डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्पीड ब्रेकर काढून टाकले पाहिजेत

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार  : उत्तम कांबळे

बस स्टँडवर पेपर विकण्यापासून ते सकाळ माध्यमसमूहात संपादक-संचालक पदावर कार्यरत असा विस्मयचकित करणारा आलेख उत्तम कांबळे यांनी आपल्या आयुष्यात रेखाटला आहे. कुटुंबात शिकलेली ही पहिली व्यक्ती. घरात बेसुमार दारिद्य्र, आई अशिक्षित, शेतमजूर. संघर्ष करीत शिक्षण घेतले. फेरीवाला विक्रेता, हमाली, बांधकाम मजूर अशी कष्टाची कामे बालपणात आणि किशोरवयात केली. या कामातून मिळणाऱ्या पैशाच्या आधारे शिक्षण घेतले. महाविद्यालयात विद्यार्थी असताना वाचनाचा छंद. अफाट वाचन. त्यातूनच पत्रकारितेची आवड निर्माण झाली. विद्यार्थीदशेतच कोल्हापुरातील दैनिक समाज या वर्तमानपत्रात १९७९ ते १९८२ या काळात वार्ताहर म्हणून काम केले. नंतर कोल्हापूर येथील दैनिक सकाळमधे १९८२ मध्ये बातमीदार म्हणून रूजू. त्यानंतर पत्रकारितेची सगळी कारकीर्द सकाळ माध्यम समूहात गेली.

१0 मे २00९ ते १ ऑगस्ट २0१२ या काळात ‘सकाळ’माध्यम समूहात मुख्य संपादक या पदाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर संपादक-संचालक या पदावर कार्यरत. ‘श्राद्ध’, ‘अस्वस्थ नायक’, ‘पन्नास टक्क्यांची ठसठस’, ‘बुद्धाचा ऱ्हास’, ‘शेवटून आला माणूस’ या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. ‘अस्वस्थ नायक’ मधून त्यांनी तरुण पिढीच्या मनातील अस्वस्थता चित्रीत केली आहे, तर ‘पन्नास टक्क्यांची ठसठस’ या कादंबरीतून महिलांना आरक्षण उपलब्ध झाले असले तरी, त्यांना आपल्या न्याय्य हक्कासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो याचे प्रत्ययकारी चित्रण आले आहे. धर्मांतरानंतर पूर्वाश्रमीच्या महार समाजाचे कसे आमूलाग्र परिवर्तन झाले, त्याचे प्रातिनिधीक चित्र त्यांनी ‘बुद्धाचा ऱ्हास’ या कादंबरीत रेखाटले आहे.

‘रंग माणसांचे’, ‘कथा माणसांच्या’, ‘कावळे आणि माणसं’, ‘न दिसणारी लढाई’, ‘परत्या’ या एकूण पाच कथासंग्रहातून त्यांनी उपेक्षित, वंचित समूहातील लोकांचे सामाजिक आणि भावजीवन रेखाटले आहे. ‘ललित’लेखनातून त्यांनी सामाजिक अस्वस्थतेलाच वाचा फोडली आहे. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीतील स्तंभलेखनाने त्यांना देशविदेशात कीर्ती मिळवून दिली. या पुरवणीतील त्यांचे ‘फिरस्ती’ हे सदर अफाट लोकप्रिय झाले.

ललित लेखनासोबतच कांबळे यांनी संशोधनपर लेखनही केलेले आहे. ‘देवदासी आणि नग्नपूजा’,‘भटक्यांचे लग्न’, ‘कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा’, ‘अनिष्ट प्रथा’ या संशोधनपर ग्रंथातून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेतील धार्मिक हितसंबंधांवर प्रहार केले आहेत. ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही दोन आत्मकथने प्रचंड गाजली आहेत. ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाची ३३ वी आवृत्ती बाजारात लवकरच दाखल होईल. एकूणच आपल्या प्रागतिक विचारांच्या साह्याने समाजात मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारा आजच्या काळातील हा एक ‘जागल्या’ पत्रकार, लेखक आणि वक्ता आहे.

प्रश्न - महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ आपणाला मिळाला, त्याबद्दल अभिनंदन! तुमची यासंदर्भातली पहिली प्रतिक्रिया काय होती?

- मला ज्या वेळेला या पुरस्कराच्या संदर्भात विचारण्यात आलं, सांगण्यात आलं; त्या वेळेला मला प्रचंड आनंद झाला होता. पण मनात एक तणावही निर्माण झाला होता. आनंद एवढ्यासाठी की, हा पुरस्कार डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की- त्यांनी आपलं सगळं आयुष्य एका मिशनऱ्याप्रमाणं, एका विशिष्ट कारणासाठी वाहिलेलं होतं; अंधश्रद्धेच्या विरोधात लढाई करण्यात वाहिलेलं होतं. या प्रवाहाचा आणि माझा खूप वर्षांपासून संबंध आहे. माझं पहिलं मत असं झालं- मी जे काही छोटं-मोठं काम करतो आहे, ज्या काही रस्त्यावरून चालतो आहे; तो माझा रस्ता बरोबर आहे, म्हणूनच आपल्याला हा पुरस्कार मिळाला. तणाव एवढ्यासाठी होता की, हा पुरस्कार सेलिब्रिटी या कारणासाठी नव्हता. एका विचारधारेला, एका कर्तव्यधारेला तो पुरस्कार होता. आपल्याला अजून नीट काम करावं लागणार आहे. याच रस्त्यावरून चालावं लागणार आहे; भोवतालची परिस्थिती कशीही असली तरीही आपल्याला हा रस्ता सोडता येणार नाही- अशा संमिश्र भावना माझ्या मनात होत्या.

प्रश्न - दाभोलकरांच्या कार्याचा आपण जो उल्लेख केला, तो बरोबरच आहे. विवेक, विज्ञाननिष्ठा हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपण उल्लेख केलात की,तुमचा देखील या सगळ्या चळवळीशी संबंध आलेला आहे. तर, कोणकोणत्या चळवळींशी आपण संबंधित आहात?

- सुरुवातीला माझा संबंध आला तो अंधश्रद्धा निर्मूलनाशीच. मी अतिशय कोवळ्या वयात या विषयाकडे ओढला गेलो होतो. त्याचं कारण हा प्रश्न तेव्हा माझ्या कुटुंबातच होता. कुटुंबाच्या आजूबाजूला सुद्धा होता. माझ्या जातीतल्या, आजूबाजूच्या गल्लीतल्या, गावातल्या कितीतरी महिला यल्लमाला वाहिलेल्या होत्या. त्या रोज माझ्या आजूबाजूला दिसायच्या. ते जीवन दिसायचं. त्या जीवनातून जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धा दिसायच्या आणि मी विचार करायचो. माझे सख्खे चुलत आजोबासुद्धा यल्लमाला सोडलेले होते. ते लुगडं नेसून, चोळी घालून, डोक्यावर यल्लमाची परडी घेऊन भीक मागत फिरायचे. ती परंपरा पुढे काही चालली नाही. पण त्या परंपरेचे फटके आत आणि बाहेर मी पाहत-सोसत होतो.

प्रश्न - ती परंपरा पुढे चालली नाही; ती थांबली कशी?

- माझा जो आजोबा होता, त्याला काही मुलं-बाळं झाली नाहीत. तो असाच एक दिवस बेपत्ता होऊन मरण पावला. तो मरण पावल्यानंतर परंपरा पुढे कुणी चालवायची, परडी कोणी फिरवायची- हा प्रश्न निर्माण झाला. मग त्या देवदासी म्हणाल्या की, त्याला मुलं नव्हती; ठीक आहे. पण त्याच्या भावाला तरी मुलं आहेत, त्यातला एखादा यल्लमाला सोडायला पाहिजे. भावाचा मुलगा म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांना जेव्हा हे कळलं, तेव्हा ते पाटलाच्या मळ्यातली चाकरी सोडून कोल्हापूरला पळून गेले. तिथं इंग्रजांच्या काळामध्ये लष्करात जवानांची भरती चालू होती. तिथे रांगेत उभे राहिले आणि भरती झाले. त्यामुळे ती परंपरा तुटलीच.

प्रश्न - या संदर्भात तुमच्याकडून काही काम झालं का?

- पुढे वाचन करीत गेल्यावर माझ्या मनात प्रश्न तयार व्हायला लागले की, हे असं का होतं? मग मी त्याचा शोध घ्यायला लागलो. हे बंद पडायला पाहिजे. माझ्या-माझ्या परीनं प्रयत्न करायला लागलो. कारण हे सगळं बंद पाडणं सोपं नव्हतं. मग त्याच्यासाठी गल्लीतल्याच बायकांचं प्रबोधन करायला लागलो. त्यांच्या या देवांच्या परंपरा, कथा,  अंधश्रद्धा समजून घ्यायला लागलो. तेव्हा मी १६-१७ वर्षांचा असेन. माझ्याकडे प्रबोधनाची शैलीही नव्हती, संघटन नव्हतं. हे बंद व्हायला पाहिजे, एवढी एक तीव्र इच्छा मात्र होती. मग माझ्या पद्धतीनं प्रबोधनातून काही महिलांना त्याच्यातून बाजूला काढलं. काही महिलांच्या जटा कापण्यामध्ये मला यश आलं. अर्थात, हे प्रतीकात्मक होतं. ते काही मास लेव्हलला नव्हतं. एखाद्या बाईचं लग्न लावलं आम्ही. अशा छोट्या-मोठ्या गोष्टी करत मी कोल्हापुरात आलो. पत्रकार झालो आणि मग मोठं हत्यारच मिळालं.

प्रश्न - पत्रकार झाल्यावर काय करायचं ठरवलंत?

- त्यामुळं मी अंधश्रद्धा हे माझं बीटच ठरवलं. मी अनेक वेळा सौंदतीच्या डोंगरावर गेलो. मुलींची लग्नं देवीबरोबर नेमकी कशी लागतात त्याचे फोटो घेतले, त्याच्या बातम्या दिल्या. फोटो काढताना एकदा हल्लाही झाला. तो चुकवला. असा मी पहिला पत्रकार होतो ज्याने देवीशी लग्न लावतानाचे नेमके फोटो दिलेले होते. मग याच पद्धतीतून खेड्या-पाड्यांमध्ये मी जायला लागलो. ओळखी वाढल्या. हे सगळं व्यक्तिगत पातळीवरचं काम होतं. एक बाई गाठायची, तिचं प्रबोधन करायचं, जटा कापतो म्हणायचं. जटा काही निघायच्या नाहीत. त्याच्यावर शांपू ओतायचा, खोबरेल तेल ओतायचं. ते मुरू द्यायचं. मग एकेक केस त्या जटेतून सोडवायचा. कारण ती बाई कात्री लावू द्यायची नाही. जटेला कात्री लागली म्हणजे देवीच्या गळ्याला कात्री लागते, अशा त्यांच्या अंधश्रद्धा होत्या.

प्रश्न - मग यातून एक चळवळ आकाराला येत होती की, कसं?

- नाही, ते व्यक्तिगत पातळीवरच होतं. त्याला ‘चळवळ’ हा शब्द वापरता येणार नाही. कारण चळवळीला समूह लागतो, रचना लागते, फंडिंग लागतं, साधनं लागतात. त्यापैकी काहीही नव्हतं आमच्याकडे. आमच्या शबनम बॅगेमध्ये खोबरेल तेलाची बाटली असायची, कात्री असायची आणि अशा स्त्रिया शोधत आम्ही फिरायचो. मग ओळखीतल्याच, नात्यातल्याच स्त्रिया- कारण अनोळखी स्त्रिया काही प्रतिसाद द्यायच्या नाहीत. हिच्याकडून तिच्याकडे, असं करत एक चेन तयार व्हायची.

प्रश्न - खरं म्हणजे, हे एक आव्हानात्मक काम होतं. या प्रथेसाठी प्रबोधन करणं किंवा मानसिक परिवर्तन करणं या ज्या गोष्टी आहेत, त्या समूहाने आकाराला आल्या नाहीत का पुढे?

- नाही, माझ्या वेळेला आल्या नाहीत. कारण एक तर माझी काही ओळखच नव्हती. मी एक साधा बातमीदार, पेपरमध्ये काम करणारा. तोही कोल्हापुरात. प्रदेश नवा. मला सगळं नवं. साधन, पैसा, समूह नाही. पण पेपर मिळाल्यामुळं ते सगळ्यात मोठं व्यासपीठ झालं. तिथे बातमी आली. मुलाखत आली. एखादी सक्सेस स्टोरी आली. लग्नाची बातमी आली की, खूप चर्चा व्हायची. त्याच्यातून माझीही एक प्रतिमा तयार व्हायला लागली की, अंधश्रद्धेविरुद्ध भांडणारा हा पोरगा आहे. तो काही तरी करतोय.

प्रश्न - पुढे चळवळीचं स्वरूप कसं आलं?

- पुढे 1980 च्या कालखंडानंतर महाराष्ट्रातल्या काही मोठ्या संघटनांनी याच्यामध्ये लक्ष घातलं. देवदासी चळवळीत पहिल्यांदा बाबा आढाव यांनी लक्ष घातलं. संघटना स्थापन केली. भीमराव गस्तीनेही संघटना स्थापन केली. कोल्हापुरातही संघटना स्थापन झाली. त्यांच्या त्यांच्यात समन्वय चालू झाला. पुढे काही वर्षांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांचं या चळवळीत आगमन झालं. त्यांची पहिली अशी चळवळ होती की, तिला एक शास्त्रशुद्ध पाया होता. तिच्याकडे शिक्षण होतं, प्रशिक्षण होतं, साधनं होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तरुणवर्ग खूप मोठ्या प्रमाणात दाभोलकरांच्या बरोबर होता. तो सुशिक्षित होता. त्यागी, समर्पक भावनेने या ‘मूव्हमेन्ट’कडे पाहायचा.

तिथून पुढे हा जो विषय आहे, तो एका संघटनेच्या हातामध्ये गेला आणि ते खूप चांगलं झालं. संघटनेचं पण वजन वाढलेलं होतं. दबदबा तयार झालेला होता. विविध कार्यक्रम चालू झालेले होते. एका मोठ्या पटावर तो विषय आला. या सगळ्या प्रवाहांचा मी हितचिंतक झालो होतो. त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणं किंवा त्यांना काही मदत लागली तर उपलब्ध करून देणं,  काही संदर्भ उपलब्ध करून देणं-अशी कामं मी संघटनेबाहेर राहून करत होतो. पण संघटनेचा मी तेव्हा आणि आजही एक सक्रिय हितचिंतक होतो, आहे. नुसताच प्रतीकात्मक हितचिंतक नाही, तर सक्रिय...

प्रश्न - एक वास्तव असं आहे आपल्या समाजामध्ये, बऱ्यापैकी परिवर्तन आपल्याला दिसतं, नाही असं नाही. पण दुसऱ्या बाजूने मानसिकता काही बदलत नाही आणि काही प्रमाणात अंधश्रद्धा आपल्याला दिसतात. त्या जशा निरक्षर लोकांमध्ये आहेत, तशा सुशिक्षित लोकांमध्ये देखील आहेत. याच्याकडे आपण कसं पाहता?

- हे जे अंधश्रद्धांच्या विरोधात वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत- संघटनात्मक पातळीवर, लेखनाच्या पातळीवर, साहित्याच्या पातळीवर, कायद्याच्या पातळीवर, प्रबोधनाच्या पातळीवर- हे सगळे प्रयत्न काही वाया गेलेले नाहीयेत्‌. त्याला खूप सुंदर फळं आलेली आहेत. या प्रयत्नांमुळेच कर्नाटकात देवदासींच्या विरोधात कायदा झाला. महाराष्ट्राने त्या कायद्यात पुन्हा बदल केला. देवदासींच्या पुनर्वसनाचे शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले. त्यांचं शिक्षण व्यापक प्रमाणात चालू झालं. त्यांना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. इथपासून ते त्यांना पेन्शन उपलब्ध व्हावी इथपर्यंत खूप प्रयत्न झाले. त्यांच्यासाठी सरकारने एक अभ्यास आयोग नेमला. त्यांच्यामध्ये या संघटनेतले कार्यकर्ते सहभागी होते. त्या आयोगाचा अहवाल सरकारने मान्य केला. त्यात ज्या शिफारशी अमलात आणल्या, हे जर झालं नसतं, तर आजचं अंधश्रद्धेचं चित्र अजून भीषण वाटलं असतं. ते भीषण वाटत नाही, कारण हा प्रतिकार आहे.

पण अंधश्रद्धा सगळ्या संपत नाहीत. काही संपतात आणि काही नवे चेहरे घेऊन पुढं येतात. म्हणजे जेव्हा आम्ही बुवाबाजीविरुद्ध लढत होतो. लिंबू देणारा, त्यांनी लिंबू द्यायचंच बंद केलं. तो पाणी द्यायला लागला. पाणी द्यायचं बंद केलं, तर फुलं द्यायला लागला. फुलं द्यायचं बंद केलं, मंत्र म्हणायला लागला. फॉर्म बदलत होता.

या अंधश्रद्धा फक्त बुवांमुळं टिकतात, असं म्हणणं बरोबर नाही. बुवा हे त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. वाहक आहेत. त्यांचे निर्माते आहेत.

प्रश्न - आता थोडा वेगळा प्रश्न असा की, तुम्ही अनेक वाङ्‌मयप्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे. तुम्हाला तो-तो वाङ्‌मयप्रकार का हाताळावासा वाटला? तुम्ही स्वतःच्या लेखनाकडे कसं बघता? म्हणजे, तुमच्या लेखनाचं प्रयोजन काय?

- एक म्हणजे, लेखनाला प्रयोजन असायला पाहिजे. जगण्याला प्रयोजन असायला पाहिजे. तुमच्या वर्तनव्यवहाराला प्रयोजन असावे. यावर मी खूप ठाम आहे. माझी ती भूमिकाच आहे. ती कुणाला मान्य होतेय की नाही, याचा मी कधी विचार करत नाही. मला खूप पातळ्यांवर व्यक्त व्हायचं आहे. एकाच पातळीवरून मला व्यक्त नाही व्हायचं. मला अंधश्रद्धा मांडायच्या आहेत, त्यातले अडकलेले जीव मांडायचे आहेत, त्यांचं प्रबोधन मांडायचं आहे. मला दारिद्र्याविरुद्ध लढायचं आहे. मला जातिव्यवस्थेविरुद्ध लढायचं आहे. मला संस्कृतीतल्या विषमतेविरुद्ध लढायचं आहे. किती तरी पातळ्यांवर मला व्यक्त व्हायचंय. मला काही तरी सांगायचंय.

ही सगळी जी विविधता आहे, त्याच्यातल्या व्यक्त होण्याच्या ज्या गरजा आहेत; त्या वेगळ्या-वेगळ्या आहेत. मग मी असा विचार करतो की, मला आता देवदासी विषयावर व्यक्त व्हायचं आहे- मी काय केलं पाहिजे. कविता लिहू का? कादंबरी लिहू का? मग त्याचा उपयोग किती होईल? ज्यांच्यासाठी मी लिहिणार आहे,  त्यांची साक्षरता किती आहे? त्यांचं आकलन किती आहे? त्यांचा समजूतदारपणा किती आहे? मग त्यांना कळेल,  अशा फॉर्मच्या शोधात मी जातो.

प्रश्न - तुम्ही लेखनाबरोबरच प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर व्याख्यानं देत असता...

- जेव्हा मी काम करत होतो- चाळीस वर्षांपूर्वी, तेव्हा भारताची साक्षरता काय होती? 50 ते 60 टक्के होती. त्यातही दलितांची साक्षरता किती होती? 10-12 टक्के. त्यातही महिलांची साक्षरता किती होती? 5-7 टक्के. त्यातही अंधश्रद्धेला बळी पडलेल्यांची साक्षरता किती होती? 0.0034 होती. मी अभ्यास केला होता की, आता मला काय करायला पाहिजे. माझं लेखन तिथं पोचणार नाही, माझी कथा पोचणार नाही. कविता पोचणार नाही, सिनेमा पोचणार नाही; तर थेट मीच पोहोचायला पाहिजे. मलाच पोहोचायचं असेल, तर मला भाषणंच करायला पाहिजेत. मग आता भाषणं कशी करायची? त्या अशा बाया आहेत कानडी-मराठी, मराठी-कानडी बोलणाऱ्या. त्यांची भाषा प्रदेशनिहाय बदलणारी आहे. त्यांचं आकलन वेगळं आहे. मग बोलायचं तर कसं बोलायला पाहिजे? त्यामुळे बरेच दिवस प्रयत्न करून मी माझ्या आयुष्यासाठी कायमची एक सोपी भाषा तयार करून घेतली. मला खूप कष्ट पडले. त्यांचे शब्द, पर्यावरण, जीवनातल्या घटना, घडामोडी घेऊन त्यांच्या भाषेत बोलायचं. मग माझ्यावर लोकांचा इतका विश्वास वाढत गेला, माझ्या भाषणांचा इतका मोठा परिणाम होत गेला की; मी दोन-दोन हजार तीन-तीन हजार देवदासींच्या समोर भाषणं केलेली आहेत.

प्रश्न - संवादी शैली म्हणजे लोकांशी आणि लोकांच्या भाषेत बोलणं, ही एक चांगली परंपरा आहेच आपल्याकडे. म्हणजे गाडगेबाबांचं नाव तुम्ही घेतलंत. विशेषतः आपल्याकडे जो महिलावर्ग आहे, त्या महिलावर्गामध्ये अंधश्रद्धा खूप आहेत, असं म्हटलं जातं. त्यांच्याशी बोलताना तुमची शैली कशी असते?

- आता महिला विविध स्तरांतल्या, मध्यम वर्गातल्या आहेत. दलित आहेत, शेतकरी आहेत. झोपडपट्टीतील आहेत, वेश्या आहेत. मला प्रवचनाची परंपरा फार आवडते. मला कीर्तनाची परंपरा खूप आवडते. मला एकतर्फी भाषण आवडतच नाही, संवाद करायला पाहिजे. मी समोरच्याला कधीच गप्प बसू देत नाही. त्याला अधून-मधून प्रश्न विचारतो. त्याच्यात भटक्या जातीतल्या, गुन्हेगार जातीतल्या महिला आहेत. कॉलेजच्या मुलीही आहेत.

पारध्यांच्या स्त्रियांसमोर बोलताना त्यांची भाषा आधी समजून घेतो. ती कुठूनपण- त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलून, पुस्तकात वाचून. त्यांचं जगणं अगोदरच माहिती आहे. त्यांच्यावर भरपूर लेखन झालेलं आहे. भाषणाच्या वेळेला ते उपयोगी पडतं. मी डायरेक्ट प्रश्न विचारतो. वडाऱ्याच्या बाईला ‘तू चोळी का घालत नाही?’ असं विचारणं ठीक आहे; पण तिच्या मनात प्रश्न आला पाहिजे- अशी कोणती व्यवस्था आहे की, जिनं आपली चोळी पळवून नेलेली आहे? आपलीच का नेली? मग तिला वाटतं, याला सगळंच माहिती आहे. तिला वाटायला लागतं की- आपलीच चोळी नेली, ती परत आणायला पाहिजे. हा आपलाच माणूस आहे.

जेव्हा त्यांच्या जगण्याला हात घालून तिथं तरंग उमटायला सुरू होतात, तेव्हा त्यांच्या न्‌ माझ्यातलं अंतर संपून जातं. मी मातंग समाजात गेलो तर- दोराला पीळ किती वेळा घालायचा आणि किती वेळा चक्री फिरवायच्या, मला माहिती आहे. रेडा कापताना काय त्रास होतो, हे मी कर्नाटकात बघितलंय. एका घावातच रेड्याचं मुंडकं तोडायचं असतं. हे कोणी लादलंय आपल्यावर जीवघेणं काम? त्याचा जीव घेण्याच्या प्रयत्नात आपला पण जीव जाण्याची शक्यता असते.

प्रश्न - जातिव्यवस्थेमध्ये कुरूप विषमता आहेच. मराठीतील लेखक भालचंद्र नेमाडे यांनी ‘जाती मोडल्या तर देश मोडेल’ अशा प्रकारचं विधान मध्यंतरी केलं होतं. त्याच्याकडं तुम्ही कसं पाहता?

- एक तर देशीवादाच्या नावाखाली जातिव्यवस्थेचं समर्थन करणं, त्या टिकाव्यात म्हणून आग्रह धरणं, ही भूमिका मानवताविरोधीच आहे. मूल्यविरोधी आहे. माणसाच्या विरोधातली भूमिका आहे. जाती टिकण्याचा आणि देश टिकण्याचा काहीही संबंध नाही. खरं म्हणजे आपल्याकडे जाती पाच हजार वर्षांपूर्वी होत्या. पण पाच हजार वर्षांपूर्वी राष्ट्र होतं का? नव्हतं. का नव्हतं? मग जाती असून राष्ट्र का नव्हतं? जाती असून देश का नव्हता? भारत वगळता अन्य जगामध्ये कुठेच जाती नाहीत, पण देश आहेत. ते का मोडून पडले नाहीत? त्यामुळं ते तर्कशास्त्र चुकीचं आहे.

प्रश्न - सध्याचं जे सामाजिक-राजकीय वास्तव आहे, त्याबद्दल अनेक लेखकांच्या काही प्रतिक्रिया सध्याच्या काळात आलेल्या आहेत, अनेक लेखकांनी आपले पुरस्कार परत केलेले आहेत...

- आत्ता जी परिस्थिती आहे, तिचं वर्णन सगळे जण असहिष्णुता असं करतात. असहिष्णुता याचा अर्थ काय? तुम्हाला माणूस म्हणून व्यक्त होण्यात अडथळे येणं. व्यक्त होण्याला मज्जाव करणं, तुमचं ऐकून न घेणं- ही असहिष्णुता आहे. हे आजच घडतंय का? तसं मी म्हणणार नाही. कारण भारताला असहिष्णुतेची परंपराच जास्त आहे. त्या परंपरेविरुद्ध माणूस लढत आलेला आहे, समाज लढत आलेला आहे, कायदे घडवत आलेला आहे.

असहिष्णुतेचं वेगळं रूप म्हणजे गर्भाशयात असणाऱ्या मुलीचं लग्न होणं, ही असहिष्णुताच आहे. ती तर सगळ्यात मोठी असहिष्णुता आहे. ती जन्माला येणार की नाही, जी जगणार की नाही हे माहीत नाही; पण त्या गरोदर बाईच्या पोटाला कुंकू लावून लग्न करणं- हे होत आलं आहे आपल्याकडं. नवऱ्याच्या चितेवर बाईला ढकलणं,  दलितांना वरून पाणी वाढणं, त्यांना कुजलेलं अन्न खायला देणं- ही असहिष्णुताच आहे ना! असहिष्णुता ही होतीच; पण माणसाने याच्या विरुद्ध संघर्ष करत ती संपवणं, तिचं स्वरूप बदलणं, तिच्यावर हल्ला करणं- असं करत तो इथपर्यंत आला आहे. म्हणजे कुठपर्यंत आला, तर तो उत्तर-आधुनिक काळापर्यंत आलेला आहे.प्राचीन काळातील गुहेपासून तो इथपर्यंत आला आहे. याकाळातसुद्धा एकीकडे विज्ञानाचा स्फोट, तंत्रज्ञानाचा स्फोट, ज्ञानाचा स्फोट होत आहे आणि प्राचीन परंपरांच्या नावाखाली माणसाच्या वाच्यस्वातंत्र्यावर, लेखनस्वातंत्र्यावर, वर्तनस्वातंत्र्यावर समूहानेच मर्यादा आणणे- हे अपेक्षित नाही.

तुमच्याकडे राज्यघटनाही आहे आणि तुम्ही बंदीही करता. तुमच्याकडे स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे आणि तरी हल्ला करणार म्हणता. हे राज्यघटनेच्या आणि उत्तर-आधुनिकतेच्या विरोधातलं आहे. आधुनिक होण्याच्या मार्गात जे अडथळे येतात, त्याचं नाव असहिष्णुता आहे. दाभोलकरांची, पानसरेंची, कलबुर्गींची हत्या झाली. या तिघांपैकी कोणीही ‘तुमचा धर्म संपवून टाका, नष्ट करा, जाळून टाका’ असं म्हटलेलं नाही. यांचा एकच आग्रह होता- समाज सुंदर व्हायचा असेल, स्वातंत्र्य-समता-बंधुतेवर उभं राहायचं असेल; तर त्याच्या आड येणारे स्पीड ब्रेकर काढून टाकायला पाहिजेत.

गेल्या दीड-दोन वर्षांत ज्या घटना आपल्याकडे घडतायत ना, त्या गंभीर स्वरूपाच्या होत्या. आपल्या अभिव्यक्तीला, विचाराला दाबणाऱ्या अशा या घटना होत्या. त्यातून लेखकांनी एक मूव्हमेंट चालू केली. तिला आपण ‘पुरस्कार वापसी’ म्हणतो. खूप वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांनी आपापले पुरस्कार शासनाला परत केलेत. त्यात लेखक, शास्त्रज्ञ, नट, संशोधक आहेत. पद्‌मश्री पुरस्कार मिळालेलासुद्धा आहे. या कृतीचं मी स्वागतच करतो.

मुलाखत: मनोहर जाधव

(शब्दांकन : भिकचंद लांडे)

 

Tags: आई समजून घेताना वाट तुडवताना मनोहर जाधव उत्तम कांबळे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2015 interview mulakhat aai samajun ghetana vat tudavatana manohar jadhav uttam kambale dr narendra dabholkar smruti purskar Maharashtra foundation awards 2016 Maharashtra foundation awards 2015 Maharashtra foundation purskar 2015 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

उत्तम कांबळे
uttamkamble56@gmail.com

संपादक, पत्रकार आणि साहित्यिक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके