डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पांढरी स्वच्छ गोडंबी आम्हाला खाण्यासाठी एका निरागस चेहऱ्याच्या मुलीने आणली. प्लेटमधील गोडंबीचा एक दाणा तोंडात टाकून त्या मुलीकडे बघितलं... मुलीच्या चेहऱ्यावर काळे डाग होते, मानेवर, चेहऱ्यावर बिब्याची धग उभारली होती. प्लेट भरलेल्या हाताला मोठा फोड आला होता. तोंडातील गोडंबी कशीतरी अपराधी भावनेने गिळली. बाजूच्याच गोरफडाजवळ गेलो. बिब्याचं एक टरफल उचललं, डाव्या हाताला मतदानाची निशाणी लावतात तसा तेलाचा एक थेंब बोटावर लावला. थोड्या वेळातच आग झाली. चार-पाच दिवस बोटावर बारीक फोड आपलं दाहकतेचं अस्तित्व घेऊन पाहण्यासारखा राहिला.

चिखली जालना राष्ट्रीय महामार्गावरील सर्वसामान्य गावांसारखे एक गाव- ‘भाणखेडा’. चिखलीपासून जालना रोडवर तीन कि.मी. अंतरावर भाणखेडा गावची पाटी आहे. मुख्य हायवेवरून एक कि.मी. आत भाणखेड्याची वस्ती आहे. चिखली तालुक्यासाठीचे मोबाईलचे टॉवर भाणखेड्यात उभारल्यामुळे भाणखेडा दुरूनच नजरेत भरते. "भाणखेडा कुठे आहे?"- असे विचारल्यावर साहजिकच टॉवरकडे बोट दाखवून लोक सांगतात- "त्या तिथे भाणखेडा."

गावची लोकसंख्या 1600 आहे. गावात फक्त-चौथीपर्यंत शाळा. पुढे शिक्षण चिखली या जवळच्या तालुक्याच्या गावाला. गावात शिरताच एक कुजट, कडवट वास नाकात भरतो. काहीतरी जळत आहे... कशाचा हा वास? भाणखेड्याच्या गल्ली-बोळात शेकोट्या पेटविल्यासारख्या आगट्या दिसतात. "काय आहे हे?" विचारल्यावर एक वृद्ध गृहस्थ सांगतात- "बिब्याच्या तेलाची भट्टी हाय ही. पाव्हणं दिसता? कोणाकडे जायचं?"

तीन-चार तरुण जवळ येत म्हणाले- "चला आमच्यासंगं, गोरफडाची धग बघावया."

संक्रातीचा सण आला की, सुवासिनी एकमेकींना वाण देतात. वाटाण्याच्या शेंगा, उसाच्या गंडोऱ्या, गाजरांचे तुकडे, गव्हाणे, दाणे इत्यादींसह बिब्याच्या बाळलेल्या फुलांना वाणात मान असतो. संक्रात आली की, सर्वांनाच बिब्याच्या फुलाची आठवण होते. थंडीच्या दिवसात उष्णता वाढीसाठी गोडंबी आठवते. गोडंबी खाताना काजू खाल्ल्याचे समाधान मिळते- परंतु हीच गोडंबी तयार करणाऱ्यांना काय वेदना होत असतील याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नसते. अशा या गरिबांचा काजू असणाऱ्या गोडंबीची व तिच्या निर्मितीमागील वेदनांची दाहकता शब्दातीत आहे.

बिबे (गोटे) फोडून त्यापासून गोडंबी आणि तेल काढण्याचे काम संपूर्ण देशात फक्त बुलढाणा, वाशीम, अकोला जिल्हांतील बोटावर मोजण्याइतपत पंधरा-सोळा खेड्यांमध्येच मोठया प्रमाणावर चालते.

शेषराव पुंडलिक इंगळे हे भाणखेडामधील एक स्थानिक गोडंबीचे तथा बिब्याच्या तेलाचे उद्योजक. त्यांच्याच भाषेत कारखानदार! भाणखेड्याच्या प्रवेशद्वारातच त्यांची ओळख झाली, भाणखेड्यामध्ये सहा सात बिबे फोडण्याचे कारखाने आहेत. यामध्ये राजाराम देवकर, प्रकाश नेवरे, तुकाराम इंगळे, सदानंद इंगळे, एकनाथ इंगळे, शेषराव इंगळे इत्यादींचे कारखाने बऱ्यापैकी आहेत. शेषराव इंगळे यांनी बिब्यापासून गोडंबी व तेल तयार करण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर सांगितले. “या माझ्यासोबत”, असं म्हणून आम्हाला आपले पाहुणे बनविले. चार-पाच गल्ल्या ओलांडल्यावर शेषराव इंगळेंचा बिबा फोडण्याचा कारखाना आला. घरातील बाज बाहेर आली. आम्ही बाजेवर बसलो. समोर पडकी ओसरी होती. ओसरीत पांढऱ्या मातीच्या दुरून चुली भासतील अशा वेगळ्या पद्धतीने बांधलेले बिबे फोडण्याचे खोलगट मातीचे साचे होते. या प्रत्येक साच्यावर एका ओळीत महिला खाली बसून बिबा फोडीत होत्या. बिबे फोडणाऱ्या महिलांच्या डोक्यावर फक्त छप्पर होते. आजूबाजूला ना भिंत, ना कोणत्या सुविधा. हे बिबे फोडण्याचे कारखाने म्हणजे उघड्यावरती फक्त सावलीची सुविधा असलेली जागा. बिबे फोडण्याच्या या जागेला "गोरफडा" म्हणतात- (कोणी त्याला कामण संबोधतात) शेषराव इंगळे या व्यवसायाची शब्दकळा आम्हाला समजावून देत होते.

हातांत पिण्याच्या पाण्याचे ग्लास देत, "बिब्बे फोडण्याचे काम म्हणजे आगीशी खेळ! एक वेळ आगीशी खेळणं परवडलं पण हा धंदा न्हाय परवडत..." असे म्हणत नर्मदाबाई इंगळे (50 वर्षे) समोर आल्या. "किती वर्षांपासून हे काम करता?" असं विचारल्याबर “तीस-पस्तीस वर्षांपासून तरी हेच काम करतो. समोर बघा, आठ-नऊ वर्षापासूनच्या पोरीबी तुम्हांला बिबेच फोडताना दिसतील." असं त्यांनी म्हणताच- आमच्या लक्षात आले की, खरोखरच अगदी परकरातील लहान मुलींपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत अनेकजणी निस्तेज चेहऱ्याने बिबे फोडत होत्या.

बिबे फोडण्याचे काम पुरुषवर्ग करीत नाही. बिबा नाजूक मारानं फोडावा लागतो व हे नाजूक मारणं हे स्त्रियांनाच जमतं- असं म्हणून पुरुषवर्ग बिबा फोडण्याच्या प्रक्रियेपासून स्वत:ला अलिप्तच ठेवतो. बिबा फोडल्यानंतर बिब्याची जी टरफले निघतात, त्यापासून तेल काढतात. हे तेल काढण्याच्या भट्टीचे काम मात्र पुरुषवर्ग करतो. अनुसूचित जमातीच्या महादेव कोळी आणि त्यांचीच पोटजात भिलवफाडे जातीच्या स्त्रिया बिबे फोडण्याचं, गोडंबी आणि तेल काढण्याचे काम करतात. महाराष्ट्रात (अगदी देशातही!) ज्या पंधरा-वीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबे फोडले जातात त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, भाणखेड, खोर, भोकर, जानेफळ, जांभोरा, सांतुळनारा, रायपूर सैलानी, सावळी, भादोला, उडणगाव, गोळेगाव, भारज (जि.जालना) ऊरुळ (ता.सिल्लोड) अमानी (ता.मालेगाव), जऊळका, जामखेड, कुतरडोह, जोगलदरी, केकतुमरा, टो (जि.वाशीम) इत्यादी खेड्या-वस्त्यांमध्ये बिबे फोडण्याचे काम चालते. भाणखेडा गावात अवघी तीन-चार मातंग समाजाची घरे सोडल्यास संपूर्ण गाव महादेव कोळी समाजाचे आहे. मासेमारी आणि बिबे फोडण्याचा व्यवसाय हा बहुतांश मुख्य व्यवसाय या समाजाचा आहे.

ज्या ज्या गावांमध्ये हा बिबे फोडण्याचा व्यवसाय चालतो, त्या सर्वच गावामध्ये बिबे फोडण्यासाठी मातीच्या चुलीसारखा आकार असलेली कोरफड करतात. हाताची दोन्ही मनगटे मावतील एवढ्या आकाराची (साधारण 9 ते 10 इंच) पसरट जागा आणि बाजूलाच एक मोठी खोलगट जागा तयार करतात. या खोलगट जागेत बिबा फोडल्यावर बिब्याची टरफले त्यात साठविली जातात. बिबा हा नेहमी खाली बसूनच फोडावा लागतो. त्यामुळे मांडी मारल्यावर बिबे फोडणारीच्या पोटापर्यंत येईल एवढ्या उंचीची (14 ते 18 इंच उंच, 3 ते 4 इंच जाडीची आणि 1 पूट रुंदीची) मातीची भिंत बांधलेली असते. यालाच गोरफडा म्हणतात. बिबा फोडताना जे तेल उडते ते या गोरफडावर उडते. फोडणारीच्या अंगावर उडत नाही, त्यामुळे ही उभी भिंत या महिलांचे एका अर्थाने संरक्षण करणारीच भिंत असते. या कोरफडीच्या समोर बिबा फोडणाच्या स्त्रिया मांडी घालून बसतात. प्रत्येक स्त्री डाव्या हाताने बिबा उभा धरते आणि उजव्या हाताने तळाशी सपाट असलेला दगड बिब्यावर मारते. या दगडालाही गोटाच म्हणतात. हा दगड मारताना डाव्या हाताच्या बोटाकडे लक्ष द्यावेच लागते. बिबा फुटल्यावर गोडंबी निघते. बिब्यावर जरा जोरात दगड मारला की, गोडंबीचे तुकडे होतात. पूर्ण गोलाकार गोडंबीला भाव अधिक असतो. तुकडा गोडंबीला भाव कमी येतो. त्यामुळे बिब्यावर किती जोरात, कसं आणि कुठे मारायचे याचा अंदाज अनुभवी स्त्रियांना जास्त असतो. हा अंदाज घेऊनच बिब्याची गोडंबी काढावी लागते.

सकाळी ८ वाजेपासून या गोरफडावर महिला बिबे फोडावयास बसतात. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत (6 वाजेपर्यंत) हा व्यवसाय चालतो. आठ-दहा तास बिबे फोडल्यावर 3 पाव ते 1 किलो गोडंबी निघते. 1 किलो गोडंबी पडल्यावर अवघी वीस रुपये मजुरी मिळते. या महिलांनी तयार केलेली गोडंबी अकोला, जळगाव, मुंबई, हैद्राबादचे व्यापारी ठोक भावाने विकत घेतात. हे व्यापारी गोडंबीचा ठोक भाव 80 ते 85 रुपये किलो ठरवितात; आणि खुल्या बाजारात हीच गोडंबी हे व्यापारी 150 ते 200 रुपये किलोने विकतात. रमझान महिन्यात हैद्राबादमध्ये गोडंबी 210 ते 260 रुपये किलो एवढ्या चढ्या भावाने व्यापारी लोक विकतात.

सौ.गुंफाबाई देवकर (भाणखेडा) बिबे फोडण्याचं तंत्र आम्हाला समजावून सांगतानाच-सांगत होत्या की, “आठ-दहा वर्षांपासून प्रतिकिलो गोडंबीमागे 20 रुपयेच मजुरीचा दर आहे. महागाई आकाशाच्या पार गेली; पर मजुरी काही वाढून मिळत नाही,” ही गुंफाबाईची तक्रार महिला सशक्तीकरण वर्षाच्या शेवटालाही कायम राहावी- ही गुंफाबाईसारख्या या क्षेत्रातील हजारो आदिवासी, अनुसूचित जमातीच्या महिलांची शोकांतिका आहे! “बिबे फोडताना बोटांची, हाताची निगा लई राखावी लागते”- असे म्हणत कापडाच्या चिंध्या बांधलेला हात दाखवत सौ. नर्मदाबाई इंगळे म्हणाल्या की, “बिबे फोडताना बिब्याचे तेल हातावर उडते. हे तेल अती तीव्र असते. हाताच्या चामड्यावर उडाल्यामुळे चामडी जाते व त्या ठिकाणी फोड तयार होतात. हे फोड भद पडल्यासारखे चिघळतात. फोड चिघळल्यामुळे मोठी जखम होते. हे सारे होऊ नये म्हणून दोन्ही हाताच्या प्रत्येक बोटाला सुतळीने, दोरीने घट्ट बांधावे लागते. जेणेकरून हातावर बिब्याचे तेल उडू नये. तरीही बिब्या फोडताना चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर रोज दोन- चार तेलाचे थेंब पडतात. मग हप्ताभर त्या जागेवर काळा डाग राहतो. नंतर तो खपली धरतो व पुढे खपली निघून जाते. रोजच्या कामात अशा डागांची संख्या ही वाढतच जाते. काही स्त्रियांच्या संपूर्ण चेहऱ्यावर देवीच्या व्रणासारखे डाग दिसतात. तरुण मुली डागाळलेला चेहरा लपविण्याचा प्रयत्न करतात. वर्षा-सहा महिन्याचे लहान बाळ आईच्या मांडीवर गोरफडाजवळच खेळत राहिल्याने त्याच्याही हाता-पायांवर, चेहऱ्यावर, अंगावर काळे डाग पडतात. बिब्याच्या तेलाचा एखादा थेंब डोळ्यात गेल्यावर खूप आग होते. अशा प्रसंगी थंड पाण्याने डोळा धुणे हाच एकमेव मार्ग असतो.

बिब्याची धग चेहऱ्यावर लागून सर्व चेहराच सुरपुटलेला, काळाभोर होतो. बिबे फोडणाऱ्या सोळा-सतरा वर्षाच्या अविवाहित मुली बिब्याची धग लागल्यामुळे निस्तेज दिसू लागतात.

बिब्याची गोडंबी काढल्यावर बिब्याचे जे टरफल असते, त्यात मोठ्या प्रमाणावर तेल असते. हे तेल दोन प्रकारे काढतात. जमिनीत एक दोन-अडीच फूट खोल व आठ ते दहा फूट लांब खड्डा करून त्या खड्ड्यात सात-आठ टिनाचे गोलाकार डब्बे ठेवतात. या प्रत्येक डब्यावर गोलाकार माठात बिब्याचे टरफल भरतात. माठ डब्यावर उलटा ठेवून आजूबाजूला शेणाच्या गोवऱ्या व गवत टाकून पेटवून देतात. माठातील टरफल बाहेरच्या उष्णतेमुळे हळूहळू पेट घेतात व पेटल्यावर त्यातील तेल खालच्या डब्यात पडते व टरफलांची जळून राख होते. या प्रकारच्या भट्टीत टरफलांपासून तेल निघण्याचे प्रमाण जास्त आहे. तेल काढण्याच्या दुसऱ्या प्रकारात बुडाशी छिद्र असणाऱ्या एका टोपल्यातील टरफल गवताच्या साहाय्याने पेटवून देतात. टरफल टोपल्याच्या छिद्रातून तेल डब्यात टपकते व टरफल पेटत-पेटत शेवटी टोपल्यात राख जमा होते.

बिब्याचे हे तेल दोन-तीन वर्षांपूर्वी 30 रुपये लिटर या ठोक भावाने विकले जायचे. आज चार-पाच रुपये लिटर या तेलाचा भाव आहे. बिब्याच्या तेलात विषारीपणा तथा त्याची तीव्रता अधिक असल्याने केंद्र सरकारने या तेलाच्या विविध ठिकाणच्या वापरावर बंदीबाबत कडक निर्बंध लादले; त्यामुळे या तेलाचा भाव मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. एकट्या भाणखेडा गावातून दर तीन महिन्याला दोनशे लिटरचे 50 ते 60 ड्रम तेल मुंबई-दिल्लीचे व्यापारी कंपन्यांमध्ये विकण्यासाठी नेत असत. आता तेलाची मागणीच कमी असल्यामुळे या धंद्यापुढे मोठे संकट उभे राहिल्याची माहिती गेल्या वीस वर्षांपासून या तेलाची भट्टी लावणारे शेषराव इंगळे हे सांगत होते, आज बिब्याच्या तेलाला अनेक रंगाच्या (पेंटस्) कारखान्यांमध्ये, कापड उद्योगामध्ये, रबर उद्योगामध्ये तसेच औषध उद्योगामध्ये मागणी आहे. परंतु भाव खूपच कमी आहे. गावोगावचे शेतकरी बैलगाड्याच्या आसाला, धान्य उफणण्याच्या सूप-टोपल्या इत्यादींना या तेलाचा गिलावा करतात. लाकडाला कीड लागू नये म्हणूनही या तेलाचा हात मारतात.

बिब्बा फोडणाऱ्या प्रत्येक गावात स्थानिक ठेकेदाराच्या हाताखाली आठ-दहा ते पंधरा-वीस महिलांचा राबता असतो. ठेकेदाराच्या आर्थिक कुवतीप्रमाणे तो बिब्याचा माल खरेदी करतो. बिब्यांचा पुरवठा करणारे मोठे व्यापारी मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांतून बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांतील गोरफडांवर बिबा ट्रकांनी आणून विकतात. ठोकमध्ये हा भाव 500 रुपये किंटल असतो. नव्या बिब्यांची पांढरी गोडंबी निघते. तिला भाव चांगला मिळतो. जुन्या बिब्यांच्या गोडंबीला भाव कमी येतो.

बिब्बे फोडणाऱ्या अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा नाही. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे पाठदुखीचे, डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

बिब्यापासून गोडंबी तयार करण्याच्या पद्धतीत कोणतीच सुधारणा होऊ शकत नाही किंवा गोडंबी फोडण्यासाठी एखादे यंत्रही कोणी विकसित करू शकले नाही- याचे प्रत्येकालाच दुःख आहे. भाणखेड्याचे शेषराव इंगळे सांगतात की, "मुंबईवरून टाटा कंपनीतील काही माणसे हा उद्योग बघण्यासाठी आली होती. परंतु त्यांच्याही मते बिब्बे फोडण्यासाठी एखादे यंत्र तयार करणे ही अवघड बाब आहे.” असे त्यांनी सांगितले. बिब्याच्या झाडातही दाहकता असते. कच्चे बिबे पिकल्यानंतर बिब्याचे फूल पिवळसर व बिब्याचे फळ काळसर होते. हे फूल या फळासह एकत्रच राहते. पिवळे फूल फळापासून वेगळे करण्याचे कामही त्रासदायक असते. हाताने फूल खुडून (तोडून) बिबा वेगळा करावा लागतो. हे वेगळे केलेले फूल (बिब्बोटी) सुकल्यावर बाणात टाकण्यासाठी किंवा खाण्यासाठी चार ते आठ रुपये किलोच्या भावाने विकले जातात. एका साधारण उंचीच्या बिब्यायाच्या झाडापासून 60 ते 120 किलो बिबा व वीस से पंचवीस किलो सुकलेली फुले मिळतात. परिपक्व होत असलेले बिबे झाडावरून काढतानाही त्याची धग तीव्रतेने जाणवते. या धगीमुळे अनेकांच्या अंगाची लाही लाही होते.

गोडंबीच्या निर्मितीमागील दाहकता अनुभवत असतानाच एका प्लेटमध्ये पांढरी स्वच्छ गोडंबी आम्हाला खाण्यासाठी एका निरागस चेहऱ्याच्या मुलीने आणली. प्लेटमधील गोडंबीचा एक दाणा तोंडात टाकून त्या मुलीकडे बघितलं... मुलीच्या चेहऱ्यावर काळे डाग होते, मानेवर, चेहऱ्यावर बिब्याची धग उभारली होती. प्लेट भरलेल्या हाताला मोठा फोड आला होता. तोंडातील गोडंबी कशीतरी अपराधी भावनेने गिळली, बाजूच्याच गोरफडाजवळ गेलो. बिब्याचं एक टरफल उचललं, डाव्या हाताला मतदानाची निशाणी लावतात तसा एक थेंब तेलाचा बोटावर लावला. थोड्या वेळातच आग झाली. चार-पाच दिवस बोटावर बारीक फोड आपलं दाहकतेचं अस्तित्व येऊन पाहुण्यासारखा राहिला. काल फोडावरची खपली पडली, पण बोटावरील व्रण अजूनही आहे- गोरफडाची धग लक्षात राहावी म्हणून!

[या लेखाच्या संबंधातील मुखपृष्ठावरील प्रकाशचित्र : रविकिरण टाकरकर, बुलढाणा.]

Tags: ग्रामीण भाणखेडा जालना चिखली सामाजिक शेती रविकिरण टाकरकर नरेंद्र लांजेवार Ravikiran Takarkar Narendra Lanjewar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके