डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या आश्रमाचा खर्च सार्वजनिक पैशातून चालतो याची गांधीजींना नेहमीच आठवण असे. आश्रमातल्या सर्वांनी कोणते ना कोणते शारीरिक श्रमाचे काम केले पाहिजे, असा त्यांचा नियम असे. अगदी पाहुण्यांनासुद्धा या नियमातून सूट नसे. एखाद्या पाहुण्याने थोडी भाजी निवडली तर त्यामुळे किती पैसे वाचतील, हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता. आपण सार्वजनिक पैशावर जगतो, शक्यतो तो आपण कसा वापरला पाहिजे, याची ती जाणीव होती.

पंधरा-वीस लोकच असतील. आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मधु दंडवतेंना श्रद्धांजली वाहिली जात होती. बापू दंडवत्यांच्या काही आठवणी दाटल्या कंठांनी सांगत होते. आपला मृत्यू जवळ आला आहे हे कळाल्यानंतर एके दिवशी घरी आलेल्या बापूंना दंडवत्यांनी घरातले एक छोटे कपाट उघडून दाखविले आणि त्यात ठेवलेली छोटीशी रक्कमही दाखवली. 'प्रमिला गेली तेव्हा झाला तसा त्रास पुन्हा होऊ नये म्हणून माझ्या अंत्यविधीसाठी करावयाच्या खर्चाची रक्कम येथे ठेवलेली आहे, ती वापरावी.' भारताचा एकेकाळचा अर्थमंत्री, रेल्वेमंत्री आपल्या अंत्यविधीच्या खर्चासाठी मित्रांची अडचण होऊ नये म्हणून, केलेली तरतूद दाखवत होता. त्याचवेळी आणखीही एक गोष्ट दंडवत्यांनी बापूंना सांगितली. 'मी गेल्यानंतर महिन्याभरात दिल्लीतील सरकारी घर रिकामे करून परत केले पाहिजे असेही माझ्या मुलाला सांगितले आहे.'

मधुजींच्या या सांगण्याप्रमाणे ते जाताच घराची आवराआवर सुरू झाली आहे, हेही बापूंनी सांगितले. दंडवत्यांचा हा दंडक ऐकणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत होता. सार्वजनिक जीवनातील अशी पथ्ये नेहमीच पाळणाऱ्या दंडवत्यांच्या जीवनातील अखेरचे असे काही प्रसंग बापू सांगत होते आणि आम्हांला कालच दूरचित्रवाणीवर पाहिलेली बातमी आठवत होती. न्यायालयाने दिल्लीत बेकायदेशीररीत्या सरकारी घरे बळकावून बसलेल्या उच्चपदस्थांविरुद्ध कारवाई करण्याचा सरकाराला आदेश दिला होता. घरे रिकामी करण्याच्या नोटिसांना दाद न देणारे राजकीय पुढारी ज्या काळात बहुसंख्य आहेत, त्या काळात जुन्या निष्ठा जपणारा एक अपवाद बापू सांगत असलेल्या आठवणींतून भेटत होता.

दंडवते ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून घडले होते, त्या लढ्यात ही मूल्ये अनोळखी नव्हती, सरदार वल्लभभाई पटेलांचे एक चरित्र बी.कृष्णा या पत्रकाराने लिहिले आहे. त्या चरित्रात एक आठवण सांगितलेली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर डेहराडूनच्या शासकीय विश्रामधामात वल्लभभाई विश्रांती घेत होते. महावीर त्यागी त्यांना भेटावयास गेले. वल्लभभाईंची आयुष्यभर काळजी घेणाऱ्या त्यांच्या कन्या मणीबेन तेथे होत्या. त्यांच्या खादीच्या साडीला एक भलेमोठे ठिगळ जोडलेले होते. त्यागीचा स्वभाव थट्टेखोर होता. ते मणीबेनना म्हणाले, "राम, कृष्ण, अशोक, अकबर आणि ब्रिटिश या सर्वांपेक्षा मोठे साम्राज्य ज्याने निर्माण केले अशा बापाची तू मुलगी आणि असे ठिगळ असलेली साडी तू वापरतेस हे तुला शोभते का?" वल्लभभाईंनी हस्तक्षेप करून म्हटले, 'तिला माहीत आहे की ती एका गरीब बापाची मुलगी आहे.' सुशीला नायर तेथे हजर होत्या. त्यांनी सत्य काय ते त्यागींना सांगितले. त्या म्हणाल्या, 'मणीबेन दिवसभर वडिलांची सेवा करते. त्यानंतर डायरी लिहिते, नंतर चरख्यावर सूत कातते. त्या सुताचेच कुडते आणि धोतर सरदार वापरतात. वल्लभभाई खादी भांडारातून कापड विकत आणीत नाहीत. वल्लभभाईंची धोतरे आणि कुडते फाटले म्हणजे मणीबेन त्याच्याच साड्या शिवते आणि त्या वापरते. तिने खादीची नवी साडी कधी विकत घेतलेली नाही.

वल्लभभाई भारताचे गृहमंत्री होते. खूप जोरात चालत असलेली वकिली सोडून देऊन गांधींच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या चळवळीत पडले होते. प्रचंड सत्ता हातात होती. अलोट श्रीमंती असलेल्या संस्थनिकांना त्यांनी नमवले होते; पण ते आणि त्यांची मुलगी मात्र गरीबच होते. मणीबेन आणि सरदार यांची आणखीही एक आठवण नमूद केलेली आहे. मणीबेनने काही महत्त्वाचा निरोप देण्यासाठी अहमदाबादला एक तार केली. ही तार घरगुती निरोप सांगणारी आहे. सरकारी कामाची नाही म्हणून या तारेचे पैसे सरदारांनी मणीबेनना सरकारात जमा करावयास लावले अशी ती आठवण आहे.

गांधीजींच्या जीवनातील तर असे अनेक प्रसंग सांगता येतील. आपल्या आश्रमाचा खर्च सार्वजनिक पैशातून चालतो याची गांधीजींना नेहमीच आठवण असे. आश्रमातल्या सर्वांनी कोणते ना कोणते शारीरिक श्रमाचे काम केले पाहिजे, असा त्यांचा नियम असे. अगदी पाहुण्यांनासुद्धा या नियमातून सूट नसे. एखाद्या पाहुण्याने थोडी भाजी निवडली तर त्यामुळे किती पैसे वाचतील, हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता. आपण सार्वजनिक पैशावर जगतो. शक्यतो तो आपण कसा वापरला पाहिजे याची ती जाणीव होती.

गांधीजी आणि सरदार ही तर फारच मोठी माणसे. पण त्यांच्या जीवनात त्यांनी जी मूल्ये स्वीकारली, अंगीकारली, आचरली ती त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात खालच्या स्तरापर्यंत झिरपत आली. अनेक लहान माणसांची जीवने या मूल्यांच्या स्पर्शाने पावन झाली. माझ्याच घरात घडलेला एक छोटासा प्रसंग मला आठवतो. स्वातंत्र्याची चळवळ नुकतीच संपली होती. माझ्या वडिलांनी स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकाळ भाग घेतला होता. जिल्हा काँग्रेसचे ते तेव्हा अध्यक्ष होते. जिल्हा काँग्रेस जवळ एक जीप होती. तेव्हा आमच्या लहान गावात फारशी वाहनेच नव्हती. खाजगी मालकीची मोटारच गावात नव्हती. गावात भाड्याने मिळणारेही वाहन नव्हते. याच काळात माझी मुंज झाली. घरात जमलेल्या काही नातेवाईकांनी माझी भिक्षावळीची मिरणूक जीपमधून काढावी, अशी सूचना केली. त्या काळात मोटारीत अशी मिरवणूक हे मोठेच अप्रूप होते. माझ्या आईने ही गोष्ट भीतभीतच वडिलांजवळ काढली. 'जीप काँग्रेसची आहे. पक्षाच्या कामालाच ती वापरायची आहे, घरच्या नाही.' वडिलांनी स्पष्ट उत्तर दिले व जीप वापरू देण्यास नकार दिला.

इतिहासाच्या, मागच्या पिढ्यांच्या, आठवणीच पुढे उरतात हे ठीक आहे; परंतु त्यांनी जपलेली मूल्येही फक्त आठवणीतच उरली तर कसे?

Tags: स्वातंत्र्यलढा भारतीय समाज नैतिक शिक्षण मूल्यशिक्षण मूल्य Indian Society Moral Values Ethics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

न्या. नरेंद्र चपळगावकर,  औरंगाबाद
nana_judje@yahoo.com

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके