डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मोन्साटोचं ही कंपनी जेनेटिकली मॉडिफाईड- जीएम प्रजाती निर्माण करते. जीएम प्रकरणात प्राणी किंवा पिकं यांच्यातल्या डीएनएची रचना प्रयोगशाळेत संशोधन करून बदलून वेगळी प्रजाती निर्माण केली जाते. पोषणमूल्ये जास्त असणारी किंवा जंतुनाशकांचा प्रतिकार करणारी बी-बियाणं अशा प्रकारे निर्माण केली जातात. पण मोन्साटोनं याबरोबरच धान्य पेरण्यासाठी लागणारं बी-बियाणं शेतकऱ्यांना दर वर्षी नवं घ्यावं लागेल, अशी व्यवस्था केली. पूर्वी शेतकरी उगवलेल्या धान्यातून चांगल्या प्रतीचे दाणे पेरणीसाठी बाजूला ठेवत. पण आता एका वेळी बियाण्यांमधून एकदाच पिकं उगवतील, अशी व्यवस्था मोन्साटोनं केल्यानं भारतात शेतकऱ्यांना अमाप खर्चाला तोंड द्यावं लागतं. या विषयावर तळमळीनं काम करणाऱ्या वंदना शिवा या डॉक्युमेंटरीत याबद्दल माहिती सांगताना दिसतात.   

तो : पण ही आमची जमीन आहे. आम्ही इथे जन्माला आलो, इथेच आमचे नातलग मरण पावले. यानं जमिनीची मालकी मिळते. केवळ एका कागदाच्या तुकड्यावरून आणि त्यावरच्या आकड्यांवरून नाही. 

बँक अधिकारी : सॉरी, आम्हाला हे करायचं नाही. पण बँक म्हणजे माणूस नाही. 

तो : पण बँकेत माणसंच काम करतात ना? 

बँक अधिकारी : नाही, तुम्ही चुकत आहात. बँक माणसांपेक्षा वेगळी आहे. बँकेत जे व्यवहार चालतात, त्याबद्दल तिथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तिरस्कार वाटतो. पण तरीही बँक ते व्यवहार करते. बँक हा एक राक्षस आहे. माणसांनी तो तयार केला, पण आता त्यावर त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. त्या राक्षसाला सतत नफा मिळवायला हवा. त्यासाठी त्याची वाढ होणं थांबलं, तर तो नष्ट होईल. त्याला वाढायलाच हवं. 

जॉन स्टाईनबेकच्या ‘ग्रेप्स ऑफ राथ’ या कादंबरीत बँकेचे कर्मचारी एका जमिनीवर ताबा सांगायला जातात, तेव्हाचा हा संवाद. या संवादात बँक म्हणजे एक व्यक्ती नव्हे, असं मान्य केलं आहे. पण प्रत्यक्षात अमेरिकेत बँक किंवा कोणतीही कंपनी-कॉर्पोरेशन ही एक व्यक्ती मानली जाते. व्यक्तीला असलेले सगळे सुरक्षेचे अधिकार कॉर्पोरेशन्सना कायद्यानं प्राप्त झाले आहेत. हे कसं झालं? तर 1868 मध्ये अमेरिकेतल्या यादवी युद्धानंतर कायद्यानं तिथली गुलामगिरी संपली. प्रत्येक माणसाला सारख्या प्रमाणात सुरक्षा पुरवावी, असं 14 व्या विधेयकाद्वारे संमत झालं. या विधेयकामुळेच वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्तीला पकडता न येणं वगैरे हक्क आणि संरक्षण कंपन्यांना/ कॉर्पोरेशन्सनाही प्राप्त झाले. थोडक्यात- फोर्ड, लॉकहीड मार्टिन, मॅकडोनाल्ड्‌स, मोन्साटो, हेलबर्टन, बँक आॉफ अमेरिका या कंपन्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कायदेशीररीत्या सुरक्षेचे हक्क मिळाले. कॉर्पोरेशन या प्रकाराला 150 वर्षांपूर्वी फारसा अर्थ नव्हता, महत्त्वही नव्हतं. आज मात्र या कॉर्पोरेशन्स आपल्यावर राज्य करत आहेत. समुद्र, हवा, डीएनए हे सगळ्यांच्या मालकीचं आहे, अशी आपली समजूत होती.  

मधल्या काळात कॉर्पोरेशन्सनी त्यावर आपला हक्क कधी प्रस्थापित केला, हेही आपल्याला कळलं नाही. आज जगातल्या 200 कंपन्यांकडे 25 टक्के संपत्ती आहे. जनरल मोटर्स ही कंपनी आता डेन्मार्क या देशापेक्षा मोठी आहे. फोर्ड कंपनी संपूर्ण दक्षिण आफ्रिकेपेक्षा मोठी आहे, तर बिल गेट्‌सकडची संपत्ती संपूर्ण आफ्रिकेतल्या लोकांकडील संपत्तीपेक्षा जास्त आहे. या कॉर्पोरेशन्स म्हणजे एक व्यक्ती आहे, असं कायद्यानंच मान्य केल्यामुळे जसे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बरेवाईट पैलू असतात तसेच बरे-वाईट पैलू त्यांनाही लागू होतात. जर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातले पैलू समाजाला त्रास देणारे ठरले तर त्याला व्यक्तिमत्त्व-विकार आहे, असं मानलं जातं. या सगळ्या कंपन्या जगभरात नफेखोर वृत्तीनं जे काही उद्योग करतात ते सगळ्या माणसांना, पर्यावरणाला आणि पर्यायानं पृथ्वीला घातक ठरत आहेत. 

यावरून या कंपन्यांनाही व्यक्तिमत्त्व-विकार आहे, हे मानून त्यावर उपाय करायला हवेत, असा विचार ‘द कॉर्पोरेशन’ या डॉक्युमेंटरीत मांडला आहे. जोएल बकान या लेखकाच्या ‘द कॉर्पोरेशन : द पॅथॉलॉजिकल परस्युट ऑफ प्रॉफिट अँड पॉवर’ या पुस्तकावर ही डॉक्युमेंटरी बेतली आहे. लेखनाबरोबरच जोएल जॅझ संगीतकार, फिल्ममेकर आणि ब्रिटिश कोलंबियाच्या विद्यापीठात कायदा या विषयाचा प्राध्यापक आहे. कायद्याच्या अभ्यासक्रमात जोएलची पुस्तकं समाविष्ट आहेत. जॅझ संगीताचा त्याचा ब्लू स्काईज हा अल्बमही गाजला होता. नोम चॉम्सकीच्या विचारांवर ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ ही डॉक्युमेंटरी काढणाऱ्या मार्क ॲकबार यानं जोएल बकानच्या संमतीनं आणि साथीनं द कॉर्पोरेशन ही डॉक्युमेंटरी 2003 मध्ये काढली. तब्बल 26 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकनं मिळवणाऱ्या या डॉक्युमेंटरीचा उत्तरार्ध 2020 मध्ये ‘द न्यू कॉर्पोरेशन’ या नावानं तयार झाला आहे. 

सनडान्स फिल्म फेस्टिव्हल आणि पीपल्स चॉईस ॲवॉर्ड अशा काही महोत्सवांमध्ये या डॉक्युमेंटरीनं पारितोषिकं मिळवली आहेत. कॉर्पोरेशन्सचं कामकाज कसं चालतं, त्यांच्याबाबतचे वादग्रस्त विषय कोणते आहेत, नफा आणि फक्त नफा यासाठी मार्गांत येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांचा या कॉर्पोरेशन्स बऱ्या-वाईट मार्गानं नायनाट करायला कशा सरसावतात, ते या डॉक्युमेंटरीत मांडलं आहे. यात तेल, फार्मा, कॉम्प्युटर, टायर उत्पादन करणाऱ्या, पब्लिक रिलेशन्स सांभाळणाऱ्या, ब्रँड तयार करणाऱ्या, जाहिरात क्षेत्रातल्या, मार्केटिंगमधल्या अशा अनेक क्षेत्रांतल्या कंपन्यांचे सीईओ आणि महत्त्वाच्या पदांवरच्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. त्यातले काही जण आपल्या कंपनीच्या अनैतिक वागण्याची प्रांजळ कबुली देतानाही दिसतात. महत्त्वाचं म्हणजे- नोम चॉम्स्की, चार्ल्स कर्नघॅन, नाओमी क्लीन, मायकेल मूर, वंदना शिवा, होवार्ड झिन, रे अँडरसन, पीटर ड्रकर, मिल्टन फ्राईडमन, सॅम्युएल एपस्टाईन, ख्रिस बेरेट असे नोबेल प्राईजविजेते अर्थतज्ज्ञ, मॅनेजमेंट गुरू, कॉर्पोरेट गुप्तहेर, शिक्षणतज्ज्ञ, समीक्षक, इतिहासकार आणि विचारवंत अशा 40 जणांच्या मुलाखती या 145 मिनिटांच्या डॉक्युमेंटरीत समर्पक ठिकाणी येतात. 

अनेक कंपन्यांच्या चकचकीत लोगोजचा कोलाज, मधेच दिसणारी काही दृश्यं आणि ध्वनिफिती यानं डॉक्युमेंटरी सुरू होऊन शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते. ‘द कॉर्पोरेशन’ या डॉक्युमेंटरीच्या पहिल्या भागात कॉर्पोरेशन ही कायदेशीर पातळीवर एक व्यक्ती कशी आहे, याबद्दलचा इतिहास दिसतो. त्यानंतर या कॉर्पोरेशन्सना सायकोपाथ हा मनोविकार कसा आहे, ते मांडलं आहे. एखादी व्यक्ती सायकोपाथ आहे का नाही, हे मानसोपचारतज्ज्ञ काही लक्षणांवरून ठरवतात. ती लक्षणं या कॉर्पोरेशन्समध्ये कशा प्रकारे दिसतात, त्याची उदाहरणं यात जागोजागी दिली आहेत. पण सायकोपाथ म्हणजे नक्की काय? सायकोपॅथी हा शब्द 1800 पासून प्रचलित होता. हेंडरसन या स्कॉटिश मानसोपचारतज्ज्ञानं 1939 मध्ये ‘सायकोपॅथिक स्टेट्‌स’ या पुस्तकात लहानपणापासून समाजविघातक वागणाऱ्या, ज्यांना सामाजिक पातळीवर बहिष्कार टाकून किंवा कायद्यानं शिक्षा करून सुधारणं अशक्य आहे, अशा लोकांना सायकोपाथ म्हटलं होतं. 

पीसीएल-आर नावाच्या चाचणीनं सायकोपॅथी मोजली जाते. या चाचणीत सायकोपॅथीच्या 20 पैलूंची यादी करून प्रश्न विचारले जातात. त्यांच्या उत्तरांमध्ये 30 पेक्षा जास्त गुण मिळवणारे लोक सायकोपाथ मानले जातात. सर्वसाधारण माणसाचे या चाचणीचे गुण 5 किंवा 6 असतात. मनोविकारांच्या वेगवेगळ्या प्रकारांचं वर्गीकरण करणारं  डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल- डीएसएम अमेरिकेत तयार होतं. या मॅन्युअलच्या चौथ्या सुधारित आवृत्तीनुसार म्हणजे डीएसएम-4 नुसार स्वार्थी, अनैतिक वागणाऱ्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्या, दुसऱ्यांची फसवणूक करणाऱ्या, सामाजिक व कायदेशीर नियम धाब्यावर बसवणाऱ्या, आपल्या गुन्ह्यांबद्दल मनात अपराधी भावना न जाणवणाऱ्या आणि दुसऱ्यांबद्दल सहानुभूती, काळजी या भावनांचा अभाव असलेल्या, दुसऱ्यांचं कल्याण वगैरे गोष्टींशी संबंध नसलेल्या लोकांना सायकोपाथ मानलं आहे. द कॉर्पोरेशन या डॉक्युमेंटरीमध्ये या सगळ्या पैलूंची एक चेकलिस्ट दिसते. या प्रत्येक पैलूला पूरक अशा प्रकारे या कॉर्पोरेशन्स कशा वागतात त्याची उदाहरणं, केस स्टडीज, मुलाखती यातून चेकलिस्टमधला एकेक मुद्दा कसा खरा ठरत जातो, ते उलगडत जातं. 

आयबीएम या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जगप्रसिद्ध कंपनीचं उदाहरण त्रासदायक आहे. जर्मनीत हिटलर 1933 मध्ये नुकताच सत्तेत आला होता. जर्मनीतला ज्यू द्वेष पराकोटीला गेल्याच्या आणि ज्यू लोकांच्या छळाच्या बातम्यांनी अमेरिकेतली वर्तमानपत्रं ओसंडून वाहत होती. तेव्हा हिटलरच्या नाझी पार्टीला जर्मनीत जनगणना करायची होती. त्या जनगणनेचे निष्कर्ष डेटा स्वरूपात साठवून त्यावर प्रक्रिया करायची होती. या कामासाठी आयबीएमची जर्मन कंपनी डेहोमॅग हिनं टेंडर भरलं होतं. ते काम डेहोमॅगनं केलं. तो डेटा डेहोमॅगचेच कर्मचारी जर्मनीत पंच करत होते. या जनगणनेचं वर्गीकरण करणारा डेटा ज्या पंच कार्डवर छापला गेला होता, ती पंच काडर्‌स द कॉर्पोरेशनमध्ये आपल्यासमोर येतात. त्यानुसार समलिंगी लोकांना 003, कम्युनिस्ट लोकांना 006, ज्यू लोकांना 008 हा कोड नंबर दिला होता. त्यानंतर या लोकांपैकी ट्रान्सफर करावी यासाठी 002, कत्तल करावी यासाठी 003 आणि विशेष वागणूक द्यावी यासाठी 006 असे कोड नंबर्स होते. 

ही विशेष वागणूक म्हणजे गॅस चेंबर्समध्ये पाठवणं. या गॅस चेंबर्सपैकी ऑशविझ 001, डकाऊला 003 असे कोड दिलेलेही स्पष्ट दिसतात. आयबीएमच्या पंच कार्ड्सशिवायही हिटलरनं ज्यूंचं शिरकाण केलंच असतं; पण ज्या वेगानं आणि शिस्तबद्ध पद्धतीत ते झालं, त्याला मात्र आयबीएमची पंचिंग काडर्‌स कारणीभूत होती. ही सर्व माहिती ‘आयबीएम अँड द होलोकॉस्ट’ या पुस्तकात मिळते. 

या पुस्तकाचा लेखक एडविन ब्लॅक ही माहिती सांगताना द कॉर्पोरेशनमध्ये दिसतो. आयबीएमचा तत्कालीन संचालक थॉमस वॉटसन हा  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट आणि त्यांच्या पत्नींचा दोस्त होता. हे सर्व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या संमतीशिवाय होणं शक्य नव्हतं. आयबीएमप्रमाणे अमेरिकेतल्या जनरल मोटर्सनंही नाझींबरोबर काम केलं होतं. इतकंच नव्हे, तर कोका- कोलाला जर्मनीत शिरकाव नव्हता. तेव्हा कोका-कोलानं जर्मनीत आपला जम बसवला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्याला हातभार लावला. दोस्तराष्ट्रांबरोबर अमेरिका नाझी जर्मनीविरोधात असल्यामुळे कोका-कोला बनवणारं सिरप जर्मनीत पोचू शकत नव्हतं. तेव्हा कोका-कोलानं तिथे फँटा हे आपलं नवे पेय सुरू केलं होतं. ते जर्मनीतल्या नाझी लोकांचं लाडकं पेय होतं. 

कॉर्पोरेशन्सचं थैमान कसं विविध क्षेत्रांत पोचलं आहे, ते पाहण्यासाठी मोन्साटो या कंपनीचं उदाहरणही खूप बोलकं आहे. मोन्साटोचं नाव जगभर पोचलं ते एजंट ऑरेंजमुळे. अमेरिका-व्हिएतनाम युद्धात व्हिएतनाममधली हजारो एकर जंगलं आणि शेती नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं 1961 ते 1971 या काळात 1.3 कोटी गॅलन्स एजंट ऑरेंज हे रसायन फवारलं. यात वापरलेलं डायॉक्सिन वातावरणात, जमिनींमध्ये, पाण्यात अनेक वर्षं टिकून राहतं. प्राणी, मासे, पक्षी यांच्या टिश्यूजमध्ये हे चिकटून राहतं. हे ज्या जमिनीत असेल तिथलं धान्य, कोंबड्यांसारखे प्राणी किंवा पाण्यातले मासे खाल्ल्यामुळे माणसांच्या शरीरातही डायॉक्सिनचा शिरकाव होतो. डायॉक्सिनमुळे नवजात मुलांमध्ये दोष निर्माण होतात. कर्करोग, मानसिक किंवा मेंदूचे आजार होऊ शकतात. व्हिएतनाममध्ये एजंट ऑरेंजमुळे तत्काळ चार लाख लोक मरण पावले होते. मोन्साटो ही कंपनी जेनेटिकली मॉडिफाईड-जीएम प्रजाती निर्माण करते. 

जीएम प्रकरणात प्राणी किंवा पिकं यांच्यातल्या डीएनएची रचना प्रयोगशाळेत संशोधन करून बदलून वेगळी प्रजाती निर्माण केली जाते. पोषणमूल्ये जास्त असणारी किंवा जंतुनाशकांचा प्रतिकार करणारी बी-बियाणं अशा प्रकारे निर्माण केली जातात. पण मोन्साटोनं याबरोबरच धान्य पेरण्यासाठी लागणारं बी-बियाणं शेतकऱ्यांना दर वर्षी नव्यानं घ्यावं लागेल, अशी व्यवस्था केली. पूर्वी शेतकरी उगवलेल्या धान्यातून चांगल्या प्रतीचे दाणे पेरणीसाठी बाजूला ठेवत. पण आता बियाण्यांमधून एका वेळी एकदाच पिकं उगवतील, अशी व्यवस्था मोन्साटोनं केल्यानं भारतात शेतकऱ्यांना अमाप खर्चाला तोंड द्यावं लागतं. या विषयावर तळमळीनं काम करणाऱ्या वंदना शिवा या डॉक्युमेंटरीत याबद्दल माहिती सांगताना दिसतात. मोन्साटोचा आणखी एक प्रताप म्हणजे आरबीजीएच- रिकॉर्बिनंट बोव्हाईन ग्रोथ हॉर्मोन. बोव्हाईन ग्रोथ हॉर्मोन नैसर्गिक रीत्या गाईमध्ये उत्पन्न होतो. तो त्यांच्या शरीरात दूध किती तयार व्हावं यावर नियंत्रण ठेवतो. पण गार्इंच्या शरीरातलं दुधाचं उत्पादन वाढावं यासाठी मोन्साटोच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत आरबीजीएच- हा हार्मोन तयार  केला. 

आरबीजीएच हा हार्मोन पोझिलॅक या नावानं बाजारात ओळखला जातो. मोन्साटोनं अमेरिकेतल्या फूड अँड ड्रग असोसिएशनकडून पोझिलॅकचं मार्केटिंग करण्याची परवानगी 1993 मध्ये मिळवली. आज अमेरिकेतल्या एक-तृतीयांश गार्इंना आरबीजीएच हे इंजेक्शन टोचलं जातं, ज्यामुळे गाई नेहमीपेक्षा 10 टक्के जास्त प्रमाणात दूध देतात. पण आरबीजीएचचे दुष्परिणाम लवकरच दिसायला लागले. डॉक्युमेंटरीत याचं चित्रीकरण पाहणं यातनादायक आहे. आरबीजीएच टोचलेल्या गार्इंपैकी 50 टक्के गार्इंच्या पायांना किंवा खुरांना बधिरता येते; त्यापैकी 25 टक्के गार्इंच्या कासेला आणि प्रजोत्पादन करणाऱ्या अवयवांना संसर्ग होतात. त्यांना वंध्यत्व येतं. 

ओव्हरीजना संसर्ग होतो. वासरं पोटात मृत होतात किंवा त्यांच्यात जन्मत: दोष असतात. सेंटर फॉर फूड सेफ्टी आणि कॅनेडियन जर्नल ऑफ व्हेटर्नरी रिसर्च अशा अनेक संस्थांनी यावर संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध केले आहेत. अर्थात हे प्रकरण गार्इंपुरतंचं मर्यादित नाही. आरबीजीएच टोचलेल्या गाई (आणि इतर जनावरं) इन्शुलिन ग्रोथ फॅक्टर-1- आयजीएफ जास्त प्रमाणात उत्पादित करतात. माणसांनी ते दूध प्यायल्यानंतर त्यांच्या शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण वाढू शकतं. तसंच कॅन्सरच्या पेशींशी लढा देणाऱ्या शरीराच्या पेशी आयजीएफ-1 मुळे ब्लॉक होतात. त्यामुळे माणसांना स्तनाचा, प्रोस्टेटचा आणि आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. युरोपमधल्या 25 देशांसह जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडानं आरबीजीएचवर बंदी घातली आहे. अमेरिकेत कायद्यानं बंदी नसली तरी ग्राहकांच्या रेट्यामुळे अनेक कंपन्यांनी आरबीजीएच वापरणं बंद केलं आहे. 

जानेवारी 2007 मध्ये सेफवे कंपनीनं आपण आरबीजीएचमुक्त झाल्याचं जाहीर केलं. मार्च 2008 मध्ये वॉलमार्ट कंपनीनं स्वत:चं ग्रेट व्हॅल्यू मिल्क हे आरबीजीएचमुक्त असल्याचं जाहीर केलं. मात्र हा हार्मोन लोकांच्या शरीरात अत्यल्प प्रमाणात जातो त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत नाही, असा दावा मोन्साटोनं केला होता. सगळ्याच कॉर्पोरेशन्स अशा आहेत, असं मात्र नाही. रे अँडरसन या इंटरफेस इनकॉर्पोरेशन्सच्या संस्थापकाची कहाणी याला अपवाद आहे. द कॉर्पोरेशन या डॉक्युमेंटरीत अशी सकारात्मक, पर्यायी उदाहरणंही आहेत, हे विशेष. रे अँडरसन हा कार्पेट बनवणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा उद्योजक होता. त्याच्या मालाचा 110 देशांमध्ये पुरवठा होत असताना त्यानं 1994 मध्ये ‘इकॉलॉजी ऑफ कॉमर्स’ हे पॉल हॉकेनचं पुस्तक वाचलं. उद्योगधंद्यांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम फक्त उद्योजकच वाचवू शकतील, असे विचार या पुस्तकात होते. अँडरसन यानं हे पुस्तक वाचून आपल्या उद्योगातून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, अशा उपाययोजना सुरू केल्या. 

त्याला त्यानं ‘मिशन झीरो’ असं नाव दिलं. स्वत:ची उत्पादनं आणि प्रक्रिया यांचा अभ्यास करून वातावरणात सोडले जाणारे प्रदूषित वायू व कचरा कमीत कमी करणं, उत्पादनं बनवताना रिन्युएबल वस्तू आणि ऊर्जा वापरणं हे मिशन झीरोचं उद्दिष्ट होतं. मिशन झीरो 2009 मध्ये गाठण्याच्या उद्दिष्टाच्या निम्म्यापर्यंत इंटरफेस ही कंपनी पोचली होती. अँडरसन 2011 मध्ये कर्करोगानं मरण पावला. पण इंटरफेसनं आपलं पर्यावरणपूरक उद्दिष्ट कायम ठेवलं आहे. मिशन झीरो आपण कशा प्रकारे साध्य केलं, याबद्दल अँडरसन यानं दोन पुस्तकं लिहिली आहेत. अशा प्रयत्नांचं प्रमाण वाढायला हवं. नाही तर पृथ्वीवरचा शेवटचा वृक्ष तोडला गेल्यानंतर, शेवटचा मासा जाळ्यात पकडला गेल्यानंतर, शेवटची नदी विषारी घटकांनी प्रदूषित झाल्यानंतर अखेरीस आपल्या एक गोष्ट लक्षात येईल- ती म्हणजे, आपण पैसा खाऊन जगू शकत नाही! 

‘मोलें धाडी जो मराया, नाही आसू आणि माया’- ही ओळ बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेतली आहे.
 

Tags: पीपल्स चॉईस ॲवॉर्ड सनडान्स फिल्म फेस्टिव्हल निलांबरी जोशी डॉक्युमेंटरी the corporation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात