डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कर्तुकी : निसर्गाची, माणसांची

एका बाजूला तांबडा, पांढरा, निळा, गुलाबी या रंगांची मधुर वासाची फुलं मैलोन्मैल रंगदार गालिचासारखी पसरलेली, तर त्याच गावात दुसरीकडे जमिनीखालच्या अवाढव्य तळघरातून कवाड उघडून अंतराळात झेपावणारी क्षेपणास्त्रे. निसर्ग आणि माणूस यांच्या कर्तृत्वाचे हे अनोखे आविष्कार.

लाम्पोक हे डोंगरांच्या कुशीत विसावलेलं टुमदार गाव. त्या गावातील सुपीक जमीन, समुद्रावरून येणारी हवा व डोंगरांची ऊब मिळवून, त-हेत-हेची फुले जोमात बहरून यायची. त्यामुळे ‘व्हर्पी’सारख्या नामवंत कंपनीनं फुलांच्या बिया बनविण्याचे उद्योगधंदे ह्या गावात उभारून बस्तान ठोकलं होतं. वर्षाचे कमीतकमी आठ महिने इथे फुले मैलोन्‌मैल रंगदार गालिचासारखी पसरलेली असायची. जुलैच्या पहिल्या दोन-तीन आठवड्यांत हा बहर फारच दाट व्हायचा. 'स्वीट पी' या फुलांचा मधुर वास वातावरण धुंद करायचा. त्यांच्यामध्ये तांबडा, पांढरा, निळा व गुलाबी रंग प्रामुख्याने. चार जुलैच्या सुट्टीत मी ह्या फुलांना बघण्यासाठी वर्षानुवर्षे लाम्पोकला भेट द्यायची. एखाद्या वेड्या मुलीसारखी मी मळ्यातून, तासन्‌तास या फुलांमध्ये धावत हुंदडतच असायची! माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या ह्या बालिश वेडेपणाचं फार हसू यायचं.

आता तर काय, या गावातच मी राहायला आले. मळ्यांमधील काम करणारे लोक मला आता ओळखायला लागले होते. ‘आली ही फुलवेडी’ म्हणून हसून ते अभिवादन करायचे, डोंगरांवर नवीन घरं बांधली जात होती. त्यातलं सर्वांत शेवटचं घर मी विकत घेतलं. नवंकोरं, बैठं, कौलारू, तीन बेडरूम्सचं. घराच्या बहुतेक बाजूंनी भिंतीऐवजी मोठमोठ्‌या काचांच्या खिडक्या, त्यामुळे घरात भरपूर उजेड. त्या नव्या कोऱ्या घराला एक छानच वास! माझ्या स्वयंपाकघराच्या व डायनिंगरूमच्या प्रचंड काचांतून मला दरीत वसलेलं टुमदार गाव व मैलोन्‌मैल पसरलेले रंगदार फुलांचे गालिचे दिसत.

माझा मोठा भाऊ (पीट गव्हाणकर) तर म्हणायचा, ‘तुला स्वतःची बाग असण्याचं कारणच नाही, तू तर नंदनवनात राहतेस. परंतु मी माझ्या घराभोवती छोटी बाग केलीय, लहानपणीची आठवण म्हणून कृष्णकमळाचा वेल व लाल रंगाची जास्वंदही लावली. माझ्या घरानंतर गावाची वसाहत नव्हती. नुसतेच डोंगर. त्यामुळे रात्री कायोटींची (लाडग्यांची जात) कोल्हेकुई गुंजत राहायची. जंगलात राहिल्यासारखा आभास माझ्या शहरी मनाला आवडायचा. तरीही सुरुवातीला कोल्हेकुई अगदी घराच्या आवारात आली की छातीत थोडे धकधक व्हायचं, ती धकधक भीतीची नसे, तर रोमांचकारी असे. माझ्या घराजवळ पड़ीक, निळा रंग उडून आता राखाडी रंगाचं दिसणारं एक जुनं घर होतं.

काळ्या लोकांनी त्या घराला त्यांच्या बॅप्टिस्ट धर्माचं चर्च बनविलं होतं. दर रविवारी सकाळी त्या चर्चमधून दमदार ‘गॉस्पेल’ हे धार्मिक संगीत सुरू व्हायचं. ह्या पद्धतीचं संगीत माझं खास आवडीचं असल्यामुळे मी ते सॅनन्सिस्कोत, रेडिओवर नेहमी ऐकायचे. इथं तर, माझ्या घरात त्या चर्चमधून थेट पोचत होतं. त्यामुळे रविवारच्या सकाळी, छान रेशमी दुलईत आळशासारखं लोळत ह्या संगीताचा मी भरपूर आस्वाद घ्यायची. माझ्या हॉलच्या खिडकीतून व बागेतून दूरवर, चुन्याने फासला असावा असा पांढरा डोंगर मला दिसे.

फार कुतूहल वाटलं, म्हणून मी तेथे शोध घेत गेले. 'डायटिमिशन अर्थ'- खणून काढण्याची ती खाण होती. तिथल्या मॅनेजरने माझा उत्साह व उत्सुकता बघून एकटीलाच खास टुर देऊन खूप माहिती दिली. खूप खूप लाखो, कोटी वर्षांपूर्वी हा सर्व भाग समुद्राखाली होता. समुद्रातील सूक्ष्म जीव आणि माशांच्या हाडांचे मिश्रण होऊन ही माती बनलेली असते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही माती जगात पाच-सहा ठिकाणी मिळते. या मातीचा उपयोग अ‍ॅस्पीरिनच्या गोळ्यांमध्ये, टूथ पेस्टमध्ये, वॉशिंग मशीनमधील कपड़े धुण्याच्या साबणात वगैरे करण्यात येतो. या सर्व माहितीचा उपयोग मला माझ्या एमबीएच्या अभ्यासातील एक पेपर लिहिण्यासाठीही झाला.

ह्या नवीन घरात, मी परत एकटीनेच राहायला जाणार म्हणून माझ्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली. टेलिफोनवरून त्यांच्या आवाजातच मला ती जाणवली. कारण हेवर्ड ह्या गावात चोरांनी माझ्यावर केलेला जीवघेणा हल्ला त्यांच्या मनात अजून ताजाच होता. हल्ल्याला पाच वर्षे होऊन गेली होती, तरीही प्रकृती तशी पूर्णपणे बरीच नव्हतीच. म्हणून त्यांच्या समाधानासाठी, सबंध घराला इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टिम लावून घेतली. ती चालू असताना, कोणी खिडकी उघडली किंवा दारात कोणी हिंडत असलं की पोलिसांना एका मिनिटात कळायचं. परंतु घरात कसलाच आवाज व्हायचा नाही. एकदा दुपारी बाहेर जाताना मी काहीतरी चूक केली. दोन मिनिटांत माझ्या घरी पोलीस हजर झाले. त्यांची ती कमालीची तत्परता बघून मी चाटच पडले. ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या आईवडिलांनाही, डोंगरावरील घरात मी एकटी राहते ह्यातलं काही वाटेनासं झालं. ह्या घरात एकटी राहण्यामुळे माझ्या मानसिक स्वास्थ्याच्या बैठकीचा धीराचा पाया पोलादी झाला.

सुरुवातीला आमचं काम दररोज बारा तास व कधी कधी आठवड्याचं सातही दिवस चालायचं. त्यामुळे कामगारांना खूपच पैसे मिळू लागले. त्यांतले काही कामगार प्रत्येक आठवड्याला पाच हजार डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळवीत, म्हणजे महिन्याला आठ-नऊ लाख रुपयांइतके. त्यांनी असे पैसे आयुष्यात पाहिले नव्हते. मग त्यांनी ‘पाच हजार’ क्लब सुरू केला व त्याचे टी-शर्ट घालून ते दिमाखाने हिंडायचे. त्या छोट्या गावात पैसा फारच खुळखुळू लागला, तशी बाहेरून येणाऱ्या लोकांची रीघ लागली. काम जसं वाढत गेलं, तशी लोकसंख्या वाढत गेली. लोकांना राहायला मिळणाऱ्या जागा अपुऱ्या पडू लागल्या. फुलांपेक्षा बिल्डिंगमध्ये जास्त पैसे मिळू लागले तसे फुलांचे मळे हळूहळू अदृश्य होऊन तेथे बरीच हॉटेलं व सुखवस्तू महागड्‌या घरांच्या वसाहती निर्माण होऊ लागल्या. ‘व्हर्पी’ कंपनीने महागाई पाहून त्यांचा तळ तेथून हलविला. सिनेमागृहांना नवीन रुपडं देऊन सजविण्यात आलं. दुकानांतून मालाचे ढीगच्या डीग खलास होऊ लागले. दर दोन आठवड्यांत दोन-तीन नवीन रेस्टॉरंट्‌स उघडू लागली. फक्त सहा महिन्यांत होणाऱ्या या गोष्टींचा वेग छाती दडपून टाकणारा होता. 

मी अंतराळक्षेत्रात काम करत असल्यामुळे एअरफोर्सच्या बेसवर कोठेही मुक्तपणे जाण्याचा खास परवानगीचा कागद माझ्या गाडीवर चिकटविला होता. कामाला सुरुवात झाली होती तरी ‘एफबीआय’कडून सगळ्यांत वरच्या दर्जाचा क्लिअरन्स अजून मला मिळाला नव्हता. मी चिनी भाषेचा इतकी वर्षे अभ्यास का करते आहे ह्या कुतूहलाने एफबीआयने फार खोलवर जाऊन माझी पूर्ण चाचणी व तपासणी केली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की मला जगातल्या सगळ्या भाषा, संगीत, संस्कृती व लोकांचा अभ्यास करायला फार आवडतो. एफबीआयची खात्री झाल्यावर, त्यांनी मला सगळ्यांत वरच्या दर्जाचा सिक्युरिटी क्लिअरन्स दिला. ही घटना माझ्या आयुष्यातील महत्त्वाची होती. वॅन्डबर्ग बेस इथून तेथे इतका पसरला होता की एक छोटंसं गाव, तीन दिशांना तीन प्रवेशद्वारं, प्रदेशाद्वारांशी हातात मशीनगन्स घेतलेले पहारेकरी.

कामावर जाताना एकदा प्रवेशद्वार ओलांडलं की मग आठ मैलांचा रस्ता. शांत वातावरण. गावाची रहदारी व गाइड नाही. सगळ्यांच्या वागणुकीला एक कडक शिस्त. रस्ता सपाट आणि समुद्राच्या फार जवळ नाही. तरी लांबून कधीकधी कॅलिफोर्निया ग्रे व्हेल्स (देवमासे) दिसायचे. त्यामुळे या भागाला अविला बीचजवळचं सौंदर्य मला कामावर जाताना दररोज दिसायचं, तसं इथे नसलं तरी वातावरण आल्हादकारकच. मी अंतराळक्षेत्रातील काम करण्याच्या माझ्या संधीमुळे हुरळून गेले होते. किती गोष्टी शिकू आणि किती नको असा प्रश्न पडायचा, कारण मी एक झपाटलेली विद्यार्थिनी बनले होते. अंतराळक्षेत्र म्हणजे जणू स्वप्नच. ते प्रत्यक्षात उतरलं होतं. काम सुरू झाल्याबरोबर तीन आठवड्यांतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझं काम आवडतं व मला बढती मिळाली. त्यामुळे आत्मविश्वास खूपच वाढला. एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग्जना मला पाठविण्यात घेऊ लागलं.आमची ही कंपनी 'अंतराळयान कोलंबिया' उडविण्यासाठी खास यंत्रणा बांधत होती. त्या ठिकाणाचं महत्त्व अशासाठी होतं, कारण पोलर ऑर्थिटमध्ये प्रवेश थेट होता. त्या वेळी रशियाशी चाललेल्या शीतयुद्धाच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशयच महत्त्वाची होती.

एकदा मी अंतराळयान जिथून उठणार, तेथील सहामजली पोकळ सांगाड्यासारख्या इमारतीत माझ्या कामासाठी जात असताना एकदम वरून एक कामगार, त्याचा पाय घसरून पडला. हा कामगार दुसऱ्या कंपनीसाठी काम करत होता व त्याने कमरेला सुरक्षेचा पट्टा बांधला नव्हता. माझ्या कंपनीचे म्हणजे बेक्टेलचे सुरक्षितता पाळण्याचे नियम फार कडक आहेत. कोणी मोडले की कामगारांना कामावरून लगेच काढून टाकलं जातं. त्या कठोर नियमांचा मलाही खूप वेळा कंटाळा यायचा व त्रास व्हायचा. परंतु ही घटना पाहिल्यावर बेक्टेलच्या कडक शिस्तीचं महत्त्व समजलं. कारण असा भयानक अपघात अजूनपर्यंत पाहिला नव्हता. अजूनही ती घटना आठवली की माझ्या गळ्यात दाटून येतं.

सॅन लुइस ओविस्पो सोडून लाम्पोकला बदली व्हायच्या अगोदर नुकतीच झालेली गोष्ट. सॅन लुइस ओविस्पोच्या जवळील डोंगरातून प्रचंड वणवा पेटला होता. तो इतका प्रचंड फैलावला की ती दृश्ये सीएनएनच्या बातम्यांमध्ये बघून माझे आईवडील हवालदिल झाले. कारण कोणाच्याही आटोक्यात न येणारा व असा धुमसणारा वणवा कोणालाही घाबरवून टाकणारा होता. हजारो एकरांची अक्षरशः होळी झाली होती. गावातील उष्णताही खूप वाढली होती. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या इंजिनिअरला कामाची फाइल द्यायला म्हणून गेले. त्याच्या घराच्या रस्त्यापलीकडच्या घरापर्यंत वणवा पोहोचला. काड्याच्या पेटीसारखं ते घर एका क्षणात ज्यालांत लपेटून खाक झालं. तेथे मदतीला उभे असलेल्या पोलिसांनी व अग्निशामकांनी माझी गाडी ताबडतोब थांबवून मला घरी जाण्याची आज्ञा दिली. त्यामुळे हा प्रसंग मी ओझरताच पाहिला. माझ्या इंजिनिअरला पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी आधीच नेलं होतं. त्यामुळे या वणव्यात नुकसान खूप झालं तरी कोणीही माणूस मेलं नाही. ते घर भक्षण केल्यावर अग्निदेवाची भूक जणू शमली आणि वणवा थंडावला, आटोक्यात आला. माझ्या घरापासून बरोबर चार मैल दूर! सरकारी नोकरांची कार्यक्षमता कमालीची. 

आई मला नेहमी विचारते की निलू, तू ज्या ज्या कामावर जातेस, ते काम किंवा ते गाव नॅशनल टीव्ही किंवा वर्तमानपत्रांतून कसं येत असतं? त्यामुळे तुझं काय चाललं आहे ते आम्हांला आधीच कळतं, ही गोष्ट मात्र खरी! बेक्टेलमध्ये तेवीस वर्षे काम केलं. खूप कामं अमेरिकेत, काही मेक्सिको, वेनिझुएला, हाँगकाँग, चीनमध्ये केली. प्रत्येक काम ह्या किंवा त्या कारणांमुळे नेहमी पेपरांत नाहीतर नॅशनल टी.व्हीवर! भारतातसुद्धा फक्त चार महिने कामासाठी आले ते एन्रॉनच्या दाभोळ प्रकल्पावर. एन्रॉनबद्दल नंतर कधीतरी सांगेन. असो. त्यामुळे असे अनमोल अनुभव तेवीस वर्षे सतत मिळणं, म्हणजे मी खरोखरच भाग्यवान आहे असे मी समजते. या बेसवर रॉकेट उडविण्याची तळघरं जमिनीखाली वांधली होती. बाहेरून अजिबात पत्ता लागू नये अशी.

आज रॉकेट उडणार अशी बातमी आम्हांला मिळाली की आम्ही ती संधी कधीच चुकवायचो नाही. कधीकधी फार महत्त्वाचे क्षेपणास्त्र उडविणार असले की आम्हांला काम थांबवून घरी पाठविलं जायचं. जमिनीवरची कवाडं एकदम उघडली जाऊन रॉकेट बाणासारखं अंतराळात झेपायचं तेव्हाचा अनुभव, तो क्षण अतिशय थरारून टाकणारा असायचा, अशी उड्डाणं मी माझ्या आयुष्यात एकंदर दहा तरी पाहिली. माणसानं विज्ञानात केलेल्या प्रगतीचं प्रत्यक्षात दर्शन होऊन, त्या अनुभवांनी माझं सामान्य मन भारावून जायचं व सामान्य मेंदू चक्रावून जायचा.

(क्रमश:)

Tags: एफबीआय बेक्टेल क्षेपणास्त्रे अंतराळक्षेत्र अमेरिका लाम्पोक आठवणी fbi bectel missiles space field america lampok memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके