डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रकल्पात पोकळ भाषणांची वृष्टी करणारे निसर्गप्रेमी मला आयुष्यात खूप भेटलेत. लोकसंख्या वाढली की ऊर्जा वापराची भूकही प्रचंड गतीने वाढते. ही भूक शमवली तरी पाहिजे किंवा तिला आळा घातला पाहिजे. निसर्गाला आणि मानवजातीला धोका पोहोचणार नाही असे तंत्रज्ञान वापरून नवे प्रकल्प उभारले पाहिजेत.

एका ठिकाणी फार दिवसांचा मुक्काम नाही, असा माझ्या जीवनाचा एक जिप्सी साचा बनत असताना 1980 ते 84 सालापर्यंत सॅनफ्रँन्सिस्कोत, एका ठिकाणी मी चार वर्षे काढली, ह्याचे माझ्या मित्रमैत्रिणींना आश्चर्य वाटायला लागले होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या धडपडीमुळे, बेशुद्ध पडण्यावर व जवळजवळ आंधळेपणा देणाऱ्या प्रचंड डोकेदुखीवर बराच ताबा आला होता. जवळजवळ एक वर्ष मी घराबाहेर बेशुद्ध पडले नव्हते. त्यातच संगीतक्षेत्रात घोडदौड, एम.बी.ए.चा अभ्यास व पेन्सिल्व्हेनिया स्टेटला कामानिमित्त दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या भेटींमध्ये चार वर्षे भरकन् उडून गेली. 

कॅलिफोर्नियातील पॅसिफिक गॅस कंपनीने सॅनफ्रँन्सिस्कोपासून 300 मैल दूर एक न्युक्लिअर पॉवर प्लॅन्ट नुकताच बांधला होता. तो सान अ‍ॅन्ड्रेज ह्या नावाच्या धरणीकंप होणाऱ्या मार्गावर असल्यामुळे, लोकांनी फार विरोध वाढविला होता. त्यात रॉबर्ट ब्लेक, जेन फान्डा सारखे नामवंत लोक होते. शेवटी हवालदिल होऊन ती युटिलिटी कंपनी, बेक्टेलकडे मदत मागायला आली. बेक्टेलने तो प्रकल्प सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण करायचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. सगळ्याच दृष्टीने ती ऐतिहासिक गोष्ट. वरिष्ठांकडून मला विचारण्यात आले की मला तेथे असल्या प्रचंड विरोधात जाऊन काम करायला आवडेल का वगैरे वगैरे… 

मला या विषयावर खूप विचार करावा लागला. आम जनतेचा जरी एक विचार असला तरी स्वतः अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायची ही माझ्या मनाची स्वतंत्र विचारांची एक बैठक, मण मी ह्या विषयावरील जितकी शास्त्रशुद्ध माहिती मिळविता येईल, ती दिवसरात्र वाचून, त्या विषयातील तज्ज्ञांना भेटून माझ्या मनातील सर्व शंकांना धुऊन काढले. तेव्हा कोठे मनाचे समाधान झाले. सॅनफ्रँन्सिस्कोतील, माझी खास जवळची मंडळी, निसर्गप्रेमी, संगीतकार, चित्रकार, अशाच व्यवसायांतील होती. परंतु आता माझ्या ह्या निर्णयामुळे आमच्यात खूप खूप चर्चा झाल्या. त्यातून माझे विचार छानच तपासले गेले. त्यानंतर यातील बरीच मंडळी, आपली विरोधी भूमिका बदलून मला तेथे भेटायला आली. 

माझी ठाम झालेली भूमिका थोडक्यात अशी होती. जगातल्या आधुनिक सुखसोयींचा उपभोग घेत, विमानाने जगभर भटकत, पोकळ भाषणांची वृष्टी करणारे निसर्गप्रेमी मला आयुष्यात खूप भेटले आहेत. जगातील लोकसंख्या जशी वाढते, तशी ऊर्जा वापरण्याची भूकही प्रचंड गतीने वाढते आहे. त्यामुळे ही भूक शमविली तरी पाहिजे किंवा तिला आळा तरी घातला पाहिजे. त्यासाठी जे जे प्रकल्प उभारले पाहिजेत, त्यांतून निसर्गाला व मानवजातीला धोका पोहोचता कामा नये अशा तंत्रज्ञानाच्या आधाराने ह्या प्रकल्पात सुधारणा केल्या पाहिजेत. तसे सरकारने कडक कायदे केले पाहिजेत व त्यांचा अंमल योग्य नियंत्रण ठेवून केला पाहिजे.

वर्तमानपत्रांत नाव येण्यासाठी, स्वतःचे उद्दिष्ट साधणारी भोंदू माणसे जेव्हा वावटे हलवून, निदर्शने करून, हवेत विरघळणारी निसर्गप्रेमविषयक पोकळ भाषणे देणारे माणसे दिसतात, तेव्हा त्यातून सामाजिक विडंबन दिसून हसू येतं. 

त्यामुळे माझी अशी भूमिका होती की आतून काम करताना डोळ्यांत तेल घालून जागृत राहायचे. धोकादायक गोष्टी टाळण्यासाठी ज्या सुधारणा लागतात, त्या योग्य वरिष्ठांच्या लक्षात आणून करवून घ्यायच्या. ह्या विचारांची मंडळी कंपनीत वाढीला असल्यामुळे कंपनीला सरळ मार्गाने जावेच लागते नाहीतर टीव्ही मिडियातून ते भांडं लगेच फुटतं. अर्थात मी अमेरिकेतील माझ्या कामाबद्दल म्हणते आहे. भ्रष्टाचारी देशांत, शहरातील लोकांना व निसर्गाला अतिशय हानिकारक असा काळा धूर सोडत जाणाऱ्या ह्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जात नाही, तर मोठ्या प्रकल्पांकडे सरकार काय लक्ष देणार? एकाचवेळी धरणीकंप, आग, चक्रीवादळ होत असताना वरून 747 बोईंग विमान जर कोसळले, तर त्यावेळी तुला कोठे असलेले आवडेल असा प्रश्न मला जर कोणी विचारला तर त्याचे उत्तर असे की अमेरिकेत, बेक्टेल ह्या कंपनीने बांधलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅन्टमधील, अणुभट्टी असणाऱ्या कन्टेन्मेन्ट बिल्डिंगमध्ये. माझ्या कामाच्या अनुभवातून, ह्या सर्व तंत्रज्ञानाच्या आधाराने मी ठामपणे सांगू शकते की अशा भयानक प्रसंगावेळीसुद्धा मला तेथे सर्वात सुरक्षित वाटेल. बऱ्याच देशांना कोळसा वापरून प्रकल्प बांधणे स्वस्तात पडत असेल, तरी सल्फर ओकणारे हे प्रकल्प निसर्गाला , मानवजातीला खुपच धोका देणारे आहेत, न्युक्लिअर वेस्ट ही कशा रीतीने हाताळावी हाही एक मोठा प्रश्न आहे. रसायन प्रकल्प पाणी किती दूषित करतात हाही मोठा प्रश्न आहे. ह्याचा अर्थ असा की प्रत्येक देशाने हे सर्व प्रश्न सोडविण्यास झटायला पाहिजेच, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की निदर्शने करुन हे सर्व प्रकल्प बंद पाडावे. कारण जंगलातील झाडे तोडून, ती जाळून, त्यावर कंदमुळे शिजविणारी माणसेही निसर्गाचा समतोलपणा बिघडवत असतातच. तर प्रत्येक कृती करताना माझ्या आजूबाजूच्या वातावरणावर त्याचा काय परिणाम होईल हा विचार मी माझ्या मनात तरी जागृत ठेवते . साधे उदाहरण, मला जर मोटार वापरावी लागणार, तर त्यात मी पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही अशी यंत्रणा बसविण्यावर जास्त खर्च करते.

तर बदलीच्या आधी झालेल्या बऱ्याच चर्चातून मी हे विचार मांडत गेले. सांगायचा आनंद म्हणजे, या सर्व वादसंवादांमुळे, बरेच जण आपल्या वर्तुळातून व स्वतःच्या जीवनात बदल घडवत गेले. ह्या वर्षी, भारतात मला एक छान अनुभव आला. प्रथमेश, अदिती, शक्ती, लक्ष्मी यांसारख्या छोट्या मंडळींनी मला सांगितले की ह्या दिवाळीत त्यांनी एकही पैसा फटाक्यांवर खर्च केला नाही व एकही फटाका वाजविला नाही. याचे कारण, ह्या मुलांना, लहान मुलांना फटाके बनविण्याचे धोक्याचे काम करावे लागते मंजूर नाही. त्या फटाक्यांच्या आवाजाने शांतता भग्न होते तेही मंजूर नाही. त्यामुळे धूर निर्माण होऊन हवा खराब होते तेही मंजूर नाही, इतक्या लहान मुलांना खायला वगैरे नसताना, आपल्या आईवडिलांचे कष्टाने मिळविलेले पैसे फटाके जाळून फुकट घालविणे तर मुळीच मंजूर नाही. असा निग्रह लाखो मुलांनी वर्षानुवर्षे केला, तर फटाक्यांच्या व्यवसायावर परिणाम होईलच. 

तसेच वाढत्या लोकसंख्येची, गावा- गावांतून ऊर्जेची भूक वाढत चालली असेल तर ती निर्माण करण्याची आवश्यकता आहेच. त्यातल्या त्यात कमी धोक्याचा, पर्यावरणाशी निगडित असेल असा मार्ग स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा त्यातील तंत्रज्ञान व बांधकाम सुधारण्यासाठी मी आतून काम करायचे ठरवते. 

आमची ही कन्स्ट्रक्शन साईट अविला बीचवरील फाटकापासून आठ मैल आत होती. सर्वांच्या कामाला सुरुवात सात वाजता व्हायची. त्याच्या आधी अर्धा तास मिटींग आम्हा अधिकाऱ्यांची होती. काम इतके होते की घरी जाईपर्यंत रात्रीचे दहा वाजून जायचे, काम अतिशय कटकटीचे व डोक्याला त्रासाचे होते. ह्या प्रोजेक्टवर वृत्तपत्रात व टीव्हीवर बातमी दररोजच. त्यामुळे निदर्शनांचाही त्रास भरपूर. एकदा तर आम्ही सर्व आत इतके अडकलो होतो की हेलिकॉप्टरने आमची सुटका करणार होते. एवढ्यात सरकारी पोलिस मदतीला आले. मला एका रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम करायला निमंत्रण आले, परंतु मी या प्रकल्पावर काम करते हे कळल्यावर , त्यांची काळजी खूप वाढली. मी त्यांना नकार देऊन त्यांची काळजी दूर केली. कारण बेक्टेलने केलेल्या कामावर माझा विश्वास होता व प्रदूषणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प खूपच काळजीपूर्वक आखला होता आणि सुरक्षितताही अव्वल दर्जाची होती. अर्थात मानवाने बनविलेल्या गोष्टीत चुकीने अपघात होण्याची शक्यता असते , परंतु हा प्रकल्प रशियातील चर्नोबाईल कधीच बनणार नाहीत याची मला खात्री वाटली. 

हे फारच निसर्गरम्य ठिकाण. प्रकल्प डोंगराच्या कुशीत दडलेला व एका बाजूने प्रशांत महासागराचे निळे निळे पाणी सुंदर सुंदर खडकांवरून लहरत असे. एक अजस्र खडक प्रचंड सिंह विराजमान झाल्यासारखा राजविंडा दिसे व त्याच्याच काही अंतरावर दुसरा खडक प्रचंड हत्तीसारखा झुलत असल्यासारखा शोभिवंत दिसे. एकदा तर मला दोन कमानी एकमेकांना जोडल्यासारखी दोन इंद्रधनुष्ये दिसली. माझ्या सबंध आयुष्यात असे सुंदर दृश्य मी पहिल्यांदाच पाहत होते, परत पाहीन असे वाटत नाही. 

थंडीच्या दिवसांत अलास्काहून मेक्सिकोला व गरमीच्या दिवसांत मेक्सिकोहून अलास्काला, असा प्रवास देवमासे (कॅलिफोर्निया ग्रे व्हेल्स) करायचे. ह्या राखाडी रंगाच्या प्रचंड देवमाशांचे कळपच्या कळप बघत राहण्याचा आम्हा सर्वांना छंदच लागला. छोटे छोटे बच्चे देवमासे आपल्या आईबरोबर उंच उड्या मारत, फुसकारून पाण्याची कारंजी उधळत, उन्हात चमकत दिमाखाने जायचे नुसत्या आठवणींनीही माझे मन आनंदाने बहरुन उठते. आमच्या सकाळच्या मिटिंगच्या ऑफिसच्या खिडकीतून हे दृश्य सर्व सहजपणे दिसे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन मी खिडकीजवळची जागा पकडायला कधीच चुकले नाही. 

परंतु ह्या प्रकल्पावर, कामात ताणतणाव फारच वाढत होता. अजून डोके दुखायचे व बेशुद्ध पडण्याचा प्रकार पूर्णपणे बंद झाला नव्हताच. म्हणून मी स्ट्रेस मॅनेजमेंट वर एक कोर्स पूर्ण केला. कामात जरी ताणतणाव असला, तरी स्वतःच्या प्रकृतीवर परिणाम कसा होऊ ध्यायचा नाही, हे आत्मसात करायला हा कोर्स खूपच उपयुक्त ठरला. हाताखाली बरेच इंजिनियर काम करीत होते, त्यात एका मध्यमवयीन भारतीय इंजिनियरची भरती झाली. माझ्या हेल्मेटवरचे ‘निलु’ नाव वाचून तो म्हणाला, ‘हे नाव भारतीय वाटतं?’, मी म्हणाले, ‘हो, कारण माझा जन्मही भारतातच झाला. तर त्यावर तो उद्गारला, ‘हो , परंतु तू भारतीय वाटत नाहीस. कारण तू दागिने वगैरे काहीच घालत नाहीस.’ त्यावर मी हसून म्हणाले, हया प्रकल्पावर गळ्यात चेन वगैरे दागिने न घालण्याचा नियम तुम्हाला माहीत असेलच. नियमात बसतील असेच कपडे घालायचे असतात, त्यावर तो जोराने म्हणाला, ‘हो, परंतु तू भारतीय व त्यातून हिंदू मुळीच वाटत नाहीस.’ ह्या माणसाबरोबर जास्त बोलण्यात अर्थ नाही हे ओळखून मी म्हटले, ‘बरोबर, कारण भी विश्व नागरिक असून, मी कोणत्याही धर्माच्या बंधनात अडकलेली नाही.’
मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागले. 

परंतु आपल्याहून वयाने लहान असलेल्या या भारतीय बाईच्या हाताखाली काम करणे त्याला फारच जड वाटू लागले. इतके की शेवटी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारायला गेला की हिला सर्वांवरची अधिकारी म्हणून का निवडली, माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी बरेच वर्षे मेहनत करून मिळविलेले ज्ञान व अनुभव त्याला ऐकवून त्याचे तोंड बंद करून टाकले. परंतु त्याचे कामात लक्ष लागेना. त्याच्या चुका बऱ्याच होऊ लागल्या . शेवटी मी विचार केला की माझ्या हाताखालच्या इतर अमेरिकन इंजिनिअर्सना वागविते तसेच त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून, शांतपणे त्याच्या चुका समजावून द्याव्या, तेव्हा तो तारस्वरात ओरडला, 
‘मी पुरुष आहे. तुझ्याहून वयाने मोठा आहे . इंजिनियर आहे. तू मला माझ्या चुका काय सांगणार?’ मी ठामपणे आवाज न चढविता उद्गारले, ‘मी तुझी अधिकारी आहे. माझ्या हातातले कागद तुमच्या चुका स्पष्ट दाखवीत आहेत. चांगले काम करायला शिका, नाहीतर बॅगा बांधून सॅनफ्रँन्सिसकोला परत जा. एक लक्षात ठेवा. तेथे तुमच्यासाठी कोणतीही कामे वाट पाहात नाहीत. जोपर्यंत माझ्या ग्रुपमध्ये आहात, तोपर्यंत इथल्या कामाची शिस्त पाळलीच पाहिजे.’

भिंतीला कान असतात हे खरं. ही गोष्ट वणव्यासारखी पसरली. त्यामुळे माझा दरारा वाढला व तो मनुष्य खूप बरं काम करू लागला. परंतु रक्तात भिनलेला त्याचा उर्मटपणा तसाच राहिला. पुरुषप्रधान कंपनीत बाई म्हणून बस्तान बसवण्यात मला खूपच शक्ती खर्च करावी लागली होती. परंतु भारतीय माणूस मला असा त्रास देईल असे मला वाटले नव्हते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी बरेच तरुण भारतीय इंजिनिअर्स व अरब इंजिनियर्स माझ्या हाताखाली काम करून गेले. परंतु ह्या मुलांकडून मला बाई म्हणून कधीच त्रास झाला नाही. मग हा जुन्या पिढीचा बुरसटपणा होता का? काही असो, मला नवीन पिढीबद्दल खूपच आशा वाटते.

(क्रमशः)

Tags: निलू गव्हाणकर पर्यावरण nilu Gavhankar Nature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके