डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमरावतीमध्ये नुकतेच विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. सामाजिक मानसिकता आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. प्रस्थापितांविरुद्ध बंड करायचे आहे; त्यांना विकले जायचे नाही, ही खूणगाठ मनाशी बांधून साहित्य चळवळी उभ्या कराव्या लागतील, असा संदेश या संमेलनाने दिला.

"माणसा-माणसांमध्ये विद्वेष पेटवणाऱ्या, अभिव्यक्तीला बंधने घालणाऱ्या सर्व धर्मातील दंगेखोर, प्रतिगामी जाती आणि स्त्रीदास्य समर्थक प्रवृत्तींच्या विरोधात लोकजागर उभा केला पाहिजे. हाच लोकजागर आपल्या वाङ्मय व्यवहाराचा, कलाविश्वाचा अविभाज्य भाग आहे. मानवी संस्कृतीवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता असून अंधाराचा नायनाट करण्यासाठी उगवणाऱ्या विद्रोहाच्या प्रकाशयात्रेत सहभागी झाले पाहिजे. कारण शोषित-कष्टकरी-दलित- बहुजन हाच भारतीय संस्कृतीचा कणा आहे. त्याची अभिव्यक्ती हाच संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्यांसाठी आपली लेखणी आहे. त्यांची सुखदुःखे, आशा-आकांक्षा यांना साहित्यकलेत योग्य रितीने आणण्याचे काम लेखक साहित्यिकांनी केले पाहिजे," असे भावनात्मक आवाहन चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजीज नदाफ यांनी महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यांतून आलेल्या विद्रोही समर्थक साहित्य कलावंत रसिक व्यक्तींसमोर केले.

अमरावतीला नुकतेच 19 आणि 20 जानेवारीला संत गाडगेबाबा नगरीत, भारतीय महाविद्यालयाच्या 'ताराबाई शिंदे स्मृती विचारापीठा'वर संपन्न झालेल्या चौथ्या दोन दिवशीय विद्रोही साहित्य संमेलनाला स्थानिक उपस्थितांचा अल्पसा प्रतिसाद आणि आदिवासी, दलित, बहुजन, कष्टकरी विद्यार्थी युवक प्रतिनिधी समूहाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. संमेलनाच्या सुरुवातीला भारतीय महाविद्यालय राजापेठपासून ते राजकमल चौकापर्यंत विविध राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या संमेलनस्थळी मिरवणूक परत आल्यानंतर विदर्भातील ज्येष्ठ सत्यशोधक कार्यकर्त्या नलिनीताई लढके यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी आदिवासी कलावंत पुन्याभाऊ गावित (नंदुरबार) यांनी पावरीवादन केले. सोबतच रमेश खैरनार यांचे हलगीवादन संपूर्ण संमेलनामध्ये जोष निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ हिंदी कथाकार, पत्रकार, नाटककार उदयप्रकाश हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब वैद्य यांनी विद्रोह कशासाठी आहे, व त्याची फलश्रुती कशात होणार आहे, याचीसुद्धा सविस्तर मांडणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करून सांगितले की, बसवेश्वरांनी ब्राह्मण धर्मातून विद्रोह करून लिंगायत समाज उभा केला. ज्या बसवेश्वराने लिंगायत समाजासाठी विद्रोह केला, त्याच समाजात आज पोटजातीची भिंत उभी राहिली आहे. असेच दलित समाजाचेही झाले आहे. समाजातील सामाजिक मानसिकता आपण जोपर्यंत समजून घेत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. प्रस्थापितांविरुद्ध बंड करावयाचे आहे, परंतु विकले जायचे नाही, ही खूणगाठ मनाशी बांधून यापुढे साहित्य चळवळी उभ्या कराव्या लागतील व या चळवळींतून कष्टकऱ्यांच्या श्रमांची, घामाची वेदना चित्रित झाल्यास खऱ्या अर्थाने समाज घडविण्याची ताकद त्यातूनच उभी राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका विशद करताना सांस्कृतिक चळवळीचे राज्य सचिव सुबोध मोरे म्हणाले की, शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात धर्मांधता ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. समतावादी- परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसमोर धर्मांधतेचे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. ब्राह्मणशाहीसोबतच चंगळवाद-भोगवादाची संस्कृती झपाट्याने वाढत आहे. आणि अशा परिस्थितीत मराठी साहित्यिक उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करीत आहेत. अशा प्रसंगी पुरुषसत्ता वर्चस्व, भांडवलशाही, साम्राज्यशाही, ब्राह्मणशाहीचे समर्थन करणाऱ्या लिखित साहित्याला विरोध करून सर्वसामान्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण असणाऱ्या लिखित साहित्यासोबतच लोककलेलाही मानवी साहित्याचा अविभाज्य भाग मानून विद्रोही सांस्कृतिक चळवळ उभी राहिली आहे, अशी स्पष्टोक्ती करून सुबोध मोरे म्हणाले की, आमची कोणत्याही साहित्यसंस्थांशी प्रतिस्पर्धा नसून हा विरोधासाठी विरोधही नाही. आमची भूमिका ही मानवी संस्कृतीच्या नवनिर्मितीची भूमिका आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष किशोर जाधव आपली भूमिका विशद करताना, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नाते हे कलावादाशी नसून तो एक जीवनवादाचा आवाज आहे, असे सांगून व आज जगात नसेल इतका सांस्कृतिक क्षेत्रातील भ्रष्टाचार हा एकट्या महाराष्ट्रात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नावाखाली सुरू आहे, असा आरोप करून मागील सात वर्षांपासूनचे हिशोब अ.भा.साहित्य संमेलनाने जाहीर करावेत अशी मागणी केली.

मौखिक साहित्यही महत्त्वाचे

उपस्थित समूहाशी संवाद साधत संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात दलित, आदिवासी, ग्रामीण, मुस्लिम-मराठी, ख्रिस्ती-मराठी आणि सर्वांची मिळून विद्रोही सांस्कृतिक चळवळ चालली आहे.

साहित्य आणि संस्कृतीच्या मशागतीसाठी प्रेम, सद्भावना यांची मूलभूत गरज आवश्यक असते. पण संस्कृतीच्या ठेकेदारांनी इतिहासाकडे दुर्लक्ष करीत मुस्लिम-ख्रिस्ती यांना उपरे ठरविले; शूद्रातिशूद्रांना दूर लोटले. त्यांना माहीत आहे का? इ.स. 1555 मध्ये आदिलशाहीच्या दरबारात मराठी भाषा प्रचलित होती. संतकवी अलमखानला वडवळच्या नागेशाचे शिष्य होण्यास कमीपणा वाटला नाही. मूँतोजी खिलजीला महेंद्राचार्यांचे शिष्य होण्यात कमीपणा वाटला नाही. आळंदीचे पीर लाडले मशायख हे तुकारामांच्या गुरुबाबा महाराजांचे गुरू होते. तर एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी हे सय्यद चांदसाहेब कादरी यांचे शिष्य होते. दत्तावतार व मलंग अवतार यांच्यामध्ये एकत्व मानले गेले होते. हुसेन अंबरखाने (1603-1613) यांनी ओवीबद्ध गीतेचे भाषांतर केले होते. त्यांचे आजोबा, वडील व नातू या तिघांनीही मराठीची सेवा केली आहे. कर्तृत्व नाकारले जाते, तेव्हा विद्रोहाची वेगळी चूल आवश्यक ठरते. पंक्तिप्रपंच गाडण्यासाठी हा विद्रोहाचा प्रपंच आवश्यक ठरतो, असे सांगून डॉ.नदाफ मराठी साहित्याच्या पुनर्लेखनाचा आग्रह धरताना म्हणाले की, साहित्यातील अनेक अप्रसिद्ध, अप्रकाशित भाग उजेडात आणले पाहिजेत. प्राचीन मराठी वाङ्मयात मुस्लिम रियासतकारांनी, संतकवींनी, शाहिरांनी गेली चार-पाचशे वर्षे सेवा केली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक बहुजनांनी मराठीत लेखन केले आहे. ते मौखिक स्वरूपात आहे. त्यांना मराठी साहित्येतिहासात स्थान देऊन मराठी साहित्येतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. लोककला व कलावंतांच्या उपेक्षेकडे लक्ष वेधून डॉ.नदाफ म्हणाले, 'लोककलेविषयी आजकाल बरेच बोलले जाते व तिच्या उद्धाराची घोषणा केली जाते. अनेक विद्यापीठांत यावर संशोधन चालू आहे. परंतु प्रत्यक्षात या कला लुप्त होत आहेत.

प्रदीर्घ वेळ चाललेल्या उद्घाटन समारंभानंतर 'शिक्षण व संस्कृतीच्या ब्राह्मणी करण्याचे आव्हान आणि फुले-शाहू-आंबेडकरी दृष्टिकोन' या विषयावर प्रा. वामन गवई यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. नीरज साळुंखे, दत्ता बाळसराफ, सुभाष थोरात, प्रा. अशोक चोपडे इत्यादींनी आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे या परिसंवादात मांडली. या परिसंवादात प्रा. प्रतिमा परदेशी यांनी शिक्षणाचे भगवीकरण हा ‘भगवीकरण’ शब्दाचा एक देखावा असून तो खऱ्या अर्थाने शिक्षणाचे ब्राह्मणीकरण करण्याचाच प्रकार आहे, यावर जोर देऊन शिक्षणातील ब्राह्मणीकरणाला पर्यायी कार्यक्रम म्हणून समतावादी मूल्ये शाळा-शाळांमध्ये रुजविली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. प्रा. नीरज साळुंखे यांनी भारतीय इतिहास लेखनातील घोडचुका मांडून इतिहास हा कधीच बहुजनांच्या बाजूने व बहुजनांच्या हिताने लिहिला गेला नसल्याचे सांगून इतिहासतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या डाव्या विचारांच्या इतिहासतज्ज्ञांनीही कशा चुका केल्या आहेत, हे सांगितले. दत्ता बाळसराफ यांनी एक प्रतिक्रियावादी न होता पर्यायीवादी दृष्टीने समतोलपणे आज सर्वच क्षेत्रांत विचार करण्याची गरज असल्याचे मत प्रामुख्याने मांडले.

समर्थ व परिपूर्ण सौंदर्यशास्त्राची उभारणी

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘वाङ्मयीन गुणवत्ता व समाजक्रांतीच्या कसोटीवर विद्रोही साहित्य व व्यवहार’ हा प्रा. डॉ. बाळाभाऊ कळसकर यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवाद प्रा. अशोक राणा, किशोर ढमाले, प्रा. वसंत शेंडे, प्रा. सुब्रतो दत्त, प्रा. महेबूब सय्यद, रत्नाकर मेश्राम इत्यादींच्या अभ्यासपूर्ण सहभागाने विशेष रंगला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक पळवेकर यांनी केले. या परिसंवादामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मुख्य कार्यकर्ते सचिव किशोर ढमाले म्हणाले की, या देशातील वाङ्मयीन गुणवत्तेचे निकष हे सर्वस्वी ब्राह्मणी सौंदर्याच्या निकषांवर बेतलेले आहेत. लिखित साहित्य हेच खरे साहित्य असते, हीसुद्धा ब्राह्मणी संस्कृतीने लादलेली बाब आहे. मौखिक साहित्यपरंपरेच्या साहित्याचीसुद्धा समीक्षकांनी दखल घेणे गरजेचे आहे. प्रस्थापितांनी लादलेली गुणवत्तेची सौंदर्यशास्त्राची मूल्ये आता आपणाला बुडापासून नाकारावी लागणार आहेत, असे सांगून किशोर ढमाले यांनी विद्रोही साहित्य व्यवहारासमोरील वाङ्मयीन गुणवत्तेच्या कसोट्या आपल्या वैचारिक प्रतिपादनाने उपस्थितांसमोर मांडल्या. संपूर्ण परिसंवादाचा आढावा घेताना परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळाभाऊ कळसकर यांनी मर्ढेकरांचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन हा बहुजन साहित्यासाठी कुचकामी असल्याचे सांगून समर्थ व परिपूर्ण सौंदर्यशास्त्र येत्या कालावधीत आपणास ताकदीने उभे करावे लागेल असेही आग्रही प्रतिपादन केले.

दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या परिसंवादात ‘कला व साहित्यातून व्यक्त होणारे भारतीय स्त्रीजीवन’ (स्त्री-पुरुष तुलनाकार ताराबाई शिंदे ते आजपर्यंत) या विषयावर ज्येष्ठ सत्यशोधक कार्यकर्त्या नलिनीताई लढके यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात प्रा. नूतन माळवी, प्रा. नंदा तायवाडे, उषाताई आत्राम, आदिवासी कार्यकर्त्या साबुताई गावित, अॅड. संगदत्ता बुराडे, प्रा.वैशाली दिवाकर इत्यादी महिला सहभागी झाल्या होत्या. या परिसंवादाचे सूत्रसंचालन आशू सक्सेना यांनी केले. या संपूर्ण परिसंवादाचे सूत्र हे ‘आजच्या चित्रपट, चित्रकृती, दूरदर्शनच्या जाहिराती व विविध प्रसारमाध्यमांतून आणि साहित्यातून स्त्री ही एक भोगवादाची वस्तू आहे, या पुरुषी दृष्टिकोनातूनच स्त्रियांची प्रतिमा रेखाटली जाते’, हे होते. याबद्दल नाराजी व्यक्त करून महिलांना अजूनही सत्यवानाचीच सावित्री माहीत आहे, महात्मा फुलेंची सावित्री अद्यापही आजच्या युवतींना व महिलांना माहीत नाही; समाजव्यवस्थेचा 50% भाग असणाऱ्या महिलांचा विद्रोह अद्यापही साहित्यविश्वात उपेक्षितच आहे याबाबत परिसंवादातील सर्वच वक्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

संमेलनातील शेवटचा परिसंवाद 'मातीशी इमान न राखल्याने मराठी साहित्याचे झेंडे अटकेपार गेलेच नाहीत, या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राचार्य रमेश अंधारे यांनी भूषविले. परिसंवादात प्रा. शोभा बागूल, बाबूराव वरघंटे या वक्त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निरीक्षणाद्वारे या परिसंवादाला अल्पसा न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रा. शोभा बागूल यांनी पेशवेकालीन कालखंड आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील साहित्यिकांनी मातीशी इमान न राखल्याने मराठी साहित्याचे झेंडे अटकेपार गेले नाहीत ही खंत व्यक्त केली. परिसंवादात हस्तक्षेप करून संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ यांनी बहुजन कष्टकरी साहित्यिकांच्या अनुवादाच्या चळवळी उभ्या राहिल्याशिवाय मराठी साहित्याचे झेंडे अटकेपार जाणार नाहीत, असे मत व्यक्त केले. प्रा. रमेश अंधारे यांनी धग, बुढाई, मेड इन इंडिया, माणूस, तणकट इत्यादी साहित्य कलाकृतीमधून मूल्यऱ्हास झालेल्या, ग्रामीण जीवनाच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचे चित्रण वरील साहित्यकृतींतून दिसते, परंतु आज सर्वच क्षेत्रांतील बदलत्या परिस्थितीनुरूप बहुजन समाजाच्या कष्टकरी-शोषित व्यक्ती समूहाचे चित्रण साहित्यात समर्थपणे प्रतिबिंबित होत नाही, याविषयी खंत व्यक्त केली.

दोन दिवस चाललेल्या या चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी विचारवंत प्रा. डॉ. आ.ह.साळुंखे हे होते. समारोपप्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव किशोर ढमाले म्हणाले की, विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही तत्कालिक प्रतिक्रियावादी संघटना न राहता कष्टकरी समाजाच्या बाजूने उभी राहणारी, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी विचारांची पताका घेऊन पुढे चालणारी, विद्रोहाचे जागर करणारी जनसामान्यांची चळवळ आहे. ठिकठिकाणी जिल्हा-गाव पातळीवर चर्चा, शिबिरे, अभ्यास शिबिरे, व्याख्याने, प्रकाशन संस्था सुरू करणे, इत्यादी उपक्रम राबविणारी ही चळवळ आहे. येत्या कालावधीत खऱ्या अर्थाने बहुभाषी साहित्यिकांना सोबत घेऊन अखिल भारतीय पातळीवरचे संमेलन आयोजन करणे हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीसमोरील कृतिकार्यक्रम आहे.

समारोपप्रसंगी तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, आपण 96.5 टक्के असूनही अल्पसंख्यांकांसारखे का वागतो? आपण बहुसंख्य असूनही अत्याचाराचे धनी आहोत. देशात देहांची संख्या जास्त असून भागत नाही; तर देहातील मनांची संख्या हवी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याजवळ असणाऱ्या प्रज्ञा आणि प्रतिभा एकत्र आल्यास सांस्कृतिक जीवन आणि वाङ्मयीन जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करून आजचा हा समाज देहांना जगण्यासारखा असेल परंतु संवेदनशील, प्रज्ञाशील, प्रतिभाशील मांडणीसाठी जगण्याच्या लायक नाही. हा समाज खऱ्या अर्थाने जगण्यासाठी लायक बनविणे ही विद्रोही संमेलनाची भूमिका आहे.

समस्त साहित्यजनांनी येत्या काळात मानवी यातनांशी नाते जोडून या नवजीवनाच्या (विद्रोही) महोत्सवात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

समारोप समारंभाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ.ह.साळुखे यांनी अ.भा.सा.स. संमेलनाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. व्यापकत्वाचा नुसता बुरखा घेणे महत्त्वाचे नाही, तर त्यांचा गाभा बदलण्याची आवश्यकता आहे; आमचा विद्रोह हा केवळ नकार नाही तर ती आमच्या स्वत्वाची लढाई आहे, असे सांगून डॉ.साळुंखे म्हणाले की, आम्ही आमचे श्वासोच्छवास विद्रोहाच्या विचारपीठावर मोकळे करतोय. ज्याला याचा त्रास होत असेल त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या कसोट्या बदलाव्यात. आम्ही आमच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना तुमच्या काळजाला वेदना होत असतील, तर तो तुमच्या काळजाचा दोष आहे, कारण उदात्त, उन्नत, करुणामय माणुसकीचा पाया असलेल्या संस्कृतीचे आम्ही वारसदार आहोत. आमचे विद्रोहाचे विचारपीठ हे सर्व शोषितांच्या आत्माविष्काराचे माध्यम आहे. प्रस्थापितांच्या भुवयांना होकायंत्र मानून आमच्या प्रतिभावंतांनी आपल्या साहित्याची दिशा ठरवू नये; असे आग्रही प्रतिपादन करून विद्रोही साहित्यनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या लेखकांनी श्रमपूर्वक, अभ्यासपूर्ण, इतिहासाचे उघड्या डोळ्यांनी वाचन करून, संशोधन, चिकाटी इत्यादी गुणसंग्रह केल्याशिवाय चांगले साहित्य निर्माण करता येणार नाही, हा रास्त सल्लाही त्यांनी दिला.

या संमेलनात डॉ. अजीज नदाफ यांचे शाहीर अमरशेख यांच्या गीतांचे संकलन असणाऱ्या (लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेले) पुस्तकाचे व अन्य काही पुस्तकांचे प्रकाशन झाले.

संपूर्ण संमेलनात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, नवापूर जिल्हा नंदुरबार येथील आदिवासी महिला स्त्री-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

---

चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब वैद्य संमेलनाच्या उत्साही व यशस्वी आयोजनाबद्दल साप्ताहिक साधनेला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी संमेलन ठरले आहे. नंदुरबारसारख्या दूरच्या जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर आदिवासी महिला या ठिकाणी येऊन त्यांनी विद्रोहीच्या विचारपीठावर येऊन परिसंवादामध्ये भाग घेतला आहे. आजपर्यंतच्या परिसंवादांमध्ये फक्त बुद्धिवादी वर्गाचेच प्रतिनिधित्व केले जात असे. विद्रोही संमेलनाने आपल्या विचारपीठावर आदिवासींना बोलते करून एक फार मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे, असे मला वाटते. 

संमेलनाचा खर्च कसा भरून काढला, यावर प्रतिक्रिया देताना अण्णासाहेब वैद्य म्हणाले की, नाममात्र 30 रुपये प्रतिनिधी फी, पुस्तकांच्या स्टॉलचे भाडे यांतून थोड्या प्रमाणात पैसा उभा राहिला आहे. काही साहित्यप्रेमी लोकांनीही या संमेलनासाठी आर्थिक मदत केली आहे. कोणत्याही मोठया भांडवलदाराकडून किंवा जाहिरातदारांकडून संमेलनासाठी पैसा उभा करण्यात आला नसून कार्यकर्त्यांनीच कार्यकर्त्यांसाठी उभे केलेले हे संमेलन आहे. संपूर्ण संमेलनाचा खर्च अवघा एक ते सव्वा लाखाच्या घरात असल्याची त्यांनी माहिती दिली.

या संमेलनाचे मुख्य आयोजक प्रा. डॉ. प्रकाश जोशी संमेलनाच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त करून काही स्थानिक साहित्यिकांचा अपवाद वगळता सर्व साहित्यप्रेमी लोकांच्या सहकार्याने हे संमेलन अमरावतीत यशस्वी होणे म्हणजे हे एक पुरोगामित्वाचे प्रतीक आहे, असे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, स्फोटक व विद्रोही विचार, दूरवरून आलेले प्रतिनिधी यांच्या आधारावरच विद्रोही सांस्कृतिक चळवळीची बांधणी यशस्वी ठरणार आहे. हे संमेलन अ.भा.सा.स.च्या तोडीचे असूनही अत्यल्प खर्चात आम्ही ते यशस्वी करून दाखविले आहे.


बँडपथक ते विचारमंच - डॉ. नदाफांचा थक्क करणारा प्रवास

बँडपथकातील कलावंत, मौखिक साहित्याचा प्रसार व जोपासना करणारे शाहीर, गजलांच्या छंदशास्त्राच्या संशोधनाबद्दल आचार्य पदवी ते विविध साहित्य संमेलनांसह चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा विस्मयकारक प्रवास डॉ. अजीज नदाफ यांनी केला आहे. मूळ पंढरपूरचे असणारे नदाफ आर्थिक परिस्थितीमुळे सुरुवातीला बँड पथकात सहभागी झाले होते व नंतर शायरीच्या ताफ्यात काम करताना शाहीर अमरशेख, शाहीर सगनभाऊ, शाहीर जंगमस्वामी आदींच्या सहवासात ते घडल्याचा व त्यांच्या प्रतिभेला बहर आल्याचा डॉ. अजीज नदाफ अत्यंत विनम्रतेने व कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.

डॉ. माधवराव पटवर्धनानंतर कुणी गजलांची छंदशास्त्रे अभ्यासली नाहीत. आपण मराठी, हिंदी व उर्दू गझलांमधील छंदांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात दीड तप खर्ची घातले. हा शोधप्रबंध (पी.एच.डी.चा) अनेक प्रकाशकांकडे प्रकाशनासाठी पाठविला. परंतु त्यास अनेकांनी नाकारले, याची डॉ. अजीज नदाफ यांना खंत आहे. अमरावतीच्या चौथ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जी आपली निवड झाली आहे, ती साहित्यिक म्हणून नव्हे तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून झाली असावी, या डॉ. नदाफ यांच्या विधानातून, त्यांच्यातील साहित्यिक झाकणारा सामाजिक कार्यकर्ताच मोठ्या प्रमाणावर डोकावतो.
 

Tags: मराठी साहित्य विद्रोही साहित्य पुस्तके साहित्य संमेलन Marathi literature books vidrohi sahitya sahitya sammelan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके