डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'पोरांची परीक्षा चालू आहे, म्हणून त्यांना आणलं नाही'
'तुमचे कसं काय चाललंय?'
'ठीके'
'पगार किती मिळतो?'
'तेरा हजारापेक्षा जास्त.. '

एका लग्नातील प्रसंग. लग्नानंतर मेजवानीच्या प्रसंगी शेजारी बसलेले तरुण व वृद्ध गृहस्थ यांच्यातील संवाद, मेजवानीचा आस्वाद घेत ऐकत होतो. वृद्धाचे केस पिकलेले डोक्यावर पागोटे, नेहरू शर्ट, धोतर परिधान केलेले. तरुण पॅट-शर्ट व फ्रेंचकट दाढी या वेषात. त्यांच्यातील संवादावरून ते मामा-भाचे आहेत हे लक्षात आले. वृद्ध मामा व तरुण भाचा खूप वर्षातून भेटल्याचे जाणवत होते. तसेच भाच्याचे आई-वडील म्हणजे मामाची सख्खी बहीण व मेहुणे वारले आहेत हेही लक्षात आले. त्यांच्यातील महत्त्वाचा पण मला खटलेला व लेख लिहावयास भाग पाडणारा संवाद पुढीलप्रमाणे... 

'लग्नाला कोण कोण आलाय?'
'एकटाच'.
'बायकू पोर्रऽ?'

'पोरांची परीक्षा चालू आहे, म्हणून त्यांना आणलं नाही'
'तुमचे कसं काय चाललंय?'
'ठीके'
'पगार किती मिळतो?'
'तेरा हजारापेक्षा जास्त.. '

आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पगार आहे, हे ऐकताच मामा म्हणाले 'हितका?'
घास घेत भाचा म्हणाला, 'हो.'
जरा थांबून मामांनी विचारले 'काय धा-पाच मिळत्यात का? ' 
'मामा, धा-पाच मी घेत नाही.' भाचा स्वाभिमानाने म्हणाला.
'च्...च्'. मामा उद्गारले.
भाचा बाणेदारपणे म्हणाला, 'मामा नाव जाईल असं अजूनतरी काही केलं नाही आणि करणारही नाही. जमलं तर नाव कमवीन.'
'पा, धा-पाचाची जग-व्हाट हाय ना?' मामा. 
'मामा, कायदा तोडून व स्वाभिमान सोडून वागणं याला मी जगरहाटी म्हणत नाही. आणि जगरहाटी असली तरी मी स्वाभिमान गहाण टाकणार नाही. पगार बऱ्यापैकी मिळतो त्यात भागवतो आणि पगार कमी असता तरी 'धा-पाच' मिळवले नसते. कष्ट करूनच जगलो असतो. कष्ट करणारा उपाशी मरत नाही.'

भाच्याचे बाणेदार उत्तर ऐकून त्याला कडकडून मिठी मारावी असे वाटले. एका अडाणी, खेड्यात राहणाऱ्या मामाने पुण्यात काम करणाऱ्या सुशिक्षित भाच्याला 'धा-पाच रुपयाची लाच घ्यायची 'जगरहाटी' शिकवणे मला खटकले.

चौकशीअंती कळले की मामाच्या दोन मुलांपैकी एक वकील व दुसरा पोलीस आहे. वकील व हा बाणेदार भाचा एकत्रच शिकलेले. भाचा सरळमार्गी, स्वाभिमानी, कायदा मानणारा आणि मामा मात्र वकील व पोलिसाकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचं शिष्टाचारात रूपांतर करणारे. कायदा, सुव्यवस्था राबवून आदर्श समाज निर्मितीस हातभार लावण्याऐवजी पगाराव्यतिरिक्त 'धा-पाच' मिळवून दोन पैसे शिल्लक टाकायचे याची रसभरीत चर्चा मामा व त्यांची दोन मुलं यांच्यात होत असेलच. पण शासकीय क्षेत्रातील अपवाद असलेला भाचा समाज निकोप व आदर्श विचाराने चालून बलवान व्हावा अशा विचाराने वागतो. भ्रष्टाचाराचा तिरस्कार करतो. नाव जाईल असं न वागता, नाव कमाविण्याची भाषा वापरतो. म्हणजे वयाने लहान भाचा नैतिकदृष्ट्या वरचढ व आदर्श वाटतो, तर वयाने मोठे, मामा देशद्रोही वाटतात.

Tags: देशद्रोही आदर्श नैतिक शिष्टाचार भ्रष्टाचार traitor ideal moral etiquette corruption weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके