डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

थांबता ना थांबती वादळे ही रक्तातली! समरहिल शाळा

समरहिलचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या मीटिंग्ज. संपूर्णपणे लोकशाही तत्त्वावर चालणाऱ्या या शाळेत सगळे नियम आणि निर्णय दर आठवड़्याला होणाऱ्या मीटिंगमध्ये घेतले जातात. या मीटींग्जमध्ये सगळी मुलं आणि स्टाफ एकत्र असतो. पाच वर्षांचा मुलगादेखील आपलं मत या मीटिंगमध्ये मांडतो. समरहिल फिल्ममध्ये रायन या विद्यार्थ्यानं पैसे चोरले आणि एका मुलाबरोबर मारामारी केली, असे त्याच्यावर आरोप होतात. तेव्हा सगळी मुलं एक मीटिंग घेतात. त्यात खुले आम चर्चा होऊन शिक्षा द्यायची का नाही आणि काय द्यायची, हे ठरवलं जातं.  सर्वांना न्याय आणि आपलं मत मांडायला परवानगी देणाऱ्या अशा मीटिंग्ज कॉर्पोरेट जगातही कधी होताना दिसत नाहीत.

सगळ्या शाळांनी नाकारलेली एक 8 वर्षांची मुलगी... अखेरीस एका वेगळ्या प्रकारच्या शाळेत अत्यंत नाइलाजानं तिचे श्रीमंत आई-वडील आपल्या भल्या मोठ्या गाडीतून तिला घेऊन येतात. मुलगी गाडीतून खाली उतरते, तेव्हा ‘इथे तरी नीट अभ्यास कर, असं आई बजावून सांगते. वडील मात्र त्या मुलीला तू आनंदात राहा’ असा सल्ला देतात. मुलीच्या हातात एक मोबाईल देऊन आई-वडील निघून जातात.

भोवताली विविध वयांची मुलं हसत-खेळत, दंगा करत, थट्टा-मस्करी करत शाळेबाहेरच्या हिरवळीवर बागडत असतात. काही जण झाडांवर चढत असतात. एक मुलगी परीचा वेष घालून शाळेशेजारच्या गर्द झाडी असलेल्या वाटेनं निघालेली असते. काही जणांनी तर चक्क शाळेच्या हिरवळीवर ऑर्केस्ट्रा उभा केलेला असतो. त्याच्या तालावर काही जण मस्त नाचत असतात. काही जण स्विमिंग पूलमध्ये पोहत असतात. काही जिमवर मस्ती करत असतात. घट्ट वेणी घातलेली, चेहऱ्यावर हट्टी भाव असलेली ती मुलगी मात्र काय करावं हे न कळल्यानं काही क्षण नुसतीच उभी राहाते.

मग ती ‘मुख्याध्यापक कुठे आहेत?’ असं विचारत शाळेचा दरवाजा उघडून आत जाते. तिच्या हातात तिला कोणते विषय शिकायला आवडतील, हे भरायचा एक फॉर्म शिक्षक देतात. नेहमीच्या विषयांबरोबरच नाटक, कथाकथन, कलाकुसर अशा अनेक गमतीजमती असलेले विषय त्यात असतात. ती मुलगी आता मात्र भांबावूनच जाते. तिला आत्तापर्यंत कोणीच तुला काय शिकायचंय वगैरे फालतू(!) प्रश्न विचारलेले नसतात. मग सवयीनं ती मुलगी त्या फॉर्मवर गणित, विज्ञान वगैरे विषयांशेजारी टिकमार्क करते. शिक्षकांना तो फॉर्म दिल्यावर ते विचारतात, ‘‘नक्की? तुला हेच शिकायचंय?’’

हे सगळं एखाद्या काल्पनिक कथेवर आधारित असलेल्या फिल्ममध्ये घडत असेल, असं आपल्याला वाटेल. पण इंग्लंडमधल्या सफोक परगण्यात अशी शाळा गेली 99 वर्षं अस्तित्वात आहे. तिचं नाव आहे समरहिल. समरहिल ही त्याच्या संस्थापकाच्या नावानं म्हणजे ‘नीलची शाळा’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. आता पृथ्वीवर समरहिल ही सर्वांत प्रागतिक शाळा आहे. कोणत्याही मुलाच्या/मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला/त्याला वर्गात शिकण्याची सक्ती करायची नाही, हा या शाळेचा सर्वांत महत्त्वाचा नियम आहे.

2008 मध्ये बीबीसी आणि इतर काही संस्थांनी मिळून समरहिलवर एक फिल्म तयार केली. या फिल्मच्या सुरुवातीला वरती उल्लेख केलेली मुलगी म्हणजे मॅडी आणि सगळ्या शाळांनी घालवून दिलेला 12 वर्षांचा रायन हे दोघं प्रवेश करतात. समरहिलच्या एका सत्रात मॅडी आणि रायनमध्ये कसं परिवर्तन घडत जातं, ते या फिल्ममध्ये आपल्यासमोर उलगडत जातं.

समरहिल याच नावाची ही फिल्म जॉन ईस्ट या दिग्दर्शकानं प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेला किती उत्कृष्ट पर्याय असू शकतो, हे जगासमोर आणण्यासाठी तयार केली आहे. त्यासाठी जॉननं समरहिल शाळेतल्याच 11 वर्षांच्या काही मुलांच्या हातात कॅमेरा दिला. ती मुलं कॅमेरा वापरायला शिकली. समरहिलमध्ये त्यांनी रोजचं चित्रीकरण करायला सुरुवात केली. या फिल्ममध्ये समरहिल शाळेचा परिसर, तिथली मुलं, शिक्षक, भोवतालचं खेळीमेळीचं वातावरण, निर्णयांसाठी घेतलेल्या मीटिंग यांचं अत्यंत नेमकं आणि नेटकं चित्रण केलं आहे. बाफ्तापासून ॲस्ट्रा फिल्म फेस्टिव्हल- रोमानिया, जर्सी शोअर फिल्म फेस्टिव्हल, सांता फे फिल्म फेस्टिव्हल अशा अनेक ठिकाणचे मानसन्मान या फिल्मनं पटकावले आहेत.

पण या फिल्मचा उद्देश केवळ मॅडी आणि रायनची गोष्ट सांगणं हा नाही. ऑफिस फॉर स्टँडडर्‌स इन एज्युकेशन- ऑफस्टेड या इंग्लंडमधल्या शिक्षणक्षेत्राचे नियम ठरवणाऱ्या सरकारी संस्थेनं समरहिलमध्ये येऊन 1999 मध्ये शाळेची तपासणी केली. त्यावरून ही शाळा मुलांसाठी योग्य नसल्याचा शेरा मारून बंद करावी, असा अहवाल सरकारकडे सादर केला. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा लावून तिथे धुडगूस चालतो, असा आरोप केला. या अहवालानंतर शाळेच्या मुलांनी एकत्र येऊन या अहवालाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. ही मुलं आपली शाळा चालू राहावी यासाठी स्वत: कोर्टात गेली. या नाट्यमय खटल्याची कथा हा समरहिल या फिल्मचा गाभा आहे.

या फिल्ममध्ये मॅडी आणि रायन या दोन मुलांबरोबर 11 ते 16 वयोगटातली सगळीच मुलं आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना दिसतात. शाळेच्या राजकीय आणि कायदेशीर लढाईत ते सक्रियपणे उतरताना दिसतात. काम करताना, खेळताना, जबाबदारी घेताना वाढणारी ही मुलं पाहणं हा आनंदाचा भाग आहे. शिक्षण, राजकारण, सरकारी नियम, स्वातंत्र्य, मुलांची मानसिक वाढ, त्यांच्यात हिंसा का निर्माण होते, मुलं कशी शिकतात- अशा अनेक गोष्टींबद्दलची आपली मतं समरहिल ही फिल्म पूर्णपणे बदलवून टाकते. मुळात आत्ताच्या युद्धखोर जगातली सगळी युद्धं, माणसा-माणसांमधला सगळा द्वेष, सगळे गुन्हे घडण्यामागचं कारण माणूस आनंदी नसणं हे आहे, असं समरहिलचा संस्थापक ए.एस.नील याचं म्हणणं होतं.

नीलनं समरहिल स्कूल 1921 मध्ये स्थापन केलं, तेव्हा समाजात व्यक्तिस्वातंत्र्याला आजच्याइतकं महत्त्व नव्हतं. बऱ्याच घरांमध्ये मुलांना छडीचा बडगा दाखवला जायचा. कठोर शिस्त हाच मुलांचा वाढवायचा एकमेव मार्ग मानला जायचा. यामुळे मुलांचं स्वत:वर फक्त स्वत:चं नियंत्रण असावं, ‘सेल्फ गव्हर्न्मेंट आणि त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य’- फ्रीडम मिळावं, या दोन गोष्टींचा पुरस्कार करायला समरहिल शाळेला बरंच झगडावं लागलं.

‘‘शाळा सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनी समरहिलमध्ये सेल्फ गव्हर्न्मेंटचा उपयोग होतो, हे आम्ही सिद्ध केलंय. खरं तर कोणत्याच शाळेमध्ये सेल्फ गव्हर्मेंट नसेल तर तिला प्रगतिशील शाळा म्हणताच येणार नाही. आपलं सामाजिक आयुष्य आपल्या हातात आहे, असं एखाद्या शाळेत जोपर्यंत मुलांना वाटत नाही; तोपर्यंत ती शाळा स्वतंत्र विचारांचा पुरस्कार करते असं म्हणता येणार नाही,’’ असं नील सेल्फ गव्हर्न्मेंटबद्दल म्हणाला होता. तसंच स्वातंत्र्याबाबत विचार मांडताना, मुलांच्या नैसर्गिक आवडी-निवडी जर समाजाला मान्य असणाऱ्या आवडींपेक्षा वेगळ्या असतील, तर मुलांना त्यांना हवं असेल ते करू द्यावं, याबाबत नील आग्रही होता.

मुलांना हवं ते करू देणाऱ्या समरहिल शाळेच्या 99 वर्षांच्या आयुष्यात 1000 विद्यार्थी शिकले आहेत. त्यापैकी काही जणांच्या कहाण्या खूप बोलक्या आहेत. उदाहरणार्थ- टॉम हा मुलगा त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी समरहिलला आला आणि सतराव्या वर्षी तो शाळा सोडून गेला. या सगळ्या वर्षांमध्ये तो कोणत्याही तासाला कोणत्याच वर्गात बसला नाही.  त्याला लिहिता-वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अर्थातच त्याची खूप काळजी वाटत होती. पण टॉम वयाच्या नवव्या वर्षी डेव्हिड कॉपरफील्ड हे पुस्तक वाचताना नीलला दिसला. त्याला वाचता कसं येतं? असं विचारल्यावर तो म्हणाला माझा मीच शिकलो. काही वर्षांनंतर दोन-पंचमांशमध्ये दोनचतुर्थांश कसे मिळवायचे हे विचारायला तो नीलकडे आला. असे अनेक विषय टॉम स्वत:च शिकला. आता धातूची उपकरणं बनवायचा टॉमचा स्वत:चा कारखाना आहे. त्याला जगातल्या अनेक विषयांचं ज्ञान आहे.

डेरिफ बॉईड हा असाच एक मुलगा. तो वयाच्या आठव्या वर्षी समरहिलमध्ये आला. तो मेडिकलची प्रवेश परीक्षा पास झाला, तेव्हा 18 वर्षांचा होता. पण मेडिकलच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. मग डेरिकनं स्पेनमधल्या एका बार्इंकडे शोफरची नोकरी केली. त्या बार्इंना युरोपमध्ये फिरवलं. त्यांच्या घराची डागडुजी करून दिली आणि नवं घर बांधायला चिक्कार मदत केली. त्या बार्इंनी डेरिफच्या मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च उचलला.

आज समरहिलमध्ये 5 ते 17 या वयोगटातली जगभरातून आलेली सुमारे 75 मुलं शिकतात. शिक्षक आणि इतर कर्मचारी असे मिळून समरहिलमध्ये 100 जण आहेत. इंग्लंडमधल्या सफोक परगण्यापासून दोन मैलांवर एका व्हिक्टोरियन बंगल्यात समरहिल कार्यरत आहे. इथे मुलांना खेळायला मुभा आहे. शिकणं पर्यायी आहे. मुलांना इथे शाळेतले नेहमीचे विषय सोडून चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लिखाण, अभिवाचन, लाकूडकाम, संगणक अशा कोणत्याही विषयात शिकता येतं. एखादं मूल सगळ्यांबरोबर वर्गात शिकताना अस्वस्थ होत असेल, तर त्याला एकट्याला शिकण्याची सोय आहे. काही मुलं भराभर शिकतात, काहींना वेळ लागतो. अशा सगळ्यांना त्यांच्या-त्यांच्या वेगानं इथे शिकता येतं. मुलांना हवं असेल, तरच ती परीक्षा देतात.

मुलं वर्गात न बसता बाहेर खेळू शकतील, एकमेकांशी गप्पा मारू शकतील, कलाकृती तयार करू शकतील अशा अनेक मोकळ्या जागा शाळेभोवतीच्या परिसरात आहेत. झोपडी बांधणं, झाडावर चढणं, कँपफायर असं सगळं इथे चालू असतं. इथे स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल, टेबलटेनिस खेळायलाही मुभा आहे. हिवाळ्यात बैठे किंवा इनडोअर खेळ कोणते खेळावेत, यासाठीही समिती निवडली जाते. तिथे शब्दकोडी, बोर्ड गेम्स, अभिनय, गोष्ट सांगणं, सिनेमा पाहणं, अभिवाचन असे उपक्रम होतात. जगभरात मुलांच्या हक्कांवर काम करणाऱ्या, वर्कशॉप्स घेणाऱ्या, समरहिल शाळा पाहायला उत्सुक असणाऱ्याच लोकांना शाळेत यायला प्रोत्साहन देण्यासाठीही इथे एक समिती आहे.

पण समरहिलचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या मीटिंग्ज. संपूर्णपणे लोकशाही तत्त्वावर चालणाऱ्या या शाळेत सगळे नियम आणि निर्णय दर आठवड़्याला होणाऱ्या मीटिंगमध्ये घेतले जातात. या मीटींग्जमध्ये सगळी मुलं आणि स्टाफ एकत्र असतो. पाच वर्षांचा मुलगादेखील आपलं मत या मीटिंगमध्ये मांडतो. समरहिल फिल्ममध्ये रायन या विद्यार्थ्यानं पैसे चोरले आणि एका मुलाबरोबर मारामारी केली, असे त्याच्यावर आरोप होतात. तेव्हा सगळी मुलं एक मीटिंग घेतात. त्यात खुले आम चर्चा होऊन शिक्षा द्यायची का नाही आणि काय द्यायची, हे ठरवलं जातं.  सर्वांना न्याय आणि आपलं मत मांडायला परवानगी देणाऱ्या अशा मीटिंग्ज कॉर्पोरेट जगातही कधी होताना दिसत नाहीत.

समरहिल फिल्ममध्ये मुलांनी ऑफस्टेडच्या अधिकाऱ्यांशी दिलेला लढा पाहणं हा अत्यंत सुखद प्रकार आहे. इंग्लंडमधील टोनी ब्लेअरच्या सरकारनं शिक्षणव्यवस्था सुधारायचा चंग 1997 मध्ये बांधला. त्या प्रक्रिेयेनुसार शाळेचे अधिकारी शाळेत तपासणीसाठी आले होते. फिल्ममध्ये हे प्रसंग नाट्यरूपाने दाखवले आहेत. या अधिकाऱ्यांचे मुलं आणि शिक्षक यांच्याबरोबरचे संवाद प्रत्यक्ष ऐकायला हवेत. उदाहरणार्थ- त्यातला एक अधिकारी म्हणतो, ‘‘या शाळेत नॉर्मल एज्युकेशन दिलं जात नाही, असं आमचं मत आहे.’’ त्यावर समरहिल शाळेची मुख्याध्यापिका म्हणते- नॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय, यावर ते अवलंबून आहे.

ऑफस्टेडच्या अधिकाऱ्यांनी समरहिल शाळेत वर्गात बसणं अनिवार्य नाही, या कारणानं शाळेविरुद्ध तक्रार नोंदवली. या तक्रारीविरोधात शाळा कोर्टात गेली. हा खटला चालल्यानंतर ब्रिटिश कोर्टानं शाळा सुरू ठेवायची असेल, तर शाळेची वारंवार तपासणी होण्याबाबत काही अटी घातल्या. त्या अटी शाळेने मान्य करायच्या का नाही, यावर समरहिलच्या मुलांनी कोर्टात न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून एक मीटिंग घेतली. अर्थात मुलांनी कोर्टात अशी मीटिंग घेणं हे इंग्लडमध्ये प्रथमच घडत होतं. हा प्रसंग फिल्ममध्ये नाट्यमय पद्धतीत बघतानाही आपण हरखून जातो. लोकशाही तत्त्वं म्हणजे काय, याचा हा प्रसंग वस्तुपाठ आहे.

हा खटला शाळेनं जिंकला. यातून समरहिल ही शिक्षणसंस्था वाचली; इतकेच नव्हे, तर शाळा ज्या तत्त्वांवर उभी होती, ती तत्त्वं महत्त्वाची आहेत हे सिद्ध झालं.

फिल्ममध्ये या खटल्यात मॅडी उत्साहात भाग घेते. तिला तिचे आई-वडील पहिलं सत्र संपल्यावर न्यायला येतात. मॅडीला मात्र समरहिलमध्येच राहायचं असतं. तेव्हाच समरहिलमध्ये एका ठिकाणी आग लागते. आगीत एक लहान मुलगा अडकतो. आग कोणी आणि का लावली, यावर बरेच आरोप-प्रत्यारोप होतात. त्यावरही मीटिंग घेऊन मुलं ते प्रकरण शांतपणे सोडवतात. म़ॅडीची आई या सगळ्या प्रकाराला साक्षीदार असते. शेवटी ती मॅडीला समरहिलमध्ये ठेवताना म्हणते, ‘‘मला खूप नीटनेटकं, शिस्तीचं, आखीव-रेखीव आयुष्य आवडतं. मला गोष्टींवर माझं नियंत्रण असावं, असं वाटतं. मी अशी शिस्तप्रिय व्यक्ती आहे, हे मला माहिती आहे. पण तुझं  व्यक्तिमत्त्व  कशा प्रकारचं आहे, हे तुला अजून माहिती नाही.. ते तू शोध!’’

कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात शिक्षणाबाबत एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली आहे. ती म्हणजे, आपण सगळ्यांनी घेतलेलं शिक्षण कोरोनानंतरच्या काळात रोजगार कमवायला उपयोगी पडेलच असं नाही. आपल्यातल्या वेगळ्या क्षमता, कौशल्यं जाणून घेऊन ती जोपासली, तर वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या मुलांनाही अशा वेगळ्या, त्यांच्या आवडीच्या वाटांनी जाऊन आयुष्य जगायची, त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वत: शोधायची मुभा द्या. त्यांच्या इच्छा-आकांक्षांना बांध घालून त्यांना थांबवण्यापेक्षा ‘थांबता ना थांबती वादळे रक्तातली’, हे लक्षात घ्या!

समरहिल फिल्मची युट्यूब लिंक  : https://www.youtube.com/watch?v=TxngqMavda0

थांबता ना थांबती वादळे रक्तातली- ही ओळ सुधीर मोघे यांची आहे.

Tags: सदर सुधीर मोघे समर हिल डॉक्युमेंटरी sadar sadhana series sudhir moghe summer hill nilambari joshi documentary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Sumangala kulkarni- 18 Jul 2020

    Excellent andextraordinary school. Everu parent ms must read this when their child is small in age..sumangala kulkarni.dadar.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके