डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी अस्मितेसाठी(?) लढा देताना गोगटेची बरीच प्रगती झाली. मोठमोठे फ्लेक्सबोर्डस्‌, होर्डिंग्जवर ही त्याचे फोटो असतात. कुठलंसं पदही मिळालंय त्याला. हा व्याप सांभाळताना सिगारेट, दारू, गुटखा अशी चार-दोन व्यसनं लागली तर नवल काय, नाही का? सोबतच्या विद्यार्थ्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालंय, गोगटे अजून टी.वाय.बी.एस्सी.लाच... त्यात काय? महत्त्वाचं म्हणजे त्याची हिरोगिरी अजूनही यशस्वीरित्या सुरू आहे. आणखी काय हवं? ‘मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ एका युवकाचं आत्मबलिदान!’ असं एक सुंदर शीर्षक देता येईल. पण कॉलेज-ग्रुप, गणेश मंडळं इत्यादी ठिकाणी असे अनेक ‘गोगटे’ रोज जन्माला येताना दिसतात. ‘त्यांच्यासाठी कुठली शीर्षकं मोजावीत?’

काही दिवसांपूर्वी जंजिऱ्याचा जलदुर्ग बघयला गेलो होतो. शिडाच्या नावेने दुर्गाच्या दिशेने संथ प्रवास सुरू होता. नावेत चाळीसेक लोक, त्यांची आपापसातील कुजबूज. पाण्याचा खळखळाट, मोकळा वारा, असंच सगळं. तितक्यात नावेतील तरुणांच्या एका घोळक्याने मोठमोठ्याने गाणी म्हणायला सुरुवात केली नि वातावरणच बदललं.

‘मालवण पाण्यामध्ये किल्ला,

शिवाजी आत कसा शिरला...?

मालवण पाण्यामध्ये किल्ला,

शिरला तर शिरला, बघतंम कोण?

अरे आपला प्रशा...

आणि म्हणतोम काय...’

‘‘अश्विनी मे ना... मे ना...”

नावेत हशा पसरला. प्रशानंतर अभ्या, आनंद, स्मिता अशी इतर नावे आणि ‘दम मारो दम...’, ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही...’, ‘लंबी जुदाईऽ‘ अशी अनेक (कदाचित समर्पक) गाणी ऐकायला मिळाली. गाणी आणि ती नाव ह्यांत काहीतरी संबंध होता, हे स्पष्टच होतं. व्यक्त होण्याचा हा एक प्रयत्न असेल का...?

हॉस्टेलमधील अनेक मित्रांची टोपण नावंच जास्त लोकप्रिय होती. उदा. गढूळ (आडनावाची मोडतोड करून),पहाडी (हिमाचल प्रदेशात राहणारा) इत्यादी... सारखं पुढे पुढे करणाऱ्यांचं वर्गीकरण ‘लाल’ ह्या वर्गात केलं जाई. अशी नावं ठरवताना स्वभावगुण व्यक्त होणं, हाच सर्वांत महत्त्वाचा निकष आणि उद्देशही. असंच एका मित्राचं नाव होतं ‘आर्कूट बाबा’. लेक्चर-प्रॅक्टिकल बुडवून, सगळी कामं सोडून तासन्‌ तास आर्कुटिंग करतो म्हणून तो ‘आर्कूटबाबा’.  हॉस्टेलमधील मस्ती सोडून, मित्रांचा प्रत्यक्ष सहवास सोडून तो आर्कुटिंग का करीत होता, ह्याचं उत्तर कधीच मिळालं नाही. पण ‘कुठेतरी व्यक्त होणं’ हा त्याचा एक महत्त्वाचा उद्देश असावा, असं वाटतं.  आर्कुट, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग अशा अत्याधुनिक माध्यमांचं तरुणांमधील वाढतं आकर्षण, वापर आणि त्यावर होणारी चर्चा बघता ‘अभिव्यक्ती’ हा उद्देश बऱ्याच अंशी स्पष्ट होतो.

आर्कूट प्रोफाईलमध्मे स्वत:बद्दल बरीच माहिती दिलेली असते. त्याद्वारेच मित्रांचे आवडते चित्रपट, नाटकं, कादंबऱ्या कुठल्या, ह्याचं एक सर्वेक्षण केलं. बहुतेक मित्रांचा ‘रंग दे बसंती’ हा अत्यंत आवडीचा चित्रपट असल्याचं लक्षात आलं. ‘हा सामाजिक भान जागृत करणारा ‘तरुणांचा’ चित्रपट आहे’;‘सामाजिक-राजकीय प्रश्नांना वाचा फोडत उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न’, अशी काही कारणंही मिळाली.

‘हे उत्तर कोणतं?...’

तर- चित्रपटातील हे शेवटचं दृश्य...

करण (चित्रपटातील एक प्रमुख पात्र) आपल्या मित्राच्या सहकार्य़ाने केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचा खून करतो. त्यानंतर एफ्‌.एम.रेडिओद्वारे आपल्या गुन्ह्यांची कबुली देऊन आपले विचार व्यक्त करतो. त्या दरम्यानचा हा संवाद.

‘‘कोई भी देश परफेक्ट नहीं होता... उसे परफेक्ट बनाना पडता हैं...!

हम पुलिस में भर्ती होंगे, मिलिटरी जॉईन करेंगे, आय.ए.एस. बनेंगे, पॉलिटिक्स मे जाकर देश की सरकार चलाऐंगे...’’

टाळ्यांचा कडकडाट... काहींच्या अंगावर शहारे आणि बरंच काही...!

चित्रपट संपल्यावर एक मित्र म्हणाला, ‘‘देशातील सर्व आय.ए.एस. अधिकारी, पोलिस, मिलिटरीतील जवान-अधिकारी, राजकीय नेते मिळून एकूण संख्या किती असेल...? एकूण लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के...? कदाचित... म्हणजे केवळ दोन-तीन टक्केच लोक देश घडवतात का? उरलेल्या सत्त्याण्णव टक्के भारतीयांची देशाच्या जडण-घडणीतील भूमिका काय? एक चांगला शेतकरी, शिक्षक,व्यावसायिक, नोकरदार, लेखक-कवी! थोडक्यात एक चांगला नागरिक बनून नाही का देशाला परफेक्ट बनवता येणार?’’

मी नि:शब्द होतो..

‘गुलाल’ नावाचा एक उत्कृष्ट हिंदी चित्रपट बघितला. ‘गुलाल’चं कथानकही महाविद्यालयीन तरुणांभोवतीच फिरतं. तरुणांच्या अभिव्यक्तीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न वाटतो. चित्रपटात ‘पृथ्वी-बना’ नावाचं एका कवीचं पात्र आहे. हा कवी म्हणतो.

‘इस मुल्ख ने जिस शक्स जो काम था सौंपा,

उस शक्स ने उस काम की माचिस जलाके छोडी...!’

प्रसिद्ध गीतांच्या विडंबनाद्वारे व्यक्त होण्याचा (तरुणांद्वारे अनेकदा केला जाणारा) प्रयत्न हा पृथ्वी-बना करत असतो.

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं

देखना हैं जोर कितना बाजू-ए-कातिल में हैं...

वक्त आने दे, बता देंगे तुझे ऐ आसमां,

हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है...

ओरे बिस्मिल काश आते आज तुम हिंदोस्तॉ,

देखते के मुल्ख सारा मे टशन में थ्रिल में हैं...

आजका लौंडा ये कहता, हम तो बिस्मिल थक गये,

अपनी आजादी तो भैय्या लौंडिया के दिल में हैं...

आज के जलसों में बिस्मिल एक गुंगा गा रहा,

और बहरों का वो रेला नाचता महफिल में हैं...

देखना हैं जोर कितना बाजु-ए-कातिल में हैं...

वक्त आने दे, बता देंगे तुझे ऐ आसमॉ,

हम अभी से क्या बतामें क्या हमारे दिल में हैं...

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं...!

भाऊ पाध्येंची ‘राडा’ ही एक महान कादंबरी. त्यातील ‘मंदार अण्णेगिरी’ नामक तरुणाचं प्रमुख पात्र एका व्यापक अर्थाने आजही तरुणांचं प्रतिनिधित्व करतं. मंदारवर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो. प्रत्येक घटनेसाठी तो सारखा चित्रपटातील एखादा प्रसंग सुचवत असतो. कधी एखादं समर्पक गीत तर कधी चित्रपटाची शीर्षकं मोजत असतो (त्याद्वारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो.) त्याचा आणखी एक आवडता छंद-हिरोगिरी करत हिंडणे, राडा करणे. मंदारच्या जडण-घडणीला सामाजिक पार्श्वभूमी शिवसेनेच्या राडा संस्कृतीची आहे. तरुणांच्या अभिव्यक्तीचे हे संदर्भ आजही समकालीन वाटतात.

हा मंदार अण्णेगिरी म्हणतो, ‘ही माणसं धड चांगली नाहीत. धड सडलेली नाहीत...!’

‘राडा’च्या प्रती आज बाजारात मिळत नाहीत. भाऊ पाध्येही गेले. मराठी अस्मितेच्या रक्षकांनी(?) एक महान मराठी कलाकृती नष्ट केली. तरीही ‘मराठी पाऊल पडती पुढे...’ म्हटलं की सगळं विसरून स्फुरण चढतं...

कॉलेज संपवून एके दिवशी हॉस्टेलला परत निघालो होतो. सायंकाळी सहा-साडेसहाची वेळ असेल.  साधारण माझ्याच वयाच्या दहा-बारा मुलांनी मला घेरलं. माझं नाव-गाव (हिंदीत)विचारू लागले. त्यात अरेरावी, भाईगिरीचा सूर होता. तितक्यात त्यांच्यातल्या एकाने मला ओळखलं असावं.

‘तू मायक्रोला आहे ना?’

‘हो.’

‘आपलाच रे हा... चल ए चल.. जा होस्टेलला...’

मी सुटलो.

टीव्हीवर त्यावेळी मनसेच्या अमराठी-विरोधी राड्याच्या बातम्या झळकत होत्या...

काही दिवसांनी तोच मुलगा पुन्हा भेटला. त्याने मैत्रीचा हात पुढे केला.

‘काय लफडं झालं ना, फोन कर मला.’ असं म्हणून मोबाईल नंबरही दिला.

त्याचं नाव ‘गोगटे’. मध्यम उंची, निमगोरा वर्ण, सडपातळ यष्टी, शर्ट किंवा टी-शर्ट. जीन्स किंवा साधी पँट घालणारा. थोडक्यात, एक सर्वसामान्य महाविद्यालयीन युवक. तो बी.एस्सी. झूलॉजीचा विद्यार्थी आणि कॉलेजमधील एका कुप्रसिद्ध ग्रुपचा खंदा कार्यकर्ताही होता.

पुढे बरेचदा आमची भेट झाली. आणि एक दिवस त्याने मला त्याच्या ग्रुपमध्मे येण्याबाबत सुचवले. नंतर काही दिवसांनी तोच म्हणाला, ‘अभ्यास कर तू... लोच्या झाला... मला बोल...तू लफड्यात पडायचं नाय...’

मराठी अस्मितेसाठी(?) लढा देताना गोगटेची बरीच प्रगती झाली. मोठमोठे फ्लेक्सबोर्डस्‌, होर्डिंग्जवर ही त्याचे फोटो असतात. कुठलंसं पदही मिळालंय त्याला. हा व्याप सांभाळताना सिगारेट, दारू, गुटखा अशी चार-दोन व्यसनं लागली तर नवल काय, नाही का? सोबतच्या विद्यार्थ्माचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालंय; गोगटे अजून टी.वाय.बी.एस्सी.लाच, त्यात काय? महत्त्वाचं म्हणजे त्याची हिरोगिरी अजूनही यशस्वीरित्या सुरू आहे. आणखी काय हवं? ‘मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ एका युवकाचं आत्मबलिदान!’ एक सुंदर शीर्षक देता येईल. कॉलेज-ग्रुप, गणेश मंडळं इत्यादी ठिकाणी असे अनेक ‘गोगटे’ रोज जन्माला येताना दिसतात. ‘त्यांच्यासाठी कुठली शीर्षकं मोजावीत?’ ह्याचं उत्तर जरा क्लिष्ट वाटतं, एवढंच....

चित्रपट-नाटकं बघणं, कथा-कादंबऱ्या वाचणं हा तरुणांचा आवडता छंद. त्यातील पात्रांनी प्रभावित होऊन केशरचना, पोशाख, चालण्या-बोलण्याची ढब बदलणं, हे सुद्धा सवयीचंच. ह्या कला माध्यमांचा तरुणांवर बराच प्रभाव आहे. तेथून त्यांना प्रेरणा मिळतात असंही म्हटलं जातं. हे तरुण स्वत:ची अभिव्यक्ती ह्या माध्यमांमध्ये शोधत असतील का?

याउलट, लेखक-दिग्दर्शकांसाठी ‘तरुण वर्ग’ हा प्रेरणादायी विषय असतो. तरुणांच्या चालण्याबोलण्याची ढब, त्यांचे पोशाख... इथपासून ते त्यांचे विचार, ह्यांना एकत्र गुंफून कथानक रचण्याचा प्रयत्न केला जात असावा. बऱ्याचदा थोडं पुढे जाऊन तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्नही केला जातो. म्हणूनच दृश्यकलांचं एक प्रमुख उद्दिष्ट ‘समाज प्रबोधन’ हेसुद्धा मानलं जात असावं; पण त्याचवेळी ही एक गंभीर जबाबदारी आहे असंही वाटतं...

सतीश आळेकरांनी लिहिलेलं ‘महापूर’ हे नाटक बघितलं. रंगमंचाऐवजी हा प्रयोग प्रेक्षकांच्या मधोमध करण्यात आला. प्रेक्षक आणि कलाकार हे अंतर मिटवून विषयाशी एकरूपता साधण्याचा हा प्रयत्न असावा.

प्रवेश पहिला :

नाटकातील (प्रमुख पात्र) एक तरुण स्वत:च्या घरात प्रवेश करतो. घरात त्यावेळी आई-बाबा कुणीही नसतं. खोलीत अंधुकसा प्रकाश तेवढा पसरलेला. काहीसा घाबरलेला हा तरुण दबक्या पावलांनी टेबलाजवळ जातो. ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागतो. मग हळूच एक फोटोबाहेर काढून न्याहाळू लागतो. दचकून, घाबरून पुन्हा लपवून ठेवतो. मग टेपरेकॉर्डर सुरू करतो. चार-दोन गाणी बदलल्यावर त्याला हवं असलेलं गाणं लागतं...माइकल जॅक्सनच्या ह्या गाण्याचे बोल आहेत.

‘‘ऑल आय वाँट टू से इज दॅट,

दे डोंट रिअली केअर अबाऊट अस...’’

तो तरुण नाचू लागतो... बेभान होऊन... दात-ओठ घट्ट आवळून. हाताच्या मुठी घट्ट बंद करून... क्षणात त्याच्या कपाळावरून घाम ओघळू लागतो. पाय वेडे-वाकडे पडू लागतात. तेवढ्यात त्याच्या पोटात कळा येऊ लागतात, असह्य कळा.... तो अडखळतो... थांबतो... मग टेबलावरची दोरी घेऊन उड्या मारू लागतो. पोटात होणाऱ्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतात. मधेच दोरीत पाय अडकून तो पडतो... सावरतो... गाण्याचा आवाज (आणि अर्थही) खूप स्पष्ट होतो. मग हा तरुण उंच उड्या मारू लागतो... दोन्ही हात हवेत लांबवून अधिकाधिक उंच जाण्याचा जीवतोड प्रयत्न करू लागतो. उंच उड्या आणि ‘ते’ गाणं एवढंच फक्त...!

हळूहळू प्रकाश मंद मंद होतो. हळूहळू सर्वत्र अंधारपसरू लागतो...

नाटकाचा नायक, तो तरुण (आणि त्याच्या त्या उड्या) दाट अंधारात दिसेनासा होतो...

अंधाराआड तोवर महापूर आलेला असतो...अव्यक्त भावनांचा महापूर...!

अंधारातून कानांवर पडलेले हे काही शेवटचे शब्द...

‘‘ऑल आय वाँट टू से इज दॅट,

दे डोंट रिअली केअर अबाऊट अस...’’

 

(कारंजा (जि.वाशिम) येथील नीलेश मोडक नुकताच एम.एस्सी. (मामक्रोबामलॉजी) झाला असून, त्याच विषयात पीएच.डी. करण्यासाठी तयारी करीत आहे.)

 

Tags: बेफिकीरी. जबाबदारी समाजप्रबोधन दृष्यकला दिशाभूल   चित्रपट प्रेरणा   भाईगिरी   भरकटेलेली तरूणाई दिशाहीन अभिव्यक्तीच्या दिशा सोशल मिडीया समाजमाध्यमे अवास्तव देशभक्ती वास्तव कॉलेज तरूण निलेश मोडक Image   Social Media   College Boy Random Thoughts Youngester nilesh Modak Neelesh Modak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मोडक
neeleshmodak@gmail.com

लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके