डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चला, पुस्तकमैत्री बालवाचनालयाची चळवळ पुढे नेऊ या...

बुलढाण्यातील पुस्तकमैत्री बालवाचनाच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहरात 50 बालवाचनालये महाराष्ट्राच्या पन्नाशीनिमित्त सुरू करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत तेहतीस बालवाचनालये सुरू झाली आहेत. लहान मुले रोज संध्याकाळी या बालवाचन केंद्रांवर गर्दी करतात, रोज पुस्तके वाचावयास घरी नेतात. सहज-सोपी आणि कुठेही, कोणालाही सुरू करता येतील अशी ही बालवाचनालये गावोगावी सुरू व्हावीत अशीच इच्छा या बालवाचनालयाच्या संयोजकांची आहे. साने गुरुजींच्या एकशे दहाव्या जयंतीदिनी आपणही महाराष्ट्रात एकशे दहा बालवाचन केंद्रे सुरू करण्याचा संकल्प करू या... - संपादक  

शिक्षक, पालक, लेखक, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत कुठेही बोलताना सहज बोलून जातात... ‘‘आज वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे.. आजच्या पिढीला वाचनामध्ये रुची नाही... टीव्हीपुढे तासन्‌तास मुलं बसलेली असतात... मैदानं ओस पडली आहेत... समाजाची संवेदनशीलताच हरवत चालली आहे... व्हिडिओ गेम्स, इंटरनेट चॅटिंग आणि कार्टून्समध्ये विद्यार्थी गुंतले आहेत. अभ्यासाचं ओझं आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे मुलांना व्यक्तिगत छंद जोपासायला वेळच मिळत नाही... पुस्तकं वाचण्याची इच्छा आहे, पण ती खूपच महाग आहेत... आमच्या गावात किंवा घराजवळ ग्रंथालय नाही.... आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, आजच्या मुलांना शिस्तच नाही, मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव नाही... वगैरे वगैरे...’’ मुलं आणि त्यांच्या बाबतीतील ही नकारघंटा सर्वत्रच दिसते. म्हणून काय आपण प्रयत्नच करायचे नाहीत? मुलं ग्रंथालयात जात नसतील तर ग्रंथालयच मुलांच्या घराजवळ नेलं तर? मुलांवर अधिकार न गाजवता त्यांना काय हवं-नको हेच आपण त्यांच्याकडून शिकलो तर? मुलांना काय वाचायला आवडतं हे त्यांनीच ठरवलं तर? आपण मुलांच्या आवडीनिवडीनुसार घरात वस्तू घेतो, मग त्यांच्या आवडीची पुस्तकं का नको? वस्तूंवर केलेला खर्च वाया जाऊ शकतो, पण पुस्तकांवर केलेला खर्च ही उद्याची गुंतवणूक नाही वाटत? मुलं खरं तर वाचू इच्छितात, परंतु त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं आज मिळत नाहीत. मोठ्या व्यक्ती, पालक वर्ग आपली आवड त्यांच्यावर लादून त्यांचं कोवळं भावविश्व बधीर करीत आहेत, म्हणून मुलांमधील संवेदनशीलता जागृत करण्यासाठी आम्ही तीन मित्रांनी (नरेंद्र लांजेवार : लेखक-पत्रकार तथा सदस्य अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विनोद देशमुख : प्रसिद्ध वक्ते तथा बालकवी, रविकिरण टाकळकर : संगीत शिक्षक तथा सुप्रसिद्ध छायाचित्रकार) एक छोटासा प्रयोग सुरू केला. पुस्तक प्रेमी बालवाचनालयाचा. मुला-मुलींच्या घरात बालवाचनालय सुरू करण्याचा....

बुलढाणा शहराच्या कानाकोपऱ्यात बालकांसाठी सुरुवातीला वस्ती ग्रंथालयं सुरू केलीत. (शासनाचं कोणतंही अनुदान न घेण्याच्या अटीवर!) पुढील वर्षी, 1 मेपर्यंत बुलढाणा शहरात पन्नास बालग्रंथालयं उघडण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आज रोजी सुरू झालेल्या या 33 पुस्तकमैत्री बालवाचनालयांध्ये सरासरी पन्नासच्या पुढेच बालकांची नोंदणी झालेली आहे. वाचनालयाचे नियमही साधे, सरळ आणि सोपे आहेत. संध्याकाळी 5 ते 6 या एका तासाच्या वेळेत रोज एकच पुस्तक बालवाचकाला मिळेल. ते त्याने पूर्ण वाचून दुसऱ्या दिवशी जमा करायचे व पुन्हा नवीन पुस्तक न्यायचे- तेही मोफत! ना कोणते डिपॉझिट, ना मासिक फी. पुस्तक देवघेवीचा व्यवहार बघतात त्या त्या केंद्रावरील बालमित्रच! मोठ्यांची अनावश्यक लुडबूड नको! मुलंच या ग्रंथालयांचे छान व्यवस्थापन करतात. स्वत:च पुस्तकांच्या नोंदी ठेवतात, गप्पांमध्ये पुस्तकांवर चर्चा करतात... घरी नेलेले छोटेसे पुस्तक तीस-चाळीस मिनिटांत वाचून झाल्यावर, मोठी ताई, दादा किंवा आई-बाबा, आजी-आजोबासुद्धा कुतूहलाने घरी आणलेली ही पुस्तकं वाचतात, अशी गोड तक्रार आता हे बालवाचक आमच्याजवळ करतात!  

आमच्या बालवाचनालयाच्या प्रत्येक केंद्रावर रोज पाच-साडेपाच वाजले की, पुस्तक बदलण्यासाठी मुलं गर्दी करतात. मी वाचलेलं पुस्तक किती छान होतं, तुझं कसं आहे रे... अशी वाक्यं त्यांच्या तोंडून बाहेर पडतात. काही केंद्रांवर पुस्तक घेण्यासाठी चक्क रांगा लागतात. मुलं वाचतात... मुलं फक्त वाचतच नाहीत तर ती चक्क पुस्तकांबरोबर बोलतात. वाचता वाचता एखादा बालवाचक म्हणतो... अरे हट्ट! चक्‌ चक्‌ चक्‌...! हाऽहाऽहाऽ! येस्स!! ओ.. शिट्‌!... ही नुसती बडबड नसते, हे असतं पुस्तकांशी तादात्म्य पावणं, जे मोठ्यांनाही जमत नाही! शासनाने वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी हे करावं, ते करावं असं खूप काही सांगता येईल; पण शासकीय यंत्रणेकडून आता खूप काही अपेक्षा ठेवणं योग्य नाही. वाचनसंस्कृतीच्या वाढीचं सांस्कृतिक भानच आजच्या नोकरदारांजवळ नाही. म्हणून ज्यांना ज्यांना या कामात पोटतिडीक आहे अशांनी दहा ते पंधरा वर्षं या कामात सक्रियता दर्शविली तरच उद्याला सकस आणि गांभीर्याने वाचन करणारी पिढी पुढे येईल.

शहरातील बरेच विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांध्ये शिक्षण घेत असल्याने मातृभाषेची अवीट गोडी काय असते- याची जाणीव मराठी भाषेतील गोष्टींच्या छोट्या छोट्या पुस्तकांतून त्यांना होणार आहे. आम्ही सुरू केलेली बालवाचनालये फक्त मध्यमवर्गीय वस्तीतच नाहीत तर झोपडपट्टी, मुस्लिमबहुल वस्तीतही आहेत. खरे तर श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय मुलांपेक्षा गरीब वस्तीतील मुलांची वाचनाची भूक मोठी आहे. या सर्व बालवाचन केंद्रांवर बालवाचकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तक देणारा व घेणारा बालग्रंथपाल! मोठी माणसं लहान मुलांशी नाही म्हटलं तरी कृत्रिमच बोलतात. लहान मुलांचे लहान मुलांशी ट्युनिंग जुळते व त्यांनाही वाटतं, चला इथे मोठ्या माणसांचं बॉसिंग नाही. ज्यांच्या घरी ही बालवाचनालये सुरू केलीत त्यांना याचा काही त्रास नाही. कारण पुस्तकांची एक छोटीशी थैली किंवा पेटी एवढाच या ग्रंथालयाचा सध्या तरी पसारा. पेटीत साधारण दीडशे ते दोनशे पुस्तके. केंद्रात बसून पुस्तके वाचण्याची गरज नाही. फक्त रजिस्टरमध्ये नोंद करा व घरी पुस्तक घेऊन जा. पुस्तक घेताना किंवा देताना समोर मोठी माणसं नाहीत... पुस्तक जर फाटलं किंवा हरवलं तर ज्या किंमतीचं पुस्तक असेल तेवढ्याच किमतीचं एक नवं किंवा जुनं पुस्तक भेट म्हणून द्यायचं. ना दंड ना शिक्षा. इतकी साधी सोपी पद्धत.

आम्ही तीन मित्रांनी हा उपक्रम सुरू केला. अनेकांना वाटलं गाजराची पुंगी आहे... वाजली तर वाजली. पण आम्ही थोडी मेहनत घेतली. मी स्वत: केरळ व पश्चिम बंगालमध्ये जाऊन वाचनसंस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. केरळ व पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य व्यक्तीचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या शाळेत करून बघितला आहे. या अनुभवाचा आम्हांला विशेष फायदा झाला. आम्ही या उपक्रमावर खूप पैसे खर्च केले असंही नाही, फक्त एक एक महिन्याची मिळकत या कामासाठी आम्ही खर्च केली. आमची अशी इच्छा आहे की, अशी छोटीछोटी बालवाचन केंद्रं प्रयोगशील व्यक्तींच्या पुढाकाराने गावोगावी व्हावीत. एक बालवाचन केंद्र उभं करण्यासाठी जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यात एक ते दीड हजार रुपयांची भर टाकल्यास वर्षभर हे केंद्र सुरू राहू शकतं. वर्षभरानंतर वाचून झालेली एका केंद्रातील पुस्तकं दुसऱ्या केंद्रात हलवता येतील. तेहतीस बालवाचनालये उत्तम प्रकारे सुरू झाली आहेत. प्रसिद्ध बालसाहित्यिक बाबा भांड, शंकर कऱ्हाडे (बदलापूर), ठाणे येथील ग्रंथसखा ग्रंथालयाच्या प्रेरणा खरे, हेरंब कुलकर्णी, जळगाव आकाशवाणीचे सतीश पप्पू, स्मिता दीक्षित, प्रसिद्ध साहित्यिक अजीम नवाज राही, ‘बारोमास’कार डॉ.सदानंद देशमुख, समीक्षक डॉ.एस.एम.कानडजे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक गणेश तायडे, साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर अशा अनेक मान्यवरांनी या केंद्रांना भेटी देऊन बालवाचनालयांचे कौतुक केले आहे. आमच्या पुस्तकमैत्री बालवाचनालयाचं (www.pustakmaitri.wordpress.com) संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळास भेटी देऊन महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिप्रायसुद्धा नोंदवले आहेत.

पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या कामाला शिस्त यावी म्हणून, आम्ही बुलढाण्यातील सात मित्रांनी एकत्र येऊन ‘चिल्ड्रन फाइन ॲन्ड लिटररी सायंटिफिक सोसायटी (बालभवन)’ या संस्थेची स्थापना केली आहे. आवाहन लोकसहभागातून गावोगावी ही बालवाचनालये सुरू व्हावीत अशी आमची तीव्र इच्छा आहे. एक बालवाचनालय कुठेही सुरू करण्यासाठी जर कोणी पाच हजार रुपयांपर्यंतची मदत केली तर त्यांच्या नावाने ते बालवाचनालय दत्तक दिले जाऊ शकते. या वाचनालयास आपण बालसाहित्याची पुस्तके, पुस्तके ठेवण्यासाठी पेटी, कपाट किंवा स्टेशनरीचे सामान भेट देऊ शकता, काही बालमासिकांची वर्गणी या केंद्रांच्या नावाने सुरू करू शकता. या बालवाचकांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजकत्व, प्रायोजकत्वसुद्धा स्वीकारू शकता.

आज बालवाचक घडले तरच उद्या मराठी साहित्यविश्वाला वाचक मिळतील. चला, उद्याचे वाचक घडवू या... पुस्तकमैत्री बालवाचनालयाची चळवळ गावोगावी नेऊ या... साने गुरुजींच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्यांनी आपण राहतो त्या परिसरात असे बालवाचन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्यांना आपल्या परिसरात असे बालवाचन केंद्र सुरू करणे काही कारणास्तव शक्य नाही, अशांनी इतर ठिकाणी अशी बालवाचनालये सुरू करण्यासाठी आर्थिक सहकार्य देऊन या चळवळीत सहभागी व्हावे. हे काम आपण नाही तर कोण करणार? आज नाही तर केव्हा करणार?

Tags: बालवाचनालय बालवाचन केंद्र बुलढाणा बालग्रंथालयं नरेंद्र लांजेवार पुस्तकमैत्री बालवाचनालयाची चळवळ पुढे नेऊ या चला अनुकरणीय balvachnalay balvachan Kendra buldhana balgranthalay narendra lanjevar pustakmaitri balvachnalayachi chalval pudhe neu ya chala Anukarniya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके