डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बनबिहारी निंबकरांचे शेती व शेळी-मेंढी पालनातील प्रयोग

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना व उत्पादनं तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी (1978-1984) ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात चालली होती. निंबकरांच्या अभिनव कल्पनांमुळे दोन-तीन नवीन उत्पादनं व प्रक्रिया अमलात आल्या, त्यामुळे मॅफ्को ज्या शेतकऱ्यांना उत्पादनं बाजारात आणण्याकरता मदत करत होती त्यांना अधिक मोबदला मिळू लागला.  दूध हे यातील पहिलं उत्पादन होतं. निंबकरांनी ‘एनर्जी’ हे दुधापासूनचं पेय तयार केलं. मुंबईला शाळांसमोर गाड्यांमधून हे पेय विकलं जात असे. 

बनबिहारी निंबकर यांचा जन्म 1931 मध्ये भारतीय वडील व अमेरिकी आई यांच्या पोटी गोव्यात झाला. भारतातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण अमेरिकेतील शाळेत पूर्ण केलं. तिथे ते त्यांच्या मातुल आजोबांकडे राहत. कृषिविद्येमध्ये पदवी घेण्यासाठी ते रटगर्स विद्यापीठात गेले, पण तिथे त्यांनी अनेक संबंधित विषयांचंही शिक्षण घेतलं आणि हे पूरक ज्ञान त्यांना उर्वरित आयुष्यात उपयोगी पडत राहिलं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दिनकर व इरावती कर्वे यांची सर्वांत मोठी मुलगी जाई कर्वे हिच्याशी लग्न केलं. मग ते कृषिविद्येचा पुढील अभ्यास करण्यासाठी ॲरिझोना विद्यापीठात दाखल झाले. इथे त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि पीएच.डी.साठीच्या सर्व क्रमिक बाबींचीही पूर्तता केली. पण प्रबंध सादर करण्याआधीच ते फलटणला परतले. यानंतर आयुष्यभरात त्यांनी भारतातील शेतीविषयी व पशुपालनाविषयी अगणित  प्रत्यक्ष कार्याधारित प्रबंध लिहीत राहिले.

त्यांच्या आयुष्यातील साठहून अधिक वर्षांच्या कालावधीचा. यातील पूर्वार्ध शेतीसंबंधीच्या प्रयोगांमध्ये गेला, तर उत्तरार्धामध्ये कोरडवाहू भागासाठी सोयीचे लहान रवंथी प्राणी विकसित करण्यात गेला. तरुणपणी ते चिकू, द्राक्षं, पेरू यांसारख्या पिकांसोबतच सोयाबीन, ज्वारी, कापूस व ऊस अशी वेगवेगळी पिकं घेऊन बघत होते. त्यातील स्थानिक परिस्थितीमध्ये सर्वाधिक नफादायक पीक कोणतं असेल, हे त्यांना शोधायचं होतं. त्या काळी रॉकफेलर फाउंडेशन भारत सरकारची सक्रिय मदत करत असे. तर, या फाउंडेशनने संकरित पिकांबाबतची शक्यता तपासण्यासाठी आणि अशा कामाकरता कोणत्या स्थानिक संस्थांना व व्यक्तींना प्रशिक्षण देता येईल याची चाचपणी करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट भारतात पाठवला. या गटामधील एक तज्ज्ञ डॉ. रॅशी हे ॲरिझोना विद्यापीठात निंबकरांचे प्राध्यापक राहिले होते. या गटाने निंबकरांना संकरित वाण विकसित करायचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर निंबकरांनी संकरित वाणांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने फलटणमध्ये एका बियाणे कंपनीची सुरुवात केली. इथे त्यांनी अमेरिकेतील व नंतर ऑस्ट्रेलियातील आवश्यक जननद्रव्यं मागवून काही स्थानिक व परक्या पिकांसाठी संकरित बियाणं तयार करायला सुरुवात केली. या कामात त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे मेहुणे डॉ. आनंद कर्वे यांचीही साथ होती. या प्रयोगांमधून निंबकरांनी विकसित केलेल्या आणि बाजारात आणलेल्या पिकांमध्ये संकरित ज्वारी, संकरित कापूस, गोड ज्वारी, करडई, मका व सूर्यफूल यांचा समावेश होता.

1960-70च्या दशकामध्ये खाजगीरीत्या विकसित करून अतिशय यशस्वी ठरलेली ही भारतातील पहिली संकरित पिकं होती. त्यांनी तयार केलेल्या गोड ज्वारीचे दाणे मोत्यासारख्या पांढऱ्या रंगाचा होते आणि भाकरी करण्यासाठी ही ज्वारी अगदी सोयीची होती. या पिकाची देठं गोड होती. त्यामुळे त्याचा रस काढून गूळ किंवा सरबत करणं शक्य होतं, दिव्यांसाठी त्यातून इंधनही मिळत असे, आणि अर्थातच गायीगुरांसाठी हा उत्तम चारा होता. त्यांच्या संकरित कापसाला मोठी फुलं येत असत आणि त्यांच्या शेतातील कापसाचा उपजेचा दर प्रतिहेक्टर 20 क्विंटल इतका प्रचंड होता. कापसाच्या फुलांमधील पुंकेसर काढून टाकणं किंवा परागीकरण घडवणं, ही कामं हाताने केली जात असल्यामुळे त्यातून मोठ्या संख्येने महिलांना रोजगार मिळाला. मोठी बोंडं खुडायला सोपी होती, त्यामुळे कामगार महिलांना दिवसामधील त्यांची उचल दुप्पट करणं शक्य झालं. हा कापूस हातमागासाठी जास्त सोईस्कर असल्यामुळे खादीचा जास्त वापर झाला. उत्पादनाचा दर जास्त असल्यामुळे सातारा व सोलापूर इथल्या जिनिंग कारखान्यांची संख्या वाढली. या संकरित वाणाच्या कापसाचं बोंड कीटकांना प्रतिकार करत असे, पण तुडतुड्यांसारखे शोषक कीडे मात्र त्यावर मारा करू शकतात असं निदर्शनास आलं, परिणामी दशकभरानंतर या संकरित वाणाचा वापर मंदावत गेला. करडईच्या काटे नसलेल्या वाणांमुळे या पिकाची अपारंपरिक भागांमधील लोकप्रियता वाढली. ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या जननद्रव्यांद्वारे त्यांनी विकसित केलेलं संकरित सूर्यफूल इतकं यशस्वी झालं की, या सूर्यफुलाच्या बियांच्या विक्रीतून बियाणे कंपनीला बराच नफा झाला आणि त्यातून निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या काही संशोधनाला अर्थपुरवठा करणं शक्य झालं. या बिया विकसित झाल्यावर अधिक नफादायक पद्धतीने ओलिताखालील शेती करण्याच्या शक्यता खुल्या झाल्या. या संदर्भात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ‘नीरा खोरे कृषी विकास कंपनी’ची स्थापना करण्यात आली. या कंपनीने धरणांच्या पाण्यातून उपसासिंचन करण्याच्या चौदा योजनांना चालना दिली. सक्षम अभियंत्यांनी या सिंचन प्रकल्पाची आखणी केली होती, पण शेतकऱ्यांनी हे पाणी अधिकाधिक यशस्वी रीतीने नवीन पिकांसाठी वापरावं यासाठी निंबकरांनी पुढाकार घेतला होता. ही योजना सर्वोत्तम रीतीने कशी राबवता येईल, हे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन पाच वर्षांकरता कंपनीला भाडेकरारावर द्यावी, असं ते शेतकऱ्यांना पटवून देत असत. हा भाडेकराराचा कालावधी संपल्यावर शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळायची आणि ओलिताखालील शेती करण्यासाठी त्यांना सहकारी संस्था स्थापन करण्याचा मार्ग उपलब्ध होत असे. अशाच एका गावात मी बनबिहारींना पहिल्यांदा भेटलो. त्यांची आकलन क्षमता व त्यांचं ध्येयं यांचा माझ्यावर प्रभाव पडला.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना व उत्पादनं तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी (1978-1984) ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात चालली होती. निंबकरांच्या अभिनव कल्पनांमुळे दोन-तीन नवीन उत्पादनं व प्रक्रिया अमलात आल्या, त्यामुळे मॅफ्को ज्या शेतकऱ्यांना उत्पादनं बाजारात आणण्याकरता मदत करत होती त्यांना अधिक मोबदला मिळू लागला. दूध हे यातील पहिलं उत्पादन होतं. निंबकरांनी ‘एनर्जी’ हे दुधापासूनचं पेय तयार केलं. मुंबईतीला शाळांसमोर गाड्यांमधून हे पेय विकलं जात असे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये इतर सर्व शीत पेयांना एनर्जी हा पर्याय ठरला होता, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. एनर्जीला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. निंबकरांनी तयार केलेली गोठवलेली भेंडी आखाती देशांमध्ये निर्यात केली जाऊ लागली. अजूनसुद्धा हा प्रकार लोकप्रिय आहे. आम्रखंड हा खाद्यप्रकारसुद्धा मॅफ्कोने पहिल्यांदा तयार करून बाजारात आणला. मॅफ्कोच्या वतीने विविध रूपांमधील डुकराचं मांस विक्रीला ठेवलं जाऊ लागलं आणि बाजारपेठेत हे उत्पादन चांगलं खपलं. निंबकर मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ही नफादायक सरकारी कंपनी झाली होती.

महाराष्ट्रातील कोरड्या व दुष्काळी प्रदेशांमध्ये फलटण इथे राहणाऱ्या निंबकरांना कोरडवाहू शेतीबद्दल आस्था होती. एकदा ऑस्ट्रेलियाला गेले असताना त्यांनी क्वीन्सलँड विद्यापीठात कोरडवाहू पिकांसंबंधी चौकशी केली. तिथल्या कृषी विभागाने त्यांना तीन-चार भिन्न प्रकारचं गवत दाखवलं. हे गवत तिथल्या अभ्यासकांनी भारतातूनच गोळा केलं होतं आणि मग त्याचा विकास केला होता. कोरडवाहू जमिनीवर झाडं वाढवण्यात निंबकरांना अपयश आलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून परतल्यावर त्यांनी या संकरित गवताच्या बिया फलटणच्या अतिशय शुष्क जमिनीवर लावल्या. अगदी खराब मातीमध्ये अत्यल्प पाऊस पडल्यावरसुद्धा हे गवत चांगल्यापैकी वाढत असल्याचं निदर्शनास आलं. मेंढ्या व शेळ्या यांच्यासारख्या गवतावर जगणाऱ्या छोट्या रवंथी प्राण्यांसाठी हा उत्तम चारा होऊ शकतो आणि गरीब गावकऱ्यांना हा एक मोठा आधार ठरेल, हे निंबकरांच्या लक्षात आलं. पण या प्राण्यांविषयी त्यांना पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरड्या प्रदेशांमध्ये मेंढ्या व शेळ्या पाळण्याच्या शक्यतेबाबत त्यांनी त्यांचे मित्र शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी निंबकरांना ‘महाराष्ट्र मेंढी व शेळी आयोगा’चं अध्यक्ष नेमलं. या आयोगाला अभ्यास करून अहवाल सादर करण्याकरता एक वर्ष देण्यात आलं. हा कालावधी नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. त्या पूर्वी स्कॉटलंडमधील एडिनबर्ग इथल्या पशुपालन क्षेत्राशी संबंधित एका सन्माननीय वैज्ञानिकाला निबकरांनी सल्लागार म्हणून फलटणला निमंत्रित केलं. हा वैज्ञनिक निंबकरांसोबत भारताच्या विविध भागांमध्ये फिरला, त्याने तिथल्या संस्था व प्रजाती पाहिल्या. लहान रवंथी प्राण्यांविषयी या वैज्ञानिकाकडून निंबकरांना बरंच काही शिकायला मिळालं. अखेरीस, संबंधित वैज्ञानिकाने लहान रवंथी प्राण्यांसंदर्भातील शक्यता नोंदवणारा अहवाल सादर केला. तोवर राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली होती, पण सल्लागाराचं मानधन द्यायला सरकारने नकार दिला. त्यामुळे निंबकरांनी स्वतःच्या खिशातून त्या वैज्ञानिकाला 1500 पौंड इतकं मानधन दिलं. अर्थातच तेवढा त्याचा उपयोगही झाला. या क्षेत्रात मूल्ययुक्त परिणाम साधण्यासाठी आवश्यक संघटनात्मक कार्यक्षमता व कामगारांची निष्ठा निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये (निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट : नारी) आढळते, असा अहवाल संबंधित वैज्ञानिकाने दिला.

या आयोगाचं काम सुरू असताना निंबकरांशी माझी दुसऱ्यांदा भेट झाली. आयोगाच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू असताना ते अचानक एके दिवशी माझ्याकडे आले आणि महाराष्ट्रातील मेंढ्या व शेळ्यांच्या अर्थकारणाचं विश्लेषण करण्यात मी मदत करू शकेन का, अशी विचारणा केली. ‘‘माझी मदत करण्याची इच्छा आहे, पण या लहान रवंथी प्राण्यांशी माझा परिचय केवळ जेवणातल्या पदार्थांपुरता आहे,’’ असं मी त्यांना नम्रपणे सांगितलं. यावर निंबकर म्हणाले की, या कामासाठी आवश्यक तो सर्व तांत्रिक तपशील मला पुरवला जाईल आणि पशुपालन खात्याकडील वार्षिक सर्वेक्षणांचे अहवाल माझ्याकडे आणून दिले जातील. त्यांनी ही जबाबदारी पार पाडल्यानंतर मी या ऐवजावर काम केलं आणि एक दीर्घ निबंध तयार केला. हा निबंध आयोगाला उपयोगी पडल्याचं त्यांनी मला सांगितलं. इतकंच नव्हे तर आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये परिशिष्ट म्हणून त्यांनी माझ्या निबंधाचा समावेश केला. ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबांसाठी शेळ्या किती महत्त्वाच्या आहेत, हे माझ्या लक्षात आलं. ग्रामीण भागांमधील 25 टक्के घरांमध्ये, बहुतांशाने गरीब कुटुंबांकडे एक ते पाच शेळ्या होत्याच. ते चहासाठी, घरातील मुलांसाठी शेळीचं दूध वापरत होते आणि घरखर्च भागवायला शेळीची पिल्लं विकत असत. आपल्या भागातील धनगरांच्या जीवनात मेंढीला मध्यवर्ती स्थान होतं.

संबंधित आयोगाचा अहवाल म्हणजे या क्षेत्रातील भावी विकासाचा उत्तम दस्तऐवज होता. पण महाराष्ट्र सरकारने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. निंबकरांना मात्र विकासासाठी कोणती पावलं उचलता येतील याबद्दलची एक कल्पना यातून सुचली. भारतामध्ये मेंढी मूलतः मांसल प्राणी आहे, पण सरकारने सुरुवातीपासूनच केवळ लोकरीसाठी मेंढीचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. भारतामध्ये प्रत्येक मेंढीकडून सरासरी पाव किलो लोकर मिळत असे. तिचं मांस व चामडं ही महत्त्वाची उत्पादनं होती. त्यामुळे मटणासाठीचा प्राणी म्हणून मेंढीचा विकास साधणं योग्य राहील, असं निंबकरांचं म्हणणं होतं.

या दरम्यान, मेरिनो जातीच्या मेंढीवर काम केलेल्या एका ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकाचं पुस्तक निंबकर यांनी वाचलं. जुळ्या कोकरांना जन्म देणाऱ्या ऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढीचा ‘बुरूला’ हा प्रकार बंगाल प्रांतातील काही गावांमध्ये आढळत असल्याचं त्या वैज्ञानिकाने नमूद केलं होतं. त्यावरून अंदाज घेत निंबकरांनी केलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र पशुपालन खात्याच्या संचालकांनी या मेंढीबाबतची माहिती बंगालच्या पशुपालन संचालकांकडून मागवली. परंतु बंगालमध्ये अशी कोणतीही मेंढी नसल्याचं उत्तर महिन्याभराने आलं. पण निंबकरांनी प्रयत्न सोडले नाहीत. आयोगाच्या अहवालानंतर ते या मेंढीच्या शोधात कोलकात्याला गेले. सुंदरबनमधील बेटांवर अशा मेंढ्या असल्याचं त्यांना एका जीवशास्त्रीय संशोधन संस्थेतील वैज्ञानिकाकडून कळलं. याचा मागोवा काढत निंबकर तिथे गेले आणि तिकडे त्यांना अतिशय लहान आकाराच्या (सुमारे 12 ते 15 किलो शारीरिक वजन) मेंढ्या सापडल्या. भाताच्या दलदलीत शेतात पाण्यामध्ये उभं राहून त्या चरू शकत होत्या आणि त्या नियमितपणे जुळ्या कोकरांना जन्म देत असल्याचंही त्यांना कळलं. निंबकरांनी ट्रक भरून अशा मेंढ्या खरेदी केल्या (त्यात नर व मादी दोन्ही होते.) आणि ट्रेनने दौंडला आणून पुढे फलटणला नेल्या. जगातील या प्रजातीच्या मोजक्या मेंढ्यांपैकी या काही मेंढ्या त्यांना मिळाल्या होत्या. एका वेळी केवळ एका कोकरांऐवजी दोन किंवा तीन कोकरू जन्माला आल्याने मेंढीपालनाचं अर्थकारण पूर्णतः बदलून जाणार होतं.

निंबकरांनी या मेंढ्या आणि फलटणमधील स्थानिक मेंढ्या यांची मिश्र पैदास सुरू केली. पण ही प्रयोगशाळा चालवणं, कोकरांची देखभाल करणं, इत्यादींसाठी त्यांना निधी गरजेचा होता. या संदर्भात त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे अर्ज केला. परिषदेच्या वतीने वैज्ञानिकांचा एक छोटा गट दिवसभरासाठी फलटणला येऊन गेला. निंबकरांच्या संस्थेकडे पात्रता असलेले वैज्ञानिक आणि आवश्यक इमारती व उपकरणं नसल्यामुळे त्यांची संस्था संशोधनासाठी निधी मिळवायला पात्र ठरत नाही, असा अहवाल या संशोधकांनी कृषी संशोधन परिषदेकडे दिला. निराश झालेल्या निंबकरांनी इतर अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांशी ओळख व्हावी यासाठी एका विख्यात ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकाची मदत घेतली. या वैज्ञानिकाने ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेशी (ऑस्ट्रेलियन कौन्सिल फॉर इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल रिसर्च : एसीआयएआर) या बाबत चर्चा केली. ऑस्ट्रेलियातील या सरकारी संस्थेचे एक वैज्ञानिक त्या वेळी भारतात आलेले होते, त्यामुळे त्यांना फलटणला जाऊन माहिती घ्यायला सांगण्यात आलं. ते फलटणला आले आणि निंबकरांशी व त्यांची सर्वांत धाकटी मुलगी चंदा निंबकर (स्कॉटलंडमधील एडिनबर्ग इथे पशू जनुकशास्त्रात तिने पदव्युत्तर पदवी मिळवली होती.) यांच्याशी बोलले. या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकाने मेंढ्यांचा कळप पाहिला आणि ‘नारी’मध्ये उपलब्ध असलेल्या इतर सुविधाही पाहिल्या. पुढे जाऊन त्यांनी दोन वर्षांच्या निधीकरता ‘डेव्हलपमेन्ट ऑफ प्रोलिफिक शिप फॉर इंडियन फार्मर्स’ असा एका संशोधनाचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव ‘एसीआयएआर’कडे सादर करण्यात आला. एसीआयएआरने यासाठी निधी मंजूर  केला, पण ती सरकारी संस्था असल्यामुळे निधीचं हस्तांतरण भारत सरकारच्या संबंधित संस्थेच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं. परंतु भारतातील या संदर्भातील अधिकृत संस्था असलेल्या आयसीएआरने ‘नारी’कडे पाठ फिरवलेली असल्यामुळे निंबकर सीएसआयआरकडे गेले. त्या वेळी डॉ. रघुनाथ माशेलकर सीएसआयआरचे संचालक होते. परिणामी, पुण्यातील एनसीएलने या संदर्भात समजुतीच्या करारावर सही करून संशोधन प्रकल्पात सहभाग घेतला. यानंतर सुंदरबनातील ‘गरोल’ मेंढीमधील ‘बुरुला’चं जनुक वापरून फलटणमधील स्थानिक दख्खनी मेंढीची ‘लोणंद’ प्रजातीमध्ये मिश्र पैदास करण्यात आली.

पण लवकरच निंबकरांच्या लक्षात आलं की, मेंढ्यांनी केवळ मेंढपाळांसाठीच नव्हे तर मोठ्या संख्येने जन्माला आलेल्या कोकरांसाठीसुद्धा अधिक दूध देणं गरजेचं आहे. मग त्यांनी अधिक दूध देणाऱ्या प्रजातीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना इस्रायलमधील अवासी प्रजातीबद्दल माहिती कळली. त्यांनी वीस अवासी मेंढे व मेंढ्या आयात केल्या. त्यासाठी त्यांनी साताऱ्यातील एका बँकेकडून कर्ज घेतलं होतं. शिवाय, अधिक मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या बन्नूर या दुसऱ्या एका प्रजातीमधील मेंढ्याही त्यांनी मागवल्या. यामुळे स्थानिक धनगरांना त्यांच्याकडील मेंढ्यांचा कळप सुधारून अधिक उत्पन्न कमावण्याकरता एक सुविधा उपलब्ध झाली. भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने निंबकरांच्या संस्थेने बुरुला जनुक शोधण्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा स्थापन केली. सध्या डॉ. चंदा निंबकर व डॉ. प्रदीप घळसासी या प्रयोगशाळेचं काम पाहतात. धनगरांना त्यांच्या कळपात जुळ्यांना जन्म देणाऱ्या, जास्त दूध देणाऱ्या, तसंच जास्त मांस पुरवणाऱ्या मेंढ्या मिळाव्यात, यासाठी या संस्थेने प्रयत्न केले.

या वेळी घडलेल्या दोन भिन्न गोष्टींमुळे निंबकरांचं लक्ष शेळ्यांकडे गेलं. राजस्थानातील विशेष शेळी पैदास कार्यक्रम बंद होत असल्याची बातमी, ही यातील एक घटना होती. राजस्थान सरकार आणि स्वित्झर्लंड यांच्यात शेळ्यांच्या विकासासंदर्भात करार झाल्याचं त्यांना कळलं. या करारानुसार अल्पाइन शेळीची राजस्थानात पैदास करण्याची जबाबदारी स्विझ डेव्हलपमेन्ट कमिशनकडे (एसडीएस) देण्यात आली होती. एसडीएसने काम सुरू केलं, पण वर्षअखेरीस त्यांच्या लक्षात आलं की अल्पाइन शेळी राजस्थानातील परिस्थितीशी अनुकूल नाही. त्याऐवजी त्यांनी स्थानिक सिरोही प्रजातीमधील उत्तमोत्तम शेळ्या निवडायला सुरुवात केली. पाच वर्षांच्या कालावधीत एसडीएसने जास्त दूध देणाऱ्या सुमारे दोनशे सिरोही शेळ्या गोळा केल्या. यातील सर्वोत्तम शेळ्या पान्हा फुटण्याच्या काळात दररोज चार लिटर दूध देत असत. पण राजस्थान सरकारला हे भावलं नाही. सहा वर्षांचा करार संपल्यानंतर स्विझ संस्था निघून गेली आणि राजस्थान सरकारने या निवडलेल्या शेळ्या विकायचा निर्णय घेतला. याची माहिती निंबकरांपर्यंत थोडी उशिरा पोहोचली. त्यामुळे त्यांनी फलटणमधील संस्थेसाठी अवासी शेळ्यांचा एक कळप खरेदी करण्यासाठी राजस्थानातील स्थानिक मध्यस्थाचा वापर केला. प्राण्यांची प्रजात सुधारण्यासाठी निवडीचं महत्त्व किती असतं, याची जाणीव त्यांना होती.

दुसरी घटना म्हणजे दिल्लीतील एका परिषदेमध्ये त्यांनी जगातील विशेष उल्लेखनीय अशा दक्षिण आफ्रिकेतील ‘बुअर’ शेळीबद्दलचा चित्रपट पाहिला. गुणवत्ता व संख्यात्मकता या दोन्ही बाबतींत या शेळीचं मांस आणि तिचं चामडं इतर कोणत्याही शेळीपेक्षा उत्कृष्ट असतं, असं चौकशीअंती चेन्नईतील सेंट्रल लेदर इन्स्टिट्यूटकडून त्यांना कळलं. त्यांनी एका ऑस्ट्रेलियन शेतावरून या प्रजातीचे वीस भ्रूण आणि काही वीर्य आयात करण्यासाठी भारतातील ऑस्ट्रेलियाच्या उच्च आयुक्तालयाकडे अर्ज केला. गेवान ब्रेमिलोव या राजनैतिक अधिकाऱ्याच्या सहकार्याने  आयातीला परवानगी मिळाली आणि एक तज्ज्ञ मनुष्य आवश्यक सामग्री घेऊन फलटणला आला व ‘महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थे’मध्ये स्थानिक शेळ्यांमध्ये वीर्य रोपण करण्यात आलं. यातून पाच बकरे व तीन बकऱ्या जन्माला आल्या. त्यानंतर निंबकरांनी अधिकचे वीस भ्रूण आयात केले आणि संस्थेतील पशुवैद्य डॉ. घळसासी यांनी स्थानिक शेळ्यांमध्ये भ्रूण रोपण केलं.

हा उपक्रम पुढे नेऊन शेळ्यांचा कळप सुधारण्यासाठी विविध गावांमध्ये योग्य बकरे पुरवणं गरजेचं होतं. एक नर त्याच्या उत्पादक आयुष्यभरात एकूण सुमारे 2500 शेळ्यांना जुगू शकतो. पण कृत्रिम वीर्य रोपणाद्वारे ही संख्या दहा पट करता येते. निंबकर कृषी संशोधन संस्थेने लहान रवंथी प्राण्यांचं वीर्य काढून जतन करायची पद्धत विकसित केली होती. किंबहुना, या बाबतीत निंबकरांची संस्था अग्रणी होती. शेळी व मेंढी संशोधन संस्थेच्या डॉ. प्रदीप घळसासी यांनी या वीर्याचं शेळ्यांमध्ये रोपण करण्यासाठी आवश्यक तंत्र विकसित केलं. असं तंत्र विकसित करणारी ती भारतातील एकमेव संस्था होती. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातील पशुपालन विभागाच्या निधीद्वारे फलटणला कृत्रिम वीर्य रोपणासाठी विशेष प्रयोगशाळा विकसित करण्यात आली. आत्तापर्यंत तिथे उत्तम गुणवत्तेच्या बुअर बकऱ्यांच्या वीर्याचं रोपण सुमारे 50 हजार शेळ्यांमध्ये करण्यात आलं आहे.

या शतकाच्या सुरुवातीला सिरिया व भारत यांच्यातील एका तंत्रज्ञानीय करारामुळे निंबकर यांनी दमास्कस बकऱ्यांचं गोठवलेलं वीर्य आयात करायचा निर्णय घेतला. दमास्कस शेळ्या जास्त दूध देतात आणि त्यांचं मांसही जास्त असतं. या देवाणघेवाणीचा भाग म्हणून निंबकरांच्या संस्थेने सिरियन सरकारी संस्थेला शेळ्यांच्या कृत्रिम वीर्य रोपणाचं तंत्र शिकवलं. दमास्कस बकऱ्यांचं वीर्य वापरून बुअर व सिरोही शेळ्यांची मिश्र पैदास करण्यात आली. वर्षभरात 1.25 लाख शेळ्यांमध्ये वीर्य रोपण करण्याची संस्थेची क्षमता होती. पण महाराष्ट्रात 11 कोटींहून अधिक शेळ्या आहेत, त्यांच्यावर अशी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात असं एक केंद्र असायला हवं, असं निंबकरांचं मत होतं.

आज भारत आणि नेपाळ इथल्या विविध भागांमधील शेतकरी व कृषी सहकारी संस्था यांचा वापर त्यांच्याकडील रवंथी प्राण्यांचा साठा सुधारण्यासाठी करत आहेत. माणदेशातील बचत गटांमधल्या महिलांना शेळ्यांच्या कृत्रिम वीर्य रोपणाचं प्रशिक्षण द्यावं, यासाठी निंबकरांच्या संस्थेने ‘माणदेशी फाउंडेशन’ या संस्थेला प्रोत्साहन दिलं. हे प्रशिक्षण मिळालेल्या पहिल्या आठ महिलांपैकी एक सुरेखा कालेल यांनी आतापर्यंत एक हजारांहून अधिक शेळ्यांवर ही प्रक्रिया पार पाडली आहे. निंबकरांनी त्यांना किट्‌स पुरवली आणि वीर्याच्या काड्या साठवण्यासाठी नायट्रोजनचे कंटेनरही पुरवले. कालेल यांना त्यांचा नवरा मोटरसायकलवरून गावात गरज असेल त्या ठिकाणी नेऊन सोडतो. पण जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये निमयितपणे ही सेवा उपलब्ध होण्यासाठी सुमारे आठ हजार प्रशिक्षित महिला गरजेच्या आहेत. हे प्रचंड मोठं काम आहे. परंतु महाराष्ट्रातील राज्य सरकारने आतापर्यंत यात फारसा रस दाखवलेला नाही.

स्थानिक शेळ्यांची निवडक पैदास करण्याचा कार्यक्रम भारत सरकारने सुमारे दोन दशकांपूर्वी सुरू केला, त्यात निंबकर कृषी संशोधन संस्थेचा पशुपालन विभागही सहभागी झाला. निंबकरांच्या संस्थेने उस्मानाबादमधील चांगल्या गुणवत्तेच्या शेळ्यांची निवड सुरू केली आहे. तिथले उच्च उत्पादनक्षम बकरे फलटणला आणले असून त्यांच्याकडून वीर्य मिळेपर्यंत त्यांची जोपासना केली जाईल. विशेष म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचा हा कार्यक्रम दोन दशकांपूर्वी सुरू झाला असला, तरी स्थानिक प्रजातींची अशी पद्धतशीर निवड केवळ उस्मानाबादी शेळ्यांच्या बाबतीतच झाल्याचं दिसतं. आता माण तालुक्यातील गावांमध्ये महिलांना बोअर-दमास्कस आणि उस्मानाबादी शेळ्यांमध्ये निवड करायचा पर्याय मिळेल. माण तालुका, नाशिक व धुळे जिल्हा, या ठिकाणी आता सुमारे 36 ‘शेळी सखी’ आहेत. निंबकरांच्या संस्थेने या महिलांना शेळ्यांमधील कृत्रिम वीर्य रोपण व शेळ्यांची योग्य देखभाल यांचं प्रशिक्षण दिलं आहे.

ग्रामीण भागातील शेळ्यांची देखभाल करणाऱ्या महिलांना व धनगरांना केवळ उत्तम प्रतीची प्रजाती पुरवून भागणार नाही, असं निंबकरांच्या लक्षात आलं. प्राण्यांची चांगली देखभाल करण्यासाठी त्यांना चांगला चारा लागतो. निंबकरांनी ब्रिस्बेन विद्यापीठातून गवत मिळवलं होतं, त्याचसोबत ऑस्ट्रेलियातील सुबाभळीचा एक प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ही ऑस्ट्रेलियातील ल्यूकेइना नावाची संकरित सुबाभळ आहे. लहान रवंथी प्राण्यांसाठी ती अतिशय पोषक आहे आणि त्यात बी फार कमी प्रमाणात असतं. हासुद्धा एक लाभदायक भाग आहे. आपल्या देशात आज सापडणाऱ्या सुबाभळी त्रासदायक ठरतात, कारण एकदा लावल्यानंतर त्यांची वणव्यासारखी वाढ होत जाते आणि सर्वत्र त्यांचं बी पडत जातं. शिवाय, ही सुबाभूळ सिलिड या कीटकाच्या भक्ष्यस्थानी पडू शकते. हा कीटक पावसाच्या अखेरीला व हिवाळ्याच्या सुरुवातीला झाडांची पानं खात सुटतो, त्यामुळे प्राण्यांना चारा म्हणून ती पानं उपयोगी उरत नाहीत. ऑस्ट्रेलियातील वेगळ्या प्रकारची सुबाभूळ मात्र या कीटकापासूनसुद्धा सुरक्षित राहणारी होती. निंबकरांनी ती फलटणला आणली आणि त्याच्या फांद्या लावून नवीन झाडे तयार केली. शिवाय, आपल्या भागातील मुरमाड जमिनीमध्ये व अनियमित पावसामध्येसुद्धा ही सुबाभूळ चांगल्या प्रकारे वाढते. या वनस्पतींची पानं लहान रवंथी प्राण्यांना पूर्ण चारा म्हणून उपयोगी पडतात. या पानांमध्ये नसणारे काही लहानसे पोषक घटक मेंढ्यांना व शेळ्यांना सैंधव चाटवून दिले जाऊ शकतात; तर शेळ्या व मेंढ्यांच्या या वाढलेल्या दुधामुळे, चांगल्या गुणवत्तेच्या व मोठ्या प्रमाणातील मांसामुळे आणि दर्जेदार चामड्यामुळे दख्खनच्या ग्रामीण भागातील गरिबांचं अर्थकारण सुधारू शकतं. यासाठी सुबाभळीचा हा प्रकार अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा इथल्या डोंगराळ ग्रामीण भागांमध्ये जमीन नापीक आहे. त्यामुळे इथल्या कुटुंबांमधील तरुण मोठ्या संख्येने गावाबाहेर पडून बिगरशेतकी कामाचा शोध घेत राहतील. परंतु लहान रवंथी प्राणी पाळण्यासाठी मात्र ही जमीन अत्यंत योग्य आहे आणि या प्राण्यांची व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढणार आहे. पण या सुबाभळीच्या वनस्पतींची संख्या वाढवण्यासाठी निंबकरांनी विकसित केलेली पद्धत अतिशय खर्चीक झाली. ही पद्धत सुधारून शेतकऱ्यांना अधिक सहजतेने कशी उपलब्ध करून देता येईल, या संबंधी संशोधन सुरू  आहे.

हे काम खूप मोठं आहे. पण बनबिहारी निंबकर या एका माणसाने स्वतःची समज, स्वीकारशीलता व कल्पकता यांद्वारे आणि त्यांच्या दोन अतिशय सक्षम तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने या कामाचा पाया रचला आहे. या पायावर उभं राहणारं काम वेगाने राज्यभर व देशभर पसरेल. आत्तापर्यंत त्यांनी साधलेल्या कार्याने मला अचंबित व्हायला होतं. एक माणूस स्वत:ला आणि अल्पशिक्षित  सहकाऱ्यांना प्रशिक्षित करून सहा दशकांच्या सक्रिय जीवनात एवढं काम करू शकला हे विलक्षणच म्हणावं लागेल! एका इंग्रजी कवीने म्हटल्याप्रमाणे, ‘माणूस काही केवळ झाडासारखा वाढत राहून उत्तम ठरत नाही.’ बनबिहारी निंबकर झाडासारखे वाढले नाहीत. आपली समज तळपातळीवरील वास्तवामध्ये उतरवण्याची त्यांची अथक धडपड चाललेली असे, त्यामुळे त्यांना विश्रांतीसाठीसुद्धा फारसा वेळ मिळायचा नाही. ते निवांतपणे नित्यक्रम पाळत जगले नाहीत, तर उपयुक्त विचार करून ते विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी खटपट केली. आपल्या देशात, खरं म्हणजे कोणत्याही देशात विविध स्तरांवर आणि विविध क्षेत्रांमध्ये अशी माणसं कार्यरत असली तर त्यामुळे इतरांचं जगणं सुसह्य होतं. बनबिहारी निंबकर यांनी असाच एक दाखला घालून दिला आहे.

(अनुवाद : प्रभाकर पानवलकर)

कृषिशास्त्रज्ञ बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी 25 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले. त्यांचे मित्र ज्येष्ठ कृषिअर्थशास्त्रज्ञ डॉ. रथ यांनी त्यांच्या जीवनकार्यातील एका पैलूचा घेतलेला हा वेध.

Tags: नीळकंठ रथ कृषीतज्ज्ञ बॉन निंबकर पशुपालन शेती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीळकंठ रथ
nrath66@yahoo.co.in

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके