डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कवितेचं आकलन हे कवितेच्या वाचनाशी कसं निगडित असतं, तसंच भाषा ही कवितेचा एक सेंद्रिय घटक कसा असते, याची जाणीव त्यांच्या काव्यवाचनाने दिली. त्यांच्या प्रभावी वाचनामुळे प्रत्येक शब्द जणू मनात ध्वनिमुद्रित होत असे! कवितेतल्या शब्दोच्चाराचं वजन, अंतर्गत लयीचे बारकावे आणि छंदोबद्ध लयीची वळणं यांचा प्रभाव त्यांच्या वाचनामुळे लक्षात येत असे. श्रोत्यांशी सहज मनःसंवाद साधण्याची कला त्यांना उत्तम अवगत होती. त्यांना अनेक जुन्या- नव्या कविता मुखोद्गत होत्या.

 

1968 वर्ष होतं ते! मी (तेव्हाची नीलिमा वैद्य) माटुंगा इथल्या रामनारायण रुईया महाविद्यालयात आटर्‌सच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. एक दिवस तळमजल्यावरच्या आमच्या प्रशस्त वर्गात आम्ही मैत्रिणी मोठ्या उत्सुकतेने पहिल्या बाकावर बसून मराठीचा तास सुरू व्हायची वाट पाहत होतो, कारण प्राध्यापक वसंत बापट आम्हाला शिकवायला येणार होते! सर आले, त्यासरशी तुडुंब भरलेला वर्ग उठून उभा राहिला. सरांनी सगळ्या वर्गावर ऐटदार नजर फिरवली नि म्हटलं, ‘‘खाली बसा! आपल्या खेळाचा नियम म्हणजे मी वर्गात आल्यावर कोणीही उभं राहायचं नाही!’’ आम्ही चकित झालो. बापटसर कवी आणि विद्वान आहेत, हे माहीत होतं; पण ते खेळकर वृत्तीचेही आहेत, हे छानच वाटलं! आजच्या भाषेत बोलायचं तर, सर तेव्हा ‘सेलिब्रेटी’ होते. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम लोकप्रिय झाले होते, तरीही ते नियमितपणे वर्गावर येत असत आणि समरस होऊन शिकवत असत, याचं आज अप्रूप वाटतं.

आम्हांला वसंत बापटसर आणि सरोजिनी वैद्य मराठी शिकवत असत. दोघेही उत्तम प्राध्यापक होते. पाठ्यपुस्तकातला गद्यविभाग सरोजिनीबार्इंनी शिकवायचा आणि पद्यविभाग ‘कविवर्य’ बापटसरांनी शिकवायचा असं ठरलेलं असे! सरांकडून कविता शिकणं, हा खूप जिवंत आणि रसरशीत अनुभव होता. त्यांची विषयावरची पकड जबरदस्त होती. प्राचीन काव्यापासून नवकाव्यापर्यंतचं सर्व प्रकारचं काव्य ते मनापासून शिकवत असत. आकलन आणि आस्वाद या वाटेनं विद्यार्थ्यांना कवितेची समज येण्याआधी समीक्षेकडे वळण्याची घाई त्यांनी कधी केली नाही. त्यामुळे त्यांच्या उदार, व्यापक संवेदनशीलतेचा खोल संस्कार मनावर झाला. कवितेचं आकलन हे कवितेच्या वाचनाशी कसं निगडित असतं, तसंच भाषा ही कवितेचा एक सेंद्रिय घटक कसा असते, याची जाणीव त्यांच्या काव्यवाचनाने दिली. त्यांच्या प्रभावी वाचनामुळे प्रत्येक शब्द जणू मनात ध्वनिमुद्रित होत असे! कवितेतल्या शब्दोच्चाराचं वजन, अंतर्गत लयीचे बारकावे आणि छंदोबद्ध लयीची वळणं यांचा प्रभाव त्यांच्या वाचनामुळे लक्षात येत असे. श्रोत्यांशी सहज मनःसंवाद साधण्याची कला त्यांना उत्तम अवगत होती. त्यांना अनेक जुन्या- नव्या कविता मुखोद्गत होत्या. त्यामुळे आम्ही अक्षरशः भारावून जात असू! कवितेच्या घडणीतले अनेक बारकावे सांगताना ते खूप उदाहरणं देत असत. चांगल्या कवितेसाठी केवळ नादमधुर शब्द गरजेचे नसतात; तर आशयाला अनुरूप शब्द आवश्यक असतात. केशवसुतांची ‘सतारीचे बोल’ ही कविता शिकवताना ‘विमनस्कपणे स्वपदे उचलित रस्त्यातून मी होतो हिंडत,’ या त्यातल्या ओळीत जोडाक्षरांमुळे साधलेल्या खंडित लयीमुळे कवीच्या अस्वस्थ मनःस्थितीचा प्रत्यय कसा येतो, याकडे त्यांनी आमचं लक्ष वेधलं होतं.

त्यांची काही वाक्ये सुभाषितासारखी मनावर कोरली गेली आहेत. उदा. ‘तुकारामांचे अभंग म्हणजे मराठीतला पाचवा वेद आहेत,’ हे त्यांचं विधान पटलं होतं. ‘कविर्दर्शनात्‌’ हे वचन म्हणजे सूत्रच वाटलं होतं आणि रवींद्रनाथ म्हणत, ‘प्रत्येकाचा चंद्र वेगळा असतो ’ हे वाक्य त्यातल्या काव्यात्मतेमुळे वेधक वाटलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यदृष्टीचा ठसा त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वावरच होता. पुढे लक्षात आलं की, सरांच्या ‘गगन सदन तेजोमय’, ‘देव माझा निळा निळा’ या कवितांमधली ईश्वर-संकल्पना ही निसर्गसंवेदनांमधून अध्यात्म अनुभवण्याच्या रवींद्रनाथांच्या कलादृष्टीशी नाते सांगणारी आहे. त्यांचं महाविद्यालयातलं अस्तित्व हे केवळ वर्गापुरतंच मर्यादित नव्हतं. दर वर्षी स्नेहसंमेलनावेळी त्यांच्याकडे ‘फिशपॉन्ड’ वाचण्याचं काम असे. तेव्हा त्यांच्यातला नट प्रकट होत असे. त्यांच्या ‘मराठी वाङ्‌मय मंडळा’च्या उपक्रमांमुळे महाविद्यालयात उत्साह सळसळत राही. वेगवेगळ्या स्पर्धा, भित्तिपत्रं, कार्यक्रम यांची रेलचेल असे. कार्यक्रमांना नामवंत मंडळींची हजेरी आणि जिमखान्यात विद्यार्थ्यांची गर्दी, हे समीकरणच असे! पुढे त्यांचं ‘ताणेबाणे’ हे पुस्तक वाचताना समजलं की ते रुईयात येईपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत महाविद्यालयात असं मंडळच नव्हतं! त्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे मंडळ सुरू झालं होतं. फुलपाखराला पंख फुटायला जशी कोषातली ऊब हवी असते, तसंच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विशिष्ट ऊर्जेनं भारलेलं वातावरण आवश्यक असतं, हे ओळखून त्यांनी चैतन्यपूर्ण वातावरण घडवलं होतं.

माझी एफ.वाय. आणि इंटर अशी दोन वर्षे कशी गेली, ते कळलं नाही. माझा संकोची स्वभाव आणि कल्याण- मुंबई प्रवासामुळे महाविद्यालयात उगाच न रेंगाळण्याची सवय, यामुळे त्यांच्याशी विशेष ओळख झाली नाही. मात्र बी. ए. (स्पेशल)साठी मराठी विषय घेतल्यामुळे मला त्यांचा सहवास जास्त प्रमाणात मिळू लागला. ते विभागप्रमुख होते. त्यामुळे स्वतःच्या कल्पक उपक्रमांना वाव देणं त्यांना सहज शक्य होतं. मराठी (स्पेशल)च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘मराठी अभ्यास मंडळ’ सुरू केलं होतं. हेतू हा की विद्यार्थ्यांना अकादमिक चर्चा, तसंच निबंधवाचन यांचा सराव व्हावा! ते आम्हांला बी. ए.ला ‘काव्यशास्त्र’ (पोएटिक्स), ‘शोकात्मिका’(ट्रॅजेडी) असे महत्त्वाचे विषय शिकवत असत.

वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ हे नाटक तेव्हा खूप गाजत होते. त्या नाटकाचा ‘शोकात्मिका’ म्हणून विचार करणारा निबंध लिहायचं काम त्यांनी माझ्याकडे सोपवलं होतं. त्या निबंधावरच्या चर्चेसाठी डॉ. श्रीराम लागू आणि शांता जोग आदी मान्यवर पाहुणे उपस्थित होते. इतर विषयांचे काही प्राध्यापकही आले होते. मी त्यांच्यासमोर निबंध वाचला. त्यात मी ‘नटसम्राट’ची वैशिष्ट्ये सांगितली होती आणि शेवटी ग्रीक शोकात्मिकेचे निकष लावून ‘नटसम्राट’मधल्या उणिवा दाखवून दिल्या होत्या. माझा निबंध वाचून झाल्यावर वर्गात एक प्रकारची शांतता पसरली. मग त्यांनी पुढे येऊन हसून सांगितलं की, अजून शेक्सपिअरची ट्रॅजेडी, इब्सेनची ट्रॅजेडी वगैरे प्रकार शिकवून व्हायचे आहेत! त्यासरशी वातावरणातला ताण हलका झाला आणि चर्चा रंगली. (त्या कार्यक्रमानंतर माझा निबंध आवडल्याचं मला प्रा. पी. जे. जोशीसरांनी आवर्जून सांगितलं होतं! तरीही आज तो प्रसंग आठवला की मला स्वतःचं हसू येतं!) मराठी अभ्यासमंडळात भालचंद्र नेमाडे, श्री. पु. भागवत, विजया राजाध्यक्ष अशी मान्यवर मंडळीही येऊन गेल्याचं आठवतंय! आमची साहित्याची आवड अधिक चोखंदळ व्हायला अशा अभ्यासपूर्ण वातावरणाचा नक्कीच उपयोग झाला.

त्यांचा आणखी एक उपक्रम म्हणजे स्पेशलच्या वर्गासाठी आयोजित केलेल्या सहली! त्यांच्यामधल्या हरहुन्नरी आयोजकाची ओळख आम्हांला त्या निमित्ताने झाली. आमच्या वेळी एकदा इंदूर-देवास येथे सहल (त्यात कुमार गंधर्व यांची भेट!) गेली होती. मी त्या सहलीला जाऊ शकले नव्हते. दुसरी सहल कोकणात- चिपळूण, रत्नागिरी, गणपतीपुळे येथे गेली होती. मी त्यात सहभागी झाले होते. त्या सहलीचा खरा हेतू होता, कविवर्य केशवसुतांच्या जन्मगावाला- मालगुंडला भेट देणे! आमच्यासाठी ते एक वाङ्‌मयीन तीर्थक्षेत्रच होतं! शाळकरी वयातच केशवसुतांच्या कवितेनं मला खेचून घेतलं होतं. त्यांच्या कवितांमधल्या विचारांचा आवाका आणि कल्पनांचा आवेग स्तिमित करून गेला होता! त्यामुळे मालगुंडला केशवसुतांच्या घरी त्यांच्या कविता आठवत वावरणं, हा एक रोमांचक अनुभव होता. नंतर आम्ही गणपतीपुळे येथे राहिलो. तिथल्या डाकबंगल्यात रात्री एकीकडे समुद्राची गाज ऐकता ऐकता त्यांच्या कवितांची मैफल अनुभवणं, हा अविस्मरणीय योग होता. अशा एखाद्या प्रसंगी आम्हांला त्यांच्या कविता ऐकायला मिळत असत. तसंच विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, इतकंच काय आमचे इंग्रजीचे प्राध्यापक सदानंद रेगे यांच्या कविता ऐकायची संधीही आम्हांला कॉलेजात मिळाली होती.

मी 1972 ला बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या वर्षीचा रिझल्ट त्यांना सुखावणारा होता. एक तर आमच्या वर्गातल्या सहा जणींना प्रथम वर्ग मिळाला होता आणि त्यातही मला मुंबई विद्यापीठात सर्व विषयांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला होता. खरं तर हा त्यांचा बहुमान होता. मला पाच हजार रुपयांची बक्षिसे मिळाली होती. त्यांनी मला कौतुकानं ‘पंचहजारी सरदार’ असं म्हटलं होतं! माझं कौतुक करायला, माझ्या आईवडिलांच्या इच्छेचा मान राखत ते आणि सरोजिनीबाई, दोघेही माझ्या घरी- आमच्या कल्याणच्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये- जेवायला आले होते! त्या वेळी त्यांनी मला त्यांचं ‘बारा गावचं पाणी’ हे पुस्तक भेट दिलं होतं. त्या पुस्तकातल्या त्या शीर्षकाच्या लेखातील शेवटचा परिच्छेद म्हणजे एक सुंदर कविताच आहे!

एम. ए.चे आमचे तास मुंबई विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत असत. ते तेथेही आम्हांला शिकवायला येत असत. मला फेलोशिप असल्यामुळे परीक्षेच्या कामासाठी रुईयात जावं लागत असे, त्यामुळे सरांच्या भेटी होत असत. 1974 ला ते विद्यापीठाच्या टागोर अध्यासनाचे प्रमुख म्हणून रुजू झाले आणि मी एम. ए. झाल्यावर रुईयात रुजू झाले. जो काव्यशास्त्राचा पेपर ते शिकवत असत, तो पेपर शिकवण्याचं काम नेमकं माझ्याकडे आलं! तेव्हा त्यांचा वारसा चालवणं किती अवघड आहे, हे प्रकर्षानं जाणवलं!   त्यांच्या सहवासातले रुईयातले दिवस असे आत-बाहेर कविता असण्याचे दिवस होते. ते ‘अष्टपैलू’ होतेच, मात्र त्यांची मूळ ओळख ‘कवी’ हीच होती. त्यामुळे त्यांच्या कवितांचा विचार वगळून त्यांच्याविषयी लिहिणं अपुरं वाटतं.

पुढे त्यांच्या कविता शिकवताना मला जाणवत गेलं की, केवळ साहित्य आणि ललित कलांपुरताच त्यांचा व्यासंग मर्यादित नव्हता. त्यांच्या कवितांमधल्या प्रतिमासृष्टीचा पैस खूप व्यापक आहे. त्यांच्या कवितांमध्ये कधी बदलत्या समाजस्थितीशी निगडित प्रतिमा येतात. उदा. ‘बिजली येईल अवचित, न्याय करील जगतात’ (बिजली), कधी धार्मिक-सांस्कृतिक प्रतिमा येतात. उदा. ‘अजूनदेखील बंदिगृहात देवकीचा आठवा वाढतो’ (अजूनदेखील), कधी ऐतिहासिक-प्रादेशिक प्रतिमा येतात. उदा. ‘रामगिरीकडून येताना भग्न विजयनगरीची तुटलेली मेखला घेऊन या!’ (अकरावी दिशा). कधी तरल निसर्गप्रतिमा आढळतात. उदा. ‘चांदण्याच्या तलावात एकदा तरी सूर माराल?’ (कॉम्रेड), तर कधी विज्ञानाशी निगडित प्रतिमा येतात. उदा. ‘प्लुटोपासून पृथ्वीपर्यंत सूर्य दिसला हजार वेळ तर सेकंदाला वेगमान काय हवे? त्यातले एक पोर म्हणेल, ‘हे गणित की पोरखेळ?’ (आदिरहस्य) अशी कितीतरी उदाहरणं देता येतील!

चांगल्या शिक्षकाचं विद्यार्थ्याशी असलेलं नातं वर्गापुरतं कधीच नसतं! विवाहानंतर मी 1986 ला पुण्यात आले आणि स. प. कनिष्ठ महाविद्यालयात मला बदली मिळाली. त्यानंतरही कधी ‘साधना’च्या कार्यालयात, कधी त्यांच्या घरी, तर कधी एखाद्या कार्यक्रमात सरांशी तुरळक गाठीभेटी होत राहिल्या. 1991 मध्ये शांता शेळके यांच्या ‘जन्मजान्हवी’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला. त्या समारंभाला प्रा. रमेश तेंडुलकर प्रमुख पाहुणे होते. मी परीक्षक या नात्याने बोलणार होते. श्रोत्यांमध्ये चक्क सर हजर होते! तो कार्यक्रम झाल्यावर त्यांनी मला छान भाषण केल्याबद्दल शाबासकी दिली! मी पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात पाय रोवत आहे, याचा त्यांना आनंद वाटला होता.

1999 मध्ये ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तो मान त्यांना मिळणं उचितच होतं! मराठी आणि महाराष्ट्र यांचा विचार हा त्यांच्या भावजीवनाचा केंद्रबिंदू होता. त्याच वेळी केंद्रबिंदू कायम राखून आपल्या सांस्कृतिक जाणिवांचा परीघ किती व्यापक करता येतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं जीवन होतं! ते स. प. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्यामुळे साने गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित खास कार्यक्रमात त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करायचा असं ठरलं. त्या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी माझ्यावर आणि डॉ. सुधांशु गोरेसरांवर सोपवली होती. प्राचार्य डॉ. ह. श्री. साने यांच्या निमंत्रणाला मान देऊन ते आणि त्यांच्या पत्नी नलूताई दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे तो कार्यक्रम खूप रंगला होता. त्यानंतर त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मी ‘केसरी’त छोटासा लेख लिहिला होता. तो आवडला, हे सांगायला त्यांनी आवर्जून फोन केला होता. त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यांचं अंत्यदर्शनच घ्यावं लागलं!

आज मागे वळून बघताना वाटतं, चांगला शिक्षक केवळ नेमून दिलेला विषय शिकवून थांबत नसतो. तो आपल्या शिकवण्यातून ‘शिकायचं कसं?’ याचं रहस्यच नकळत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो! बापटसरांनीही आम्हांला केवळ शिकवलं नाही, तर कवितेचा मूलकंदच आमच्या हाती दिला! तो पुढे मनात न रुजता, तरच नवल!

Tags: nilima gundi vasant bapat जन्मशताब्दी विशेषांक नीलिमा गुंडी रुईया कॉलेज वसंत बापट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलिमा गुंडी,  सुभाषनगर, पुणे
nmgundi@gmail.com

भाषाभ्यासक, कवयित्री. पुणे येथील सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक (निवृत्त)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके