डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘रथ’यात्रेतील स्मरणचित्रे...

या राज्यात मी गेली 64 वर्षे प्रदीर्घ काळ वास करतो आहे. इथे पाहिलेल्या आणि शिकलेल्या अनेक गोष्टींनी मला विलक्षण प्रोत्साहित बनवले. सतत बदलणाऱ्या, उत्क्रांत होणाऱ्या परिस्थितीला तितक्याच प्रगल्भपणे प्रतिसाद देण्याबाबत इथल्या सर्वच संबंधितांना पुढच्या काळात आलेले अपयश पाहून मी निराशही झालो. सामाजिक गतिविधींसंदर्भात तर्कशुध्द् विचार करून अनुरूप कृती करण्याची वेळ आणि संधी महाराष्ट्राने दवडली, यांबाबत मला होणारा खेद आपण जाणून घ्याल, अशी आशा आहे. अहो, या सगळ्यातून महाराष्ट्रानेच काही धडे घेतले नाहीत तर ओडिशा वा देशातील अन्य प्रांतांबद्दल काय बोलायचे?

– 1 –

8 जुलै 1949 रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर मी उतरलो तेव्हा मध्यान्ह टळून गेलेली होती. ओडिशातील कटकसारख्या गावातून पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मी निघालो आहे, याचा माझ्या डब्यातील काही सहप्रवाशांना अंमळ विस्मयच वाटलेला मला जाणवला. पुण्यातील ब्राह्मण विद्यार्थ्यांनाच मुख्यत्वे प्रोत्साहन देण्याचा तिथल्या अध्यापक वर्गाचाही खाक्या असल्याने पुण्याच्या शिक्षणक्षेत्रात पुणेकर विद्यार्थ्यांचीच आणि त्यांतल्या त्यांतही पुन्हा ब्रह्मकुलोत्पन्न विद्यार्थ्यांचीच काय ती वर्णी लागते, असे त्यांचे अनुभवसिध्द मतही त्यांनी मला ऐकवल्याने मी तर पुरता हादरूनच गेलो होतो. मला बसलेला तो पहिला धक्का. बी.ए. (ऑनर्स) पर्यंतचे माझे शिक्षण कटकलाच झाले. ज्या महाविद्यालयातून मी पदवीधर झालो त्या महाविद्यालयात अर्थशास्त्राचे पदव्युत्तर वर्ग नुकतेच सुरू झालेले होते.

पदव्युत्तर शिक्षणासाठीही मी कटकलाच राहिलो तर कितीही नाही म्हटले तरी माझ्या वडिलांच्या दैनिकाच्या कार्यालयातच माझा बराचसा वेळ जाईल हे मला पुरेपूर ठाऊक असल्याने मी कटक सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या वेळी अलाहाबाद विद्यापीठात अनेक जण प्रवेश घेत असत. परंतु, माझ्या अनेक समकालीनांच्या मते अलाहाबाद विद्यापीठातील शिकणे-शिकवणे तेव्हा फार काही दर्जेदार नव्हते. आमच्या महाविद्यालयातील सामान्य बुध्दिमत्तेचा विद्यार्थीही तिथे एम.ए.ला पहिल्या वर्गात सहज पास होत असे. त्या वेळी आमच्या एका स्नेह्यांनी पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेचा पर्याय सुचविला. ते गृहस्थ हिंद सेवक संघाचे आजीव सदस्य होते. वसतिगृहाचा खर्च तसा माफक असल्याने पुण्यात राहणे त्या मानाने फारसे खर्चिक नसेल, असेही त्यांचे मत पडले.

त्या वेळी प्रा. डॉ. धनंजयराव गाडगीळ हे गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संचालक होते. पुणे अथवा गोखले अर्थशास्त्र संस्था यांबाबत मला तेव्हा काही म्हणजे काहीच माहिती नव्हते. हिंदुस्थानातील औद्योगिक उत्क्रांतीचा आलेख रेखाटणारे प्राध्यापक गाडगीळ यांचे एक पुस्तक काय ते मी माझ्या पदवीपरीक्षेच्या अभ्यासक्रमादरम्यान वाचलेले होते. अखेर, बऱ्याच विचारविनिमयान्ती मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. हिंद सेवक संघाचे आणखी एक आजीव सदस्य डॉ.र.गो. काकडे यांच्यासाठी दिलेले एक परिचयपत्र बरोबर घेऊन मी पुण्याला पोहोचलो. पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्याचे जे दर्शन मला पुण्याच्या प्रवासादरम्यान घडले त्यामुळे मी पार हरखूनच गेलो. घाटात तरंगणारे ढग, कुंद हवा, रसातळ दाखवणाऱ्या दऱ्या आणि पहाडांतून कोसळणारे धबधबे यांनी नटलेल्या पश्चिम घाटांचे सौंदर्यवर्णन करणारे एक प्रदीर्घ पत्रच मी नंतर माझ्या आईला लिहिल्याचे मला आठवते.

पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरून मी बाहेर आलो. संस्थेमध्ये जाण्यासाठी टांगा केला खरा पण, ‘गोखले अर्थशास्त्र संस्था’ अथवा ‘हिंद सेवक संघ’ ही दोन नावे त्या टांगेवाल्याच्या कानावरून तोपर्यंत कधीच गेलेली नसल्याचा साक्षात्कार मला झाला. त्याला ठाऊक होता तो केवळ गोखले हॉल! अखेर, जंगली महाराज रोडच्या शेवटाला थोडीफार विचारपूस केल्यानंतर आमचा टांगा हिंद सेवक संघाच्या आवारात येऊन पोहोचला. संस्थेच्या आवारातील गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अर्धपुतळ्यापाशी पोहोचून मी टांग्यातून उतरत असतानाच शेजारच्या इमारतीतील तळमजल्यावरील एका खोलीमधून एक सद्‌गृहस्थ बाहेर आले आणि ‘नीळकंठ रथ तुम्हीच का?’, अशी चौकशी त्यांनी मजजवळ केली. ‘मी र.गो.काकडे’ अशी स्वत:ची ओळखही त्यांनी करून दिली. त्या पहिल्यावहिल्या भेटीतच काकडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा माझ्यावर उमटला.

माझे स्थानीय पालकत्व त्यांनी त्या क्षणापासूनच जणू स्वीकारले. लहानमोठ्या अशा प्रत्येक व्यक्तिगत अडीअडचणीला ते माझ्या मदतीला धावून येत असत. वसतिगृहातील माझी खोली काकडे यांच्या कार्यालयाशेजारीच होती. सामान खोलीमध्ये ठेवून अंमळ स्थिरस्थावर झाल्यानंतर काकडे मला प्राध्यापक गाडगीळ यांच्याकडे घेऊन गेले. संस्थेच्या आवारातील एका लहानशा दुजली इमारतीमध्ये त्या वेळी गाडगीळ बसत असत. मी पुण्यात येऊन दाखल झाल्याचे त्यांना केवळ औपचारिकपणे कळवणे, एवढाच त्या भेटीचा उद्देश होता. गाडगीळ यांची गाठ घेऊन झाल्यानंतर काकडे मला डेक्कन जिमखाना परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले. पुण्याला सुखरूप पोहोचल्याची तार मला वडिलांना पाठवायची होती. तारेचा मजकूर आणि वडिलांचे नाव व पत्ता लिहून मी तारेचा फॉर्म पोस्टातील माणसाकडे दिला. फॉर्ममध्ये लिहिलेला कटक पोस्ट ऑफिसचा पत्ता वाचून पोस्टातील त्या कर्मचाऱ्याने इंग्रजीमध्ये मला विचारले ‘‘कटक! कोठे आहे हे कटक? पूर्व पाकिस्तानात की पश्चिम?’’. त्याचा तो प्रश्न ऐकून मी क्षणभर स्तंभितच झालो.

‘कटक हे शहर ओडिशामध्ये आहे’, असे उद्‌गार पुढच्याच क्षणाला माझ्या तोंडून उमटले. तोवर, जवळच्या पुस्तिकेमध्ये डोकावून कटक कोठे आहे याचा शोध घेण्यात तो गुंगला होता. पोस्टातील त्या माणसाची ती विचित्र पृच्छा माझ्या मनात रेंगाळत राहिली. संस्थेतील माझे वसतिगृह नेमस्त होते. माझ्या खोलीला खिडक्याच नव्हत्या. अतिशय लहानखुऱ्या त्या खोलीत एक लाकडी खाट, लहानसे लाकडी टेबल आणि एक खुर्ची एवढ्याच तीन गोष्टी होत्या. लोखंडी सांगाड्यावर आडवी टाकलेली तीन फळकुटे असे त्या खाटेचे रंगरूप. संडास-बाथरूमची सोय त्या इमारतीच्या आवारातच पण दुसऱ्या ठिकाणी केलेली होती. पहिल्या वर्षाच्या अखेरीस माझा मुक्काम आकाराने जराशा मोठ्या आणि खिडक्या असणाऱ्या खोलीमध्ये हलवण्यात आला. वसतिगृहातील माझ्या पाच वर्षांच्या वास्तव्यादरम्यानचा हाच काय तो एकमात्र बदल.

कटकमधील महाविद्यालयातून पदरात पाडून घेतलेल्या माझ्या पदवीला पुणे विद्यापीठाची औपचारिक मान्यता मिळवून पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये मला रीतसर दाखल करण्याचा उपचार अजून बाकी होता. त्यासाठी, पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांची मी भेट घ्यावी असे प्राध्यापक गाडगीळ यांनी मला सुचविले. त्यानुसार, पुण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुणे विद्यापीठाच्या मनोरेदार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दाखल झालो. तिथे चिटपाखरूही नव्हते. कुलसचिवांचे कार्यालय मी शोधत असतानाच एका खोलीतून एक शिपाई बाहेर आला आणि ‘काय पाहिजे?’ असे त्याने मला विचारले. ‘मला कुलसचिवांना भेटायचे आहे’, असे मी सांगितल्यावर मी कोठून आलो आहे याबाबत त्याने माझ्याकडे चौकशी केली. ‘मी ओरिसाहून आलो आहे’, असे मी सांगताच ‘अच्छा, बिहार आणि ओरिसा’ असे उद्‌गार त्याच्या तोंडातून बाहेर पडले.

कुलसचिवांची भेट होणे जरा अवघडच आहे, असेही त्याने मला सूचित केले. आमचे हे बोलणे चालू असतानाच बुशकोट आणि पँट ल्यालेला एक तरुण मनुष्य (मी त्या वेळी धोतर आणि सदरा अशा वेषात होतो) दुसऱ्या एका खोलीतून बाहेर आला. मला काय हवे आहे असे त्याने मला विचारले. माझे काम कळल्यानंतर त्याने कुलसचिवांच्या कार्यालयाकडे अतिशय शांतपणे निर्देश केला, तो स्वत: आत गेला आणि ‘तुला आताच कुलसचिवांना भेटता येईल’, असे त्याने मला बाहेर येऊन सांगितले. त्या शिपायाच्या उद्धटपणाच्या अगदी विरुद्ध असे त्या तरुण सद्‌गृहस्थाचे वागणे होते. त्या तरुण सद्‌गृहस्थाने विद्यापीठातील नोकरी सोडल्याचे पुढे मला बऱ्याच वर्षांनी कळले. विद्यापीठ सोडल्यानंतर तो मनुष्य मराठी रंगभूमीवरील एक प्रथितयश नटवर्य बनला आणि त्याही पुढे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीतही अभिनेता म्हणून तो ख्यातनाम झाला. मला त्या वेळी विद्यापीठात भेटलेला तो तरुण गृहस्थ म्हणजे शरद तळवलकर!

माझ्या एका मित्राचा आणि शरद तळवलकरांचा व्यक्तिगत स्नेह आहे असे जेव्हा मला पुढे कळले तेव्हा त्यांची आणि माझी एकदा गाठ घालून देण्याबाबत मी माझ्या मित्राला विनंती केली. मराठी रंगभूमी आणि चित्रपटांच्या क्षेत्रात त्यांनी संपादन केलेल्या लौकिकाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नव्हे तर, निखळ आंतरिक चांगुलपणातून माझ्यासारख्या एका अ-मराठी व्यक्तीला अनेक वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना भेटण्याची मला इच्छा होती. मी त्यांना भेटलो. अनेक वर्षांची माझी एक मनीषा त्यामुळे पूर्ण झाली. आमच्या त्या भेटीनंतर काही दिवसांतच शरद तळवलकर यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

डॉ.काकडे, प्राध्यापक गाडगीळ, शरद तळवलकर आणि हिंद सेवक संघातील सर्वश्री बापट, काळे, देव... यांच्यासारखे कर्मचारी माझ्या जडणघडणीच्या टप्प्यावरच माझ्या आयुष्यात आले, हे मी माझे भाग्य समजतो. पुढे काही वर्षांनी रावसाहेब पटवर्धनांशीही माझा परिचय झाला. मदतीचा हात पुढे करण्यास ही सगळीच मंडळी सततच कमालीची उत्सुक असत. मात्र, हा सन्मान्य अपवादच होता, हे मला नमूद केलेच पाहिजे. अन्यथा, सर्वसाधारणपणे माझा अनुभव याच्या विरुध्द आणि विपरीतच होता. त्या काळात अभ्यासाचे आमचे तास विद्यापीठात घेतले जात असत. ‘सिल्व्हर ज्युबिली’नामक बस कंपनीची बस फर्गसन कॉलेज रस्त्यावरून पकडून आम्ही विद्यार्थी विद्यापीठात तासांसाठी जात असू. हिंद सेवक संघाच्या वसतिगृहातून जाणारे आम्ही जवळपास सहा-सातजण तेव्हा होतो. परंतु बस पकडण्यासाठी जाताना वा परतीच्या वाटेवर त्यांपैकी एकही विद्यार्थी ना माझ्याबरोबर कधी बोलत असे, ना रस्त्याने माझ्याबरोबर कोणी चालत असे.

मी पुण्यात येऊन दाखल झाल्याला सहा महिने उलटून गेल्यानंतरची एक गोष्ट. त्या दिवशी कसे कोणास ठाऊक पण, विद्यापीठात तासाला जाणारे आम्ही दोघेच विद्यार्थी होतो. मी आणि माझ्या वर्गातील आणखी एक जण. बसच्या दिशेने चालता चालता एकाएकी ‘तुझे नाव शर्मा ना!’ असे त्या मुलाने मला विचारले. त्याला वास्तवात विचारायचे होते माझे आडनाव. कारण, महाराष्ट्रात व्यक्तीला तिच्या आडनावानेच ओळखले जाते आणि तिला हाकदेखील आडनावानेच मारतात, हे माझ्या तोवर अंगवळणी पडलेले होते. अर्थात, दुसऱ्या वर्षात आम्ही सगळे पोहोचलो त्या दरम्यान त्यांच्यापैकी अनेकांशी माझी दोस्ती झालेली होती. ते मैत्र पुढे जीवनभर टिकले.

आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल यांबाबत इथल्या चांगल्यापैकी शिकलेल्यांनाही किती घनघोर अज्ञान आहे, याची प्रचीती मला इथे आल्यानंतर लवकरच आली. तसे हे अज्ञान त्या काळात आपल्या देशात सार्वत्रिक होते. मात्र, त्यातल्या त्यात पुण्यात तर हे अज्ञान तेव्हा अधिकच प्रगाढ असल्याचा अनुभव मला येत राहिला. माझ्या समकालीनांपैकी बहुतेकांना केवळ मराठ्यांच्या इतिहासाचा आणि त्या इतिहासाशी संलग्न असलेल्या मोगलांच्या इतिहासाचाच काय तो परिचय आहे, हे वास्तव माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागले होते. ऊर्वरित भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाबाबत ते बव्हंशी अनभिज्ञच होते.

कटक हे ठिकाण पूर्व पाकिस्तानात आहे की पश्चिम, असा प्रश्न पोस्टातील त्या कर्मचाऱ्याने मला तेव्हा का विचारला असावा, याचा उलगडा मला ते सगळे वास्तव बघितल्यानंतर झाला. मराठ्यांनी अटकेपार झेंडे नेले होते, हे त्याने मराठ्यांच्या इतिहासात वाचले होते. ‘कटक’ आणि ‘अटक’ यांच्यातील ध्वनिसाधर्म्यामुळे त्याचा घोटाळा झाला. ‘अटक’ आणि ‘कटक’ हे दोन्ही एकच या गफलतीतून त्याने कटक हे शहर पूर्व पाकिस्तानात आहे की पश्चिम, असा प्रश्न तेव्हा मला विचारला होता. इतिहासाची कथा अशी आणि भूगोलाबाबत तर विचारूच नका! वसतिगृहात येऊन दाखल झाल्याला मला तीन महिने होतात न होतात तोच एके दिवशी संध्याकाळी व्हरांड्यामध्ये मला एकट्यालाच उभे असलेले पाहून एक तरुण गृहस्थ माझ्याशी बोलायला आले.

मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयात मी अर्थशास्त्राचा व्याख्याता आहे, अशी त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली आणि आम्ही दोघे गप्पा मारायला लागलो. बी.ए.ची पदवी मी कोणत्या विद्यापीठातून घेतली, असा प्रश्न त्यांनी संभाषणादरम्यान मला विचारला. मी उत्कल विद्यापीठाचे नाव सांगितल्यावर, हे नव्यानेच स्थापन झालेले विद्यापीठ आहे का, असा पुढचा प्रश्न त्यांनी मला विचारला. पुणे विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी सात वर्षे उत्कल विद्यापीठ अस्तित्वात आलेले आहे, असे मी त्यांना अतिशय संयतपणे सांगितले. आमच्या गप्पा सुरूच होत्या. बोलण्याच्या ओघात एकाएकी, ‘‘नीळकंठ, ओरिसा हे नेमके आहे तरी कोठे?’’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला (नव्याने परिचित माणसाला त्याच्या पहिल्या नावाने हाक मारण्याची त्यांची ती कृती त्या काळी अपवादात्मकच होती). एवढा प्रश्न विचारूनच थांबले नाहीत. तर, ‘‘ओरिसा हे बंगाल आणि बिहार यांच्यामध्ये आहे की बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्या दरम्यान आहे?’’ असा पुढचा प्रश्न त्यांनी विचारला. अशा प्रश्नांना मी तोवर पुरेसा सरावलेलो होतो. त्यामुळे त्या प्रश्नांनी मी अचंबित वगैरे काही झालो नाही.

‘‘भारताच्या नकाशावर आपण कधीकाळी दृष्टिक्षेप टाकलेला असाल तर; बंगाल, बिहार, संयुक्त प्रांत व बेरार, मद्रास इलाखा आणि बंगालचा उपसागर यांनी वेढलेल्या भूभागाला ओरिसा असे म्हणतात, हे आपल्या ध्यानात येईल’’, असे मी उत्तरलो. एवढ्यावरच न थांबता, ‘‘बंगाल आणि बिहार यांच्यामधील तसेच बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्यादरम्यानची सीमारेषा केवळ प्रतीकात्मक आहे’’, अशी भरही मी त्यांच्या ज्ञानात घातली. माझे ते तीक्ष्ण प्रत्युत्तर मनाला फारसे लावून न घेता त्यांनी त्यांचे बोलणे चालूच ठेवले. थोड्या वेळाने त्यांनी एकाएकी पुन्हा विचारले, ‘‘कटक हे आसामच्या उत्तरेला आहे की दक्षिणेला?’’ ही मात्र आता अगदी हद्द होती. देशातील एक विख्यात अर्थतज्ज्ञ म्हणून ते गृहस्थ पुढे नावारूपाला आले. त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आमची मैत्रीही अभंग राहिली.

घरी जाण्यासाठी मला पूर्व पाकिस्तानातून जावे लागते का, असा प्रश्न मला किती जणांनी विचारला असेल याची तर गणतीच नाही. आसाम आणि ओडिशा या दोन राज्यांच्या स्थानांकनाबाबतचे हे सारे अज्ञान, दुसरे काय! पुढे, माझा एक वर्गमित्र हैदराबादमार्गे बेझवाड्यापर्यंत जाणार असल्याने त्याच्याबरोबर सुटी सुरू होण्याआधी आठवडाभर घरी जाण्याबाबत परवानगी घेण्यासाठी मी प्राध्यापक गाडगीळ यांना भेटलो तेव्हा, कटकला बरहमपूरमार्गे जाणार तर, अशा तऱ्हेची टिप्पणी त्यांनी केली त्या वेळी मला आर्श्चयाचा सुखद धक्काच बसला तो या सगळ्या पार्श्वभूमीवर.

– 2 –

पुण्यातील विद्यापीठीय शिक्षणाबाबतचा माझा अनुभव मात्र संमिश्र ठरला. एका विषयाला एक तास या हिशेबाने एम.ए. च्या पहिल्या वर्षात आम्हा विद्यार्थ्यांना आठवडाभरात केवळ आठ तासच काय ते वर्गात बसायला लागायचे. त्या वेळी ट्यूटोरियल्स नसायची. अध्यापकांची भेट घेणे हे तर तेव्हा अशक्यच असे. माझ्या माहितीनुसार कलकत्ता, अलाहाबादसारख्या ठिकाणचे चित्र यापेक्षा वेगळे असायचे. पुणे विद्यापीठाची फी मात्र त्या वेळी भारतात सर्वाधिक होती! पहिल्या जेमतेम तीन आठवड्यांतच या सगळ्यापायी मला चिंता वाटायला लागली. अखेर, धीर एकवटून मी प्राध्यापक गाडगीळ यांना भेटायचे ठरवले. मला इथे विलक्षण एकाकी आणि निराधार वाटू लागल्याचे मी त्यांच्या कानावर घातले. गाडगीळांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. ‘मी केंब्रिज विद्यापीठातून माझी पदवी घेतलेली असल्यामुळे भारतातील विद्यापीठीय व्यवस्थांचा मला फारसा काही अनुभव नाही,’ असे प्राध्यापक गाडगीळांनी मला आमच्या संभाषणादरम्यान सांगितले.

केंब्रिजमधील शिक्षणपध्दतीनुसार वर्गातील तासिकांपेक्षा ट्यूटरच्या ट्यूटोरियल्सना तिथे अधिक महत्त्व दिले जाई, असेही प्राध्यापक गाडगीळ त्या वेळी म्हणाले. त्यांच्या त्या विधानावरच मी नेमके बोट ठेवले आणि ट्यूटोरियल्सची अशी काहीच व्यवस्था आपल्या इथे नाही, हे मी त्यांच्यासमोर मांडले. प्राध्यापक गाडगीळांनी त्याबद्दल लगोलग दिलगिरी व्यक्त केली आणि विद्यापीठ नवीन असून तिथे अध्यापक चमू मर्यादित असल्याने नाना प्रकारच्या व्यवस्था अजून आकाराला यायच्या आहेत, असे त्यांनी मला समजावून सांगितले. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची तयारी असेल त्यांच्यासाठी साप्ताहिक ट्यूटोरियल ते स्वत: घेतील असेही त्यांनी लगोलग सांगून टाकले. त्या नंतरच्याच आठवड्यात अशी ट्यूटोरियल्स घ्यायला त्यांनी सुरुवातदेखील केली. केव्हाही काहीही अडचण आली तर मला खुशाल भेटत जा, असेही त्यांनी मला त्या वेळी सांगून टाकले.

हे सगळे झाले तोवर मी पुण्याला येऊन महिना लोटला होता. ट्यूटोरियल्स घेण्याबाबत गाडगीळांनी आश्वासन दिलेले होते. त्यांना केव्हाही भेटण्याची मुभा त्यांनी मला दिलेली होती. दुसऱ्या एखाद्या विद्यापीठात जाण्याने आणखी नवीन अनिश्चिततेला आमंत्रण मिळाले असते. हा असा सगळा विचार करून अखेर पुण्यातच राहण्याचा निर्णय मी घेतला. मात्र, पुणेकर प्राध्यापक व विद्यार्थी आणि पुण्यातील शिक्षण यांबद्दल पुण्यात येतानाच्या माझ्या प्रवासादरम्यान माझ्या सहप्रवाशांनी दिलेले इशारे काही अगदीच अस्थानी नव्हते, याची प्रचिती मला परीक्षेच्या निकालाव्दारे पुरेपूर आली. विद्यार्थ्याने केलेले वाचन आणि उत्तर लिहिताना मांडलेले तर्कशुद्ध विश्लेषण यांच्यापेक्षाही, विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत पातळीवर असलेले स्नेहसंबंध आणि प्रश्नाचे उत्तर लिहितेवेळी आपणच वर्गात दिलेल्या नोटस्‌चा त्यांनी केलेला वापर या दोन बाबींचे मोल अनेक प्राध्यापकांच्या लेखी अधिक महत्त्वाचे ठरत असे.

माझी एम. ए. ची परीक्षा झाल्यानंतर गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्येच संशोधन साहाय्यकाचे पद प्राध्यापक गाडगीळ यांनी मला देऊ केले. संयुक्त राष्ट्रसंघाचा एक संशोधन प्रकल्प पुरा करून त्या वेळी ते परत आले होते. संशोधक साहाय्यकाचे काम करीत असतानाच डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी नाव नोंदविण्याची सुविधाही ते मला देणार होते. माझ्यापुढे त्या वेळी दुसरा पर्याय होता तो भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी परीक्षेला बसण्याचा. दोहोंतून एका पर्यायाची निवड करण्याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्या वडिलांनी आणि काकांनी माझ्यावरच टाकली. मात्र, मंत्रिगणांचे वर्तन बघता प्रशासकीय सेवेतील चाकरी हा फारसा समाधानकारक पेशा ठरेल असे वाटत नाही, अशी पुस्ती त्या दोघांनी जोडली.

प्राध्यापक गाडगीळांनी माझ्यापुढे ठेवलेला प्रस्ताव स्वीकारायचा निर्णय मी घेतला आणि पुण्यात राहिलो. प्राध्यापक गाडगीळांचा संशोधन साहाय्यक म्हणून केलेल्या उमेदवारीचा मला अफाट लाभ झाला. वेळोवेळी ते लहान लहान कामे माझ्याकडे सोपवत असत. त्या निमित्ताने मला संबंधित साहित्याचे केवळ चौफेर वाचनच करावे लागे असे नाही तर, अनेकानेक धोरणात्मक बाबींच्या संभाव्य परिणामांबाबत चिंतन-मननही करणे भाग पडे. त्यांनी माझ्याकडे पहिलेच काम सोपविले ते दुष्काळ निवारणासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये (फॅमिन कोड) सुधारणा करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे. ते 1951 साल होते. तीव्र दुष्काळाचे संकट महाराष्ट्राच्या पुढ्यात ठाकलेले होते. दुष्काळ निवारणासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्वपक्षीय केंद्रीय समितीचे गाडगीळ त्या वेळी अध्यक्ष होते.

दुष्काळ निवारणासंदर्भातील नियमावलीमध्ये सुधारणा घडवून आणण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास त्यांनी मला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सांगितले. मग मी केवळ दुष्काळ निवारणासंदर्भातील नियमावलीच नव्हे तर तिच्या निर्मितीशी संबंधित यच्चयावत ऐतिहासिक दस्तऐवज वाचून काढले आणि त्या नियमावलीमध्ये आवश्यक वाटणाऱ्या सुधारणांबाबत एक तपशीलवार प्रदीर्घ टिपण तयार केले. मी तयार केलेला तो मसुदा समितीने तसाच्या तसा स्वीकारून तोच मसुदा निवेदनाच्या स्वरूपात मुंबई सरकारला सादर केल्याचे मला त्यानंतर पुढे बऱ्याच काळाने समजले आणि तेही निव्वळ योगायोगानेच. महाराष्ट्रातीलच केवळ नव्हे तर भारतातील दुष्काळांचाही इतिहास या वाचनामुळे मला चांगल्यापैकी ज्ञात झाला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या लोकोत्तर व्यक्तींच्या, या संदर्भातील कामाशी त्याचप्रमाणे पुणे सार्वजनिक सभेच्या कार्याशीही माझी पहिलीवहिली ओळख झाली तीही त्यामुळेच.

क्षेत्रीय सर्वेक्षणाव्दारे सातारा जिल्ह्यातील काही खेडेगावांसंदर्भात गोखले अर्थशास्त्र संस्थेने संकलित केलेल्या सांख्यिकी तसेच अन्य प्रकारच्या माहितीवरही मी त्या वेळी काम केले. पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांच्या अर्थव्यवस्थांचा पट त्याव्दारे माझ्यासमोर उलगडला गेला. त्या संदर्भात काही लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वीच माझ्याकडे दुसरे एक काम सोपविण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रवर्तित केलेल्या ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षणावर आधारित संशोधनपर प्रबंध वाचून प्राध्यापक गाडगीळ यांच्यासाठी त्यावर दर आठवड्याला टिपण तयार करण्याचे ते काम होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ग्रामीण पतपुरवठ्यासंदर्भातील दिशादर्शक समितीचे प्राध्यापक गाडगीळ हे त्या वेळी एक सदस्य होते. देशाच्या विभिन्न भागांतील अनेक जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थांचे चलनवलन समजावून घेणे आणि त्या अर्थव्यवस्थांसंदर्भात क्षेत्रीय पाहणीव्दारे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याच्या अभ्यासपध्दतींचा आढावा घेणे या उभय बाबींशी संलग्न असलेले माझ्या लेखी ते एक व्यापक असे बहुआयामी शिक्षणच होते.

एका जिल्ह्यातील ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षणावर बेतलेल्या संशोधनपर प्रबंधाचे पुनर्लेखनही मी केले. या साऱ्या कार्यानुभवाचा मला माझा डॉक्टरेटचा प्रबंध लिहितेवेळी खूप फायदा झाला. आपल्या देशातील ग्रामीण तसेच शेतीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात 19 व्या शतकाच्या मध्यापासून जे काही संशोधन झालेले होते त्या संशोधनासाठी वापरण्यात आलेल्या अभ्यासपध्दतींचा विश्लेषक आढावा घेऊन त्यावर आधारित प्रबंध मी डॉक्टरेटसाठी तयार करावा, असा संशोधनविषय प्राध्यापक गाडगीळ यांनी मला सुचविलेला होता. या विषयासंदर्भात त्या वेळी उपलब्ध असलेले सर्व प्रकाशित साहित्य अभ्यासण्याची संधी मला प्रबंधलेखनाच्या निमित्ताने मिळाली. या अभ्यासात केवळ प्रकाशित ग्रंथच नव्हे तर, संस्थेच्या ग्रंथालयात उपलब्ध असणारे अनेकानेक आयोगांचे अहवाल आणि शेतसाऱ्याचे निश्चितीकरण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समित्या-अभ्यासगटांचे अहवालही अंतर्भूत होते.

हे सगळे साहित्य वाचणे आणि टिपणे तयार करणे हे अफाट काम होते. परंतु त्यामुळे भारताच्या विविध प्रांतांतील शेतीच्या समस्या आणि शेतीच्या अर्थकारणाची वैशिष्ट्ये यांबाबतचे माझे आकलन विलक्षण समृध्द बनले. प्रांताप्रांतांतील ग्रामीण अर्थव्यवस्थांमधील फरकांबाबतची स्पष्ट जाण माझ्या या वाचनामुळे माझ्या ठायी तयार झाली. केवळ इतकेच नाही तर, ‘जमीनदारी’ आणि ‘रयतवारी’ या दोन व्यवस्थांतर्गत नांदणाऱ्या ग्रामीण समाजव्यवस्थांमधील भेदही मला चांगल्यापैकी उमगले. पश्चिम भारतातील काही शेतकऱ्यांनी 1878 साली ब्रिटिश सरकारच्या तत्कालीन सेक्रेटरी ऑफ स्टेटला सादर केलेले एक निवेदन वाचून मी तर चकितच झालो. शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषिमाल तारण ठेवून त्याच्या आधारे शेतकऱ्यांना पतपुरवठा करणारी शेतकी बँक स्थापन करण्याबाबतची विनंती त्या शेतकऱ्यांनी राणीच्या शासनाच्या पुढ्यात सादर केलेली होती. अशा प्रकारे वित्तपुरवठ्याची सोय उपलब्ध झाल्याने सुगी झाल्या झाल्या खळ्यावरचा शेतमाल बाजारात नेऊन विकण्याची परवशता शेतकऱ्यावर येणार नाही आणि बाजारात चांगल्यापैकी भाव मिळेपर्यंत थांबण्याची क्षमता त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये निर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन त्या निवेदनात करण्यात आलेले होते. त्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्ये महादेव गोविंद रानडे यांचाही समावेश होता. 

किंबहुना, दख्खनच्या दंग्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचे अहवाल; 1880 ते 1901 या कालावधीत वेळोवेळी नेण्यात आलेल्या दुष्काळ निवारण आयोगांनी सादर केलेले त्यांचे अहवाल; मुंबई इलाख्याप्रमाणेच उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि बंगाल राज्यांतील शेतजमिनींवर आकारावयाच्या शेतसाऱ्यांचे निश्चितीकरण करण्यासाठी समित्यांनी केलेली सर्वेक्षणे अशांसारख्या बहुविध साहित्याच्या वाचनाव्दारे, देशाच्या विविध प्रांतांत 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात सक्रिय असणाऱ्या अग्रगण्य नेतृत्वाच्या उक्ती-कृती आणि लेखनाला वैचारिक अधिष्ठान पुरविणाऱ्या साधनसामग्रीचा मला जवळून परिचय घडला.

महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे विचारी नेतृत्व निपजण्यास दख्खन प्रांतातील विशिष्ट ग्रामीण अर्थव्यवस्था आणि समाजपध्दतीच कशी कारणीभूत आहे, याचा उलगडा मला या सगळ्या प्रक्रियेतून घडला. तर दुसरीकडे, समाजाच्या एकंदरच व्यवस्थेमध्ये निर्माण होणारे आधिक्य मूठभर जमीनदारांच्या मुठीत एकवटण्यास पूरक पर्यावरण निर्माण करणाऱ्या बंगालमधील जमीनदारी पध्दतीच्या मुशीतून त्या प्रांतात रवीन्द्रनाथच जन्मास येणार याचाही साक्षात्कार मला घडला.

– 3 –

ओडिशातील महानदीवर बांधण्यात येणाऱ्या हिराकूद धरणाच्या कालव्यांखाली येणाऱ्या त्या धरणाच्या लाभक्षेत्रांचे तपशीलवार क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याचे काम गोखले अर्थशास्त्र संस्थेस 1954 साली मिळाले. सेन्ट्रल वॉटर ॲन्ड पॉवर कमिशनने संस्थेकडे सुपूर्त केलेल्या त्या अभ्यासप्रकल्पातील क्षेत्रीय सर्वेक्षणाच्या भागाचा मुख्य म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. ओडिआ भाषा जाणणारा अभ्यासक माझ्या रूपाने संस्थेपाशी असल्यानेच गोखले अर्थशास्त्र संस्थेने त्या संशोधन प्रकल्पाचे काम स्वीकारले होते. ओडिशाच्या किनारपट्टीच्या ज्या भागातून मी आलो होतो त्या प्रदेशातील लोकसमाज व त्यांच्या चालीरीती आणि जिथे मी आता राहत होतो, काम करत होतो तो दख्खनचा प्रदेश आणि तिथे वास करणाऱ्या समूहांचे रीतिरिवाज यांच्यातील वैचित्र्याचे निरीक्षण व अध्ययन करण्याची संधी मला माझ्या इथल्या वास्तव्यामुळे मिळाली.

आमच्या आहारविषयक आवडीनिवडी भिन्न होत्या. ताटभर भात, मुगाचे घट्ट वरण आणि संमिश्र भाजी असा तुलनेने सुखवस्तू समजल्या जाणाऱ्या ओडिआ कुटुंबांचा आहार असे. आमच्या समाजात मांसाहार वर्ज्य समजला जात नसे. मात्र, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि सहज उपलब्धता यांवरच मांसाशनाचे प्रमाण अवलंबून असे. स्वयंपाकासाठी तिळाचे तेल वापरण्याची आमची परंपरा. त्या वेळी हळूहळू तिळाच्याऐवजी मोहरीचे तेल वापरामध्ये रूढ होऊ लागलेले होते. या सगळ्याच्या तुलनेत दख्खन प्रांती सगळेच निराळे होते. इथे लोक मुख्यत: ज्वारी खात असत. पूरक अन्न म्हणून जेवणात भात असे पण तोही मुख्यत: ब्राह्मण कुटुंबांत आणि एकंदरच समाजातील उच्चवर्गीयांच्या आहारात. किंबहुना, खेडेगाव असो वा शहर, ब्राह्मण समाजाच्या आणि इथल्या शेतकरी समाजाच्या आहारपध्दतींमध्येच मूलभूत फरक होता. अशी आणि इतकी तफावत ओडिशामध्ये आढळून येत नसे.

स्वयंपाकासाठी महाराष्ट्रात मुख्यत्वे वापरले जाई ते शेंगदाणा अथवा करडईचे तेल. भाषा आणि स्वयंपाकाचे तेल या दोन बाबींमुळेच आपल्या देशात जागोजागी भेद आढळून येतात असे माझे मत बनलेले आहे. त्यातही पुन्हा, खाण्याच्या तेलाबाबत तर आपल्या देशातील लोकसमूहांच्या आवडीनिवडी इतक्या कट्टर आणि तीव्र आहेत की आपल्यापेक्षा वेगळे तेल स्वयंपाकासाठी वापरणारा शेजारी देखील लोकांना नकोसा वाटतो. या वास्तवाचा अनुभव मी पुण्यात घेतलेला आहे. देशात अन्यत्र होता तसा जातिभेद इथेही होताच. परंतु, महाराष्ट्रापेक्षा त्याची तीव्रता ओडिशामध्ये कमी होती. या दोन प्रांतांतील लोकांच्या आहारविषयक सवयी, हा त्यामागील एक मुख्य घटक. बव्हंशी ओडिशा कुटुंबांना मत्स्याहाराचे वावडे नाही. मात्र, महाराष्ट्रातील ब्राह्मणांना मासे चालत नसत. किंबहुना मत्स्याहारी ब्राह्मणांना अन्य ब्राह्मण मुळात ‘ब्राह्मण’ समजतच नाहीत.

सारस्वत ब्राह्मण हे याचे एक उदाहरण. तुलनेने बहुसंख्य, चांगल्यापैकी सुशिक्षित आणि पुढारलेल्या कायस्थ जातसमूहाकडे ओडिशातील ब्राह्मणेतर समाजसमूहांचे अग्रणीपण राहत आले आहे. महाराष्ट्रात असे दिसत नाही. जवळपास 19 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत राजकीय सत्ता ब्राह्मणांच्या हाती राहिल्यामुळे असेल कदाचित पण, ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षाची धार महाराष्ट्रात अधिक तीव्र आहे. ओडिशाने आपली राजकीय स्वायत्तता आणि स्वातंत्र्य 16 व्या शतकाच्या अखेरीसच गमावले होते. बाहेरून आलेल्या मुस्लिम सत्ताधीशांनी ओडिशा आपल्या पंखाखाली आणला. महाराष्ट्रात पेशवे सत्ताधीश होते त्याप्रमाणे ओडिशामध्ये ब्राह्मण कधीच सत्ताधारी नव्हते. डाकूंचा गुलाम असणे, ब्राह्मण सत्ताधीश, वाफाळणारी कोशिंबीर आणि गारगट्ट तळण एकसारखेच अवांच्छनीय होय, अशा आशयाची एक म्हणच ओडिआ भाषेत आहे. 

नेमक्या याच भावनेने मराठी समाजात अधिक प्रमाणावर ताण आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होण्यास हातभार लावला. ओडिशामध्ये मात्र असा प्रकार आढळत नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजव्यवस्थेतील भेद कार्यसंबध्द स्वरूपाचे होते. लोहार, सुतार, न्हावी, धोबी यांच्यासारखे ग्रामीण समाजाला नानाविध दैनंदिन सेवा पुरविणारे व्यावसायिक आणि खाटिक, जागले, सफाई कामगार, यांच्यासारखे समाजपुरुषाला अन्य सेवा पुरविणारे समाजघटक यांना त्यांनी पुरविलेल्या सेवांचा ठोक मोबदला म्हणून शेतकरी कुटुंबांकडून वर्षाकाठी ठराविक धान्यधुन्य अदा केले जात असे. दख्खन प्रदेशातील गावगाड्याची ही व्यवस्था अत्यंत सुविहित होती. शेतीचा व्यवसाय ब्राह्मणेतर शेतकरी जातसमूहांच्या हाती असल्यामुळे गावगाड्याची ती व्यवस्था व्यवहारात राबविली जात असे. ओडिशाच्या वेगवेगळ्या प्रांतांत प्रदीर्घ काळापर्यंत नांदलेल्या जमीनदारी व्यवस्थेत अथवा संस्थानी कारभारात शेती करणाऱ्या समूहांची बाजू या गावगाड्याच्या तुलनेत कमजोर होती. साहजिकच, बाजारपेठीय व्यवस्था आणि रोखीच्या व्यवहारांचे युग अवतरल्यानंतर ओडिशातील ती व्यवस्था धीम्या गतीने आणि कोणत्याही स्वरूपाचा दृश्य ताणतणाव निर्माण न करता अस्तंगत झाली.

मराठी प्रदेशातील शेतकरी हा गरीब होता, अशिक्षित होता हे खरे. परंतु तो सडेतोड, रोखठोक आणि स्वाभीमानी होता, हे निर्विवाद. इथली रयतवारी व्यवस्था आणि मराठ्यांच्या लष्करातील चाकरी या दोहोंचा तो परिपाक असावा. जमीनदारी व्यवस्थेतील शेतकरी कायम दीन, झुकलेला आणि कोणत्याही सत्तेपुढे सपशेल लाचार होणारा, असाच मी पाहिलेला आणि अनुभवलेला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठी शेतकरी मला एकदम थेट, कोणाची भीडभाड न ठेवणारा आणि ताठ कण्याचा वाटला. दगड फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या वडार समाजातील काही व्यक्तींचे तेव्हा पाहिलेले चित्र माझ्या डोळ्यांसमोर आजही तितकेच ताजे आहे. येरवडा परिसरात तेव्हा राहणाऱ्या वडार समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांची एक सहकारी संस्था तयार करण्याची खटपट डॉ. काकडे त्या वेळी करत होते. त्या निमित्ताने त्यांच्यापैकी काहीजण डॉ. काकडे यांना भेटण्यासाठी हिंद सेवक संघाच्या कार्यालयात अधूनमधून येत असत.

डॉ. काकडेंच्या कार्यालयात त्यांच्या कामाच्या टेबलानजीक भिंतीपाशी तीन खुर्च्या ठेवलेल्या असत. कामानिमित्त येणाऱ्या त्या वडार व्यावसायिकांनी कमरेला केवळ लंगोटे परिधान केलेले असे. मात्र, काकडेंच्या खोलीतील त्या खुर्च्या रिकाम्या असतील तर ती मंडळी काकडेंनी त्यांना बसण्याचा संकेत करण्याची वाट न बघताच त्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालेली मी त्या काळात अनेक वेळा बघितल्याचे मला स्मरते. माझ्या प्रांतात हे चित्र कल्पनेतदेखील अशक्य होते. पुढे, या भागातील खेडेगावांत राहणारे शेतकरी भेटत तेव्हाही त्यांच्या रोखठोक, सडेतोड बाण्याची छाप माझ्यावर उमटत असे. साडीचोळी लेऊन शेतीभातीत राबणाऱ्या शेतकरी वर्गातील इथल्या महिला आणि एखादा अपरिचित मनुष्य दिसताच अंग चोरून दूर होणाऱ्या पडदानशीन अशा ओडिशाच्या किनारपट्टीतील तसेच बिगर आदिवासी पट्ट्यांतील स्त्रिया यांच्यातील फरक अत्यंत प्रकर्षाने जाणवणारा असे.

सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आणि पतसंस्थांसारख्या सहकारी संस्था स्थापन करण्याच्याबाबतीत महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने दाखवलेले संघटनकौशल्य, धडाडी आणि क्षमता यांच्यामुळे पुढील काळात मी असाच प्रभावित झालो होतो. हे सगळे असे असूनही, आधुनिक जीवनाच्या अनेक अंगोपांगांत, साहित्यासारख्या क्षेत्रात या समाजघटकांचे अस्तित्व इतके नगण्य का आणि कसे, या बाबीचा मला सततच विस्मय वाटत आलेला आहे. यथावकाश मराठी वृत्तपत्रे आणि मराठी ग्रंथांचे वाचन माझे सुरू झाले. अनेक क्षेत्रांतील अनेकांशी माझे बोलणे चालणे होऊ लागले. शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायक्षेत्रांकडे शेतकरी समूहातील समाजघटक अभावानेच वळतात, अन्य क्षेत्रांत त्यांनी अजूनही शिरकाव केलेला नाही, अशी माझी धारणा त्यातून पक्की होऊ लागली.

या समाजसमूहातील लेखकांची संख्या तर त्या काळी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच होती. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्या वेळी अनेक मुलींनी प्रवेश घेतलेला असे. परंतु त्यात मुख्यत्वे भरणा असे तो ब्राह्मण घरांतील मुलींचाच. अर्थशास्त्राच्या आमच्या पदव्युत्तर वर्गात अनेक मुले-मुली होत्या. मात्र, आमच्या त्या वर्गातील केवळ एकच मुलगी नेसत्या लुगड्याचा आदबशीर पदर डोईवर घेऊन वर्गात येत असे. ती वर्गात प्रवेश करीत असे त्या वेळी तिच्या दोन्ही हातांतील बांगड्यांची मंजुळ किणकिण कानी पडत असे. ती मुलगी इंदूरजवळच्या एका उच्चकुलीन खानदानी मराठा घराण्यातील होती, असे मला माझ्या मित्रांकडून कळले. पश्चिम महाराष्ट्रात ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला त्याच्या आगेमागेच ओडिशाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 

परंतु, इथे एक मूलभूत फरक ध्यानात घ्यायला हवा. राज्यकारभारात अनेक ठिकाणी इथे ब्रिटिशांना एतद्देशीयांची गरज भासत असल्याने शिक्षणाच्या सुविधांचा श्रीगणेशा त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रारंभीच्या काळातच केला. याच्या बरोबर उलटी परिस्थिती पूर्व भारतामध्ये होती. बंगालमध्ये ब्रिटिशांनी त्यांची सत्ता सुमारे अर्धा शतक आधीच स्थिरपद केलेली होती. त्यामुळे, सरकारी नोकऱ्यांत शिरकाव करून घेण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण-प्रशिक्षण पदरात पाडून घेण्यासाठी बंगाली जनतेला पुरेसा अवधी मिळाला. ओडिशाची किनारपट्टी आणि अंतर्गत भाग ब्रिटिशांनी 1803 साली मराठ्यांकडून ताब्यात घेतला. त्याच वेळी प्रशासनाच्या विविध शाखांधील अनेक स्तरांवरील कामे सांभाळण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताशी शिक्षित-प्रशिक्षित बंगाली नागरिकांच्या अक्षरश: तुकड्या होत्या. इंग्रजी भाषा आणि त्या भाषेतील ज्ञान संपादन करण्याच्याबाबतीत ओडिशातील ब्राह्मणसमाज कमालीचा रूढीग्रस्त आणि पुराणमतवादी होता.

पश्चिम भारतातील ब्राह्मणसमाज या बाबतीत अधिक पुढारलेला आणि जागतिक दृष्टिकोन असलेला होता. माध्यमिक शिक्षणाच्या मांडवाखालून जाऊन मॅट्रिकची परीक्षा पास झालेल्या पहिल्यावहिल्या ओडिआंची पिढी बाहेर पडायला 1864 साल उजाडले. म्हणजेच, इंग्रजी शिक्षणाच्याबाबतीत बंगालशी तुलना करता ओडिशा तब्बल 100 वर्षे तर पश्चिम महाराष्ट्राशी तुलना करता ओडिशा जवळपास 50 वर्षे तरी मागे होता. जमीनदारीशी संबंधित ‘सन सेट’ कायद्यानुसार थकबाकीच्या रकमा 31 मार्चपर्यंत जमा करण्यात अपयश आलेल्यांच्या जमीनदारीचा लिलाव कलकत्त्यातील फोर्ट विल्यम्स येथे 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात पुकारला गेला त्या वेळी त्या जमीनदाऱ्या विकत घेण्यासाठी ब्रिटिश प्रशासनात किरकोळ पदांवर काम करणारे हेच बंगाली बाबू हिरिरीने पुढे सरसावले.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील प्रदेशातच केवळ नव्हे तर बिहारमध्येही कोठे कोठे असणाऱ्या या जमीनदाऱ्या त्यांनी लिलावात पदरी पाडून घेतल्या आणि दूरदूरच्या मजला मारून हे बंगाली बाबू तिथे पोहोचले. आपापल्या जहागिरीचा प्रदेश त्यांनी शोधून काढला आणि मग स्वत:चे तांब्याभांडे त्यांनी तिथे स्थिर केले. या नव-जमीनदारांच्या मुलाबाळांच्या रूपानेच त्या त्या प्रांतांतील शालेय शिक्षणाचा लाभ मिळालेल्यांची पहिली पिढी उदयाला आली.

– 4 – 

ओडिशा आणि महाराष्ट्र या दोन प्रांतांत हा फरक होता. शिवाय, जमीनदारी आणि तिच्याशी साधर्म्य असणारी अन्य रूपांतील कूळ व्यवस्था ओडिशामध्ये प्रचलित असूनही ब्राह्मण आणि करण (कायस्थ) या दोन उच्च जातींखेरीज, जीवनाच्या विविध क्षेत्रांत, विभिन्न व्यवसायांत, साहित्यविषयक घडामोडींत सक्रिय असणाऱ्या अन्य जातींतील व्यक्तिमत्त्वे गेल्या शतकाच्या मध्यावर तिथे लक्षणीय संख्येने विद्यमान होती, ही बाब मला लक्षवेधी आणि स्पृहणीय वाटते. ओडिआ भाषेतील प्रथम आणि विख्यात कादंबरीकार गणले जाणारे फकीरमोहन सेनापती हे खंडायत समाजातील होते. ते लघुकथा लेखकही होते. त्यांच्या नावावर काही काव्यनिर्मितीही जमा आहे.

महाराष्ट्रातील ‘मराठा’ जातसमूहाचे ओडिशातील भावंड म्हणजे ‘खंडायत’. मराठीतील थोर कादंबरीकार हरि नारायण आपटे यांचे फकीरमोहन सेनापती हे समकालीन. ‘छ माण, आठ गुंठ’ ही त्यांची कादंबरी भारतीय कादंबरीच्या विश्वातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट कृतींमधील एक गणली जाते. ओडिशातील मराठा शासन-प्रशासनाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेली ‘लच्छमा’ ही त्यांची अन्य एक कादंबरी. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धातील ओडिशाच्या इतिहासाचा एक मूलभूत साधनस्रोत म्हणूनच फकीरमोहन सेनापती यांच्या आत्मचरित्राकडे बघितले जाते. जन्माने मराठी असलेले मधुसूदन राव हे ओडिआतील कवी आणि निबंधकार फकीरमोहन सेनापती यांचे समकालीन होते.

मधुसूदन राव हे ब्राम्हण समाजाचे अनुयायी असल्याने त्यांच्या काव्यावर ब्राम्हण समाजाच्या तत्त्वज्ञानाची छाया दिसते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, राव यांचे निबंध अगदी माध्यमिक शाळांतील क्रमिक पुस्तकांमध्ये निबंधलेखनाचा प्रमाणित वस्तुपाठ म्हणून समाविष्ट केलेले असत. ओडिआतील सर्वोत्कृष्ट तीन प्रथम आधुनिक कवींमध्ये गणना होणारे गंगाधर मेहेर हे जन्माने आणि व्यवसायाने कोष्टी होते. तेही फकीरमोहन सेनापती, मधुसूदन राव यांचेच समकालीन. त्यांची संस्कृत भाषेशीही उत्तम सलगी होती. सच्ची राउतराय हा असाच आणखी एक असामान्य प्रतिभेचा ओडिआ कवी.

1920 च्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या काव्यलेखनाचा प्रारंभ झाला. ओडिशातील ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारे त्यांचे काव्य तर चिरस्मरणीय आहेच; परंतु, ओडिशातील नागरी औद्योगिक समाजाच्या भावभावनांचे चित्रण विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीने काव्यात करणारा नागरी काव्याचा अग्रदूत म्हणूनही ते ख्यातकीर्त आहेत. पुढे, ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. सच्ची राउतराय हे देखील खंडायत समाजाचेच. खंडायत समाजातून पुढे येऊन उदंड कीर्ती संपादन केलेले असाधारण प्रतिभेचे अन्य दोन कवी म्हणजे नंदकिशोर बळ आणि राधामोहन गडनायक. खंडायत समाजातून आलेले मायाधर मानसिंग हे असेच आणखी एक श्रेष्ठ ओडिआ कवी आणि विद्वान व्यक्तिमत्त्व. शेतकरी जातींमधूनच केवळ नव्हे तर तथाकथित मागास जातींमधून आलेली किती तरी व्यक्तिमत्त्वे त्या वेळी वैज्ञानिक, प्राध्यापक, प्रशासक म्हणून आपापल्या क्षेत्रांत नावलौकिकास पावलेली होती. अशांची संख्याही लहानसहान नव्हती.

स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 60 वर्षांत शिक्षणाचा प्रसार सर्वदूर किती तरी मोठ्या प्रमाणावर झालेला असल्याने या सगळ्या जातसमूहांमधून नावारूपाला आलेले व्यावसायिक, साहित्यिक आज ओडिशामध्ये पदोपदी आढळून येतात. या नवोदितांची प्रभा आज सर्वत्र फाकलेली दिसत असली तरी त्यांच्या पूर्वसूरींची प्रभावळही आजमितीस तितकीच देदीप्यमान आहे. जातिआधारित राजकीय पक्षांचा उदय ओडिशातील राजकारणात न होण्यामागील हे एक कारण होय, असे मला वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर, साहित्यिक क्षेत्रातील यशकीर्ती आणि अन्य व्यवसाय क्षेत्रांतील चमकदार कामगिरी, रयतवारी व्यवस्था नांदणाऱ्या महाराष्ट्रातील ब्राह्मण जातींपुरतीच मर्यादित राहावी, या बाबीचा मला त्या वेळी अतिशय मोठा विस्मय वाटला. हे असे कशामुळे घडले असावे, याबाबत माझ्या अनेक मित्रांशी आजवर मी चर्चा करत आलेलो आहे. मात्र, या वास्तवामागील कार्यकारणभावाची समाधानकारक उकल काही मला अजूनही करता आलेली नाही.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या बहिणाबाई चौधरी यांचा त्या वेळी नव्यानेच प्रकाशित झालेला एक काव्यसंग्रह माझे मित्र अशोक केळकर यांनी 1954 च्या प्रारंभी केव्हा तरी मला दिला त्या वेळी मी खरोखरच विस्मयचकित झालो आणि भारावूनही गेलो तो या सगळ्या पूर्वपीठिकेमुळेच. बहिणाबार्इंची ती काव्यकृती नितांत सुंदर होती एवढेच केवळ नव्हे तर, त्या काळातील तो एक अपवादच होता. मराठी साहित्याचे माझे वाचन सुरू झाले ते माटे मास्तरांच्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या कथाकृतीपासून. त्या कथा वाचून मी तर इतका प्रभावित होऊन गेलो की ते पुस्तक वाचून पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा ओडिआ भाषेत अनुवाद करण्यास मी प्रवृत्त झालो. परंतु,

‘‘पहा जिवाला पडली भूली। चुकली त्याची वाट खरी। 
घर जरी असे अनंतरामी। प्रपंचधामी प्रीत करी।। 
आई देवकी दाई यशोदा। तिला चिकटतो हा वेडा। 
मर्म समजुनी कर्म करावे। प्राणी सारे भ्रम सोडा।।’’

या काव्यपंक्तींपाशी मी पोहोचलो आणि मला शस्त्रे म्यान करावी लागली! एखाद्या काव्यकृतीचा तितकाच रसमय काव्यानुवाद करण्याची काव्यमय प्रवृत्ती आणि क्षमता माझ्या ठायी नाही, हे तर खरेच. पण ही बाब एक वेळ बाजूला ठेवली घटकाभर तरी, माटे मास्तरांच्या त्या साहित्याचा अनुवाद करणे मला अत्यंत कठीण भासले.

मराठीतील काही असामान्य लेखनकृतींबाबतचा माझा अनुभव आणि भावनाही नेमकी अशीच आहे. पु.ल. देशपांडे यांच्या लेखनाचा अंतर्भावही याच कोटीत करावा लागेल. किंबहुना, पु.लं.च्या साहित्यकृतींचा यथार्थ अनुवाद अन्य कोणत्याही भारतीय भाषांत घडवून आणणे केवळ अशक्यप्राय होय, अशीच माझी तर धारणा आहे. केवळ इतकेच नाही तर, नेटाने त्या साहित्याचा अनुवाद करण्याच्या हट्टास आपण पेटलो तर त्या मूळ साहित्यकृतीचा त्यामुळे गळाच घोटला जाईल, अशी भीती मला वाटत आलेली आहे. मराठी साहित्याबाबतच्या उत्सुक ऊर्मीमुळे पु.शि.रेगे संपादित करत असलेल्या ‘छंद’ या मासिकाचा, ते प्रसिध्द होण्यास सुरुवात झाल्यानंतर अल्पावधीतच मी वर्गणीदार बनलो.

‘छंद’च्या सुरुवातीच्या एका अंकातच इरावतीबाई कर्वे यांनी लिहिलेला ‘कुंकवाची उठाठेव’ हा ललित लेख मी वाचला. पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर आणि एक ‘करण सामंत’ यांच्याशी इरावतीबार्इंच्या झालेल्या भेटीची पार्श्वभूमी त्या लेखाला लाभलेली होती. ओडिआ भाषेत अनुवादयोग्य वाटल्याने त्या ललित लेखाचा मी अनुवाद केला आणि इरावतीबार्इंची रीतसर अनुमती घेऊन एका अग्रगण्य ओडिआ दैनिकाच्या रविवार आवृत्तीमध्ये तो प्रकाशितही करवला. परंतु, ‘उठाठेव’ या मराठी शब्दाला तितकाच अर्थवाही ओडिआ प्रतिशब्द काही मला शोधता आला नाही, हे कबूल करायलाच हवे. चांगल्या दर्जेदार मराठी साहित्याचे माझे चौफेर वाचन आहे, असा दावा मला करता येणार नाही. परंतु, मराठीतील काही अप्रतिम साहित्यकृती मात्र मी वाचलेल्या आहेत. त्या साहित्यकृतींचा परिचय मला घडवला तो माझे स्नेही मंगेश पदकी यांनी.

गाडगीळ-गोखले-भावे या, मराठी लघुकथेच्या विश्वात त्या काळी अग्रगण्य ठरलेल्या त्रिमूर्तीच्या काही लघुकथा मी वाचलेल्या होत्या. परंतु, एके दिवशी मंगेश पदकी यांनी मला जी.ए. कुलकर्णी यांचा त्या वेळी प्रकाशित झालेला पहिलावहिला लघुकथासंग्रह वाचायला दिला तेव्हा प्रचंड उत्सुकतेने त्या कथा मी वाचून काढल्या आणि मराठी लघुकथालेखनाच्या प्रांतात जी.ए. कुलकर्णी यांचे स्थान अव्दितीय आहे, याचा मला साक्षात्कार झाला. जी.एं.च्या लघुकथांचा अनुवाद (तसे ते काम महादुष्करच ठरते म्हणा!) इंग्रजी भाषेमध्ये झाला असता तर वैश्विक मान्यता पावलेल्या साहित्याच्या पंगतीत त्यांना मानाचा चौरंग प्रदान केला गेला असता, याबाबत मला तरी शंका नाही.

माझे ओडिआ साहित्याचे वाचन आता जरी तितकेसे अव्वल राहिलेले नसले तरी, जेवढे काही ओडिआ साहित्य मी नजरेखालून घातलेले आहे. त्यात जी.एं.च्या लघुकथांच्या जवळपास पोहोचेल असे काही निदान मला तरी आढळून आलेले नाही. जी.एं.बद्दल मला वाटणाऱ्या आदराचे प्रतीक म्हणून ओडिआ भाषेत प्रसिध्द होणाऱ्या एका वार्षिकासाठी जी.एं.च्या एका कथेचा अनुवाद मी केला. त्याच धर्तीवर, विजय तेंडुलकरांची एक एकांकिकाही मी ओडिआ भाषेत अनुवादित केली. मराठी कवींमध्ये माझ्या लेखी केशवसुत अव्दितीयच ठरतात. रवींद्रनाथांच्या साहित्यसंभाराशी तुलना करता केशवसुत अल्पप्रसव ठरतात हे मान्य. मात्र, काव्यवृत्ती आणि काव्याची जातकुळी यांच्याबाबतीत मराठीतील हा आद्य आधुनिक कवी रवींद्रनाथांपेक्षा अगदी निराळा आहे. ब्राह्म समाजाचे अनुयायी असल्याने रवींद्रनाथांच्या काव्यात मुक्त वैदिक परंपरेचा सघन आणि सखोल आविष्कार जाणवतो.

श्रेष्ठ दर्जाची प्रेमकविता आणि निसर्गकाव्य रवींद्रांच्या नावावर जमा आहे. मात्र, केशवसुतांच्या कविताविषयांचा मागमूसही रवींद्रांच्या काव्यात आढळत नाही. उदारमतवादी मानवी मूल्ये आणि सामाजिक उत्थानाला केशवसुतांच्या कवितेव्दारा हुंकार मिळालेला दिसतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि ‘लोकहितवादी’ गोपाळ हरि देशमुख यांच्या गद्य वैचारिक लेखनाशी केशवसुतांची कविता या बाबतीत समानधर्मा ठरते. त्यानंतर बऱ्याच काळाने विंदा करंदीकरांची कविता मी वाचली. विंदांच्या काव्याची मोहिनी तेव्हापासून आजवर टिकून आहे. त्या मानाने, कुसुमाग्रज आणि अगदी अलीकडच्या अरुण कोलटकर यांची कविता मी अल्पस्वल्पच वाचलेली आहे.

विंदांच्या कवितेशी नाते सांगणारे आधुनिक ओडिआ साहित्यात वा काव्यात काही सापडते का हे मी पाहत असतो. मात्र, पदरी निराशाच येते. असाधारण दर्जाची प्रेमकविता ओडिआमध्ये काही प्रमाणात आहे, हे खरे. परंतु, मराठी काव्याला स्वरांचा साज चढवणारे एकाहून एक दर्दी संगीतकार मराठीला लाभले तसे संगीतकार ओडिआ प्रेमकवितेलाही लाभले असते तर तिचा बोलबाला किती तरी अधिक प्रमाणावर झाला असता.

अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे अशा तोडीचे वास्तवदर्शी काही साहित्य मराठीच्या प्रांगणात आहे. इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवतांचे साहित्यिक ललित निबंध त्यात मोडतात. गंभीर, वैचारिक अशा विद्वत्तापूर्ण लेखनाची पावले मराठीमध्ये उमटलेली दिसतात ती इतिहासाचार्य राजवाडे यांच्या लेखनातून. राजवाडे खरोखरच असामान्य. 1950 पर्यंतच्या दीड शतकातील स्वतंत्र प्रज्ञेच्या दोन भारतीय विद्वानांमध्ये माझे स्नेही अशोक केळकर इतिहासाचार्यांची गणना करतात. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेले राजवाड्यांचे चार लेख माझ्या प्रथम वाचनात आले. या संपूर्ण विषयासंदर्भातील राजवाड्यांची भूमिका, लेखनातील तर्कशुध्दता आणि विषयाची व्यासंगपूर्ण हाताळणी यामुळे मी तर अक्षरश: हरखूनच गेलो. राजवाड्यांचे लेखन तोपर्यंत इंग्रजीमध्ये अनुवादित झालेले नव्हते, ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथाचा ओडिआमध्ये अनुवाद करून मी तो काही वर्षांपूर्वी प्रकाशित केला.

राजवाड्यांच्या त्या ग्रंथाचा अन्य एखाद्या भाषेत झालेला तो पहिलावहिला अनुवाद होता. आता इंग्रजी भाषेतही त्या पुस्तकाचा अनुवाद झालेला असल्याचे माझ्या कानावर आले. अनेक संशोधनप्रांतांत अप्रतिहत गती असलेले राजवाडे म्हणजे बहुआयामी विद्वान होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे माझे असेच दुसरे आदरस्थान. राजवाड्यांप्रमाणेच शास्त्रीबुवांनीही केवळ मराठीतच लेखन केले. शास्त्रीबुवा हेही अव्वल बुध्दिमत्तेचे लेणे लाभलेले विद्वान. ‘‘वैदिक संस्कृतीचा इतिहास’ हा त्यांचा ग्रंथ विद्वानांना सतत मार्गदर्शक ठरत राहील अशा तोडीचा आहे. ज्यांच्या साहित्यकृतींचे मी वाचन केले अशाच लेखक- साहित्यिकांचा नामनिर्देश मी या ठिकाणी केलेला असला तरी, अन्य कोणत्याही भाषेतील अग्रमानांकितांच्या पंगतीला ते सहज बसतील, अशी माझी धारणा आहे. विधात्याचा वरदहस्त माथ्यावर राहील तर महाभारतातील व्यक्तिरेखांवर इरावतीबाई कर्वे आणि दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेल्या दोन निबंधसंग्रहांचा आणि त्याचप्रमाणे लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपरोक्त बृहद्‌ग्रंथाचा अनुवाद ओडिआमध्ये करण्याचा माझा मानस आहे.

तथाकथित दलित समजल्या जाणाऱ्या समाजगटांतील स्त्रीपुरुषांची आत्मकथने हा मात्र मला इथे येईपर्यंत अपरिचित असलेला साहित्यप्रांत होता. मी पुण्यात आल्यानंतर काही वर्षांनी साहित्याच्या या प्रांतातील लेखनकृती प्रकाशित होऊ लागल्या. दलित समजल्या गेलेल्या समाजसमूहांतील व्यक्तींची अशी आत्मचरित्रे म्हणजे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सामाजिक इतिहासाचा एक लक्षणीय भाग ठरतो. मराठीमध्ये हा साहित्यप्रकार रूढ झाल्यानंतर अन्य काही भाषांमध्येही या प्रवाहाच्या पाऊलखुणा उमटल्या. माझे मित्र शंकरराव खरात यांचे ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मवृत्त, दया पवार यांचे ‘बलुतं’ यांसारखी अन्य काही आत्मकथने वाचल्यानंतर, ओडिआतील दलित समाजातील एका कम्युनिस्ट नेत्याने लिहिलेल्या आत्मवृत्ताचा एकमात्र अपवाद वगळता ओडिआ भाषेमध्ये या साहित्यप्रकारांतील अन्य काहीच कृती का आढळून येत नाहीत, असा प्रश्न मला अस्वस्थ करू लागला. या प्रश्नाने मला शोधप्रवृत्त बनवले.

ओडिशापासून तर मी आता बराच काळ दूर आणि बऱ्याच अंतरावर आहे. तरीही माझ्या मित्रांच्यामार्फत, माझ्या व्यक्तिगत संपर्कातून अशा प्रकारचे आत्मकथन शब्दबध्द करू शकणाऱ्या व्यक्ती हुडकून काढून त्यांना लिहिते बनवण्याची बरीच खटपट मी करत राहिलो. या प्रयत्नांत माझ्या पदरी अनेकवार अपयशच आले. अखेर, अशी दोन आत्मकथने तयार झाली. ओडिशाच्या किनारपट्टीत जन्मलेल्या एका सर्वोदयी कार्यकर्त्याचे आत्मचरित्र हे त्यातील एक, तर, ओडिशातील कोरापुट जिल्ह्याच्या आदिवासी भागांत लोकचळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कार्यकर्तीचे आत्मकथन हे दुसरे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या प्रदेशातील दलित समाजात जन्माला आलेल्या व्यक्तीचे जगणे त्या सर्वोदयी कार्यकर्त्याच्या लेखनात अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणे उमटलेले आहे.

चळवळीमध्ये काम करणाऱ्या त्या दलित स्त्री कार्यकर्तीच्या आत्मकथनाबाबत मात्र मी असे म्हणू शकणार नाही. आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचेच चित्रण तिच्या आत्मवृत्तामध्ये बव्हंशी सापडते. या दोन आत्मकथनांच्या विक्रीव्दारे जमा झालेले पैसे मी आजही त्या वितरकाकडेच ठेवलेले आहेत. अशा प्रकारच्या अन्य आत्मवृत्तांच्या प्रकाशनासाठी हा निधी वापरला जावा, असा त्यामागील हेतू. पश्चिम उत्तर प्रदेशातील एका दलित व्यक्तीने लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक अलिकडेच माझ्या वाचनात आले. मात्र, दलित समाजातील अनेकानेक स्त्रीपुरुषांनी मराठीमध्ये शब्दबद्ध केलेली त्यांची जीवनचरित्रे हाच साहित्याच्या या प्रांतातील मुख्य ठेवा राहिलेला आहे.

– 5 – 

पुण्याला आल्यावर आणखी एका गोष्टीचा ठसा माझ्या मनावर उमटला आणि ती गोष्ट म्हणजे पुणेकरांचे संगीतप्रेम. पुण्यातील आणि महाराष्ट्रातील अनेकांची संगीतसाधना आणि संगीताच्या क्षेत्रात त्यांनी गाठलेली यशाची शिखरे, हा तसाच दुसरा प्रांत मला सततच विस्मयकारक वाटत आलेला आहे. शास्त्रीय अभिजात संगीताच्या प्रांतात मात्र मला अजिबातच गती नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. संगीताची अशी आवड, संगीतश्रवणाची भक्ती आणि संगीताच्या क्षेत्रात नावलौकिक कमावलेले दिग्गज ओडिशामध्ये मला कधी आढळले नाहीत. ओडिआ संगीत हाही अभिजात शास्त्रीय संगीताचाच एक प्रकार आहे. या संगीत प्रकारातील रागदारी कर्नाटकी संगीतातील असली तरी तिचे ओडिशातील चलन मात्र वेगळ्या ढंगाचे आहे. मात्र, या संगीतप्रकाराला संगीतप्रेमींच्या वर्तुळात सुप्रतिष्ठित करू शकेल अशा ताकदीचा संगीतकार गेल्या अनेक वर्षांत त्याला लाभलेला नाही.

मराठी नाट्यसंगीताची मला आवड आहे. मात्र, मराठी संगीत नाटके पाहणे हे मला कधीच आवडले नाही, हे इथे नमूद केलेच पाहिजे. गद्य नाटकात गुंफलेले अप्रतिम संगीताचे तुकडे, असे काहीसे त्यांचे स्वरूप मला वाटले. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि जब्बार पटेल प्रभृतींनी रंगमंचावर आणलेले ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक मात्र याला अपवाद होते. अतिशय वेगळ्या प्रकारची आणि प्रकृतीची अशी ती नाट्यकृती होती. 1960 आणि 1970 च्या दशकात मराठी रंगभूमीला पुन्हा एकवार नव्याने टवटवी येत होती. त्याच काळात मी पुण्यामध्ये होतो हे माझे अहोभाग्य. ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेच्या सदस्य प्रेक्षक समुदायाचे आम्ही सभासद होतो. त्यामुळे, ‘रंगायन’ची आणि त्याच्या जोडीनेच अन्य नाट्यसंस्थांची त्या काळात रंगमंचावर आलेली बहुतेक सर्व नाटके मी व माझ्या पत्नीने पाहिली. माझ्या गावी कटकला असताना मी नाटकांचे काही खेळ बघायला जात असे.

गेल्या शतकातील 1940 च्या दशकात कटकमधील दोन नाट्यसंस्था प्रत्येकी साधारण अर्धा डझन नवीन नाटके रंगमंचावर दरवर्षी सादर करीत असत. ती सगळीच नाटके अगदी शेक्सपिअरच्या नाट्यकृतींच्या कुळातील नसली तर सर्वसाधारण चार नाटकांपेक्षा त्यांचा दर्जा बराच चांगला असे. त्यांतील काही नाट्यकृती तर अफलातून सुंदर असत. त्या काळात ओडिशामध्ये हे घडू शकले कारण ओडिआ चित्रपटसृष्टीचा जन्म तेव्हा व्हायचा होता. परंतु, ओडिआ चित्रपटांचा उदय 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात घडून आल्यावर ओडिआ नाट्यसृष्टीला उतरती कळा लागली. 1960 आणि 1970 च्या दशकातील मराठी रंगभूमीवरचे आज काहीच उरलेले नाही. मात्र, अनेक तरुण कलाकार चांगल्या नाट्यकृती उत्तम सादरीकरणासह अधूनमधून सतत नाट्यरसिकांसमोर मांडत असतात.

पुण्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या माझ्यासाख्या ओडिआ असामीला इथे दोन गोष्टींची मात्र फार उणीव जाणवते आणि अगदी चुकल्या चुकल्यासारखे होते. ओडिआ शास्त्रीय नृत्य आणि मंदिरशिल्पे या त्या दोन बाबी. पुरीचे जगन्नाथ मंदिर, भुवनेश्वरातील लिंगराजाचे देवालय, कोणार्कचे सूर्यंमंदिर यांसारख्या, मध्ययुगीन शिल्पकलेचे अजोड नमुने असणाऱ्या देवळांच्या प्रदेशातून इथे आलेल्या माझ्यासारख्याच्या डोळ्यांची क्षुधाशांती व्हावी असे महाराष्ट्रात काहीच नव्हते. याला अपवाद फक्त वेरूळच्या कैलास लेण्याचा. मुंबापुरीनजीकच्या एलिफंटा गुंफांमधील पुरातत्त्वीय अंश व अवशेष आणि अजिंठ्याच्या लेण्यातील चित्रकला यांनीही मी मोहित झालो.

ओडिशी शास्त्रीय नृत्याची महती आज आपल्या देशात अतिशय गायली जाते. मी पुण्याला आलो त्या वेळी ओडिशी शास्त्रीय नृत्याचे पाऊल ओडिशाच्या सीमांबाहेर पडलेलेच नव्हते. संजुक्ता पाणिग्राही, त्यांचे नृत्यगुरू केळूचरण महापात्र आणि संजुक्ता पाणिग्राही यांचे गायक पती रघुनाथ पाणिग्राही यांच्या ओडिशी नृत्याविष्काराचा पहिलावहिला कार्यक्रम मी आणि माझ्या पुणेस्थित ओडिआ मित्रांनी पुण्यात आयोजित केला, तो 1970 च्या दशकाच्या अखेरच्या चरणात. संजुक्ता पाणिग्राही प्रभृतींशी पु.ल. देशपांडे यांचे व्यक्तिगत स्नेहसंबंध होते. नृत्याचा तो कार्यक्रम पुण्यामध्ये करायचा असे आम्ही ठरवल्यानंतर कार्यक्रमाच्या आर्थिक बाजूबाबत पु.लं.नी मला सावधगिरीचा इशारा दिला. शास्त्रीय नृत्यप्रकाराचा पुण्यातील संगीतरसिकांना तोवर परिचयच नव्हता.

साहजिकच, या नृत्यप्रकाराची अभिरुचीही येथील प्रेक्षकवृंदात तयार झालेली नव्हती. त्यामुळे, या कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल किंवा कसे आणि त्यामुळे आमचा खर्च तरी भरून येईल का, यांबाबत पु.ल.सचिंत होते. परंतु, माझ्या पातळीवर मी केलेले प्रयत्न, माझ्या परिचितांचा पुण्याला असलेला मोठा परिवार यामुळे संजुक्ता पाणिग्राही यांच्या ओडिशी शास्त्रीय नृत्याचा पुण्यातील तो पदार्पणाचा कार्यक्रम भरघोस प्रतिसादात पार पडला. त्यामुळे, ओडिशी शास्त्रीय नृत्य आणि ओडिशी कलाकार यांचा परिचयही पुणेकर रसिकांना घडला.

आता परिस्थिती प्रचंड पालटलेली आहे. ओडिआ भाषेसंदर्भात पु.लं.नी माझ्यापाशी नोंदविलेला अभिप्रायवजा शेरा या ठिकाणी नोंदवायलाच हवा. पु.ल. काही काळ शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिले होते. त्या वेळी ते भुवनेश्वरला चार-पाच दिवसांसाठी जाऊन आले. भुवनेश्वरला त्यांचा मुक्काम पाणिग्राहींच्या घरीच होता. परत आल्यावर आमच्या झालेल्या भेटीदरम्यान पु.ल. मला म्हणाले, ‘‘रथ, ओडिशाला मी अंमळ अधिक दिवस राहिलो असतो तर मी ओडिआ नक्कीच शिकलो असतो. ती भाषा 'Aw-Ful' आहे!’’ (ऑ-फुल : ओडिआ भाषेमध्ये प्रत्येक शब्दातील अंत्य ‘अ’कार हा पूर्ण उच्चारला जातो. त्यामुळे ती भाषा ‘अ’ बहुल भासते. नेमक्या याच वैशिष्ट्यावर पु.लं.नी ‘ओडिआ (अ) ऑ-फुल’ आहे, अशी कोटी केली. असे शब्दलाघव प्रकट करणे, हा पु.लं.चा हातखंडा होता).

– 6 – 

पुण्यात येण्याअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही मला फारशी माहिती नव्हती. 30 जानेवारी 1948 च्या सायंकाळी गांधीजींची हत्या होईपर्यंत कटकमध्ये आम्ही कोणीही संघाचे नाव ऐकलेलेदेखील नव्हते. माझे वडील ज्या वृत्तपत्रामध्ये काम करत त्या वृत्तपत्रातील उपसंपादकांबरोबर त्या संध्याकाळी मी बोलत बसलेलो होतो. गांधीजींची हत्या झाली आणि वृत्तपत्राच्या त्या कचेरीत बातम्यांचा ओघ सुरू झाला. गांधीजींची हत्या करणारा इसम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा बहुधा सदस्य असावा, असे त्यांपैकी काही वृत्तांत नमूद केलेले होते. कटकमधील एका बंगाली वकील महाशयांच्या घराच्या अंगणात एक मराठी भाषिक संघ कार्यकर्ता स्थानिक मुलांसाठी दररोज सायंकाळी काही खेळ व व्यायाम प्रकारांचे आयोजन त्या आधीच्या काही महिन्यांपासून करत असल्याचे माझ्या कानावर मी आता कचेरीच्या वाटेवर असताना काही लोकांच्या बोलण्यातून पडले, असे त्या उपसंपादकांपैकी एकाने आम्हांला त्या वेळी, बातम्यांमधील संघाचा तो निर्देश पाहून सांगितले.

केवळ इतकेच नाही तर, गांधीजींच्या हत्येचे वृत्त त्या संध्याकाळी आगीसारखे चहूंकडे पसरल्यानंतर त्या गृहस्थाने खेळायला जमलेल्या मुलांना पेढ्यांचा खाऊ वाटला, असेही त्या उपसंपादकाच्या कानांवर आले होते. हे सगळे ऐकून तिथे बसलेले आम्ही सगळे अचंबितच झालो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावही आमच्यापैकी कोणीही तेथवर ऐकलेले नव्हते. त्यामुळे, कटक शहरात सुरू झालेल्या संघकार्याबद्दल आम्हांला फारशी माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. संघाबद्दल मग मी वृत्तपत्रांतून पुढे अधिक वाचले. ब्राह्मण समाजातील लहानथोर स्त्री-पुरुषांवर संघाच्या असलेल्या प्रभावाबद्दल मी पुण्याला आल्यानंतर माझ्या मित्रमंडळींकडून मला अधिक तपशील कळला.

पुण्यात आल्यानंतर बस्तान बसेपर्यंत या खानावळीतून त्या खानावळीत असे माझे प्रयोग करणे चालू असताना काही काळ आपटे रस्त्यावरील वैदिकाश्रमातील खानावळीत मी जात होतो. तिथे नियमित जेवायला येणाऱ्यांमध्ये संघाच्या शाखांमध्ये नित्याने जाणाऱ्या तरुणांचा समावेश होता. जेवताना त्यांपैकी काही मुलांबरोबर गप्पा होत. मैत्री करण्यास उत्सुक, मदतीस सदैव तत्पर आणि ज्यांच्या बरोबरचे बसणे-उठणे सर्वसाधारणपणे संतोषजनक वाटावे अशीच ती सारी मुले आहेत, अशी माझी धारणा बनली. परंतु, प्रचलित परिस्थितीशी संबंधित एखाद्या गंभीर विषयाबाबत चर्चा सुरू झाली रे झाली की त्या मुलांचा सारा नूर एकदम पालटून जाई. ‘‘या सगळ्याबद्दल आम्हांला फारसे काही ठाऊक नाही.

नागपूरमध्ये बसलेले आमचे वरिष्ठ या संदर्भातील आवश्यक ती सर्व काळजी वाहण्यास समर्थ आहेत,’’ अशा आशयाचे प्रत्युत्तर आमच्या त्या चर्चांदरम्यान बहुतेक वेळा त्यांच्याकडून दिले जात असे. तो सगळा प्रकार मला फारच विचित्र वाटे. आता, संघाचा विषय निघालाच आहे तर तत्कालीन शहरी मराठी समाजाच्या मन:पटलावर प्रतिमा कोरल्या गेलेल्या एका व्यक्तिमत्त्वाबाबत इथेच बोलणे उचित ठरावे. ती व्यक्ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर! भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामासंबंधातील त्यांच्या पुस्तकाबाबत महाविद्यालयात शिकत असताना मी ऐकलेले होते. त्या पुस्तकावर काही काळ सरकारने बंदी जारी केली होती.

बंदी उठल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याची एक प्रत आणली. मोठ्या उत्कंठेने ते पुस्तक मी वाचून काढले. एक श्रेष्ठ राष्ट्रभक्त म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात ते पुस्तक वाचून आदराची भावना निर्माण झाली. पुढे गांधीहत्येतील आरोपींवर अभियोग दाखल झाला. त्या खटल्याच्या कामकाजाचे वृत्तपत्रांमध्ये केले जाणारे वृत्तांकन मी आवर्जून वाचत असे. मात्र, ते वाचून सावरकर माझ्या नजरेतून पार उतरले. गांधीजींच्या हत्येसंदर्भात न्यायालयाने सावरकरांना दोषी ठरवले नाही, हे खरे. परंतु, गांधीजींच्या हत्येमागची बौध्दिक प्रेरणा त्यांचीच होती, अशी माझी धारणा बनली. केवळ श्रेष्ठ राष्ट्रभक्त म्हणूनच नव्हे तर एक तितकेच श्रेष्ठ मराठी कवी म्हणूनदेखील सावरकरांबाबत पुण्यात त्या वेळी अत्यंत आदराची भावना होती. अजूनही ती आहे.

या सगळ्याशी जुळवून घेणे मला काही जमले नाही. हिंदू समाज आणि हिंदू धर्म यांबाबत सावरकरांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह माझे मित्र विद्याधर पुंडलीक यांनी पुढे अनेक वर्षांनी जेव्हा प्रकाशित केला तेव्हा सावरकरांचे ते लेखन वाचून मात्र मी अगदी थक्क होऊन गेलो. धर्म आणि धर्मगत कर्मकांडे यांबाबत इतक्या बुध्दिनिष्ठपणे चिंतन आणि लेखन करू शकणारी त्यांच्यासारखी व्यक्ती राजकीय भूमिकेसंदर्भात मात्र तितकीच तर्कहीन आणि प्रतिक्रियावादी कशी काय बनू शकते, हे कोडे मात्र मला काही केल्या उलगडले नाही. माणूस आणि माणसांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत गुंतागुंतीचे व व्यामिश्र प्रकरण असते आणि त्यामुळे सावरकरांसारख्या एखाद्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे लेखन वाचत असताना वाचकाला निवडीबाबत बरेच तारतम्य ठेवावे लागते, या निर्णयाप्रत मी अखेर आलो (इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्तपावनांबाबत लिहिलेल्या लेखाची या संदर्भात इथे आठवण होते.

विद्याधर पुंडलिक यांनी संकलित आणि प्रकाशित केलेल्या सावरकरांच्या लेखांपैकी काहींचा अनुवाद मी ओडिआमध्ये केलेला आहे. उरलेल्या लेखांचाही अनुवाद करून ते प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. हिंदू श्रध्दाविश्व आणि कर्मकांडांचे अंधानुकरण गतानुगतिकपणे करणाऱ्या माझ्या प्रांतातील अनेकांच्या वाचनात सावरकरांचे हे लेखन यावे असे मला फार वाटते. सावरकरांबद्दल वाटणारा सखोल आदर आणि कौतुकाची भावना एकीकडे आणि त्याच वेळी, पंडिता रमाबाई यांच्यासारख्या असाधारण महाराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची घनघोर उपेक्षा दुसरीकडे, असा एक मोठाच विरोधाभास मी त्या काळात पुण्यात अनुभवला.

बघताक्षणीच मनाचा ठाव घेणारे व्यक्तिमत्त्व आणि विलक्षण तेजस्वी नजर लाभलेल्या पंडिता रमाबाईंचे तैलचित्र पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात लावलेले मी माझ्या एम.ए.च्या दिवसांत पाहिले. या पंडिताबाई नेमक्या कोण होत्या आणि कोणत्या काळात त्या होऊन गेल्या याबाबत माझ्या काही मित्रांकडे मी विचारणा केली. ‘पंडिता’ पदवी प्राप्त केलेल्या या ब्राह्मण विदुषीने पुढे ख्रिस्ती धर्म स्वीकारला, एवढाच काय तो तपशील मला माझ्या मित्रांकडून मिळाला. हरिभाऊ मोटे यांनी संपादन केलेला ‘विश्रब्ध शारदे’चा पहिला खंड वाचल्यानंतर पंडिता रमाबाईंबद्दलच्या माझ्या जिज्ञासेने शमन झाले. इंग्रजीमध्ये लिहिलेली पंडिता रमाबाईंची एकंदर पाच पत्रे ‘विश्रब्ध शारदे’च्या त्या पहिल्या खंडात समाविष्ट केलेली होती.

रमाबाईंनी धर्मांतर करेपर्यंतच्या त्यांच्या जीवनक्रमाचा वृत्तान्त कथन करणारा एक प्रदीर्घ निबंधही त्या पत्रांसोबत ‘विश्रब्ध शारदा’च्या पहिल्या खंडात प्रकाशित करण्यात आला होता. रमाबाईंचे पांडित्य, त्यांनी जीवनभर जपलेली मूल्ये आणि पंडिताबाईंनी केलेली समाजसेवा यांचा तपशील वाचून मी तर अगदी भारावूनच गेलो. रमाबाईंबद्दल ओडिआमध्ये काही तरी लिहिण्याचा मग मी निश्चयच केला. ‘विश्रब्ध शारदा’च्या त्या पहिल्या खंडात त्यांच्या जीवनक्रमाचा जो आणि जेवढा तपशील प्रकाशित झाला होता त्याचा मग मी अनुवाद केला. परंतु त्या मजकुरात त्यांच्या आयुष्याच्या काही भागाचेच काय ते शब्दचित्र रेखाटलेले होते. मग, रमाबाईंचे मराठीमध्ये लिहिले गेलेले एक संपूर्ण चरित्र मी फर्गसन महाविद्यालयातील प्राध्यापक भागवत यांच्याकडून पैदा केले आणि रमाबाईंच्या चरित्राचा ऊर्वरित अर्धांश त्यातील माहितीच्या आधारे ओडिआत उतरवला.

पंडिता रमाबाईंची ही जीवनकहाणी ज्या ओडिआ वार्षिकात प्रकाशित झाली त्या वार्षिकाचे संपादक म्हणजे चांगले चौफेर वाचन असलेले गृहस्थ होते. एका स्थानिक ख्रिस्ती संघटनेने प्रसिध्द केलेल्या एका पुस्तिकेमध्ये पंडिता रमाबाईंबद्दल प्रकाशित झालेला मजकूर आपण त्या पूर्वी वाचला असल्याचे त्या गृहस्थांनी मला नंतर सांगितले. मात्र, धर्मांतरित ख्रिस्ती या नात्यानेच काय ती आणि तेवढीच माहिती त्या पुस्तिकेत रमाबाईंबद्दल नमूद करण्यात आलेली होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ‘‘गेल्या 150 वर्षांतील सर्वश्रेष्ठ भारतीय महिला,’’ असे गौरवोद्‌गार सरोजिनी नायडू यांनी रमाबाईंच्या मृत्यूप्रसंगी काढले होते. पतिनिधनानंतर बंगालमधून महाराष्ट्रात यावे यासाठी ज्या सगळ्यांनी रमाबाईंना गळ घातली, निराधार व परित्यक्ता महिलांच्या पुनर्वसनासाठी रमाबाईंनी उपसलेले कष्ट ज्यांनी पाहिले, त्यांच्या त्या कार्याला ज्यांनी हातभार लावला त्याच सगळ्या मंडळींनी पंडिताबाई पुढे केवळ ख्रिस्ती बनल्या या एकाच कारणाबद्दल त्यांच्यावर संपूर्ण बहिष्कार टाकावा हे कधीही पुसले न जाणारे लांच्छन आहे, असे मला अतिशय प्रामाणिकपणे वाटते.

आश्रमातील एका हिंदू विधवेचे रमाबाईंनी धर्मांतर घडवून आणले असे वृत्त प्रसृत झाल्यावर त्यांची आणि त्यांच्या कार्याची तेथवर पाठराखण करणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनीही अखेर पंडिता रमाबाईंवर बहिष्कार टाकला. धर्मांतराच्या त्या वृत्तात कणभरही सत्यांश नसून ती शुध्द वदंता असल्याचे पुढे शाबीत झाले. आपण केवळ ख्रिस्ताचे अनुयायी असल्याची बावनकशी जाणीव जागृत असल्याने ख्रिस्ती धर्मांतर्गत कोणत्याही पंथाची दीक्षा रमाबाईंनी अखेरपर्यंत घेतली नाही, या वास्तवाची आपण कोणी दखलही घेत नाही. मध्य भारतात 1899, 1900 आणि 1901 अशी सलग तीन वर्षे जो भयकारी दुष्काळ पडला त्या दुष्काळादरम्यान त्यांनी केलेले डोंगराएवढे कार्यही आपण उपेक्षेच्या खाईत लोटले.

दुष्काळात आईवडील मृत्युमुखी पडल्याने निराधार अवस्थेत इतस्तत: भटकणारी सुमारे पाच हजार बालके रमाबाईंनी दुष्काळग्रस्त प्रदेशात भ्रमंती करून गोळा केली आणि त्यांना आपल्या आश्रमात आश्रय दिला. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या त्या दुष्काळग्रस्त मुलामुलींचा सांभाळ करण्यासाठी रमाबाईंपाशी ना होता पुरेसा पैसा ना होते मनुष्यबळ. कोणत्याही धर्माच्या सामाजिक संस्थांनी त्यांपैकी त्यांना जमतील तेवढी मुले दत्तक घेऊन त्यांचा प्रतिपाळ करावा, असे जाहीर आवाहनही रमाबाईंनी वृत्तपत्रांव्दारे त्या वेळी केले. पंडिता रमाबाईंच्या त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हिंदुधर्मीयांची एकही सामाजिक संघटना तेव्हा पुढे आली नाही ही बाब अत्यंत खेदकारक ठरते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, तत्कालीन समाजाची भूमिका व दृष्टिकोण आणि त्या काळच्या समाजमनाची एकंदरच धारणा व विचारपध्दती यांचे प्रतिबिंब त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये पडल्याचे आपल्याला जाणवते.

हिंदुधर्माचा त्याग न करताही हे सगळे कार्य करता आले नसते का, असा प्रश्न रमाबाईंचे सारे कार्यकर्तृत्व पाहून प्रभावित झालेल्या काहींनी पुढे अनेक वर्षांनंतर त्यांना विचारला. त्या प्रश्नाला रमाबाईंनी दिलेल्या उत्तरात त्यांचे सारे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी जीवनभर जपलेल्या मूल्यांचे प्रतिबिंब सामावलेले आहे. इंग्लंडमधील वास्तव्यात मिशनच्या एका वसतिगृहात रमाबाई राहत होत्या. वसतिगृहात त्यांच्याबरोबर राहणाऱ्या ख्रिस्तसेविका (नन्स) दर रविवारी नियमाने लंडनला जात असत. त्यांच्या त्या परिपाठाबद्दल रमाबाईंनी विचारणा करताच त्या ख्रिस्तसेविकांनी रमाबाईंना त्यांच्याबरोबर चलण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार रमाबाई त्यांच्याबरोबर गेल्या. स्खलित आणि रुग्णाईत स्त्रियांची शुश्रूषा करून त्या नरकात सापडलेल्या त्या अभागिनींचे दु:ख अंमळ हलके करण्यासाठी त्या ख्रिस्तसेविका दर रविवारी लंडनला जातात, हे रमाबाईंनी तिथे प्रत्यक्ष बघितले.

ही अशी सेवा तुम्ही का करता, असा प्रश्न रमाबाईंनी त्या ख्रिस्तसेविकांना विचारला. स्खलन झालेल्यांना त्याचप्रमाणे आजारी असलेल्यांना सेवेचा आधार पुरवणे हेच खरेखुरे देवकार्य होय, या ख्रिस्तवचनानुसार आपण ही सेवा करत असल्याचे त्या ख्रिस्तसेविकांनी रमाबाईंना सांगितले. रमाबाईंनी संपूर्ण बायबल पुन्हा एकवार नजरेखालून घातले. आपले यच्चयावत वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रपर वाङ्‌मय मी धुंडाळले; मात्र, ‘‘दु:खी, पीडितांची सेवा हीच ईश्वरसेवा,’’ या ख्रिस्तवचनाच्या जवळपास जाईल असे काहीच हिंदुधर्मशास्त्रात मला आढळले नाही, असे रमाबाईंनी नमूद करून ठेवलेले आहे. अशा धर्तीची मानवसेवा करण्याचा त्यांचा मानस होता. ‘‘हिंदुधर्मातच राहून ख्रिस्तवचनाचे पालन करणे हा माझा अप्रामाणिकपणा ठरला असता,’’ असे उद्‌गार रमाबाईंनी त्या संदर्भात काढलेले आहेत.

धर्मांतरासंदर्भात काही मंडळींनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांचे उत्तर हे होते. रमाबाईंचे ते स्पष्टीकरण वाचून मी अक्षरश: अवाक्‌ झालो. रमाबाई आणि विवेकानंद यांच्यातील फरक नेमका हाच, हे मला तत्क्षणी उमगले. अशा या विदुषीवर टीका करताना, ‘रेव्हरंड’ या संज्ञेचे स्त्रीरूप वापरण्याच्या मिषाने ‘रेव्ह-रांडा’ अशी अशिष्ट कोटी करून रमाबाईंचा निर्देश ‘केसरी’च्या संपादकीयात करण्यापर्यंत ‘केसरी’कारांचे अध:पतन तेव्हा व्हावे, याची मला मनस्वी शरम वाटत आलेली आहे. सावरकर आणि पंडिता रमाबाई या दोन व्यक्तींच्याबाबतीत मराठी समाजाच्या दृष्टिकोनात असलेल्या या उदंड तफावतीपायीच आपली एकंदर विचारसरणी आणि मूल्यप्रणाली यांबाबत मी कायमच साशंक राहिलेलो आहे.

– 8 – 

ज्यांची उदंड कीर्ती माझ्या कानावर पडलेली होती परंतु ज्यांचे लेखन मी पुण्याला येईपर्यंत कधी वाचलेले नव्हते असे गाढे विद्वान, व्यासंगी जननेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला येऊन स्वजातीयांच्या उत्थानासाठी त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांबद्दल मी त्या आधी काही वाचले होते. गांधीजींबरोबर त्यांनी केलेल्या ‘पुणे करारा’बाबतही माझ्या पाहण्यात काही साहित्य आलेले होते. घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलही मी पुण्याला आलो त्या वेळी वाचलेले होते. परंतु, डॉ. आंबेडकरांचे नाव मात्र त्या वेळी व्यक्तिगत संभाषणांदरम्यान अथवा सार्वजनिक चर्चा-भाषणांमधून फारसे कानावर पडत नसे.

घटना तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आणि दलित समाजसमूहातील एका जातीचे नेते, हीच डॉ. आंबेडकर यांची इथल्या सर्वसामान्य सुशिक्षित माणसाच्या मनातील प्रतिमा होती. भारतीय रुपयासंदर्भात त्यांनी केलेले सघन विश्लेषण आणि व्यापक अभ्यास; त्याचप्रमाणे, गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या काळे स्मृती व्याख्यानाच्या व्यासपीठावरून बोलताना भारतीय संघराज्याबद्दल त्या आधी काहीच वर्षे त्यांनी मांडलेले विवेचन, त्याच विषयासंदर्भातील त्यांचे लेखन यांचा साधा निर्देशही महाविद्यालयीन आणि/अथवा विद्यापीठीय शिक्षक-अध्यापकांच्या बोलण्या-दरम्यान झालेला मी कधी ऐकला नाही. खरे म्हणजे, पुण्याच्या तत्कालीन सार्वजनिक जीवनात त्या काळी डॉ. आंबेडकरांचा संदर्भही येत नसे.

महात्मा जोतीराव फुले तसेच राजर्षी शाहू छत्रपतींबद्दलही पुण्यात दाखल झाल्यानंतर मी बऱ्याच काळाने ऐकले. किंबहुना, ‘ब्राह्मणव्देष्टे म्हणून फुल्यांचा निर्देश झाला त्या वेळी फुल्यांचे नाव माझ्या कानावर पहिल्यांदा पडले. कोल्हापुरात राहणाऱ्या मराठा समाजातील बुध्दिवंतांच्या संदर्भात काही चर्चा चालू असताना मी शाहू छत्रपतींचा उल्लेख ऐकला. माझ्या आठवणीनुसार, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने त्या वेळी एकही राजकीय पक्ष राजकारण करत नसे. याला अपवाद फक्त डॉ.आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचा. परंतु, त्या काळी रिपब्लिकन पक्षाचा लोकमानसावर विशेष असा प्रभाव नव्हता. अनुयायांव्यतिरिक्त डॉ. आंबेडकरांशी त्या काळी संबंध-संपर्क ठेवणारे राजकारणाच्या क्षेत्रातील लोक म्हणजे तेव्हाही मूठभरच असणारे उदारमतवादी. अर्थात, तेही त्या वेळी अस्तंगत होण्याच्या पंथाला लागलेले होते.

दलित समाजातील एका जातीच्या लोकांनी त्या काळी अतिशय मोठ्या प्रमाणावर बौध्द धर्माचा स्वीकार करूनही ‘डॉ.आंबेडकर’ हे तेव्हा फारसे वजनदार नाव नव्हते. हा प्रवाह बदलायला त्या नंतर किमान दोन दशकांचा कालावधी उलटून जावा लागला. महात्मा फुले यांच्याबाबतही हेच घडलेले दिसते. फुल्यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांबाबत प्रथम अज्ञान, मग उपेक्षा आणि नंतर आता आराधना असाच क्रम दिसतो. या लोकाग्रणींच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत ही स्थिती तर मग देशाच्या अन्य भागांत तेव्हा काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी! ‘डॉ.आंबेडकर’ या नावाचा चमत्कार त्या वेळी देशाच्या अन्य भागांत अनुभवास येत नसे, हे मात्र खरे. बाबासाहेबांनी केलेल्या आवाहन-प्रबोधनाला, धर्मांतराबाबत त्यांनी दिलेल्या हाकेला महाराष्ट्रात ज्या प्रकारे प्रतिसाद लाभला तसा अभूतपूर्व प्रतिसाद देशाच्या अन्य प्रांतात उमटला नाही.

डॉ.आंबेडकरांनी प्रदान केलेली प्रेरणा आणि दिलेली नवदृष्टी यांचा लाभ आजच्या नवबौध्द समाजाला खचितच मिळाला. तो तसाच पुढेही मिळत राहील. पारंपरिक कर्मकांडांच्या कचाट्यातून मुक्तता, गावगाड्यातून उठून शहरांकडे स्थलांतर आणि शिक्षणाकडे वाढता कल हा जो त्रिविध बदल या समाजात दृग्गोचर होतो त्याची यथार्थ जाणीव देशाच्या अन्य प्रांतांतील दलित जातसमूहांना आजवर म्हणावी अशी झालेली दिसत नाही.

– 9 –

दलित चळवळीशी ज्या प्रमाणे माझा परिचय मी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरच झाला, त्याचप्रमाणे ज्या अन्य काही बाबी मला इथे आल्यानंतर ज्ञात झाल्या त्यांपैकी एक म्हणजे सहकाराची चळवळ. समाजहितैषी अशा काही ब्रिटिश मुलकी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सहकाराचे बीजारोपण भारतात केले, असे मी माझ्या अभ्यासादरम्यान वाचलेले होते. तेव्हाच्या पंजाब प्रांतात आणि मद्रास इलाख्यात विशेषत्वाने सहकाराचा कैवार त्या काळी घेतला गेला. सहकाराच्या चळवळीबाबत या भागात अतिशय गांभीर्याने प्रयत्न सुरू असल्याचे मी पुण्याला आल्यानंतर अवघ्या दोनएक वर्षांतच माझ्या ध्यानी आले. हिंद सेवक संघाच्या वसतिगृहातील माझा निवास आणि डॉ. काकडे यांचा निकट संपर्क यांमुळेच त्या साऱ्या घडामोडींचा मी साक्षीदार ठरलो.

लहानसहान सहकारी पतसंस्था त्या वेळच्या पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत होत्या. परंतु, मोठा आकार आणि व्यवहार असणाऱ्या पतसंस्थांचे संघटन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उभ्या भारतात साकारले ते, देशाच्या ग्रामीण भागांत त्या काळी विद्यमान असणाऱ्या पतपुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने जी समिती नेलेली होती तिच्या शिफारशीव्दारे. प्राध्यापक गाडगीळ हे त्या समितीचे एक सदस्य होते. उसावर प्रक्रिया करून साखरनिर्मिती करण्याच्या उद्योगाची सहकारी तत्त्वावरील उभारणी महाराष्ट्रात त्या अगोदरच पाच वर्षे झालेली होती, ही या साऱ्यांतील मनोज्ञ बाब. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील लोणी येथे उभारला गेलेला प्रवरा सहकारी साखर कारखाना हाच तो पहिलावहिला सहकारी उद्योग.

या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठका हिंद सेवक संघाच्या अध्यक्षांच्या निवासी इमारतीमध्ये नियमितपणे भरू लागल्याचे मी 1951 साली बघू लागलो. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठका पुण्यात भरत असत कारण प्राध्यापक गाडगीळ हे त्या वेळी कारखान्याचे अध्यक्ष होते, तर डॉ. काकडे हे कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य होते. त्या वेळी विठ्ठलराव विखे पाटील हे कारखान्याचे उपाध्यक्ष होते. दुपारी भोजनाची वेळ झाली की, हिंद सेवक संघाच्या अध्यक्षांच्या निवास्थानासमोरील बागेत तेव्हा असलेल्या एका आंब्याच्या झाडाखालील मोठ्या पसरट दगडावर विठ्ठलराव जेवायला बसत. हे दृश्य त्या वेळी मी कित्येक वेळा पाहिल्याचे आठवते. विठ्ठलरावांच्या अंगावर कोट असे. कोटाच्या खिशातून ते आपली शिदोरी बाहेर काढत. मोठ्या आकाराच्या, हातावर थापलेल्या दोन-तीन भाकऱ्या, चटणी आणि दोन-चार कांदे रुमालात बांधलेले असत. बरोबर आणलेली आपली ती शिदोरी विठ्ठलराव त्या आंब्याच्या झाडाखाली बसून खात आणि नंतर त्या बागेत असलेल्या नळावरच हाताची ओंजळ करून पाणी पीत. ते सारे बघून मला मौज वाटत असे. त्या बाबत मी एकदा डॉ. काकडे यांना विचारलेदेखील. त्या वेळी त्यांनी मला कथन केलेला तपशील मोठा रोचक आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक सुरू असे. जेवायची सुटी झाली की, जेवणासाठी आपल्याबरोबर आपल्या घरी चलण्याबाबत प्राध्यापक गाडगीळ विठ्ठलरावांना अनेकदा निमंत्रण देत. अधूनमधून विठ्ठलराव त्या निमंत्रणाचा स्वीकार करतही असत. परंतु, सर्वसाधारणपणे विठ्ठलरावांचे उत्तर ठरलेले असे. आपल्या कोटाच्या खिशाकडे निर्देश करीत विठ्ठलराव म्हणत असत, ‘‘नानासाहेब, माझे जेवण माझ्याबरोबर इथे आहे. आपण खुशाल जेवून या.’’ कोटाच्या खिशात विठ्ठलरावांनी रुमालात बांधून आणलेली त्यांची शिदोरी असे. चटणी आणि कांदा-भाकर हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नित्याचा आहार होय, हे मला डॉ. काकडे यांनी त्या वेळी सांगितले.

विठ्ठलरावांपाशी त्या वेळी एक जीप आणि एक ट्रक होता. एकदा, प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली. कारखाना सुरू होऊन तोवर उणीपुरी पाच वर्षेही झालेली नव्हती. त्या संदर्भात बोलत असताना डॉ.काकडे यांनी त्या प्रकाराबाबत विठ्ठलरावांची झालेली प्रतिक्रिया सांगितली. मोठ्या शेतकऱ्याच्या मिळकतीपेक्षाही ज्यांचे उत्पन्न अधिक आहे, असे हे कर्मचारी पुन्हा पगारवाढीची मागणी करतात, याचे विठ्ठलरावांना आश्चर्य वाटत होते. जेवणाखाण्याचा खर्च आणि राहणीमानाचा दर्जा यांत काहीही वाढ झालेली नसताना या कर्मचाऱ्यांना अधिक पैसा लागतो कशासाठी, असा त्यांचा सवाल होता.

आहाराबाबतच्या विठ्ठलरावांच्या नेमस्त सवयी बघता त्यांची ती प्रतिक्रिया समजण्याजोगी आहे, असा अभिप्राय डॉ.काकडे यांनी त्या वेळी मजजवळ बोलताना व्यक्त केला. कारखान्यासाठी भागभांडवल गोळा करतेवेळी विठ्ठलराव त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या घरोघरी गेले होते. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य होते तेव्हा दहा रुपये. ते दहा रुपये उभे करणेही काही शेतकरी कुटुंबांना तेव्हा जड गेले. मग, घरातील पितळेची भांडी विकून काहींनी समभाग विकत घेतले होते. माझ्या काही मित्रांकडून हा सारा तपशील मला तेव्हा कळला. कारखान्याच्या आद्य भागधारकांमध्ये त्या माझ्या मित्रांच्या वडिलांचा समावेश होता. एवढ्या धडपडीने उभे केलेले भागभांडवल तरीही अपुरेच ठरत होते. कारखान्याच्या यंत्रसामग्रीची खरेदी आणि कारखान्याच्या इमारतीची उभारणी या दोहोंसाठीच्या खर्चाची बेगमी त्यातून होण्यासारखी नव्हती. प्राध्यापक गाडगीळ त्या वेळी औद्योगिक वित्त महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य होते.

औद्योगिक वित्त महामंडळाकडून कारखान्यासाठी काही रकमेच्या कर्जाची सोय मग गाडगीळांनी केली. तरीही निधीची पूर्तता झाली नाही. मुंबई सरकारमध्ये त्या वेळी वैकुंठभाई मेहता हे अर्थमंत्री होते. ते गाडगीळांचे मित्र. कारखान्याला सरकारने अर्थसाहाय्य पुरवावे, असा प्रस्ताव गाडगीळांनी त्या वेळी वैकुंठभाईंपुढे मांडला. वैकुंठभाई हे आजन्म सहकारव्रती होते. गांधीजींच्यामुळे ते राजकारणाच्या क्षेत्राकडे वळले. सहकाराच्या तत्त्वावर आकारास येत असलेल्या कारखान्यासारख्या संस्थेला सरकारने अर्थसाहाय्य पुरवावे, ही कल्पना वैकुंठभाईंना मुळातच नामंजूर होती. सहकारी वित्तव्यवहार आणि सरकार या दोन बाबी परस्परांपासून अलिप्तच असल्या पाहिजेत, ही वैकुंठभाईंची भूमिका प्राध्यापक गाडगीळ यांना ज्ञात होती. कर्जरूपाने घेतलेला सरकारचा आणि औद्योगिक वित्त महामंडळाचा पैसा कारखाना दहा वर्षांच्या आत सव्याज फेडून टाकील, असे आश्वासन देऊन प्राध्यापक गाडगीळांनी वैकुंठभाईंचे मन वळवले. मोठ्या नाखुषीनेच वैकुंठभाईंनी अखेर गाडगीळांच्या त्या प्रस्तावाला होकार भरला.

प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्राध्यापक गाडगीळ पहिली दहा वर्षे होते. कारखान्याच्या अध्यक्षपदावरून गाडगीळ पायउतार झाले त्या वेळी मुंबई सरकार आणि औद्योगिक वित्त महामंडळाचे सारे कर्ज कारखान्याने सव्याज परत केलेले होते. इतकेच केवळ नाही तर, कर्जाची परतफेड करूनही चांगले घसघशीत आधिक्य कारखान्याच्या गंगाजळीत जमा होते. या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी माझ्या कानावर त्या वेळी पडत असत. मुळात, शेतीचा उत्पादन खर्च भागवण्याइतपतही पैसा त्या काळी शेतकरी वर्गापाशी नव्हता. त्यामुळे, सहकारी तत्त्वावर आकारास येत असलेल्या पतपुरवठा संस्थांना, निदान प्रारंभीच्या काळात तरी, सरकारी अर्थसाह्याचा टेकू आवश्यक भासत असे.

अशाच प्रकारची कार्यपध्दती त्या वेळी त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात राबविली गेली. सहकारी वित्तव्यवस्थेत, अशा प्रकारे, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या सहकारबाह्य संस्थांचा पैसाही गुंतलेला असल्यामुळे परतफेडीची अत्यंत कडेकोट कार्यप्रणाली सिध्द केली गेली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची पातळी एकदा का उंचावली की, गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारा निधी शेतकरी वर्गाच्या बचतीमधूनच उपलब्ध होईल; त्यातून ठायी ठायी सहकारी तत्त्वावरील पतसंस्था कार्यरत बनतील आणि मग या संपूर्ण व्यवस्थेला सहकारबाह्य स्रोतांकडून अर्थसाहाय्याची गरजच उरणार नाही, असा या सगळ्यामागील विचारव्यूह होता. प्राध्यापक गाडगीळ यांच्याही विचारांची दिशा तीच होती याचा प्रत्यय मला त्यांनी 1960 च्या दशकाच्या अखेरीस या संदर्भात केलेले लेखन मी वाचले तेव्हा आला.

बिनबोभाट मिळणाऱ्या सरकारी वित्तसाहाय्याच्या आधारावर सहकारी पतसंस्थांचा संसार बहरास यावा, हे गाडगीळ यांच्या मनोविश्वातील ‘सहकारी कॉमनवेल्थ’च्या प्रारूपास अभिप्रेत नव्हते. आणखी काही वर्षांच्या आयुष्याचे दान पदरात आले असते तर सहकाराबाबतच्या आपल्या या मतांना शब्दरूप देऊन सहकारी चळवळीची वाटचाल त्या दिशेने व्हावी, यासाठी गाडगीळ सक्रिय बनले असते याविषयी माझ्या मनात मुळीच संदेह नाही. प्रारंभीच्या खडतर वर्षांत सहकारी पतसंस्थांना तग धरता यावा यासाठी सरकारी वित्तपुरवठ्याचा आधार पुढे करण्याचे ते धोरण, खरे पाहता, निखळ हंगामी वा तात्कालिक स्वरूपाचे असणे उचित ठरले असते. मात्र, तोच परिपाठ आजही सुरूच आहे!

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सहकारी तत्त्वांवर सुरू करण्याची चळवळ हे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य ठरले. देशातील अन्य प्रांतांनीही या बाबतीत महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकले पण ते बऱ्याच उशीरा. परंतु, महाराष्ट्रात हे सारे जितक्या सुसंघटित सुविहितपणे घडून आले त्याचे अनुकरण मात्र अन्य प्रांतांना करता आले नाही. सहकारी संस्थांच्या विस्तारणाऱ्या जाळ्याच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि पक्षसंघटन या दोहोंना भरपूर वाव असल्याचे अचूक हेरून राज्यातील काँग्रेस पक्षाने सहकाराच्या वाढविस्तारात मनापासून रस घेतला. सहकारी संस्थांच्या निर्मिती- उभारणीच्या प्रक्रियेद्वारा पार तळागाळातील कार्यकर्त्यांचे राजकीय व सामाजिक बाबींसंदर्भातील प्रबोधन आणि विकासप्रवाहांसंदर्भातील प्रशिक्षणही आपसूकच घडून येईल, हेही त्या पक्षाने ओळखले. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे आणि त्या पक्षाच्या राज्यभरातील विस्ताराचे हे वैशिष्ट्यच म्हणायला हवे. त्यामुळे, पक्षाला राज्यव्यापी अधिष्ठान प्राप्त झाले आणि त्याच वेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील विकासविषयक समस्यांबाबतचे पक्षाचे आकलनही समृध्द बनले.

पुढे, राज्यातील शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली. बदलत्या परिस्थितीला अनुसरून सरकार आणि सहकार यांच्यादरम्यानचे नाते, पतपुरवठ्याचे धोरण व मार्गदर्शक तत्त्वे यांत अनुरूप आणि इष्ट असे बदल घडवून आणणे आवश्यक व उचित ठरले असते. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. राज्य सरकारच्या अर्थसाह्याच्या माध्यमातून सहकारी संस्थांना उपकृत करून ठेवणे, हा त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा हुकमी उपायच जणू सरकारला सापडला होता. निवडणुकीच्या राजकारणाचा विचार करता हे फायद्याचे कलम ठरत असल्याने काँग्रेस पक्षाला ते धोरण बदलणे आत्मघातकी वाटले. सहकारी संस्था आणि सहकारी चळवळ यांचे आज आपण अनुभवत असलेले राजकियीकरण हा याच सगळ्या कार्यकारणभावाचा परिपाक होय. यामुळे सहकार चळवळ आणि सहकारी संस्थांची पार धूळधाण झाली.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पक्ष, पक्षविस्तार आणि राजकीय संघटन यांसंदर्भातील कालसुसंगत अशा नवचिंतनाचे आणि नवदिशेचे कोंभही या साऱ्यामुळे कोळपून गेले. राज्यात 1973-74 साली आकारास आलेला रोजगार हमी योजनेचा विचार हेही महाराष्ट्राचे आणखी एक असेच खास वैशिष्ट्य. भारतातील गरिबीबाबतचा 1970 च्या सुमारास झालेला सखोल अभ्यास आणि गरिबी निवारणासंदर्भात राजकीय पातळीवर त्या वेळी सुरू असलेले मंथन यांच्या पार्श्वभूमीवर वि.स. पागे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली काही काँग्रेस नेत्यांच्या चिंतनातून रोजगार हमी योजनेचे प्रारूप व्यवहारात उतरले. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या धुरीणांनीही या योजनेचा अत्यंत हिरिरीने स्वीकार-पुरस्कार केला. योजनेच्या अंलबजावणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा या हेतूने स्वत:चा असा कराधारित महसूल स्रोत राज्य सरकारने निर्माण केला.

रोजगार हमी योजनेच्या प्रारंभापासूनच केंद्रीय नियोजन आयोग आणि केंद्र सरकार तिच्या अंलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चात भागीदारी करण्याबाबत अनुत्साहीच राहिल्याने राज्य सरकारने आपला पर्याय धुंडाळला होता. रोजगार हमी योजनेची अंलबजावणी महाराष्ट्रात अत्यंत यशस्वीपणे अनेक वर्षे झाली. नंतर मात्र योजनेचा पाया पार खचला. दोन बाबी या योजनेच्या मुळावर आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यापायी रोजगार हमी योजनेची आधारभूत भूमिकाच हद्दपार ठरली. दुसरे म्हणजे, अनुरूप असे सक्षम पर्याय शोधून काढून ते टप्याटप्याने कार्यान्वित करण्याबाबत राज्यातील सत्ताधारी पक्षही विलक्षण उदासीन राहिला.

– 10 –

काँग्रेस हा महाराष्ट्रातील पूर्वापार समर्थ आणि प्रभावशाली राजकीय पक्ष. राज्याच्या दीर्घकालीन हिताचे संगोपन-संवर्धन करणारी धोरणे आणि कार्यक्रम मोठ्या कल्पकतेने निर्माण करून आपल्या हिकमतीवर ते अंमलात आणण्याची या पक्षाची प्रेरणा आणि क्षमता यांबाबत मला इथे येऊन स्थायिक झाल्यावर अतिशय कौतुक वाटले. देशातील अन्य राज्यांत मात्र त्याच काँग्रेस पक्षाच्या अशा उपक्रमशीलतेचा प्रत्यय येत नाही. आला तरी अगदी अभावानेच येतो. मात्र, याच मार्गाने विचार आणि कृती गतिमान पध्दतीने सातत्यशील राखण्याबाबत नंतरच्या काळातील राजकीय नेतृत्त्व तितकेसे दक्ष राहिले नाही. विकासाच्याबाबतीत राज्यात नांदणाऱ्या विभागीय असमतोलाचा अभ्यास करून त्याच्या निराकरणाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने 1983 साली एका समितीची नियुक्ती केली. या समितीने तिच्या अहवालात केलेल्या शिफारशींचे केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय मोलही इथल्या राजकीय नेतृत्वाला जोखता येऊ नये, ही बाब राजकीय नेतृत्वाची या सगळ्याच प्रांतातील विचारक्षमता किती दुर्बल झालेली आहे या वास्तवाकडे निर्देश करते.

प्रा. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आलेल्या त्या समितीच्या शिफारशींबाबत गांभीर्याने विचारविनिमय होऊन त्यांचा आकलनपूर्वक स्वीकार झाला असता तर उभ्या राज्याच्या ग्रामीण भागातील शेती तसेच औद्योगिक क्षेत्रात खाजगी गुंतवणूक बहुविध रूपांनी क्रियाशील बनण्याच्या वाटा किती तरी रुंदावल्या असत्या. केवळ इतकेच नाही तर, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जातिआधारित राजकारणाचा जो आकृतिबंध आज संपूर्ण देशात रुजलेला दिसतो त्याचाही वरचष्मा इथे कमी झाला असता. किंबहुना, हे उदाहरण समोर मांडून त्या दिशेने करायच्या वाटचालीचे अग्रेसरत्व महाराष्ट्राला स्वत:कडे घेता येणे शक्य होते. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाच्या निराकरणासंदर्भात दांडेकर समितीने सुचविलेल्या उपाययोजनेबाबत मी ओडिशा सरकारमधील संबंधितांशी प्रसंगोपात्त बोलत असे. वास्तवात, दांडेकर समितीच्या शिफारशींची तंतोतंत तामीळी राज्य सरकारने केलीच नाही.

अनुशेष निवारणाबाबत समितीने सुचविलेली कार्यपध्दती आणि मांडलेले तर्कशास्त्रही उपेक्षिलेच गेले. त्या ऐवजी आपण निर्माण केली वैधानिक विकास मंडळे. ओडिशातील धोरणकर्त्यांनीही अनुकरण केले ते नेमके याचेच. ‘जे आडात तेच पोहोऱ्यात’, या न्यायाने दोन्ही राज्यांत या सगळ्याची फलश्रुती काय तर शून्य! 

या राज्यात मी गेली 64 वर्षे प्रदीर्घ काळ वास करतो आहे. इथे पाहिलेल्या आणि शिकलेल्या अनेक गोष्टींनी मला विलक्षण प्रोत्साहित बनवले. सतत बदलणाऱ्या, उत्क्रांत होणाऱ्या परिस्थितीला तितक्याच प्रगल्भपणे प्रतिसाद देण्याबाबत इथल्या सर्वच संबंधितांना पुढच्या काळात आलेले अपयश पाहून मी निराशही झालो. सामाजिक गतिविधींसंदर्भात तर्कशुध्द् विचार करून अनुरूप कृती करण्याची वेळ आणि संधी महाराष्ट्राने दवडली, यांबाबत मला होणारा खेद आपण जाणून घ्याल, अशी आशा आहे. अहो, या सगळ्यातून महाराष्ट्रानेच काही धडे घेतले नाहीत तर ओडिशा वा देशातील अन्य प्रांतांबद्दल काय बोलायचे?

(अनुवाद : अभय टिळक)

Tags: नीळकंठ रथ अभय टिळक राजवाडे ब्राम्हण भावे मराठी ओडिसा शेतकरी शेती दुष्काळ शिक्षण नीकंठ अर्थशास्त्र संचालक कारखाना सहकार विठ्ठलराव विखे धनंजय गाडगीळ पुणे nilkanth rath tilak abhay rajwade bramhan bhawe Marathi odisa shetakari sheti dushakal shikshan nilkanth arthshasr sanchalak karkhana sahakar vithhalraw wikhe dhananjay gadagil pune weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीळकंठ रथ
nrath66@yahoo.co.in


Comments

 1. Ravindra kulkarni- 21 Jan 2021

  Enjoyed article ! Publish all these 100 articles in book form.

  save

 1. Anjani Kher- 22 Jan 2021

  महाराष्ट्राचा गेल्या साठ वर्षांचाअतिशय विचक्षण इतिहास . गुणवत्तेचं वर्णन आहे तसेच चुका आणि दोष सडेतोडपणे मांडले आहेत. प्रत्येक सुबुद्ध मराठी माणसाने वाचावा असा लेख.

  save

 1. Santosh Dastane- 12 Feb 2021

  लेख अप्रतिम आहे. विवेचन अतिशय वस्तुनिष्ठ आहे. समाजशास्त्र व अर्थशास्त्र विषयांच्या अभ्यासकांना खचितच मोलाचे आहे.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके