डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

23 डिसेंबर 1973 रोजी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यात भामरागडमधील हेमलकसा येथे आदिवासी लोकांच्या उत्थानाकरिता लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. अनंत अडचणींना तोंड देत या प्रकल्पाला नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याचा हा वृत्तान्त.

थोर समाजसेवक पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या कार्यकर्तृत्वाने व प्रेरणेतून आनंदवन, सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा व नागेपल्ली ही सेवातीर्थे जन्माला आली आहेत. विदर्भाच्या पावन भूमीतील या आधुनिक तीर्थस्थळांनी लाखो अपेक्षितांच्या उत्थानाची, पुनर्वसनाची व आत्मनिर्भरतेची प्रेरक दिशा जगाला दिली आहे. या सेवातीर्थांतील हेमलकसा येथील 'लोकबिरादरी' (लोकांमधील बंधुभाव) या प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास बुलडाण्याच्या ‘युवक प्रगती सहयोग’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थित राहण्याचा योग आला.

हेमलकसा हे ठिकाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशच्या सीमा जिथे जुळतात त्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात चंद्रपूरपासून पूर्वेला जवळपास 200 कि.मी. अंतरावर आहे. भामरागड नैसर्गिक सौंदर्याचा परमोच्च बिंदू गणला आहे. निसर्गानेही आपल्या दोन्ही हस्ताने सौंदर्याची लयलूट या परिसरावर केली आहे. भामरागडला पारलकोटा-पामोल, गौतम व इंद्रावती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. माडिया, गोंड, हिलमाडिया व हलवी इत्यादी जातींचे आदिवासी या परिसरात मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणी उन्हाळ्यातील तापमान 48 अंश सेल्सियसपर्यंत असते: आणि थंडी 6 से 7 अंशांपर्यंत पडते. या भागातील आदिवासींना मृत्यू हा जणू पाचवीलाच पूजलेला! तो कधी जंगली हिंस्र श्वापदांनी, कधी रोगराईने तर कधी भुकेचा वणवा घेऊन त्यांच्या पाठीमागे उभाच असतो.

पावसाळ्यात या भागातील सगळ्या नद्यांना पूर येत असल्यामुळे हा सारा प्रदेश संपर्क-साधनांपासून अगदी तुटून पडतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत बाबा आमटे यांच्या प्रेरणेने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पाला पंचवीस वर्षांपूर्वी सुरुवात केली. या पंचवीस वर्षांच्या कार्यातील कामाचे सिंहावलोकन करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या सहकारी मित्रांना अभिवादन करण्यासाठी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन अलीकडेच करण्यात आले होते. 

26 डिसेंबरला बाबा आमटे यांचा 85 वा वाढदिवस व डॉ. प्रकाश आमटे यांचा 51 वा वाढदिवस आणि लोकबिरादारी प्रकल्पाचा रौप्य महोत्सवी सोहळा असा हा त्रिवेणी संगमातून साकारलेला सोहळा समाजकार्याची प्रेरणा देणारा ठरला! पहिल्या दिवशी दुपारी हेमलकसातील आश्रमशाळेच्या आदिवासी मुलामुलींनी ढोलताशाच्या निनादात बाबा आमटे यांची वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना व्यासपीठावर आणले. (बाबांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो म्हणून व्यासपीठावर नेहमीप्रमाणे पलंगावर झोपवण्यात आले. व्यासपीठावर कुठलेही बॅनर नाही की कोणत्या हारफुलांचा स्वागत समारंभ नाही. अशा अगदी साध्या स्वरूपातील या स्नेही, मित्र व पालक मेळाव्याची सुरुवात हेमलकइातील आदिवासी मुलांच्या स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी केंद्रीय आरोग्यमंत्री, सेवाग्रामच्या गांधीव्रती श्रीमती सुशीला नायर यांच्या हस्ते तथा खासदार नरेश पुंगलीया, ‘सर्व’च्या संचालिका डॉ. राणी बंग, लोकसत्ता (नागपूर)चे निवासी संपादक सुरेश द्वादशीवार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आशीष सिंग (गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते वामनराव गुड्डमवार, आमदार पेंटाराम तलांडी, डॉ. प्रकाश आमटे, आनंदवनचे विश्वस्त डॉ. विकास आमटे, बाबा आमटे यांची जर्मनीतील मानसकन्या मरियाना,  स्वित्झर्लंडची मिसुजान- अनेक परदेशी पाहुणे व व्यक्ती स्थानापन्न झाल्या. लोकबिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेची पार्श्वभूमी इत्यादी स्वागतपर दोन शब्द बोलताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, आज या कार्याला पंचवीस वर्षे पूर्ण झालीत, यावर विश्वास बसत नाही. मी व माझी पत्नी डॉ. मंदा आम्ही दोघेही फक्त निमित्तमात्र आहोत. आम्हांला या पंचवीस वर्षांत अनेकांचे हातभार लाभले आहेत. आमच्या सोबतीला विलास मनोहर, रेणुका मनोहर, गोपाल फडणीस, प्रभा फडणीस, मनोहर यम्पलवार, संध्या यम्पलवार, दादा पांचाळ, बबन पांचाळ इत्यादी स्नेही-सोबती आहेत, असे नम्रपणाने सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सेवेच्या कार्याचे मर्म सांगताना ते म्हणाले, ‘‘काही न बोलता काम करता येते, हेच या सेवेतून सिद्ध झाले आहे.’’

डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव डॉ. दिगंत आमटे यांनी लोकबिरादरीच्या वैद्यकीय सेवेबाबतचा आढावा उपस्थितांसमोर वाचून दाखविला. एका झोपडीतून सुरू झालेल्या या सेवेचा लाभ आतापर्यंत 5,44,850 आदिवासी रुग्णांना मिळाला असून मध्य प्रदेशच्या बस्तारच्या जंगलातल्या 248 खेड्‌यांतून: आंध्र प्रदेशातील जवळपासच्या 80 खेड्यांतून व चंद्रपूर, गडचिरोलीच्या परिसरातील 929 खेड्‌यांतून आदिवासी आज औषधांसाठी या रुग्णालयात येतात. सर्व प्रकारचा मोफत औषध उपचार केला जातो. या प्रकल्पावर दर वर्षी एक भव्य शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येते. आजवर जवळपास दोन हजार अवघड शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये करण्यात आल्या. दर वर्षी 10 लाख रुपयांपर्यंत आरोग्यसेवेवर खर्च होतो व साधारणतः 8 लाख रुपयांचा तोटा येतो.

आरोग्यसेवेबरोबरच या लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी शेतीविषयक प्रशिक्षण, हस्तकला प्रशिक्षण इत्यादींच्या कार्यशाळा 25 खेड्‌यांमध्ये असून तेथेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देऊन मी माझे पुढील आयुष्य याच प्रकल्पात राहून आदिवासींची सेवा करण्यात घालवीन, अशी घोषणा करताच जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. या वेळी हेमलकसाच्या आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या डॉ. पांडू पुंगारी या माडिया समाजातील तरुणानेही आपले पुढील आयुष्य याच प्रकल्पासाठी देण्याचा संकल्प जाहीर करताच उपस्थित हजारो माडिया बांधवांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. डॉ. दिगंत व डॉ. पांडू या तरुणांनी आपले आयुष्य या प्रकल्पाला देण्याचा हा संकल्प सोहळ्याचा क्षण सर्वांसाठी भावोत्कट ठरला.

लोकबिरादरी प्रकल्प रुग्णसेवेसोबतच शैक्षणिक सुविधांचा उपक्रम, कुष्ठरोग सेवा समिती, आनंदवनच्या अंतर्गत आश्रमशाळा या ठिकाणी चालविण्यात येतो. या आश्रमशाळेचे विद्यार्थिप्रिय मुख्याध्यापक श्री. गोपाल फडणीस यांनी पंचवीस मुलांपासून सुरू झालेल्या या आश्रमशाळेत पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देऊन या शाळेच्या विकासाचा उंचावणारा आलेख उपस्थितांबरोबर मांडला. या शाळेने क्रीडाक्षेत्रात विशेष प्रगती साधली असून येथील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. काहींनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेतृत्व केले असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. औपचारिक शिक्षणाला कौशल्याधिष्ठित शिक्षणाची जोड या ठिकाणी देण्यात आली आहे.

1976मध्ये सुरुवातीला जेव्हा शाळा सुरू करण्याचा मनोदय झाला तेव्हा पहिल्या वर्गात 23 मुले आणि 2 मुली महत्कष्टाने मिळाल्या. दहा वर्षे शाळा चालविल्यानंतर सरकारने 1976 साली पहिल्या वर्गाला मान्यता दिली. आज पहिली ते दहावीपर्यंतची उत्तम अशी सुविधा या आश्रमशाळेत उपलब्ध आहे. या आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन ‘माडिया जमातीतील पहिला डॉक्टर’ असा मान मिळविणाऱ्या डॉ. कन्ना यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संपर्क साधून माझ्यासारखे पाल्यांना शिकवा व विद्यार्थ्यांनीही शिका, असे नम्र आवाहन केले. डॉ. कन्ना मडावी हे सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून या आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षण घेऊन आज आजूबाजूच्या गावांमध्ये कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, तर कोणी विद्यार्थिनी परिचारिका म्हणून काम करीत असल्याची माहिती देताना शाळेच्या मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

हेमलकसा प्रकल्प उभारण्यात प्रथम ज्या महारोगी बांधवांनी बाबांना सहकार्य केले होते, अशा दहा बांधवांचा सत्कार या वेळी करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा तथा खेळाडूंचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. येथील लोकप्रिय खासदार नरेश पुंगलीया यांनी या प्रसंगी आमटे कुटुंबीयांच्या सेवाव्रती जीवनाबद्दल आदर व्यक्त करून आश्रमाला संगणक अभ्यासक्रम उभारण्यासाठी 10 लाख रु., बाह्यरुग्ण विभागातील लोकांसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी 10 लाख रुपयांची मदत खासदार निधीतून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
लोकसत्तेचे निवासी संपादक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. सुरेश द्वादशीवार आपल्या भावपूर्ण भाषणातून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या 25 वर्षांपासूनच्या सेवेचा गौरव करताना म्हणाले की, आमटे परिवार गेल्या पंचवीस वर्षांपासून या उपेक्षित क्षेत्रात आपल्या सेवेचा आत्मयज्ञ चालवीत आहेत. सगळ्यांच्या पापाचे ओझे चिंध्यांच्या स्वरूपात आपल्या अंगावर बाळगणाऱ्या येशूच्या एका कथेचा संदर्भ देऊन सुरेश द्वादशीवार म्हणाले की, डॉ. प्रकाश व त्यांचे सर्व सहकारी या सेवेच्या माध्यमातून आपणां सर्वांच्या पापाचे ओझे वाहत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्व भौतिक सुखाचा त्याग करून तुम्ही जी सेवा करत आहात हा एक फार मोठा आदर्श तुम्ही सर्वांनी आमच्या डोळ्यांसमोर ठेवला आहे, असे भावोद्‌गार त्यांनी व्यक्त केले. शेवटी या आदिवासी भागातील खरा आजार भुकेचा आजार आहे, हे बदलण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. 

या प्रसंगी माजी पोलीस अधीक्षक भीष्मराम बाम तथा ‘सर्व’च्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बंग म्हणाल्या की सेवाकार्यासाठी स्वप्ने पाहण्याची ताकद येथूनच आम्हांला मिळते. या ताकदीतून आमच्या समाजकार्याच्या स्फूर्ती तेवत असल्याची कबुली त्यांनी दिली. या वेळी आंतरभारतीचे यदुनाथ थत्ते यांच्यावर काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो लोकांच्या नजरा भाषणाकडे लागल्या होत्या. शेवटी तो क्षण जवळ आला.

बाबांचे नाव मार्गदर्शन करण्याकरिता उच्चारण्यात आले तेव्हा सर्व समुदाय स्तब्ध होऊन बाबांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या स्फूर्तिफुलांकडे लक्ष देऊन ऐकू लागला . बाबा हिंदीतून गरजते, ‘‘भूख को धर्म नहीं होता.. सुख की कोई जात नहीं होती। आज माझा 85 वा वाढदिवस आहे. आजपर्यंतच्या ध्येयधुंद जीवन जगण्यात मला समाधान कधीच मिळाले नाही. परंतु आज मी खूप समाधानी आहे, कारण माझ्या परिवारातील तिसऱ्या पिढीने केलेला सेवेचा मनोदय ऐकून मी भारावून गेलो आहे. आज माझ्या यातना धन्य झाल्या आहेत. दिगंत व त्याच्या मित्रांनी आज केलेल्या घोषणांमुळे मला आजवर कधीही न लाभलेल्या संकल्पपूर्तीचे समाधान मिळाले आहे. असे सांगून ते म्हणाले की, तरीही एक खंत माझ्या मनात कायम राहणार आहे.

राष्ट्राच्या नवनिर्माण कार्यासाठी 'नव युवा वाहिनी' स्थापन करून आशावादी व ध्येयवादी तरुणांना विविध प्रकल्पांवर काम देऊन त्यांचा एक वर्षाचा सर्व खर्च उचलून त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रेरणा देण्यासाठी एक संघटन मला उभे करावयाचे होते. हे माझ्या जीवनातील फार मोठे स्वप्न अपुरे राहिले आहे. ‘‘मी जर असा बिमार राहिलो नसतो तर हेही स्वप्न पूर्ण झाले असते,’’ असे बोलून बाबा म्हणाले की, मी समाजसेवा करणाऱ्यांना काय सांगू? जो लोक दुनिया की और पीठ मोड लेते हैं उनके ही पीछे दुनिया आती है । अशा भावपूर्ण शब्दांत बाबा आमटेंनी आपले विचार व्यक्त केले. बाबांच्या अथक कार्यकर्तृत्वाची कहाणी त्यांच्याच ‘गतीचे गीत’ या स्फूर्तिगीतात रेखाटली आहे. हे गीत डॉ. भारती विकास आमटे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सादर केले. तेव्हा कार्यक्रमाला एक प्रचंड उंची निर्माण झाली. ही उंची होती कृतज्ञतेची; त्यागाची आणि आत्मसमर्पणाची! 

‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही.’

या स्फूर्तिगीताचा तेजःपुंज भावार्थ उपस्थितांच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकून केला. हजारो किलोमीटर अंतरावरून आलेल्या आप्त, मित्र परिवाराला या क्षणी धन्य वाटले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आटोपशीर संचलन प्रा. मदनराव धनकर यांनी केले. स्नेहमेळाव्यानंतर पाच-सहा हजार माडिया बांधवांसोबत सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व भोजनव्यवस्था अगदी चोख होती. भोजन सुरू असतानाच बाबांच्या उपस्थितीत डॉ. प्रकाश आमटे यांच्या छोटेखानी घरासमोर अंगणात सुषमाताई देशपांडे यांनी निवडक उपस्थितांसमोर ‘व्हय मी सावित्री बोलतेय’चा अप्रतिम नाट्यप्रयोग केला. या नाट्यप्रयोगाला बाबा साधनाताईंसमवेत संपूर्ण आमटे परिवार व निवडक मित्रपरिवार उपस्थित होता. याच रात्री सर्व उपस्थितांसाठी नागपूरच्या ‘स्वरमाला’ या नव्या दमाच्या कलाकारांच्या संगीत रजनीची सुरेख मैफल आयोजित करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला आदिवासींना वृक्षतोडीपासून प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने सकाळीच भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. फुलमाळांनी सजविलेल्या पालखीमध्ये दोन लहान वृक्ष सुंदर अशा घटामध्ये ठेवून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वाजतगाजत या वृक्षदिंडीला प्रारंभ केला. बाबा आमटे यांनी सुरुवातीला काही अंतर अनेक मान्यवरांसमवेत चालत गेल्यानंतर आमटे परिवारातील सदस्यांनी सेवाव्रतासारखाच हा वृक्षदिंडीचा वारसा पुढे चालविला. या वृक्षदिंडीमध्ये हजारो माडिया थंडीची पर्वा न करता आपल्या शरीरावरील अपुऱ्या वस्त्रांनिशी वृक्षांचे गुणगान गात 'आमचा हा वसा आम्ही जतन करणारच' असा दृढ आत्मविश्वास व्यक्त केला. वृक्षदिंडी पुढे गेल्यावर डॉ. प्रकाश आमटे यांचे प्राण्यांचे अनाथालय बघितले. या अनाथालयात सहा-सात जातींची कुत्री, सिंह, बिबटे, कोल्हे, अस्वल, हरणे, काळवीट, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर , साळिंदर , गिधाड, घुबड, शॅमेलिऑन इत्यादी विविध प्राण्यांचा संसार एकत्र नांदतो आहे हे सर्व बघितल्यावर खरोखरच आश्चर्य वाटते.

जेव्हा हा सर्व परिसर आम्ही डोळ्यांत साठवून परत निघालो तेव्हा आमटे परिवारासह विलास, रेणुका मनोहर, गोपाळ-प्रतिभा फडणीस, दादा पांचाळ, बाबा पांचाळ, मनोहर-संध्याताई यंपलवार इत्यादी विविध आघाडीवरील कार्यकर्त्यांची लक्षणीय धडपड नजरेत अगदी भरून येत होती. या सर्वांनी केलेल्या त्यागाचे कुठेही अवडंबर दिसत नव्हते की, भौतिक जगापासून तुटलेपणाची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत नव्हती. सर्वांच्या बोलण्यातून नम्रता पदोपदी जाणवत होती. खऱ्या अर्थाने या कार्यरत माणसांच्या जोडीला डॉ. प्रकाश-मंदाताई आमटे यांची दिगंत आणि अनिकेत ही मुले व इतर कार्यकर्त्यांचे अजिंक्य, पांडुरंग, धीरज, केतन व मनिष ही नव्या दमाची तरुण तडफदार नेतृत्व असलेली दुसरी-तिसरी पिढी आपल्या खांद्यावर या कर्मयज्ञाची पालखी पुढे वाहून नेण्यास निश्चितच सामर्थ्यवान आहेत. आम्ही हेमलकसाच्या मंतरलेल्या वातावरणातून बाहेर पडलो; तरीसुद्धा पहिल्या रात्री भारतीताई आमटे यांनी गायलेल्या बाबांच्या त्या गीताच्या काही ओळी आमची सोबत करीत होत्या. जणू त्या आमच्या आत्मभानाला जागृत करीत होत्या.

‘नांगरून स्वप्ने उद्याची, येथील फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उगवतील नेते, ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळांची कमाई, दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही.’

Tags: दिगंत आमटे डॉ. प्रकाश आमटे डॉ. बाबा आमटे रौप्य महोत्सव लोकबिरादरी हेमलकसा सामाजिक digant amate dr. prakash amate dr. baba amate dimond jubili lokbiradari hemalkasa social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके