या देशामध्ये लोकांना पंतप्रधानाविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, पण सरपंचाविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. जिथे तुमचे आणि इतरांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि ज्या विचारांचा हितसंबंधांवर परिणाम होतो ते बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. ज्याचा कोणत्याच हितसंबंधांवर कधीच परिणाम होण्याचा संभव नाही ते बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. ह्याला मी फॉर्मल डिमॉक्रसी म्हणतो; तीत लोकशाहीचा आत्मा नाही असे मी समजतो.
शास्त्रीय समाजवादाच्या मांडणीला स्थूलमानाने मार्क्सपासून प्रारंभ होतो असे मानले जाते. ज्यांनी शास्त्रीय समाजवादाची कल्पना एका विशिष्ट पद्धतीने मांडली त्यांना त्या पद्धतीने मांडण्याची गरज का भासली हा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण मानवजातीचा इतिहास पाहिला तर दोन प्रेरणांचा हा झगडा आहे हे दिसून येईल. त्यांतील पहिली प्रेरणा ही स्वतःच्या हितसंबंधांचे जतन करणारी व ते करीत असताना स्वतःच्या जपण्यायोग्य वाटणाऱ्या हितसंबंधांना एखाद्या व्यापक अशा तत्वज्ञानाचा आधार देण्याची आहे. आणि दुसरी म्हणजे माणूस हा स्वतःच्या स्वार्थाच्या कोशातून बाहेर पडून इतरांच्या हितास अग्रहक्क देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या स्वार्थाला मुरड घालून इतर सर्वांच्या कल्याणाचा तो विचार करतो. ह्या प्रवाहाची प्रेरणा आहे.
माणसाच्या स्वतःच्या स्वार्थाच्या कोशातून बाहेर पडण्याच्या ह्या धडपडीतून आपला सगळा नीतिविचार मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. स्वतःच्या स्वार्थाच्या बाहेर पडून इतरांच्या कल्याणाचा विचार करण्याची माणसाची ही प्रेरणा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाच्या संरक्षणाइतकीच बलवत्तर आहे. मानवी जीवनाबद्दलची ही जी नैतिक प्रेरणा आहे ती सगळ्या समाजवादाची कल्पना मांडण्याच्या बुडाशी आहे. समाजवादी मंडळी जरी अर्थव्यवस्थेच्या परिभाषेत बोलत असली तरी हा जो त्यांच्या बोलण्याचा भाग आहे, त्यामागे कुठेतरी नैतिक जाणिवा दडल्या आहेत. या नैतिक जाणिवांतून समाजवादाची कल्पना येते. ह्या कल्पनेच्या पाठीमागेही काही एक परंपरा आहे.
मार्क्सवाद्यांसमोरचा प्रश्न
सगळ्या मार्क्सवादाच्या मागे फ्रेंच राज्यक्रांती उभी आहे. ह्या फ्रेंच राज्यक्रांतीचा अप्रत्यक्षरीत्या मानवी जीवनावर जो परिणाम पडला त्याचा इतिहास जर आपण गृहित धरला नाही तर पुढचा समाजवाद आपल्याला मांडताच येणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ह्या तीन तत्त्वांचे आश्वासन फ्रेंच राज्यक्रांतीने फ्रान्सच्या जनतेला दिलेले आहे. हे आश्वासन केवळ एका राष्ट्रातील जनतेला मिळणे पुरेसे नाही तर हे आश्वासन सगळ्या मानवजातीला मिळायला पाहिजे. ह्या जगातल्या सर्व माणसांसाठी, सर्व मानवजातीसाठी समता देता आली पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांतीने जे आश्वासन दिले ते व्यवहारात येऊ शकले नाही; ते व्यवहारात कसे आणता येईल हा मार्क्सवाद्यांसमोरचा प्रश्न आहे.
नैतिक प्रतिष्ठान
ज्यांना आपण समाजरचना म्हणून संबोधतो त्या माणसांनी बनवलेल्या आहेत. म्हणून समाजरचनेत जर काही दोष असतील तर तेही नवनिर्मित आहेत. चांगली समाजरचना बनवता येईल ही खात्री जर आपण बाळगली नाही तर पुढचा समाजवादाचा विचार सुरू होऊ शकत नाही. अधिक चांगल्या समाजरचनेचे स्वप्न पाहणे हा माणसाचा अधिकार आहे. यातील 'अधिक चांगले' ही शब्दयोजना नैतिक मूल्यांची सूचक आहे. आज अस्तित्वात असलेल्या समाजरचनेपेक्षा आपल्या स्वप्नात असणारी 'समाजवादी समाजरचना' अधिक चांगली समाजरचना आहे आणि तिच्या पाठीमागे एक नैतिक प्रतिष्ठान आहे असा ह्याचा अर्थ आहे.
समाजवादाकडे पाहत असताना जनतेच्या प्राथमिक गरजांचे प्रश्न सोडवणारे एक तत्त्वज्ञान म्हणून त्याकडे पाहणे मूलतः चुकीचे आहे. सगळ्यांना अन्न कसे मिळेल, सगळ्यांना वस्त्र कसे मिळेल, निवारा कसा मिळेल अशा व्यावहारिक गरजांचा विचार करणारे तत्त्वज्ञान म्हणजे समाजवाद नव्हे, तर ते एक असे तत्त्वज्ञान आहे जे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेचे आश्वासन देणे हे आपले आद्यकर्तव्य समजत नाही तर अधिक नैतिक जीवनव्यवस्था निर्माण करणे हे आपले आद्यकर्तव्य समजते. ह्या पद्धतीने आपणास समाजवादाकडे जावे लागेल. समाजवादाचे मोठेपण सांगावयाचे झाल्यास आपणास ते नैतिक समाजरचनेच्या संदर्भातच सांगावे लागेल.
माणसाच्या कर्तृत्वावरील विश्वास
सगळ्या समाजवादाचा विचार माणसाच्या स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास निरपेक्षपणे व निर्विवादपणे स्थापन करण्याच्या भूमिकेतूनच झाला पाहिजे. समाजवाद हा नेहमी दैववादाच्या विरोधी उभा करणे भाग आहे. कारण समाजवाद माणसाच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या विश्वासातून निर्माण होतो. चांगली समाजरचना निर्माण करणे आपल्याला शक्य आहे. दैववाद चांगली समाजरचना निर्माण करू शकत नाही. समाजवादाची ही कल्पना समजून घेताना ती माणसाच्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्यातून निर्माण होते आणि सगळ्या दैववादाच्या विरोधातून निर्माण होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
बुद्धिप्रामाण्यवादाचा संदर्भ
ह्या ठिकाणी अजून एक घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. मी सगळ्या प्रश्नांचा बुद्धीच्या आधारे उलगडा करू शकतो. ही यूरोपमध्ये निर्माण झालेली विचारसरणी आहे. नवीन समाजरचना निर्दोष कशी करायची हे मी बुद्धीच्या आधारे सांगू शकतो. बुद्धिप्रामाण्यवादाचा संदर्भ सगळ्या समाजवादाच्या कल्पनेत गृहित धरला आहे. बुद्धिप्रामाण्यवादाचा हा संदर्भ गृहित धरला तर ही समाजरचना विज्ञाननिष्ठ असणे भाग आहे. विज्ञानाचा विकास होत आहे आणि विज्ञानाच्या ह्या विकासामुळे आपण अंधश्रद्धेच्या जगातून बाहेर पडत आहोत. विज्ञान हा अंधश्रद्धेच्या जगाबाहेर नेणारा एक महत्त्वाचा वाटाड्या आहे. म्हणून विज्ञान प्रमाण मानले पाहिजे. विज्ञानाच्या आधारे आपण मानवी जीवन अधिक सुखी करू शकू अशी ही भूमिका आहे.
एका बाजूस बुद्धिप्रामाण्यवाद व दुसऱ्या बाजूस विज्ञाननिष्ठा- ह्या दोन्ही बाजू एकत्र करण्याचा प्रयत्न करताना समाजवाद्यांची धडपड असते ती आपला विचार शास्त्रीय आहे हे सांगण्याची. आपला विचार नैतिक आहे हे सत्य सांगण्याऐवजी आपला विचार शास्त्रीय आहे असे ते सांगतात. पण सगळ्या समाजवाद्यांच्या मनामधील भूमिका, जीवनाचे आर्थिक प्रश्न सोडवणे ही नसून सगळ्या जीवनाची नैतिक पायावर फेरमांडणी करणे ही आहे.
गरजांच्या तडजोडीचा इतिहास
एंजल्सने एका ठिकाणी म्हणले आहे की मानवी इतिहासामध्ये आपणास ज्या समाजरचना पाहावयास मिळतात, ह्या सगळ्या समाजरचना गरजांशी तडजोड करून निर्माण झालेल्या आहेत. काही जणांची जगण्याची गरज व उरलेल्या सर्वांची आपल्या स्वार्थाचे संरक्षण करण्याची गरज -ह्या गरजांच्या तडजोडीतून निर्माण झालेल्या समाजरचनांनी सबंध मानवजातीचा इतिहास घडलेला आहे. हे जे गरजांचे जग आहे, ह्या गरजांच्या जगातून एक प्रचंड उड्डाण करून आपणास स्वातंत्र्याच्या जगात जावयाचे आहे.
सर्वांच्या स्वातंत्र्यावर आधारलेली, सर्वांच्या स्वातंत्र्याला वाव देणारी, सर्वांचे स्वातंत्र्य जतन करणारी अशी एक समाजरचना आपणास निर्माण करायची आहे. सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पनाच नैतिक आहे. तुम्हाला जर तुमच्या स्वार्थाचे उदात्तीकरण करता येत नसेल, स्वार्थाचे नियंत्रण करता येत नसेल किंवा स्वार्थाच्या कोशातून बाहेर पडता येत नसेल, तर सर्वांच्या स्वातंत्र्यावर आधारलेली समाजरचना कधीही अस्तित्वात येणार नाही. तेव्हा अथपासून इतिपर्यंत हा प्रश्न नैतिक पायावर नवी समाजरचना उभारण्याचा आहे.
आधीचे प्रयत्न
परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेची चौकट मान्य करून माणूस नैतिक करण्याचा प्रयत्न सर्व जुन्या विचारवंतांनी, संतानी केलेला आहे. कोणत्याही धर्मात परंपरेने अतिशय उदात्त असे विचार आलेले आहेत. सगळीच माणसे सुखी असावीत हा विचार काही मार्क्स पासून जन्माला येतो असे समजण्याचे कारण नाही. मार्क्सच्या कितीतरी आधी सर्व माणसे सुखी असावीत असा विचार सांगणारे संत झाले आहेत.
ज्ञानेश्वरासारखा माणूसही ह्या जगामध्ये सुखच सुख असावे, दुःखाचा लवलेशही असू नये असे म्हणतो. सगळ्यांची दुःखे दूर व्हावीत, सगळेच सुखी व्हावेत आणि समाधानी राहावेत असे विचार मांडलेले आहेत. त्याच्याही पूर्वीच्या काळी 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः' असे विचार मांडले गेलेत हा विचार नवा नाही, पण आहे ती राज्यव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था, आहे ती अर्थव्यवस्था, आहे ती परंपरेची चौकट मान्य करून माणूस नैतिक करण्याचा हा विचार आहे.
समाजवाद्यांची मान्यता
माणूस नैतिक व्हावयाचा असेल तर समाजाची अर्थव्यवस्थाच प्रथम बदलावी लागेल असा मुद्दा समाजवाद्यांनी उपस्थित केला, कारण समाजव्यवस्थेत अर्थव्यवस्था मूलभूत आहे. पण केवळ अर्थव्यवस्था बदलून भागणार नाही. अर्थव्यवस्थेबरोबर सगळी समाजरचनाही बदलावी लागेल. अर्थरचना बदलल्याशिवाय समाजरचना बदलता येणार नाही. म्हणून प्रथम अर्थरचना बदलावी लागेल. पण इतक्यावर थांबून चालणार नाही. मुळात माणसाचे मन बदलावे लागेल. माणसाच्या मनाची जडणघडण बदलावी लागेल.
ते बदलण्याचे कार्य अधिक अवघड व अधिक संथ गतीने होणार म्हणून ते उशिरा होणार. तुलनात्मकदृष्ट्या, त्या मानाने, वेगाने बदलणारी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्था ही आहे. अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय समाजरचना बदलता येत नाही आणि समाजरचना बदलल्याशिवाय माणुस व त्याचे मन बदलता येणार नाही. माणसाचे मन बदलल्याशिवाय स्वतंत्र माणूस बनवता येणार नाही. जर स्वतंत्र माणूस निर्माण केला नाही तर संपूर्ण मानवी जीवनाची व्यवस्थित नैतिक पुनर्स्थापना करता येणार नाही. म्हणून अर्थव्यवस्था आद्य आहे पण आद्य म्हणजे एकमेव बाब नव्हे.
समाजवाद्यांचा लाडका सिद्धांत
सगळे समाजवादी अर्थव्यवस्था आद्य आहे अशी घोषणा करीत असतात त्याचे महत्वाचे कारण हे आहे की त्यांच्या संपूर्ण विचारात अर्थव्यवस्था कधीच आद्य नसते. त्यांना जर तुम्ही सांगितले की तुमची जी चळवळ आहे ती मानवी जीवनाची नैतिक पुनर्स्थापना करण्याची चळवळ आहे; तर तो म्हणेल : माझ्यासमोर काही प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. म्हणून तुम्ही नैतिक प्रश्नांचे मुद्दे उपस्थित करू नका. हे जे मानवी मन आहे ते मानवी मन समाजरचनेतून जन्माला येते हा समाजवाद्यांचा लाडका सिद्धांत आहे. समाजरचनेची इमारत अर्थव्यवस्थेवर उभी आहे म्हणून अर्थव्यवस्थेचा प्रश्न मूलभूत आहे असे सगळेच समाजवादी सांगत असतात.
समाजवाद्यांना वाटणारी धास्ती
कुठल्याही समाजवाद्याला जर आपण विचारले की एका माणसाने दुसऱ्या माणसावर आक्रमण करून त्याला लुटायला तुझी हरकत काय आहे. तर तो म्हणेल : शोषण हा अन्याय आहे. शोषण हा अन्याय आहे हे मान्य करून त्याला विचारले की समाजामध्ये अन्याय अस्तित्वात असायला तुझी हरकत का आहे? तो म्हणेल : माझा अन्यायाला विरोध आहे; मी अन्याय कधीच सहन करीत नाही; मी न्यायाच्या बाजूने लढेन.
त्यावर त्याला आपण विचारले की जर तू न्यायाच्या बाजूने लढणार असशील तर तुझा लढा न्यायाच्या पुनर्स्थापनेचा लढा आहे; तुझा लढा मूलत: आर्थिक नाही तर नैतिक आहे हे कबूल करायला लाज का वाटते? आपला लढा नैतिक आहे असे म्हटले की आर्थिक प्रश्नांतून लक्ष उडते; समाजवाद्यांना ह्याची धास्ती वाटते. म्हणून समाजवाद ही कल्पना आर्थिक नसून नैतिक आहे हे आपणास मान्य करावे लागेल.
समाजवादाचा कार्यक्रम आणि ध्येय
अस्तित्वात असलेल्या समाजव्यवस्थेत काही नीतिमूल्ये रुजवून माणूस नैतिक करण्याचा जो प्रयत्न हजारो वर्षे धर्माच्या आधारे चाललेला आहे तो नाकारणारी ही चळवळ आहे. माणूस नैतिक करावयाचा तर सगळी समाजव्यवस्था बदलावी लागते. शेवटी माणूस नैतिक केला पाहिजे असे मानणारी ही नैतिक संकल्पना आहे. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था आणणे हा कार्यक्रमाचा भाग आहे तर माणूस नैतिक करणे हा ध्येयाचा भाग आहे.
स्वातंत्र्यावर आधारलेली समाजरचना
सगळ्या समाजवाद्यांनी सातत्याने स्वातंत्र्य ह्या संकल्पनेवर फार मोठा भर दिला आहे. समाजवाद ही कल्पना समजून घ्यावयाची असेल तर ह्या कल्पनेचे घटक समजून घेतले पाहिजेत. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण समाजव्यवस्था आणि जीवनव्यवस्था ह्यात काय बिघडलेले आहे ते जाणू शकतो. बुद्धीच्या जोरावर तो नवीन निर्दोष समाजरचना निर्माण करू शकतो. विज्ञान हे त्याला सहाय्यकारी होते म्हणून विज्ञानाची मदत घेऊन निर्दोष समाजरचना निर्माण करणे शक्य आहे.
हे शक्य आहे म्हणून त्याचे स्वप्न पाहण्याचा आम्हास अधिकार आहे. हा झाला एक भाग. तर दुसरा भाग म्हणजे संपूर्ण समाजरचना सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या स्वातंत्र्यावर आधारलेली अशी झाली पाहिजे. अन्याय्य आणि अनैतिक अर्थव्यवस्था बदलून तिच्या जागी आम्ही न्याय्य आणि नैतिक अर्थव्यवस्था निर्माण करू इच्छितो; अनैतिक समाजव्यवस्था बदलून नैतिक समाजव्यवस्था निर्माण करू इच्छितो. नैतिक समाजव्यवस्था व नैतिक अर्थव्यवस्था निर्माण करून नवा नीतिप्रधान माणूस तयार करू इच्छितो. नवा निर्भय आणि स्वतंत्र माणूस तयार करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आमचा सारा संघर्ष आहे.
वरिष्ठवर्गीयांचे स्वातंत्र्य
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या सरकारने जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले असे म्हटले की पुष्कळसे कम्युनिस्ट विचारतात की जनतेच्या स्वातंत्र्याचा संबंध कुठे येतो? जनता कधी स्वतंत्र नव्हतीच. मूठभर बुद्धिजीवी वर्ग व भांडवलदार ह्यांचे जनतेला लुटण्याचे स्वातंत्र्य बंद करणे ही आम्ही पुरोगामी गोष्ट मानतो. ते चूक आहेत का बरोबर आहेत हा मुद्दा या क्षणी मजसमोर नाही.
ज्या पद्धतीने ते विचार मांडतात ते लक्षात घेतले पाहिजे. समाजवाद्यांच्या विचार मांडण्याच्या पद्धतीत स्वातंत्र्य हा शब्द आला की कुणाचे स्वातंत्र्य, कशासाठी स्वातंत्र्य आणि किती जणांसाठी स्वातंत्र्य हे तीन प्रश्न उपस्थित होतात. मूठभर लोकांचे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे; दुसऱ्यांना लुटण्याचे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे, जनतेला उपाशी राहण्याचे स्वातंत्र्य नको आहे. अशा स्वातंत्र्याच्या कल्पनेला आमचा विरोध आहे. असे स्वातंत्र्य हे मूठभर वरिष्ठवर्गीयांचे स्वातंत्र्य आहे. आमचे स्वातंत्र्य सर्व लोकांचे, सर्व लोकांसाठी असलेले स्वातंत्र्य आहे.
निर्दय गुलामगिरीचे आरंभस्थान
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जी संसद भरली त्या संसदेने जे निरनिराळे कायदे केलेले आहेत, त्यापैकी आपल्या प्रजासत्ताकाच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशात मजूरांना संघटना निर्माण करता येणार नाही हा कायदा आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ह्या तत्त्वज्ञानावर आधारलेल्या क्रांतिकारी सरकारने आपल्या राजवटीत निर्माण केलेला हा कायदा आहे. हा दैवदुर्विलासच आहे. मिसा रद्द झालाच पाहिजे. ह्या भूमिकेवर निवडून आलेल्या सरकारच्या मंत्र्यांनी व्यापाऱ्यांनी योग्यप्रकारे आमच्या कार्यक्रमांना प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्याविरुद्ध आम्ही मिसा वापरू अशी घोषणा ताबडतोब करून टाकली, हाही दैवदुर्विलास आहे.
समता स्थापन करण्याची आमच्या प्रजासत्ताकाची भूमिका असल्यामुळे मूठभर लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या संघटना आमच्या प्रजासत्ताकात निर्माण करू देणार नाही. तुम्ही असे म्हणायला लागला की माझ्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या भावात घ्यावा ह्याचे स्वातंत्र्य मला आहे; कच्चा माल तयार करणाऱ्यांनी आपला कच्चा माल कोणत्या भावात विकावा ह्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. माझ्या कारखान्यांच्या मजुरांना किती मजूरी द्यावी ह्याचे स्वातंत्र्य मला आहे; ह्या मजुरीवर काम करावयाचे किंवा नाही ह्याचे स्वातंत्र्य मजूरांना आहे; तयार माल मी कोणत्या भावात विकावा ह्याचे स्वातंत्र्य मला आहे; ह्या भावात माल घ्यावयाचा किंवा नाही ह्याचे स्वातंत्र्य गिऱ्हाईकांना आहे. कारण सर्वांना स्वातंत्र्य आहे.
हे सर्वांचे स्वातंत्र्य जेव्हा ह्या पद्धतीने वापरले जायला लागते त्या वेळेला लोकांच्या निर्दय गुलामगिरीचे ते आरंभस्थान असू शकते. सरंजामशाहीपेक्षा भांडवलशाही अधिक क्रूर आहे हे मार्क्स स्वतःच सांगतो. मार्क्सवाद्यांना असे वाटते की निदान सरंजामशाहीमध्ये माणूस गुलाम असला तरी ह्या गुलामांना जिवंत ठेवण्याची जबाबदारी सरंजामदारांनी स्वीकारलेली असते. ह्या भांडवलशाहीमध्ये सर्वांना स्वतंत्र करण्याच्या उद्योगात कुणालाही जिवंत राखण्याची जबाबदारी भांडवलदारांनी स्वीकारलेली नाही. त्यामुळे त्यांनी केलेले मजूरांचे शोषण अधिक कठोर, अधिक निर्दय आणि अधिक निर्घृण झाले आहे.
वादाचा प्रश्न
ह्या सर्व भूमिकांच्यामध्ये एक नैतिक विचार आहे. अन्याय संपला पाहिजे. न्यायावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आली पाहिजे. माणूस स्वतंत्र झाला पाहिजे. एकटा-दुकटा माणूस नव्हे तर सगळेच जण स्वतंत्र झाले पाहिजेत. मार्क्सने एका ठिकाणी म्हटले आहे की, खरोखरी स्वातंत्र्याला कुणाचाच विरोध नसतो; सगळा वादाचा प्रश्न दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य करायचे किंवा नाही येथे येतो.
आपल्या स्वातंत्र्याला कुणाचाही विरोध नसतो. हुकुमशहालासुद्धा वाटेल ते करायला आपण स्वतंत्र आहोत असे वाटते. त्याचाही स्वतःच्या स्वातंत्र्याला विरोध नसतो; दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला मात्र जरूर असतो. दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य करावयाचे किंवा नाही हा प्रश्न ह्यासाठी निर्माण होतो की दुसऱ्याचे स्वातंत्र्य माझ्या स्वार्थाच्या आड येते. माझ्या स्वार्थाच्या आडवे येण्याचा दुसऱ्याचा हक्क मी कबूल करणे आणि तो कबूल करीत असताना स्वेच्छेनेच माझ्या स्वार्थावर मर्यादा घालण्याची नैतिक जबाबदारी मी स्वीकारणे ही गोष्ट गृहीत धरल्याशिवाय समाजवादाच्या कल्पनेचा विचार करता येणार नाही.
दोन पर्याय
ज्या काळात ही कल्पना मांडली गेली त्या काळाच्याही काही मर्यादा आहेत. ज्या काळात समाजवादाची कल्पना मांडली गेली त्या काळात प्रौढ मतदानावर आधारलेली लोकशाही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात अस्तित्वात नव्हती. इंग्लंडमध्ये प्रौढ मतदानावर आधारलेली निवडणूक 1926 मध्ये झाली. कारण 1926 साली स्त्रियांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्याच्यापूर्वी अर्धी लोकसंख्या मतदानास पात्र नव्हती. सर्व प्रौढ पुरुषांना मतदानाचा अधिकार 1896 नंतर मिळालेला आहे.
ज्या काळात शास्त्रीय समाजवादाची कल्पना मांडली गेली त्या काळात जनतेचे प्रश्न सोडवणारे सरकार अस्तित्वात नव्हते. सरकार जनतेच्या मतावर निवडून यावयाचे नव्हते. जर सत्तांतर मतदानाच्या मार्गाने घडणे अशक्य असेल तर सत्तांतर घडविण्यास रक्तमय क्रांतीशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहत नाही. सरकार हिंसेने बदलावे किंवा अहिंसेने बदलावे हा खरा प्रश्न नसतो. खरा प्रश्न असा आहे की सरकार जर लोकशाही मार्गाने बदलण्याची शक्यता संपली असेल तर पर्याय दोनच उरतात : आहे ते सरकार कायम ठेवणे किंवा ते उलथून पाडणे. ह्याशिवाय तिसरा पर्यायच शिल्लक राहत नाही. लोकांना लोकशाही मार्गाने जाऊ द्यावयाचे किंवा नाही ह्याचा निर्णय सत्ताच देत असते.
शास्त्रातीत कारणे
ह्या बाबतीत आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सभा घेणे, प्रचार करणे, लोकमत बनवणे व संघटना उभारण्यासाठी ग्रामीण भागात जाणे ह्या गोष्टी शक्यच नाहीत, कारण सरकार तुम्हाला यातील काहीही करू देणार नाही. म्हणून तुम्हाला कमीत कमी वेळात गरजेपुरते लोक संघटित करून सत्ता उलथून टाकली पाहिजे. त्यामुळे कामगार क्रांतीचा नेता असतो असे म्हटल्याशिवाय पर्यायच नसतो.
मार्क्सवादामध्ये जे अनेक मुद्दे शास्त्रीय पद्धतीने मांडलेले आहेत, त्या पाठीमागे शास्त्रातीत कारणे आहेत. तुम्ही शेतकरी संघटित करू शकत नाहीत. कारण तुमच्याजवळ इतके कार्यकर्तेच नाहीत. तेवढा वेळ नाही. शहरामध्ये तुम्हाला कामगारवर्गाशिवाय अन्य वर्ग संघटित करता येत नाही. कामगारवर्ग हा असा वर्ग आहे की जो क्रांतीचा अग्रदूत होतो, कारण त्याची भूमीबद्दलची बंधने तुटून गेलेली आहेत. तो आसोलेटिड (आयसोलेटेड) झालेला आहे. बंधनांशिवाय त्याच्याजवळ काही उरलेलेच नाही. पण मागायला मात्र जगाचे राज्य आहे!
संघटित करायला तुम्हाला कामगारांशिवाय दूसरे काहीच नाही. उरलेली माणसे तुम्ही संघटित करू शकत नाहीत. कामगारांच्या साह्याने रक्तमय क्रांती करायची असेल तर सत्तेवर आणलेले सरकार उलथून पडू नये म्हणून प्रोलेटेरिअट डिक्टेटरशिपशिवाय तुम्हाला अन्य पर्याय नाही. कामगारांना क्रांतीचे अग्रदूत ह्यासाठी मानावे लागते की तुमच्याजवळ अन्य कोणताच पर्याय नाही. कामगारांची संघटना निर्माण करून रक्तमय क्रांतीच्या मार्गाने यासाठी जावे लागते की शांततेचे रस्तेच मोकळे नाहीत. हे तत्त्वज्ञान मांडायचे असेल तर वर्गलढ्याचे तत्त्वज्ञान अधिक कठोर भाषेत तुम्हाला मांडावेच लागते. त्याशिवाय गत्यंतर नाही.
क्रांतीच्या अपयशाचे कारण
या सगळ्यांचा परिणाम असा होतो की संपूर्णपणे नैतिक पुनर्व्यवस्था करणारे जे तत्त्वज्ञान आहे ते नीतीचे विचार टाळून तुम्हाला मांडावे लागते. क्रांतीला येणाऱ्या अपयशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यांना ज्या नैतिक जीवनाची उभारणी करायची आहे त्या नैतिक जीवनाची संपूर्ण व्यवस्थाच त्यांनी आपल्या समर्थनातून वगळलेली आहे.
तुम्ही कार्यकर्त्यांना नीतीचे शिक्षण देणार नाही. संघटनेला नीतीचे शिक्षण देणार नाही. आंदोलनाला नीतीचे शिक्षण देणार नाही आणि तरीही नैतिक जीवनाची रचना करण्याचा प्रयत्न करणार! पण ह्याही उद्योगाला तुम्ही चिकाटीने चिकटून असलात तरी किमान यश येण्याची खात्री आहेच. म्हणून समाजवाद नावाची ही जी कल्पना आहे ती समजून घेताना आणखी एक-दोन बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत.
समाजवाद हे जीवनातील सर्व दुःखांवरचे उत्तर नाही. जीवनामध्ये समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था ह्यांनी जी सामाजिक दुःखे निर्माण केली आहेत त्या सामाजिक दुःखांपैकी जी दुःखे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेशी निगडित आहेत तेवढ्याचे उत्तर समाजवाद आहे. म्हणून समाजवाद हे उत्तर वैयक्तिक दुःखाचे नाही तर सामाजिक दुःखाचे आहे. ह्या दुःखाचे उत्तर दिल्यांशिवाय खरा निर्भय माणूस बनू शकत नाही, अशी समाजवाद्यांची भूमिका आहे. प्राथमिक गरजांच्या पूर्ततेची हमी दिल्याशिवाय निर्भय माणूस बनू शकत नाही.
आणि निर्भय माणूस झाल्याशिवाय तो स्वतंत्रही होऊ शकत नाही. सर्वच माणसांना स्वतंत्र करायचे असेल तर सर्व माणसांना निर्भय करावे लागेल. सर्वांना निर्भय बनवायचे असेल तर सर्वांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करावी लागेल. सर्वांच्या गरजांची पूर्तता समाजामध्ये करायची असेल तर समाजामध्ये स्वार्थाला वाव सापडेल अशी रचना अस्तित्वात नसली पाहिजे. जगण्यासाठी माणसाला अनैतिक होण्याची गरज पडू नये. सगळी समाजव्यवस्था नैतिक करणे हा ध्येयवाद आहे. बुद्धीच्या व विज्ञानाच्या आधारे हा ध्येयवाद मांडण्याचा व साकार करण्याचा समाजवादाचा प्रयत्न आहे.
व्यावहारिक अडचणी
जेथपर्यंत समाजवाद ह्या कल्पनेचा संबंध आहे तेथपर्यंत फारसा वाद निर्माण होत नाही. खरी अडचण येते ती ही कल्पना व्यवहारात आणताना. जनता पक्षाचे लोकसुद्धा या देशामध्ये आपण समाजवादी राजवट आणणार आहोत असे रोज सांगतात. काँग्रेस पक्षाचेही म्हणणे होते की आम्हाला समाजवादी राज्य निर्माण करायचे आहे. कम्युनिस्टांचेही म्हणणे आहे की आम्हाला समाजवादी राज्य निर्माण करायचे आहे.
देशाच्या राजकारणामध्ये दिसणारे चित्र पाहिले की समाजवाद नावाची कल्पना आपल्याला साकार करायची ह्यावर राजकीय पक्षांचे स्थूल मानाने एकमत झालेले आहे. असे असतानासुद्धा कुणीही व्यवहारामध्ये समाजवाद ही कल्पना अंमलात आणण्याच्या दृष्टीने फारशी वेगाने पाऊले उचलीत असताना दिसत नाही. ह्या कल्पनेवर सर्वांचा विश्वास असेल तर ती अंमलात आणण्यात अडचणी का येतात? असा प्रश्न निर्माण होतो. समाजवादी समाजरचना अस्तित्वात आणण्याच्या मार्गातील व्यावहारिक अडचणींचा आरंभ ह्या ठिकाणी होतो.
सगळे जण समतेचे पुरस्कर्ते आहेत, पण समतेचे हे पुरस्कर्ते ज्यामुळे समता येईल अशा कायद्यांना पाठिंबा देतीलच असे नाही. जे मोठ्या उत्साहाने पाठिंबा देतील ते त्यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करतीलच अशातला भाग नाही. तेव्हा समाजवादाची कल्पना सर्वांना मान्य असूनसुद्धा व्यवहारामध्ये ही कल्पना आणायला लागलो की नानाविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. ह्या अडचणीचे नेमके स्वरूप काय आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे. लोकशाही व समाजवाद ह्या दोन्ही मूल्यांवर श्रद्धा ठेवणारे व लोकशाहीच्या चौकटीत बसून समाजवाद आणता येईल अशी श्रद्धा बाळगणारे लोक आहेत. ह्यांच्याही काही अडचणी आहेत. लोकशाहीच्या मार्गाने जमले नाही तर हिंसेच्या मार्गाने समाजवाद आणू अशी ज्यांची प्रतिज्ञा आहे त्याच्याही काही अडचणी आहेत. दोघांच्याही अडचणींत मूलत: फार मोठा फरक नाही.
लोकशाहीतील विषमतेचे दर्शन
लोकशाहीत निवडणूक हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या निवडणुकीमुळे नानाविध प्रकारची गुंतागुंत लोकशाहीत निर्माण होते. धर्म, जाती व हितसंबंधांचे संरक्षण ह्या गोष्टी कुठल्याही निवडणूकीतील फार महत्त्वाचे घटक ठरतात. म्हणून निवडणुकीची प्रक्रिया आपल्या लोकशाहीतील विषमतेचे विदारक दर्शन घडविणारी आहे.
उदाहरण म्हणून बाबा आढाव यांची 'एक गाव:एक पाणवठा' मोहीम घेऊ. त्यांनी आपल्या 'एक गाव एक पाणवठा' ह्या पुस्तकात म्हटले आहे की, 'एका गावामध्ये राहणाऱ्या सर्व मंडळीना एका विहिरीवर पाणी भरता आले पाहिजे. इतकी साधी गोष्टसुद्धा महाराष्ट्रात अजून घडलेली नाही ही दुःखाची, लाजेची, शरमेची बाब आहे. त्यांचे प्रतिपादन चांगले आहे. तत्व व व्यवहार म्हणून मला मान्य आहे.
ह्या मोहिमेतील अडचण वेगळीच आहे. एका विहिरीवर पाणी भरणे हा खरा भांडणाचा मुद्दा नाही. विहिरीचे पाणी घराच्या आत आणावे लागते हा खरा भांडणाचा मुद्दा आहे. ज्याची आपल्या घरी अस्पृश्याच्या शेजारी बसून जेवण्याची तयारी आहे तोच माणूस एका विहिरीवर अस्पृश्यांसह पाणी भरू शकेल. उरलेल्यांनी बाटलेले पाणी आपल्या खाजगी घरात-देवघरात, स्वयंपाकघरात आणि ओसरीवर कसे वापरावे? ही खरी अडचण आहे. तेव्हा मनातील अस्पृश्यता दूर झाल्याशिवाय 'एक गाव एक पाणवठा' होणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
एका बाजूने तुम्ही दलित समाजाच्या मनामध्ये समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या आकांक्षा सारख्या प्रज्वलित करीत जाणार, कारण त्यांना तुम्ही समान नागरिकत्व दिलेले आहे. कायद्याची समानता तुम्ही त्यांना दिलेली आहे. ह्या सगळ्या मंडळींना, ते मागासलेले असल्यामुळे, विकासाला अग्रहक्क असला पाहिजे, हे तत्व तुम्ही स्वीकारलेले आहे. म्हणून तुम्ही त्यांना शिक्षणाच्या सवलती दिल्या, नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देत राहणार, हा समाज दरिद्री असल्यामुळे शिकण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या देत राहणार. ह्या सगळ्यांचा समुच्चयाने परिणाम त्यांच्या आकांक्षा जाग्या होण्यात होतो.
निवडून येण्याचे हत्यार
लोकशाहीमध्ये आपण प्रौढ आणि सार्वत्रिक मतदानाचे तत्त्व स्वीकारले. हे तत्त्व स्वीकारल्याबरोबर समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या कल्पना गतिमान व्हायला लागतात. लोकशाहीमध्ये निवडून येणारा जो माणूस आहे, ह्या माणसाला बहुमताची गरज असते. आपल्या पाठीमागे बहुमत उभे करण्याचा खात्रीलायक उपाय परंपरेने जे चालत आलेले आहे ते आपल्या पाठीशी घेणे हा आहे. समाजामध्ये चालू असणारा सगळा परंपरावाद निवडून येण्याचे हत्यार म्हणून वापरण्याची प्रक्रिया प्रौढ मतदानावर आधारलेल्या लोकशाहीतच सुरू आहे.
एका बाजूने लोकशाहीमध्ये समाजात मूके असलेल्या घटकांचा मूकेपणा दूर करून त्यांना बोलके करण्याची, स्वातंत्र्य वाढवण्याची, न्यायाची आणि हक्कांची आकांक्षा वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या बाजूने परंपरेने चालत आलेले गट अधिक बळकट करून आपल्या हातात धरण्याची प्रक्रिया सुरू असते. लोकशाहीमध्ये एकाच वेळी दोन्ही प्रक्रिया चालू होत असल्याने लोकशाहीमधील राजकारण समाजपरिवर्तनाच्या बाबतीत फारशी मोठी गती घेण्यास निरुपयोगी ठरते. त्यामुळे विषम समाजरचनेकडून समतेवर आधारलेल्या समाजरचनेकडे जाण्याचा मार्ग अधिक कठीण किंबहुना अशक्य होऊन जातो.
मते मिळवण्याचा हुकुमी मार्ग
लोकशाहीतून समाजवादाकडे जात असताना समाजपरिवर्तनातील ही अडचण आहे. आणि आर्थिक परिवर्तनातील अडचण ही समाज परिवर्तनाच्या अडचणीचा एक भाग आहे. तुम्ही आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ परंपरावाद वापरता आहात, कारण सगळा परंपरावाद तुमच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठीच निर्माण झालेला आहे. धर्मपरंपरा असोत वा समाजरचनेच्या परंपरा असोत, कोणत्याही क्षेत्रातला सगळा परंपरावाद वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठीच असतो.
म्हणून वरिष्ठ वर्ग आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी परंपरावाद सारखा वापरीत असतो. निवडून येण्यासाठी आपल्याजवळ जास्तीत जास्त मते गोळा करण्याचा हा अत्यंत हुकुमी मार्ग आहे. यावेळी आम्ही असे सांगतो की जोपर्यंत मुस्लिम समाज सांगणार नाही तोपर्यंत त्यांच्या वैयक्तिक कायद्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, त्यावेळी आम्हाला असे म्हणायचे असते की मुस्लिम समाजाच्या सगळ्या परंपरावादाच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. मात्र या परंपरांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी त्यांची एकगठ्ठा मते आम्हाला मिळतील ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
...तर परिवर्तन कठीण
लोकशाहीमधील ही निवडणूक प्रक्रिया एका बाजूने फार मोठ्या प्रमाणात आकांक्षा वाढवीत नेते आणि दुसऱ्या बाजूने नकळत समाजातला परंपरावाद बळकट करीत असते. त्यामुळे समाज परिवर्तनाचे व आर्थिक परिवर्तनाचे कार्य अधिक कठीण होऊन जाते. हे सर्व लक्षात घेतल्यानंतर लोकशाहीच्या चौकटीत बसून समाजवाद आणायचा कसा, हा अडचणीचा मुद्दा उपस्थित होतो.
जर मुस्लिम समाजाच्या एकूण जीवनव्यवस्थेमध्ये काही बदल करायचा नसेल, हिंदू समाजाच्या परंपरागत रचनेत काही बदल करायचा नसेल, अस्पृश्यांचे प्रश्न सोडवण्याचे दृष्टीने काही फार मोठी पाऊले उचलायची नसतील, शहर आणि खेडे ह्यांच्यातील अंतर फारसे कमी करायचे नसेल, ज्यांच्या हातात नोकऱ्या आहेत त्यांच्याच हातामध्ये नोकऱ्या राहतील ह्याची काळजी आपल्याला घ्यायची असेल, ज्यांच्या हातात सत्तेच्या नाड्या आहेत, त्यांच्याच हातात त्या चालू राहतील ह्याची खबरदारी आपल्याला घ्यायची असेल, आणि हेच जर परंपरावादाचे जतन करण्याचे कार्य निवडणूका जिंकण्याचे हुकुमी हत्यार ठरणार असेल तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन कठीण होत जाणार.
समन्वयाचे राजकारण
पण सत्याचा एवढाच जर अंश असता तर मग लोकशाहीने समाजपरिवर्तन होणे अशक्य आहे असा निर्णय घेऊन आपण थांबू शकलो असतो. दोन प्रेरणा परस्परांच्या विरोधी आहेत. एका बाजूने कोट्यवधी लोकांच्या आकांक्षा जागृत होत असतात.
त्यांच्यामध्ये वैफल्य निर्माण होऊ नये, अतिरेकी प्रवृत्ती बलवान होऊ नये म्हणून ह्या सर्व सामाजिक विषमतेच्या बळी झालेल्या दलितांच्या जाग्या झालेल्या प्रेरणांचे जतन करणे, समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या दुबळे असणारे जे घटक आहेत त्यांच्या जाग्या झालेल्या आकांक्षांची पूर्ती करणे- ही दडपणे येत असतात. ही दडपणे सांभाळणे आणि परंपरावादही सांभाळणे- असा दोन्हींचा समन्वय घालण्याचे राजकारण राजकारणी नेते खेळत असतात. लोकशाहीची सगळी प्रक्रिया समाज परिवर्तनाच्या दृष्टीने प्रवाहित होत असते ही लोकशाहीबद्दलची अडचण आहे.
जीवनाचा नियम
दुसऱ्या बाजूने आपण हकूमशाहीचा विचार करू लागतो. ज्या मंडळीना क्रांती करायची नाही, त्यांना हुकुमशाही अत्यंत आवडत असते. हा जीवनाचा नियम आहे. ज्या मंडळींना कोणत्याही मूल्यांची काहीही किंमत मोजायची नाही ती मंडळी अतिरेकाची अत्यंत चांगली समर्थक असतात. ज्या मंडळींनी काही तरी अस्तित्वात आणण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला आणि आयुष्यभर त्यांना अपयशच आले ती माणसे आयुष्यात कधी निराश झालेली आढळत नाहीत. म.गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जयप्रकाशांसारखी माणसे निराश झालेली, हताश आणि विफल झालेली आढळत नाहीत.
खरे म्हणजे त्यांना विफल होण्याचा अधिकार आहे. ज्या मंडळींनी काहीही करण्यासाठी कधीही आपले आयुष्य पणाला लावले नाही अशी माणसे तरुण वयापासून हताश, विफल आणि निराश झालेली दिसतात. ज्या मंडळींना निराश होण्याचा अधिकार नाही ती माणसे अत्यंत निराश आणि नैराश्याचे बोलके प्रतिनिधी होतात आणि ज्यांना निराश होण्याचा पूर्ण अधिकार आहे, ती माणसे कधीच निराश झालेली दिसत नाहीत.
काहीही कारण नसताना निराश होणाऱ्यांची संख्या भरपूर असते. ही माणसे अत्यंत अतिरेकी असतात. तुमच्या लोकशाहीने कुठलेच प्रश्न सुटणार नाहीत. देशाचे प्रश्न सोडवण्यास तुमची लोकशाही निरुपयोगी आहे. प्रश्न सोडवायचे असतील तर हुकुमशाहीची आवश्यकता आहे असे हे लोक सांगत असतात. क्रांतीशिवाय रस्ता नाही ह्यावर प्रचंड विश्वास असणारी बहुसंख्य मंडळी क्रांतीसाठी काहीही करावयास तयार नसतात. हुकुमशाहीने क्रांती करायची असली तरी क्रांती करणाऱ्यांच्या पाठीशी खांद्यांवर बंदुका घेतलेल्या काही लाख माणसांची शक्ती उभी असावी लागते. त्याशिवाय तुम्हाला हुकुमशाहीसुद्धा आणता येत नाही. हुकुमशहाची आज्ञा तंतोतंत पाळणारे लोक नसतील तर हुकुमशाहीही टिकविताही येत नाही. हुकुमशाहीलासुद्धा निष्ठावंतांचे संघटन लागते.
खरा प्रश्न
एखाद्या ध्येयासाठी मरायला व मारायला तयार होणारा निष्ठावंत असा अनुयायांचा पाच-पन्नास लाखांचा गट उभा करणे हे ज्या नेत्याच्या ताकदीत आहे, त्याला निवडणुका जिंकणे अशक्य नसते. ज्या माणसाला ह्या देशामध्ये सशस्त्र क्रांती यशस्वी रीतीने करण्याइतके जनतेचे पाठबळ मिळेल त्या माणसाला लोकशाही पद्धतीने निवडणुका जिंकण्याइतकेसुद्धा पाठबळ मिळेल.
अडचणी वेगळ्या नाहीत. लोकशाहीच्या मार्गाने जायचे असे म्हटले की पाठीशी मत गोळा करण्यासाठी परंपरावाद सांभाळावा लागतो आणि रक्तमय क्रांतीसाठी अनुयायी गोळा करायचे असे म्हटले तरी जे गोळा होणारे ग्रामीण भागातील अनुयायी आहेत त्यांचा परंपरावाद जतन करण्याची हमी घ्यावी लागते. तरच ते तुमच्याबरोबर येतात. सशस्त्र क्रांती शहरात बसून करता येत नसते. सशस्त्र क्रांती जर करायची असेल तर ग्रामीण भागात तुम्हाला प्रचंड पाठिंबा असावा लागतो. कारण शहरे फार झपाट्याने घेरता येतात. आमच्या राजकीय आंदोलनाच्या जागृतीचा आरंभ मुंबई शहरापासून कलकत्ता शहरापर्यंत होतो, पण बेचाळीसच्या चळवळीत प्रचंड आंदोलने सातारासारख्या जिल्ह्यात होत असत.
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी डोंगर आणि जंगले भरपूर आहेत त्या ठिकाणी सशस्त्र क्रांतीचा पाया तयार होत असतो. म्हणून हा देशात क्रांती करू इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी ग्रामीण भागात पाठिंबा देणाऱ्या निष्ठावंतांचे दल तयार करणे ही अडचण लोकशाहीत निष्ठावंत समाजपरिवर्तनवादी तयार करण्याच्या अडचणीपेक्षाही अधिक गंभीर आहे. हुकुमशाही असो की लोकशाही असो, खरा प्रश्न आहे समाज परिवर्तनावर श्रद्धा असणारे निदान काही लाख माणसांचे प्रामाणिक मन कसे तयार करता येईल, नव्या मूल्यांविषयी आस्था असणारे मत कसे तयार करता येईल ह्याचा नेमका प्रश्न आहे.
मन ताब्यात ठेवण्याचे शिक्षण
आपल्या राजकीय आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांना स्वतःला शिस्त लावण्याची सोयच आम्ही शिल्लक ठेवली नाही. म. गांधींच्या आंदोलनामधला महत्त्वाचा भाग असा आहे की आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्याला स्वतःला शिस्त लावायला गांधीजी भाग पाडीत असत. सर्व चळवळीतून गांधीजींनी मन ताब्यात ठेवण्याचे शिक्षण देण्याची काळजी घेतली. तेवढी काळजी घेऊनसुद्धा फारसा उपयोग झाला नाही. असे आपले राजकारण आहे. पण पुढच्या काळात राजकीय कार्यकर्त्याला स्वतःला शिस्त लावायची काळजी घ्यावी लागते ही जाणीवच सोडून देऊन आम्ही रस्त्यावर बसलो. आपल्या जीवनाला नैतिक वळण देण्याची गरज वाटत नाही.
अशा कार्यकर्त्यांना हाताशी धरून आम्ही संपूर्ण मानवी जीवनाची नैतिक पायावर फेरउभारणी करू पाहतो आहोत. अशा अवस्थेमधला कार्यकर्ता सत्तेचा वापर स्वतःच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी जर करू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात. माझ्या हातात दुसऱ्याचे कल्याण करण्याचे आलेले सामर्थ्य दुसऱ्याचे कल्याण करीत माझेही कल्याण करण्यासाठी वापरायचे किंवा नाही हा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःच्या जीवनाला नैतिक वळण देण्याची प्रक्रिया जर राजकारणाच्या संपूर्ण व्यवहारातून साधली जाणार नसेल तर तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने गेला काय किंवा हुकुमशाहीच्या मार्गाने गेला काय, तुमच्याजवळ समाजपरिवर्तनाला वचनबद्ध असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे दलच असणार नाही आणि असे दल नसताना तुम्ही समाजपरिवर्तन करू शकणार नाही.
समाजवादाचा विचार करताना काही बाबींच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलेले आहे. माणसाला काही मन असते हे आम्ही मानायलाच तयार नाही. हे जे माणसाचे मन आहे ते माणसाचे मन मोठ्या प्रमाणामध्ये प्राणिसृष्टीतून माणूस बनत असताना वारसाहक्काने आलेले मन आहे हेही मानायला आम्ही तयार नाही. माणसाचे मन अगदीच जनावरासारखे आहे असे नाही. पण त्याचबरोबर हे माणसाचे मन प्राणिसृष्टीतून चालत आलेल्या वारसाहक्कातून प्राप्त झालेले आहे. ह्या मनाचा विचार केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.
ज्या माणसाची समाजवादाच्या ध्येयावर संपूर्ण श्रद्धा आहे आणि ज्याच्या मनामध्ये समाजवादाविषयीची श्रद्धा तंतोतंत भिनलेली आहे. असा माणूस फारसा पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. तो दारिद्र्य स्वीकारील. दारिद्र्य स्वीकारण्यात तो धन्यता मानील. असा निष्ठावंत कार्यकर्तासुद्धा वेळप्रसंगी विकारवश होऊ शकतो. त्याचेही मन मानवी असून क्रांती झाल्याच्या दिवशी ते एकाएकी बदलेल असे नाही. म्हणून क्रांतीच्या ध्येयवादाने प्रेरित झालेला निष्ठावंत कार्यकर्ता सत्ताप्राप्तीसाठी तडजोड करणारच नाही असे सांगता येत नाही. म्हणून मानवी मनातील प्रेरणांनी कार्यक्रमांवर मात करू नये ह्याची काळजी फक्त लोकशाहीतच घेता येत असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
हा तर प्रच्छन्न दैववादच
लोकशाहीवरची श्रद्धा जेव्हा ढासळते आणि हुकुमशाहीशिवाय प्रश्न सुटणार नाही असे जेव्हा वाटते त्या वेळी चांगल्या कल्याणकारी हुकूमशहाची वाट पाहणारे लोक वेगळ्या भाषेत दैववाद सांगत असतात. जे जे काही बिघडलेले आहे त्याविरुद्ध उभा राहून मी झगडेन असे म्हणणाऱ्या माणसाला लोकशाहीवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. माझी मते मी सर्वांना पटवून देईन आणि त्यांच्या संमतीने अंमलात आणीन असे म्हणणाऱ्या माणसाला लोकशाहीशिवाय अन्य पर्याय नसतो. लोकांना पटवीत वगैरे बसणार नाही तर त्यांना ठोकून काढून माझी मते मी त्यांना पटवून देईन अशी ज्याची प्रतिज्ञा असते तो माणसाचे मन स्वतंत्र करण्याच्या रस्त्याने निघालेला नसतो.
ज्या काळी दुसरे पर्यायच शिल्लक नव्हते त्याकाळी रक्तमय क्रांतीची घोषणा क्षम्य होती, पण आज दुसरे पर्याय असताना जो माणूस आपली मते दुसऱ्यांवर लादण्याची भाषा बोलतो, तो माणूस अन्य माणसांना स्वतंत्र करावयास निघालेला नसतो. हुकुमशाहीच्या विचारामध्ये माणसाला स्वतंत्र करण्याचे सूत्र नाही, एक प्रच्छन्न दैववाद मात्र आहे. जनतेची संमती नसतानाही तिच्यावर राज्य करण्याची अनैतिक प्रवृत्ती ह्या विचारात आहे. ही प्रवृत्ती 'अनैतिक' ह्यासाठी म्हटली आहे की ती माणसाला अधिक अध:पतित, अधिक भीतिग्रस्त आणि अधिक दुबळी बनविणारी आहे; ती माणसाला निर्भय आणि स्वतंत्र करणारी नाही.
फॉर्मल डेमॉक्रसी
ताया शिंकिन ह्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पं. नेहरू म्हणाले होते, "ह्या देशातील सर्व दारिद्र्यांनासुद्धा आपली मते व्यक्त करण्यासाठी आम्ही निर्भय केले आहे." नेहरूंचे म्हणणे बरोबर होते. या देशामध्ये लोकांना पंतप्रधानाविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, पण सरपंचाविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. जिथे तुमचे आणि इतरांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि ज्या विचारांचा हितसंबंधांवर परिणाम होतो ते बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. ज्याचा कोणत्याच हितसंबंधांवर कधीच परिणाम होण्याचा संभव नाही ते बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. ह्याला भी फॉर्मल डिमॉक्रसी म्हणतो; तीत लोकशाहीचा आत्मा नाही असे मी समजतो.
केरळमधला नागबा शेतकरी, 'पंतप्रधान मूर्ख आहेत' असे म्हणू शकतो हे खरे आहे, पण त्याच्या ह्या म्हणण्याची पंतप्रधानाला मधून मधून भीती वाटली पाहिजे हा डेमॉक्रॅटिक स्पिरिटचा अर्थ आहे. सत्तेवर असणाऱ्यांना निर्भय राहण्याचे स्वातंत्र्य निवडणूकीच्या प्रक्रियेने मिळालेले आहे. ही एक अडचण आहे. मानवी मनामध्ये असणाऱ्या नानाविध प्रवृत्तींचा माणसाच्या कार्यावर होणारा परिणाम आणि माणसाच्या मनामध्ये सुरक्षिततेसाठी, स्वातंत्र्यासाठी तडजोड करण्याची असणारी जबरदस्त प्रवृत्ती ह्यांचा फारसा गंभीरपणे विचार केला जात नाही. कारण तोंडाने आम्ही समाजवादी अर्थरचनेच्या गोष्टी बोलत असतो, पण व्यवहारात आमचा समाजवादी अर्थरचनेवर विश्वासच नाही.
अंकुश ठेवणारी रचना
हा माणसाच्या मनाचा प्रश्न आहे. नेत्यांच्या मनात असणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवणारी जी एकमेव रचना असते ती म्हणजे लोकशाही. लोक काय म्हणतील ह्याची सारखी धास्ती असणे चांगले. म्हणून लोकशाहीने परिवर्तन करण्याचा आपण विचार करून सत्ताधाऱ्यांनी ते अशक्य केले तर काय करावयाचे हा वेगळा मुद्दा आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने परिवर्तन करणाऱ्याचा तुम्ही प्रयत्न केला तर परिवर्तनाला तयार असणारे निष्ठावंत मन तयार न करता परिवर्तन लादावे लागेल. लादलेले परिवर्तन घर, कपडे इ. देऊ शकेल. पण नवा निर्भय आणि मुक्त असा माणूस तयार करू शकणार नाही. इथे अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. अनेक प्रकारच्या अडचणी आहेत.
अडचणीचे मुद्दे
पहिली अडचण आहे ती सर्वांगीण नियोजनाची. तुम्ही सर्वांगीण नियोजन करावयाचे असे ठरवले तर सर्वांगीण नियोजन करण्याच्या प्रयत्नामध्ये व्यक्तीचे स्वातंत्र्य शिल्लक राहू शकेल काय हा अडचणीचा मुद्दा आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य शिल्लक राहील ह्याची तुम्हाला काळजी घ्यावयाची असेल तर सर्वांगीण नियंत्रण करता येईल काय? हा दुसरा अडचणीचा मुद्दा आहे.
आपल्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये हितसंबंध गुंतलेले असतात. समाजात बेकरी कमी होते का वाढते ह्याचा विचार आपण करत नाही. ग्रामीण भागातील शेतमजूरांच्या बेकारीचा विचार आम्ही करीत नाही. कारण ती शिक्षणाने वाढलेली नाही. शिक्षणाने सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे. ती कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी एक तर शिक्षणच बंद केले पाहिजे किंवा ते उत्पादन व्यवस्थेशी जोडले पाहिजे. त्यासाठी आपणास जीवनाचे संपूर्ण नियोजन करावे लागेल आणि ते सर्व सत्तेच्या आधारे करावे लागेल. म्हणजेच समाजपरिवर्तनाचे कार्यक्रम हाती घेण्यासाठी संपूर्ण नियंत्रण, संपूर्ण नियोजन आणि सर्वंकष सत्ता ह्या गोष्टी पूर्व-अट म्हणून राहतील. समाजवादापुढची ही खरी समस्या आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ
सातत्याने स्वातंत्र्याला वाव देणाऱ्या व्यवस्थेमध्ये सर्वांगीण नियोजन नसताना सर्वांच्या प्राथमिक गरजांच्या हमीची पूर्तता आपण कशी देऊ शकू ही दूसरी समस्या आहे. कारण आपण सगळ्या चमत्कारिक कल्पना घेतलेल्या आहेत. समाजवाद्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे यंत्रे वाढविणारा दृष्टिकोन अशी काही तरी संगती आपण लावलेली दिसते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा यंत्रे वाढविणारा नसतो, आणि कमी करणाराही नसतो. विज्ञानाने निसर्गाविषयीचे जे ज्ञान उपलब्ध करून दिलेले आहे ते ज्ञान माणसांच्या गरजांना सुसंगत कसे करता येईल ह्याचा विचार करणारा दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
एखाद्या देशात मोठ्या प्रमाणात माणसे असतील आणि त्या मानाने जमीन कमी असेल तर माणसे बेकार न करता उत्पादन कसे वाढवता येईल ह्याचा विचार करणे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन असू शकतो. कोट्यवधी माणसे बेकार कशी करता येतील? उत्पादन वाढविणारी सर्व यंत्रे विज्ञानाच्या संशोधनातून येतात. हे वैज्ञानिक संशोधन असेल पण त्यास जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणता येणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन एकूण उपलब्ध असणारी साधनसामग्री, एकूण उपलब्ध असणारी माणसे आणि त्यांच्या गरजा ह्यांचा समन्वय कसा साधता येईल याचा विचार करणारा असला पाहिजे.
हिंदुस्थानसारख्या देशामध्ये तुमची कितीही वैज्ञानिक प्रगती झाली, कितीही औद्योगिकरण झाले तरी ह्यापुढची कैक शतके 70 टक्के लोकसंख्या शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायावरच जगणार आहे. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून ह्या देशामध्ये कोणतेच समाजपरिवर्तन आणता येणार नाही. ग्रामीण भागात रोजगारी वाढवण्याचा मार्ग, शहरामध्ये असणारे औद्योगीकरण हा नव्हे. ह्या देशामध्ये हा मार्ग लोकांना रोजगार देण्याचा मार्ग नाही. विचार न करता केल्या जाणाऱ्या सर्व साचेबंद प्रक्रिया ह्या वैज्ञानिक समाजवादाच्या प्रक्रिया आहेत. त्या माणसाला निर्भय करणाऱ्या प्रक्रिया आहेत किंवा त्यांच्या गरजांच्या पूर्ततेची हमी देणाऱ्या प्रक्रिया आहेत असे मानता येणे फार कठीण आहे.
भांडवलशाहीचे नवे स्वरूप
नव्या जगामध्ये नवे नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातला एक प्रश्न भांडवलशाहीने घेतलेले नवे रूप हा आहे. जुन्या काळामधला भांडवलदार, आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल ह्या एकाच प्रश्नाचा विचार करीत असे. नव्या काळामधला भांडवलदारही ह्याच पद्धतीने विचार करीत. मग बदल कुठे झालेला आहे? जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी उपाय कोणते वापरावे लागतील ह्याविषयी जुन्या काळामधला भांडवलदार जो विचार करीत असे आणि नव्या काळातला भांडवलदार जो विचार करीत आहे त्या विचारांत बदल झालेला आहे.
औद्योगीकरण हाती घेतले असता जनतेची क्रयशक्ती जर क्रमाने घसरायला लागली तर संपूर्ण भांडवलशाहीचे अस्तिल धोक्यात येईल. म्हणून नव्या काळातला भांडवलदार समाजाची क्रयशक्ती घसरू देत नाही तर ती टिकवून धरण्यासाठी आणि वाढविण्यासाठी उपाययोजना करतो. ह्या भांडवलदारांनी ताब्यात ठेवलेले जे सरकार आहे ते सुद्धा ह्याच प्रकारची उपाययोजना करते. किमान वेतन कायदा हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. भांडवलशाही टिकायची असेल तर मजुरांची क्रयशक्ती वाढली पाहिजे आणि ती वाढायची असेल तर मजुरांचे जीवनमान वाढले पाहिजे. अशा रीतीने संघटित मजूरवर्गाचे जीवनमान सतत उंचावत नेण्याचा प्रयत्न आधुनिक भांडवलशाही व सरकार करीत असतात. जनतेची क्रयशक्ती घसरू नये ह्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सरकार सातत्याने अशा कामात पैसा खर्च करीत असते की ज्या कामातून विकाऊ माल तयार होत नाही.
त्यामुळे एका बाजूला संघटित मजूरवर्गाची स्थिती सुधारत जाते, परंतु असंघटित मजूर, शेतमजूर ह्यांची आर्थिक स्थिती मात्र खालावत जाते. संघटित मजूरवर्गाचे जीवनमान फार उंच आहे, असे मी म्हणत नाही. आमच्याकडची पुरोगामी मंडळी कशाचा काय अर्थ करतील ह्याचा नेम नाही. भारतासारख्या अविकसित देशात असंघटित मजूरवर्गाला रोजगार कसा पुरवता येईल व त्यांचे जीवनमान निदान संघटित मजूरवर्गाच्या पातळीवर कसे आणता येईल ही समाजवादापुढील एक महत्वाची बिकट समस्या आहे.
आजची मोठी गरज
समाजवादापुढील काही प्रमुख समस्यांचा विचार आपण केला. त्याचबरोबर समाजवादाची कल्पना केवळ आर्थिक नसून ती मूलतः नैतिक कशी आहे ह्याचाही आपण विचार केला. समाजवादापुढील समस्यांतून मार्ग काढणे हा त्यामुळेच जसा आर्थिक प्रश्न आहे त्याचप्रमाणे नैतिक मूल्यांवर आधारलेल्या नवसमाजाची रचना कशी करता येईल, असाही तो प्रश्न आहे. आणि त्यासाठी सातत्याने व चिकाटीने समाजप्रबोधनाचे व समाजपरिवर्तनाचे कार्य करणाऱ्या निष्ठावंत सामाजिक कार्यकर्त्यांची कधी नव्हे इतकी आज फार मोठी गरज आहे.
(वाई येथे प्रा. अ. के. भागवत यांच्या निवृत्तीनिमित्त झालेल्या व्याख्यानमालेतील व्याख्यानाचा लेखकाने संमत केलेला गोषवारा.)
Tags: सरंजामशाही फ्रेंच राज्यक्रांती कार्ल मार्क्स महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थव्यवस्था हुकूमशाही लोकशाही Feudalismसमाजवाद French Revolution Karl Marx Mahatma Gandhi Pandit Nehru Dr. Babasaheb Ambedkar Economy Dictatorship Democracy Socialism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या