डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तिची खंत अन्‌ तिचं स्वप्न

जरा वेळ आराम झाल्यावर, कांदा कसा काढायचा? ऊस कसा कापायचा? असले प्रशिक्षणही आम्हाला मिळालं. स्वत: तोडलेला ऊस चाखण्याची मजाच निराळी! संध्याकाळ झाली होती. पुन्हा वातावरणात गारवा पसरू लागला. अंधारापूर्वी पुण्यात पोचलेलं बरं म्हणून काहीशा अनिच्छेने आम्ही तिथून निघालो. गणेश बऱ्याच दूरपर्यंत आम्हाला सोडायला आला होता. सोबत पपई, ऊस,कांदा, मिरच्या असं बरंच काही त्यानं आम्हाला दिलं. मळा सोडण्यापूर्वीच गणेशला त्याची पूर्ण रक्कम अगदी रोख मिळाली होती. परतीच्या वाटेवर जेजुरीला थांबून चहा घेताना, तिची खंत अन्‌ भविष्मातील स्वप्न याबद्दल रसिका सहज बोलून गेली.

जेऊरला जाण्याची माझी पहिलीच वेळ... डिसेंबरचा शेवटचा रविवार. सकाळी सहा वाजताच आम्ही सुसाट वेगाने पुण्याबाहेर पडलो. आता दुतर्फा होती फक्त उंच झाडं, दाट झुडपं किंवा मोकळं मैदान... थोड्याच वेळात घाटाचा रस्ता सुरू झाला तेव्हा उंच इमारती, भव्य होर्डींग्ज, वाहनांचा असह्यधूर आणि आवाज असं बरंच काही आम्ही दरीत सोडून आल्याचं स्पष्ट दिसत होतं. हे सगळंच अत्यंत विलोभनीय आणि हवहवंसं वाटत होतं, पण खरं तर जेऊर अजून बरंच दूर होतं...

घाटातून जाताना मला सहजच नेरळची ट्रीप आठवली- नुकतीच टी.वाय.ची परीक्षा संपली होती. कुठंतरी फिरायला जायचं, म्हणून आम्ही नेरळच ठरवलं. त्याला कारणही होतं तसंच. नेरळला माझ्या एका मित्राच्या काकांची शेती आहे. ती खूप छान आहे, तिथे खूप मजा येईल आणि पैसेही लागणार नाहीत म्हणून मग नेरळ. प्रवासात खूप मजा आली. नेरळला पोचताच एका सुंदरकमानीतून आम्ही काकांच्या शेतात प्रवेश केला. शेत खरंच खूप सुंदर होतं. शेताला चोहीकडून कुंपण होतं. एकीकडे पिकलेल्या फळांनी लगडलेली आंब्याची झाडं, तर दुसरीकडे टवटवीत कमळफुलांनी सजलेला तलाव... तिथंच जरा पुढे एक मोठा मत्स्यशेती विभाग... त्यालाच लागून असलेली कोळंबीची शेती...मग छोटीशी गुलाब-फुलांची बाग... शेताच्या मधोमध एक टुमदारघर... त्याचं मातीनं सारवलेलं अंगण... तुळशीवृंदावन... हे सगळं आमच्या शेतीच्या व्याख्येत मुळीच बसणारं नव्हतं. त्यामुळे आम्ही शेतात नाही, तर एखाद्या पर्यटनक्षेत्रातच आल्यासारखं वाटलं.

काकांनी मस्त झुणका-भाकरीचा पाहुणचार दिला. शेतातूनच तोडून आणलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि पाथीचा कांदा तर लाजवाबच. दुपारी थोडा आराम केला. चेहा घेऊन शेतात पुन्हा एक फेरफटका मारला नि परतीची तयारी सुरू केली. सगळ्यांसाठीच हा खूप वेगळा अनुभव होता. परीक्षेमुळे आलेलं दडपण दूर कुठंतरी पळून गेल्या सारखं वाटलं. कमानीजवळ काका आमची वाट बघत, हातात आंबे, कांदे, मिरच्यांनी भरलेल्या पिशव्या घेऊन उभे होते. त्यांच्याही चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. आम्ही मनापासून काकांचे आभार मानले.

‘‘पुन्हा जरूर या बाळांनो...’’ असं म्हणत काकांनी पाठीवर मायेची थाप दिली, खरंच आम्हालाही परत यायचंच होतं.

‘‘पण काका, मला वाटतं तुम्ही आमच्याकडून पैसे घ्यायला हवेत... किमान दीडशे रुपये तरी...’’ रसिकाचं हे वाम ऐकून क्षणभर आम्ही दचकलोच...

रसिका फाटक, माझी वर्गमैत्रीण... पुण्यातल्याच एका सुशिक्षित सुखवस्तू कुटुंबातली मुलगी. शेती, शेतकरी, पीक अशा गोष्टी इतक्या जवळून बघण्याचा अनुभव तिला ह्यापूर्वी क्वचितच आला असेल...

उणीपुरी दोन वर्षे लोटली असतील ह्या प्रसंगाला... त्याच रसिकाने आज जेऊरला एक कृषिपर्यटन क्षेत्र विकसित केलंय आणि तिथेच आम्ही मित्र नव्हे, तर पर्यटन बनून निघालो होतो. साधारण दीडवर्षांपूर्वी एम.एस्सी. (बायोडायव्हर्सिटी)ला प्रवेश घेतल्यावर, अनिवार्य संशोधन प्रकल्पासाठी ‘कृषीपर्यटन’ हा विषय निवडण्याच्या तिच्या निर्णयाची बीजं नेरळमध्येच रुजल्याचं मला जाणवतं...

‘‘जेऊर पुण्याहून तसं जवळ आहे. चांगले रस्ते, मुबलक पाणी अशा मूलभूत सोयी इथं आहेत आणि संपूर्ण गाव नमन रम्यनिसर्गासौंदर्यान नटलेलं आहे. म्हणूनच जेऊरची निवड केली...’इति रसिका.

विषयच पुस्तकी नसल्यानं त्याचा अभ्यास ही पुस्तकाबाहेर जाऊनच करावा लागेल, याची रसिकाला स्पष्ट कल्पना असावी. म्हणून अभ्यासाच्या सुरुवातीलाच तिने ‘ॲग्रोटुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चं कार्यालय गाठलं. तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाराष्ट्रातील कृषिपर्यटन क्षेत्रांविषयी माहिती घेतली व थेट त्या क्षेत्रांना भेटी द्यायला सुरूवात केली, पण बहुतांश केंद्रं अद्याप सुरूच झाली नव्हती. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद तिला मिळाला नाही.

‘‘रूढ कृषी पर्यटनाची संकल्पना नाही मला पटत. ती बरीच खर्चिक आहे, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही. आर्थिक मदत मिळत असली तरी मुळात हा खर्चच मला अनावश्यक वाटतो.’’ ह्याच विचारांतून तिने ‘कृषिपर्यटना’ची नवी संकल्पना साकारली. ‘‘माझ्या मते पर्यटकांना मुख्यत्वे तीन गोष्टी हव्या असतात... आराम, उत्तम जेवण आणि सुरक्षितता. माझ्या पर्यटनक्षेत्रात ह्या तीनही गोष्टी असतील.’’ अशी ही सहज, सोपी आणि अत्यंत स्वस्त तिची कृषिपर्यटनाची संकल्पना.

ओळखीच्या गणेशनामक जेऊरच्या एका शेतकऱ्याच्या शेतावर हे क्षेत्र उभारायचं असं तिनं ठरवलं... पण हे इतकंही सोपं नव्हतं. मुळात गणेशला कृषीपर्यटनाची पुसटशीही कल्पना नव्हती. बरं ती समजावून सांगितल्यावर, शहरातील माणसं आपल्या शेतावर येऊन धिंगाणा घालतील आणि शेतातली कामं सोडून आपल्याला त्यांच्याच मागे राहावं लागेल, अशी भीतीही त्याला वाटू लागली. सतत फोन करून, प्रत्यक्ष भेटून, ह्या संकल्पनेचं महत्त्व पटवून द्यायला अन्‌ त्याचा होकार मिळवायला रसिकाला तब्बल एक महिना लागला. पण प्रश्न पूर्णत: सुटला नव्हताच. गणेशच्या होकारानंतर, गावातूनच विरोध होण्याची मोठी भीती निर्माण झाली. त्यामुळे गावचे सरपंच व काही गावकरी यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे अत्यावश्यक होते.

अडीच-तीन महिन्यांच्या ह्या (दिशाहीन) धावपळीनंतर शेवटी तिने खऱ्या कामाला सुरुवात केली. ‘‘कृषीपर्य टन क्षेत्रं केवळ मजा करण्यासाठी नसावेत.’’ ह्या ठाम मताला धरूनच तिने प्रकल्पबांधणी सुरू केली.

पर्यटक म्हणून जेऊरला पोचल्यावर तिने आमची व्यवस्था एका कौलारू घरात केली. थोड्याच वेळात गरम चहा मिळाला. मग आम्ही गावालगतचा एक बंधारा बघायला गेलो. तिथं पाणी अडवण्यासाठीची अनोखीपद्धत आणि पाण्याचं नियोजन करणं कसं आदर्श आहे, ह्याची माहिती देत होती तेव्हा ती माझी मैत्रीण असल्याचा मला क्षणभर विसरच पडला. तिथून मग गावातलं देऊळ, गणेशची नर्सरी, कॅनॉलच्या पाण्यात मनसोक्त डुंबणं, असं करीत करीत दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही परतलो. दरम्यान वाटेत अनेकपक्षी, झाडं, माती ह्यांची वर्षानुवर्षाची ओळख असल्यागत ती माहिती देत होती...

जेवण अर्थातच गणेशच्या मळ्यात... वांग्याचं भरीत अन्‌ भाकरी...

जेवताना रसिकाशी बरंच बोलणं झालं... ‘‘पर्यटन क्षेत्र म्हटलं की रेस्टॉरन्टस्‌, हॉटेल्स असं काम काम गृहीतच असतं. त्या मुळेच कदाचित, ह्या गोष्टी कृषीपर्यटनातही शिरकाव करू पाहताना बऱ्याच ठिकाणी दिसतं. हळूहळू ती केवळ सधन शेतकऱ्यांचीच मक्तेदारी होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच इथं येणारे पर्यटकही सधनच... पण खरं तर कृषीपर्यटनाला हे अपेक्षित नाहीच मुळी...

किंबहुना कृषीपर्यटन क्षेत्रं वर्षभर सुरू न ठेवता केवळ हंगामीच असावीत, असं मला वाटतं. म्हणजे शेतात मका आला किंवा हुरडा आला की गणेशने मला कळवायचं. मग तशी जाहिरात करून मी पर्यटकांना तिथं घेऊन जाईन. त्यामुळे गणेशला शेतीची कामंही नीट करता येतील आणि हा जोडधंदाही सुरळीत चालेल. जेवण कधीच आटोपलं होतं. गणेशनं मळ्यातूनच तोडून आणलेली गोड पपई खात आम्ही सावलीत बसलो होतो.

जरा वेळ आराम झाल्यावर, कांदा कसा काढायचा? ऊस कसा कापायचा? असले प्रशिक्षणही आम्हाला मिळालं. स्वत: तोडलेला ऊस चाखण्याची मजाच निराळी! संध्याकाळ झाली होती. पुन्हा वातावरणात गारवा पसरू लागला. अंधारापूर्वी पुण्यात पोचलेलं बरं म्हणून काहीशा अनिच्छेने आम्ही तिथून निघालो. गणेश बऱ्याच दूरपर्यंत आम्हाला सोडायला आला होता. सोबत पपई, ऊस,कांदा, मिरच्या असं बरंच काही त्यानं आम्हाला दिलं. मळा सोडण्यापूर्वीच गणेशला त्याची पूर्ण रक्कम अगदी रोख मिळाली होती. परतीच्या वाटेवर जेजुरीला थांबून चहा घेताना, तिची खंत अन्‌ भविष्मातील स्वप्न याबद्दल रसिका सहज बोलून गेली.

‘‘बऱ्याच शेतकऱ्यांना ‘कृषी पर्यटन’ त्यासाठी मिळणारी आर्थिक मदत किंवा त्याचं एकंदरीत महत्त्व याबद्दल फारशी माहितीच नाही. तसंच पर्यटकांपर्यंत पोचायचं कसं? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. एखादं केंद्र कसं उभारायचं, कसं चालवायचं? ह्याबाबतही योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. अनेक केंद्रांवर पैसे थेट शेतकऱ्याला मिळतच नाहीत. म्हणून ह्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवायची आणि शेतकरी व कृषीपर्यटक यांच्यातील दुवा म्हणून काम करायचं, असं मी ठरवलं.

खरं तर ही कृषीपर्यटनाची संकल्पना मला खूप पुढं न्यायची आहे. ह्या माध्य मातूनच धान्य, फुलं इत्यादींच्या अनेक दुर्लक्षित पण महत्त्वाच्या वन्य जातीचं संवर्धन करणं शक्य आहे. म्हणजे ह्या वन्य जातींचं महत्त्व पर्यटकांना पटवून द्यायचं. पर्यटकांमार्फतच ह्या जातींची मागणी वाढवून लागवडही वाढवायची...म्हणजे ह्या जातींचं सहज संवर्धन करता येईल  ‘हॉर्टीकल्चर’ आणि ‘लँडस्केपींग’चे अनेक प्रमोग कृषीपर्यटनाच्या माध्यमातून यशस्वी करता येतील. हेच खरं माझं स्वप्न आहे.’

हे सांगताना तिच्या डोळ्यांमध्ये थकवा स्पष्ट जाणवत होता.

‘‘कसं वाटतंय तुला आता?’’ सहजच मी विचारलं.

‘‘खरं सांगू... दोन्ही हात पसरून, डोळे घट्ट मिटून, अशी एक उंच उडी मारावीशी वाटते.’’

खरं तर माझ्या मते, जेऊरचा हा प्रकल्प म्हणजे एका विद्यार्थिनीची एक मुक्त उडीच आहे, नाही का?...

Tags: नीलेश मोडक लँडस्केपींग हॉर्टीकल्चर कृषी पर्यटन nilesh modak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मोडक
neeleshmodak@gmail.com

लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके