डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरं म्हणजे या शहराच्या परिसरातील काळीभोर लुसलुशीत माती सुपीक म्हणून प्रसिद्ध, परंतु शेतीत पैसा नाही म्हणून शेती नष्ट करून त्यावर मोठमोठे शॉपिंग मॉल व सिनेमागृहं बांधली गेली. शांत, सुरेख, टुमदार गाव आता शहर बनलं होतं.

सॅन सुईस ओविस्पो हे टुमदार युनिव्हर्सिटीच्या निगडित असलेलं सुरेख गाव, माझ्या कामाच्या प्रकल्पापासून साधारण तीस कि.मी. दूर. परंतु ह्या गावाशी माझ्या खूप खूप आठवणी विलगून होत्या. 1971 साली या गावातील कोर्ट हाउसमध्ये रजिस्टर पद्धतीनं माझं लग्न झालं होतं. कॅलपॉली युनिव्हर्सिटीतून माझा नवरा इंजिनिअर झाला होता. कॅम्पसच्या कॅफेटेरियात बसून खूप वेळा मी माझ्या नवऱ्याचा कॅल्क्युलस व इंजिनिअरिंगचा अभ्यास करून दिला होता. प्रेमाच्या नावाखाली केलेली अयोग्य मदत.

बदली झाल्यावर, जागा मिळेपर्यंत मी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये राहणार होते. पहिल्याच दिवशी पोचल्या पोचल्या मी खोलीत सामान टाकलं व युनिव्हर्सिटीला आणि गावाला चक्कर मारली. खूप खूप वर्षांत जुन्या गोष्टींचा विचार केला नव्हता. बरंच काही विसरून गेले होते. या तेरा वर्षांत मी इतकी बदलले होते, तसंच गावही बदललं होतं. तिथली ओळखीची माणसंही ते गाव सोडून गेली होती. जुनी छोटी छोटी घरं पाडली जाऊन तेथे उंच इमारती बांधल्या गेल्या होत्या. युनिव्हर्सिटीच्या लोकसंख्येला पुरेशी जागा व्हावी म्हणून एकाला एक लागून अपार्टमेंटच्या इमारती विस्तारलेल्या होत्या. प्रत्येक बिल्डिंगला लागून स्विमिंग पूल रुबाबात लहरत होते.

खरं म्हणजे या शहराच्या परिसरातील काळीभोर लुसलुशीत माती सुपीक म्हणून प्रसिद्ध. परंतु शेतीत पैसा नाही. त्यामुळे ती सर्व शेती नष्ट होऊन त्यावर मोठमोठे शॉपिंग मॉल व सिमेमागृहे बांधली गेली होती. गावाची लोकसंख्या दुपटीने वाढली होती. तितकीच रहदारी वाढली होती. शांत, सुरेख टुमदार गाव आता शहर बनलं होतं. परंतु त्या गावाच्या चहू बाजूंनी वेढलेल्या डोंगरांनी शहराचं सौंदर्य बरंच राखलं होतं. प्रगती द्या नावाखाली हा जो बदल घडला होता, त्याला थांबविणं कोणाला शक्य आहे? 1971 साली हे गाव मी सोडलं, जानेवारी 1984 मध्ये परत आले ती नव्यानं पाहायची दृष्टी घेऊनच ना!

या शहराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील हे पहिलं शहर. येथे मोटारीच्या रहदारीच्या रस्त्यावर सायकल चालविणाऱ्या लोकांसाठी खास विभाग ठेवले होते. बहुतेक विद्यार्थिवर्ग कॅम्पसवर सायकलीनेच जात. प्रदूषणविरोधी यंत्रणा मोटारीवर कारयदेशीररीत्या बसविली असली, तरी ह्या सायकलीमुळे मोटारीची वर्दळ कमी. शिवाय त्यांचा स्वतःचा विभाग वेगळा असल्यामुळे अपघात होत नव्हते. एकूण वाढत्या शहराचीही आखणी नीट विचार करून रेखीव व अतिशय सुबक करण्यामागे विचारवंत लोकांचं नियोजन होतं.

दोन बेडरूम्स असलेलं, प्रशस्त असं छान अपार्टमेंट मला शांत ठिकाणी मिळालं. ते ‘मडाना इन’ ह्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या जवळच होतं. हे हॉटेल त्याच्या खास वैशिष्ट्यामुळे एक प्रेक्षणीय स्थळ बनल्यामुळे दूरदुरचे लोक तेथे यायचे. श्री. मडानांच्या मालकीचा हा लहानसा डोंगर. या डोंगरात पूर्वी मार्बलच्या खाणी होत्या. त्यामुळे श्री. मडाना हे धनाढ्य श्रीमंत झाले. त्या खाणी जेव्हा बंद पडल्या, तेव्हा तेथल्या खडकांच्या गुहा वापरून त्यावर हे पसरलेलं दुमजली असं हॉटेल बांधलं गेलं, या हॉटेलचा विस्तार प्रचंड. याचं वैशिष्ट्य म्हणजे एक खोली दुसऱ्या खोलीसारखी नाही. प्रत्येक खोलीची सजावट वेगळी. मी या हॉटेलमध्ये ‘फ्लिन्स्टोन’ ह्या खोलीत तीन दिवस राहिते होते. अर्थात फ्लिन्स्टोन या प्रसिद्ध कार्टूनच्यावर याची सजावट आधारित. परंतु सजावटीचा मामला राजेशाही. पलंग इतका मोठा की त्यावर सहा माणसं आरामात झोपतील. तो पलंग एका झाडाच्या छायेत विसावला होता. त्या झाडावर बारीक बारीक पांढरे दिवे चांदण्यासारखे चमकत होते.

गुबगुबीत कार्पेट की, त्यात पाय खोलवर रुततील. हिरव्या रंगाच्या वेलवेटचे पडदे. गुहेतील खोलीला शोभेल अशी गुहेतील बाथरूम. अंघोळीचे गरम पाणी भिंतीतून झऱ्यासारखं वाहायचं. ‘ब्राइडल स्वीट’ या दुसऱ्या गुहेतील खोलीच्या बाथरूममध्ये अक्षरशः धबधबा व त्याभोवती गार्डन केलं होतं. ह्या हॉटेलच्या मुख्य कॉफी हाउसमध्ये पुरुषांची टॉयलेटही अशीच वेगळी होती. त्यात पाणी कुठून येतं व कुठून जातं हेच समजायचं नाही. तर ही टॉयलेट बघायला लोकांची गर्दी तर काय बघायलाच नको. त्या टॉयलेटवरील पोस्टकार्डचा खपही जबरदस्त. सगळाच वेडेपणाच! आयुष्यात क्षणिक मजा आणणारा!

माझ्या इथल्या वास्तव्यात दर वीकएन्डला कोणीतरी पाहुणे माझ्याकडे राहायला यायचेच. मोरो बे हे सॅन लुईस ओविस्पोजवळील समुद्राच्या काठावर विसावलेलं सुंदर गाव, ह्या गावात घरांपेक्षा मोटेल हॉटेलंच जास्त होती. कारण हेही एक प्रेक्षणीय स्थळ. मोरो बेचा प्रचंड खडक हा जिब्रॉल्टरसारखा प्रसिद्ध. माझ्या लग्नानंतर आम्ही ह्या गावात काही महिने राहिलो होतो, तेव्हा माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून तो प्रचंड खडक, निळाभोर प्रशांत महासागर व शोभिवंत सूर्यास्त दिसायचा, छातीवर दगडाने शिंपले फोडून खाणारे, मजेशीर ‘ऑटर’ प्राणी व ‘सील्स’ ह्या खडकाजवळील समुद्रात सदा धिंगाणा घालत असतच. मोरो बे गावाबद्दल वाटलेलं प्रेम अजून माझ्या मनात ताजं टवटवीत आहे.

माझ्या पाहुण्यांना मी ह्या गावात एकदा जेवायला घेऊन जायचेच. मोरो बेहून उत्तरेला गेलं की सॅन सिमियन बीच. जेथे रॅन्डॉल्फ हर्स्ट या माणसानं डोंगराच्या माथ्यावर बांधलेला प्रचंड ‘हर्स्ट कॅसल’. जगातून कोठून कोठून लोक हे प्रेक्षणीय स्थळ बघायला यायचे. इथल्या बागा, फुलं, सुंदर सुंदर वस्तूंचा साठा सर्वच शोभिवंत. माझे आवडते ते स्विमिंग पूल, बाहेरच्याच आर्किटेक्चर ग्रीक वास्तुशास्त्रावर आधारलेलं, आतला पूल जरा काळोखी परंतु खऱ्या सोन्याच्या पानांनी मढवलेला. काळोखी म्हणून नोकर वापरायचे म्हणे.

सॅन सिमियन बीच व तिथलं छोटं गाव, एलिझाबेथ टेलर व रिचर्ड बर्टनच्या ‘सॅन्डपाइपर’ या सिनेमामुळे त्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात होतं. इथं जाताना रस्त्यात एक हार्मनीत म्हणून अप्रतिम सुंदर छोटं गाव होतं. त्या गावाची लोकसंख्या होती फक्त 25. माझ्या एका मैत्रिणीचं लग्न तेथेच झाले. इतक्या निसर्गरम्य ठिकाणी, फुलांच्या सान्निध्यात , फक्त जवळच्या लोकांना निमंत्रण म्हणजे आम्ही वीस जणं. साधा परंतु सुरेख समारंभ मनात ठासून गेला. सॅन लुइस ओविस्पोमध्ये दर गुरुवारी बाजारपेठ भरायची. हे दृश्यही तसं अमेरिकेत विरळच. आजूबाजूच्या भागातले शेतकरी त्यांच्या गाड्या भरभरून भाज्या, फळे वगैरे घेऊन यायचे. त्या ताज्या ताज्या व स्वस्त वस्तू घ्यायला सबंध शहर तेथे लोटायचं. लहानसा मेळावाच जणू. कॉलेजचे पोरे पोरींना बघायला यायचे. पोरीही नटूनथटून मिरवायला यायच्या.

रस्त्यात संगीतकारांचे छोटे छोटे ग्रुप संगीत वाजवायचे. लोक टाळ्या वाजवून त्यांना भरपूर प्रतिसाद देऊन पैसे देऊन जायचे. काही काही संगीत तर इतके सुंदर असे की लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावरच नाचायचे. छोट्या छोट्या गाड्यांवर बार्बेक्यू जेवण बनविलं जायचं. त्याचा सुगंध मैलोन्मैल पसरायचा. सर्व स्वच्छ. कोठेही कचरा वा सांडपाणी नाही. गोंधळ नाही. मारामारी-आरडाओरडा नाही. सबंध वातावरणात एक प्रकारची जादू व मजा. परंतु माझ्या कामाच्या कटकटीत मी इतके गुंतले होते की खूप वेळा उशीर झाल्यामुळे माझा गुरुवारचा बाजार चुके. माझी मैत्रीण मोनिका, आयोवा स्टेटहून आलेली, सदोदित माझ्याबरोबर असे. ती सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंजिनिअर होती. तिने माझ्या अपार्टमेंटजवळच तिचं अपार्टमेंट घेतलं होतं. ती बेक्वेलमध्ये ज्या दिवशी कामाला लागली, त्या दिवसापासून मी तिला ओळखत होते. जरी मी तिच्याहून वयाने 12 वर्षांनी मोठी असले तरी आमची मैत्री जमली. ती मी दोघींनी अक्षरशः याद्या करून अरोयो ग्रॅन्डे ह्या गावापासून ते मोरो बे गावापर्यंत प्रत्येक रेस्टॉरंट पालथे घातले. अर्थात या छंदात आम्ही दोघींनी भरपूर वजनेही वाढवून घेतली. मोनिकाचे वडील तिच्या लहानपणीच वारल्यामुळे, व ती सर्वांत मोठी असल्यामुळे धाकट्या तीन बहिणींवर तिचं खूप लक्ष होतं. तिची एक बहीण खूप फटाकडी होती. तिचं शाळेवरचं लक्ष उडालं तसं मोनिकाने तिला स्वतःकडे राहायला आणलं. मोनिकाची बदली झाली तोपर्यंत ती मुलगी मार्गाला लागली होती. मोनिकामुळे ती माझीही मैत्रीण बनून गेलेली होती. ती पुढे सिव्हिल इंजिनिअर झाली व तिचा पहिला जॉब, आमच्या प्रकल्पावर मीच तिला मिळवून दिला. पुढे तिचं अतिशय हुशार, देखण्या आर्किटेक्टशी लग्न झालं. मोनिकाच्या जीवनात त्याच वेळी एक छान मुलगा आला. त्यालाही तिने प्रोत्साहन देऊन शिकविलं. तो टेक्सासच्या ए अ‍ॅन्ड एम युनिव्हर्सिटीतून हायेस्ट ऑनर्स मिळवून इंजिनिअर झाला व नंतर त्यांनी लग्न केलं व ते सुखात आहेत. अशी ती गोड व चांगली मुलगी.

माझ्या इतक्या भ्रमंतीतून आम्ही वर्षातून एकदा तरी भेटतोच. बघता बघता अठरा महिने गेलेसुद्धा. मी ज्या कामासाठी आले होते ते संपलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला विचारले की स्पेस प्रोग्रॅमवर काम करायला आवडेल का? मी एका सेकंदाचाही विचार न करता पटकन हो म्हणून टाकलं. बॅन्डनबर्ग एअरफोर्स बेसला मी राहत होते त्यापासून 120 किमी दूर. अतिशय सुंदर भाग, तसा माझ्या परिचयाचा. 74 सालापासून. सॅनफ्रान्सिस्कोतील पाचव्या रस्त्यावर राहत असताना परममित्र झालेला फ्रेड डॅनिअल्सन तेथे 'लॉकीड' ह्या जगप्रसिद्ध कंपनीत काम करत असल्यामुळे, या स्पेस प्रोग्रॅमची माहिती होतीच.

मी सॅन लुईस ओविस्पोला आल्यापासून त्याच्या बायकोची- सिल्व्हियाची- फार घनिष्ठ मैत्री झाली होती. सिल्व्हिया ही पेरू देशातली. फ्रेडने 66 साली नेपाळमध्ये येऊन पीस कोअरसाठी दोन वर्षे काम केलं होतं. त्यामुळे त्याचा पिंडच वेगळा. त्याच्याकडे भारतावरची पुस्तके इतकी होती की माझे वडील त्याला भेटून खूश व्हायचे. फ्रेडने केलेल्या भज्यांना व डाळीलासुद्धा मस्त चव होती. आम्ही एकमेकांचे अगदी जीवश्चकंठश्च मित्रमैत्रिणी असल्यामुळे स्पेस प्रोग्रॅमचा मला खूपच परिचय. विशेष करून अंतराळयानाबद्दल अतिशय आकर्षण असल्यामुळे खूप खूप आनंद झाला. माझ्या एम.बी.ए.च्या अभ्यासाला गेले अठरा महिने खंड पडला होता. कारण तशी सोय सॅन सुइस ओविस्पोमध्ये नव्हती. बॅन्डनबर्ग एअरफोर्स बेसवर गोल्डन गेट युनिव्हर्सिटीची शाखा होतीच. शिवाय सॅन्टाबार्बरा युनिव्हर्सिटीची शाखा होतीच. शिवाय सॅन्टाबार्बरा युनिव्हर्सिटी तेथून फक्त 90 किमी दूर होती.

परत एम.बी.ए.चा अभ्यास सुरू करता येईल या विचाराने मी खूश झाले. या अठरा महिन्यांत ह्या कामावर खूप मेहनत घ्यावी लागली होती. प्रकृतीवर नाही म्हटले तरी परिणाम होतच होता. अनुभवांचं विश्व वाढत चाललं होतं. कंपनीत जम छानच बसला होता. आर्थिक परिस्थिती छानच सुधारली होती. परत छोटे प्रवास- बहामा, न्यू ऑर्टियन्स वगैरे सुरू झाले होते. त्यामुळे परत कामात बदली होणार ह्याचा एक जबरदस्त उत्साह आला.

सॅन ओविस्पो हे फक्त 120 किमी दूर असल्यामुळे नव्याने जोडलेले लोकही फार दूर जाणार नव्हते. येऊन-जाऊन संपर्क राहणारच होता. मोनिकाची बहीण अभ्यासात गुंतली होती, तरी येऊन-जाऊन तिच्या फेऱ्या असायच्याच. सामानाची बांधाबांध सुरू झाली. मी ‘लाम्पोक’ ह्या छोट्याशा गावाच्या दिशेने मार्ग पकडला. फ्रेड आणि सिल्व्हिया आतुरतेने माझ्या आगमनाची वाट बघतच होते. ते स्वागतही जबरदस्त होतं. आयुष्याला परत नव्याने सुरुवात. अनुभवाचं नवीन दालन खुलं झालं.

(क्रमशः)

Tags: टुमदार गाव निसर्गरम्य सॅन लुइस ओविस्पो प्रवासवर्णन beautiful village scienic san luice ovospo travelogue weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके