डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना मित्र मंडळ : उदंड प्रतिसाद हवा आहे

साने गुरुजी जन्मशताब्दी महोत्सववर्षाचा जास्तीतजास्त लाभ घेऊन सक्रिय होऊन साधनेला समर्थ संपन्न करण्याचा सर्व साने गुरुजी प्रेमींनी संकल्प करावा.

गुरुजींची जन्मशताब्दी चालू आहे. महाराष्ट्रात सेवा दल, साधना परिवारातील व्यक्ती व संस्था उत्साहाने कार्यरत आहेतच. पण या सर्वांच्या पलीकडे आपापल्या ठिकाणी गुरुजींच्या जन्मशताब्दीचे असंख्य उपक्रम उत्स्फूर्तपणे अनेक संस्था, व्यक्ती साजऱ्या करत आहेत. गुरुजींच्या स्मृतीला म्हणजेच विचाराला होणारे हे अभिवादन त्यांच्या ध्येयवादाचे मूर्त स्वरूप असलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाची आज वाढती गरज आहे हे स्पष्टपणे दाखवते. याचाच अर्थ साधना सर्वदूर पोचण्याची गरज व अनुकूलता आहेच. हवी आहे नियोजनपूर्वक धडपड. हे काम शताब्दिवर्षात चालू व्हावयास हवे व शताब्दीनंतरही स्थिर स्वरूपात चालावयास हवे. यासाठी साधना मित्रमंडळाची स्थापना जाहीर करत आहोत.

कल्पना अशी आहे की ‘साधने’साठी अनेक व्यक्ती आज धडपडत आहेत. महाराष्ट्र पातळीवर त्यांचे सुसूत्रीकरण हवे. साधनेचे वर्गणीदार वाढविणे, जाहिराती मिळविणे, दीपावली अंक विक्री या साऱ्यांसाठी मित्रमंडळातील सभासदांनी केलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी केली जाईल. त्यांच्याशी पत्राद्वारे नियमित व्यक्तिगत संपर्क राखला जाईल. वर्षातून एकदा एकत्रित मेळावा होईल. यामुळे उत्साह व ताकद वाढेल. परस्परांच्या अनुभवातून नव्या कल्पना, नवा जोम मिळेल. केवळ विक्री वाढवणे हे याचे उद्दिष्ट नव्हे. साधनेत काय यावे? लोकांच्या अपेक्षा काय आहेत? कोणते बदल उपकारक ठरतील? हे सर्व या मित्रमंडळाकडून थेट कळेल. साधना अधिक सकस, समर्थ व गतिमान बनेल.

गुरुजींची पुण्याई, काळाची गरज, हितचिंतकांची संख्या, साधनेचा इतिहास लक्षात घेता साधना साप्ताहिकाच्या वर्गणीदारांचा आकडा दहा हजार ही संख्या ओलांडणारा हवा. हे अजिबात अवघड नाही. ते अवघड वाटत असेल तर अर्थ एवढाच की लोकांपर्यंत पोचण्यात आपली ढिलाई होते आहे. हा केवळ भाबडा आशावाद नाही. संपादक झाल्यापासून महाराष्ट्रभर फिरताना लाभलेला हा विश्वास आहे. नाशिकहून आलेले प्रा.व्ही. एस. चव्हाण यांच्या पत्रातील हा भाग पाहा.

‘‘'माझ्यात लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. त्या कामी चाहते, हितचिंतक व कार्यकर्ते कमी पडतात. अनुभव असा आहे की अपेक्षेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद आपणांस मिळतो. तेव्हा साने गुरुजी जन्मशताब्दी महोत्सववर्षाचा जास्तीतजास्त लाभ घेऊन सक्रिय होऊन साधनेला समर्थ संपन्न करण्याचा सर्व साने गुरुजी प्रेमींनी संकल्प करावा. मी व्यक्तिशः किमान 100 वर्गणीदार आणि जाहिराती आणि देणगीद्वारा किमान रु.10 हजारांचे आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचा मनोमन संकल्प केला आहे.’’

यासाठी एक उपक्रम आम्ही चालू केला आहे. तो म्हणजे साधनाचा विवेक जागर. कल्पना अशी आहे की सलग दोन ते तीन दिवस एखाद्या जिल्ह्यात जावे. हेतू साधनाचा विवेकवादी विचार पोचवणे व साधनाला वर्गणीदार, जाहिरातदार मिळवणे. या अभियानाला एकदम वजन प्राप्त झाले आहे. कारण ज्येष्ठ अभिनेते व बुद्धिवादी विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांनी दर महिन्याला यासाठी 2 ते 3 दिवस देण्याचे मान्य केले आहे. सोबत आणखी एक-दोन वक्तेही असतील. याची सुरुवात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांपासून आम्ही केली, तेव्हा ग. प्र. प्रधान व पुष्पाताई भावे सोबत होत्या. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी, वक्त्यांनी यासाठी शक्यतेनुसार वेळ देण्याचे कबूल केले आहे. जेथे जातो तेथे सकाळी महाविद्यालयात व्याख्याने होतात. मुख्य कार्यक्रम सायंकाळी होतो. त्याला साधनेच्या हितचिंतकांबरोबर अन्य जनसमुदायही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील असा प्रयत्न केला जातो. सुमारे दोन-अडीच तास सविस्तर वैचारिक मांडणी होते. समाजात विवेकवादी विचार व त्यासाठी साधना साप्ताहिक वाढवण्याची गरज थेट पोचवली जाते. अर्थातच असा कार्यक्रम वर्षातून एकदाच होणार. इतर वेळेला स्थिर स्वरूपात साधनेसाठी झटत राहवयास हवे, ही बांधिलकी मानणारे अनेक जण घरचेच कार्य आहे असे समजून काम करतात.

मिरजेला रामचंद्र तावरे, तासगावला प्रताप घाटगे, मालेगावला डॉ. सुगन वरंठ, मुंबईला दत्ता गांधी, जळगावला सुधीर निंबाळकर, धुळ्याला बापूसाहेब महाले आणि खरे तर अनेक जिल्ह्यांत अनेक गावांत अनेक जण आपापल्या परीने झटत असतात. वरील नावे अगदी वानगीदाखल आहेत. खूप जणांची नावे त्यात नाहीत. याचे एकमेव कारण सर्वांची नावे लिहिणे शक्य नाही. परंतु त्या सगळ्यांच्या क्रियाशील हातांनीच साधना समर्थ बनत आहे. या सर्वांना एकत्र आणणे यासाठी मित्रमंडळ स्थापन होत आहे. अनेक ठिकाणी सेवा दल विचारांच्या व्यक्ती संस्था म्हणून सक्षम आहेत. स्वाभाविकच त्यांचा आवाका मोठा असतो. श्री. सुरेश तावडे हे अपना बाजारचे चेअरमन, त्यांनी 150 वर्गणीदार देण्याचे कबूल केले. भरत लाटकर कोल्हापूर जिल्ह्यातून 500 वर्गणीदार देण्याची उमेद बाळगून आहेत. येथेही सर्वांची नावे घेत नाही. 

मुद्दा असा की या पाठपुराव्यासाठीदेखील मित्रमंडळाची गरज आहे. साधना साप्ताहिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी वेळ देणे मला शक्य आहे आणि माझी तशी तळमळीची प्रामाणिक इच्छा आहे असे वाटणारे अनेक जण साधना वाचक परिवारात आहेत. साधनेचे तेच वैभव आहे, सामर्थ्य आहे. त्याचा संघटित सक्रिय आविष्कार म्हणजे साधना मित्रमंडळ. आपणांस त्यासाठी कळकळीचे आवाहन. आपली अनुमती नरेंद्र दाभोलकर, संपादक साधना साप्ताहिक, 431 शनिवार पेठ, पुणे 30. या पत्यावर त्वरित कळवावी. पत्रावर ‘साधना मित्रमंडळ’ असा ठळक उल्लेख करावा. भरभक्कम साधना मित्रमंडळ हे गुरुजींच्या साधनातर्फे सर्वांत अर्थपूर्ण अभिवादन ठरेल.
 

Tags: साने गुरुजी नरेंद्र दाभोळकर sane gurujee narendra dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक होते तसेच साधना साप्ताहिकाचे संपादक ही होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके