डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धार्मिक नीतीला मानवधर्मी नीतीने प्रभावित केले पाहिजे!

धर्माचा विषय खरे तर ईश्वर आणि मनुष्य यांचा संबंध हा आहे. परंतु संपूर्ण मानवी जीवनाला गवसणी घालण्याच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि नीती ही एकमेकांशी कायमची जोडली गेली आहेत. किंबहुना, धर्माशिवाय नीती असू शकते अशी कल्पना करणेसुद्धा माणसाला जड जाते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत सुसंवाद असावा, सहकार्याची भावना नांदावी, सर्व माणसांच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती आणि व्यक्तित्वाचा विकास सामूहिक प्रयत्नातून व्हावा यासाठी नीतिमूल्ये व नीतिनियम यांची आवश्यकता असते. नीतीच्या या कार्याचा तसा धर्माशी काही साक्षात संबंध नाही. तेव्हा धर्माशिवाय नीती संभवतच नाही, ही कल्पना चुकीची आहे. वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली आजतागायत धर्माच्या प्रेरणेनुसार अटीतटीचे झगडे झाले आहेत. रक्तपात व कत्तली झाल्या आहेत.

धर्माचे प्रभुत्व

मानवी जीवनात धर्माला एक वैशिष्ट्‌यपूर्ण स्थान आहे. सर्व जगातील मानव समूहात आदिम अवस्थेपासून या ना त्या स्वरूपात धर्माने माणसाची सोबत केली आहे. आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही गेल्या अवघ्या 400 वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला होता. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले होते. विज्ञानाचा उदय होण्याआधी त्यांना विशाल स्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले होते. सर्व बाजूंनी धर्माची अप्रतिहत सत्ता दीर्घकाळ चालली. धर्म व्यक्तीला जन्मत:च मिळतो. त्याचा संस्कार लहानपणापासून होतो. त्या वेळी चिकित्सा करण्याचा प्रश्नही उपस्थित होत नाही. व्यक्ती प्रौढ होते, चिकित्सक विचार करण्याची तिची क्षमता तयार होते. ही क्षमता वापरून इतर धर्मांबरोबर स्वतःच्या मायधर्माची तुलना ती करू लागते, तेव्हा धर्मविचाराला प्रारंभ होतो. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतेकांच्या जीवनात हे घडतच नाही. बदलत्या वयापरत्वे काही कर्मकांडे, धार्मिक वाचन, तीर्थयात्रा एवढेच घडते. स्वाभाविकच लहानपणापासूनचा धर्मसंस्कार गडद होत जातो. मनाला समाधान देत जातो. त्या व्यक्तींना ही बाब उचित व उपयुक्त वाटते. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही आहे, असे त्यांना वाटत नाही. समजावून सांगावयास गेले, तर तो बहुदा धर्मश्रद्धेवर आघात वाटतो.

धर्मचिकित्सा का?

धर्माचा अभिमान, अस्मिता, आग्रह, अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मात चालू आहे. त्याला परधर्मद्वेषाचे रूपदेखील अनेकदा येते. देवळात जाणे, यात्रा करणे, धर्माची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, देवतांचे व धर्माचे उत्सव या गोष्टींकडे त्या त्या धर्मांतील सर्वसामान्य समाजच नव्हे, तर तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू झाले आहे. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. सध्या जे उधाण धर्मभावनेला आले आहे, ते धर्मभावना धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे लक्षण आहे. धर्म या घटिताच्या सर्व प्रकारच्या आविष्कारांसाठी शब्दश: कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात असल्याने आणि या विचाराचा संबंध हरघडी धर्माशी येत असल्याने धर्मचिकित्सा अपरिहार्य बनल्याचे मानावे लागते. पारलौकिक दिव्य शक्तीचा ओढा हा सर्व धर्मांत समान भाग आहे. पण अशा शक्तीची साधना थोड्यांनीच करावी, याउलट त्या धर्मातील बहुजनांनी धर्मभावना ही एक ऐहिक शक्तिसंपादनासाठी उपयुक्त गोष्ट मानावी, अशी भूमिका धर्माच्या आधारे आता सगळेच धर्म घेऊ लागले आहेत. जगातले सारे मुसलमान पॅन इस्लामिझमच्या झेंड्याखाली संघटित झाले पाहिजेत, यहुद्यांनी आंतरराष्ट्रीय संघटना करून इस्त्राईल हे राष्ट्र बलिष्ठ केले पाहिजे आणि हिंदूंनी हिंदू राष्ट्राची तयारी चालू केली पाहिजे असे मानणाऱ्यांना बळ लाभण्याचा सध्याचा काळ आहे. एकंदरीतच मानवी जीवन पूर्वीपेक्षा जास्त अस्थिर व संघर्षमय झाले आहे. या संघर्षाला तोंड देण्यासाठी धर्मभावनेला केवळ साधन बनवण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. ही धर्मभावनादेखील पारंपरिक भावनेप्रमाणे दृढ व तीव्र असते. या भावनेचा परिपोषही कौटुंबिक व सामूहिक शिकवणीच्या परंपरेतून होतो. ही पारलौकिकाच्या अंगापासून मुक्त झालेली नसते; पण या धर्मभावनेचा सारा भर संघशक्तीवर आणि संघर्षासाठी लागणाऱ्या भौतिक बळावर असतो. हिंदूंच्यात धर्म वास्तवात जातीच्या रूपाने व्यक्त होतात. त्यामुळे जाती आणि उपजातीही आता याच पद्धतीने संघटित व संघर्षशील होऊन व्यक्त होऊ लागल्या आहेत.

या भयावह परिस्थितीत धर्माला दुय्यमत्व देऊन, वर्गसंघर्षांच्या मार्गाने लोकांच्या भौतिक गरजांवर संघर्ष उभारून त्याद्वारे त्यांना एकूणच धर्मभावनेचे मिथ्यापण लक्षात आणून देणे हेच योग्य आहे, अशी एक विचारपरंपरा आहे. वास्तवात ती यशस्वी झालेली दिसत नाही. कामगारांच्या वर्गसंघर्षासाठी प्रसिद्ध असलेली मुंबई महानगरी ही धर्माच्या आधारे उभ्या राहिलेल्या संघटनेच्या प्रभावाखाली काही दशके असावी हा अंतर्विरोध पुरेसा बोलका आहे. कामगारांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही हा युक्तिवाद अपुरा आहे. या प्रश्नाकडे अधिक साक्षेपीपणे पाहावयास हवे. असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की, महाराष्ट्रातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेला नकार का दिला नाही? वरील नावांच्या बरोबरच लोकहितवादी, न्या. रानडे, पंडिता रमाबाई यांच्याबद्दलही असेच प्रतिपादन करता येईल. वर उल्लेख केलेल्या सर्व थोरांचे कार्य आपापल्या क्षेत्रात मोठे आहेच; परंतु याबरोबरच त्यांनी ’धर्माचा विचार केला असे दिसून येते. त्यांचे विचार, निष्कर्ष व कृती वेगवेगळ्या होत्या. ते कोणाला पटतील वा न पटतील, पण त्यांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म इहलोकवादी केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. धर्मांचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढते आहे. अशा वेळी तर या स्वरूपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा.

तटस्थता म्हणजे चिकित्सेला नकार नव्हे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ समिती या संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात; परंतु तरीही एक महत्त्वाची बाब समिती करू इच्छिते आणि करतेही. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेची तरतूद कलम 25, 26, 27, 28मध्ये आहे. त्याप्रमाणे व्यक्तीला उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य या बाबींनी नियंत्रित केले आहे. याबाबत समाजात जागृती करण्याचे व आग्रह धरण्याचे कार्य समिती करते. याबरोबर भारतीय घटनेत नागरिकांची कर्तव्ये दिली आहेत. त्यांतील एक कर्तव्य सुधारणेच्या तत्त्वाचा परिपोष करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे आहे. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजसुधारणेसाठी धर्मचिकित्सा करणे हे भारतीय संविधानाने नागरिकांना घालून दिलेले कर्तव्य आहे.

‘समाजाचे धारण करतो तो धर्म ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही. तरी प्रत्येक धर्म मात्र स्वतःला आदर्श मानतो. समाजाची धारणा म्हणजे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की नाही ते कुणी ठरवायचे? प्रत्येक धर्म हे स्वतः ठरवत असतो. धारणा होत नसेल तरच तो धर्म कुणी बदलायचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे, असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही ही शंका उपस्थित करणे धर्मद्रोहाचे लक्षण असते. व्याख्या आदर्श अशा धर्माची करायची, आपल्या धर्माची चिकित्सा वगैरे काहीही करायची नाही आणि त्यातून लोकांसमोर असा आभास निर्माण करायचा की, त्यांचा विशिष्ट धर्म हाच आदर्श आहे. ही बौद्धिक चलाखी भल्याभल्यांना लक्षात येत नाही. धर्मसंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही; तर प्रत्यक्षातील धर्म असे आदर्श आहेत का, ते आदर्श आहेत की नाहीत हे कुणी ठरवावे, आदर्श नसतील तर कुणी बदलावेत हे ते वादाचे प्रश्न आहेत. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. आजची भारताची राज्यघटना व त्यानुसार निर्माण झालेले कायदे व प्रशासन समाजाच्या धारणेसाठीच आहेत. म्हणून राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशांना धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सा करू इच्छिते; परंतु धर्माचा पगडा असलेल्या एका फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो. या ठिकाणी अंनिसच्या भूमिकेचे वेगळेपण व सामर्थ्य स्पष्ट होते. जगातील विवेकवादी अशी भूमिका घेतात की, धर्म या कल्पनेला पूर्णतः नकार द्यावयास हवा. इहवादी असलेले मार्क्सवादी असे मानतात की, स्वतःच्या शोषणातून मुक्त होण्यासाठी धर्म नावाच्या मिथ्या कल्पनेला लोक कवटाळतात. यासाठी त्यांना धर्मचिकित्सेत न अडकवता प्रत्यक्ष शोषणाच्या लढ्यात आणले पाहिजे. त्यामुळे वास्तव बदलेल, शोषण संपेल आणि शोषणातून मुक्तीचा आधार शोधण्यासाठी धर्मभावनेला जवळ करणारे शोषितांचे मन धर्म या भ्रमातून मोकळे होईल. या दोन्ही भूमिकांच्यात संबंधितांनी धर्माकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे धर्माच्या लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असे दिसते. लोकांच्या धर्मभावनेची विधायक कृतिशील चिकित्सा करणारे समितीचे कार्य यापेक्षा वेगळे व वैशिष्ट्‌यपूर्ण आहे. यामुळेच धर्माचे तथाकथित ठेकेदार समितीच्या कार्याला तीव्र विरोध करतात, कारण धर्माची चिकित्सा करणे हे काम त्यांना त्यांच्या मुळावर येणारे वाटते.

कालविसंगत धर्मरूढी व्यवहारात जी धार्मिकता येते त्यात प्रथा, रूढी, चालीरीती असतात. उपासना पद्धती असते. पुरोहितशाही व कर्मकांडे असतात. समाजव्यवस्था व नियमन असते आणि अहिंसा, सत्य, अपरिग्रह अशी उच्च नैतिक मूल्येही असतात. या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो. असे ‘धर्मपण’ व्यक्तिमानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना किंवा धर्मनिरपेक्ष पद्धतीने समाज घडवताना याचा विचार सारासार विवेकाने करावयास हवा. धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी, परंपरा सर्वच धर्मात प्रगतीचे अडथळे ठरत असतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेत असतात. उदाहरणे नेहमीची आहेत; पण त्याबाबत प्रश्न विचारणेच लोकांना आक्षेपार्ह वाटते. मुलगी ही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते. स्वत:चा कोणताही अपराध नसताना विधवा बनलेल्या स्त्रीला हळदी कुंकवात अघोषित मज्जाव असतो. शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेतली जाते. कन्यादान होत असताना स्वतःच्या पोटात जिने मूल वाढवले तिला तो हक्क वैधव्यामुळे नाकारला जातो. कन्यादानाची प्रथा चूकच आणि त्यामध्ये विधवा झाली या कारणासाठी आईला दूर ठेवणे ही तर महाचूक. वेळेचे अपरंपार महत्त्व असलेल्या आजच्या गतिमान समाजात प्रत्येक पिंडदानाच्या कार्यक्रमावेळी स्मशानात शेकडो लोक पिंडाला कावळा कधी शिवतो याची वाट पाहत हजारो तास वाया घालवतात. एका विवाहाला सुमारे 5 ते 10 किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात आणि महाराष्ट्रात दरवर्षी 3 लाख लग्ने होतात. याचा अर्थ, टंचाई असलेला सुमारे 30 लाख किलो तांदूळ रंगवून, म्हणजे खाण्याला निरुपयोगी बनवून अक्षता टाकणे या रूढीपायी उधळला जातो. शब्दश: पायदळी तुडवला जातो. मुसलमान समाजात 3 वेळा तलाक हा शब्द तोंडी उच्चारला, तर केवढेही दीर्घ विवाहबंधन संपुष्टात येते. लग्न हा करार असल्याने तलाकपीडित पत्नीला पोटगी देण्याचीही गरज उरत नाही. मूल होण्याची अजिबात शक्यता नसली, तरी जोडप्याला मूल दत्तक घेता येत नाही. या रूढींना धर्माचे प्रामाण्य द्यावयाचे का हे पदोपदी प्रश्नचिन्हांकित करावयास हवे.

आपापल्या दैवताची उपासना कशी करावी, आपले पारलौकिक कल्याण कसे साधावे, हा खरे तर ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्याचा अधिकारही. पण त्यासाठी जे केले जाते त्यामध्ये फक्त आंधळेपणाच असेल, तर व्यक्तिगत धार्मिक उपासना म्हणून त्याचा आदर करावयाचा की सारासार माणूसपण गहाण पडते म्हणून त्याचा अव्हेर करायचा? महाराष्ट्रातल्या जत्रा यात्रांत पावलोपावली हा प्रश्न पडतो. देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोडून घेणे, पाठीच्या कातडी तुन धारदार गळ आरपार घालून घेणे, बैलगाडीवर ठेवलेल्या काठीच्या बगाडाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत टांगून ठेवून ती बैलगाडी पळवत नेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, धुळीत लोटांगणे घालत देवळाला प्रदक्षिणा घालणे अशा सर्व बाबी त्या त्या व्यक्ती वा संप्रदाय यांच्या लेखी उपासना पद्धतीच असतात. आरती किती वेळा करावी? नमाज किती वेळा पढावा? गायत्री मंत्राचे पठण किती वेळा करावे? रुद्राक्षाची माळ कितीदा ओढावी? रोजे किती कडक पाळावेत? सूर्यास्तापूर्वी भोजन उरकून घ्यावे? अशा प्रत्येकाला इष्ट वाटणाऱ्या आणि फलदायी ठरणाऱ्या उपासनेच्या पद्धती या इतर कोणाला अर्थहीन आणि अनावश्यक वाटल्या, तरी त्यांचे आचरण करण्याचा व आपले लौकिक व पारलौकिक कल्याण साधण्याचा व्यक्तीचा अधिकारही मान्य व्हावयास हवा की नको? दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे काही वर्षांपूर्वी अग्नीत लक्ष मोदकांची आहुती दिली. ते उपासनास्वातंत्र्य म्हणून मान्य करावे काय? वैराग्याची मूर्ती असणाऱ्या बाहुबलीच्या मस्तकावर शेकडो लीटर दही, दूध, तूप, मध यांचा वर्षाव धर्मउपासनेशी सुसंगत की विसंगत? कालबाह्य धार्मिक व्रते ही धार्मिक उपासनेचा भाग केल्याने कोणते धर्माचरण साधते याचा विचार सुज्ञपणे करावयास हवा.

अमूर्त नीती व्यवहारात अनीती

धर्माचा विषय खरे तर ईश्वर आणि मनुष्य यांचा संबंध हा आहे. परंतु संपूर्ण मानवी जीवनाला गवसणी घालण्याच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि नीती ही एकमेकांशी कायमची जोडली गेली आहेत. किंबहुना, धर्माशिवाय नीती असू शकते अशी कल्पना करणेसुद्धा माणसाला जड जाते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत सुसंवाद असावा, सहकार्याची भावना नांदावी, सर्व माणसांच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती आणि व्यक्तित्वाचा विकास सामूहिक प्रयत्नातून व्हावा यासाठी नीतिमूल्ये व नीतिनियम यांची आवश्यकता असते. नीतीच्या या कार्याचा तसा धर्माशी काही साक्षात संबंध नाही. तेव्हा धर्माशिवाय नीती संभवतच नाही, ही कल्पना चुकीची आहे. वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली आजतागायत धर्माच्या प्रेरणेनुसार अटीतटीचे झगडे झाले आहेत. रक्तपात व कत्तली झाल्या आहेत. सर्वात भयावह म्हणजे या अमानुष नरसंहाराचा अभिमानच बाळगला गेला आहे, कारण ही सर्व कृत्ये धर्मासाठी केलेली असल्यामुळे धर्मकृत्ये होती. त्यामुळे ती नैतिकच आहेत, असे मानले गेले.

सत्य, अहिंसा, समता, दया, क्षमा, सहिष्णुता इत्यादी सर्वमान्य मूर्त नीतितत्त्वे आणि सामाजिक जीवनातील त्यांचा व्यवहार यांत फरक असतो. नीती म्हणून उच्च तत्त्वाचा उद्घोष करणे सोपे असते; परंतु माणसाचा नैतिक व्यवहारही समाजव्यवस्थेच्या एका चौकटीतच होत असतो. त्या व्यवस्थेचे स्वरूपच व्यावहारिक नीतीला जन्म देते. त्या व्यवस्था परिवर्तनाचा विचारही केला जात नाही. अमूर्त नीतितत्त्वाचा जयजयकार आणि व्यवहारात संस्थाअंतर्गत अनीतीला धर्ममान्यता असा अंतर्विरोध धर्मात आणि हिंदू धर्मात तर फारच ठळकपणे दिसून येतो. हिंदू धर्मातील तत्त्वचिंतकांना, साधुसंतांना अस्पृश्यता, स्वीदास्य, शूद्रांचे सर्व प्रकारचे शोषण या गोष्टी गंभीरपणे अनीतिमूलक आहेत अशी शंकासुद्धा आली नाही. जमीनदार, सावकार, पुरोहित, राजा, शासनसंस्था यांच्याद्वारे कित्येक शतके कष्टकरी लोकांचे जे रोजरोस शोषण चालू होते त्यात पुरेपूर अनीतीच आहे, असे त्या त्या काळातील जाणत्या जबाबदार व अत्यंत धार्मिक लोकांनाही कधी वाटले नाही. समग्र समाजजीवनच अंतर्विरोधाने भरलेले होते. अजूनही ते तसेच आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे नीतिमान समाजाची निर्मिती करण्याचा पुकारा करणाऱ्या शक्तींची चिकित्सा करण्याची गरज आहे. धर्म आणि नीती यांच्या या स्वरूपामुळे हिंदू माणसाच्या मनावर एक विशिष्ट प्रकारचे संस्कार झाले आहेत. व्यक्तिगत जीवनातील नीतिनियम तो पाळतो, पण सामाजिक नीतीबाबत उदासीन असतो.

आपल्या सामाजिक जीवनात जिकडे तिकडे स्वार्थीपणा व भ्रष्टाचार बोकाळला आहे. धर्मश्रद्धेचा लोप झाल्याचा हा परिणाम आहे, असे सनातनी लोक म्हणत असतात. धर्मबंधने सैल झाल्यामुळे नीती, अनीतीचा धरबंद राहिलेला नाही हा कार्यकारणभाव पटण्याजोगा नाही. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोक परंपरागत धर्मातील रूढ आचार पाळण्यात सर्वांत पुढे असतात, ही खेदजनक वस्तुस्थिती सर्वत्र व सर्व धर्मात दिसते. तीर्थयात्रा, दान, धर्म, व्रतवैकल्ये, जपजाप्य हे सर्व काही व्यवस्थित चालू असते. खऱ्या विशुद्ध नैतिक धर्माशी त्यांचे काही देणेघेणे नसते. म्हणून एका बाजूला धर्माचा उदंड उदो उदो आणि त्याच वेळेला दुसरीकडे आकंठ भ्रष्टाचारात बुडालेला समाज, असे चित्र आज आपल्या देशात दिसते. भ्रष्टाचाराने स्वतःचा सर्व प्रकारचा अनैतिक स्वार्थ साधणाऱ्या सामान्य जनांनाच नव्हे, तर त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कथित धार्मिक वृत्तीच्या नेत्यांना यामध्ये काही चूक आहे असे वाटत नाही. म्हणूनच समाजातील अनेक अपप्रवृत्तींचा संबंध धर्मश्रद्धेच्या लोपाशी आहे हे नाकारावे लागते.

कर्मकांडे-

पुरोहितशाही धर्मातील रूढी, परंपरा कर्मकांडाद्वारे व्यक्त होतात. कर्मकांडे ही कोणत्याही मानवी संस्कृतीत आहेत आणि असणारच. ती माणसाच्या परस्परसंवादाचा आणि उपजत कृतज्ञताबुद्धीचा आविष्कार असतात. मात्र शोषणाला पूरक आणि मिथ्या कथनाचा आधार घेणाऱ्या कर्मकांडांना विरोध करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की, ‘खुळचट कर्मकांडांनी देश भिकेला लागला.’ व्यक्तीने कोणती कर्मकांडे करावीत, याचे वर्णन करणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रमाणभूत प्राचीन ग्रंथात वर्षभरात करावयाच्या एकूण 700 कर्मकांडांचा उल्लेख आहे. याचा अर्थ व्यक्तीला त्यापलीकडे काही सवड शिल्लकच राहत नाही. ’केली कर्मकांडे तर बिघडले काय?’ असा प्रश्न सतत विचारला जातो. कर्मकांडांचे तोटे अनेक आहेत. एक तर कर्मकांडप्रधान व्यक्ती आणि समाज बौद्धिकदृष्ट्‌या योग्य अशा ऐहिक व्यवहारास दुय्यम स्थान देतात. त्यामुळे सामाजिक अवनती होते. उदा., संशोधन मागे पडते. दुसरे असे की, ज्या समाजात अशा कर्मकांडांचे स्तोम माजते, त्या समाजाची आर्थिक पीछेहाट होते. आर्थिक व्यवहारात लागणारा उत्साह व उपक्रमशीलता भजन-पूजनात जाते. श्रीमंतांनाच ते परवडते आणि कथित मोक्षाचे धनीही तेच होतात. तिसरे असे की, कर्मकांडे हा एक प्रकारचा बहिर्मुख निवृत्तिमार्ग आहे. व्यक्ती त्यामुळे आत्मकेंद्रित होते आणि परलोकाच्या कल्पनेत अडकते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरोहित वर्गाचा स्वार्थ साधला जातो. ज्या परमेश्वराच्या उपासनेसाठी कर्मकांडे केली जातात, तो परमेश्वर मानणाऱ्या संतांनाही त्यांची गरज लागत नाही. परमेश्वराचे नुसते नामस्मरणही त्याला पोचते, असा त्यांचा विश्वास असतो. खरा प्रश्न असतो तो असा की, भावना परोपकाराची हवी, नीतीची हवी. ही भावना नसून कर्मकांडे असतील, तर त्यांचा उपयोग शून्य आणि ती भावना असेल, तर कर्मकांडांची काही गरजच नाही. ज्या कर्मकांडांत नैतिक नियमांना प्राधान्य असते, त्यांना व्रते म्हणतात. उदा., सत्यभाषण. तेव्हा धर्मातील कर्मकांडांचा भाग साक्षेपाने विचारात घ्यावयास हवा.

धर्माचा आणखी एक भाग पुरोहितशाहीचा आहे. परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेली ही दलाल व्यवस्था आहे. परमेश्वराला जे जे काही द्यावयाचे, ते पुरोहितामार्फत देण्यात येते आणि व्यवहारात पुरोहित त्याचा उपभोग घेतो. बहुतेक धर्मांत ही व्यवस्था दिसते. परमेश्वराकडे पोचण्याचे एक शास्त्र आहे. आणि प्रत्येक कार्य जसे त्या कार्याशी प्रशिक्षित तज्ज्ञाला दिले जाते, त्याच पद्धतीने देवाच्या पूजेचे कार्य हे प्रशिक्षित पुरोहित करतो, असा युक्तिवाद केला जातो. यात तथ्य नाही, असेच मानावयास हवे. देव आहे की नाही, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू, पण तो आहे असे मानले, तरी त्याची जी गुणवैशिष्ट्‌ये आणि थोरवी वर्णिली आहे, त्याच्याशी कोणत्याही स्वरूपातील मध्यस्थाची कल्पना ही अनावश्यक व विसंगत ठरते. प्रत्यक्षात एका बाजूला ती बहुसंख्य ठिकाणी एका जातीतच बंदिस्त झाली आहे. ज्याला पुरोहित अथवा पुजारी व्हावयाचे असेल, त्याचा अभ्यासक्रम तयार करावा व तो उत्तम प्रकारे उत्तीर्ण होणाऱ्या कोणाही स्त्री-पुरुष व्यक्तीस ते स्थान द्यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 सालीच केली होती.

धार्मिक नीती व विवेक

नीती हा धर्मातील चौथा भाग आहे. मानवाच्या मनात नीतीची भावना धर्मामुळे येते. नीतीने वागले नाही, तर भीती वाटते ती धर्माची. सगळे जग माझ्याविरोधी गेले तरी चालेल पण मी नीतीनेच वागेन, अशी हिंमतही सामान्य माणूस धार्मिक नीतीच्या आधारेच बाळगतो, असे धर्माचे समर्थक सांगतात. संघटित धर्माचा उदय हा मानवी जीवनात नीतीची स्थापना करण्यासाठी झाला आणि तसा प्रयत्न धर्माने चुकतमाकत केलाही आहे. धर्माचा आधारच काढून घेतल्यास माणूस अनीतिमान होणार नाही का, समाज नीतिभ्रष्ट होणार नाही का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तरातील पहिला भाग असा की, कोणीही व्यक्ती जर असा दावा करत असेल की, ती नैतिक जगते, याचे कारण तिला तिची धर्मभावना, नैतिक जगण्याची शक्ती देते, तर अशा व्यक्तीबद्दल समितीला आदर वाटतो. नीतीने जगणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे, असे समिती मानते. धार्मिक नीतीचा दुसरा भाग संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोचवत असत. त्यांच्या मते भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, अडाण्याला शिक्षण, बेघराला घर, आजाऱ्यांची शुश्रूषा, प्राण्यांना अभय हाच धर्म होता. रूढ धार्मिक नीतीला या मानवधर्मी नीतीने प्रभावित केले गेले पाहिजे. धार्मिक नीतीबाबत तिसरा महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा भाग असा की, इतिहासात असे घडले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वांत प्रभावी बनली. सर्वांवरील सर्वोच्च मूल्य, असे धर्माला मानण्यात आले. याची आता गरज नाही. विविध धर्म आणि त्यांतील धार्मिक माणसे जी मानवी मूल्ये मनोमन मानतात, त्या मूल्यांकडे केवळ मानवी मूल्ये म्हणून बघता येणे शक्य आहे. निकोप सामाजिकता, सौंदर्यविषयक मूल्य, न्याय, समता, बंधुभाव या कल्पना तर धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही. व्यक्ती धार्मिक असो वा नसो, प्रत्यक्ष अनुभवातून त्याला असे वाटते की, मानवी जीवन सतत जास्तीत जास्त सुधारता येणे शक्य आहे. ही वाटचाल नैतिकतेची आहे. ती विवेकाच्या आधारे करता येते, असे समिती मानते. मात्र धार्मिक नीतीच्या आधारे प्रामाणिकपणे हे कोणी करू इच्छित असेल, तर समिती त्याचे स्वागतच करते.

(राजहंस प्रकाशनाकडून आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकातील ‘धर्म’ हे प्रकरण काहीअंशी संपादित करून येथे घेतले आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक होते तसेच साधना साप्ताहिकाचे संपादक ही होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके