डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इतर देशांना मी दिलेल्या भेटी (खरे म्हणजे त्या देशांची मी घेतलेली भेट) या सहलीला गेलेल्या प्रवाशाच्या भेटी होत्या. इंग्लंडला मात्र मी वेगळ्याच भावनेने येत होतो. जी घटनात्मक व्यवस्था स्वतंत्र भारताने अमलात आणली आहे, जी न्यायव्यवस्था आपण स्वीकारली आहे, देशाची संपर्क भाषा म्हणून जी भाषा आपण वापरतो, त्या सगळ्यांचे जन्मस्थान मला पाहावयाचे होते. लोकशाही व्यवस्था आणि तिचा पाया असलेला उदारमतवाद ज्या देशातून आपण आयात केला तो देश पाहणे म्हणजे भारताच्या संस्कृतीवर कलम करणाऱ्या एका दुसऱ्या संस्कृतीला भेटण्याचा प्रयत्न होता.  

पावसाची एक सर पडून गेलेली होती. लंडन शहर हळूहळू जागे होत होते. प्रथम जाग आली होती ती रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उपाहारगृहांना. विमानतळावरून शहरात जाताना दोन्ही बाजूंना विद्युत प्रकाशात चकाकणाऱ्या पाट्या बघत होतो. कबाब कॉर्नर, इंडियन रेस्टॉरंट, इंडियन करी अशा पाट्यांची रेलचेल होती. पुढेही पंधरा दिवसांच्या मुक्कामात भारतीय पदार्थ देणाऱ्या उपाहारगृहांची भरपूर संख्या आढळून आली. अर्थात त्यांचे ‘इंडियन’ हे विशेषण फसवे होते. नंतर कळले की अनेक बांगलादेशी, पाकिस्तानी आणि अफगाणी लोकांनीसुध्दा ‘इंडियन’ हे नाव ब्रिटिशांच्या अधिक ओळखीचे म्हणून उचललेले आहे. ‘इंडियन’ या विशेषणाने सगळ्या भारतीय उपखंडाला आणि अफगाणिस्तानसारख्या शेजारच्या देशांनाही आपल्या कवेत घेतले होते.

खरे म्हणजे इंग्लंडमध्ये शिरताशिरताच भारतीय उपखंडाचे झालेले हे दर्शन मला थोडेसे निरुत्साही करणारे होते. सातासमुद्रापलीकडून येऊन भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या आणि आपल्या राजकीय आणि भाषिक संस्कृतीची छाप भारतावर सोडून जाणाऱ्या लोकांचे इंग्लंड मला पाहायचे होते. प्रथम दिसले ते अगदीच ओळखीचे दृश्य.

इतर देशांना मी दिलेल्या भेटी (खरे म्हणजे त्या देशांची मी घेतलेली भेट) या सहलीला गेलेल्या प्रवाशाच्या भेटी होत्या. इंग्लंडला मात्र मी वेगळ्याच भावनेने येत होतो. जी घटनात्मक व्यवस्था स्वतंत्र भारताने अमलात आणली आहे, जी न्यायव्यवस्था आपण स्वीकारली आहे, देशाची संपर्क भाषा म्हणून जी भाषा आपण वापरतो, त्या सगळ्यांचे जन्मस्थान मला पाहावयाचे होते. लोकशाही व्यवस्था आणि तिचा पाया असलेला उदारमतवाद ज्या देशातून आपण आयात केला तो देश पाहणे म्हणजे भारताच्या संस्कृतीवर कलम करणाऱ्या एका दुसऱ्या संस्कृतीला भेटण्याचा प्रयत्न होता.

पहिल्या दिवशीच बाहेर पडलो तर नवा देश भेटीला आला. लंडनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही नवख्या माणसालासुद्धा चुकू न देणारी आहे. प्रत्येक बसथांब्यावर तेथून जाणाऱ्या बसेसच्या मार्गांचे नकाशे आहेत. प्रत्येक मार्गावरची बस त्या थांब्यावर किती मिनिटांनी येणार आहे हे सांगणारी विद्युच्चलित दर्शके आहेत आणि बसेस खरोखरच तेवढ्या मिनिटांनी त्या थांब्यावर येतात. भुयारी रेल्वेमध्ये तशीच यंत्रणा आहे. तिकीट प्रत्येक बसथांब्यावर यंत्राद्वारे मिळू शकते. ऑयस्टरसारखे कार्ड विकत घेतले तर ते बस आणि भुयारी रेल्वे कोठेही चालते. चुकीने भरलेले किंवा प्रवासानंतर उरलेले पैसे परत देण्याचा अधिकार खिडक्यांवर तिकिटे देणाऱ्या प्रत्येक कारकुनालासुध्दा आहे व तो तत्परतेने ते पैसे परत देतो; त्यासाठी ‘नंतर या’, ‘एक फॉर्म भरा’, ‘पैसे देणारे ऑफिस वेगळे आहे’, असली उत्तरे ऐकावी लागत नाहीत.

दुसरे जाणवले म्हणजे अनेक पाश्चात्य आणि सिंगापूरसारख्या पौर्वात्य देशांप्रमाणेच याही देशात असलेली सार्वजनिक स्वच्छता. रस्त्याने जाताना लोक खाद्यपदार्थ खातात, कॉफीही पितात परंतु उरलेले कागद आणि कप लगेच रस्त्याच्या कोपऱ्याला फेकत नाहीत. ते तसेच हातात किंवा खिशात ठेवून जवळच्या कचराकुंडीपर्यंत जातात आणि तेथे ते निर्माल्य टाकतात. याला अपवाद असलेला माणूस मी पाहिला नाही. आपली गावे स्वच्छ असली पाहिजेत हे अख्ख्या इंग्लंडने मनावर तरी घेतले असावे अगर सार्वजनिक स्वच्छतेविषयीचे कायदे केवळ पुस्तकात ठेवावयाचे असतात आणि त्यावर अंलबजावणी करायची नसते हे लंडनच्या महापालिकेला ठाऊक नसावे. लोकांना वळण लावणाऱ्या कायद्याची कडक अंलबजावणी करूनही आपण निवडून येऊ शकतो असा विश्वास तिथल्या नगरपित्यांना कसा प्राप्त झाला कोण जाणे?

लंडनमध्ये फिरणे आणि ते शहर पाहणे सोयीचे व्हावे म्हणून एक मार्गदर्शक पुस्तक विकत घेतले होते. त्या पुस्तकात प्रेक्षणीय स्थळे, रस्ते, वगैरेंची माहिती तर होतीच पण त्याचबरोबर बहुतेक सर्व महत्त्वाच्या उपाहारगृहांची माहिती होती. विशेष म्हणजे त्या उपाहारगृहांपैकी अस्वच्छ कोणती आहेत आणि कोणत्या उपाहारगृहात स्वच्छ व चवदार पदार्थ मिळतात हेही, त्यांच्याकडून जाहिरातीचे पैसे न घेता, स्पष्टपणे नमूद केले होते. त्या मार्गदर्शक पुस्तकावरून खरी भारतीय उपाहारगृहे कोणती हेही कळत होते.

आणखी एक वैशिष्ट्य इतर काही देशांप्रमाणे तेथेही आढळले. मुख्य रस्त्याला मिळणारी एखादी छोटी गल्ली आपण ओलांडू लागलो आणि एखादी मोटार येताना दिसली तर आपण घाबरून जाऊन पळत पुढे किंवा मागे जातो आणि धडक चुकवण्यात यशस्वी झालो तर मग पुन्हा गल्ली ओलांडण्याचा सावकाश प्रयत्न करतो. तसे तिकडे होत नाही. तुर्कस्थान, ग्रीस आणि ब्रिटन तिन्ही देशांत एकेकदा तरी तो अनुभव मी घेतला. आलेली मोटार रस्ता ओलांडणारा माणूस पाहून थांबते आणि मोटारीच्या खिडकीतून डोके बाहेर काढलेला वाहनचालक आपल्याला शिव्या न देता सौजन्याने हसून आपण पुढे जा अशी हाताने खूण करतो. आपण रस्ता ओलांडल्यावर मग तो गाडी पुढे घेऊन जातो. ‘मी वेगाने गाडी घेऊन जातो आहे, तुम्ही मधे कडमडायला का आलात? तुम्हाला या वेळी येथून जाण्याचा अधिकार कोणी दिला?’ असले उद्दाम भाव चेहऱ्यावर बाळगणारे चालक दिसलेच नाहीत.

लंडनमध्ये शासकीय कार्यालये सकाळी नऊला सुरू होतात आणि लोक वेळेवर जातात. त्यामुळे सुखवस्तू प्रवासी लंडनच्या रस्त्यावर फिरायला दहा-साडेदहा वाजता आला म्हणजे त्याला बहुतेक भेटतात ते लंडनला आलेले त्याच्यासारखेच प्रवासी. जगभरातून लंडनला आलेले प्रवासी रस्त्यावर गर्दी करून असतात. दुकानामध्ये विक्रीसाहाय्यक म्हणून, बसचे चालक म्हणून, भुयारी रेल्वेत मार्गदर्शक म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात लंडनचे निवासी झालेली मूळ आफ्रिकेतील काळी माणसे दिसतात. शिवाय विद्यापीठे आणि इतर संस्थांतही शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत त्यांचे प्रमाण भरपूर आहे. साम्राज्याच्या काळात रेल्वे, सार्वजनिक वाहने, क्लब्स्‌ आणि इतरत्र एतद्देशीयांना मज्जाव करणाऱ्या ब्रिटिश लोकांवर काळानेच सूड उगवला आहे. सार्वजनिक ठिकाणी तरी आता फारसे निखळ गोऱ्यांचे काही उरलेले नाही. त्यांना सर्व वर्णीयांच्याबरोबरच नांदावे लागत आहे.

प्रेक्षणीय स्थळांमध्ये मला रस तसा कमीच होता. त्यामुळे मादाम तुसाँच्या मेणाच्या मूर्तींच्या प्रदर्शनाकडे मी फिरकलोच नाही. लंडन आयच्या जत्रेतल्या मोठ्या चक्रात बसलोच नाही. माझी आकर्षण स्थळे वेगळी होती. एका शासकीय विभागाच्या तळघरात असलेल्या चर्चिल वॉर रूम्स मी आवर्जून पाहायला गेलो. आत जाण्याला अगदीच छोटासा दरवाजा आणि आत भलेमोठे तळघर. याच तळघरात युध्दकाळात चर्चिल आणि त्यांचे निकटचे सहकारी राहायचे. त्यांच्या निवासाच्या खोल्या-अंथरुणा-पांघरुणांसह-जतन करून ठेवल्या आहेत. स्वयंपाकाची, चहाची भांडीसुध्दा तशीच आहेत. सैन्याचे वरिष्ठ अधिकारी जेथे बैठका घेत ती खोली भिंतीवरच्या नकाशासह तशीच आहे. शिवाय बाजूच्या (तळघरातल्याच) प्रचंड मोठ्या जागेत अतिशय दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन आहे. त्यातच गांधीजी आणि चर्चिल यांच्यात झालेल्या झटापटीच्या नोंदी आहेत. गांधींजीसारखेच पंचा गुंडाळलेल्या चर्चिलचे एक व्यंगचित्रही आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे युध्दाचे छोटे छोटे खरेखुरे चित्रपट तेथे सतत चालू असतात. पाच-दहा मिनिटांचा लघुपट पाहताना तुम्हाला महायुध्दाचा प्रत्यक्षानुभव घेतल्यासारखे वाटते. चर्चिल हा काही भारताच्या स्वातंत्र्याचा चाहता नव्हे. पण उद्‌ध्वस्त झालेल्या लंडनमधून पायी फिरत लोकांना धीर आणि विश्वास देणाऱ्या चर्चिलचे नेतृत्व पाहून त्याच्याविषयी आदर वाटतो. हा त्या देशाला लाभलेला समर्थ नेता होता याची हे स्मारक पाहून खात्री पटते.

ब्रिटिश म्युझियम चुकवणे शक्यच नव्हते. इतिहासाची आठवण देणाऱ्या जगभरातून आलेल्या अनेक दुर्मिळ कलावस्तूंचा प्रचंड संग्रह असलेले हे संग्रहालय संपूर्ण पाहणे शक्य नव्हते. जे पाहायचे ठरवले होते तो होता भारतीय विभागातील अमरावतीचा पुनर्जोडणी केलेला स्तूप. दुर्दैवाने त्याच्या काही दुरुस्तीसाठी तो विभागच बंद ठेवलेला होता. इतर विभागांत पाहण्यासाठी फिरू लागलो. प्रत्येक महत्त्वाच्या वस्तूखाली ती वस्तू त्या संग्रहालयात कशी आली याचा निर्देश होता. बहुतेक वस्तू ब्रिटिश साम्राज्याचे अधिकारी म्हणून वसाहतीत काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथून आणून ब्रिटिश म्युझियममध्ये दाखल केल्या होत्या. एकापरीने हे सगळे संग्रहालयच आज विलय पावलेल्या ब्रिटिश साम्राज्याचे स्मारकच होते.

साम्राज्यशाहीच्या अधिकाऱ्यांनी खरे तर अनधिकाराने उचलून आणलेल्या या वस्तू पाहताना- त्यातही भारतातून आणण्यात आलेल्या- दुःख होत होते. ही तशी लूटच होती. पण नंतर दुसराही विचार मनात येत होता. या वस्तू जर त्या काळात इकडे आणण्यात आल्या नसत्या तर त्यांचे काय झाले असते? कोणी त्या पळवून नेल्या असत्या, कोणी त्या विद्रूप केल्या असत्या. इस्लामी राज्याच्या काळात भारताल्या अनेक देवळांतील मूर्तींचे जे विद्रूपीकरण झाले त्यातून वाचलेल्या काही मूर्ती तेथे पाहता आल्या. पुढे राज्यकर्ते आपणच झालो. पण आपल्या वस्तू आणि वारसा जतन करून ठेवावा असे फारसे वाटलेच नाही. बंगालच्या फाळणीमुळे कर्झन आपल्याकडे अप्रिय आहे; पण याच कर्झनने भारतातल्या पुरातत्त्व खात्याची चांगली वाढ केली आणि अनेक प्राचीन वास्तूंच्या रक्षणाची व्यवस्था केली. श्रीरंगपट्टणला मी दोन वेळा गेलो. टिपू ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणापासून वीस-पंचवीस फुटांवर एक मोठी कमान आहे. त्या कमानीच्या बाजूला दोन ओवऱ्या होत्या. त्या अर्थातच मोकळ्या होत्या. दुसऱ्यांदा मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा त्या ओवऱ्यांत दोन घरे थाटण्यात आली होती आणि चक्क भिंती बांधून त्या बंद केल्या होत्या. आतून स्वयंपाकाचा धूर येत होता. अशा अतिक्रमणाची दखल घेणे किंवा त्याबद्दल बोलणेही गैरसोयीचे असते. अनधिकाराने नेलेला का असेना पण आपल्या इतिहासाचा थोडासा वारसा लंडनमध्येही अजून जपलेला आहे.

मला आवर्जून जायचे होते ते ब्रिटिश लायब्ररीत. एकोणिसाव्या शतकाचा शोध घेण्यासाठीचे काही अधिक संदर्भ या ग्रंथालयात सापडतील काय हे बघायचे होते. शिवाय निजामी राज्याच्या शेवटच्या काळात त्याने राज्य टिकवण्याची जी धडपड केली त्याबद्दल काही नवी माहिती उपलब्ध आहे का हे मला पाहायचे होते. ब्रिटिश सरकारच्या अभिलेखागाराचा बराच भाग आणि इंडिया ऑफिस लायब्ररी म्हणून ओळखला जाणारा भारतावरील ब्रिटिश अमलाशी संबंधित कागदपत्रांचा भाग आता ब्रिटिश लायब्ररीतच समाविष्ट करण्यात आला आहे. ग्रंथालयातील सुरक्षा दक्ष असली तरी व्यवस्था आणि मदत करण्याची तत्परताही तेवढीच चांगली आहे. ग्रंथालयात येणारा वाचक  हा याचक आहे असे हे ग्रंथालय अजिबात समजत नाही. ग्रंथालयातील सर्व जुन्या फायलींचे संदर्भ सांगणाऱ्या व्यवस्थित सूची उपलब्ध आहेत. त्या आपल्याला स्वतः पाहता येतात. जुनी पुस्तकेही चाळता-वाचता येतात. विशेष म्हणजे मूळ कागदपत्रांच्या जुन्या संचिका मागणी केल्यापासून अर्ध्या तासात तुमच्या टेबलावर आणून दिल्या जातात.

मात्र एक गैरसोय आहे. आपल्याकडे अनेक वाचकांना हातात पेन घेऊन पुस्तक वाचता वाचता ते चितारण्याची सवय असते. सार्वजनिक ग्रंथालयांतील अनेक पुस्तके अशा वाचकांच्या बेजबाबदार वर्तनाची साक्ष पुढे ते पुस्तक वाचणाऱ्या वाचकांना देत असतात. कित्येक वेळा इतक्या आडव्या उभ्या रेघा या मंडळींनी मारलेल्या असतात की ते पुस्तक वाचणेच अशक्य बनते. ब्रिटिश लायब्ररीत पेन किंवा बॉलपेन वापरताच येत नाही. आपल्या वहीवरसुध्दा पेन्सिलनेच सर्व टिपणे करावी लागतात. कारण आपल्या वहीवर पेनने लिहिता लिहिता वाचनालयाच्या किंवा अभिलेखागारातील जुन्या कागदपत्रांवर आपण तो पेन कधी वापरू याचा नेम नसतो.

या ग्रंथालयात मला अनेक दुर्मिळ गोष्टी पाहायला मिळाल्या. ब्रिटिश राजवटीच्या काळात विविध हुकुमांनी जी पुस्तके जप्त करण्यात आली व त्यांच्यावर बंदी घालण्यात आली त्यांच्या याद्या तेथे आहेत. एकूण 43 मराठी पुस्तकांवर ब्रिटिश काळात बंदी घालण्यात आली होती. त्यांची यादी मी पाहिली. वेळ असता तर ती पुस्तकेही पाहता आली असती. हैदराबादच्या निजामाने भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्यासाठी केलेल्या धडपडीत काही शस्त्रे बेकायदा आयात केली होती. या प्रयत्नात कराचीच्या गौरीपूर विमानतळावर एक विमान कोसळले आणि त्यात चार युरोपीय ठार झाले. या अपघाताची पूर्ण माहिती देणाऱ्या अधिकृत पत्रव्यवहाराची शासकीय फाइलही मला तेथे पाहावयास मिळाली.

लंडनचे एक संस्कृतिचिन्ह म्हणून मला पब पाहण्याची उत्सुकता होती. उंच स्टुलावर बसलेली माणसे तेथे होती. फक्त त्यांपैकी कोणाच्या डोक्यावर आता फेल्टहॅट नव्हती. बाहेरच्या धावपळीला विसरून जाऊन निवांत क्षण तेथे घालवता येत होते.

इंग्लंडच्या मुक्कामातले शेवटचे तीन दिवस पार दक्षिण टोकाला असलेल्या सीफर्ड नावाच्या एका छोट्याशा गावात मी घालवले. सीफर्डला जाताना प्रचंड मोठी गवताळ मैदाने आणि शेते दिसली. सीफर्डसुध्दा एक मोठे खेडेच आहे. जवळच असलेल्या ब्रायटन या शहरात पाहण्यासारखे पुष्कळच आहे. सिंहासनापासून दूर राहिलेल्या राजघराण्यातील व्यक्तीने आपल्या विलासी जीवनासाठी उभारलेला महाल आहे. मित्र- मैत्रिणींना खाने देण्यासाठी केलेली कायम व्यवस्था आहे. इतिहासाचे हे रूपही टिकवून ठेवण्यात आले आहे. सीफर्डला माझ्या मित्राचा मुलगा राहात होता. त्याच्याकडे- सचिन घायाळकडे मी तीन दिवस होतो. सीफर्डपासून ब्रायटनला जाताना सात छोट्या छोट्या वस्त्या होत्या आणि त्यांना सेव्हन हेवन्स असे सार्थ नाव होते. एखाद्या डोंगराच्या उतारावर वसलेली आपल्याकडची उत्तरेतील थंड हवेची ठिकाणे असावीत तशा या टुदार वस्त्या होत्या. पण हे हेवन फार महाग असावे. मला फक्त ते पाहणेच परवडणारे होते. स्वाभाविकपणेच मला इंग्लंडचे उच्च न्यायालय आणि ओल्ड बेली या नावाने विख्यात असलेले तिथले सत्र न्यायालय पाहण्याची इच्छा होती. हे दोन्ही पाहाताना पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे तेथे अजिबात गर्दी नव्हती. पक्षकारांचीही नव्हती आणि वकिलांचीही नव्हती. सत्र न्यायालयात सौदी अरेबियाच्या एका राजपुत्रावरचा खटला चालू होता. पण तेथेही चार-दोन खुर्च्या रिकाम्याच होत्या. परंपरा जपणाऱ्या वकील आणि न्यायाधीशांनी कामकाज करत असताना डोक्यावर विग घातलेले होते. कॉरिडॉरमध्ये तर शुकशुकाटच होता.

ब्रिटिश हाऊस ऑफ कॉन्स आणि हाऊस ऑफ लॉर्डस्‌ही संसदेची दोन्ही सभागृहे मी बाहेरूनच पाहिली; पण निवासाच्या जागेवर आल्यावर सतत तीन-चार दिवस बीबीसीवरून त्यांचे होणारे प्रक्षेपण पाहात होतो. कॉन्समध्ये तरुण खासदार प्रचंड संख्येने होते. फक्त पाच-दहाच वृध्दांचे चेहरे दिसत होते. काही मंत्र्यांच्या भाषणात नवखेपण दिसत असले तरी त्यांची तयारी उत्तम होती. वाद गांभीर्याने केला जात असला तरी अधूनमधून एकमेकांचे कौतुकही होई. एकदाही आरडाओरडा झाला किंवा खासदार जागा सोडून पुढे आले असे दिसले नाही. संसदेचा पूर्ण वेळ कारणी लागावा याची काळजी खासदार घेताना दिसत होते. अर्थातच परदेशाचे हे चित्र पाहताना स्वदेशाच्या आठवणी येतच होत्या.

बीबीसीवर आणखी एक कार्यक्रम आवर्जून पाहिला तो म्हणजे मँचेस्टरला त्या वेळी चालू असलेल्या हुजूर पक्षाच्या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण. पक्षाच्या अधिवेशनात त्यावेळच्या प्रमुख प्रश्नांची आणि राजकीय निर्णयांची चर्चा होत होती. आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा होताना आरोग्यमंत्री आणि त्या खात्याचे संसदीय चिटणीस व्यासपीठावर असत. प्रत्येक वक्ता पाच-सात मिनिटांत मुद्देसूद बोलून भाषण संपवी. पंतप्रधान आणि इतर मंत्री खाली श्रोत्यांत बसलेले असत. कोणत्याही जिंदाबादच्या घोषणा नव्हत्या, हारतुरे नव्हते, गोंधळ गडबड नव्हता. तीन-चार दिवस गांभीर्याने पक्षाचे खासदार आणि कार्यकर्ते संसदेसमोर येणाऱ्या प्रश्नांची चर्चा करीत आपली मते मांडत होते.

मला आठवली ती समाजवादी पक्षाची काही अधिवेशने. बार्शीच्या अधिवेशनात ब्रिटनप्रमाणेच आपल्याकडेही आरोग्य सेवेचे राष्ट्रीयीकरण करावे का या विषयावर गंभीर चर्चा झाली. इतर पक्षांच्याही अधिवेशनांत त्या काळात अशा चर्चा होत असणार. पुढे सर्व बदलले. सुदैव असे की मी तेथे असतानाचा पूर्ण पंधरवडा हवामान अतिशय उत्तम होते. पावसाच्या एक-दोन किरकोळ सरी वगळल्या तर सूर्यप्रकाश छान होता आणि थंडीही फारशी नव्हती. त्यामुळे हे वास्तव्य आनंदाचे होते. त्रासदायक भाग म्हणजे डोक्यात रुतून बसलेले चलन परिवर्तनाचे कोष्टक. तीन पौंडाला टाइम्स विकत घेतला की त्याची किंमत रुपयात आपोआप काढली जायची आणि घेतलेली वस्तू किती महाग आहे याचा हिशेब पाच-दहा मिनिटे अस्वस्थ करायचा. हे चलनाचे कोष्टक आणि राजकीय संस्थांची सहज मनात डोकवणारी तुलना या गोष्टींनी आनंदाला अस्वस्थतेची झालर जोडली होती.

Tags: केल्याने देशाटन पर्यटन लंडन नरेंद्र चपळगावकर चर्चिल वॉर रूम्स ब्रिटीश म्युसिअम british museam churchil war rooms travelouge landon narendra chapalgaonkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरेंद्र चपळगावकर,  औरंगाबाद, महाराष्ट्र
nana_judge@yahoo.com

निवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद पीठ.  वैचारिक लेखक.   न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख. 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके