डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाणी पंचायतीचे 'पाणी बाबा' : विलासराव साळुंखे

समतेच्या लढ्याचे 'साधना'ला सर्वाधिक अगत्य आहे. पाण्याच्या क्षेत्रात हा समतेचा लढा ज्या अभ्यासू आणि समर्पित भावनेतून विलासराव साळुंखे यांनी दिला तो अभूतपूर्व आहे, या कार्यात त्यांच्या सोबत वावरलेल्या तरुण सहकाऱ्याची ही आदरांजली.

23 एप्रिलची सकाळ अशा फोनने होणार याची मुळीच जाणीव नव्हती. दिल्लीमध्ये कामानिमित्त आल्यावर पुण्याहून फोन येणे फारच स्वाभाविक; पण गौरीने फोन करून सांगितले, “नीलेश, विलासराव आज सकाळी हृदयदाबाच्या झटक्याने गेले.” या निरोपाने क्षणभर मन इतके सुन्न झाले, की समोर बसलेल्या खा. चिंतामणजी वनगांनीदेखील “अरे, काय सर्व ठीक आहे ना?” असे विचारले, पाणीप्रश्नाशी जोडलेल्या आम्हा सर्व तरुण अभियंत्यांचे मार्गदर्शक, आपुलकीने कायम विचारपूस करणारे वडील मित्र, सासवड भागातील सामान्य शेतकऱ्यांचे ‘पाणी बाबा', ग्रामायनसारख्या स्वयंसेवी चळवळीचे आधारस्तंभ, यशस्वी मराठी उद्योजक, रोज नवीन प्रयोगातून शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणारे मृदू आणि मितभाषी पण नेमकेपणाने कोरडवाहू शेतकऱ्याच्या गरिबीचे मूळ शोधणारे, माणशी अर्धा एकर पाणी या सिद्धांताचे जनक, पाणीपंचायतीचे संस्थापक, अध्यक्ष विलासराव गेले.

काही वेळ ही बधिरता तशीच राहिली. आणि विलासरावांच्या आठवणींनी मन भरून आले. वेड्यासारखे सर्व मित्रमंडळींना फोन केले. दिल्लीतील त्यांच्या खास चाहत्या मित्रांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांना सांगितले, आणि नकळत सर्वांशी बोलताना विलासरावांच्या आठवणींचा संच मनात तयार झाला आणि प्रथमच न राहवून ही मोठी आठवण लिहून काढायचे ठरवले.

बारा वर्षांपूर्वी कॉलेजमधील शेवटच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसारख्या विषयाचा अभ्यास करताना आपण देशातील पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांना बगल देत आहोत, याची जाणीव होत होती आणि त्याच सुमारास ज्ञानप्रबोधिनीच्या संतोष गोंधळेकरची कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्र शिबिरात भेट झाली. तोही इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा विषय घेऊन करत होता; पण लक्ष मात्र पूर्णपणे वेगळ्याच विषयात होते. त्याने प्रथम मला सासवडजवळील खळद येथे, विलासरावांची कर्मभूमी, तसेच जिवंत प्रयोगशाळावजा आवारात नेले. निमित्त होते त्यांच्याकडील लेव्हल घेण्याचे व तीही नर्मदेच्या विस्थापितांना जी पाण्याची पातळी बुडित क्षेत्रासाठी सरकारने आणून दिली आहे, त्याची खात्री करून घेण्यासाठी मेधा पाटकरांसाठी सर्वेक्षण करून देण्याचे. मेधाचे विलासरावांशी आधीच बोलणे झाले होते. पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपड्यातील हलकीशी दाढी असलेले सतत हसतमुख असणारे विलासराव मनावर वेगळीच पाहिली छाप पाडून गेले. लेव्हल घेताना परत आल्यावर निवांत बोलू म्हणून त्यांनी आम्हाला निरोप दिला. संतोषशी प्रवासात झालेल्या गप्पांमुळे विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू कळले व विलासरावही इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याचा त्याला विशेष अभिमान होता. तो त्यांच्या संपर्कात सुमारे दीड वर्षांपासून होता. त्यांनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या सिद्धांताबद्दल जरी फार कळले नाही तरी उत्सुकता नक्कीच वाटली; व हे काहीतरी रुटीनपेक्षा वेगळे आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

पाणीवाटपाचा मूलभूत विचार

मी त्या सुमारास नुकतीच महाराष्ट्रातील पाणीप्रश्न या विषयाच्या वाचनास सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील पाण्याच्या वाटपाबद्दलचा फार मूलभूत विचार विलासरावांनी मांडला; काही काळ समाजवादी, साम्यवादी विचार म्हणून उसाच्या धनदांडग्या शेतकरी, पुढारी वर्गाने त्यांची हेटाळणी केली. परंतु विलासरावांचा द्रष्टेपणा आजच्या पाणीटंचाईच्या काळात जाणवल्यानंतर आज मात्र या पुढाऱ्यांची भंबेरी उडालेली दिसते. मुख्यत्वे शास्त्रशुद्ध मांडणी आणि उपलब्ध माहितीचे विज्ञाननिष्ठ विश्लेषण यांमुळे महाराष्ट्रातील काय, किंबहुना देशाचा पाणीप्रश्न हा मानवनिर्मित आहे आणि निसर्गनिर्मित नाही; हा सामान्यांना वरकरणी चुकीचा वाटणारा आणि दिवसेंदिवस पावसाच्या वेभरवशीपणाला शिव्याशाप देणाऱ्या शेतकरी, पुढारी वर्गाच्या मतांमुळे चूक वाटणारा खरा सिद्धांत त्यांनी विचारपूर्वक मांडला. देऊन ग्रामीण भागात एकूण लागणाऱ्या पाण्याच्या फार तर फार 2 % पाणी पिण्यासाठी पुरेसे आहे आणि सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था केली तर पिण्याचे पाणी थोड्या सामाजिक शिस्तीने अगदी नक्की 'बाय प्रॉडक्ट’ म्हणून उपलब्ध होईल, ही वस्तुस्थिती विलासरावांमुळेच महाराष्ट्राला अवगत झाली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैव म्हणजे हे कळूनही अंमलबजावणी अद्यापही होत नाही.

बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात लागू असलेल्या व पुढे इतर राज्यांत ज्याचे उदाहरण दिले जाते, अशा रोजगार हमी योजनेबाबत विलासरावांनी फार मूलभूत सूचना केल्या. रस्त्यासारखी दुष्काळी कामे काढून पैसे वाया घालवण्यापेक्षा पाझर तलाव, तळी यांची कामे करून 'पुढील पावसाचे पाणी साठवण्यासाठी सज्ज राहा' हा महाराष्ट्राला दिलेला बहुमोल सल्ला आजही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे व त्या काळातील या धोरणामधील आमूलाग्र बदलास कारणीभूत झालेले व तटस्थपणे महाराष्ट्रातील दुष्काळांचा अभ्यास केलेले इलेक्ट्रिकल इंजिनियर, अ‍ॅक्युरेट गेजिंग या स्वतःच्या यशस्वी मेकॅनिकल क्षेत्रातील उद्योजक प्रणेते विलासराव होत. या सर्व तत्त्वज्ञानाचे बालामृत आत्मसात करीत असतानाच पाण्याचे गावपातळीवर नियोजन आणि वाटप यांचा एकत्रित विचार होणे अत्यंत गरजेचे आहे, हे मत किती मूलतः विचार केलेले आहे, हे जाणवले. कधीकधी तर पुढे जाऊन मांडलेले भूमिहीनांचेही पाण्याचे अधिकार इत्यादी विषय फारच तात्त्विक वाटल्याने सवडीने विलासरावांशी त्यावर चर्चा केली, तर त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील पाणी कायदा काय सांगतो, जलनीती म्हणून आपण आज किती मागास विचार करतो आहोत; तसेच एक ना एक दिवस पाणी हा घटनेतील मूलभूत हक्कांमध्ये जाणारा विषय आहे, हे त्यांचे प्रतिपादन ऐकून त्या बालवयात या कल्पना रम्य, गूढ वाटणे याव्यतिरिक्त अन्य काही होणे अशक्य होते, पण ग्लोबल वॉटर पार्टनरशिपच्या बैठकीत वसुधा पांगारेद्वारा हाच विचार सध्या जगभर मांडला जात आहे; आणि हा विचार कैक वर्षांपूर्वी मांडणारे आपले गुरुजी किती दूरचा विचार करीत होते, हे सांगितल्यानंतर खरोखरीच हा माणूस काळाच्या फारच पुढचा विचार करीत असल्याने सर्वसामान्यांना पचला नाही, अशा निष्कर्षाप्रत येऊन पोहोचणे अपरिहार्य आहे.

संतोष गोंधळेकर, प्रसाद सेवेकरी व प्रसाद रसाळ यांनी प्रत्यक्ष विलासरावांच्याबरोबर पाठ्यवृत्ती मिळणारे विद्यार्थी म्हणून काम करण्यास सुरुवात केली तर ग्रामीण भागातील प्रश्न समजावून घेण्याच्या धडपडीने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीतील मार्गापेक्षा ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकसन विभागात अन्य मित्रांसोबत अनुभव घेण्याचे ठरवले. गावागावांतून आरोग्य व युवक संघटन या विषयांकरिता हिंडताना प्रकर्षाने जाणवले की पाण्याची समस्या हीच सर्व ग्रामीण दारिद्याच्या मुळाशी आहे आणि विलासरावच या कोरडवाहू तसेच मर्यादित सिंचनक्षमतेच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना मार्ग दाखवू शकतात, याची खात्री झाली. यामधूनच प्रत्येक गावात सर्वप्रथम पाण्याच्या समस्येचे निराकरण व मगच पुढील कार्यक्रम, हे समीकरण बनले. गुरुजींनी शिकवलेली समीकरणे, तसेच कोष्टके गावपातळीवर वावरांमध्ये तपासून पाहिली आणि विठ्ठल भोईटे, संपतनाना बोरकर या गावपातळीवरील सहकाऱ्यांनाही ही तंतोतंत बिनातपशीलाची पटतात. हे पाहिल्यावर आणखीनच आत्मविश्वास वाढला. तसे म्हटले तर विलासरावांना गुरू मानून आमची एकलव्यगिरी चालू होतीच आणि मधे कधी तरी संधी मिळताच त्यांच्या सहवासातून काय मिळेल ते शिकणे, असा कार्यक्रम जवळपास दोन वर्षे चालू राहिला.

याच कालावधीत शेतकऱ्यांचे पुढारी शरद जोशी तसेच अन्य शेती अर्थविषयक तज्ज्ञ व दांडेकरांसारखे प्रकांड पांडित्य असलेले अर्थतज्ज्ञ यांच्याशी विविध प्रसंगी चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली. शरद जोशींच्या स्वभावाप्रमाणे अर्थातच त्यांनी माणशी अर्धा एकर पाणी वगैरे समाजवादी कल्पनांनी शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही, याउलट त्याला गरिबी वाटून कशी घ्यावी, याचे तत्त्वज्ञान आपण शिकवल्यासारखे होईल इत्यादी हेटाळणीवजा युक्तिवाद केले; तर दांडेकरांनी थोडे विचकत पण असाच काहीसा सूर लावला. एकूणातच अर्थशास्त्र कशाशी खातात; आणि त्यातून ग्रामीण अर्थरचना वगैरे प्रश्नावर ह्या मंडळींसमोर आपली काय टाप, या भावनेतून गप्प राहणेच योग्य आहे असे ठरवले. पण गुरुजींनी (विलासरावांनी) यावरही विचार नक्कीच केला असणार! तरी यावर त्यांच्याशीच चर्चा होणे आवश्यक आहे, असे कुठेतरी वाटतच राहिले. आणि आज, कुठे बापू उपाध्ये यांनी मांडलेल्या सहभागी सिंचनाच्या प्रयोगातून, तसेच सध्या चालू असलेल्या सर्व क्षेत्रातील समता आणि समानतेच्या आग्रहातून आपल्यावरील गुरुजीचे संस्कार खरे तर या प्रश्नांची उत्तरे देण्यास खंबीर होते असे वाटल्याशिवाय राहात नाही.

वेगवेगळ्या बैठकांमधून विलासरावांना ऐकत राहणे आणि त्यांनी मांडणी केलेल्या विचारांचे चिंतन करून त्याची ग्रामीण भागात प्रयोगांमध्ये अंमलबजावणी सुरू करणे हे जणू व्यसनच जडले होते. सध्या स्वयंसेवी क्षेत्रात चालू असलेल्या बुवाबाजीच्या कितीतरी दूर आपले विलासराव कसे होते, याची उदाहरणे तर द्यावी तितकी थोडीच. 

कोरडवाहू शेतकऱ्यास संजीवनी

एका गावातील प्रयोगाने काही लोकांनी महाराष्ट्रातील- नव्हे देशातील- सहा लाख खेड्यांना उत्तर शोधल्याचे दावे केले. पण विलासराव मात्र मांडलेले सूत्र ठराविक एका सॅम्पल साईजच्या खेड्यांवरती अंमलबजावणी झाल्याखेरीज सार्वत्रिकीकरण करत नसत. हे त्यांच्या 100 हून अधिक विविध उपसा जलसिंचन योजनांच्या अभ्यासपूर्वक केलेल्या प्रयोगांतून लक्षात आले. काही तत्त्वे ही फार तर सर्व प्रयोगांमध्ये उपयोगी ठरतात, म्हणून तोच प्रयोग सार्वत्रिक कार्याचा मोह कधीही त्यांना झाला नाही आणि म्हणूनच त्यांची पाणी वाटपाची कल्पना कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता खरोखरीच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू शेतकऱ्याला संजीवनी ठरली. पाण्याची गावपातळीवर अशा प्रकारची चर्चा करणारा हा द्रष्टा ‘पाणी पंचायत' या संकल्पनेचा प्रणेता म्हणून देशात नव्हे तर अवध्या विश्वात ओळखला जाऊ लागला. आणि पाण्याच्या रेशनिंगच्या सिद्धांताने पु.ल.देशपांडे यांसारख्या लेखकालाही त्यांनी डिवचल्यावाचून सोडले नाही. याचाच परिपाक म्हणून पुलंनी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माणशी अर्धा एकर पाणी: एक विलक्षण कल्पना' हा लेख लिहिला.

स्वयंसेवी क्षेत्रातील कामावरती जेवढा दृढ विश्वास विलासरावांचा होता, त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्तीशिवाय धोरणात्मक बदल घडणे केवळ अशक्य आहे, या भावनेपोटी विलासरावांनी 1984 साली स्वतः आमदारकीची निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. विलासरावांना निवडून जाऊन सत्तेचे राजकारण न करता विषयांवर आधारित दबावगट निर्माण करायचे होते, हे त्यांना कळलेच नाही. किंबहुना पाणीपंचायतच्या संकल्पनेलाच थोड़ासा सेटबॅक मिळाला, अशाही निर्णयाप्रत येणे गैर ठरणार नाही. परवा परवा म्हणजे सहा महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये अरुण शौरी हे प्रशासकीय सुधारणा या विषयाचे मंत्री असताना त्यांनी 'Ideas that have worked' या व्याख्यानमालेत शेवटचे पुष्प विलासरावांना गुंफण्यास सांगून पाणी पंचायतीच्या संकल्पनेचा एकप्रकारे गौरवच केला. त्या मुक्कामात तीन ते चार दिवस सकाळच्या न्याहरीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत विलासरावांशी गप्पा मारण्याचा योग आला. खरे सांगायचे तर मला एक बौद्धिक मेजवानीच उपलब्ध झाली. त्यांच्या इंजिनियर झाल्यापासूनच्या विविध आठवणी अतिशय मोकळेपणाने ते बोलत होते आणि मला जणू आपल्यासमोर कॅलिडोस्कोप आहे व दर मिनिटाला नवीन आकृती तयार होते आहे, याचा भास झाल्याप्रमाणे वाटत होते.

सतत नावीन्य

तसे म्हटले तर विलासरावांबरोबर अनेक प्रवास झाले. अगदी ग्रामीण विकास संस्था परिषदेच्या खिरोदा येथील जळगाव जिल्ह्यातील मधुकरराव चौधरींसमवेतच्या बैठकीपासून बाळासाहेब विखे यांनी आयोजित केलेल्या प्रवरानगरच्या पाणी परिषदेपर्यंत प्रत्येक वेळी नवीन ऐकायला मिळायचे आणि दर काही महिन्यांनी विलासराव नवीन प्रयोगाचे सूतोवाच करायचे.

आपल्याच कामाचे तुणतुणे वाजवत बसणे हे तर दूरच; पण लोकांनी कोणी कोणी त्यांची स्तुती केली आहे हे सांगणेही त्यांनी कधी आपणहून केले नाही. प्लॅनिंग कमिशनपासून ते प्रेसिडेंटपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यामध्ये त्यांना मिळालेली शाबासकी, ही खरे तर फार मोठी आणि मोलाची आहे.

दिल्लीतील वास्तव्यामधील अनुभव ऐकताना तर त्यांचे उद्योग- क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, मराठी उद्योजकाच्या अडचणींवरती उपाययोजनांसाठीची त्यांची धडपड यांवर स्वतंत्र लेख होऊ शकेल असे वाटले. जरी मध्ये झालेल्या हृदयाच्या दुखण्याने त्यांना काहीसे निराश केले, तरी त्यांच्या मनातून, बुद्धीतून येणाऱ्या नवनवीन प्रयोगांच्या कल्पना पाहूनच आम्हा अभियंत्यांचा गट त्यांचे शिष्यत्व पत्करण्यास राजी झाला, तर असे अनेक वयोगटांतील मित्र-मैत्रिणी त्यांचे चाहते झाले. आपल्या या हृदयाच्या दुखण्यावर विचारले असता ते गंमतीने म्हणत; “ओ! इतके दिवस शेतीला पाणीपुरवठा करण्याचा अभ्यास करत होतो; आता हृदयाद्वारे शरीराच्या सर्व अवयवांना रक्त पुरवठा करण्याचा अभ्यास करतो आहे इतकेच!”

मृदु आणि अत्यंत समंजस स्वभावाबरोबरच कमालीची सहनशीलता हा त्यांचा फार मोठा गुण होता. अहम् हा शब्दच जणू माहिती नसलेला हा माणूस व्यक्तिगत जीवनात कमालीच्या साधेपणाने राही. स्वतःच्या कमावलेल्या पैशाने हवा तेवढा विमानप्रवास करू शकणारा हा अवलिया सेकंड क्लास स्लीपरने किंवा बसने सर्व ठिकाणी कल्पनाताईंच्याबरोबर फिरताना पाहिल्यावर खरेच स्वतःची लाज वाटली.

गणेश पांगारेंशी सहज मध्यंतरी 'एन.जी.ओ' आणि 'फंडींग' या विषयावर चर्चा चालू होती. गाडी बऱ्याच रथी महारथी पुरस्कारविजेत्या मंडळींवरून घसरत असताना गणेश म्हणाला, “फोर्ड फाऊंडेशनच्या इतिहासात 1980 च्या दरम्यान एक कोटीपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही अटीविना त्यांनी देऊ केली असताना, माझ्याऐवजी ही रक्षम दुसऱ्या कोणाच्या उपयोगी पडेल म्हणून ती नाकारणारे बिलासराव साळुंके हे एकमेव उदाहरण असेल. परंतु महत्त्वाचे म्हणजे तरीही त्यांच्या वागण्याला बिलकुलही दर्प नव्हता व कोणतीही पूर्वग्रहदूषित मतेही नव्हती. प्रामाणिकपणा आणि सचोटी याचा यापेक्षा मोठा दाखला आमच्या पिढीला कोणाचा असावा?

व्यक्तिगत आयुष्यात विलासरावांना त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या कामात, विशेषतः कल्पनाताईंकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत तर बोलावे तितके थोडेच.

72 नंतर कारखान्याचे काम कल्पनाताईंनी स्वतःकडे घेतले व विलासरावांना पूर्ण मोकळीक दिली. पण हे करत असताना, अत्यंत हसतमुखाने घरी कधीही भेटल्या, तरी पाणी या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यादेखील तितक्याच तयारीने बोलत असत. पुढे विक्रम आणि आदित्य यांनी तर व्यवसाय इतक्या उत्तम रितीने सांभाळला, की अॅक्युरेट कंपनी आणि विलासराव यांचे काय नाते आहे ते आजच्या पिढीला उमगणे फारच कठीण आहे. विलासरावांच्या कुटुंबीयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सर्व उपक्रमांत ही मंडळी तनमनधनपूर्वक सामील होतात; अगदी सुनांनादेखील अशाच सहभागी झालेल्या दोन  वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमात मी स्वतः पाहिले आहे.

सात्विक संताप

विलासरावांना मी रागावलेले पाहिल्याचे आठवते नाही. केवळ एक प्रसंग जरूर नमूद करावासा वाटतो. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात पुण्यामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात माधवराव चितळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व वैश्विक उदाहरणे देत केलेले भाषण महाराष्ट्रातील मूळ पाणी प्रश्नाला अनुत्तरित ठेवत गेलेले पाहून विलासरावही काहीशा उपरोधाने बोलले. तेव्हा इस्रायलच्या उदाहरणाविषयी त्यांनी जे उद्गार काढले ते प्रत्येक अभियंत्याने लक्षात ठेवण्याजोगे आहेत. “इस्रायलकडून टेक्नॉलॉजीपेक्षा मोटिव्हेशन शिकणे जास्त महत्त्वाचे आहे”, हे ते होते. त्याचबरोबर स्वतः पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी स्वखर्चाने अन्य देशांतही- वेळप्रसंगी विरोधही पत्करून- त्यांनी कसा प्रवास केला, ही कहाणी तर शोधपत्रकारांना लाजवेल अशी आहे.

विलासरावांना तुकारामाची गाथा असो किंवा महात्मा फुले असोत; यांनी पाण्यावरती काय काय म्हटले आहे हे मुखोद्गत असे; आणि त्याचे चपखल उदाहरणही ते देत.

या अचाट व्यक्तिमत्वाविषवी असणाऱ्या सर्व आठवणी सांगणेही या प्रसंगी उचित होणार नाही; पण काही निवडक प्रसंग सांगणे अपरिहार्य आहे.

पोपटराव पवार, सरपंच हिवरे बाजार, जि. अहमदनगर यांच्या प्रयोगाने माझ्यापेक्षा पुढची पायरी गाठली आहे, हे सांगणारे विलासराव पाहिले की काही स्वयंसेवी महात्मे आपण न केलेले कामही स्वतःच्या नावावर खपवताना पाहून कीव येते.

सध्या त्यांना झपाटले होते, ते शेतीतील प्रयोग करणाऱ्या बेडकीहाळ या निपाणीजवळील देसाई या शेतकऱ्याने. तसेच विकोवा खोऱ्यातील समाज पाणीवाटपाच्या मुद्याने. दोन्ही विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. किंबहुना प्लॅनिंग कमिशनचे मेंबर अॅग्रिकल्चरिस्ट श्री. सोमपाल पुण्यामध्ये कार्यक्रमास आले असताना हा शेतीविषयक अभ्यास पाहून त्यांनी लगेचच या प्रयोगास भेट देण्याची इच्छा दर्शविली होती. पण अतिउत्साह व स्वस्त लोकानुनय हे दोन्ही अवगुण माहितीच नसलेल्या विलासरावांनी त्यांना नम्रपणे आपणाला मी अभ्यास पूर्ण झाला की कळवतो, असे सांगितले.

विकोवा खोऱ्यातील पाणीवाटपाचे प्रकरण तर इतके तापले की विलासराव आपले सहकारी आनंदराव पाटील रा. के. पाटील यांच्यासमवेत आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले. सरकारने शेवटी श्री.चितळे यांना दोन्ही बाजू ऐकून सरकारपुढे निःपक्षपाती निवेदन करण्याची विनंती केली. विलासरावांच्या अनुभवज्ञानाचा धाक इतका मोठा आहे, की महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हे ऐकावे लागले. यवतमाळच्या आदिवासी भागातील त्यांच्या प्रयोगांबद्दल ऐकले; आणि आदिवासींसाठीच्या पूर्ण मोफत उपसा जलसिंचन योजनेची त्यांनी केलेली आखणी पाहिली, त्यावर कोणी त्यांच्याबाबत केलेले इर्षेचे खोटेनाटे आरोप ऐकता फारच विषाद वाटतो. विलासरावांच्याबरोबर दोन गोष्टी ठरल्या होत्या; त्या सांगून थांबतो.

चीनमध्ये पाणी विषयात झालेले काम पाहण्यासाठी आपण जायला हवे. अगदी नुकतीच गुढी पाडव्याला 14 एप्रिल रोजी घरी हडपसरला आमची या विषयावर सविस्तर चर्चा झाली. किंबहुना प्रधानमंत्री कार्यालयातील सुधींद्र कुलकर्णी तसेच म्हाळगी प्रबोधिनीच्या विनय सहस्रबुद्धे यांनी काही खासदारांसमवेत यामध्ये यावे म्हणून तू प्रयत्न कर असे त्यांनी मला बजावले होते. परवा तर दिल्लीहून कपार्टमधून आल्यावर, आता काय करणार आहेस? गप्पा मारायला ये, असा फोन आला. मी गेल्यावर माझी पुढील दोन ते पाच वर्षे पाणी विषय विविध पातळ्यांवर लोकप्रतिनिधी, नोकरशहा आणि तज्ज्ञ लोकांसमवेत चर्चा करून किमान समान निर्णयाप्रत पोहोचण्याचे ठरवले आहे, हे सांगितल्यावर यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे व लोकांचे ऐकून घेऊन मगच निर्णय घेणे कसे महत्त्वाचे आहे. यावर सविस्तर मार्गदर्शन केले:

विलासराव दिल्लीत म्हणाले, “आता मी, पाणी पंचायतीचे काम तुम्ही तरुण पोरे जे कराल, तेच आहे असे जाहीर करतो.” हे ऐकून कोठेतरी क्षणभर फार बरे वाटले, पण लगेचच हे सतीचे वाण घेण्यास आपण लायक आहोत का हा विचार मनात डोकावून गेला. विक्रमच्या समवेत ठरल्याप्रमाणे किमानपक्षी हे काम पूर्ण केले, तरी हा द्रष्टा माणूस कशासाठी धडपडत होता, हे इतरांना कळेल व हीच विलासरावांना खरी श्रद्धांजली असेल.

Tags: माधवराव चितळे अरुण शौरी महाराष्ट्र टाइम्स पु ल देशपांडे ग्लोबल वॉटर पार्टनरशिप दक्षिण आफ्रिकेतील पाणी कायदा मेधा पाटकर ज्ञानप्रबोधिनी विलासराव साळुंखे निलेश कुलकर्णी Madhavrao chitale Arun Shoury Maharashtra Times P. L. Deshpande global water partnership water act in South Africa Medha Patkar Dhyan prabodhini Vilasrao Salunkhe Nilesh Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके