डिजिटल अर्काईव्ह

नकोसा स्पर्श नकोच : आपलीशी वाटणारी पुस्तिका

वैचारिक भूमिकांचं नातं रोजच्या जगण्याच्या चळवळीशी जोडून काम करणाऱ्या लेखिका कार्यकर्त्या दिवंगत कमला भसीन यांच्या ‘काश किसने मुझे बताया होता’ या पुस्तिकेचं ‘नकोसा स्पर्श नकोच’ ही अत्यंत साध्या, सोप्या-सरळ भाषेतली पुस्तिका ‘मुक्ता प्रकाशन’ने नुकतीच प्रकाशित केली. कवयित्री सारिका उबाळे यांनी हे भाषांतर केलंय. लिंगभाव, पितृसत्ता व लैंगिक शोषण या विरोधात कायम सक्रिय काम करणाऱ्या कमला भसीन यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबतचे अनेक प्रश्न यात उभे केले आहेत, उद्‌धृत केले आहेत. आजच्या अरिष्टाच्या परिस्थितीत लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर असताना अल्प किमतीत उपलब्ध असलेली ही पुस्तिका शिक्षक, विद्यार्थी, पालक व कार्यकर्ते यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तिकेची व एकंदरच लैंगिक शोषणाच्या विषयासंदर्भातील काही निरीक्षणे.

भर उन्हाळ्याची टळटळीत दुपार. जुन्या शहरातल्या मध्यवर्ती भागात दोन सिमेंटच्या भिंतींमधून जाणारा चिंचोळा रस्ता... आत गेलो तर विस्तीर्ण वस्ती. गरिबांची, कष्टकऱ्यांची, सर्व जातिधर्मांच्या समाजाची ही मिश्र वस्ती. अनेक संस्कृती एकत्र नांदताना पाहण्याचा अनुभव वेगळा होता. एका अशासकीय संस्थेच्या वतीने आयोजित एनजीओच्या कार्यक्रमासाठी येथे आलेली. समोर खूप सारी चिलीपिली पोरं. नेहरू जयंतीचा कार्यक्रम घ्यावयाचा होता. सगळे औपचारिक सोपस्कार पार पडले. मी संस्थेच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की, आम्हांला एकांतात बोलायचंय मुलांशी. ते दूर गेले. सारी मुलं 4 ते 16 वर्षे वयोगटातील. मागच्या बाजूला वस्तीतली टगी पोरं, काय चाललंय पहायला आलेली. ती ही 16 ते 20 या वयोगटातली. आम्ही एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. हळूहळू मी माझ्या मनातल्या विषयांकडे वळले. एका मुलीला व मुलाला जवळ बोलावलं, त्यांना दोघांनाही जवळ घेतलं, विचारलं- ‘काय वाटतंय तुम्हांला माझ्या सोबत जवळ असताना?’ मुलं सुरुवातीला बिचकली, मग म्हणाली, ‘मॅडम, छान वाटतयं.’ मुलगी म्हणाली, ‘आईजवळ असल्यासारखं वाटतंय...’ मुलगा हळूच म्हणाला, ‘मॅडम, माझी मुंबईची मावशी तुमच्यासारखी दिसती. ती माझा खूप लाड करती.’

मग हळूहळू सगळीच मुलं जवळ आली, घेरून बसली... मी हळूच विषयाला हात घातला.  ‘असं होतं का की तुम्हांला काही लोकांनी जवळ घेतलेलं, स्पर्श केलेलं आवडत नाही, राग येतो, रडायला येतं, संताप येतो...’ आणि मुलं धडाधडा बोलायला लागली. मुलांचे अनुभव थरारक होते. वस्तीतल्या बाहेरच्या पोरांनी येता-जाता मागून चिमटे घेण्यापासून, समोरून हात लावल्यापासून ते बलात्कार करण्याच्या प्रयत्नांपर्यंत फारच मुलं-मुली सांगू लागली. घरातले नातेवाईक, बाहेरचे शेजारचे, गर्दीत असताना कार्यक्रम करत असताना, एकटं असताना- कधीही कुठलाही प्रसंग अपवाद नव्हता. मुलं बोलताना घाबरत होती, मुली तर अपराधी भावनेनं सांगत होत्या. मध्येच डोळ्यांत पाणी, रडू, तर कधी संताप, क्रोध... संमिश्र भावनांचा दबलेला उद्रेक होता. त्यांच्याशी जे होत होतं ते नक्की काय हे त्यांना कळत नव्हतं, याला लैंगिक शोषण म्हणतात, हे तर मुळीच माहीत नव्हतं. परंतु हा घाणेरड्या, किळसवाण्या, नकोशा स्पर्शाचा ‘पाशवी खेळ’ होत होता. रोज ही लहान मुलं-मुली सहन करीत होती. मनात भावना दाबून ठेवीत होती... आज कदाचित पहिल्यांदा व्यक्त होत होती.

आम्ही दोन तास बोललो. खूप... ‘काही घरच्यांना, आई-वडिलांना सांगू शकत नाही. कारण एक तर ते लक्ष देत नाहीत किंवा आम्हीच चुकीच वागतो, असं त्यांना वाटतं. आपल्याकडूनच काही चुकतंय ही भावना तर खूप तीव्र होती.’ दोन-तीन मुलींवर बलात्काराचा प्रयत्नही झाला होता, भर दुपारी वस्तीतली मोठी माणसं कामावर असताना. थोडक्यात वाचल्या होत्या आणि हे करणारी मुलं वस्तीबाहेरची होती. चुकीच्या जागी स्पर्श करणं, दाबणं, शरीरावर शरीर घासणं, येता-जाता नको तिथे नेमका स्पर्श करणं, लगट करणं, धमक्या देऊन अंगावर पडून स्वत:ला ‘मोकळं’ करून घेणं. असे अनेक अनुभव मुलं सांगत होती. मला जे बोलायचं होतं त्याला वाट मोकळी झाली होती. मी त्यांना नकोसा व वाईट स्पर्श व चांगला स्पर्श यांतला फरक समजावला. अर्थात बऱ्याच जणांना अनुभव होता; पण काही मुलं अद्याप या अनुभवातून गेली नव्हती. त्यांच्याशी गप्पा मारल्या. असं घडल्यावर कोणाला सांगावं व सांगू नये याबद्दल बोललो. शेवटी निघताना एकच सांगितलं, ‘असं काही घडलं तर ओरडा.’ त्यांना ओरडायला, व्यक्त व्हायला शिकवलं. ‘कसं ओरडाल?’ असं विचारलं तर मुलांनी ओरडून दाखवलं. व्यक्त होणं, सांगणं, हा अनुभव जवळच्या खात्रीच्या माणसाशी शेअर करणं हा पहिला धडा मुलं शिकली. ओरडायला शिकली. हा अनुभव 15 वर्षांपूर्वीचा.

त्यानंतर मधल्या काळात यांसारखे अनेक विषय खाजगीत व कधी कार्यक्रमात हाताळले. कालच सोशल मीडियावरचा एका व्हिडिओ कार्यक्रमात एका उच्चभ्रू घरातल्या मुलीची कैफियत ऐकली. ती सांगत होती, ‘माझ्यावर ओळखीच्या म्हाताऱ्या आजोबापासून लग्नात नातेवाईक व वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत सख्ख्या मामाने लैंगिक अत्याचार केले.’ ही सारी माणसं आजही रोजरोज तिच्या घरी येतात. मामा तर अश्लील बोलतोही कुणी नसताना... आई आणि बहिणीला सांगितलं तर त्यांनी गप्प बसायला लावलं.

कमला भसीन यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘काश किसने मुझे बताया होता’ या पुस्तिकेत स्वतःचे, मैत्रिणींचे अनुभव लिहिलेले. यांचा अनुवाद ‘नकोसा स्पर्श नकोच’ या पुस्तिकेत आहे. वर दिलेल्या दोन्ही घरांमध्ये वयापैकी वर्षाचे अंतर आहे. पण प्रश्नांची तीव्रता तीच आहे. फरक इतकाच आहे, ती मुलगी कॅमेऱ्यासमोर धाडधाड बोलते पण मध्येच रडतेही, मध्येच अस्वस्थ होते, नंतर म्हणते की, ‘आपण दुसऱ्या विषयावर बोलू या का?’

या पुस्तिकेत कथनरूपाने मुलींवर कोण, कोठे, कुठच्या स्वरूपांचे लैंगिक शोषण करतात, यांचे अनुभव आहेत. आता या काळात मुलांच्या बाबतीही असं घडतं.

कमला भसीन यांनी नमूद केलं की लैंगिक शोषण करणारे कुंटुबातील जवळची माणसं, नातेवाईक, भाऊ, समारंभात-कार्यक्रमात जमणारे सगेसोयरे, शाळेमध्ये शिक्षक, विकृत खाजगी शिकवण्या घेणारे, वाहन चालक, शाळेच्या दारावर असणारे वॉचमन, शेजारील वृद्ध माणसं, घरी येणारे बहीण-भावांच्या मित्रमैत्रिणी, दूरचे नातेवाईक, काही वेळी घरातले सख्खे नातेवाईक ही सगळीच माणसं- याबद्दल लिहिलं आहे. ही माणसं रोजच्या रोज सहवासात येणारी आहेत. कुटुंबातील सदस्यांना वाटतं की, ही माणसं ‘सुरक्षित व विश्वासार्ह’ आहेत. आणि नेमकी हीच माणसं लहान मुलामुलींच्या अशक्त वयाचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करताना दिसतात. याबाबत मुलं ना आरडाआरोडा करू शकत ना कोणाला काही सांगू शकत. या लैंगिक शोषणाच्या घटनांचे संपूर्ण वर्णन कमला भसीन यांनी या पुस्तिकेत केले आहे. या वयोगटातील बहुतांश सर्वच मुलामुलींना या प्रकारच्या अनुभवांना कधी न कधी सामोरे जावे लागतेच, अगदी अतिसुरक्षित वाटणाऱ्या कुटुंबातही. केवळ या प्रकारांची वाच्यता होत नाही, यावर बोललं जात नाही म्हणून हे समोर येत नाही. परंतु या प्रकारच्या लैंगिक शोषणाचे दूरगामी परिणाम मुलांच्या भावी आयुष्यावर वैवाहिक आयुष्य तसेच, स्त्री-पुरुष नातेसंबंधावर कायमस्वरूपी होतात. याचे मूळ लहान वयातील शोषणात असू शकते, याचा विचारही कोणी करू शकत नाहीत.

मुलं या विषयाबाबत बोलत नाहीत, याला अनेक कारणे आहेत. एक तर जेव्हा धैर्य करून हे सांगण्याचा प्रयत्न मुलं करतात, तेव्हा ती लहान आहेत म्हणून त्यांच्याकडे पालक किंवा मोठी माणसं दुर्लक्ष करतात. तर कधी ही माणसं जवळच्या नात्यातली असल्यामुळे याबाबत जाणीवपूर्वक गुप्तता पाळली जाते. अनेकदा मुलांना आपल्याबरोबर काय होतंय हे समजत नाही, त्यामुळे ती भांबावतात, गोंधळतात व या गोष्टी सहन करीत राहतात. खूपदा मुलांना असंही वाटतं की आपल्याशी जे होतं त्याबद्दल आपण बोललो तर आपल्याला दोषी ठरवलं जाईल. म्हणून व भीतीपोटी या गोष्टी मुलं बोलत नाहीत. यामध्ये सगळ्यात धोक्याची व चिंतेची ही बाब आहे की, शोषण करणारी माणसं जवळची आप्तस्वकीय व पुन:पुन्हा संपर्कात येणारी असतात व या गोष्टी जाहीर होत नाहीत. म्हणून सातत्याने ही दुष्कृत्यं करण्यास त्यांना संपूर्ण मोकळीक व वाव मिळत राहतो. मुलं यापासून दूर जाण्याचा व वळण्याचा प्रयत्न करतात; परंतु ती तसं का करतात हे समजावून न घेतल्याने मुलांची कुचंबणा होते व ती रोज नव्याने वाढत जाते.

खरं तर या विषयावर सातत्याने उघडपणे बोललं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. काही व्यवहार्य बाबींकडे पालकांनी, शिक्षकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आपलं मूल एखाद्या व्यक्तीला, शिक्षकाला, नातेवाइकाला घाबरतंय का? काही विशिष्ट लोकाच्या जवळ जायला तयार नाही, शाळेत जायला अकारण नकार देतंय काय? मुलं अचानक गप्प, शांत, अबोल, चिडचिडे होतात का? अशा प्रकारच्या मुलांच्या वर्तवणुकीवर थोडं लक्ष ठेवलं तर त्याच्या मुळाशी जाता येऊ शकतं, अनेक अनर्थ यामुळे टळू शकतात. मुलं शरीराने-मनाने सक्षम, स्वावलंबी व स्वसंरक्षण करण्यास तयार होईपर्यंत ही काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांना या गोष्टी व्यवस्थित समजवता याव्यात, त्यांना मोकळपणाने याबाबत बोलता यावं, आधार वाटावा, संरक्षण मिळावं; यासाठी काही उपायांबाबत पुस्तिकेत चर्चा केलेली आहे. उदा., मुलांना स्वत:च्या शरीराची ओळख करून देणे, खाजगी भागांची ओळख करून देणे, चांगले व वाईट स्पर्श यांचे ज्ञान देणे, आपल्या घरी येणाऱ्या परिसरातल्या तसेच, शाळेतील व्यक्तींची माहिती ठेवणं, त्यांच्या संपर्कात राहणं, मुलांबरोबर याविषयी विचारणा करणं अशा अनेक स्तरांवर हे उपाय करता येऊ शकतील.

‘नकोसा स्पर्श नकोच’ ही पुस्तिका अधिकाधिक मुले, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवता आली तर याचे गटागटात वाचन, चर्चा, खाजगी स्वरूपांची प्रश्नोत्तरे, पालकांचे प्रबोधन या पद्धतीने मार्ग शोधता येतील. पुस्तिकेची किंमत अल्प असून यामध्ये अनेक चित्रे आहेत. त्यामुळे मुलांना ही पुस्तिका आपलीशी वाटेल असा आमचा विश्वास आहे.

चला तर, साखळी पद्धतीने या कामाला लागू या व पुन्हा आव्हानात्मक काळात आपल्या तरुण पिढीला आतापासूनच सक्षम, स्वावलंबी व स्वरसंरक्षणासाठी मानसिक व शारिरिकरीत्या तयार करण्यासाठी मोट बांधू या.

‘नकोसा’ स्पर्श नकोच
मूळ लेखिका : कमला भसीन,
अनुवाद : सारिका उबाळे
मुक्ता प्रकाशन, यशोदानगर चौक, अमरावती
मोबाईल : 9422170623,
मूल्य : 50/- रु.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी