डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी" विशुद्ध मनोरंजन करणारा आधुनिक फार्स

या नाटकातील कथानकाचा काळ दुसऱ्या महायुद्धाचा, म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येण्याचा काळ आहे. हिटलर आणि त्याचा सहकारी गोबेल्स युद्ध जिंकण्याचे डावपेच लढवू पाहताहेत. अर्थात्, नाटककाराने प्रारंभीच त्यांच्या या डावपेचांचे विडंबन केलेले आहे. तेव्हापासूनच, नाटककाराच्या लेखनामधील खट्याळपणाची, मॅडनेसची आपल्याला कल्पना येऊ लागते आणि नाटक आपली पकड घेऊ लागते.

सध्या मराठी व्यावसायिक रंगभूमीवर तथाकथित विनोदी नाटकांची लाट आलेली आहे. याची कारणे खरे तर जशी रंगभूमीवर विविध रूपांमध्ये कार्यरत असणाऱ्या रंगकर्मीच्या मानसिकतेमध्ये आहेत; तशीच ती आपल्या समाजाच्या, विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या मानसिकतेमध्येदेखील दडलेली आहेत. निरनिराळ्या एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक, हौशी रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी असा प्रवास करून दूरदर्शन मालिकांमध्ये दुय्यम अथवा प्रमुख भूमिकांची संधी मिळविणे; किंवा तांत्रिक स्वरूपाची कामे करीत राहणे आणि त्यांच्याद्वारे पैसा आणि प्रसिद्धी मिळविणे; समाजामध्ये तथाकथित स्वरूपाचा मानमरातब मिळविणे; ही प्रामुख्याने आजच्या रंगकर्मीची मानसिकता बनलेली आहे. ही मानसिकता बनलेल्या रंगकर्मींना लोकप्रियतेच्या प्रकाशझोतांचे सततचे आकर्षण असते. परिणामी, सामाजिक समस्यांपासून दुरावलेली, बाष्कळ विनोद असणारी, समूहनृत्य, गाणी यांची रेलचेल असलेली, क्वचित् समस्यांचेच सुलभीकरण केलेली नाटके करून हे रंगकर्मी प्रेक्षकानुनय करीत राहिलेले दिसतात. परिणामी, अशा नाटकांची आज व्यावसायिक रंगभूमीवर गर्दी झालेली आहे.

या रंगभूमीचा प्रेक्षक मुख्यत्वेकरून मध्यम वर्गातील, उच्च मध्यमवर्गातील आणि उच्च वर्गातील आहे. एकेकाळी सामाजिक चळवळीचे, प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या किंवा या चळवळींमध्ये अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सहभागी होणाऱ्या या मध्यमवर्गाचा, उच्च मध्यमवर्गाचा गेल्या पंचवीस वर्षांमधील प्रवास हा एक प्रकारच्या भ्रमनिरासाने व वैफल्याने ग्रासलेला आहे. (अर्थात् याला काही सन्माननीय व्यक्ती अपवाद आहेत.) अशा भ्रमनिरास झालेल्या, वैफल्यग्रस्त असलेल्या आणि परिणामी व्यक्तीवादी जीवनदृष्टी स्वीकारून केवळ स्वतःच्याच सुखांचा अहोरात्र विचार करणाऱ्या या प्रेक्षकांना गंभीर आशयाची, समकालीन वास्तवाला बेधडकपणे सामोरी जाणारी, गुंतागुंतीचा, अर्थपूर्ण मानवी जीवनानुभव साकार करणारी, नातेसंबंधांची जटिलता, व्यक्त करणारी नाटके नकोशी झालेली आहेत. त्यांना हवी आहेत दोन-अडीच तास या साऱ्या वास्तवापासून त्यांना पळायला लावणारी आणि उथळ विनोदाने खळाळून हसायला लावणारी नाटके! प्रेक्षकांच्या या मानसिकतेमुळेदेखील व्यावसायिक रंगभूमीवर आज तथाकथित विनोदी नाटकांची चलती आहे; मात्र अशा गर्दीतही निखळ आणि विशुद्ध विनोद निर्मितीचा एखाददुसरा प्रयत्न साहजिकच लक्षवेधी ठरतो. असाच प्रयत्न अथर्व थिएटर्सच्या परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगात प्रत्ययाला आला. मुळामध्ये नाटककार, दिग्दर्शक, सर्व कलावंत व्यावसायिक रंगभूमीवर नवखे असताना हे नाटक धडाकेबाज गर्दीत पन्नास प्रयोगांपर्यंत मजल मारते, हीच घटना लक्षवेधी म्हणायला हवी.

परेश मोकाशी या नाटककार, दिग्दर्शकाने यापूर्वी ‘सं.डेबूच्या मुली’ हे प्रायोगिक नाटक लिहून दिग्दर्शित केले होते. त्या नाटकाला 'रंगदर्पण' पुरस्कारदेखील लाभला होता. एक प्रकारच्या खट्याळ, तिरकस नजरेने आणि मॅडनेस वृत्तीने आपल्या सामाजिक जीवनातील स्त्री-पुरुष नात्याचा, विशेषतः पुरुषी वर्चस्वाचा दंभस्फोट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या नाटकात केला होता. या खट्याळपणाचा, तिरकसपणाचा, एक प्रकारच्या मॅडनेसचा पूर्णाविष्कार प्रस्तुत ‘मु.पो.बोंबिलवाडी’मध्ये पाहावयास मिळतो. तर्काला छेद देणारे कथानक, त्याच्या विकासाचा निश्चित नसणारा आलेख, उत्स्फूर्त, शब्दप्रधान, घटनाप्रधान, बौद्धिक चमक दाखविणारा विनोद, श्लील-अश्लीलतेच्या सीमारेषा पुसट करणारे संवाद, तर्काधिष्ठित विकासाच्या कल्पनांना छेदणारी पात्रनिर्मिती आणि या साऱ्यांच्या संयोगातून रंगमंचावर अर्थपूर्ण गोंधळ निर्माण करून प्रेक्षकांचे निखळ रंजन करणे, ही जर फार्सची वैशिष्ट्ये असली तर प्रस्तुत ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक नव्या, आधुनिक स्वरूपातील फार्सच आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. 

या नाटकातील कथानकाचा काळ दुसऱ्या महायुद्धाचा, म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येण्याचा काळ आहे. हिटलर आणि त्याचा सहकारी गोबेल्स युद्ध जिंकण्याचे डावपेच लढवू पाहताहेत. अर्थात्, नाटककाराने प्रारंभीच त्यांच्या या डावपेचांचे विडंबन केलेले आहे. तेव्हापासूनच, नाटककाराच्या लेखनामधील खट्याळपणाची, मॅडनेसची आपल्याला कल्पना येऊ लागते आणि नाटक आपली पकड घेऊ लागते. महाराष्ट्रातल्या कुण्या एका बोंबिलवाडी नामक मऱ्हाठी गावात स्वातंत्र्यचळवळीचे वारे पोहोचले आहेत. नाटकातील वैद्यबुवा आणि भास्कर बाँब बनवून गावातील पोलीस चौकी उडवण्याचा कट रचतात. पोलीस चौकीचा प्रमुख असलेला इंग्रज इन्स्पेक्टर कुक हा नाटकवेडा आहे. विशेषतः बालगंधर्वांचा चाहता आहे. त्यांना तो स्त्रीच समजतो. गावातील नाटक मंडळी त्या काळाला शोभणारे संगीतप्रधान नाटक करणार असतात. वैद्यबुवा आणि भास्कर पोलीस चौकीत घुसतात. इन्स्पेक्टर कुक आणि हवालदार भैरव यांच्या तावडीत सापडतात. बाँबचा कट हा 'रुद्रासुराचा वध' या नाटकातीलच एक भाग असल्याचे आणि बालगंधर्व स्वतः प्रयोग पाहायला येणार असल्याचे सांगून स्वतःची सुटका करून घेतात. इन्स्पे. कुक त्याच्या संग्रही असणारे वेगवेगळे पोषाख प्रयोगासाठी देतो. जुन्या नाटकांचे विडंबन करणारा नाटकातील नाट्यप्रयोग, त्यामध्ये काम करणारे वरवंटेकाका, वरवंटेकाकू, बबन, कुंडलिनी आणि इतर पात्रे, प्रयोगाच्या दरम्यान पेटाऱ्यातून अवचितपणे येणारा हिटलर, बबनने हिटलरच्या पोषाखात चौकीत जाणे, यांसारख्या तर्काला छेद देणाऱ्या घटना, प्रसंगांमधून, शब्दप्रधान, घटनाप्रधान, उत्स्फूर्त विनोदातून आणि शब्दांचा खेळ करणाऱ्या, कोटीबाजपणाची रेलचेल असणाऱ्या संवादांमधून या लेखनातील मॅडनेस लखलखीतपणे प्रकट होतो आणि प्रेक्षक मनमुरादपणे खळाळून हसत राहतो. पुराणातील, इतिहासामधील परिचित, ज्ञात प्रसंगांचा, प्रेक्षकांच्या त्या भोवतालच्या मानसिकतेचा वापर विनोदनिर्मितीसाठी करण्याच्या नाटककाराच्या कौशल्याला खास दाद द्यायला हवी. फार्सचा हेतू जर निखळ, विशुद्ध रंजन करणे हा असेल तर, कोणतेही जीवनविषयक तत्त्वज्ञान न सांगणारा, सलग आशय सूत्र व मांडणारा 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' हा आधुनिक, नव्या स्वरूपातील फार्स हा हेतू साध्य करतो असे निश्चितपणे म्हणता येईल.

या नाटकाच्या संहितेतील खट्याळपणा, ‘मॅडनेस’, दिग्दर्शक परेश मोकाशी यांने प्रयोगातूंन पुरेपूर व्यक्त केलेला आहे. फार्समध्ये घटना, प्रसंगांना त्यांची अशी अंगभूत गती असते, हे ओळखून दिग्दर्शकाने रंगमंचावर वेगाने घटना घडविलेल्या आहेत. त्यांनी पात्रांची अभिनय शैली देखील नाटकांतील काळ लक्षात घेऊन त्या काळातील अभिनय शैलीचे विडंबन करणारी ठेवलेली आहे. कायिक, वाचिक, विडंबनात्मक अभिनयावर भर देणारी, क्वचित त्यांचा अतिरेक करणारी ही शैली आहे. विनोद-निर्मितीसाठी प्रसंग, पात्रांचा अभिनय, हालचाली, दृश्यबदल यांमधील एकही जागा दिग्दर्शकाने सोडलेली नाही. दोन दृश्यांमधील काळोखे अंतर त्यांनी जुन्या नाट्यगीतांचा अर्थपूर्ण वापर करून भरून काढलेले आहे. एक प्रकारे काळाचेच विडंबन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच, या नाटकाचे तथाकथित कथानक कालबद्ध असूनही त्यामधील विनोद मात्र काळाला भेदून जाऊन आजच्या तरुण व प्रौढ प्रेक्षकांना खळाळून हसवतो आहे. निखळ, विशुद्ध विनोदी नाटकाच्या यशाचे हेच तर गमक असते.

दिग्दर्शक मोकाशींना त्यांच्या नटसंचाने कमालीची साथ दिलेली आहे. खरे तर एकही नामवंत विनोदी कलावंत नसताना विशुद्ध विनोदाचे हे शिवधनुष्य या कलावंतांनी लीलया पेललेले आहे. हिटलरच्या रूपातील चिन्मय केळकर, गोबेल्स, वैद्यबुवा झालेले ऋषिकेश जोशी, क्रांतिकारक भास्कर झालेले विनोद लव्हेकर, सचिन देशपांडे, सोनाली विनोद, वैभव मांगले हे कलावंत विनोदनिर्मितीची एकही जागा सोडत नाहीत.

नाटक खळाळतं ठेवण्यात, गतिमान राखण्यात त्यांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिलेले आहे. मात्र खास उल्लेख करायला हवा तो, हवालदार झालेल्या गणेश मयेकर, बबन साकार करणाऱ्या जितेंद्र जोशी आणि बरवंटेकाकू झालेल्या गीतांजली यांचा. विनोदाची जणू उपजत जाण असलेल्या जितेंद्र जोशी यांनी बबनच्या बाळवटपणाचे राखलेले बेअरिंग, संवादांचे विशिष्ट लयीत केलेले उच्चारण, चेहऱ्यावरचे बाळवटपणाचे भाव, रंगमंचावरचा वावर, यांमधून ही भूमिका विलक्षण लक्षवेधी केलेली आहे. मराठी विनोदी नाटकांनी आशेने पाहावा, असा हा नट आहे. गणेश मयेकरांनी आपला चेहरा आणि उंची यांचा अर्थपूर्ण वापर करीत हवालदार भैरव केलेला आहे. गीतांजली ही प्रायोगिक रंगभूमीवरील एक गुणी अभिनेत्री आहे. विनोद-निर्मितीसाठी तिने केलेल्या कायिक आणि वाचिक अभिनयाने आपण वेगळ्या प्रकारच्या भूमिकादेखील समर्थपणे करू शकतो, हेच तिने दाखवून दिलेले आहे.

सुनील देवळेकरांचे सुटसुटीत नेपथ्य व प्रकाशयोजनेने आणि दादा परसनाईक, शैलेंद्र मांडवकर यांच्या संगीत संयोजनाने या आधुनिक फार्सची लज्जत वाढविलेली आहे. सवंग, उथळ विनोदाची अपेक्षा न बाळगणाऱ्या, बुद्धिप्रधान विनोदाची आकांक्षा असलेल्या, जीवनातील लहान लहान प्रसंगांमधून निखळ आनंद घेऊ पाहणाऱ्या प्रेक्षकांनी विशुद्ध मनोरंजनासाठी या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ ला जायला हवे.

Tags: परेश मोकाशी मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी नीलकंठ कदम Mukkam Post Bombilwadi. Neelkanth Kadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके