डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वत:च्या गृहीतकांविषयी साशंक असायला हवं

नरेश फर्नांडिस हे ‘स्क्रोल-डॉट-इन’ या संकेतस्थळाचे सुरुवातीपासून संपादक राहिले आहेत आणि या डिजिटल मंचाला त्यांनी आकार दिला आहे. ‘स्क्रोल-डॉट-इन’चा प्रवास 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाला आणि आजघडीला भारतातील सर्वोत्तम डिजिटल पोर्टलांमध्ये त्याची गणना केली जाते. या संकेतस्थळाला 8 जानेवारी 2020 रोजी सहा वर्षं पूर्ण झाली, तेव्हा संकल्प गुर्जर यांनी नरेश फर्नांडिस यांची ही मुलाखत घेतली. या मनमोकळ्या मुलाखतीमध्ये ते डिजिटल मंचांच्या सामर्थ्याविषयी व मर्यादांविषयी, माध्यमविश्वातील स्पर्धेविषयी व निर्बंधांविषयी आणि ऑनलाइन ट्रोलिंग व पत्रकारितेसमोरच्या आव्हानांबद्दल बोलले आहेत. ‘आपण कोणत्याही माध्यमात काम करत असलो, तरी सत्ताधारी लोकांना आपलं काम खुपण्याची शक्यता असतेच,’ असा त्यांचा ठाम विश्वास आहे. शिवाय, डिजिटल माध्यमे इतर माध्यमांपेक्षा अधिक समाधान देणारी असली, तरी त्यासाठी अधिक कार्यक्षम मनुष्यबळही लागतं, असं ते मानतात.

प्रश्न - दि.26 जानेवारी 2014 रोजी ‘स्क्रोल’ सुरू झालं. आज ते भारतातील उत्कृष्ट डिजिटल पोर्टल्सपैकी एक मानलं जातं. स्क्रोलच्या या यशामागचं रहस्य आम्हाला सांगू शकाल?

- माझ्या मते सगळ्या डिजिटल माध्यमांमध्ये आमची व्याप्ती सर्वाधिक आहे. केवळ डिजिटल स्वरूपातच अस्तित्वात असणारी, वार्तांकन करणारी प्रकाशने फारच कमी होती अशा काळात आम्ही सुरुवात केली. बहुतेक पारंपरिक माध्यमे ज्याप्रमाणे वार्तांकन करत होती, तशा प्रकारच्या माध्यमाची उणीव भरून काढण्याच्या कल्पनेने आम्ही सुरुवात केली. आमच्यासमोर असणारी ‘रेडिफ’ आणि ‘फर्स्ट पोस्ट’सारखी डिजिटल माध्यमे रूढार्थाने वार्तांकन करत नव्हती. त्यांचा भर लेख, फीचर्स छापण्याकडे होता. तेव्हा ही उणीव भरून काढायला हवी याची आम्हाला जाणीव झाली. त्याचप्रमाणे आमच्या हे लक्षात आले होते की, अशा अनेक स्टोरीज होत्या- ज्यांची मुख्य प्रवाहातल्या माध्यमांकडून दखल घेतली जात नव्हती. आम्हाला असंही वाटलं की, ज्या पद्धतीने अनेक महत्त्वाच्या स्टोरीज कव्हर केल्या जातात, त्याहून अधिक काटेकोरपणाने त्या केल्या जाऊ शकल्या असत्या. तेच करायचं, असं ठरवून आम्ही कामाला सुरुवात केली.

मात्र वाचकांना केवळ राजकारण, विकासाचे प्रश्न इत्यादी विषयांशी संबंधित बातम्यांमध्येच रस असतो असं नाही, याचीही आम्हाला जाणीव होती. पारंपरिक माध्यमे ही एखाद्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीप्रमाणे असतात, अशी कल्पना करा. थाळीत जसे अनेक प्रकारचे पदार्थ नुसते एकत्र ठेवलेले असतात, तशी ही माध्यमे आहेत. मात्र वाचकांनाही त्यांना दिल्या जाणाऱ्या कंटेंटमध्ये वैविध्य हवं असतं, ते आम्ही जाणीवपूर्वक राखायचं ठरवलं. त्यामुळे स्क्रोलने अगदी सुरुवातीपासूनच केवळ एकच एक प्रकारच्या बातम्यांवर लक्ष केंद्रित केलं नाही. आम्ही आमच्या वाचकांना वैविध्यपूर्ण मजकूर दिला. आमच्या वाचकांच्या हे लक्षात आलं आणि मला वाटतं, त्यांना ते आवडलंही असावं. संस्कृती, चित्रपट आणि क्रीडाविषयक विषयांवर आम्ही चांगला मजकूर देण्याचा प्रयत्न करतो. ‘द फिल्ड’ या विभागात क्रिकेट वगळता अन्य खेळांविषयीचा कंटेंट असतो, कारण आपल्याकडे क्रिकेटकडे खूपच जास्त लक्ष दिले जाते आणि त्या तुलनेत इतर खेळांकडे दुर्लक्ष होते. तसेच आम्ही खेळांचे वार्तांकन करताना केवळ पुरुष खेळाडू आणि त्यांच्या खेळांना जास्त प्राधान्य दिले आहे, असे होत नाही. स्क्रोलवर आम्ही सांस्कृतिक विषय अतिशय गांभीर्याने कव्हर करतो. वाचकांना ते आवडतं आणि त्यामुळेच ते आमच्याकडे वळतात.

प्रश्न - स्क्रोलचा वाचक कोणता आहे? स्क्रोलचा आदर्श वाचक कोण असू शकतो?

- असा कोणी आदर्श वाचक समोर ठेवून आम्ही काम करत नाही. जी सहा वर्षं आम्ही काम करत आहोत, त्या काळात ऑनलाईन माध्यम बऱ्याच प्रमाणात बदललं आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा प्रत्येक जण स्टोरी ‘शेअरेबल’ असण्याविषयी बोलत होता, म्हणजे त्यासाठी तुम्ही ती ‘क्लिकबेट’ शीर्षकासह लिहिली पाहिजे. लोक सोशल मीडियावर एकमेकांना पाठवू शकतील अशा पद्धतीने स्टोरीज देणं अपेक्षित होतं. त्या स्टोरीज लहान असत. ‘अमुक एक गोष्ट करण्याची दहा कारणे’ अशा यादीवजा पद्धतीने लोक लिहीत होते. अनेक लोक ऑनलाईन माध्यमांसाठी कर्कश सुरात लिहीत होते. त्याची आम्हाला जाणीव झाली आणि असं वाटलं की, पत्रकारितेमध्ये याहून अधिक काही तरी असायला हवं. आम्हाला वाटलं की, आपण या ट्रेंड्‌सचं अनुकरण करण्याची गरज नाही. आपण ऑनलाईन माध्यमात कार्यरत असलो तरीही आपण काही अधिक गंभीर, चांगल्या स्टोरीज वाचकांना देऊ शकतो. उथळ मजकूर देताना नेहमी असं गृहीत धरलेलं असतं की, वाचकांना सूक्ष्म तपशिलांसह लिहिलेल्या स्टोरीज समजत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्या नको असतात. 

हा दृष्टिकोन वाचकांना कमी लेखणारा आहे. आम्ही या सगळ्यांतून बाहेर पडायचं ठरवलं आणि गंभीर, आकर्षक बातम्या आवश्यक त्या बारकाव्यांसह द्यायचं ठरवलं. त्यामुळे तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर- जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा आमच्या डोळ्यांपुढे कोणताही विशिष्ट स्वरूपाचा वाचक नव्हता. ऑनलाईन माध्यमांमध्ये तुमच्या वेबसाईटवर किती वाचक वाचत आहेत, हे माहिती करून घेणं फारच सोपं झालं आहे; कारण तंत्रज्ञानाने त्या-त्या वेळी या गोष्टींची मोजदाद ठेवणं शक्य झालं आहे. पण त्यामुळे गंमतीशीर ट्वीट्‌स एकत्र आणून तयार केलेल्या स्टोरीज तुमच्या वेबसाईटवर कदाचित फारच लोकप्रिय ठरतील हे पाहणं आणि तशाच प्रकारचं लेखन देण्यासाठी उद्युक्त होणं, हेदेखील खूप सोपं आहे.

त्यामुळेच स्क्रोल सुरू करताना बातमीदारांवर पडणारा ताण टाळण्यासाठी, एखादी विशिष्ट स्टोरी किती वेळा शेअर केली गेली आहे हे दाखवायचं नाही, असं आम्ही ठरवलं. अशा आकड्यांचा ताण आमच्या बातमीदारांवर पडू द्यायचा नाही असं आम्ही ठरवलं आणि त्यांनी त्यांच्या सर्वोच्च क्षमतेने लिहावं एवढंच आम्हाला हवं आहे. आपले वाचक वेबसाईटवर काय वाचतात याचा अंदाज यावा म्हणून अर्थातच संपादक या आकड्यांवर लक्ष ठेवून असतात. पण आम्हाला हे माहित आहे की, आमचे वाचक बुद्धिमान आहेत आणि त्यांना आपल्या आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल आहे. पण याहून अधिक बारकाईने आम्ही वाचकांचे वर्गीकरण करत नाही.

प्रश्न - ऑनलाईन माध्यमांसाठीच्या मजकुराची निर्मिती- विशेषतः स्टोरीजची निवड आणि लेखन- पारंपरिक वृत्तपत्रांपेक्षा कशी वेगळी असते? त्यात काही बदल होतो का?

- त्यात काही बदल होतो, असं मला अजिबात वाटत नाही. आम्ही नेहमीच असं म्हटलं आहे की, बातमी देणारं आणि बातम्या येतील त्याच वेगाने प्रसिद्ध करणारं नियतकालिक हेच आमचं ध्येय होतं. मात्र ऑनलाईन आणि प्रिंट माध्यमांमधील लेखनाची तुलना केल्यास, मला असं वाटतं की, ऑनलाईन माध्यम अधिक दृश्य घटक (visual element) तुमच्या स्टोरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मदत करतं. आपल्या लेखनाला पूरक असे व्हिडिओदेखील आपण ऑनलाईन माध्यमात असताना त्यात समाविष्ट करू शकतो. स्टोरीच्या लिखाणातल्या काटेकोरपणाच्या दृष्टीने मात्र त्यांत काही बदल होत नाही. खरं तर हे कदाचित बढाईखोरपणाचं वाटू शकेल, पण आम्हाला असा विश्वास वाटतो की, पारंपरिक पत्रकारिता एके काळी ज्यासाठी प्रसिद्ध होती त्या काटेकोरपणावर- जो तिथून आता बेदखल झाला आहे- आम्ही स्क्रोलमध्ये दावा सांगत आहोत. आणि त्या अर्थी, आम्ही फार जुन्या पठडीची पत्रकारिता करतो.

सध्याच्या काळात, प्रिंट माध्यमातले वृत्तपत्र असो किंवा ऑनलाईन माध्यम- युवा पिढी ते त्यांच्या मोबाईल फोनवरच वाचते. त्यांच्यासाठी सगळंच डिजिटल आहे- मग तो ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असो, नाही तर ‘स्क्रोल’. त्या अर्थी सगळंच डिजिटल आहे, मग स्टोरीचा मूळ स्रोत कोणताही असो. त्यामुळे लोक जेव्हा म्हणतात की, प्रिंट माध्यमं डिजिटलपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत; तेव्हा आपण हे विचारायला हवं की, जर वाचक त्यांच्या मोबाईल फोनवरच प्रिंट माध्यमांनी दिलेल्या बातम्या वाचत असतील तर मग प्रिंट माध्यम म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? मी नेहमी गमतीने असं म्हणतो, शेखर गुप्तांच्या डिजिटल माध्यमाचं नाव ‘द प्रिंट’ आहे; तसं आता कुणी तरी ‘द वेबसाईट’ नावाचं प्रिंट स्वरूपातलं प्रकाशन सुरू करायला हवं.

प्रश्न - तरीसुद्धा, इतर अनेक वृत्तपत्रांप्रमाणे स्क्रोलला अशी दशकांपासूनची कुठलीही परंपरा नाही. त्याचा स्क्रोलला काही फायदा झाला का किंवा काही अडचण आली का?

- हो. अनेक प्रकाशनांना दीर्घ परंपरेचा फायदा मिळतो. काळ जसजसा पुढे जाईल तशी संथपणाने, क्लेशकारक प्रक्रियेने तयार होणारी विश्वासार्हता ही गोष्ट आहे. इतर काही माध्यमे जी विश्वासार्हता उपभोगत असतात, ती मिळवण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळेच मला वाटतं, कदाचित एखाद्या प्रकाशनाचं आयुष्य किती काळ आहे त्यानुसार आपण त्यांच्यामध्ये (जुनं किंवा नवं असा) फरक करू शकतो; त्यांचं माध्यम कोणतं आहे (मुद्रित किंवा डिजिटल) त्या आधारे नाही. प्रत्येक दिवशी आम्ही प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडून जर काही चूक घडली तर ती आम्ही मान्य करतो आणि लगेच दुरुस्त करतो. अतिशय वेगवान अशा डिजिटल माध्यमासाठी जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा थोड्याफार चुका होणारच याची आम्हाला जाणीव आहे. आमचे वाचकही ते समजून घेतात.

प्रश्न - दीर्घ परंपरा असणाऱ्या माध्यमांच्या तुलनेत स्क्रोलला काही फायदे आहेत का?

- आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडून वाचकांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. आमच्या गुणवत्तेचे निकष स्वतःच ठरवून स्वतःला हवं त्या पद्धतीने उभं करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला होतं आणि तुम्ही कोण आहात व काय आहात याविषयीचे निष्कर्ष लोकांना स्वतःच काढावे लागत होते. एका अर्थाने पाहता, स्क्रोलमध्ये आम्हाला परंपरेचं ओझं नव्हतं. त्यामुळे आम्ही आवश्यक ते निर्णय अधिक वेगाने घेऊ शकत होतो. वेगवेगळ्या पठडीतल्या लोकांशी सल्लामसलत करावी लागेल, मालकावर एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होईल याचा विचार करावा लागेल- अशी गुंतागुंतीची संस्थात्मक रचनाही आमच्याकडे नव्हती. स्क्रोल ही स्वायत्तपणे काम करणारी व्यवस्था आहे.

प्रश्न - स्क्रोलची स्पर्धा केवळ डिजिटल प्रकाशनांशीच नाही, तर प्रिंट आणि टीव्ही माध्यमांशीही आहे. या स्पर्धेकडे तुम्ही कसं पाहता?

- त्याचा आम्हाला फार फरक पडत नाही. आमचा असा ठाम विश्वास आहे की, सरतेशेवटी तुमची सर्वोत्तम कामगिरी तुम्ही करणं आणि वाचक त्याची दखल घेतील अशी आशा बाळगणं, हेच आपल्या हातात असतं. वितरणाचं स्वरूप ही गोष्ट या नव्या डिजिटल माध्यमांमध्ये अधिक अवघड आहे, कारण त्यातला बहुतेक भाग गुगल या सर्च इंजिनशी संबंधित आहे. वाचकांनी तुमच्या वेबसाईटसाठी विशिष्ट प्रमाणात सर्च केल्यानंतर गुगल तुमच्या वेबसाईटचं इंडेक्सिंग करतं का, वाचक तुम्हाला गुगलवर सहजपणे शोधू शकतात का, तुमच्या बातम्या गुगलच्या बातम्यांसाठीच्या पानावर दिसतात का- इत्यादी गोष्टींना आता महत्त्व असतं. सर्व माध्यमांना हेच निकष लावले जात असल्याने कोणालाही काही अतिरिक्त फायदा झाला आहे असं होत नाही. गुगलने एकदा तुम्हाला विश्वासार्ह प्रकाशक म्हणून मान्य केलं की, मग तुम्ही ‘गुगल न्यूज’मध्ये, ‘गुगल सर्च’मध्ये दिसू लागता. त्यांचे अल्गोरिदम तुमच्या वेबसाईटवरील अर्काईव्हची व्याप्ती किती आहे हे ओळखतात. तसेच तुम्ही साधारण किती काळाच्या अंतराने स्टोरी अपलोड करता, हेदेखील त्यांना समजतं. मला वाटतं- तुम्ही सातत्याने काम करत असाल, स्टोरीज वेळच्या वेळी अपलोड होत असतील; तर याचा अर्थ तुम्ही विश्वासार्ह माध्यम ठरू शकता, हे गृहीतक त्यामागे असतं. त्या अर्थी हे तुलनेने अधिक समान पातळी असणारं क्षेत्र आहे, जिथे पारंपरिक माध्यमे आणि नवोदित प्रकाशने या दोन्हींनाही समान पद्धतीनेच वागवलं जातं. या निकषांवर स्क्रोल उत्तीर्ण झालं आणि आम्ही ‘गुगल न्यूज’वर दिसू लागलो. हे लक्षात ठेवायला हवं की, डिजिटल माध्यमांमध्ये तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता यापेक्षा लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात, हे महत्त्वाचं आहे.

प्रश्न - स्क्रोलच्या स्थापनेपासून ते आताचा सहा वर्षांचा काळ लक्षात घेतला, तर राजकीय स्तरावर नरेंद्र मोदींचा प्रभाव होता. गेल्या वर्षी तुम्ही ‘द मोदी इयर्स’ हा प्रोजेक्ट केला होता. त्याच्यामागचा तर्क काय होता?

- मागच्या म्हणजे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वी आम्ही ‘द मोदी इयर्स’ प्रोजेक्ट केला होता. मुळात ती नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचं विश्लेषण करणारी लेखमाला होती. सरकारची कार्यक्षमता आणि दावे यांची चिकित्सा त्या लेखांत होती. कदाचित पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळेसदेखील आम्ही असाच एखादा प्रकल्प राबवू.

प्रश्न - स्क्रोल नियमितपणे वाचणाऱ्यांना हे लक्षात येईल की, तुमचा मुख्य भर हा देशांतर्गत घडामोडींवरच असतो.  असं का?

- पहिली गोष्ट, आमचे स्रोत व साधनं मर्यादित आहेत आणि आपण वार्तांकनासाठी कोणती गोष्ट प्राधान्याने निवडायची आहे, हे आम्हाला ठरवावं लागतं. आंतरराष्ट्रीय बातम्या देणारी बरीच माध्यमं आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे आमचं अधिकारक्षेत्रही नाही. त्यामुळे इतर काही जण त्याविषयी ज्या प्रमाणात वार्तांकन करतात तितकं आम्ही करत नाही. तरीदेखील, गेल्या काही वर्षांत आम्ही काही खास प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केले होते. आमच्याकडे वैद्यकीय विषयांना वाहिलेला एक विभाग होता, पण आर्थिक मर्यादांमुळे तो आम्हाला वगळावा लागला. गेल्या काही वर्षांत प्रसंगानुरूप काही प्रकल्प आम्ही हातात घेतले आहेत. आम्ही केलेला शेवटचा मोठा प्रकल्प आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा (एनआरसी) होता. आसाममध्ये ‘एनआरसी’ची प्रक्रिया सुरू होती. आमच्या त्या प्रकल्पांतर्गत आम्ही त्याचं वार्तांकन काटेकोरपणे केलं होतं. ते साधारण वर्षभर चाललं आणि त्यात माझे सहकारी अरुणाभ सैकिया यांनी उत्कृष्ट काम केलं. तो प्रकल्प पूर्ण झाला आणि ‘एनआरसी’ हा आजच्या काळातला एक सर्वाधिक महत्त्वाचा विषय बनला आहे.

प्रश्न - म्हणजे एनआरसीचं गांभीर्याने आणि मोठ्या प्रमाणावर वार्तांकन करणारं स्क्रोल हे पहिलं माध्यम होतं...

- तसा दावा करायला मला आवडेल. पण खरोखरच, त्या प्रकल्पाविषयी तुम्हाला अधिक सांगायचं तर, आम्ही आसाममधील एनआरसीचं वार्तांकन करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. आमच्या वेबसाईटवर केवळ त्या विषयाला वाहिलेला एक विभाग आहे. ‘द फायनल काउंट’ असं त्याचं नाव आहे आणि त्यात जवळपास 150 स्टोरीज आहेत.

प्रश्न - ‘सत्याग्रह’ नावाची एक हिंदी वेबसाईटदेखील स्क्रोल चालवतं. त्याचा उद्देश काय आहे?

- ‘सत्याग्रह’ 2015-16 मध्ये सुरू झालं. त्याची स्वतःची स्वतंत्र टीम आहे, स्क्रोलचं ते हिंदी भाषांतर नाही. आम्हाला अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचायचं होतं, म्हणून आम्ही ते सुरू केलं. ‘सत्याग्रह’ त्याच्या स्टोरीज स्वतः ठरवतं. प्रसंगोपात्त स्क्रोलवरचा एखाददुसरा लेख तिथे येतो, मात्र प्रामुख्याने ते स्वतःच त्यांचा मजकूर हिंदीतूनच तयार करतात. 

प्रश्न - सत्याग्रहदेखील ‘स्क्रोल’प्रमाणेच खूप मोठ्या प्रमाणात फीचर्स आणि रोचक व्हिडिओज प्रकाशित करतं का?

- नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, ‘सत्याग्रह’ची टीम स्क्रोलच्या तुलनेत लहान आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला मर्यादा आहेत.

प्रश्न - आज अनेक वृत्तपत्रं त्यांच्या वेबसाईट्‌स किंवा डिजिटल मजकुरासाठी पेवॉलच्या माध्यमातून शुल्क आकारत आहेत. पण स्क्रोलने अजूनही पेवॉलचा मार्ग निवडलेला नाही. त्याचं कारण काय? पेवॉलशिवाय स्क्रोल त्याचं आर्थिक गणित कसं जमवतं?

- प्रिंट माध्यमांचा महसूल आणि त्यांचा वाचकवर्ग उतरणीला लागलेला आहे अशा काळात आपण राहतो आहोत. ज्या गतीने डिजिटल माध्यमांची वाचकसंख्या वाढते आहे, त्या प्रमाणात महसूल वाढलेला नाही. स्क्रोलचं खात्रीशीर आर्थिक प्रारूप चालवण्यासाठी आम्ही बाकीच्या ऑनलाईन माध्यमांप्रमाणेच इतर अनेक गोष्टी करत आहोत. निरनिराळ्या लोकांसाठी हे निरनिराळ्या प्रकारे लागू पडतं. पश्चिमेकडील देशांमधील माध्यमांमध्ये प्रचलित असलेला एक प्रघात असा की, ती प्रकाशने ‘मर्यादित स्वरूपात पेवॉल’ वापरतात. म्हणजे वाचकांना पाच किंवा दहा लेख महिनाभरासाठी मोफत असतात आणि त्याहून अधिक लेख वाचायचे असतील, तर ते तुमच्याकडून शुल्क आकारतात. त्या प्रकाशनाकडून दिले जाणारे लेख नियमितपणे वाचणारा निष्ठावान वाचक मजकुराचे महत्त्व ओळखून त्यासाठी नक्कीच पैसे खर्च करेल, असा यामागचा युक्तिवाद असतो. ही एक पद्धत आम्ही अजमावू शकतो. पण तूर्त आम्ही वाचकांना ‘सबस्क्राईब’ करायला सांगतो आणि आमच्या भारतीय वाचकांना आमच्या ‘वार्तांकन निधी’साठी देणग्या देण्यासाठीची विनंती करतो. जाहिरातींतूनही काही महसूल आम्हाला मिळतो.

डिजिटल माध्यम वेगाने बदलत आहे आणि त्याबाबतची गृहीतकंदेखील. सहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा लोक म्हणत होते की, ऑनलाईन मजकुरासाठी भारतीय लोक पैसे मोजणार नाहीत. मात्र ही स्थिती आता झपाट्याने बदलते आहे. डिजिटल माध्यमातील कंटेंटसाठी काही प्रमाणात खर्च करण्याची सवय लोकांना होते आहे. तसेच आपल्याला हेही मान्य करावंच लागेल की, ऑनलाईन स्वरूपातले आर्थिक व्यवहार अजूनही तितकेसं सोपे नाहीत. या व्यवहारांसाठी तुमच्याकडे क्रेडिट/डेबिट कार्ड असावं लागतं, ओटीपी वगैरे कसा वापरावा हे माहीत असायला लागतं. अनेक वाचकांकरता ही पैसे देण्याची पद्धत फारशी सुलभ नाही. नोटाबंदीनंतरच्या काळात डिजिटल क्षेत्रातली आर्थिक व्यवहार यंत्रणा गोंधळलेली आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार उपलब्ध करून देणाऱ्या काही कंपन्यांनी ‘केवायसी’ (Know Your Customer)  ची विचारणा सुरू केली. महत्त्वाचा मुद्दा असा की, किरकोळ रक्कम ऑनलाईन स्वरूपात पाठवण्यासाठीचं तंत्रज्ञान अजूनही स्थिर आणि सुलभ नाही. भविष्यात ते स्थिर होईल, अशी आम्हाला आशा आहे. तुमच्या टॅक्सीचे किंवा खाद्य पदार्थांचे पैसे डिजिटल स्वरूपात देणं आता सुरू झालं आहे. अशा स्वरूपाच्या इकोसिस्टमची वाढ होण्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे करावेत याची लोकांना सवय होईल. तसेच जसजसा वापर वाढेल तसतशी त्यातली सहजताही वाढेल. ते स्क्रोलसारख्या वेब माध्यमांसाठीही उपकारक ठरेल.

प्रश्न - 2016 मध्ये स्क्रोलने वाचकांचा संपादक (Readers' Editor) नियुक्त केला होता. वाचकांचा संपादक असलेले ‘द हिंदू’ वगळता स्क्रोल हे एकमेव प्रकाशन होते. मात्र अशा प्रकारे वाचकांच्या संपादकाची नियुक्ती करण्याची पद्धत स्क्रोलकडून खंडित झाल्याचं दिसतं. त्यांची नियुक्ती स्क्रोलने का केली होती? आणि ते पुढे का सुरू राहिलं नाही?

- आमच्याकडे सी. राममनोहर रेड्डी आणि नंतर कल्पना शर्मा या दोघांनी वाचकांच्या संपादकाचे काम केले होते. मात्र आर्थिक मर्यादांमुळे आम्हाला वाचकांचा संपादक नेमण्याची पद्धत खंडित करावी लागली. पण पत्रकारितेतल्या चांगल्या पद्धती आणि आमचे वाचक यांच्याविषयीची आमची बांधिलकी आजही तितकीच कायम आहे. वाचकांचा संपादक प्रकाशनाचं मूल्य वाढवतो असंही आम्हाला वाटतं. मात्र आर्थिक अडचणी तीव्र झाल्या, तेव्हा आम्हाला वार्ताहर ठेवणे किंवा वाचकांचा संपादक ठेवणे यांच्यापैकी एकाची निवड करावी लागली. भविष्यकाळात जसा आमचा महसूल वाढेल, तेव्हा आम्ही नक्कीच वाचकांचा संपादक नियुक्त करू.

प्रश्न - स्क्रोलकडे पुस्तकांतले उतारे देणारा एक मोठा विभाग आहे, जिथे फिक्शन आणि नॉन-फिक्शन पुस्तकांतील काही भाग नियमितपणे दिला जातो. स्क्रोलच्या महत्त्वाच्या आकर्षणांपैकी हे एक आहे. तीन- चार पुस्तकांतले उतारे प्रत्येक दिवशी देणं सोपं नाही. स्क्रोलला हे कसं जमतं? आणि तुम्ही हे का करता?

- प्रकाशनात सुरुवातीच्या काळात काम करणाऱ्या लोकांच्या आवडी-निवडीमुळे प्रकाशन कशा तऱ्हेने विकसित व्हावं हे ठरत असतं.. स्क्रोलमधील आम्हा सर्वांना पुस्तकांची आवड होती आणि आमचं वेगवेगळ्या प्रकारचं वाचनही होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की, आपण स्क्रोलला एक असं पोर्टल बनवायला हवं की जिथं वाचक म्हणून आम्हाला वाचावेसे वाटेल असा कंटेंट मिळू शकेल. नव्या पुस्तकांतले उतारे नियमितपणे छापणे हा त्या प्रक्रियेचाच भाग होता. त्यामुळे आम्ही हे करायला सुरुवात केली. एकूण प्रकाशन व्यवसाय (विशेषतः नॉन-फिक्शन) हा आता खूपच व्यापक झालेला आहे. त्यामुळे आमचा 'book excerpt' विभाग वाचल्यास, गेल्या काही काळात कोणती चांगली पुस्तकं आलेली आहेत आणि ती आमच्या वाचकांना विकत घ्यायला आवडू शकतील याची माहिती त्यांना मिळते.

प्रश्न - म्हणजे स्क्रोलचा वाचक हीच या विभागामागची प्राथमिक प्रेरणा होती?

- स्क्रोलमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्यांच्या दृष्टिकोनातून या विभागाची रचना केली गेली होती. मात्र या विभागाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. तो विभाग खूप मोठ्या प्रमाणावर वाचला जातो. काही वेळेला विशिष्ट विषयावरील तीन-चार वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक असेल आणि तो विषय अचानकपणे आज महत्त्वाचा झालेला आहे तर अशा प्रसंगी हा विभाग- ज्यांना त्या विषयाबाबत अधिक जाणून घ्यायचं आहे, अशा अनेक वाचकांना उपयोगी ठरतो. त्या पुस्तकातले ते उतारे वाचून ते पुस्तक खरेदी करायचं की नाही, हे वाचक ठरवू शकतात. उदाहरणार्थ- गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिलीप डिसुझा हे 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान निष्कासित (detain) केल्या गेलेल्या, मात्र त्याआधीची अनेक वर्षे भारतातच राहणाऱ्या चिनी नागरिकांवर संशोधन करत आहेत, लिहीत आहेत. जेव्हा एनआरसीचा मुद्दा पुढे आला, तेव्हा या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात समयोचितता प्राप्त झाली.

प्रश्न - अनेक माध्यमसमूह त्यांच्या वार्तांकनाद्वारे आणि लेखांद्वारे धोरण व राजकारण यांच्यावर प्रभाव पाडू पाहतात. याबाबत स्क्रोलचा अनुभव काय आहे? किंवा अधिक ढोबळमानाने हा प्रश्न असा असू शकेल की, जशा प्रकारे टीव्ही किंवा प्रिंट माध्यमे सरकारी धोरण/राजकारण यांच्यावर प्रभाव टाकतात, तसा प्रभाव ऑनलाईन माध्यमे टाकू शकतात का?

- मला माझ्या कामाच्या सुरुवातीच्या काळातच याची जाणीव झाली की- पत्रकारितेतल्या इकोसिस्टमला असा विचार करायला आवडतं की, ‘आम्ही जग बदलतो आहोत’. पण खरं जग बदलतात ते तुमचे वाचक! तुमच्या वार्तांकनातून व लेखांतून तुम्ही जनमत तयार करता आणि सत्ताधीशांवर दबाव निर्माण करता. तुमच्या स्टोरीज वाचकांच्या मतांना आकार देतात आणि जर वाचकांना एखाद्या समस्येची तीव्रतेने जाणीव झाली, तर ते कदाचित तो प्रश्न उचलून धरू शकतात. अशा वेळेस ते प्रश्न विचारतात आणि उत्तरांची किंवा अधिक स्पष्टीकरणाची मागणी करतात.

मला ठामपणे असं वाटतं की, तुम्ही कोणत्याही माध्यमात काम करत असलात तरीही सत्तेतील व्यक्तींवर तुम्ही अंकुश ठेवू शकता. एक उदाहरण देतो : मालिनी सुब्रमण्यम या आमच्या वार्ताहर छत्तीसगडमधून वार्तांकन करत होत्या. सरकारला आणि काही लोकांना त्यांच्या स्टोरीज आवडल्या नाहीत. त्यामुळे जगदलपूरमधील त्यांच्या घरावर हल्ला केला गेला आणि त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेने आम्हाला याची तीव्रतेने जाणीव झाली की, तुम्ही कुठल्याही माध्यमासाठी लिहीत असा; तुम्ही तुमचं वार्तांकन जर योग्य रीतीने केलंत, तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात. पण त्यातून बदल घडतो का? मध्य भारत आणि त्या प्रदेशातील आदिवासींचे प्रश्न यांचं वार्तांकन स्क्रोल करत आलं आहे. पातालगडीची चळवळ आणि त्याची हाताळणी सरकार कशी करत होतं, याचं वार्तांकन माझ्या सहकारी सुप्रिया शर्मा करत होत्या. सरकारने दहा हजार लोकांवर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्या विषयीचीही एक स्टोरी त्यांनी केली होती. झारखंडमधील राजकीय नेते हेमंत सोरेन यांनी त्यांचा तो लेख रीटि्वट केला. त्यानंतर काही काळाने जेव्हा त्यांचा ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ हा पक्ष त्या राज्यातील सत्तेत आला, तेव्हा त्यांच्या पहिल्या काही निर्णयांपैकी एक निर्णय होता तो, ते राष्ट्राद्रोहाचे खटले मागे घेण्याचा. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर- हो! तुम्ही जर तुमचं काम पार पाडलंत, तर तुम्ही धोरण/राजकारण यांच्यावर प्रभाव पाडू शकता.

प्रश्न - स्क्रोलचा वाचकवर्ग मुख्यतः भारतातील आहे, की भारताबाहेरील लोकही स्क्रोल वाचतात?

- आमच्या वाचकांपैकी बहुतेक जण भारतीय आहेत, मात्र जवळपास 15 टक्के वाचक भारताबाहेरील आहेत. त्यातही मुळातून भारतीय असलेले व देशाबाहेर वसलेले किंवा भारतातील घडामोडींमध्ये रुची असणारे अभारतीय लोकही आहेत. आमचा वाचकवर्ग मुख्यत्वेकरून दक्षिण आशियात पसरलेला आहे. उदा- पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी देशांतील अनेक लोक स्क्रोल वाचतात. दक्षिण आशियातील ‘द डॉन’, ‘ढाका ट्रिब्युन’ इत्यादी माध्यमांसोबत आम्ही मजकुराची देवाण-घेवाणही करतो. परदेशातील काही वृत्तांकन केलंच, तर ते बऱ्याचदा या शेजारी देशांशी संबंधित असतं. आणि जेव्हा स्क्रोलची आर्थिक स्थिती आजच्यापेक्षा जास्त चांगली होती तेव्हा आमच्याकडे दक्षिण आशियातील वार्ताहर/ लेखक होते. त्या-त्या देशांमध्ये काय चाललं आहे त्याविषयी ते लिहीत असत. तसेच हे लेखन केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणाऱ्या त्या देशातील एखाद्या चित्रपटाविषयी, पुस्तकाविषयी, किंवा संगीताच्या कार्यक्रमाविषयीही ते लिहीत होते. मजकुराच्या दृष्टीने तो अतिशय संपन्न असा विभाग होता. मात्र आर्थिक मर्यादांमुळे आम्ही तो चालवू शकलो नाही. 

प्रश्न - आपण वाचकवर्गाविषयी बरंच तपशिलात बोललो. मला हे विचारायला आवडेल की, स्क्रोल नियमितपणे वाचणारे लोक किती आहेत, हे मोजण्याचा काही मार्ग आहे का?

- आम्ही गुगलचे analytics  वापरतो. स्क्रोलला किती लोक भेट देतात, त्यांची वारंवारीता (frequency), ते मुख्यतः कोणतं लेखन वाचतात- याविषयीची माहिती आम्हाला मिळते. प्रत्येक आठवड्यानुसार किंवा महिन्यानुसार अशी माहितीही आपल्याला मिळते. आमच्या वेबसाईटला किती युनिक व्हिजिटर्सनी भेट दिली याचीही माहिती आम्हाला मिळते. असे युनिक व्हिजिटर्स मोजणं ही तुमची व्याप्ती आणि वाचकवर्ग यांचं मापन करण्याची बऱ्यापैकी खात्रीशीर पद्धत आहे. त्या पद्धतीमध्ये वाचक मोजण्यासाठी त्यांची वारंवारीता हा घटक महत्त्वाचा नसतो. (उदा- एखादा वाचक महिन्यातून 15 वेळा स्क्रोलला भेट देत असेल तर ते 15 स्वतंत्र वाचक न धरता तो एकच वाचक धरला जातो!)

प्रश्न - आपण आम्हाला हे सांगू शकाल का की, किती वाचक मोबाईलवर स्क्रोल वाचतात आणि किती जण लॅपटॉपवर?

- आमचा 90 टक्के वाचकवर्ग मोबाईलवरच स्क्रोल वाचतो.

प्रश्न - भारतीय पत्रकारितेविषयी आपलं मत काय आहे?

- मला असं वाटतं की, सर्वसाधारणपणे बोलायचं झालं तर वळणाच्या टप्प्यावर उभे आहोत. आज पत्रकारिता जितकी पक्षपाती आहे तितकी पक्षपाती मी माझ्या कार्यकाळात कधीही पाहिलेली नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमे सरकारशी संधान बांधून विरोधकांना प्रश्न विचारत आहेत. पत्रकारितेच्या मूळ भूमिकेच्या विरुध्द जाणारे असे हे वर्तन आहे. भारतीय लोकशाहीसाठी हे केवळ गोंधळात पाडणारंच नाही, तर अतिशय घातकही आहे. तुम्ही अशी आशा बाळगू शकता की, सत्तेवर अंकुश ठेवणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे याची जाण पत्रकार ठेवतील.

प्रश्न - असं का घडत आहे?

- गेल्या काही काळामध्ये हे असं घडतं आहे. या माध्यमांपैकी काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित आहेत. हिंदुत्वाच्या प्रोजेक्टवर त्यांचा विश्वास आहे. आपण सत्तेच्या विरोधी भूमिका घेतली, तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील याची अनेकांना भीती वाटते. तर, काही एकेकटे पत्रकार कुठल्या तरी व्यक्तिगत लाभापोटी हे करत असतात.

प्रश्न - पण हे याआधीही घडत नव्हतं? नक्की काय बदललं आहे?

- आज जितक्या प्रच्छन्नपणे हे होत आहे तितके याआधी होत नसे. तरीही वेळोवेळी मला असे काही लोक भेटतात जे विचारतात- सध्याच्या काळातच माध्यमं सरकारवर का टीका करत आहेत आणि याआधी ती का करत नव्हती? अशा वेळेस मी त्यांना आठवण करून देतो की, यूपीएचं सरकार पडलं; कारण राडिया टेप, राष्ट्रकुल स्पर्धा, कोलगेट अशा भ्रष्टाचारांच्या घोटाळ्यांना याच माध्यमांनी उघडं पाडलं होतं.

प्रश्न - स्क्रोलला आणि स्क्रोलच्या पत्रकारांना उजव्या विचारांच्या लोकांकडून नियमितपणे ट्रोल केलं जातं. त्याचा सामना तुम्ही कसा करता? तुमच्यावर त्याचा काही परिणाम होतो का?

- खरंच नाही. आमच्यावर केली जाणारी बरीचशी टीका ही बोट्‌स (bots) मार्फत होते. बोट्‌स ही सोशल मीडियावरील बनावट अकाउंट असतात. ट्रोलिंगच्या उद्देशानेच ती तयार केलेली असतात. त्यामुळे प्रथमदर्शनी ही भरपूर प्रमाणात केली जाणारी टीका वाटते, पण खरं तर ती तितकी जास्त नाही.

प्रश्न - बातमीदारी करणारं डिजिटल माध्यम चालवताना तुम्हाला तुमच्या पूर्वानुभवाचा कसा उपयोग होतो? तुम्ही मुळात मुद्रित माध्यमांतील पत्रकार आहात आणि आता डिजिटल प्रकाशनाचं संपादन करत आहात. हे कसं जुळून येतं?

- खरं तर, स्क्रोलमध्ये काम करणारे आमच्यापैकी बहुसंख्य हे सुरुवातीच्या काळात प्रिंट माध्यमांतील पत्रकारच होते. मी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मधून माझ्या पत्रकारितेला सुरुवात केली. ‘टाइम आउट’ या मुंबईतील नियतकालिकात मी सांस्कृतिक आणि शहरविषयक कंटेंट संपादित करत होतो. त्या प्रकाशनातील माझा अनुभव आणि माझ्या अभिरुचीचे विषय मी स्क्रोलमध्ये आणले. मी याबाबतीत भाग्यवान आहे की, वैविध्यपूर्ण अभिरुची असणारी तरुण आणि उत्साही टीम माझ्या आसपास आहे. त्यामुळे सरतेशेवटी आम्ही या सगळ्याचं प्रतिबिंब असणारं प्रकाशन घेऊन वाचकांसमोर येतो.

प्रश्न - स्क्रोल हे दिल्लीस्थित माध्यम नाही. ऑनलाईन माध्यमांसाठी दिल्ली महत्त्वाची आहे?

- मी जगातल्या अशा मोजक्या भाग्यवंतांपैकी एक आहे, जे त्यांच्या कामाच्या ठिकाणी चालत जाऊ शकतात. मी वांद्य्राला राहतो आणि माझं ऑफिस तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. आम्ही दिल्लीत नसल्यामुळे जगाकडे पाहण्याचा ‘दिल्लीकेंद्री’ दृष्टिकोन आमच्यापाशी नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की, आम्ही जगाकडे ‘मुंबईकेंद्री’ दृष्टिकोनातून पाहतो. आमच्याकडे श्रीनगर, कोलकाता आणि गुवाहाटी अशा विविध शहरांत कार्यरत असलेले वार्ताहर आहेत. त्यामुळे आमची संपादकीय बैठक कॉन्फरन्स कॉलद्वारे होते. संपादकीय बैठकीत माझे सहकारी वेगवेगळ्या शहरांतून सहभागी होतात. आपापले दृष्टिकोन आम्ही एकमेकांशी शेअर करतो आणि जगाकडे पाहण्याची आमची दृष्टी निर्धारित करतो.

प्रश्न - ऑनलाईन माध्यमांची न्यूजरूम वृत्तपत्रांच्या न्यूजरूमपेक्षा वेगळी असते का?

- होय. दिल्लीसारख्या शहरांमध्ये आमची कार्यालयं असली, तरीही लोक बैठकीसाठी कार्यालयांमध्येच बसलेले असतात असं नाही. ते फोनवरून आमच्याशी संपर्क साधतात. आमची टीम लहान असण्यामुळे आमचे निर्णय फार चट्‌कन होतात. पण आमचा मुख्य भर फोनवरून वार्तांकन करणं असा नसतो तर प्रत्यक्ष बाहेर पडून वार्तांकन करण्यावर असतो, त्यामुळे उदाहरणार्थ- (जानेवारी 2020 मध्ये), जेएनयूवर हल्ला झाला, तेव्हा माझे तीन सहकारी आम्ही काही सांगण्याआधीच तिथे पोहोचले होते.

प्रश्न - स्क्रोलने पत्रकारांची निवड करताना पारंपरिक माध्यमांतील व्यक्तींनाच निवडलं, की केवळ डिजिटल माध्यमांना वाहिलेला नवा पत्रकारवर्ग तयार केला?

- ज्यांनी स्क्रोलमधूनच आपल्या कामाची सुरुवात केली असे काही लोक वगळता, इतर सर्व जण प्रिंट माध्यमांचीच पार्श्वभूमी असणारे होते. प्रत्येकाला यापूर्वीचा कामाचा काही अनुभव होता. स्क्रोलसारख्या लहान ऑनलाईन माध्यमासाठी हे आवश्यक असतं, कारण अनुभवी लोकांची तुम्हाला गरज असते. उत्तम स्टोरी वेगाने आणि काटेकोरपणाने निर्माण व्हावी, म्हणून हे आवश्यक असतं. अनुभवी व्यक्ती असण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे, ते काय करत आहेत हे त्यांना ठाऊक असतं.

प्रश्न - ऑनलाईन माध्यमांना वरिष्ठ आणि अधिक क्षमतेच्या पत्रकारांची आवश्यकता नसते; किंबहुना, नवे आणि कमी तयारीचे लोकच ऑनलाईन माध्यमांकरता अनुकूल असतात, अशी समजूत आहे. पण तुम्ही जे सांगत आहात, ते त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

- होय. ऑनलाईन माध्यमांसाठी तुम्हाला अधिक क्षमतेच्या लोकांची गरज आहे. काही प्रमाणात हे ‘न्यूजवॉर’साठी काम करण्यासारखं आहे. तिथे असणारे लोक आपल्या कामात तरबेज असतात आणि आपण कशाविषयी बोलत आहोत, हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.

प्रश्न - मग स्क्रोलमधून लोक वृत्तपत्रांकडे जाऊ शकतात?

- हो. का नाही? दोन्हींसाठी लागणारी कौशल्यं सारखीच आहेत. पण मला वाटतं, डिजिटल हे प्रिंट प्रकाशनांपेक्षा अधिक rewarding असे माध्यम आहे. बहुसंख्य प्रिंट माध्यमे लेखकाला लिहिण्यासाठी पुरेशी जागा देत नाहीत. ती अडचण डिजिटलला येत नाही. मात्र डिजिटलमध्ये अधिक तणावाचं वातावरण असतं, कारण तुम्हाला दिवसभर स्टोरीज मिळवत राहाव्या लागतात. डिजिटल तुम्हाला तुमच्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मुभा देतं, जे मुद्रित माध्यमांत एकदा कॉपी छापायला गेल्यानंतर शक्य नसतं.

प्रश्न - स्क्रोलच्या लेखांच्या विभागात नेहमीची, सर्वांना परिचित असलेली नावं फार कमी असतात. असं का? हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे?

- नाही, प्रस्थापित नावं नेहमी प्रिंट माध्यमांमध्ये लिहिणं पसंत करतात. मात्र आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट अशी की- रामचंद्र गुहा, मुकुल केशवन आणि इतरही काही सन्माननीय लेखकांचं लेखन आम्ही प्रसिध्द करतो.

प्रश्न - असाही एक समज आहे की, स्क्रोलमध्ये लेखन प्रसिद्ध होणं सोपं नाही, ते खरं आहे का?

- हो. काटेकोरपणा नसलेलं लिखाण आम्ही प्रकाशित करत नाही. आणि गुणवत्तेचे काही निकष आम्ही पाळतो. काही तरुण अभ्यासकही आमच्यासाठी लिहितात. पण मुख्यत्वेकरून आमचा भर लेखांपेक्षा रिपोर्ताज प्रसिध्द करण्यावर असतो.

प्रश्न - पण वृत्तांकन करणं तर अधिक खर्चाचं असतं?

- हो. पण आम्हाला अशी जाणीव झाली की, मतप्रतिपादन करणारं असं बरंचसं लेखन आसपास तरंगत असतं. मात्र अधिक विश्वासार्ह अशा वृत्तांकनाची अजूनही वानवा आहे. त्यामुळे आम्ही वृत्तांकनावर अधिक भर देतो. आमच्या वाचकांना ते ठाऊकच आहे.

प्रश्न - तुमच्या मते, पत्रकारांकरता आज सर्वांत मोठं आव्हान कोणतं?

- पत्रकाराचं काम संविधानातील मूल्यांचं रक्षण करणं हे आहे; सत्तेत असणाऱ्या सरकारची पाठराखण करणं नाही. पण ती कामगिरी बजावताना जाहिरातदार तुमच्यासोबत असायला हवेत की नकोत, हा प्रश्न उभा राहतो. मंदावलेली अर्थव्यवस्था जाहिरातींतल्या महसुलावरही परिणाम करते. ढासळता महसूल वृत्तमाध्यमांवर निर्बंध लादतो. कामामध्ये तुलनेने अधिक मोकळीक देणारा माध्यमसमूह सापडणं हे अनेक पत्रकारांसमोरचं आव्हान आहे; नाही तर अनेकदा वृत्तांकन करताना पत्रकारांना त्यांच्या मालकांच्या, व्यवस्थापनाच्या प्रतिक्रियांचा विचार करावा लागतो.

प्रश्न - भावी पत्रकाराकडे कोणती कौशल्यं असायला हवीत?

- अनेक गोष्टींविषयीची माहिती शोधून काढणं हे फारसं आव्हानात्मक राहिलेलं नाही. उदाहरणार्थ- सरकारी माहिती ऑनलाईन उपलब्ध असते आणि दूरवरच्या व्यक्तींशी संपर्क साधून त्याविषयी खात्री करून घेणंही अतिशय सोपं झालेलं आहे. मला वाटतं की, भावी पत्रकाराने जगाविषयी जिज्ञासू आणि स्वतःच्या गृहीतकांविषयी साशंक असायला हवं!

(अनुवाद :  सुहास पाटील)

मुलाखत व शब्दांकन : संकल्प गुर्जर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरेश फर्नांडिस

पत्रकार,  ‘स्क्रोल-डॉट-इन’ या संकेतस्थळाचे संपादक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके