डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ऐतिहासिक शिवधर्म प्रकटन समारंभ' कसा झाला याचा नरेंद्र लांजेवार यांनी सिंदखेडराजा येथून खास 'साधना 'साठी पाठविलेला ऑन दी स्पॉट रिपोर्ट…

जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जि. बुलढाणा. याच शिंदखेडराजा ऐतिहासिक नगरीत मराठा सेवा संघाच्या पुढाकाराखाली जिजाऊ जयंतीला 12 जानेवारी 2005ला शिवधर्म प्रकटन समारंभ' होणार याची चर्चा संपूर्ण देशभर गेल्या पाच-सहा वर्षांपासून होत होती. जसजसा 12 जानेवारीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत होता, तसतसा प्रसारमाध्यमांनी कधी एकेरी, कधी दुहेरी तर कुठे अनुल्लेखाने या समारंभाची दखल घेतली, आडवळणावर असलेल्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक ठिकाणी येथील लखुजीराजे जाधवांनी बांधलेल्या मोती तलावाच्या उत्तरेस जालना मार्गाच्या दुत्तर्फा 100 एकर जमिनीवर जिजाऊ सृष्टी प्रकल्पाचे भव्य प्रार्थनागृह व त्यामागे चाचनालय, निवासी खोल्यांची चार मजली इमारत व त्यावर मेघडंबरी उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या जिजाऊ सृष्टी प्रकल्पाच्या पावनभूमीतच शिवधर्म प्रकटन समारंभाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. या शिवधर्मपीठावर जिजाऊ माँ साहेबांचा सिंहासनावर विराजमान झालेला देखणा पुतळा बसविण्यात आला होता. शिवधर्मपीठावर जिजाऊ माँ साहेबांच्या आसनस्थ पुतळ्याशेजारी भव्य डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर बंद पिंजऱ्यातील पक्षी आता सर्व बंधने झुगारून आकाशात मुक्त संचार करीत आहे, असे चित्र रेखाटण्यात आले होते. या चित्रावर 

आले पक्षभान। सोडिली नळिका 
जिजाऊ प्रेरिका। झेपावण्या 
शुर्के नळिकेसी। गोवियले पाय 
विसरोनि जाय । पक्ष दोन्ही 
अभंग रचनेतील या चार ओळी लिहिलेल्या होत्या.

दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक तालुक्यातून खासगी वाहनांद्वारे, स्वतंत्र ट्रॅक्सद्वारे मोठ्या संख्येने माणसे जिजाऊ सृष्टीवर येतच होती. जवळपास दोन हजारांहून जास्त मोटारींतून जिजाऊ सृष्टीवर शिवभक्त आले होते. अनेकांनी छोट्या-मोठ्या झाडांच्या सावलीत बसून सोबत आणलेल्या शिदोऱ्या, डबे काढून जेवण उरकले होते. जेवण, नास्त्याच्या स्टॉल्सवर जास्त गर्दी झाल्याने अनेकांची गैरसोय झाली. आयोजकांनी 5 रुपयांमध्ये बेसनपोळी, खिचडी, भाजीपुरी अशी व्यवस्था केली होती. या ठिकाणी तरुणांचा भरणा अधिक होता. 20 ते 25 वयोगटातील तरुणाई मोठ्या संख्येने तथा मोठ्या उत्साहाने या समारंभासाठी आलेली होती. महिलांची, तरुणींची संख्याही बऱ्यापैकी होती. सिंदखेडराजा परिसरातील आजूबाजूच्या गावांवरून अनेक लोक जत्रेला यावे तसे जथ्याजथ्याने येत होते.
असा राहील शिवधर्म -

●    देवाला स्थान राहणार नाही.

●    कर्मकांडं नसतील.

●    वैज्ञानिक आधारावर उपासना.

●    सणउत्सव साजरे करण्यास मुभा.

●    जात व पोटजातीला स्थान नाही.

●    उत्पन्नातील 5 टक्के वाटा शिवधर्मासाठी

●    जात न पाहता रोटी-बेटी व्यवहार.

●    हुंडा-अहेर पद्धती पूर्णपणे बंद.

●    भट-ब्राहाणांना शिवधर्मात प्रवेश नाही. 

●    कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र वर्ज्य नाहीत.

●    शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील. येत्या तीन वर्षांत परिपूर्ण शिवधर्माची उभारणी.

शिवधर्म नवा धर्म नव्हे, नवी दीक्षा नव्हे...

हे तर नव्या विचारांचे प्रकटन...

टू-व्हीलरवर येणारे बहुतेक तरुण सपत्नीक लहान मुलाबाळांसह या सोहळ्याला आली होती. काही तरुणांच्या अंगावर नवीन पांढरेशुभ्र कपडे व शर्टाच्या खिशावर ठळकपणे जिजामातेचा बिल्ला लावलेला दिसत होता. दलित वर्गातील आंबेडकरवादी जनताही हा शिवधर्म प्रवेशाचा समारंभ बघण्यासाठी व शिवधर्माला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

शिवधर्म प्रकटनाचा समारंभ शिवधर्मपीठ परिसरात दुपारी ठीक 3.20ला सुरू झाला. या तीस-बत्तीस एकर परिसरात 1.30 पासूनच शिवप्रेमी जागा धरून बसले होते. शिवधर्म प्रकटन समारंभाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी स्वतः पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित लोकांना शांत राहण्याचे तथा शिवदर्शनासाठी दानधर्म करण्याचे आवाहन वारंवार करीत होते... खिशात पैसे असतील ते दान करा... गळ्यात, हातांत जे मौल्यवान दागिने असतील ते दान करा... असे आवाहन केल्यावर काही महिलांनी अंगठ्या, गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. सोने दान केलेल्या महिलांची नावे माईकवरून आवर्जून सांगितली जात होती.

शिवधर्म प्रकटन समारंभासाठी खास उभारण्यात आलेल्या भव्य अशा शिवधर्मपीठावर पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. आ. ह. साळुंखे, शिवधर्माचे विश्वसमन्वयक नेताजी गोरे या तीनच व्यक्ती विराजमान झाल्या होत्या. बरोबर 3.20ला जयश्री शेळके यांनी जिजाऊ वंदन सादर केल्यानंतर शिवधर्माचे विश्वसमन्वयक नेताजी गोरे यांनी शिवधर्माची भूमिका अवघ्या दहा मिनिटांत मांडली. शिवधर्माच्या गेल्या सात वर्षांतील वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार मानून विज्ञानाचा स्वीकार आणि प्रबोधनाची चळवळ यातून हा मानवधर्म तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मातृत्वाला स्थान देणारी, समता, बंधुता व न्याय देणारी समाजव्यवस्था आम्हाला उभी करावयाची आहे. त्यासाठीच आजपासून कर्मकांडातून बहुजन समाज बाहेर पडतो आहे. असे सांगून व शिवधर्माला विश्वधर्म बनवू या' असे आवाहन करून त्यांनी आपले भाषण संपवले. याच दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमीवरून निघालेली चेतना ज्योत शिवधर्मपीठावर पोहोचली. या ज्योतींचे स्वागत नेताजी गोरे यांनी केले. 

त्यांच्या भाषणानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या भाषणात बहुजनांनी भट-ब्राह्मणांबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत... यापुढचे सर्व विधी हे बिनशेंडीच्या माणसांनी करावयाचे आहेत... आजपासून बहुजन समाज कर्मकांडाच्या, धर्मसत्तेच्या गुलामगिरीतून भयमुक्त-भटमुक्त होत आहे... भटा-ब्राह्मणांची सर्व प्रकारची बौद्धिक, सांस्कृतिक, मानसिक गुलामगिरी आम्हांला झुगारावयाची आहे... ब्राह्मण हा कधीही बहुजनांचा उद्धारक होऊ शकत नाही, म्हणून त्यांच्यासोबत असणारे आपले सर्व सांस्कृतिक संबंध आपल्याला तोडायचे आहेत. यापुढे शिवधर्मीयांसाठी मनुस्मृती, मत्स्यपुराण हे विकृत ग्रंथ नाहीत - असे विकृत धार्मिक ग्रंथ केवळ जाळायचेच नाहीत; तर असे धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांनादेखील आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही... आज 19 लाख शिवप्रेमी लोकांनी शिवधर्मात प्रवेश करण्याविषयीचे फॉर्म्स स्वेच्छेने भरून दिलेले आहेत... देशभर 4 कोटी लोक आपल्या शिवधर्माचे आचरण करीत आहेत... यापुढील काळात शेंडीवाला भटजी आम्हांला चालणार नाही. आमच्या बहुजन बळीराजाला कुठलाही वामन गाडू शकणार नाही, कोणत्याही एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्य आता कापणार नाही. आमच्या उपासना ह्या वैज्ञानिक असतील... आम्ही विविध ग्रहांवर जाऊ... कोणतेही ग्रह आमचे काहीच वाकडे करणार नाही... भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व ब्राह्मणच करीत आले आहेत... आतापर्यंत मरायला बहुजन आणि चरायला ब्राह्मण हे यापुढे चालणार नाही... ब्राह्मणी व्यवस्था उद्ध्वस्त करून बहुजन समाजाची समाजव्यवस्था आपणाला इथे उभी करावी लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली प्रगती होणार आहे... आपला सर्व समाज विविध कर्मकांडाच्या आहारी गेला होता.

या कर्मकांडात प्रत्येक कुटुंबाचा वर्षाला उघड व छुप्या मार्गाने सरासरी एक हजार रुपये खर्च होतो आहे, हा खर्च थांबवून तो पुस्तकांवर करा... माझ्या तरुण बांधवांना माझे आवाहन आहे, काही खर्च कमी करा परंतु यापुढे आपल्या आई-बहिणींसाठी गावात संडास बांधा; घराघरांत घरच्या लक्ष्मीला विश्वासात घेऊन कार्य करा; व्यसनांपासून दूर रहा; महिलांना जास्त शिकवा. ज्याची पत्नी जास्त शिकलेली असेल, त्याला शिवधर्मात जास्त महत्त्व असेल... आपल्या कष्टाच्या कमाईचा 5 टक्के भाग शिवदान करण्याचा संकल्प करा... असे म्हणून पुरुषोत्तम खेडेकर पुढे म्हणाले, 'नवा शिवधर्म स्वातंत्र्य, बंधुता, समता यांवर आधारित असेल व तो राज्यघटनेचा देखील हिरीरीने पुरस्कार करेल. येत्या तीन वर्षांत पूर्ण शिवधर्म अंगीकारण्याचा आपण प्रयत्न करूच... शिवधर्मीयांनी कर्मकांड, उपवास आदी विधींचा आता अंगीकार करू नये... डोक्यातील गुलामगिरीच्या मानसिकतेचा पिंजरा आता फेकून द्या. सर्व जाती पोटजाती नष्ट करा... शिवधर्मात जाती-पोटजातींना अजिबात थारा नसेल. रोटी व बेटी व्यवहार सर्वांमध्ये होईल. जात व हुंडा राहणार नाही. नको अहेर- नकोत कपड़े, फक्त सामूहिक विवाह. शेवटी धर्म ही सत्ता आहे, याचे आत्मभान जागवा ही मानवमुक्ती व समृद्धीची क्रांती धर्म आहे. लहान मुलांच्या हातात पोथी व पंचपात्र देण्याऐवजी त्यांच्या हातांत पुस्तके द्या; म्हणजे त्यांच्यात चंद्र-सूर्य हातात घेण्याची ताकद येईल."

शेवटी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, "आमच्यातील अनेक राजकीय पुढारी म्हणतात, आम्ही शिवधर्मासोबत आहोत. परंतु येथे ते का आले नाहीत? याचाही शोध घ्यावा लागेल... राजेश टोपेंसारख्या एकमेव मंत्र्याने पत्र पाठवून आमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली... इतर कोण कुठे आहे, हेही येत्या काळात बघावे लागणार आहे. राज्यसत्ताच आता शिवधर्माला हाती घ्यावी लागेल.... येत्या काळात शिवधर्माचा भावी मुख्यमंत्री व प्रधानमंत्री आपल्याला तयार करावयाचा आहे... बहुजनांची राजसत्ता संपादन करण्याचे ध्येय गाठण्याच्याही दिशेने समर्थपणे आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.

पुरुषोत्तम खेडेकरांचे भाषण सुरू असतानाच आर.पी.आय. नेते, पंढरपूरचे खासदार रामदास आठवले यांचे शिवधर्मपीठाकडे आगमन झाले. त्यांना शिवधर्मपीठाकडे न नेता निमंत्रितांमध्येच बसू द्या. अशी जाहीर सूचना पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. पत्रकारकक्षामध्ये बसलेले काही पत्रकार यावर म्हणत होते, एकमेव खासदार आले आहेत, त्यांना शिवधर्माच्या या ऐतिहासिकप्रसंगी शुभेच्छा देण्याची इच्छा असेल तर पाच मिनिटे बोलू द्या पण या सूचनेकडे कोणीच लक्ष दिले नाही. पुरुषोत्तम खेडेकरांच्या भाषणानंतर अमरावतीच्या डॉ. योगीराज चौधरी यांच्या संचाने संत तुकारामाचा ‘आनंदाचे डोही... आनंद तरंग' या अभंगाचे भावपूर्ण गायन केले आणि त्यानंतर 4.30ला शिवधर्माचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या नेहमीच्या शांत व संयमी आर्जवी पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. लिखित भाषण थोडे बाजूलाच ठेवून ते म्हणाले, "शिवधर्म प्रकटनात आपण प्रामुख्याने जातीय व्यवस्था मोडण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देत आहोत. हे करण्यासाठी जाती जातींत अगोदर विश्वास निर्माण करूया... प्रत्येकाची मन जोडूया, मर्न निर्मळ करूया... यातून जातीच्या भिती गळून पडतील. मला पिकलेल्या पानांपेक्षा कोवळी पालवी महत्त्वाची वाटते. तरुणच परिवर्तनाचे प्रेरक असतात, माझी भिस्त तरुणांवर जास्त आहे. आजचा समारंभ हा धर्मांतर सोहळा नाही, की कोणत्याही तथाकथित धर्माची दीक्षा तर मुळीच नाही.

हा प्रकटन सोहळा आहे आपल्यामधील अधर्माला आपल्यापासून वेगळे करण्याचा हा सोहळा आहे.. आपण आपल्या आयुष्यात ग्रंथप्रामाण्य वा व्यक्तिप्रामाण्य नव्हे तर विवेकप्रामाण्यवादी बनूया... व्यक्तिगत आयुष्यात ईश्वर मानता की नाही, यापेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्त्वाचे आहे, ते माणूसपण आपण जगूया... जपूया. कोणत्याही विकृतीचे उत्तर आपण उदात्त संस्कृतीतून देऊया; कारण द्वेष करणे ही शिवधर्माची संस्कृती नाही. आता आपण गुलामही व्हायचे नाही आणि उद्दामही व्हायचे नाही... आपल्या संतापाच्या ज्वालामुखीची ऊर्जा नवनिर्मितीसाठी वापरूया... आपल्या सर्वांना राज्यघटनेचे पालन है बंधनकारक राहणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ ह्या आपली मानवीप्रेरणा आहेत... त्याचे दैवतीकरण करू नका असे कळकळीचे आवाहन करून सरतेशेवटी मानवाच्या मुक्तीसाठी स्वतःला शिवधर्मात जोडूया असे वैश्विक धर्माशी नाते सांगणारे अभ्यासपूर्ण विचार डॉ. आ. ह. साळुखेंनी आपल्या एक तासाच्या भाषणात मांडले.

यानंतर महाराष्ट्रातून आलेले जवळपास पन्नास ते साठ हजार बांधव शिवधर्म प्रकटनाची प्रतिज्ञा घेण्यासाठी उभे राहिले... सर्वांनी दोन्ही हात जोडले. प्रतिज्ञा संपताच जय जिजाऊ... जय शिवराय... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो... तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ... जय शिवराय... अशा घोषणांनी तथा विविध रंगांच्या आतषबाजीने सारा परिसर दणाणून गेला... प्रतिज्ञा संपताच लोक हर्षभराने, प्रफुल्लित मनाने एकमेकांच्या गळ्यांत गळे घालून, हस्तांदोलन करून शिवधर्म प्रवेशाची आपापसांत शुभेच्छा देत होते.

Tags: सिंदखेड राजा वृत्तांत शिवधर्म प्रकटन Religion Sindkhedraja Shivdharma Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके