डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेतकऱ्यांच्या वेदनेला ‘साहित्य अकादमीचा’ सलाम

सदानंद देशमुखजी, आपल्या 'बारोमास' कादंबरीला 2004 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! अमडापूर-जानेफळ या ग्रामीण परिसरात आपण लहानाचे मोठे झालात. आपली कथा-कविता याच परिसरात बहरली. अनेक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन आपला गौरव केला आहे.

[शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या सर्जनशील साहित्यिकाचा साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास कसा होत गेला, यासंबंधी नरेंद्र लांजेवार यांनी 'साधना साठी घेतलेली विशेष मुलाखत.]
 

सदानंद देशमुख: माझा जन्मच शेतकऱ्यांच्या भरल्या घरातला. मला चार भाऊ, चार बहिणी. काका-चुलते त्यांची कुटुंबं असं भलं मोठं खटल्याचं घर. घरातील सर्व कामं आईलाच करावी लागायची. वडिलांचे वर्षातील बाराही महिने कष्टातच जात असते. ‘बारोमास’ कष्ट करण्यातच त्यांचा जन्म गेला. घरात कितीही गडी माणसं असली तरी शेतीच्या कामात माणसं कमी पडतातच. मी लहानपणापासूनच आईसोबत, घरातल्या माणसांसोबत शेतात जात होतो. शेतावर कामासाठी नाही म्हणायची सोय नव्हती. सुटीच्या दिवशी जास्त वेळ काम करावे लागे. बालपणी मला वाटे, रविवारच नसावा. रविवार आला की अंगावर काटाच येई. पूर्ण दिवस शेतातच जात होता. इतर दिवशी शाळेच्या नावावर थोडा वेळ खेळायला, हिंडायला, फिरायला तरी मिळायचं. पण रविवारी सर्व बंद, फक्त काम; आणि खळ्यांचे दिवस आले की शाळा बंद. फक्त शेतातच पूर्णवेळ राहायचं. धाकच होता बापाचा तसा! धान्यांचं खळं असलं की त्यातून खूप भुशी अंगावर उडायची. सर्व अंगाला खाज आल्यासारखी वाटायची.

मी आईला म्हणायचो, "खळंच नाही यायले पाहिजे-" आई म्हणायची, "खळ्याच्या खुशीतच खुशी असते बापू! खळ नाही तर खायचं काय?"- मग मी शेतीच्या प्रत्येक कामात आनंद मानू लागलो. लहान वयातच निंदणं, खुरपणं, डवरणं, खतं टाकणं, राना-वनात ढोरं चारायला नेणं, गायी-म्हशी धुणं, दूध काढणे, शेण काढणं, घरी पाणी भरणं अशी सारी कामं मी करू लागलो.

आई रोज रात्री झोपताना आम्हा भावंडांना गोष्टी सांगायची. अनेक प्रकारच्या लोककथांचे तिच्याजवळ भांडारच होतं. त्या कथा ऐकून-ऐकून माझी कल्पनाशक्ती वाढत गेली, आज मी जो लेखक म्हणून उभा आहे. त्याचे बरचसं श्रेय माझ्या आईलाच आहे. मी 15-16 वर्षांचा होतो, तेव्हाच माझी आई अतिकष्टांच्या कामांनी कमी वयात गेली. आई गेली तशी माझ्या डोक्यावरची सावलीच गेली.

शाळेत असल्यापासूनच मी गावच्या ग्रंथालयात जात असे. लहानपणी पेपर, पुस्तक वाचण्याचा, चाळण्याचा आनंद काही निराळाच वाटे. आई गेल्यावर मन रमावं म्हणून मी पुस्तकं अधिक प्रमाणावर वाचू लागलो. बनगरवाडी, बलुतं, कोसला, धग, गोतावळा, ताम्रपट, पाचोळा यांनी माझ्या मनाची पकड घेतली. अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे मनाला भावू लागले. बरीच चांगली पुस्तकं मी दहावीपर्यंतच वाचून काढली. आई गेल्यावर पुस्तकंच आई बनून मला भेटली. वाचनाचा चांगला संस्कार माझ्यावर झाल्याने मी दहावीत- अकरावीतच चांगला वाचक झालो.

●    या वयात फक्त वाचनच होतं की, काही लिहूनही पाहत होता?

00- त्याचं असं होतं, मी जे वाचत होतो, तेच मला माझ्या आजूबाजूला दिसायचं. मला वाटायचं, 'अरे हे तर आपल्या गावासारखंच लेखन आहे.' मग मला ना. धो. महानोरांच्या कविता आवडू लागल्या, मी त्या पाठ करू लागलो. 'हे लेखक लोक कसं लिहीत असतील, आपल्याला लेखन जमेल का, प्रयत्न करू बघू या, असं म्हणून मी बारावीत असताना देवाघरचं मरण' ही एक कथा लिहिली. मरणासन्न अवस्थेतील बिनकामाचा बैल कसायाला न विकता त्याला नैसर्गिक मरण यावं, की पैशासाठी खाटकाला तो विकावा असा बापलेकांचा संघर्ष असणारी ती कथा होती. कथा लिहून झाल्यावर कुठे पाठवावी, कशी पाठवावी, याची काहीही गंधवार्ता नसताना 'महाराष्ट्र टाईम्स'च्या पत्त्यावर पाठवून दिली आणि 18 सप्टेंबर 1978ला 'महाराष्ट्र टाइम्स च्या रविवार पुरवणीत ती छापूनसुद्धा आली. पहिली कथा छापून आली, तेव्हा मी अठरा वर्षांचा होतो. ती वाचून माझे शिक्षक बापू कुलकर्णी आणि वल्लभराव देशमुख या माझ्या वडीलधाऱ्या लोकांनी सुरुवातीला खूप प्रोत्साहन दिलं. येथूनच माझ्यातील कथालेखकाचा जन्म झाला. अनेकांच्या प्रोत्साहनाने माझा आत्मविश्वास वाढत गेला.

पुढं बी.ए. करण्यासाठी मी अमडापूरवरून चिखलीला गेलो. तेथे शिवाजी कॉलेजमध्ये असताना माझ्या कथा किर्लोस्कर, लोकशिक्षण, तरुण भारत, लोकमत इत्यादींच्या साहित्य पुरवण्यांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या. मी बी.ए. होईपर्यंत माझ्या 20 कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. एकीकडे शिक्षण सुरू होतं, तर दुसरीकडे शेतात राबणं, कथा-कविता लिहिणं, वाचन करणं सातत्याने सुरू होतं. कथा-कविता पोस्टाच्या माध्यमातून छापायला पाठविण्यासाठीसुद्धा माझ्याजवळ पैसे नसायचे, पण मी ठरवून टाकलं की, आपण खूप शिकायचं आणि नोकरीला लागायचं. याच दरम्यान माझे लग्न झालं. नंतर बी. ए. पूर्ण झालं. बी. ए. नंतर एसटीत कंडक्टर म्हणून नोकरीला लागावं, असं खूप वाटायचं. दोन-तीन मुलाखती दिल्या, पण काम झालं नाही. नंतर जालन्याला बी. एड. साठी नंबर लागला. बी.एड. पूर्ण झाल्यावर गावापासून जवळच असणाऱ्या जानेफळच्या सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.

पुढे एम.ए.केलं. प्रथम श्रेणीत विद्यापीठात प्रथम आलो. ज्या शाळेत शिक्षक होतो, तेथेच कनिष्ठ महाविद्यालयात पदोन्नती मिळाली. शिक्षणामुळे आणि लेखनामुळे एक नवी ओळख मिळाली. नोकरी-शिक्षण सुरू असतानाच शेतीतील काम आणि वाचन सुरू होतंच, वाङ्मयीन मूल्यं म्हणजे काय? ती साहित्यात कशी महत्त्वाची ठरतात, याची समजही वाढत गेली. शेतीतील सक्तीच्या कामातून शेतीवरची भक्तीही वाढत गेली. घरच्या शेतीचा, आजूबाजूच्या शेतीचा भरभराटीचा काळ मी पाहिला, अनुभवला. मी एक एकर शेतीत बारा किंटल कापूस पाहिला. एक एकरात 20 क्विंटल गहू पाहिला, 12 किंटल भुईमुग पाहिला, पुढे पुढे शेती प्रचंड डबघाईस आली. सर्वांवरच कर्जबाजारीपण आलं, स्वतःही अनुभवलं. शेतीचा खर्च वाढत गेला... उत्पन्न घटत गेलं. नापिकी सुरू झाली. शेत विकायची कल्पनाच असह्य होऊ लागली. मध्यंतरी शेतकऱ्यांची पोरं शिकू लागल्याने त्यांची भौतिक सुखाची हाव पूर्ण करू शकेल, अशी कृषी संस्कृती राहिली नाही, आणि यातूनच संस्कृतीच्या विघटनाचं पर्व सुरू झालं. एकत्र कुटुंबातील विघटनाचं दुःख मरणाइतकंच भेदक असतं. मी ते अनुभवलं आणि माझ्या साहित्यात ते आहे तसं मांडू लागलो. माझ्या संवेदनशील मनाशी प्रामाणिक राहून माझे अवतीभवतीचे अनुभव मी लेखनात शब्दबद्ध करू लागलो.

●    सर्व अनुभव पुस्तक रूपाने केव्हा बाहेर आले? 

00 मी 1988ला महाराष्ट्र शासनाकडे काही कथा नवलेखक प्रकाशन अनुदानासाठी पाठविल्या. त्या कथांचे पहिले पुस्तक 1989 ला अंधारवाटा', हे औरंगाबादच्या कैलास पब्लिकेशनच्या वतीने पुस्तक रूपाने बाहेरही आलं. पण नंतर हे पुस्तक कसं अंधारातच राहिलं, काही कळलं नाही. त्यानंतर 1992 ला ‘लचांड', 1994 ला 'उठावण', 1996ला 'महालूट' हे सर्व कथासंग्रह 'मेहता प्रकाशना ने देखण्या स्वरूपात प्रकाशित केले. 1998ला तहान' आणि 2002ला 'बारोमास' ह्या कादंबऱ्या 'कॉन्टिनेंटल ने प्रकाशित केल्या. यांतील सर्वांनाच सन्मानाचे वाङ्मयीन पुरस्कार लाभलेत. 

●     'बारोमास'चं मूळ कथाबीज- बेणे कुठं सापडलं? 

00 मी विघटित होणाऱ्या ग्रामीण कुटुंबाच्या दुःखाची कहाणी तुम्हाला सांगितलीच, शेतीत नापिकी होत आहे, कर्ज वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाची आत्महत्या रोजच होत आहे, शेतकऱ्यांच्या जीवनातील बारा महिन्यांच्या दुःखावर मला एक डायरी लिहावीशी वाटली. मी 1990-91मध्ये 'बारोमास' नावाची दीर्घ कविता लिहिली होती. ही कविताच माझ्या कादंबरीचं मूळ कथाबीज घेऊन माझ्यासमोर उभी राहिली. त्या कवितेच्या काही ओळी अशा होत्या...

असा केला मेळमाळ 
बिया भरणाचा आणि 
तिफणीच्या काकरात 
जरा थोपवले पाणी 
वाढणारं आगाईत 
त्यात इंधन कित्तीक 
माझ्या तोंडावर चढे 
बारोमासाचं सुतूक 
केले खळे मळे आणि 
देणेकरी चुकवले 
घास मातेयाचे काही 
मग मलेबी उरले 
केले मातेरं कुतेरं 
जमा सावरून सारं 
दलिंदऱ्या नशिबाचं 
सुटे भवताली वार...
गेला हंगाम सरूण 
नाही कोणी थांबलं 
उभ्या धसकटावणी 
मन माहेबी वाळलं 
खोल उदास मनानं 
आलो एकदा रानात 
पान गळणारं झाड 
सांगे गुपीत कानात
म्हणे, तू-मी आहे 
एका मातीतले खोड 
आम्ही उभे एकाजागी 
तुम्ही चालणारे झाड 
नातं जोडलं झाडानं 
तसा मनात हासलो 
वृक्षवल्ली वनचरे गात 
तुकोबाला शरण गेलो
जसा येणारा बहर 
तसा जाणार झडून 
गळणाऱ्या पानासाठी 
काय फायदा रडून 
काय फायदा रडून 
जीणं हसत जगावं 
अन् मातीच्या कुशीत 
सोनं होऊन उगावं.

या कवितेनंतर मी शेतकऱ्यांची बाजारपेठेत जी लूट होते त्यावर 'महालूट' नावाची कथा लिहिली. एकत्र ग्रामीण कुटुंबाच्या विघटनावर 'चिरोटी' नावाची कथा. लिहिली. हे चिरोटी, महालूटमधील आजचं वास्तव विस्ताराने मांडावं असे मला सातत्याने वाटायचं. आणि माझ्या या वाटण्यातून 'बारोमास' कविता माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि मग या सर्वांचा मेळ घालून 'बारोमास' कादंबरी लिहिली.

ग्रामीण जीवनाचं आजचं भेदक वास्तव मला स्वस्थ बसू देत नव्हतं. महालुटीतलं शोषण, चिरोटीमधील- विघटन. त्यातून पुढे आलेली नापिकी", यांतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या' असं जे चित्र आहे; त्या चित्राच्या, त्या वास्तवाच्या तळाशी जाण्याचा मी प्रयत्न केला आणि जे हाती आलं, जे गवसलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न 'बारोमास'मध्ये केला.

●    बारोमास ही कादंबरी आजपर्यंतच्या ग्रामीण साहित्यातील 'आकृतीबंध' आणि निर्मितीमूल्याच्या दृष्टीने 'मानदंड' ठरणारी कलाकृती आहे. या कादंबरीचा जो नायक आहे एकनाथ' तो कसा गवसला?

00 एकनाथ हा उच्च शिक्षित आहे. त्याचे एम.ए.बी.एड. झालेलं आहे. तो फार विचारी आहे. त्याला कालचं आजचं आणि उद्याचे ग्रामीण तथा शहरी वास्तवचित्र माहीत आहे. जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे धोके तो ओळखून आहे. उद्ध्वस्त होणाऱ्या ग्रामसंस्कृतीतून पुढे आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या प्रसंगांना त्याने समर्थपणे तोंड दिलं आहे. आत्महत्येचा प्रसंग त्यांच्या घरात घडतो. त्याचे वडील आत्महत्या करतात. वडिलांच्या आत्महत्येमुळे आई वेडी होते. शेतीच्या विघटनामुळे ग्रामीण कुटुंब कशी विस्कळित होत आहेत, हे तो जाणतो आणि तो शेतकऱ्यांचा विद्रोही नेता बनतो. शेतकऱ्यांच्या पोरांनीच विद्रोही झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही असं त्याला वाटतं. आपण शांत राहिलो तर वामन तिसरा पाय आपल्या डोक्यावरच ठेवणार... त्या बटू वामनाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर दलितांनी विद्रोहातून मानसन्मान, समानता भांडून का होईना जशी काही प्रमाणात मिळविली आहे. तसंच विद्रोही मन आता शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे. याची या बारोमासच्या नायकाला कल्पना आहे.

आजच्या परिस्थितीत शरद जोशी किंवा इतर कोणताही शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकणार नाही. आत्महत्या करणारे शेतकरी भ्याड आहेत, म्हणून आत्महत्या करीत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आत्म्याची सामाजिक अवहेलनेतून रोजच हत्या होत आहे. त्याच्या शरीराची हत्या फक्त एकदाच होते. बाकी बारोमास त्याची आत्महत्या सुरूच राहते. ज्याने ते भोगले तोच त्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल, असं या नायकाला वाटतं. भोगणाऱ्याची जी भडास आहे, तीच त्याला न्याय मिळवून देण्याची प्रेरणा देणारी बाब आहे. ही अशी प्रेरणाच त्याला समग्र संघर्षाच्या वाटेवर उभी करणारी आहे. एकनाथच्या भोगवाटांचा संघर्षाच्या दिशेने होणारा विकास, व्यक्तिगत पातळीवरून समष्टीच्या पातळीवर होत गेलेला विकास, हा मला तरी आजच्या सर्व परिस्थितीत महत्त्वपूर्ण वाटतो. 'बारोमास' वेदनेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टांना न्याय देण्याच्या बाजूने विचार करणारा हा नायक आहे.

●    अनेक लहान-मोठ्या पुरस्कारां- बरोबरच अशा मोठ्या 'साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे वाचकांची अपेक्षा उंचावलेली राहणार... आता पुढील लेखनाची दिशा काय?

00 मी खूप चिंतन केल्यानंतर लेखन करतो. मी एक राजकीय कादंबरी लिहायला घेतली होती. तिची 150 पानं लिहून झाली होती. परंतु मला ती भावली नाही. मी ते लेखन फाडून टाकलं. लेखकाला स्वतःच्या साहित्याकडे तटस्थपणे समीक्षकाच्या नजरेतूनही पाहता आलं पाहिजे. मी ते पाहतो, म्हणूनच अस्वस्थ होऊन लेखन करणं मी महत्त्वाचं समजतो. बारोमास लिहिताना रात्री-बेरात्री मी जागा होत 

असे. अनेक पात्रं माझ्या डोळ्यासमोर उभी राहत, तीच जणू मला म्हणत, 'आमच्या तोंडी अशी अशी वाक्ये टाक...' प्रत्येक पात्र मला सतावत होतं. प्रत्येक पात्र जणू माझ्यातच जगत होतं. हे अस्सं होत जाणं, हीच लेखननिर्मितीची एक गूढ प्रक्रिया समजायला हवी. आता तहान, बारोमास चा पुढील टप्पा मला गाठायचा आहे. पुढील लेखन अधिक जबाबदारीने केलेलं असेल. तरीही काळाच्या सोबत चालण्याचा दृष्टिकोन असल्याने, माझे लेखनही काळासोबत प्रामाणिक राहिलेलं असेल!

●    इतर लेखकांचे तसं नसतं, असं तुम्हांला म्हणायचं आहे का? 

00 मला इतरांबद्दल तसं म्हणायचं नाही, परंतु आजपर्यंतच्या अनेक सदाशिव पेठेतील, महानगरातील साहित्यिक, प्राध्यापकी धाटणीतील लेखनालाच ग्रामीण साहित्य समजत आले आहेत. वाङ्मयीन मूल्य ठरविणारीही तीच मंडळी असल्याने त्यांनी त्याच साहित्यिकाला राजमान्यता दिली. पण त्यात अनुभवाची कमतरता होती, अस्सलपणा नव्हता, तो अस्सलपणा अलीकडच्या काळात ग्रामीण भागात राहून लेखन करणाऱ्या साहित्यिकांमध्ये दिसतो आहे.

●    साहित्य अकादमीचा हा पुरस्कार आपल्या अस्सलतेच्या अनुभवाला आहे, असे समजायचे का? 

00 मला हे 'समकालीन ग्रामीण वास्तवाचे चित्र' समाजापुढे मांडायचं होतं, ते समजून घेणारे परीक्षक साहित्यक्षेत्रात आहेत, ही बाब मला समाधान देणारी वाटली. साहित्य अकादमीच्या या पुरस्कारामुळे सदानंद देशमुखांकडे काहींच्या नजरा जरी वळल्या असल्या तरी, साहित्यक्षेत्राचं लक्ष ग्रामीण समस्यांकडे वेधले गेले आहे, हीच बारोमासची खरी ताकद आहे असं मला वाटतं.

●    या पुरस्कारानंतरची पहिली प्रतिक्रिया काय होती?

00 सुरुवातीला विश्वासच बसला नाही. लोकमान्यतेसह लिखाणाला केंद्र सरकारचीही मान्यता मिळाली. धन्यधन्यता वाटली. बारोमास निष्ठेने केलेली साहित्यसाधना फळाला आली. समानधर्मी काव्यभावना असणाऱ्या ना.धों. महानोरांच्या शब्दांत सांगायचे तर…
मज कळेना चालता 
दुःख कैसे फूल झाले 
अन् कुणाचे दिव्य 
आशीर्वाद मज देऊन गेले 
अक्षर चुरगाळीता 
मी अमृतांचे कुम प्यालो 
अन् उद्याच्या जीवनाची 
सांगता येऊन आलो

●    आपल्या कादंबऱ्या पुस्तकरूपाने आल्या, परंतु आपण सुरुवातीपासून कविता लेखन करता तरीही अद्याप कवितासंग्रह का नाही प्रकाशित झाला?

00 लवकरच 'सुविधा प्रकाशना कडून 'गावकळा' कवितासंग्रह येईल. त्यात 80 कविता आहेत. पण मला दुःख वाटतं, ते याच की महाराष्ट्रातील प्रकाशक कवितासंग्रह काढण्यासाठी पैसे मागतात. कोणीच सध्या पैसे न घेता कवितासंग्रह प्रकाशित करीत नाही. कवितासंग्रहसुद्धा विकत घेऊन वाचणारे वाचक कमी आहेत. मला अनेकांनी 'तहान', 'बारोमास तुमच्याकडे असेल तर द्या, ती वाचायची इच्छा आहे असं सांगितलं. विकत घेऊन वाचणारे कमीच! अहो, तुम्हांला गंमत वाटेल, प्रकाशनानंतर पहिल्या वर्षी 'बारोमास ची विक्री फक्त बावीस प्रतींची होती! आता सगळे बारोमास वर तुटून पडत आहेत. ती न वाचताच त्यावर भाष्य करणारेही मला बरेच भेटलेत. वाचून प्रतिक्रिया देणारे कमीच! असो, आता कवितासंग्रह येत आहे. 'मॅजेस्टिक कडून 'रगडा नावाचा कथासंग्रहही प्रकाशित होत आहे.

●    तुम्ही साहित्यिकांचा काही वेगळा 'लेखनधर्म' मानता का?

00 खरं तर माझे असं मत आहे की, आपल्या समाजात कोणाकडूनच कोणाचे शोषण होऊ नये. आपली खरी संस्कृती ही पेरून खाणारी संस्कृती आहे, ती मारून खाणारी संस्कृती म्हणून विकसित होत आहे. निसर्गाचा नाश करून माणसांची मनं प्रदूषित होताना दिसत आहेत. ही प्रदूषित मनं सांधण्याचा यशस्वी प्रयत्न खरं तर लेखनातूनच झाला पाहिजे आणि मन साधण्याचा प्रयत्न साहित्यातूनच होऊ शकतो. इतर माध्यमांतून नाही!

Tags: मराठी साहित्य साहित्य शेती ग्रामीण संस्कृती मुलाखत बारोमास सदानंद देशमुख Agriculture Rural Culture Village Marathi Literature Literature Baromas Sadanand Deshmukh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके