डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘कुत्ते’ : प्रगल्भ मर्मदृष्टी देणारे करुण नाट्य

ज्या काळामध्ये मराठी व्यावसायिक रंगभूमी खोट्या, स्वप्नरंजनात्मक, तथाकथित आदर्शवादी क्षोभनाट्यांमध्ये रमलेली होती, त्याच काळामध्ये तेंडुलकर एखाद्या व्रतस्थ रंगकर्मीप्रमाणे त्यांच्या 'श्रीमंत', 'माणूस नावाचे बेट', 'कावळ्यांची शाळा', 'मधल्या भिंती', 'मी जिंकलो, मी हरलो', 'एक हट्टी मुलगी' अशा नाटकांमधून नव्या वास्तवदर्शी नाट्यानुभवांचे दर्शन मराठी प्रेक्षकांना घडवीत होते. मात्र हे दर्शन जरी विस्मयचकित करणारे असले, तरीदेखील त्याचे या काळातील स्वरूप प्रामुख्याने संयत होते.

ज्या काळामध्ये मराठी व्यावसायिक रंगभूमीवर कौटुंबिक जिव्हाळ्याची, सामाजिक समस्यांचे सुलभीकरण केलेली आणि कथानकाचा आरंभ, पताकास्थान (उत्कर्ष) आणि शेवट (खरे तर, समस्येचे निराकरण) अशा तंत्राने लिहिलेली नाटके प्राधान्याने येत होती, त्याच काळामध्ये, म्हणजे 1955 सालापासून, नाटककार विजय तेंडुलकरांनी मात्र या सांकेतिक रंगभूमीचा चेहरा बदलण्याचा निकराने प्रयत्न चालविलेला होता. युरोपच्या भूमीवर लढल्या गेलेल्या दोन महायुद्धांनी मानवी मूल्यांची सर्वंकष पडझड केली होती. नवी नैतिक मूल्ये आकाराला येत होती. मानवी समाजाला माणसाची अगतिकता, नियतिशरणता, स्वतःपासून, इतरांपासून आणि अंतिमतः सृष्टीपासूनचा माणसाचा तुटलेपणा, आणि या साऱ्यांच्या परिणामी होणारा भ्रमनिरास, वाट्याला येणारे अटळ एकाकीपण यांचा दाहक प्रत्यय आला होता. जरी महायुद्धांच्या प्रत्यक्ष झळा भारतीय समाजाला लागल्या नाहीत, तरीदेखील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या दशकातच सामान्य माणसाला एक प्रकारच्या स्वप्नभंगाने आणि वैफल्याने ग्रासण्यास सुरुवात झालेली होती. या सामान्य माणसाच्या, विशेषतः मध्यम वर्गाच्या दैनंदिन जीवनातील नाट्यपूर्ण संघर्ष नसणाऱ्या, वरकरणी सपक वाटणाच्या हर्ष-मर्षातून, अर्थपूर्ण घटनांमधून तेंडुलकरांनी प्रारंभी त्यांचा वास्तवदर्शी नाट्यानुभव शोधलेला आहे. त्यामुळे ज्या काळामध्ये मराठी व्यावसायिक रंगभूमी खोट्या, स्वप्नरंजनात्मक, तथाकथित आदर्शवादी क्षोभनाट्यांमध्ये रमलेली होती, त्याच काळामध्ये तेंडुलकर एखाद्या व्रतस्थ रंगकर्मीप्रमाणे त्यांच्या 'श्रीमंत', 'माणूस नावाचे बेट', 'कावळ्यांची शाळा', 'मधल्या भिंती', 'मी जिंकलो, मी हरलो', 'एक हट्टी मुलगी' अशा नाटकांमधून नव्या वास्तवदर्शी नाट्यानुभवांचे दर्शन मराठी प्रेक्षकांना घडवीत होते. मात्र हे दर्शन जरी विस्मयचकित करणारे असले, तरीदेखील त्याचे या काळातील स्वरूप प्रामुख्याने संयत होते. तेंडुलकरांना भारतीय स्तरावर नेणाऱ्या 'शांतता, कोर्ट चालू आहे!' या नाटकापासून मात्र तेंडुलकरांनी या संयत स्वरूपाची संगत सोडली. (मात्र ते बटबटीत कधीच झाले नाहीत!) आणि ते मानवी (आविष्कार प्रस्तुत कलाश्रय निर्मित 'कुत्ते' या हिंदी क्रौर्याचा, हिंसेचा, माणसांमधल्या पशुवत् वृत्तीचा, दांभिकपणाचा, क्रौर्य हिंसा आणि निरागसता यांच्या झगड्यात बळी जाणाऱ्या निरागस संवेदनशीलतेचा धाडसी वृत्तीने आपल्या नाटकांमधून वेध घेऊ लागले. ‘शांतता…’ नंतरची त्यांची 'गिधाडे', सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'बेबी' यांसारखी नाटके या विधानाची साक्ष आहेत. या काळातही तेंडुलकरांनी 'अशी पाखरे येती', 'घरटे अमुचे छान' सारखी नाटके लिहिली, हे खरे; परंतु या काळात तेंडुलकरांनी माणसामधल्या कुरूपतेला, सौंदर्यापेक्षा त्याच्या भेसूर, विकृत चेहऱ्याला प्रामुख्याने आपले लक्ष्य केले होते. याच काळात तेंडुलकर नाटकाच्या सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत होते. तेंडुलकरांचे हे नाट्यकर्तृत्व सूत्रबद्धरीत्या सांगण्याचे प्रयोजन त्यांचे आविष्कारप्रस्तुत, कलाश्रयनिर्मित नवे हिंदी नाटक 'कुत्ते' हे आहे. या नाटकाला नवे असे संबोधले असले, तरीदेखील त्यामधील नाट्यानुभव आणि तो सादर करण्यासाठी नाटककाराने योजिलेले तंत्र पाहता, तेंडुलकरांनी प्रस्तुत 'कुत्ते' हे नाटक 'शांतता...' आणि 'गिधाडे' या नाटकांच्या दरम्यानच्या काळात लिहिले असावे! तेंडुलकरांची 'शांतता...' पासून बदललेली जीवनदृष्टी आणि नाट्यविषयक जाणीव हे जसे यामागचे कारण आहे; तसेच याच काळामध्ये नवनाट्यामध्ये नव्या स्वरूपात अवतरणारा विदूषक, तमाशा, लोकनाट्य या लोकधर्मी प्रकारांविषयी नवनाटककारांना वाटणारी जवळीक, या बाबी 'कुत्ते' या नाटकामधूनही प्रतीत होतात, हेदेखील या शक्यतेला पुष्टी देणारे एक कारण आहे.

नाटककाराने या नाटकामध्येही सामान्य स्तरावर आयुष्य जगणाऱ्या माणसांची, त्यांच्यावर चालणाऱ्या नियतीच्या सत्तेची, अध्यात्म, पारलौकिकाचे तत्त्वज्ञान यांच्याआड दडपलेल्या माणसांच्या कामप्रेरणांची, माणसांमधल्या बेरकीपणाची आणि हिंसक प्रवृत्तीची आणि अंतिमतः पुरुषसत्ताक व्यवस्थांमध्ये बळी जाणाऱ्या निरागस स्त्रीजीवनाची कहाणी सांगितलेली आहे. स्वतःला सुसंस्कृत, नीतिमान समजणारा माणूस वासनाविकारांच्या थैमानाखाली पशुवत् आचरण करतो, तेच त्याचे खरे स्वरूप आहे; ही (भयावह) जाणीव या नाटकामधून अधोरेखित झालेली आहे. सोलापूरजवळच्या एका तालुक्याच्या गावी नोकरीनिमित्त गेलेल्या 'मैं' या तरुण विक्रेत्याचा संबंध तेथील त्याच्या सहायक असणाऱ्या 'घोडके सरकार' याच्याशी येतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली हा विक्रेता-बसाले सरकार- एका प्रौढ विधवेच्या घरी जातो, आपल्या मानसिकदृष्ट्या अधू असलेल्या मुलीसोबत जगणारी ही विधवा आपल्या मृत्यू पावलेल्या नवऱ्याला कधी कुत्र्याच्या तर कधी घोड्याच्या रूपात पाहत राहते. एक प्रकारे मानसिक विकृतीच्या अरण्यात वावरणाच्या ह्या प्रौढ विधवेविषयी 'बसाले'ला शारीरिक आकर्षण वाटू लागते आणि पुढचे भीषण नाट्य घडते.

वास्तवदर्शी आणि ठसठशीत व्यक्तिरेखा हे तेंडुलकरांच्या नाटकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या काही व्यक्तिरेखा तर मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणामध्ये वादग्रस्त ठरल्यानंतरदेखील अविस्मरणीय बनलेल्या आहेत. या नाटकातील "मैं', 'घोडके', 'औरत', 'ताडपत्रीवाला' या चारही व्यक्तिरेखा वादग्रस्त ठरणाऱ्या नसल्या, तरीदेखील त्या तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरल्याच्या निदर्शक मात्र जरूर आहेत. वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमधील या व्यक्तिरेखा आहेत. 'मैं' कनिष्ठ मध्यमवर्गातला, तर 'घोडके’ सर्वसामान्य आयुष्य जगणारा, गावरान, बेरकी, अनुभवाने शहाणा झालेला धूर्त इसम आहे. 'ताडपत्रीवाल्या'चा जीवनस्तर मध्यमवर्गीय, तर 'औरत' भूतकाळातल्या तथाकथित ऐश्वर्यावर गुजराण करणारी प्रौढ विधवा आहे. या प्रत्येकाचे एक स्वतंत्र वास्तव आहे. बुद्धिमत्ता नसलेल्या, जेमतेम पदवी प्राप्त केलेल्या 'मैं ला प्रौढ विधवेविषयी शारीर आकर्षण वाटते आहे. आणि त्याच्या हातून भयंकर गुन्हा घडतो. ती त्याची नियती आहे. 'ताडपत्रीवाल्याला पुत्र नसल्याचे दुःख आहे. त्यासाठी तो बुवाबाजीच्या नादी लागलेला आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार बाबी त्याच्या जगण्याचा मूलाधार आहेत. घोडकेच्या माध्यमातून गावपातळीवरचे वास्तव नाटकात प्रवेश करते. त्या बकाल गावातील त्याची नोकरी, तेथील माणसे, त्यांचे जगणे यांच्याशी त्याची नियती जखडलेली आहे. तो गावरानपणाचा अस्सल नमुना आहे. प्रौढ विधवा ‘औरत' आध्यात्मिक तत्त्वज्ञानाखाली, ग्रंथांखाली वावरत स्वतःच्या कामप्रेरणा दडपून टाकते आहे. या कामप्रेरणांच्या दबावामुळे वेळोवेळी तिच्याकडून घडणाऱ्या कृती ह्या तिच्यावर चालणाऱ्या नियतीच्या सत्तेचा अटळ परिणाम आहेत. याखेरीज, नाटकाच्या अखेरीस केवळ एका भयानक किंचाळीने व्यक्त होणारी 'औरत'च्या मुलीची व्यक्तिरेखा यात आहे. ती प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाही. परंतु तिच्या निरागसपणाचा बळी जाण्यामधून एक प्रकारे नाटककाराची जीवनदृष्टीच प्रतीत होते. या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वतंत्र वास्तवाच्या एकत्रित परिणामातून हा नाट्यानुभव अधिक गुंतागुंतीचा बनतो, आणि त्यामधून मानवी जीवनामधील हे करुण, भीषण नाट्य साकार होते. 

व्यक्तिरेखांचे अनुभव, त्यांचे मनोव्यापार नेमकेपणे व्यक्त करणाऱ्या संवादांमुळेदेखील हा नाट्यानुभव प्रत्ययकारकपणे पोहोचलेला आहे. अनलंकृत भाषेतील, कृत् नर्मविनोदी शैलीत लिहिलेले, कथनपर आणि प्रसंगांमधला ताण साकार करणारे हे संवाद आहेत. (सुषमा बक्षी यांनी या नाटकाचा केलेला हा हिंदी अनुवाद तेंडुलकरांच्या भाषेची ही सगळी वैशिष्ट्ये सामावून घेणारा आहे.) या नाटकाचा मुलीच्या बाबतीत घडणारा शेवट हा तार्किक विकासाला छेद देणारा, धक्का देऊन विस्मयचकित करणारा असला तरीदेखील तो तेंडुलकरांची जीवनदृष्टी व्यक्त करणारा औचित्यपूर्ण शेवट आहे. गुंतागुंतीचा जीवनानुभव, तो साकार करणाऱ्या सघन व्यक्तिरेखा, त्यांचे अनुभवविश्व तोलून धरणारे संवाद आणि या सगळ्या घटकांच्याद्वारे व्यक्त होणारी नाटककाराची अंतर्मुख करणारी, प्रगल्भ मर्मदृष्टी देणारी जीवनदृष्टी ही या करुण-नाट्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. प्रस्तुत नाट्यानुभव कालबाह्य होत नाही, तो यामुळेच!

तेंडुलकर नाट्यसंहितेमध्ये तपशीलवार देत असलेल्या रंगसूचनांमधून त्यांना अपेक्षित असलेला नाट्यप्रयोग ते सूचित करीत असतात. दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी यांनी या रंगसूचनांचा पुरेपूर आदर राखून प्रयोग सादर केलेला आहे. संहितेमध्येच निर्देश केलेल्या पारदर्शिकांमधून (स्लाईड्स) नाट्यानुभवासभोवतालचे वास्तव साकार केलेले आहे; तर तमाशा या लोकधर्मी प्रकाराचा वापर करून विविध प्रसंग निरनिराळ्या ठिकाणी सादर करण्यामधील अवडंबर त्यांनी कमी केलेले आहे. परंतु त्याचबरोबरीने हा नाट्यानुभव तालुका पातळीवरच्या एका गावात घडतो आहे. हेदेखील त्यांनी त्यामधून सूचित केलेले आहे. वास्तव आणि खेळ अशा दुहेरी स्तरांवर हा अनुभव विकसित होतो, ही जाणीव त्यांच्या दिग्दर्शनात प्रतीत होते. प्रत्येक व्यक्तिरेखेला तिच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार सादर करून परस्परांमधील ताणतणावाचे क्वचित हलक्या- फुलक्या शैलीतील प्रसंग त्यांनी कमालीच्या साधेपणाने, परंतु प्रत्ययकारकतेने साकार केले आहेत. नर्म विनोदाच्या अंगाने जाणारे हे तेंडुलकरी शैलीतले करुणनाट्य आहे याचे भान हट्टंगडींच्या दिग्दर्शनात दिसते.

किशोर कदम या अभिनेत्याने 'घोडके'ची व्यक्तिरेखा नजाकतीने साकार केलेली आहे. त्यांचे रंगमंचावरचे वावरणे, संवादफेक, मुद्राभिनय या साऱ्यांमधून त्यांनी घोडकेचा बेरकीपणा, इरसालपणा आणि त्याची घटनांकडे निर्लेपपणे पाहण्याची वृत्ती नेमकेपणाने पोहोचविलेली आहे. रोहिणी हट्टंगडी या नामवंत अभिनेत्रीने आपली निवड सार्थ ठरविली आहे. मृत नवऱ्याच्या (खोट्या) आठवणींमध्ये रममाण होऊन शारीर अनुभवांमधील सुखद क्षणांच्या स्मृतींना केवळ संवाद, डोळे, मुद्राभिनय आणि हालचाली यांच्याद्वारे त्यांनी कमालीच्या उत्कटतेने साकार केले आहे. कामभावनेची असोशी आणि मुलीच्या बाबतीतील प्रसंगानंतर उद्ध्वस्त होऊन जडशीळ होणे त्यांनी प्रभावीपणे साकार केलेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही या भूमिकेला अनुरूप होते. मकरंद अभ्यंकर या नव्या अभिनेत्याने पूर्ण आत्मविश्वासाने लवचिकपणे 'मैं ('बसाले’ची) ची भूमिका केलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भोळेभाबडे भाव, निरागसता, आपल्या कृतीविषयीचा अंदाज न येणारी संदिग्धता, यांच्यामुळेदेखील त्यांची व्यक्तिरेखा उठावदार झालेली आहे. नव्या स्वरूपातला विदूषक, प्रेक्षकांशी संवाद साधणारा निवेदक-कथनकार आणि प्रत्यक्ष 'मैं' ही एकाच व्यक्तिरेखेची निरनिराळी रूपे त्याने सहजतेने साकार केलेली आहेत. या नाटकाच्या निमित्ताने मकरंद अभ्यंकरमधला अभिनेता जाणवला. पद्माकर सरप यांचा 'ताडपत्रीवाला' ठीक होता.

सीताराम कुंभार यांनी अवडंबर न माजवता नेमके नेपथ्य उभारून रंगमंच दिग्दर्शकाला आणि अभिनेत्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. रवींद्र सावंत यांनी रंगसूचनांबरहुकूम पारदर्शिकांची निवड करून आणि अनुभवानुरूप प्रकाशयोजना करून नाट्यानुभव गडद केलेला आहे.

नाट्यानुभवाकडून जीवनविषयक प्रगल्भ मर्मदृष्टीची आकांक्षा बाळगणाच्या रसिकांनी या वास्तवदर्शी करुण नाट्याला एकदा तरी अनुभवावयास हवे.

Tags: व्यावसायिक रंगभूमी विजय तेंडुलकर कुत्ते नाटक निळकंठ कदम Vijay Tendulkar drama ‘dog’ Neelkanth Kadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके