डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हवाला प्रकरणाच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण पुस्तिका

हवालाग्रस्त राजकारणाचा लेखकाच्या अपेक्षेनुसार निवडणुकांवर परिणाम होवो किंवा न होवो, परंतु हवालाग्रस्त राजकारणातून काही बोध घेऊन एकूण भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था यांना नवी दिशा दाखविण्याचा अल्पसा प्रयत्न प्रा. देसरडा यांनी केला आहे असेच म्हणावे लागेल.

भ्रष्टाचार आणि लाचलुचपतीच्या हवाला प्रकरणामुळे राष्ट्राच्या नीतिमत्तेला लागलेली ही शेवटची तर थरथर नाही ना, असा प्रश्न विचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पडल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या तथाकथित लोकनेत्यांच्या विकृत चंगळवादी संस्कृतीचे प्रदर्शन हवाला प्रकरणामुळे बाहेर आले आहे.

महाराष्ट्रातील सुपरिचित अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी नुकतीच 'हवालाग्रस्त राजकारण, निवडणुका आणि व्यवस्था-परिवर्तन' ही महत्त्वपूर्ण छोटेखानी पुस्तिका स्वतःच प्रकाशित केली आहे.

आजपर्यंत देशाच्या विविध प्रसारमाध्यमांमधून या हवाला प्रकरणाची हाल-बे-हाल वर्णन अनेकांनी वाचली आहेत, बघितली आहेत, परंतु एकसंघ सविस्तर माहिती आणि त्यातही या प्रकरणाचे भेदक दुष्परिणाम प्रा. देसरडा यांच्याइतके स्पष्टपणे अद्याप तरी कोणीही कोठेही मांडलेले नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने ढोंगी राजकीय संधिसाधू पक्षांचा प्रा. देसरडा यांनी केलेला पंचनामा खरोखरच महत्त्वाचा आहे.

प्रत्येक राजकीय पक्षाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. प्रा. देसरडा यांनी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांना, आशा-आकांक्षांना गेलेल्या तड्याचे आपल्या मार्मिक शैलीत विश्लेषण करून, आहे त्या व्यवस्थेला परिवर्तनाची नवी दिशा दाखविण्याचा अल्पसा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. 

बोफोर्स, रोखे, साखर, टेलिकॉम, हवाला आणि निवास अशा एकामागून एक घोटाळ्या-महाघोटाळ्यांच्या बातम्यांनी सारा देशच ढवळून निघाला आहे. राज्यकर्तेच देशाचे तुकडे करून देश विकू पाहात आहेत. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. साधारण 31 जबाबदार लोकप्रतिनिधींनी हवालाची खिरापत-माया लाखोंच्या राशीत आपल्या पदरी जमा केली, त्यांची नावे रकमेनिशी प्रा. देसरडांनी एका दृष्टिक्षेपात वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

देशात इतक्या मोठ्या प्रमाणात नंबर दोनचा काळा पैसा कसा उभा राहतो. या पैशातून कोणती मूल्ये जोपासली जातात, याचे काही दुष्परिणाम होतील काय, याचे विश्लेषण करताना प्रा. देसरडा सांगतात, कंत्राटासाठी खिरापत वाटणारे व्यापारी-उद्योगपती लुटणारे नोकरशहा आणि राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी या सर्वांनी ज्या भपकेबाज भोग-उपभोगवादी विकृत जीवनशैलीचा अवलंब केला आहे, त्यामुळे तमाम नीतिमूल्यांचा चक्काचूर होतो आहे. प्रकृती आणि संस्कृतीचे, सृष्टी आणि स्त्रीत्वाचे प्रचंड दोहन व अमानुष शोषण केले जात आहे. देशोदेशीच्या ऋषिमुनींनी, युद्ध-महावीर, ज्ञानेश्वर, पैगंबर यांनी जी दूरदर्शी शिकवण दिलेली आहे त्याकडे पाठ फिरवून आणि भोगवादाच्या नादी लागून निसर्गाची ऐसीतैसी व माणुसकीचा खातमा करणारा विकासाचा मार्ग चालू ठेवून मानव समाज समूळ विनाश आणि सामूहिक आत्महत्येकडे आगेकूच करीत आहे, हा धोक्याचा इशारा तात्काळ लक्षात घेण्याची गरज आहे.

उपभोगवादी, चंगळवादी संस्कृतीच्या आहारी जात असलेल्या समाजाला पर्यायी विकासनीतीच्या पर्यावरणीय दिशा-दृष्टी देण्याची कल्पना एखाद्या वैश्विक जाणिवा समृद्ध झालेल्या विचारवंताला भासावी. इतक्या आग्रहीपणे प्रा. देसरडा यांनी ही नवी दिशा मांडली आहे.

गांधी तत्त्वज्ञानाची सांगड पर्यावरणीय पर्यायी विकासनीतीसाठी मांडण्याचा प्रयत्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे.

साठ पाने असलेल्या या छोटेखानी पुस्तिकेत भारतीय राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या अंगाने अनेक मुद्यांचा उपमुद्यांचा आढावा देसरडा यांनी घेतला आहे. काही प्रसंगी काही मुद्यांची पुनरावृत्ती जरी झालेली असली तरी उद्याच्या भारतासमोर उभ्या राहणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करताना त्या मुद्यांच्या पुनरावृत्तीचे महत्वसुद्धा साहजिकच खटकत नाही.

हवालाग्रस्त राजकारणाचा लेखकाच्या अपेक्षेनुसार निवडणुकांवर परिणाम होवो किंवा न होवो, परंतु हवालाग्रस्त राजकारणातून काही बोध घेऊन एकूण भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था यांना नवी दिशा दाखविण्याचा अल्पसा प्रयत्न प्रा. देसरडा यांनी केला आहे असेच म्हणावे लागेल.

राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे चाळण्यापेक्षा एक वेळ ही पुस्तिका डोळ्यांखालून घालणे केव्हाही चांगले! मतदानाला जाण्यापूर्वी एकदा ही पुस्तिका समजून घेणे केव्हाही योग्य, अन्यथा पुन्हा पाच वर्षे असेच हवालाग्रस्त राजकारण आपल्या नशिबी येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही!

'हवालाग्रस्त राजकारण, निवडणुका आणि व्यवस्था परिवर्तन'
प्रा. एच. एम. देसरडा
पृष्ठ : 60. किंमत : रु. 15/-

Tags: नरेंद्र लांजेवार. पैगंबर ज्ञानेश्वर लाचलुचपत भ्रष्टाचार Narendra Langewar Prophet Dnyaneshwar bribery Corruption weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके