डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी युवाल नोहा हरारी (गुगल मुलाखत)

हरारीनं कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या वाढतील,  त्याचाही ऊहापोह केला आहे. उदाहरणार्थ- डॉक्टर्सच्या नोकऱ्या किंवा  व्यवसाय संपेल हे खरं असलं,  तरी नवी  औषधं आणि शस्त्रक्रियेच्या पध्दती शोधणं ही संशोधनाची कामं खूप वाढतील. पण या नव्या नोकऱ्यांमध्ये विशिष्ट कौशल्यं आणि  नैपुण्याची गरज असेल. कामाच्या बाबतीतल्या अशा बदलांना प्रत्येक माणसाला भावनिक/मानसिक पातळीवर तोंड देणं त्रासदायक ठरेल. यावर उपाय म्हणून माणूस- एआय यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा  एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं ठरेल. औषधांपासून ते ध्यानधारणेपर्यंत अनेक तंत्रं  तो ताण कमी करण्यासाठी वापरावी लागतील, असं हरारी सुचवतो. हरारीनं मांडलेली दुसरी महत्त्वाची समस्या  म्हणजे- पर्सनलायझेशन सर्च आणि त्यातून अटेंशन इकॉनॉमीला मिळणारी चालना.   

समजा, दोन लहान मुलांना चेंडूशी खेळताना भान राहिलं  नाही आणि ती चेंडूच्या मागे रस्त्यावर धावत आली,  तेव्हाच तिथून एक स्वयंचलित मोटारगाडी चालली आहे.  गाडीचा मालक मागच्या सीटवर शांतपणे झोपला आहे. जर  स्वयंचलित गाडीनं त्या दोन मुलांना वाचवण्यासाठी  अचानक बाजूच्या लेनमध्ये गाडी घुसवली,  तर समोरून  येणाऱ्या ट्रकला ती गाडी धडकेल. गाडीचा मालक तत्काळ  गतप्राण होईल. जर गाडी त्याच लेनमधून जात राहिली,  तर  ती दोन मुलं मरण पावतील. अशा वेळी स्वयंचलित गाडी  चालवण्यासाठी त्या गाडीला कृत्रिम बुध्दीमत्ता वापरून जो  अल्गॉरिदम प्रोग्राम करून द्यायचा आहे, तो कोणता द्यावा?  गाडीच्या मालकाचा जीव वाचेल असा, का त्या मुलांचा  जीव वाचेल असा?  कृत्रिम बुध्दीमत्ता हा आजच्या जगातल्या परवलीचा शब्द  झाला आहे. युवाल नोहा हरारी या प्रसिध्द लेखकानं याच  कृत्रिम बुध्दीमत्तेचे संभाव्य फायदे-तोटे सांगताना एका  मुलाखतीत हे उदाहरण दिलं आहे. गुगलमधल्या एका  अधिकाऱ्यानं हरारीची घेतलेली ही मुलाखत यु-ट्यूबवर  उपलब्ध आहे. 

हरारीनं ऑक्सफर्ड विद्यापीठातून  इतिहासातली डॉक्टरेट मिळवली आहे. तो  जेरुसलेममधल्या विद्यापीठात इतिहास या विषयाचा  प्राध्यापक आहे. बिल गेट्‌सपासून बराक ओबामांपर्यंत  त्याचा फॅन क्लब आहे. हरारीनं मुलाखतीत मांडलेल्या मोटारगाडीबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर एलॉन मस्क या उद्योजकाला स्वयंचलित गाड्या तयार करताना शोधावं लागलं होतं. त्यासाठी  2015 मध्ये त्यानं काही लोकांच्या मतांची चाचपणी केली  होती. ते करताना पादचाऱ्यांना मारून टाकणारी आणि  मालकाला वाचवणारी गाडी बनवावी; का पादचारी वाचले  पाहिजेत,  मग मालक मरण पावला तरी चालेल अशी गाडी  तयार करावी- असा प्रश्न त्यानं निवडक लोकांना विचारला.  जर अशी परिस्थिती आली तर पादचाऱ्यांना वाचवावं,  मग गाडीचा मालक मृत्युमुखी पडला तरी चालेल, असं  त्यातल्या अनेक जणांनी उत्तर दिलं. पण ‘प्रत्यक्षात गाडी  घ्यायची वेळ आली,  तर कोणती घ्याल?’ असा प्रश्न  विचारल्यावर मात्र ‘जी मालकाला वाचवेल,  तीच गाडी  विकत घेऊ’ असं सांगितलं.

एकूणच अनेकांची नैतिक,  धार्मिक,  राजकीय  गोष्टींबद्दलची आदर्श विचारसरणी आणीबाणीच्या प्रसंगात वागताना मात्र तितकीशी आदर्श राहत नाही,  हे हरारीनं  आपल्या ‘21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी’ या पुस्तकात  सविस्तर लिहिलं आहे. आजच्या ग्राहककेंद्रित  अर्थव्यवस्थेत मस्कची टेस्ला ही कंपनी स्वयंचलित  मोटारगाड्यांची कदाचित दोन प्रकारची मॉडेल्स तयार करेल. त्यातून ग्राहकाला योग्य वाटेल ते मॉडेल तो विकत  घेईल,  असं हरारी पुढे म्हणतो. ‘सेपियन्स’ या आपल्या पहिल्या पुस्तकात हरारीनं मानवजातीच्या इतिहासाचं अत्यंत मर्मभेदी विश्लेषण केलं  होतं. ‘होमो ड्युस’ या त्यानंतरच्या पुस्तकात हरारीनं  मानवाच्या भवितव्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता.  या दोन्ही पुस्तकांचे 45 भाषांमध्ये अनुवाद होऊन 1.2 कोटी प्रती आजवर अनेक देशांमधल्या लोकांपर्यंत पोचल्या  आहेत. ‘21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी’ हे पुस्तक आपण का  लिहिलं,  यावर हरारीनं लिहिलेलं मनोगत विचारांना चालना  देणारं आहे. 

त्याच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या जगात निश्चित अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे- अनिश्चितता.  कृत्रिम बुध्दिमत्ता आणि त्यावर आधारित यंत्रमानव यामुळे  वाढणारी बेरोजगारी, बदललेल्या कामांच्या स्वरूपाबाबत अनिश्चितता,  दहशतवाद किंवा पर्यावरणातले बदल यामुळे  सतत मृत्यूची टांगती तलवार, आर्थिक-राजकीय- सामाजिक-सांस्कृतिक समजुतींना अकस्मात धक्के देणारे  बदल हे सतत चालू आहे. पण मुळात या बदलांची सामान्य लोकांना अजिबात  कल्पना नसते. त्या अज्ञानाची हरारी दोन कारणं देतो. यापैकी पहिलं कारण म्हणजे,  अनेकांना हे ज्ञान मिळवणं  शक्यच नसतं. मुंबईच्या झोपडपट्टीत दोन मुलांच्या दोन  वेळेच्या घासासाठी झगडणारी माऊली;  मध्य समुद्रात भरकटलेले आणि आपल्याला पडाव टाकायला हक्काचा  जमिनीचा तुकडा कुठे दिसतो आहे का,  हे शोधणारे  निर्वासित, अपघातात जखमी होऊन इस्पितळात शेवटचा  शोस घेण्याची धडपड करणारा जीव यांच्यापुढे जागतिक  तापमानवाढ किंवा लोकशाहीची मूलतत्त्वं याचा विचार  करण्यापेक्षा खूप गंभीर समस्या आहेत.

अशा लोकांना  शिकवण्यासाठी माझ्या पुस्तकात कोणतेच धडे नाहीत; उलट दुर्दम्य इच्छाशक्ती मीच त्यांच्याकडून शिकेन,  असं  हरारी म्हणतो.  पण ज्यांना आपल्या भोवताली काय चाललं आहे  त्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी वेळेची गुंतवणूक  करण्याची इच्छा आणि सवय नाही, त्यांच्याबद्दल मात्र  हरारीनं असे उद्‌गार काढले आहेत;  आपल्याला त्याहून  खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. आपल्याला  आपल्या कामावर जायचं असतं,  मुलांना वाढवायचं असतं  किंवा पालकांचा सांभाळ करायचा असतो. इतिहास मात्र  आपल्याला सवलत देऊ शकत नाही. तुम्ही गैरहजर  असलात तरी मानवतेचं भवितव्य ठरत जातंच. पण त्याचे  परिणाम मात्र तुम्हाला सगळ्यांनाच भोगावे लागतात.  प्रत्येकानं दिवसातून थोडा वेळ तरी आजूबाजूच्या घटनांकडे  सजगपणे पाहावं,  बदल घडवून आणणारी काही तरी कृती  करावी- असं हरारीनं सुचवलं आहे. तुमची एक कृती काय  घडवू शकते याचं ‘मी टू’ चळवळ हे उत्तम उदाहरण आहे.  मिलानो या अमेरिकन महिलेलं 15 ऑक्टोबर 2017 रोजी  मी टू हा हॅशटॅग वापरून टि्वट केलं. 

दिवसभरात 2 लाख  महिलांनी तो हॅशटॅग टि्वटवर वापरला. त्याच विषयावर  फेसबुकवर 24 तासांत 47 लाख लोकांनी 1.20 कोटी  पोस्ट टाकल्या होत्या. जगभरातल्या कोट्यावधी स्त्रियांनी  यानंतर कामाच्या ठिकाणी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक  अत्याचारांना वाचा फोडली.  जगाबद्दलच्या अज्ञानाचं हरारीनं मांडलेलं दुसरं महत्त्वाचं  कारण म्हणजे,  नॉलेज इल्युजन. उदाहरणार्थ, एका ग्रुपमध्ये ‘पेन कसं चालतं?’ हे विचारलं. तेव्हा जवळपास  सगळ्यांना आपण ते सांगू शकू, याबद्दल आत्मविश्वास  वाटत होता. पण त्या प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगा,  असं  म्हटल्यावर अनेक जणांना ते माहिती नव्हतं असं लक्षात  आलं. स्टीव्हन स्लोमन आणि फिलीप फर्नबाक या  मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या दोन संशोधकांनी या प्रकाराला ‘द नॉलेज इल्युजन’ असं नाव दिलं आहे. आज  जगात सभोवताली काय चाललं आहे,  त्याबद्दलचं आपलं  अपुरं ज्ञान किंवा पुरेपूर अज्ञान कोणी मान्य करत नाही. इतर  सर्वांकडचं ज्ञान आपलंच आहे,  असं आपण मानून चालतो. त्यामुळे निर्माण होणारं नॉलेज इल्युजन कमी करण्यासाठी  काही महत्त्वाच्या विषयांची ओळख हरारीनं या पुस्तकात  करून दिली आहे. 

पुस्तकाच्या तंत्रज्ञानाबाबतची आव्हानं,  या पहिल्या  भागात भ्रमनिरास, काम, स्वातंत्र्य, समानता; राजकारण- विषयक दुसऱ्या भागात समूह,  सिव्हिलायझेशन,  राष्ट्रवाद,  धर्म,  स्थलांतरित;  नाऊमेदी आणि आशा या तिसऱ्या  भागात दहशतवाद,  युध्द  विनम्रता,  देव, सहिष्णुता; सत्य  या चौथ्या भागात अज्ञान,  न्याय, पोस्ट ट्रूथ,  सायन्स  फिक्शन आणि लवचिकता या पाचव्या भागात शिक्षण, अस्तित्वाचा अर्थ व ध्यानधारणा अशी एकूण 21 प्रकरणं  आहेत.  या पुस्तकातले सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. पण  कृत्रिम बुध्दिमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण  होणारी बेरोजगारी हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या प्रयत्नांना  ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ असं म्हटलं जातं.  माणूस ज्या प्रकारे शिकतो,  जसा विचार करतो आणि जशी  आपली बुध्दिमत्ता वापरतो; तसंच कॉम्प्युटरचा वापर करून  त्याला माणसासारखा विचार करायला लावणं,  हे एआयचं  तत्त्व आहे. 

यंत्रमानवाची (रोबोट) संकल्पना एआयवर  आधारलेली आहे. यंत्रमानवाला संगणकीय भाषेत सूचना दिल्यानंतर तो त्या सूचना पार पाडतो.  एआय आता वैद्यक,  पत्रकारिता,  वैज्ञानिक संशोधन,  वकिली अशा सर्व क्षेत्रांत पोचलं आहे. त्यामुळे वैमानिक  असो, विक्रेता असो, वकील असो वा आर्थिक सल्लागार असो; बेरोजगारीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर  आहे. सिटी बँकेनं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं  यंत्रमानवांमुळे कोणाकोणाचे रोजगार जाऊ शकतील यावर  तयार केलेल्या अहवालानुसार, इंग्लंडमधले 35 टक्के  रोजगार मानवाकडून यंत्रमानव हिसकावून घेतील.  अमेरिकेमध्ये हे प्रमाण 47 टक्के असू शकतं. तसंच  भारतातल्या 69 टक्के इतक्या नोकऱ्यांवर यंत्रमानवांमुळे गदा  येईल.  हरारीनं कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या वाढतील,  त्याचाही ऊहापोह केला आहे. उदाहरणार्थ- डॉक्टर्सच्या  नोकऱ्या किंवा व्यवसाय संपेल हे खरं असलं,  तरी नवी  औषधं आणि शस्त्रक्रियेच्या पध्दती शोधणं ही संशोधनाची  कामं खूप वाढतील. पण या नव्या नोकऱ्यांमध्ये विशिष्ट  कौशल्यं आणि नैपुण्याची गरज असेल. कामाच्या बाबतीतल्या अशा बदलांना प्रत्येक माणसाला भावनिक/ मानसिक पातळीवर तोंड देणं त्रासदायक ठरेल. यावर उपाय  म्हणून माणूस-एआय यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा  एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं ठरेल. औषधांपासून ते  ध्यानधारणेपर्यंत अनेक तंत्रं तो ताण कमी करण्यासाठी  वापरावी लागतील,  असं हरारी सुचवतो.  

हरारीनं मांडलेली दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे  पर्सनलायझेशन सर्च आणि त्यातून अटेंशन इकॉनॉमीला मिळणारी चालना. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून औद्योगिक  अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल केली. नंतरच्या माहिती  तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महापूर लोकांवर  कोसळायला लागला. त्या माहितीकडे लोकांचं जाणारं लक्ष  हे संसाधन बनलं. माहिती दिवसेंदिवस वाढत गेली आणि  लक्ष हे संसाधन दुर्मिळ होत गेलं. हे लोकांचं लक्ष वेधून  घेऊन पैसे कमावणारी ती अटेंशन इकॉनॉमी.  वेबसाईट्‌सवर माणसाचं अटेंशन-लक्ष हे आता एक  महत्त्वाचं संसाधन झालं आहे. जगाची लोकसंख्या 700 कोटींच्या आसपास असल्यामुळे ते संसाधन मुबलक  प्रमाणात उपलब्ध आहे. इंटरनेट 1990 मध्ये जेव्हा  ग्राहककेंद्रित झालं, तेव्हा अटेंशन इकॉनॉमीचं मॉडेल  ऑनलाईन कसं वापरता येईल यावर तज्ज्ञ कामाला लागले. गुगलची उलाढाल 2000 च्या दशकात 2300 कोटी  डॉलर्सची होती. आज वीस वर्षांनंतर गुगल ही अमेरिकेतली दुसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे. तिची उलाढाल 80000 कोटी डॉलर्सची आहे. त्या तुलनेत पाहायला गेलं तर एक्झॉनमोबिल या तेल खणणाऱ्या कंपनीची उलाढाल  फक्त 23700 कोटी डॉलर्स आहे. थोडक्यात, तेल खणण्यापेक्षा इंटरनेटवर लोकांचे डोळे कशाकडे किती वेळ  लक्ष देतात ती मिनिटं खणून काढणं आज जास्त नफा  मिळवून देतंय! 

या कंपन्या हे साध्य करताना परवलीचे दोन शब्द  वापरतात. ते शब्द म्हणजे पर्सनलाइज्ड सर्च आणि त्यामधून  तयार झालेले फिल्टर बबल्स. हे सगळं नेमकं काय आहे,  याचं उदाहरणच पाहू.  ‘कुत्रा पाळणं योग्य/चांगलं आहे का ?’ असा सर्च  गुगलला देऊन बघा. मग कुत्रा पाळणं किती चांगलं आहे,  कुत्रा पाळण्याचं तंत्र काय आहे,  वगैरे रिझल्ट्‌स गुगल  दाखवेल. त्यानंतर लगेचच कुत्रा पाळणं हा दुष्टपणा आहे का?’ असा सर्च द्या. त्यानंतर ‘कुत्रा किंवा इतर प्राणी  पाळणं किती आणि कसं दुष्टपणाचं आहे यावर रिझल्ट्‌स  येतील. अशा प्रकारे तुमच्या मनाचा कल ओळखून गुगल  तुम्हाला वेगवेगळी वेबपेजेस दाखवतं. ही झाली पर्सनलाइज्ड सर्च. पर्यावरणाची हानी या विषयावरचे  निकालही पर्यावरणावर सामाजिक काम करणाऱ्या  माणसाला आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे  दिसतात. याच प्रकारे आपल्या आर्थिक,  राजकीय,  सामाजिक,  सांस्कृतिक आदर्शांना/आवडी-निवडींना  अनुसरून इंटरनेटवर अनेक वेबसाईटस आपल्याला  रिझल्ट्‌स दाखवतात. असं कसं होतं?  याचं उत्तर आहे  फिल्टर बबल्स..!

फिल्टर बबल हा शब्द एलि पॅरिसर यानं 2011 मध्ये  प्रथम वापरला होता. जो माणूस इंटरनेट वापरत असतो  त्याचं ठिकाण,  तो कोणत्या गोष्टींवर क्लिक करून त्या  गोष्टी जास्तीत जास्त वेळा पाहतो (उदा.- स्त्रिया दागिने  आणि पुरुष मोटारगाड्या) आणि तो कोणकोणत्या गोष्टी  सर्च करतो (उदा.- शिवाजीमहाराज,  डोनाल्ड ट्रंप,  गोवा,  पॅरिस,  मिसळ असं काहीही) अशा अनेक गोष्टींवरून  असंख्य वेबसाईट्‌स माहिती गोळा करतात. त्यावर  अल्गॉरिदम्स लिहितात. त्यावरून त्या माणसापुरतं त्याचं वैयक्तिक विेश तयार करून त्याच्या आवडीच्या वस्तू  त्याच्यासमोर आणल्या जातात.  हे सगळं करून गुगलला काय मिळतं?  तर,  इंटरनेट  वापरणाऱ्याची जितकी नेमकी आणि अचूक वैयक्तिक  माहिती मिळवली जाईल तितक्या जास्त योग्य जाहिराती  वेबसाईट्‌स त्याला दाखवू शकतात. इंटरनेट वापरणारा माणूस ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची शक्यता त्यातून  वाढत जाते. उदा.- ॲमेझॉन प्रत्येक ग्राहकाची आवड- निवड ओळखून त्याच्यासमोर ती विशिष्ट गोष्ट ठेवतं.  त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वांत जवळच्या विेशासू  मित्रालाही सांगत नसाल इतकी माहिती ही पर्सनलाइज्ड  सर्च गोळा करते. उदाहरणार्थ- डिप्रेशन हा एक शब्द जर  तुम्ही डिक्शनरी डॉट. कॉमला शोधलात,  तर औषधं पुरवणारी वेबसाईट लगोलग तुम्हाला अँटिडिप्रेसंटची  जाहिरात दाखवायला लागते. 

आता आपल्यापर्यंत कोणते  ई-मेल्स पोचावेत,  आपल्याला जोडीदार कसा मिळावा,  आपण कोणत्या रेस्टॉरंट्‌समध्ये जावं- हे सगळं या  वेबसाईटवरच्या कंपन्या ठरवतात. अल्गॉरिदम्स आता  जाहिराती दाखवण्याबाबत निर्णय घेता-घेता आपल्या  आयुष्याचं सुकाणूच हातात घ्यायला लागले आहेत.  यामुळेच गुगलनं आपलं तंत्रज्ञान मानवाच्या सुरक्षेसाठी  वापरावं,  पण उत्पादनं विकण्यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नये- असं मत या मुलाखतीच्या शेवटी  हरारीनं मांडलं आहे. समकालीन समस्यांची जाणीव करून  घेण्यासाठी ही मुलाखत पाहणं ही पहिली पायरी ठरेल.  

मुलाखतीची लिंक https://youtu.be/Bw9P_ZXWDJU

Tags: Google Interview Yuval Noah Harrari artificial budhhimtta tantradnyan manasashasra sanskruti samaj harari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके