डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘निवडक मराठी व्यंगचित्रं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी व्यंगचित्रांचा संग्रह नाही. मात्र व्यंगचित्रकारांनी स्वत:ची व्यंगचित्रं स्वत:च निवडली असल्यानं हा मराठी व्यंगचित्रकलेचा ऐतिहासिक दस्तऐवज मानायला हवा, त्या दृष्टीनं हे पुस्तक अपूर्व आहे. प्रशांत कुलकर्णी यांच्या संशोधन वृत्तीला आणि मेहनतीला उत्तम कल्पकतेची जोड मिळाल्यानं हे पुस्तक देखणं आणि संग्राह्य बनून गेलं आहे.

‘निवडक मराठी व्यंगचित्रं’ नावाचं एक अनोखं पुस्तक मराठी साहित्यविश्वात येऊन दाखल झालं आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्तानं मराठी व्यंगचित्रं आणि मराठी व्यंगचित्रकार यांवर एक चांगली चर्चा सुरू झाली आहे.

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना विजय तेंडुलकरांनी मराठी व्यंगचित्रकारांच्या व्यंगावर बोट ठेवलं. ‘‘आर. के. लक्ष्मण, शंकर यांसारख्या परभाषिक व्यंगचित्रकारांनी स्वतःची रेषा शोधली. मराठी व्यंगचित्रकार यात उणे पडले. ते स्वतःची शैली निर्माण करू शकले नाहीत. व्यंगचित्रात चित्र हा शब्द महत्त्वाचा आहे. मराठी व्यंगचित्रकारांमध्ये याचं भान दिसत नाही.’’ अशा आशयाचे विचार तेंडुलकरांनी व्यक्त केले. प्रशांत कुलकर्णी या तरुण व्यंगचित्रकारानं संपादित केलेला आणि अक्षर प्रकाशनानं प्रकाशित केलेला हा ग्रंथ मराठी व्यंगचित्रकलेचा इतिहास आणि वर्तमान याचं चित्ररूप दर्शन घडवतो.

इतक्या गांभीर्यानं मराठी व्यंगचित्रांची दखल घेणारा मराठीतला हा पहिलाच प्रयत्न. प्रशांत कुलकर्णीच्या संशोधन वृत्तीला आणि मेहनतीला उत्तम मुद्रणाची जोड मिळाल्यानं 'निवडक मराठी व्यंगचित्रं' हे पुस्तक देखणं आणि संग्राह्य बनून गेलं आहे . प्रकाशन समारंभात यावर सर्वांचं एकमत होतं. वसंत सरवटे स्वतः अभ्यासू व्यंगचित्रकार, त्यांनीही प्रशांत कुलकर्णीच्या मेहनतीची प्रशंसा केली. पण समारंभानंतर श्रोत्यांच्या मनात दीर्घ काळ रेंगाळत राहिला तो तेंडुलकरांनी उपस्थित केलेला मराठी व्यंगचित्रकारांच्या दर्जाचा आणि कुवतीचा मुद्दा. प्रकाशन समारंभातील भाषण असल्यानं औचित्यभंग होऊ नये अशा सावधगिरीने तेंडुलकरांनी आपले परखड विचार बोलून दाखवले. ‘‘पुस्तकातील व्यंगचित्रांचा दर्जा तितकासा चांगला नाही. व्यंगचित्रकाराला माणसाबद्दल प्रेम असावं लागतं. हे भान पुस्तकातल्या कमी व्यंगचित्रांमधून जाणवतं.’’ यांसारखी टीकात्मक विधानं तेंडुलकरांनी केली. 

मराठी व्यंगचित्रकलेवरील टीका म्हणून हे भाष्य मोलाचं असलं तरी पुस्तकावरील टीका म्हणून ते गैरलागू वाटलं. एका अर्थानं पुस्तकाच्या दर्जावरलं भाष्य न ठरता एकूण मराठी व्यंगचित्रकलेवरलं भाष्य ठरतं. कुणीतरी हे करायलाच हवं होतं. नव्या पुस्तकात व्यंगचित्रकारांच्या मुलाखती आहेत; त्यातून या कलेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारसा सखोल नसल्याचं जाणवतं याला अपवाद आहेतच, तसे ते प्रत्येक क्षेत्रात नेहमी असतात. पण स्वतः संपादकांनीही भाष्य करण्याचा प्रकार टाळला आहे आणि तटस्थपणे कला आणि कलाकारांची मांडणी केली आहे. हा या पुस्तकाचा गुण मानायचा की अवगुण हे आत्ता समीक्षकांनी ठरवायचे. पुस्तक प्रकाशन प्रसंगीची तेंडुलकर, सरवटे प्रभृतींची भाषणं समीक्षकांना पायाभूत साहित्य म्हणून उपयोगी पड़तील. पुस्तकाला वसंत सरवटेंची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.

प्रस्तावनेच्या शेवटी त्यांनी केलेलं विधान समीक्षक आणि वाचक दोन्ही वर्गानं लक्षात घ्यावं असं आहे. सरवटे म्हणतात, ‘‘शेवटी व्यंगचित्र हे प्रामुख्यानं हसवण्यासाठी असलं तरी व्यंगचित्रकला ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही.’’ प्रत्यक्षात व्यंगचित्राचे प्रेक्षक किंवा वाचकच नव्हे तर स्वतः मराठी व्यंगचित्रकारही ही कला हसण्यावारी नेताना आढळतात. काही अपवादात्मक व्यंगचित्रकारांची कामगिरी वगळता रेखाटनाची रेषा, रेखाटन वस्तूंचा आकार आणि मिती यांबाबत आपले व्यंगचित्रकार प्रयोग करताना दिसत नाहीत.

चित्ररचना आणि मांडणीचं वैविध्य, ज्याचं मोहवून टाकणारं रूप पाश्चात्त्य व्यंगचित्रांत सापडतं ते मराठी व्यंगचित्रकार देशीविदेशी व्यंगचित्रकारांचं रेखाटन पाहत असतील काय अशी शंका वाटते. विदेशी व्यंगचित्रकलेकडे आपल्या चित्रकारांच्या नजरा वळल्याच तर चौर्यकर्मासाठी. राजकीय व्यंगचित्रात कल्पकता आणि रेखाटन दोन्हीदृष्ट्या बिगर मराठीभाषक आघाडीवर आहेत. सशक्त कल्पना आणि अशक्त रेखाटन किंवा सशक्त रेखाटन आणि अशक्त कल्पना असा प्रकार आपल्याकडे अनेकदा आढळतो. व्यंगचित्राला प्राधान्य देणारी दोन नियतकालिकं मराठीत आहेत. 'मार्मिक' आणि 'आवाज'. आजच्या घडीला या अंकांतल्या व्यंगचित्रांच्या दर्जाबद्दल अभिमानानं बोलावं असं काही नाही. 

‘निवडक मराठी व्यंगचित्रं’च्या प्रकाशनानिमित्तानं मराठी व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकार याकडे लक्ष वेधले गेले तरी खूप काही साधलं म्हणता येईल. एरवी ना धड चित्रकलेत जमा ना धड साहित्यात- असा हा कलाप्रकार. साहित्यिकांची संमेलनं होतात. चित्रकारांची शिबिरं होतात. व्यंगचित्रकारांना एकत्र आणण्यासाठी असा वार्षिक उपक्रम नाही. ‘कार्टूनिस्ट कंबाईन’ नावाची व्यंगचित्रकार संघटना अलीकडेच स्थापन झाली आहे. संघटनेतर्फे मोजके कार्यक्रम आयोजित केले जातात तेवढेच. खास करून प्रेक्षकांना व्यंगचित्रकला हा प्रकार समजावून सांगण्याचे प्रकार या कार्यक्रमातून चालतात, हे चांगले आहे. पण कधीतरी व्यंगचित्रकारांना व्यंगचित्रकला हा प्रकार समजावून सांगण्याचे कार्यक्रमही या संघटनेने हाती घ्यावेत.

Tags: कार्टूनिस्ट कंबाईन वसंत सरवटे आर. के. लक्ष्मण मराठीतील व्यंगचित्रकला प्रशांत कुलकर्णी निवडक मराठी व्यंगचित्रं पुस्तक समीक्षा cartoonist combine vasant sarvate r. k. laxman art in marathi cartoon prashant kulkarni nivdak marathi vyangachitre book review weekly sadhana साधना साधन साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके