डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाल प्रतिभेचा अखिल भारतीय महोत्सव- सर्गोत्सव!

आनंददायी शिक्षणाच्या नावावर आपल्याकडे फक्त चर्चाच जास्त होते. विद्यार्थ्याच्या सर्जनशक्तीला वाव देणारी अशी सर्गोत्सवासारखी विविधांगी प्रयोगांची शाळा खरे तर प्रत्येक ठिकाणी असावी. तेव्हाच जीवनोपयोगी शिक्षण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकणार. हे होण्यासाठी सर्वप्रथम आपण शिक्षणयंत्रणेचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन बदलविणे गरजेचे आहे.

भारत ज्ञान-विज्ञान समुदाय आणि केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या वतीने केरळच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या भूमीत 17 ते 27 मेपर्यंत एक आगळा-वेगळा बाल प्रतिभेला प्रोत्साहन देणारा बालांचा सृजनोत्सव संपन्न झाला. या सृजनोत्सवाला आयोजकांनी नाव दिले होते – सर्गोत्सव!

या सर्गोत्सवात उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, त्रिपुरा, प. बंगाल, केरळसह महाराष्ट्रातील 160 विद्यार्थी सहभागी झाले व होते. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा प्रवासखर्च ‘युनिसेफ’ या संस्थेने केला होता. केरळच्या प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हा सर्गोत्सव झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील सर्गोत्सव अल्लेप्पे येथे संपन्न झाला.

संवेदनक्षम वयातील विद्यार्थ्यांना जात, धर्म, भाषा, राज्य यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाची ओळख व्हावी, पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचे जग उघड्या डोळ्यांनी, मोकळ्या मनांनी पाहता यावे, ‘हे करू नको- ते करू नको,’ ‘तुला हे जमणार नाही,’ ‘चूप बैस,’ याच्या पलीकडे जाऊन ‘तुला जे करावेसे- शिकावेसे वाटेल ते तू कर,’ असे मोकळ्या मनाने सांगणारा बालकांच्या सृजनाला प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने या सर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय सर्गोत्सवात देशभरातून 13 वर्षांखालील 3000 बालविद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्याव्यतिरिक्त संपूर्ण केरळ राज्यातील 3 हजार विद्यार्थी व जेथे हा राष्ट्रीय सर्गोत्सव झाला त्या अल्लेप्पी येथील स्थानिक 4 हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. 10 हजार विद्यार्थ्यांची सर्व चोख व्यवस्था केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या वतीने ठेवण्यात आली होती. साने गुरुजींच्या आंतरभारतीच्या धर्तीवर प्रत्येक राज्यातून आलेल्या एका-एका विद्यार्थ्याला केरळमधील एका-एका विद्यार्थ्यांच्या घरी पाहुणा म्हणून ठेवण्यात आले होते. दोन भिन्न संस्कृती, दोन भिन्न भाषा, भिन्न चालीरिती विद्यार्थ्यांनी समजून घ्याव्यात हा चांगला उद्देश यामागे होता. संवादासाठी विद्यार्थ्यांना भाषेची कुठेही अडचण जाणवत नव्हती. निरागस मैत्री भाषेच्या पलीकडे जात असते, याचा अनुभव अनेकांनी येथे घेतला.

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त विविधांगी, जीवनोपयोगी कला तथा विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या वतीने केरळमध्ये अनेक शैक्षणिक प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांचाच एक भाग म्हणून या बाल सर्गोत्सवात जवळपास 100 विविध प्रकारची कला तथा विज्ञानदालने विद्यार्थ्यांसाठी उभारलेली होती. यात विज्ञान सागर, हातांची जादू, माहितीचा डोंगर, पंखांच्या वरती, हसत-गात खेळ खेळ, लाटांच्या सोबत, विज्ञानाचा चमत्कार इत्यादी मुख्य विषयांची दालने होती. यांतील काही दालनांमधून मुलांना नाट्याचे, अभिनयाचे, नाट्यसंवाद लेखनाचे प्रशिक्षण दिले जात होते. फोटोग्राफी कशी करतात; व्हिडिओ शूटींग कसे करतात: कार्टुन कसे काढावयाचे, नृत्य कसे करावयाचे, चित्र कसे तयार होते; विविध प्रकारची ग्रीटींग्ज तयार करणे; वृत्तपत्राची सर्वांगीण ओळख, रोजचे वृत्तपत्र कसे तयार करतात; आपणही आपले हस्तलिखित वृत्तपत्र कसे तयार करावयाचे; संगीतवाद्यांची तोंडओळख, गीतगायन, कविता, लेखन वाचन, कथा लेखन, कथा सादरीकरण, जादूचे प्रयोग, चित्रपट कसा तयार होतो; जाहिराती किती खऱ्या किती खोट्या; कागदाची विविधांगी ओरेगामी, बाहुल्या तयार करणे; मुखवटे तयार करणे; मातीकाम, मातीची खेळणी, साबण तयार करणे, कागदाची- कापडाची खेळणी तयार करणे; खगोलशास्त्राची माहिती, आकाशदर्शन, रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, जीवशास्त्रातील चमत्कार, गणितातील जादू, जीवनदायी वनस्पती, आपल्या डोळ्यांची रचना, ‘आपण समजून घेऊ आपलं शरीर,’ सागर विज्ञान इत्यादी विविध प्रकारची स्वतंत्र दालने या सर्गोत्सवात होती. प्रत्येक दालनात विपुल साधन सामग्रीसह दोन दोन तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना सुरुवातीला मार्गदर्शन करत. नंतर विद्यार्थी स्वतः अनेक कलाकृती तयार करून बघत, विविध प्रयोग करून बघत, ओरेगामी करीत, मुखवटे रंगवीत, ज्याला जे शिकायचं असेल ते ते त्याने त्याने समजून घ्यावं- स्वतःच्या हातानं करून बघावं असा हा कोणालाही, कशाचाही नकार नसलेला महोत्सव होता. विद्यार्थ्यांचे गट पाडलेले असल्याने प्रत्येक दालनात त्यांना 1 तास काम करायला मिळायचे. सर्वच दालने बघण्यासारखी होती. परंतु संपूर्ण दालने सर्वच विद्यार्थ्यांना वेळेअभावी बघता आली नाही. तरीही खूप काही अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांना यातून मिळाली.

या सर्गोत्सवाच्या उद्घाटनाला जागतिक पातळीवरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. यशपाल हे लाभले होते. त्यांनी शंका उपस्थित करा, सातत्याने प्रश्न विचारा असा मौलिक सल्ला या बालविद्यार्थ्यांना दिला. मुळात प्रश्न पडणे महत्त्वाचे आहे. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. प्रश्नच जर निर्माण झाले नाहीत तर शिक्षणाला अर्थ नाही. पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जीवन जगण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनात जे प्रश्न पडतात, त्यांना कसे सामोरे जावे हे विविधांगी कला, साहित्य, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, विज्ञान यांद्वारे समजून घेतले पाहिजे. आपली स्वयंपाक खोली हीच जगातील सर्वांत मोठी प्रयोगशाळा आहे, रसायनशाळा आहे. स्वयंपाकातील विविध क्रिया ह्या विज्ञानाच्या आधारे आपण समजून घेतल्या पाहिजेत असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केलेत. या सर्गोत्सवात प्रसिद्ध गायक येशूदास, प्रसिद्ध मल्याळम् कवी कडमेटा वासुदेवन नायर, साहित्यिक यू.आर. अनंतमूर्ती यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, कलावंत व्यक्तींनी सर्गोत्सवात बाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सर्गोत्सवात सर्व विद्यार्थ्यांसाठी समुद्र दर्शन, समुद्र सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. नाचगाणी आणि विविध खेळाचेही अनेक प्रयोग येथे विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेत. ‘बच्चों के साथ, बच्चों के लिए, संसार को बदलो’ हा नवा विचार सर्गोत्सवाने मोठ्यांना दिला.

आनंददायी शिक्षणाच्या नावावर आपल्याकडे फक्त चर्चाच जास्त होते. अपवादात्मक परिस्थितीत एक-दोन ठिकाणी आनंददायी शिक्षणाची चुणूक दिसतेही. तरीही पाठ्यपुस्तकांच्या घोकंपट्टीची व विद्यार्थ्यांच्या फक्त स्मरण शक्तीचीच आपण परीक्षा घेत असतो. विद्यार्थ्यांच्या सर्जनशक्तीला वाव देणारी अशी सर्गोत्सवासारखी विविधांगी प्रयोगांची शाळा खरे तर प्रत्येक ठिकाणी असावी. तेव्हाच जीवनोपयोगी शिक्षण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकणार. हे होण्यासाठी सर्वप्रथम आपण शिक्षणयंत्रणेचा, शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन बदलविणे गरजेचे आहे. कारण आपले आजचे शिक्षण फक्त परीक्षातंत्र आत्मसात करावयाला शिकविते. जीवन जगण्याची कलाच ते हरवून बसले आहे. जीवन सृजनात्मक शैलीने जगण्याची, माणूसपणाची गुरुकिल्लीचं सर्गोत्सव विद्यार्थ्यांच्या हाती देतं!
 

Tags: मानवता. आनंदी शिक्षण शिक्षण व्यवस्था वासुदेव नायर येशुदास यु. आर. अनंतमूर्ती शिक्षण कौशल्ये जीवन शिक्षण समुद्र सृजनशीलत केरळ मुले विद्यार्थी #पाठ्यपुस्तक Humanity Happy Education Educational system Vasudeo Nayar Yeshudas U. R. Anantmurti Learning Skills Life Education Ocean Sea Creativity Kerala Children Student #Textbook weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके