे-जाणे वाढले. नानासाहेबांची औरंगाबादेत एक-दोन स्वतंत्र व्याख्यानेही झाली.

नानासाहेब गोऱ्यांना आपण विचारवंत म्हणून ओळखतो. हल्ली विशेषणे इतकी सवंग झाली आहेत, इतकी पातळ झाली आहेत की- त्यातला अर्थ अदृश्यच होतो. नानासाहेबांचे विचारवंतपण अस्सल होते. त्यांच्या विचारप्रक्रियेचा मूलाधार होता वैचारिक स्वातंत्र्य. तात्त्विक संकल्पनांचा गुंता सोडवण्यापेक्षा त्यांच्या आधारे जीवनव्यवहारच चिकित्सापूर्वक तपासणे हे विचारवंताचे खरे काम नानासाहेबांनी आयुष्यभर केले. ते करताना त्यांनी दोन गोष्टी कटाक्षाने जपल्या. पहिली म्हणजे- त्यांची बुद्धिनिष्ठा आणि दुसरी म्हणजे- स्वतंत्र विचार करण्याचे व तो निभर्यपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य. ते ज्येष्ठांचा आदर करीत, पण या आदराचे रूपांतर श्रद्धेत होऊ देत नसत. कोणी सांगितले की, ते न तपासता तसेच श्रद्धापूर्वक स्वीकारावे व त्याप्रमाणे वागावे, असे त्यांनी कधी केले नाही. ‘जे आपण तपासून पाहिलेले नाही, असे जीवन जगण्यात अर्थ नाही.’ हे सॉक्रेटिसचे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळले. प्रश्नाचा साक्षेपाने विचार करून नंतरच आपले मत ते निश्चित करीत. ‘माझ्या विचाराची गती मंद असते, पण ती निश्चित असते’, असे त्यांनीच लिहिले आहे. त्यांच्या जीवनातली परिवर्तने या तपासणीच्या प्रक्रियेतूनच घडून आलेली आहेत. 

नानासाहेब ज्या काळात व सामाजिक परिस्थितीत जन्मले ती परिस्थिती आणि तो काळ स्वतंत्र विचारासाठी अजिबात पोषक नव्हता. नव्या विचारांची शक्यताच घट्ट बंधनांच्या आचारपरंपरांनी नाहीशी केली होती. तत्कालीन समाजाच्या स्थितिवादी अवस्थेचे त्यांनी फार नेमके वर्णन केले आहे. ‘या आमच्या समाजातील स्त्रिया किंवा पुरुष यांना कोठेही पोहोचावयाचे नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर देवाने दिलेले आयुष्य जसेच्या तसे जगण्यापलीकडे कोणतेच ध्येय नव्हते. दिशाहीन आणि ईर्ष्याहीन अशी ही सर्व मााणसे माझ्या अवतीभोवती वावरत होती. मुले-माणसे जन्माला येत होती, जीवन जगत होती, आयुष्याची दोरी तुटली की मरत होती... कस गेलेल्या जमिनीतली झाडे जशी खुरटतात, तसा हा सर्व बाजूंनी खुरटलेला समाज होता.’ अशा स्थितीत नानासाहेबांनी आपले विचारस्वातंत्र्य जपले, उपयोगात आणले. ते स्वतःही बदलत गेले आणि त्यांनी समाजालाही बदलण्याची गरज सांगितली. 

नानासाहेबांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी त्यांनी मित्रांच्या आग्रहावरून ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शीर्षकाचा एक आत्मलक्ष्यी लेख लिहिलेला आहे. त्यात त्यांनी  आपल्यात घडत गेलेली परिवर्तने आणि त्यांची कारणेदेखील उल्लेखिली आहेत. वडलांबरोबर ते एकदा कोकणात गेले असताना कासेला फक्त लंगोटी असलेला झिलगा रस्त्यात त्या दोघांना पाहून एकदम खाली बसला. त्याचे काय कारण आहे, असे विचारताच ‘आपल्या अंगावर त्याची सावली पडू नये म्हणून तो खाली बसला’, असे वडलांनी सांगितले. ते राहत असलेल्या वाड्यातल्या तांबड्या अलवाणातल्या सोवळ्या झालेल्या बायका आपल्याला खुणावून कोपऱ्यावरून न्हाव्याला बोलावून आणण्यास कसे सांगत असत, हेही त्यांनी सांगितले आहे. सामाजिक जीवनातली असली दाहक सत्ये नानासाहेबांच्या वेशापासून विचारापर्यंत परिवर्तन करण्याला कारणीभूत झाली होती. किशोरावस्थेपर्यंत त्यांच्यावर धार्मिक आचारांचा-विचारांचा पगडा होता. त्यांनी लांबलचक शेंडी राखली होती. त्या काळात ते भोपटकरांचा ‘भाला’ आवडीने वाचत. एके दिवशी त्यांनी शेंडीला रजा दिली. त्याच वर्षीच्या श्रावणीला श्रावणी करण्यासच इन्कार केला. गळ्यातले जानवे काढून वडलांपुढे ठेवले. नंतर त्यांनी जानवे कधीच घातले नाही. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तकांचा खजिनाच उपलब्ध झाला. गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांच्या वाचनाने मनावरची उरलीसुरली पुटेही खरवडून निघाली. 

रशियात 1919 साली झालेली राज्यक्रांती ही त्या वेळच्या तरुणांसाठी एक प्रेरक घटना होती. कम्युनिस्ट जाहीरनामाही नानासाहेबांनी वाचला आणि ते विलक्षण प्रभावित झाले. ‘माझ्या मनावर आणि वृत्तीवर जो ठसा उमटला, त्याला माझ्या जीवनात तोड नाही’ असे या प्रभावाचे त्यांनी वर्णन केले आहे. त्यातील विचार एखाद्या झंझावाताप्रमाणे नानासाहेबांची विचारप्रक्रियाच बदलून टाकण्याला कारणीभूत झाले. पण नानासाहेबांच्या पुनर्तपासणीत हा प्रभाव फार काळ टिकला नाही. रशियातील स्टालिनशाहीच्या लीला जसजशा बाहेर येऊ लागल्या, तसतसा त्यांचाही भ्रमनिरास झाला. मार्क्सवादी विचारवंत के. एन. फडके आणि दि. के. बेडेकर यांच्याबरोबर फडक्यांच्या खोलीवर नानासाहेबांच्या चर्चा झडत. ‘कोणत्याही संघटनेचे अथवा तत्त्वाचे एकाधिपत्य मान्य केले आणि तिची सत्ता आली म्हणजे तिच्याकडून अन्याय घडू लागल्यास तिला वठणीवर आणण्यासाठी जनतेच्या हाती काहीच उपाय उरत नाही.’ त्या वेळी लोकांनी काय करावे, असा प्रश्न त्यांना पडे. या प्रश्नाचे उत्तर मार्क्सवादही देत नव्हता. तोही अपुरा आहे, असे त्यांच्या लक्षात आले. 

आपल्या वैचारिक भूमिकेला जे सुसंगत असेल, तेच नानासाहेब करीत. वैयक्तिक सत्याग्रहाची परवानगी 1940 मध्ये देताना गांधीजींनी प्रत्येक सत्याग्रहीने मनोमन स्वीकारलेले तत्त्व म्हणून अहिंसेवर श्रद्धा ठेवली पाहिजे, अशी अट घातली होती. नानासाहेबांनी सत्याग्रही म्हणून नाव नोंदवले होते, पण त्यांनी गांधीजींना स्पष्ट कळवले की- आपण अहिंसावादी असलो तरी नैतिक सिद्धांत म्हणून आपण अहिंसा तत्त्वाचा स्वीकार केलेला नाही. गांधीजींना असे कळवून या सत्याग्रहींच्या यादीतून त्यांनी आपले नाव मागे घेतले. 

स्वतंत्र बुद्धीच्या परिसावर प्रत्येक विचार नानासाहेब घासून घेत आणि नंतरच त्याचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत. दुसरा दुखावेल म्हणून न पटणाऱ्या मताशी सहमतीचा देखावा करावा किंवा दुसरा दुखवू नये म्हणून सत्य सांगताना कचरावे, असे त्यांनी कधी केले नाही. तोही चांगला, हाही चांगला- अशा तऱ्हेची भोळसट मते व्यक्त करून वैचारिक संघर्षापासून दूर राहणाऱ्यांपैकी ते नव्हते. बा. न. राजहंसांनी जयप्रकाशांचे एक चरित्र मराठीत लिहिले आहे. त्याला नानासाहेबांची प्रस्तावना आहे. त्यातला रोखठोकपणा पाहण्यासारखा आहे. जयप्रकाशांच्या मोठेपणाचा यथायोग्य गौरव त्यांनी केलाच आहे; पण त्याचबरोबर व्यक्तीविषयीचा आदर आणि त्याची राजकीय भूमिका याची गल्लत केल्यामुळे जयप्रकाशांनी किती गंभीर चुका केल्या, याबद्दलही त्यांनी परखडपणे लिहिले आहे. 

समाजवादी पक्षात घुसून तो आतून पोखरून टाकण्याचे कम्युनिस्टांचे कारस्थान स्पष्ट दिसत असताना आणि त्याबद्दलचे पुरावे समाजवादी पक्ष कार्यकारिणीसमोर मांडल्यानंतरही त्याकडे डोळेझाक करून, त्यांना पक्षात ठेवून कारवाया चालूच ठेवण्याची आणखी संधी देणारे जयप्रकाश... आपल्या विश्वासावर पक्षात असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता राजकारण सोडून विनोबांच्या भूदान आंदोलनासाठी जीवनदान घोषित करणारे जयप्रकाश त्यांनी मांडले आहेत. निवडणुकीतले किंवा चळवळीतले अपयश पचवून नेत्याने कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जायचे असते- हे जयप्रकाशांचे कर्तव्य त्यांनी पार पाडलेले नाही, हेही नानासाहेबांनी सांगितले आहे. जयप्रकाशांच्या चुकांबद्दल इतक्या परखडपणे लिहिणाऱ्या नानासाहेबांच्या मनात त्यांच्याबद्दलचा गाढ स्नेह मात्र कायम होता. चंदीगडच्या अखिल भारतीय आरोग्य विज्ञान संस्थेत जयप्रकाश उपचार घेत होते, त्या वेळी एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाली. नानासाहेब त्या वेळी दिल्लीत होते. त्यांना हे कळताच त्यांनी आपल्या मित्राला गाडी उपलब्ध करून द्यायला सांगितले. रातोरात प्रवास करून नानासाहेब चंदीगडला पोहोचले. जयप्रकाशांची प्रकृती सुधारते आहे, हे समक्ष पाहिल्यानंतरच त्यांचे समाधान झाले. 

भारतीय राजकारणात विचारांपेक्षा नेत्यावरील श्रद्धा हीच पुष्कळ वेळा प्रभावी ठरते आणि या श्रद्धेपोटी कार्यकर्ते स्वतः विचार करणेच थांबवतात. नेत्यांच्या चुकासुद्धा श्रद्धापूर्वक स्वीकारतात आणि अंतिमतः पक्षाचे प्रचंड नुकसान होते. नानासाहेबांना या वास्तवाची उत्तम जाण होती. त्यांनी म्हटले आहे, ‘1950- 1954 च्या काळातील या घटनांचा तपशीलवार आणि निर्भीड इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तो जावो; कारण त्यात आमच्या भारतीय परंपरेतून आलेल्या स्वप्नवादी कल्पना, गांधीजींच्या तेजोवलयांकित व्यक्तिमत्त्वाचे दडपण, जयप्रकाशांबद्दलचा आदरभाव व डॉ.लोहियांविषयीची निष्ठा यांचा असा काही चिकट गारा झालेला आहे की, त्यापासून स्वतःची बुद्धी निर्लेप राखून त्या काळातील घटनांविषयी वस्तुनिष्ठेने विचार करणे, बोलणे अथवा लिहिणे शक्यच होत नाही.’ नानासाहेबांनी ज्या चिकट गाऱ्याचा उल्लेख केला, त्यातून आपली राजकीय मीमांसा आजही मुक्त झालेली नाही. आपल्या राजकीय विचारात काय किंवा समाजविचारात काय, आपण दुसऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला काय वाटेल याचाच अधिक विचार करतो. 

जसे मार्क्सच्या वैचारिक मांडणीतले अपुरेपण त्यांच्या लक्षात आले, तसेच गांधीजींच्या ‘हिंद स्वराज’मधील विचारांचे अपुरेपणसुद्धा. गांधीजींनी वाफ, वीज आणि अणुऊर्जा या शक्तिस्रोतांनाच नाकारलेले होते. पर्यायाने प्रगतीचे आणि माणसाचे जीवन सुलभ करण्याच्या प्रयत्नांचे दरवाजेच बंद केले होते. वैयक्तिक सुखोपभोगाला मर्यादा घातली पाहिजे, हे ठीक आहे; पण सामान्यांचे जीवन सुलभ करणाऱ्या गोष्टीसुद्धा गांधीजींना मान्य नव्हत्या. संसदेसारख्या राजकीय संस्था ते नाकारत होते. शोषणविरहित आणि दंडविरहित समाजाचे गांधीजींचे स्वप्न नानासाहेबांना वास्तववादी वाटत नव्हते. गांधीजींची विश्वस्त कल्पना मात्र त्यांना मान्य होती. आपले हे विचार ते स्पष्टपणे मांडतही होते. म्हणूनच नानासाहेब जसे मार्क्सवादी झाले नाहीत, तसेच ते गांधीवादीही झाले नाहीत. कोणत्याही ‘वादा’ला व्यक्तीने बांधून घेऊ नये, जे पटते तेवढे ग्रहण करावे आणि आपली वाटचाल चालू ठेवावी, असे त्यांचे मत होते. 

‘ज्ञानाच्या किंवा विचारांच्या बाबतीत- मग ते ज्ञान अथवा विचार ऐहिक असोत की पारमार्थिक - पूर्णावस्थेची पायरी ते कधीच गाठू शकत नाहीत’ असे त्यांनी लिहिले आहे. माझ्यापूर्वी आणि माझ्यानंतरही जग घडत राहणार आहे, बदलत राहणार आहे, त्याबद्दलचे मनुष्याचे ज्ञानही वाढत जाणार आहे. म्हणूनच विचारांच्या वाढीला मनाई करीत पूर्णविराम देणाऱ्या धर्मग्रंथातील विचार अंतिम आहे, असे ते मानत नाहीत. 

मनाची अशी घडण झालेल्या नानासाहेबांची राजकीय वाटचाल हा एका देशभक्त व्यक्तित्वाच्या मार्गक्रमणाचा  इतिहास आहे. त्या वेळी वातावरणच असे होते की, एखादी महत्त्वाची घटना घडली की, तिची प्रतिक्रिया म्हणून अशा प्रसंगी आपले काय कर्तव्य आहे, याचा विचार तरुण करू लागत. स्वातंत्र्य चळवळीतले एक आर्यसमाजी नेते स्वामी श्रद्धानंद यांचा अब्दुल रशीद नावाच्या एका मुस्लिमाने 1926 मध्ये खून केला आणि देशातल्या जातीय भावनांना उधाण आले. अशा काळात तरुणांत जातीय विचार बलवान होऊ नये, म्हणून मुद्दाम प्रयत्न करण्याची गरज तरुणांना भासू लागली. ख्यातनाम समाजवादी नेते व मुंबईचे महापौर युसूफ मेहरअली यांच्या पुढाकाराने 1928 मध्ये मुंबईत एक युथ लीग स्थापन झाली. तिच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते वीर नरिमन. काही दिवसांतच लीगची एक शाखा पुण्यात स्थापन झाली. नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, र. के. खाडिलकर हे तिचे पहिले सभासद. सगळेच विद्यार्थी. खोल्यांत दाटीवाटीने राहत. दहा-पंधरा लोक एकत्र बसू शकतील एवढी मोठी खोली कोणाचीच नव्हती. अशा वेळी आश्रय असे तो काकासाहेब गाडगीळ यांचा. त्यांच्या घरी युथ लीगच्या बैठका व्हायच्या. काकासाहेब हजर नसत, पण  आतिथ्याची व्यवस्था करून जात. पुण्यातल्या या मंडळींनी युथ लीगच्या तीन परिषदा घेतल्या आणि त्यासाठी अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि बाबू संपूर्णानंद यांना आणले. अशा पाहुण्यांनासुद्धा बहुतेक वेळी काकांच्या घरीच उतरवले जाई. 

समाजवादी विचारांच्या प्रसाराबरोबरच काही प्रत्यक्ष कृतीही करावी, अशी इच्छा युथ लीगच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाली. आचार्य शंकरराव जावडेकरांचे बौद्धिक मार्गदर्शन तर मिळतच होते. पुण्याच्या पर्वती देवस्थानात मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह करावयाचा, असे या तरुणांनी ठरवले. युथ लीगचे गोरे, एस.एम. यासारख्या कार्यकर्त्यांबरोबरच स्वतः काकासाहेब गाडगीळ, ब्राह्मणेतर पक्षाचे केशवराव जेधे आणि राजभोजांसारखे दलित या सत्याग्रहात सामील झाले. सनातन्यांच्या मोठ्या जमावाने सत्याग्रहींना मंदिरात येऊच दिले नाही. त्यांना अडवले आणि मारहाणही केली. या सत्याग्रहात तुरुंगवास नव्हता, फक्त विरोधकांकडून मार खाणे होते. 

तुरुंगात जाण्याचा योगही नानासाहेबांना लवकरच आला. पुढच्याच वर्षी, 1930 मध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. दांडीयात्रा सुरू होताच महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरही सत्याग्रह सुरू झाले. अलिबागला सत्याग्रह केलेल्या नानासाहेब गोऱ्यांना चार महिन्यांची शिक्षा झाली. शिक्षा संपवून ते बाहेर आल्यानंतर काही दिवसांनी नानासाहेब, एस.एम. आणि खाडिलकर या तिघांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. यूथ लीगमधील त्यांच्या कामाचा पोलिसी अहवाल या हा स्थानबद्धतेचा आधार असावा. याच वर्षी दिल्ली येथे काँग्रेसचे अधिवेशन भरवण्याचे ठरले होते. सरकारने त्याला बंदी घातली, असली तरी बंदीहुकूम मोडून अधिवेशन भरवावयाचे, असे काँग्रेसने ठरवले होते. स्थानबद्धतेतून सुटका होताच नानासाहेब सरळ दिल्लीला रवाना झाले आणि रेल्वे स्थानकावरच त्यांना अटक झाली. या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. प्रथम येरवड्याला आणि नंतर नाशिक तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. 

नानासाहेबांचा आणि त्यांच्या समविचारी मित्रांचा या वेळचा तुरुंगवास भारतीय राजकारणातील एका ऐतिहासिक घटनेला जन्म देणारा ठरला. जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, अशोक मेहता आदी मंडळी तेव्हा नाशिक तुरुंगातच होती. काँग्रेसही विविध मतांच्या कार्यकर्त्यांची स्वातंत्र्यासाठी लढणारी एक आघाडी आहे, तो एक विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञानच मानणारा पक्ष नाही, असे या तरुणांचे निरीक्षण होते. काँग्रेसमध्येच राहून समाजवादासाठी आग्रह धरणारा वेगळा पक्ष स्थापन करणे आवश्यक आहे, असा त्यांचा विचार झाला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नोव्हेंबर 1934 मध्ये मुंबईच्या वरळीतील रेडिमनी मॅन्शनमध्ये समाजवादी पक्षाची रीतसर स्थापना करण्यात आली. 

पुढच्या पाच दशकांचा नानासाहेबांचा आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या राजकीय जीवनाचा इतिहास भारतातील समाजवादी चळवळीच्या फाटाफुटीचा इतिहास आहे. समाजवादाच्या ध्येयावर निष्ठा असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे बळ पक्षाला मिळालेले होते. बेचाळीसच्या चळवळीने तर त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे नायकपदही बहाल केले होते. पण त्यानंतर पक्षातल्या काही नेत्यांना आपले अट्टहास कुठपर्यंत ताणावेत याचे भान राहिले नाही. कोणतीही संघटना अंतर्गत शिस्तीशिवाय टिकणार नाही, हे सत्य त्यांना माहीत नव्हते असे नाही; पण प्रत्यक्षात व्यक्तिगत अहंता व दुराग्रह हे पक्षशिस्त आणि पक्षाच्या भवितव्यापेक्षा मोठे ठरले. अनेकदा पक्ष तुटला आणि तो उभारणाऱ्या नानासाहेबांसारख्या अनेकांची मनेही भग्न झाली. गांधीजी आणि नेहरू या दोघांनाही समाजवाद्यांबद्दल प्रेम होते, काँग्रेसने त्यांचे सहकार्य घ्यावे अशीही त्यांची इच्छा होती; पण व्यवहारतः हे प्रत्यक्षात येणे अवघड झाले. आपण एक होऊ शकत नाही, तर वेगवेगळे दोन पक्ष (काँग्रेस आणि समाजवादी) कायम ठेवू, पण आपसात संघर्ष टाळू- असा मर्यादित समझोता करण्याचीही प्रयत्न झाला, पण तोसुद्धा सर्वांना पटला नाही. 

समाजवादी विचारांच्या विविध राजकीय गटांच्या एकत्रीकरणाचा अनेक वेळा प्रयत्न झाला व अनेक वेळा त्यात फाटाफूट झाली. काही वेळा कारणे अगदीच तकलादू असत, पण तीच पुरेशी ठरत. हा इतिहास जर वेगळा घडला असता तर लोकशाही समाजवादावर विश्वास ठेवणारा एक मजबूत पक्ष समाजवादी पक्षाच्या रूपाने उभा राहिला असत. अनेक चांगल्या शक्यता प्रत्यक्षात आल्या असत्या. काँग्रेसला एक लोकशाही धर्मनिरपेक्ष पक्ष पर्यायी म्हणून उभा राहिला असता. अशा पक्षामार्फत नानासाहेबांच्या मनातील उदारमतवादी लोकशाही प्रत्यक्ष राबवण्यात त्यांना सहभागी होता आले असते. सांसदीय संकेत पाळणारा एक तत्त्वनिष्ठ लोकशाही नेता म्हणून नानासाहेबांची कारकीर्द इतिहासात नोंदवली गेली असती. 

योगायोग असा की- नानासाहेबांना ब्रिटिश, निजामी आणि पोर्तुगीज अशा तिन्ही तुरुंगांत राहण्याचा प्रसंग आला. 1941 मध्ये हैदराबाद संस्थानातल्या गुलबर्ग्यात नानासाहेबांनी एक भाषण केले होते. ते युद्धविरोधी असल्याचा आरोप करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यासाठी त्यांना पुण्यात अटक करून गुलबर्ग्याला नेण्यात आले. या खटल्यात त्यांना वर्षभराची शिक्षा झाली. गुलबर्ग्याच्या तुरुंगात ते एकटेच राजकीय कैदी होते. त्यामुळे शिक्षेला एकांतवासाच्या शिक्षेचे रूप आले होते. या तुरुंगात त्यांनी ‘कारागृहाच्या भिंती’ ही तुरुंगवासातली टिपणे लिहिली आहेत. गुलबर्ग्यातल्या दहा महिन्यांच्या बंदीवासानंतर नानासाहेब सुटले आणि सरळ मुंबईत भूमिगत असलेल्या आपल्या मित्रांना जाऊन मिळाले. 

नानासाहेब गुलबर्ग्याच्या तुरुंगात जाण्यापूर्वी 1940 मध्येच गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मोहीम सुरू केली होती. निवडक कार्यकर्त्यांची राजकीय निष्ठा त्यामुळे पुन्हा उजळली गेली; परंतु या सत्याग्रहात सामुदायिक कृती नसल्यामुळे समाजजीवन ढवळून निघाले नव्हते. जे लोक तुरुंगाबाहेर उरले होते, त्यांच्या लक्षात आले की- व्यापक भारतीय राष्ट्रवादाचे संस्कार देणारी स्वायत्त स्वयंसेवक संघटना स्थापन केली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्रवादाचा प्रभाव आपोआप वाढत जाईल आणि हिंदुत्ववादी मंडळी आक्रमक होतील. अहमदनगरमध्ये आचार्य कृपलानींची सभा उधळली गेली होती. अशा परिस्थितीत नानासाहेब गोरे, शिरूभाऊ लिमये. वि. म. हर्डीकर आदींनी राष्ट्र सेवादलाची स्थापना करण्याचे ठरवले. पूर्वी फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी उभारलेल्या स्वयंसेवक दलाचे नाव राष्ट्र सेवादल असेच होते. त्याचे पुनरुज्जीवन आता होत होते. 

दि.9 जून 1941 रोजी राष्ट्र सेवादलाची स्थापना झाली. त्या दिवशीच्या प्रतिज्ञा समारंभात नाशिक तुरुंगातून सुटून आलेले एस.एम.सुद्धा सामील झाले होते. त्यानंतर त्यांनाच सेवादलाचे अध्यक्ष करण्यात आले. सातारला राष्ट्र सेवादलाचा एक मोठा मेळावा 1946 मध्ये झाला. अकरा-बारा हजार सैनिक तिथे जमले होते. त्यात ग्रामीण भागातून आलेली बहुजन समाजातली मुले मोठ्या प्रमाणात होती. आसपासच्या खेड्यांतून भाकरी जमा करून सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. या मेळाव्याला काँग्रेस कार्यकारिणीचे त्या वेळचे एक सभासद शंकरराव देव उपस्थित होते. बेचाळीसच्या चळवळीत समाजवादी मंडळींनी पुढाकार घेऊन, भूमिगत राहत चळवळ चालवली होती आणि शक्यतो प्राणहानी होऊ न देता सरकारी इमारती व यंत्रणेवर हल्ले चढवले. ही गोष्ट शंकरराव देवांना अमान्य होती. काँग्रेसअंतर्गत वेगळा गट किंवा पक्ष अस्तित्वात असू नये, अशी त्यांची भूमिका होती आणि सेवादलाचे नियंत्रणसुद्धा काँग्रेसच्याच हातात पाहिजे, अशीही त्यांची भूमिका होती. शंकररावांनी या मेळाव्यातल्या आपल्या भाषणात समाजवादी नेत्यांची आणि सेवादलाची शक्ती ‘शिवशक्ती’ आहे का, याबद्दलच शंका व्यक्त केली. पुढे त्यांच्याच पुढाकाराने काँग्रेस कार्यकारिणीने काँग्रेसअंतर्गत वेगवेगळे गट किंवा पक्ष असू नयेत, त्यांचे अस्तित्व असू नये असा ठराव केला आणि 1948 मध्ये झालेल्या नाशिकच्या अधिवेशनात समाजवादी पक्षाला काँग्रेसबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. 

राष्ट्र सेवादल ही 1940 ते 1970 अशी पंचवीस-तीस वर्षे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात परिवर्तन घडवू पाहणारी शक्ती होती. सेवादलात मोठ्या प्रमाणात विविध जातींचे तरुण सामील झाले होते. धर्मनिरपेक्षतेचे आणि समतेचे संस्कार त्यांच्यावर होत होते. या तरुणांतूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक चांगले कार्यकर्ते मिळाले. सेवादलासारख्या युवक संघटनांच्या अनेक गावांत भरणाऱ्या शाखा पुढे कमी-कमी होत गेल्या. 

बेचाळीसची चळवळ सुरू झाल्यावर गांधीजींच्या ‘करेंगे या मरेंगे’ या संदेशाचा आपला अर्थ लावून समाजवाद्यांनी भूमिगत चळवळ सुरू केली होती. यातील काही मंडळी मुंबईत मिळेल त्या एक-दोन जुन्या रिकाम्या जागांत राहत होती आणि तिथून चळवळ चालवत होती. या जागांना ‘मूषक महाल’ किंवा ‘हडळ हाऊस’ अशी एका अर्थाने समर्पक नावे त्यांनीच दिली होती. एकदा पोलीस छाप्यात नानासाहेबांसह मूषक महालातले सगळेच लोक पकडले गेले आणि 1946 च्या सुमारालाच सर्वांची सुटका झाली. 

पोर्तुगीज कारागृहाचा अनुभव मात्र नानासाहेबांना भारतीय स्वातंत्र्यानंतर आला. कारवारला 1954 मध्ये गोमंतक साहित्य संमेलन भरले होते. नानासाहेबच अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोमंतक मुक्त करण्यासाठी सत्याग्रह केला पाहिजे, अशी सूचना केली. ती गांभीर्याने केली होती आणि तिचे सर्वप्रथम पालन स्वतः करण्याचा त्यांचा इरादा होता. तिथून पुण्यात आल्याबरोबर एस.एम.शी त्यांनी चर्चा केली आणि थोड्याच दिवसांत शिरुभाऊ लिमये व सेनापती बापटांबरोबर गोव्यात जाऊन सत्याग्रह केला. गोव्यातील पोर्तुगीज राजवट हे काही कायद्याचे राज्य नव्हते. पोर्तुगीज हद्दीत प्रवेश करताच बापट आणि नानासाहेब या दोघांनाही जबरदस्त मारहाण करण्यात आली. बापटांना गोव्याच्या सरहद्दीबाहेर घालवून देण्यात आले, तर नानासाहेबांवर खटला चालला. या खटल्यात त्यांना सतरा वर्षांची शिक्षा झाली. प्रत्यक्षात तीन वर्षांनीच 1957 मध्ये जागतिक दडपणामुळे त्यांची सुटका झाली. 

एका वाङ्‌मयीन व्यासपीठावरून बोलताना नानासाहेबांनी ‘स्वातंत्र्याची महती आपण कृतीने दाखवू या’ असे आवाहन केले आणि प्रत्यक्ष तुरुंगवास भोगला. जीवनातल्या सर्व मूल्यांचा आधार स्वातंत्र्य हाच आहे, याची त्यांना जाणीव होती. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या एकसष्टी समारंभासाठी नानासाहेब औरंगाबादला आले होते. त्यानंतर ते माझ्याकडे जेवायला आले असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. ज्या कार्यक्रमाला ते आले होते, त्याच्या व्यासपीठावर पाहुण्यांनी फुले वाहण्यासाठी ज्या तसबिरी ठेवल्या होत्या, त्या समतावादी चळवळीच्या नेत्यांच्याच होत्या; त्यात गांधीजींची प्रतिमा नव्हती. ही गोष्ट सांगून नानासाहेब म्हणाले, ‘‘तिथे गांधीजीही पाहिजे होते. स्वातंत्र्याशिवाय समता येईल कशी आणि राहूच कशी शकेल? स्वातंत्र्य हाच समतेचा मूलाधार असतो.’’ स्पष्टवक्त्या नानासाहेबांनी ही गोष्ट तिथल्या भाषणातही सांगितली असणार. 

नानासाहेब गोव्याच्या तुरुंगातून बाहेर आले, त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. प्रजासमाजवादी पक्षाने संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील न होता तिला पाठिंबा द्यावयाचा व चळवळीतही भाग घ्यावयाचा, असा निर्णय घेतला होता. सत्तावन्न सालच्या निवडणुकीत पुणे शहरातून नानासाहेब गोऱ्यांनी लोकसभेची निवडणूक समितीपुरस्कृत समाजवादी उमेदवार म्हणून लढवली व ते निवडून आले. सत्तावन्न ते बासष्ट अशी पाच वर्षे ते लोकसभेचे सभासद होते आणि नंतर 1970 ते 1976 अशा सहा वर्षांच्या काळासाठी ते राज्यसभेवर निवडून आले होते. या दहा-अकरा वर्षांच्या सांसदीय कारकिर्दीत संसदीय संकेतांचा आदर करणारी पण आवश्यक तो विरोध स्पष्टपणे नोंदवणारा नेता अशी नानासाहेबांची ओळख प्रस्थापित झाली होती. 

अशाच एका प्रसंगी संसदेतील भाषणानंतर ते खाली बसले, तेव्हा इंदिरा गांधींची एक चिठ्ठी त्यांना मिळाली. ‘तुमचे भाषण समक्ष ऐकण्याची माझी इच्छा होती, पण मला सभागृहात येता आले नाही; तरीही मी कार्यालयातच बसून ते भाषण ऐकले,’ असे त्यांनी लिहिले होते. समकालीन राज्यसभा सदस्य उमाशंकर जोशींनी नानासाहेबांबद्दल लिहिले आहे, ‘संसदेला ज्या प्रौढ अनुभवी राजकीय नेत्यांमुळे तेज चढले, त्या नेत्यांपैकी ते एक होते. ते बोलण्यासाठी उभे राहिले की, सर्वांचे लक्ष वेधून घेत. वाटेल तेव्हा ते बोलत नसत. उच्च अपेक्षा बाळगून त्यांचे बोलणे ऐकावेसे सर्वांना वाटे. बोलण्याची ढब संयत आणि शांत, मात्र लक्ष्य असेल त्याचा सरळ वेध घेणारी. सहानुभूतीची व्यापकता आणि सखोलपणा यामुळे उदात्त स्वरकंप कधी-कधी अवश्य जाणवे. संसदेतील माझ्या अनुभवाप्रमाणे मी गोरे यांच्याप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्रश्नाबाबत विशाल राष्ट्रहिताच्या दृष्टीने सखोल, धीरगंभीर चर्चा करणारे दुसरे कोणी (खासदार) पाहिले नाहीत.’ 

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाला मोठे बहुमत मिळाले. एवढा प्रचंड विश्वास त्यांच्यावर टाकणाऱ्या जनतेचे दुर्दैव लगेच उभे राहिले. अनेकांनी मनात जोपासलेली अहंता उफाळून आली आणि मानापमानाची नाटके सुरू झाली. मंत्रिमंडळात मी येणार नाही, असे जाहीर करीत पक्षालाच धोक्यात आणणारांच्या नाकदुऱ्या काढायला नानासाहेब गोरे, एस. एम. आणि राजमोहन गांधी प्रयत्न करू लागले. (अशा कामाला तेच मोकळे होते, कारण त्यांना कोणतेच पद नको होते.) मंत्रिमंडळ कसेबसे तयार झाले. नंतर नानासाहेबांना ब्रिटनमध्ये भारताचे राजदूत म्हणून पाठवण्यात आले. नानासाहेबांच्या मानाने पद छोटे होते, हे खरे; पण त्यांच्या वागण्याची आदब, त्यांचा भारदस्तपणा आणि तरीही सतत प्रगट होणारी माणुसकी व स्नेह यांच्यामुळे ते राजदूतपदही मोठे झाले. नानासाहेब त्या पदावर असतानाच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जेम्स कॅलहन भारतात आले होते. 

राष्ट्रपती भवनातील सन्मान भोजनानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, ‘‘भारताचे राजदूत म्हणून इंग्लंडमध्ये वास्तव्य करणारे श्री. ना. ग. गोरे हे केवळ राजदूत नसून भारतातील जनतेचे मन समर्थपणे इंग्लंडच्या जनतेसमोर उकलून दाखवणारे भारताचे खरे प्रतिनिधी आहेत.’’ मोरारजींचे सरकार पडले आणि  चरणसिंह पंतप्रधान झाले. सरकार बदलल्याबरोबर नानासाहेबांनी राजदूतपदाचा ताबडतोब राजीनामा दिला आणि ते परत आले. थोड्याच दिवसांत त्यांनी ‘साधने’चे संपादक म्हणून काम करायला प्रारंभ केला. त्यांच्या दृष्टीने भारताचा राजदूत आणि ‘साधने’चा संपादक ही दोन्ही सारखीच कर्तव्ये होती. 

आपण राजकारणात का पडलो, याचे कारण नानासाहेबांनीच सांगितले आहे. ‘‘मी सौंदर्यपूजक असल्यामुळेच मी राजकारणाकडे वळलो, हे लोकांनी ध्यानात घ्यायला हवं. सौंदर्यपूजकाची अनुभूती जेव्हा अतिशय तीव्र होते, तेव्हा त्याच्या ध्यानी येते की- कागदक लमातून अभिव्यक्त होऊन त्या अनुभूतीचं समाधान होत नाही; उलट अभिव्यक्तीसाठी अखेर जीवनाचेच माध्यम करावे लागते, कारण सभोवारची असुंदरता त्याला असह्य होते. तिच्या निवारणाच्या प्रयत्नाला लागले म्हणजे ती उत्कट अनुभूती समाधान पावते. मी सौंदर्यपूजक असल्यामुळे मी राजकीय रणकंदनात उतरलो आहे.’’ 

सभोवतालच्या असुंदरतेचे निवारण करण्यासाठी नानासाहेब राजकारणात आले, पण तरीही त्यांच्यातला रसिक जीवनाची विविध रूपे आणि व्यक्तिभावना शब्दांत टिपतच होता. घाईगर्दीच्या आयुष्यातही नानासाहेबांमधला तत्त्वचिंतक आणि सौंदर्यपूजक साहित्यिक सतत जागा असे. 

फर्ग्युसन महाविद्यालयात गोरे जेव्हा शिकत होते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा बदल होत होता. स्वातंत्र्यासाठी आपण काही करावे, या प्रेरणेतून युथ लीगची स्थापना तर झालीच होती. दुसरीही एक स्वाभाविक प्रेरणा- नानासाहेबांच्या मनात एक कोमल भावना निर्माण करत होती. महाविद्यालयात बरोबर शिकणाऱ्या सुमती देसाईंचा त्यांचा परिचय झाला होता आणि तो वाढत जाऊन त्याचे रूपांतर स्नेहात झाले होते. दोघांनी एकमेकांच्या जीवनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. नानासाहेबांची सुमतीबाईंशी लग्न विधवेविषयीच्या कणवेच्या भावनेतून केलेले नव्हते. तारुण्यसुलभ प्रेमभावना निर्माण झाल्यानंतर विचारांती त्यांनी घेतलेला तो निर्णय होता. अर्थात हा निर्णय घेताना सुमतीबाई विधवा आहेत, त्या कोकणस्थ ब्राह्मण नाहीत, या दोन्ही गोष्टी आणि त्याचे संभाव्य परिणाम त्यांनी लक्षात घेतले होते. जुन्या परंपरांना घट्ट चिकटलेले आपले वडील सुमतीबाईंना सून म्हणून स्वीकारणार नाहीत, याची त्यांना कल्पना होती. घराबाहेर निघूनच आपल्याला सहजीवन सुरू करावे लागेल, हे त्यांना माहीत होते. 

हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलं होतं आणि निष्ठापूर्वक निभावलं होतं. वेगळे घर केल्यानंतर नानासाहेबांना राजकीय काम निर्वेधपणे करता यावे म्हणून सुमतीबाई शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. नानासाहेब सुमतीबाईंना अतिशय आदराने वागवत. त्यांना बरोबरीची वागणूक हा केवळ देखावा नसे, ती अंतःकरणातून आलेली स्वाभाविक भावना होती. सुधाताई वर्दे यांनी नवरेमंडळींबद्दल एक परखड निरीक्षण नोंदवले आहे. ‘‘आमचे खूप समाजवादी नेते, सहकारी पाहिले; पण बायकोशी त्यांचं वागणं पाहिलं की त्यांच्यातला नवरा, त्यांच्यातला पुरुष डोकावतोच. नानासाहेबांसारखे काही अपवाद.’’ 

सुमतीबाईंना 1946 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आणलं होतं. त्यांच्या सर्व सार्वजनिक कामांतही ते मदत करीत. पुढे सुमतीबाईंना दम्याचा विकार झाला. शेवटची अनेक वर्षे तर त्या मानसिक दृष्ट्या विकल झाल्या होत्या. त्याही काळात नानासाहेबांनी त्यांना अजिबात न दुखावता सांभाळलं. दिल्लीला राहत असताना संध्याकाळी सुमतीबाईंचा हात धरून त्यांना कॅनॉट प्लेसमध्ये ते फिरायला घेऊन जात. एखाद्या स्नेह्याकडे जायचे, असे त्या म्हणत आणि तिथे पोहचल्या-पोहचल्या आपण परत जाऊ या म्हणत. नानासाहेब त्यांना घेऊन परत निघत. 

कठोर विचारनिष्ठा असलेल्या नानासाहेबांचे अंतरंग सुमतीबाईंच्या स्मृतीने सतत ओलावलेले असे. 

सुमतीबाईंच्या निधनानंतर नानासाहेबांचे राज्यसभेतले सहकारी आणि प्रसिद्ध साहित्यिक उमाशंकर जोशी यांनी त्यांना गुजरातीत सांत्वनपर पत्र लिहिले. नानासाहेबांचे उत्तरही गुजरातीतच होते. त्यांनी उत्तरात सुमतीबाईंबरोबरच्या आपल्या सहजीवनाबद्दल लिहिले होते, ‘आमचे सहजीवन समान जीवनकार्यावर आधारित होते.’ 

सभोवतीची असुंदरता, कुरूपता निवारण्याचा प्रयत्न करताना एक उत्कट समाधान लाभते म्हणून आपण राजकारणात पडलो, असे नानासाहेबांनी म्हटले आहे. नानासाहेबांच्या राजकारणाच्या प्रारंभाबद्दल हे विधान खरे आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत योगक्षेम कसा चालेल याची काळजी न करता अनेक तरुण राजकारणात गेले. स्वातंत्र्याची  आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना सुंदर होती, यात वादच नाही. पुढे सत्तेचे राजकारण जेव्हा सुरू झाले तेव्हा राजकारण इतके गढूळ होत गेले की, ते स्वच्छ करण्याची आकांक्षा धरणे, हाच वेडेपणा ठरू लागला. राजकारणात नानासाहेबांसारखी माणसे आली आणि तेवढ्यापुरते काही चांगलेही झाले. राजकारण नेहमीसाठी सुंदर करणे, ही तशी अशक्यच गोष्ट होती. नानासाहेबांमधल्या लेखकाने मात्र मराठी वाचकांना उदातत्तेचा, सौंदर्याचा अनुभव देणारे पुष्कळ दिले आहे. 

पुष्कळ वेळा व्यक्तीची आवड निराळीच असते आणि आपद्‌धर्म म्हणून त्याला दुसरेच काम करावे लागते. स्वातंत्र्याच्या चळवळीची हाक इतकी प्रबळ होती की, अनेकांच्या मूळ इच्छा व प्रेरणा त्यांनी दाबून ठेवल्या आणि त्यांनी चळवळीत स्वतःला झोकून दिले. नानासाहेब स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले नसते आणि एखादा व्यवसाय किंवा नोकरी शांतपणे करीत राहिले असते, तर त्यांच्यातला लेखक अधिक बहरला असता का- याचे उत्तर मात्र ‘नाही’ असेच द्यावे लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीत आलेल्या अनुभवातून, त्या वेळी पाहिलेल्या माणसांतून नानासाहेबांतला लेखक अधिक समृद्ध झाला, असेसुद्धा म्हणावे लागेल. जुन्या परंपरांच्या शृंखलातून मुक्त होऊन स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा जेव्हा नानासाहेबांनी घेतली, तेव्हाच त्यांच्यातला स्वातंत्र्यप्रेमी तरुण जसा जागा झाला तसाच त्यांच्यातला रसिक लेखकही जागा झाला. साहित्याचीसुद्धा मूलभूत प्रेरणा स्वातंत्र्य हीच आहे. 

सगळ्याच समाजवाद्यांना जवाहरलाल नेहरूंविषयी प्रेम वाटत असे. लोहियांसारख्या एखाद्याच्या प्रेमाचे विरोधभक्तीत रूपांतर होई, पण ते मुळातले प्रेमच असे. नेहरूंच्याही मनात समाजवाद्यांविषयी प्रेम होते. जवाहरलाल नेहरूंची सुसंस्कृतता, त्यांचे वाचन व बुद्धिमत्ता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे- त्यांची लोकशाहीवरील अंगभूत श्रद्धा. या गोष्टींचे आकर्षण वाटणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. एकदा नानासाहेबांनी ‘नेहरू : एक साहित्यिक’ या विषयावर पुण्यात इंग्रजीत भाषण दिले होते. नेहरूंच्या जीवनाचा आणि विचार-विश्वाचा मराठी वाचकांना परिचय करून द्यावा म्हणून नानासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला आहे. 

नानासाहेबांनी पुष्कळ ललित लेख व ललित गद्य लेखन केले. हे लेखकाच्या अंतरंगाचे दर्शन घडवणारे असते. तो जितका प्रगल्भ, जीवनाविषयीचे त्याचे चिंतन जितके खोलवर आणि सौंदर्य टिपण्याची त्याची वृत्ती जेवढी स्वाभाविक- तेवढे हे ललित लेखन वाचकाच्याही अंतःकरणाला भिडणारे होते. मराठीत ललित निबंधाचा जन्म झाला तेव्हा प्रारंभीच्या लेखनात एक साचाच ठरून गेला होता. खिडकी, सिगारेट असल्या कुठल्या तरी अगदीच नगण्य आणि परिचयाच्या वस्तू घेऊन तिच्याभोवती कृत्रिमरीत्या लालित्य निर्माण करावयाचे, अशी कसरत केली जात असे. नंतर काहींनी अशा ललित गद्याला काव्यात्म रूप देण्याचा प्रयत्न केला. ती काव्यत्मकताही कृत्रिम आहे, हे सहज लक्षात येत होते. दुर्गाबाई भागवत मात्र याला अपवाद होत्या. त्यांनी जे ललित लेखन केले आहे, त्यात कोणतीही कारागिरी नाही. अंतःकरणाला भावलेले आणि आपल्या विचारविश्वाचा भाग झालेले फक्त लिहिले. त्यातले लालित्य हा त्याचा अंगचाच गुण होता. आणखीही काही उदाहरणे देता येतील. 

नानासाहेब गोऱ्यांनी जे ललित गद्य लेखन केले आहे, तेसुद्धा एखादी वास्तू किंवा वस्तूच्या अगर एखाद्या व्यक्तीच्या निमित्ताने केलेले असले तरी आत्माविष्कार हाच त्याचा प्राण असतो. त्यात नानासाहेबांच्या विचारांचा भाग येणे स्वाभाविक असते. ‘धुमकुडिया’ या नावाने ओळखला जाणारा आदिवासी समाजातील एक विशेष उत्सव नानासाहेब जेव्हा सांगतात, तेव्हा समुदायाने आनंद उपभोगण्याचे सांस्कृतिक विशेष आता फक्त आदिवासी समाजातच शिल्लक राहिले आहेत, शहरी समाजात आपण नवीच मूल्ये आणली याबद्दलची आपली बोचही व्यक्त करतात. त्यांनी लिहिले आहे, ‘शुभा, आपणा भारतीय लोकांची दशा एखाद्या म्हाताऱ्या, जगाला विटलेल्या, मरगळून गेलेल्या माणसासारखी झालेली आहे. बेहोश होणे, आनंदाने उसळणे, नाचणे, गाणे आणि त्या वेळी सारा औपचारिकपणा विसरून जाणे- या गोष्टी जणू काही आपल्याला जमतच नाहीत.... निकोप, खेळीमेळीचे, सरमिसळ जीवन आपल्याला साधतच नाही. स्त्रिया आणि पुरुष एकत्र नाचले तर जग बुडेल, असे आपणास वाटते. आजोबा आणि नातू एकत्र बागडले, तर सगळा शिष्टाचार संपुष्टात आला, अशी आम्ही कल्पना करून घेतलेली आहे. आजच्या आपल्या जीवनाच्या हा दगडी शुष्कपणा जर नाहीसा होईल, त्यामध्ये जर थोडी अधिक क्रीडेची टवटवी आणि आनंदाचा रस उतरेल तर फार बरे होईल, असे मला वाटते.’  त्यांच्या ललितगद्याने अनेक रूपे धारण केली आहेत. 

युसूफ मेहरअली यांचा अंत्यसंस्कार आटोपून आल्यानंतर त्यांनी जे लिहिले आहे तो आपल्या त्या मित्राशी एक संवाद आहे. तर अचानक घडलेल्या दोन रसिकांमधला एक संवाद आहे. लोकमान्यांच्या पुण्यस्मरणाच्या एका कार्यक्रमासाठी हैदराबादला गेले असताना गौरी कीर्तनेंनी अचानकपणे ‘सी. डीं.ना भेटायचे का?’ विचारले आणि एक अविस्मरणीय अनुभव नानासाहेबांना मिळाला. एकाच सांस्कृतिक पातळीवर येऊन एकमेकांचा अनुभव वाटून घेणारे समानशील हल्ली फार क्वचितच भेटतात. चिंतामणराव आता वृद्ध झाले होते, पण त्यांचे ते म्हातारपणसुद्धा सुंदर होते. ‘एक शांत सुंदर पिकणे’ हा या भेटीच्या आनंदात वाचकालाही समाविष्ट करून घेणारा ललित लेखही सुंदर आहे. अर्ध्या-पाऊण तासाची भेट, पण त्यात आठवण कशाची निघावी तर लोध्र पुष्पाची! त्याचा उल्लेख कुठे आला आहे, ते कसे असेल, याबद्दल संस्कृतचे ते दोन्ही जाणकार अंदाज करू लागले. कालिदासाच्या रघुवंशात गर्भवती राणीचा उल्लेख ‘मुखेन सालक्ष्यत लोध्रपाण्डुना’ असा तो उल्लेख आहे. नानासाहेबांनी मेघदूताचा समछंदी अनुवाद केलेला आहे. उत्तर मेघातही लोध्राचा निर्देश येतो. 

‘उत्तर मेघात कुठे बरं?’ असा प्रश्न करून सीडी जरा थांबले आणि नंतर एक-एक ओळ हलक्या आवाजात म्हणू लागले. 

हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धं 
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामाननश्री: । 
चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णे शिरीषं 
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम्‌ ॥ 

कालिदासाचे संस्कृत पद्य सी. डी. म्हणत होते आणि नानासाहेबांच्या मनात त्यांनीच केलेला त्याचा अनुवाद जागा होत होता. 

खेळविती हातीं कमळासी, कुंदकळ्या केसांत 
लोध्रफुलांतिल शुभ्र रजांनी मुखास उजळवतात । 
कोरांटीची वेणी नाजुक, शिरीष कानीं डुलतें 
प्रमदा-भांगीं फूल कदंबी तव सांगाती ये, ते ॥ 

माणसाच्या रसिकतेला त्याची संस्कृती घडवत असते. आपण आधुनिक बनताना अनावश्यक म्हणून अनेक गोष्टी संस्कृतीतून वगळून टाकतो. त्या मागासलेल्या आहेत, असे समजतो. संस्कृत भाषा आणि वाङ्‌मयाची फांदीसुद्धा अशीच आपण छाटून टाकली, त्याबरोबरच आपली काही मुळेही गेली. चिंतामणराव देशमुखांकडून परत येत असताना गौरी कीर्तनेंकडे वळून नानासाहेब म्हणाले, 'Is'nt he ageing?’ (‘सीडी किती सुंदरपणे म्हातारे होत आहेत!’) तिेथून परत जाताना नानासाहेबांच्या मनात विचार आला- ‘माझ्या व्यक्तित्वाची ही दडस कैरी अशीच लोभसवाण्या पाडाला येईल का?’ 

नानासाहेबांनी ‘कोंबडा’ नावाची एक कथा लिहिली आहे. वाढीस लागलेल्या एका मुलाला आपले स्वतंत्र जग असावे, असे वाटते. आपल्यासाठी असे ते जग आपल्या काकासाहेब गाडगीळ नानासाहेब गोरे एस.एम.जोशी  भावविश्वात तो निर्माणही करतो. त्याच्या त्या जगात केंद्रस्थानी असते एक कोंबड्याचे पिलू. नानासाहेबांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्या मुलाच्या अनुभवाशी एकरूप होण्याची ताकद लक्षणीय आहे. ललित लेखन करणाऱ्या लेखकाचे बहुश्रुतपण, संवेदनशीलता आणि त्याची चिंतनशीलता हे दोन्हीही त्याच्या लेखनाला समृद्ध करीत असते. उषा मेहतांच्या एका पत्राला उत्तर लिहिताना त्यांनी जी कविता पाठवली होती, ती म्हणजे जवळजवळ त्यांचे आत्मचरित्रपर निवेदनच आहे. ही कविता अशी... 

मी एक अश्वत्थ जुनापुराणा 
अजून ताठ कण्याने उभा 
पण मी उभा आहे तो शिरावर 
अठ्ठ्याहत्तर वर्षांचा भार पेलीत 
एक एक फांदी निबर होत जातेय 
माझ्या शुष्क सालीवर भस्म चढलेय 
जळून गेलेल्या कालकणांचे 
मातीचे थरामागून थर विंधीत 
अभेद्य पाषाण भेदीत 
दहा पुरुष खोल गेलेली माझी पाळे 
पाण्याचा थेंबही शोषीत नाहीत. 
.... 

ही तुझी अवेळी साद, अवेळी दाद 
मी तुला दुरून जाताना पाहिले आजवर 
शुभ्र उत्फुल्ल तू 
आपल्याच गंधात बुडालेली तू 
ओठावर हास्य लिसाचे 
पण डोळ्यांत दूरभाव 
आता कसे तुटावे ते अंतर? 
मी तर अश्वत्थ जुनापुराणा 
तरीही कधी वाटलेच तर ये 
पारावर टेक क्षण दोन क्षण 
माझी वत्सल सावली संपली असली तरी 
आशीर्वादाचे एखादे सुके पान 
मी ढाळीन तुझ्या मस्तकावर. 

शुभा जोशी ही नानासाहेबांची मुलगी. लग्न झाल्यानंतर अमेरिकेत पीटसबर्ग येथे ती स्थायिक झाली. वर्षातून निदान दोन महिने नानासाहेब अमेरिकेत तिच्याकडे जात. आपल्या मुलीवर नानासाहेबांचा असलेला जीव तिच्या लहानपणापासून त्यांनी तिला लिहिलेल्या पत्रांतून व्यक्त झाला आहे. पत्रात फक्त शब्दच बोलतात असे नाही, तुरुंगात असूनही नानासाहेबांनी अशी अनेक पत्रे फुलांनी, वेलबुट्टींनी रंगवलेली आहेत. ज्या मुलीला वडलांकडून अशी रंगीत पत्रे आली, तिचे बालपण सुंदर झाले असणारच. नानासाहेबांमधला चित्रकार कोंबडासुद्धा चित्रित करतो. शब्दांच्या सामर्थ्याइतकेच रेषा-रंगांचेही सामर्थ्य नानासाहेबांजवळ होते. 

अनेकदा मतभेद झाले आणि एकदा तर दोन वेगवेगळ्या पक्षांचे एस. एम. आणि नानासाहेब राष्ट्रीय अध्यक्षही झाले, पण त्यांची मैत्री मात्र आयुष्यभर अभेद्य राहिली. जीवात जीव गुंतलेला असावा, अशी ती मैत्री होती. आपल्यानजीक आलेल्या मृत्यूचा उल्लेख एस. एम.नी ताराबाईंजवळ केला आणि ताराबाईंनी तो नानासाहेबांना सांगितला, तर नानासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू पाझरू लागत. एस. एम. यांच्या आजारपणामुळे काही कार्यक्रमात त्यांची भूमिका नानासाहेबांना पार पाडावी लागली आणि भाषणाच्या ओघात एस. एम.चा उल्लेख करावा लागला, तर त्यांचा कंठ दाटून येई. नानासाहेबांच्या गौरवग्रंथाला प्रास्ताविक लिहिताना एस. एम.नी लिहिले आहे, ‘आमची शरीरे वेगळी असली, स्वभाव भिन्न असले तरी जीवने एकसंधच आहेत. तरुण माणसांनी आमच्यापासून धडा शिकला पाहिजे. कितीही मतभेद असले, भांडलो तरी जिव्हाळा संपला नाही; म्हणून तर मी त्यांना या लेखाच्या प्रारंभी परममित्र म्हटले आहे, मला तो शब्द आवडतो म्हणून नव्हे!’ 

दिल्लीतल्या एका भेटीत एका स्नेह्याने त्यांना विचारले, ‘‘स्वातंत्र्यासाठी लढलात ते मिळाले. गोवा मुक्त झाला. महाराष्ट्र मिळाला. लोकशाही समाजवाद आता धूसर होत चालला. पक्षाला नित्य पडझडीने ग्रासलेले. शुभाताईंकडे जाऊन राहावंसं वाटत नाही का?’’ नानासाहेब ठामपणे म्हणाले ‘‘इतिकर्तव्य संपलं, असं अजून वाटत नाही. या भूमीत जन्मलो, वाढलो, समरस झालो; ती भूमी आता कशी नि कशासाठी सोडायची?’’ दि. 1 मे 1993 रोजी नानासाहेबांचा देह याच भूमीमध्ये विसावला. 

Tags: न्या. नरेंद्र चपळगावकर साधना समाजवादी नानासाहेब गोरे ना ग गोरे एस एम जोशी s m joshi samajvadi socialist n g gore Narendra chapalgaonkar on n g gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरेंद्र चपळगावकर,  औरंगाबाद, महाराष्ट्र ( 42 लेख )
nana_judge@yahoo.com

निवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद पीठ.  वैचारिक लेखक.   न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख. 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. 


Comments

  1. Digambar Ugaonkar- 05 Dec 2020

    खूप सुंदर्ख़ुफ आद वणी आल्या.१९५५ चा का ळ आटवला

    save

  1. Pandhurang dhopdeshwarkar- 15 Jun 2021

    सुरेख लेख.नानासाहेब गोरे यांची उत्तम परिचय करून दिला

    save

  1. Prabha Purohit- 16 Jun 2021

    ना.ग.गोरे यांचे अत्यन्त विलोभनीय व्यक्तीचित्र ! नानासाहेबांची सी डी देशमुखांबरोबरची भेट खूप भावली. एक राजकारणी आणि एक अर्थशास्त्रज्ञ आणि दोघांनाही कालिदास मुखोद्गत ! भेट एक सुंदर संयोग !

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी