डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"हीच तर प्रेमाची गंमत आहे " : पारंपरिक अभिरुचीला धक्का देणारी प्रसन्न सुखात्मिका

वेगवेगळ्या कल्पनांवर नाट्यलेखन केल्यामुळे पाटोळेंच्या एकूणच नाट्यलेखनात आशय/विषयांची विविधता आलेली आहे. पाटोळे प्रेक्षकांना खूप संपन्न करणारा नाट्यानुभव जरी देत नसले तरीदेखील त्यांनी प्रेक्षकांच्या अभिरुचीचा एक किमान दर्जा कायम राखलेला आहे. नाटककार पाटोळेंना प्रेक्षकांचे सुखावह मनोरंजन करण्याची हातोटी निश्चितपणे साधलेली आहे. पाटोळेंच्या या सर्व वैशिष्ट्यांचा प्रत्यय, सुयोग प्रकाशित नाट्यसुमन निर्मित ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, या सुखात्मिकेत येतो.

बंदिस्त कथानक, त्या कथानकाचा विकास करणारी ठसठशीत पात्रे, अलंकरणाचा मोह टाळलेले, परंतु संघर्षपूर्ण संवाद, आवश्यकता असेल तिथे आलंकारिक संवादांचे उपयोजन आणि प्रारंभ, उत्कर्ष आणि विराम या क्रमाने होणारा नाटकाचा शेवट ही कानेटकर नाट्यलेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आपल्या दीर्घकालीन आणि विपुल नाट्यलेखनाद्वारे नाटककार वसंतराव कानेटकरांनी साठोत्तरी मराठी नाटकांना दिलेले हे रूप त्यांच्यानंतर नाटककार रत्नाकर मतकरी आणि अशोक पाटोळे यांच्या नाटयसंहितांमधून प्रत्ययाला येते. मतकरींच्या नाटकांमधून या वैशिष्ट्यांचा गडद प्रत्यय येत असला तरीदेखील मतकरी हे प्रामुख्याने सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे नाटककार आहेत. (त्या अर्थाने आणि नाट्यनुभवाच्या दृष्टीने ते कानेटकरांपेक्षा विजय तेंडुलकरांशी जास्त नाते सांगणारे नाटककार आहेत.) अशोक पाटोळे मात्र त्या अर्थाने सामाजिक आशयाची, समस्यांची नाटके लिहिणारे नाटककार नाहीत. त्यांचे 'आई, रिटायर होतेय'सारखे गाजलेले नाटकदेखील वरकरणी स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडित असले तरीदेखील ते एक प्रकारे फॅन्टसीच्याच अंगाने विकास पावलेले आहे. मात्र वेगवेगळ्या कल्पनांवर नाट्यलेखन केल्यामुळे पाटोळेंच्या एकूणच नाट्यलेखनात आशय/विषयांची विविधता आलेली आहे. पाटोळे प्रेक्षकांना खूप संपन्न करणारा नाट्यानुभव जरी देत नसले तरीदेखील त्यांनी प्रेक्षकांच्या अभिरुचीचा एक किमान दर्जा कायम राखलेला आहे. नाटककार पाटोळेंना प्रेक्षकांचे सुखावह मनोरंजन करण्याची हातोटी निश्चितपणे साधलेली आहे. पाटोळेंच्या या सर्व वैशिष्ट्यांचा प्रत्यय, सुयोग प्रकाशित नाट्यसुमन निर्मित ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, या सुखात्मिकेत येतो.

व्यावसायिक नाटकांचा मुख्य प्रेक्षक असणाऱ्या वर्गाला रुचेल अशा, परिचित वाटतील अशा घटना-प्रसंगांमधून या नाटकाची कथावस्तू आकार घेते. डॉ. राहुल हा व्यवसायाने दातांचा डॉक्टर आहे. तो अविवाहित आहे. त्याच्या घर-कम् दवाखान्यात करुणा ही आकर्षक तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत आहे. खरे तर ती केवळ रिसेप्शनिस्ट नाही तर राहुलच्या चहा-नाश्त्यापासून ते त्याच्या जेवणापर्यंत, त्याची सर्व प्रकारची काळजी घेणारी व स्वतःला त्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग समजणारी. डॉ. राहुल हा मात्र अनेक मुलींना प्रेमात पाडणारा, आजच्या भाषेत बोलायचे तर उडाणटप्पू असा अविवाहित आहे. माणिक नावाची नवी तरुणी आणि राहुलचे सध्या प्रेमप्रकरण सुरू आहे. मात्र राहुलला नेहमीप्रमाणेच लग्नाच्या बंधनात न अडकता तिच्याशी केवळ प्रेमखेळ करायचेत. त्यासाठी, तो करुणा ही आपली पत्नी असून तिच्याशी आपण घटस्फोट घेणार आहोत, अशी थाप माणिकला मारतो. आपल्या या कारस्थानात तो आपला विवाहित मित्र सुधाकर आणि स्वतः करुणालादेखील सामावून घेतो. करुणाला आपली पत्नी असण्याचे आणि आपल्यात व तिच्यात कडाक्याचे भांडण होत असल्याचे नाटक करायला सांगतो. घरच्या अडचणींमुळे आणि खरे तर मनाने राहुलमध्ये गुंतल्यामुळे करुणाला स्वतःचे लग्न हा विषय अप्रिय बनलेला आहे. राहुलची पत्नी असण्याचे नाटक वठवीत असताना खरोखरच त्याच्यामध्ये गुंतल्याचा तिला प्रत्यय येतो. तिच्या या प्रेमाचा साक्षात्कार सुधाकर, माणिक आणि तिचा आंग्लाळलेला मराठी बोलणारा तरुण मित्र बबन यांना होतो. या साऱ्या घटना- प्रसंगांमधून कथानकात विनोद निर्माण करणारा जो गोंधळ होतो, त्या अर्थपूर्ण गोंधळाची आणि अखेरीस राहुल आणि करुणाच्या यशस्वी प्रेमप्रकरणाची ही सुखात्मिका आहे. उच्छृखल राहुल आणि त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी करुणा, राहुलमध्ये गुंतलेल्या माणिक वर प्रेम करणारा बबन, त्या दोघांमधील मैत्री आणि त्या मैत्रीचे प्रेमात होणारे रूपांतर, सुधाकर आणि करुणा यांनी राहुलला वठणीवर आणण्यासाठी एकमेकांवरच्या प्रेमाची आणि लग्न करीत असल्याची केलेली बतावणी, त्यामुळे सुधाकरच्या पत्नीच्या मनात निर्माण होणारा गैरसमज, अशा तिपेडी रचनेमधून उपर्युक्त कथानक विकास पावत जाते. कथानकाच्या या विकासासाठी नाटककाराने मराठी प्रेक्षकांना परिचित असणाऱ्या व्यक्तिरेखा निर्माण केलेल्या आहेत. 

सदैव नवनव्या तरुणींच्या मागे असणारा गुलछबू राहुल, त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली, परंतु तसे न दाखविणारी देखणी करुणा, राहुलला सल्ला देणारा, त्याच्या कारस्थानात सहभागी होणारा, कथानकात आवश्यक असेल तेव्हा नेमक्या वेळेला प्रवेश करणारा राहुलचा विवाहित मध्यमवर्गीय मित्र सुधाकर, राहुलच्या प्रेमात असलेली परंतु त्याचा डाव लक्षात येताच त्याच्यामधून बाहेर पडून बबनच्या प्रेमात पडणारी माणिक आणि तिचा धांदरट मित्र/प्रियकर बबन या सर्वच व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या परिचयाच्या असाव्यात अशा केलेल्या आहेत. नाटककाराने या प्रत्येक व्यक्तिरेखेला अशा सुखात्मिकतेतील पात्रांना असलेल्या सवयी दिलेल्या आहेत. यांमधील राहुल बिनधास्तपणे, अस्ताव्यस्त जगणारा, सदैव हिंदी गाणी गुणगुणणारा आहे, करुणा सतत गडबडीत, धावपळीत असणारी, प्रारंभी कठोर वाटणारी, त्रागा करणारी परंतु देखणी स्त्री आहे. माणिक लाडिक बोलणारी नवथर तरुणी आहे, तर बबन आंग्लाळलेले मराठी बोलणाऱ्या तरुणांचा प्रतिनिधी आहे. तो निरागस परंतु स्मार्ट आहे. व्यक्तिरेखांच्या या स्वभाववैशिष्ट्यांमुळेदेखील ही सुखात्मिका प्रेक्षकांशी नाते निर्माण करते. पाटोळ्यांचे नर्म विनोदी शैलीतील संवाद, कचित तथाकथित तणावपूर्ण प्रसंगांतील खटकेबाज, संघर्षपूर्ण संवाद, भावनिक उद्रेक दाखवणारे संवाद आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुरूप लिहिलेले संवाद, हे या नाटकाचे बलस्थान आहेत. प्रेक्षकांच्या पारंपरिक अभिरुचीला धक्का न लावता त्यांना हसत ठेवण्यात ही प्रसन्न सुखात्मिका यशस्वी होण्यामध्ये या साऱ्या घटकांचा अर्थपूर्ण सहभाग आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये, संवादांचे बलस्थान नेमके ओळखून प्रसंगांची बांधणी केलेली आहे. योग्य कलावंतांची निवड हा त्यांच्या दिग्दर्शनामधील महत्त्वाचा घटक आहे. पात्रांना चपळ हालचाली देऊन तसेच त्रिस्तरीय नेपथ्यरचनेच्या सर्व भागांचा कौशल्याने वापर करून त्यांनी प्रयोग गतिमान ठेवलेला आहे. ज्यावेळी केवळ दोनच पात्रे रंगमंचावर असतील, तेव्हा त्यांना सर्व भागांत वावरायला लावून; तर अनेक पात्रे असताना त्यांना रंगमंचाच्या निरनिराळ्या जागांवर ठेवून त्यांनी रंगमंचीय अवकाश भरून काढलेला आहे.

संजय मोने या हरहुन्नरी नटाने डॉ. राहुलचा उडाणटप्पूपणा, वागण्यातील बेफिकिरी, कारस्थान रचतानाचा बेरकीपणा, माणिकला थाप ठोकतानाचा उडणारा गोंधळ, करुणासमोरची अगतिकता सराईतपणे दाखवलेली आहे. करुणा निघून गेल्यानंतरचे स्वगत त्याने सर्व भावाविष्कारांसह उत्कटपणे म्हटलेले आहे. ("ती फुलराणी" मधल्या प्रो. अशोक जहागिरदाराच्या स्वगताची आठवण व्हावी, असे या स्वगताचे लेखन झालेले आहे.). आंग्लाळलेले मराठी बोलण्याची सवय, धांदरटपणा आणि स्मार्टनेस यांचे मिश्रण, त्या जोडीला निरागसता ही बबन या पात्राची स्वभाववैशिष्ट्ये सुनील बर्वे या तरुण अभिनेत्याने चांगली व्यक्त केलेली आहेत. त्यांचे रंगमंचावर असणे सुखावह, प्रसन्न वाटते. मैथिली वारंगने माणिकचा लाडिकपणा, नवथरपणा नेमका साकारला आहे. मंगेश कदम यांनी सुधाकर ही एक प्रकारची पूरक व्यक्तिरेखा नीट केलेली आहे. शुभांगी गोखले या अभिनेत्रीने मात्र करुणाची भूमिका विलक्षण तन्मयतेने केलेली आहे. तिचा सुरुवातीचा त्रागा, फणकारा, राहुलमध्ये गुंतत जाणे, नाटक वठविताना, माणिकशी बोलताना उडणारा अगतिक करणारा गोंधळ, राहुलपासून दूर जाताना होणारी तडफड, अखेरचा तिचा आत्मविश्वास, हे सारे भावाविष्कार तिने कमालीच्या प्रत्ययकारकतेने साकार केलेले आहेत. या अभिनेत्रीचे प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या भूमिकेला उठावदार करणारे आहे.

राजन भिसे यांनी रंगमंचाच्या सर्व भागांचा वापर करून घेणारे त्रिस्तरीय नेपय्य उभारले आहे. त्याची रंगसंगती नेत्रसुखद आहे. हीच बाब त्यांनी केलेल्या वेशभूषेची! विशेषतः करुणा या नायिकेला दिलेली वेशभूषा आणि तिची रंगसंगती नेत्रसुखद आहे. अशोक पत्की यांचे पाश्चसंगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना या सुखात्मिका प्रसन्नता वाढविणारी आहे.

व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकवर्गाच्या पारंपरिक अभिरुचीला धक्का न देणारी ही प्रसन्न सुखात्मिका एकदा पहायला हरकत नाही.

Tags: Ashok Patki Shubhangi Gokhale Sunil Barve Sanjay Mone Vijay kenkre Vijay Tendulkar Ashok Patole Ratnakar Matkari Vasantrao Kanetkar neelkanta Kadam अशोक पत्की शुभांगी गोखले सुनील बर्वे संजय मोने विजय केंकरे विजय तेंडुलकर अशोक पाटोळे रत्नाकर मतकरी वसंतराव कानेटकर निलकंठ कदम weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके