डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सगळ्या जगाला आनंदाने एकत्र जोडणारं माध्यम म्हणजे संगीत! देशोदेशी फिरत, तेथील सुंदर संगीत मी माझ्या मनाच्या कप्प्यात गोळा करीत माझं स्वतःचं जीवन आनंदमय करते.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी टोकियोची प्रेक्षणीय स्थळं पाहायला सुरुवात केली. टोकियोची रेल्वेस्टेशनं बघून मी जाम चकित झाले. प्रत्येक स्टेशनवर कितीतरी मजले आणि प्रत्येक मजल्यावरून वेगवेगळ्या दिशेने सतत धावणाऱ्या गाड्‌या तरी किती! प्रत्येक गाडी बरोबर वेळेवर हजर. दोन सेकंद लवकर नाही किंवा उशिरा नाही, टोकियो शहरातील सबवे सिस्टीमचं जाळं तर इतकं अफाट! हजारोंनी माणसं गाडीत घुसण्यासाठी उभी होती. ती डब्यात शिरती की त्या सर्वांना आत व्यवस्थित ढकलून, दारं व्यवस्थित बंद झाली की नाहीत हे पाहायला रेल्वेने खास ठेवलेली धष्टपुष्ट माणसं ज्यांना ‘पुशर’ म्हणतात.

इतक्या लोकांना गाडीत ढकलायचं आणि कोंबायचं हे काम कठीणच. परंतु इतक्या गर्दीतही धक्काबुक्की नाही, आरडाओरड नाही व बायकांचा विनयभंग करणारे पुरुषी चाळे नाहीत. सगळीकडे कमालीची स्वच्छता. कोठेही कागदाचे कपटे वगैरे पडलेले दिसले की सुटाबुटांतील माणसेही ती घाण उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकणारे दिसले. जागा सर्व लोकांची आहे व ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची... आपली आहे अशी भूमिका असणारा हा एकच देश. स्टेशनवरील तिकीट कलेक्टरने त्याच्या घाईगडबडीतून घेळ काढून ‘अमक्या ठिकाणी, जायची गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते आणि केव्हा येते,’ असे दोन प्रश्न मला जपानी लिपीत लिहून दिले. तो कागद मला माझ्या सबंध प्रवासात खूपच उपयोगी पडला.

रेल्वेस्टेशन म्हणजे प्रचंड शॉपिंग मॉलच होतं. प्रत्येक मजल्यावर तऱ्हेतऱ्हेची दुकानं, गेटमधून मग आतमध्ये प्लॅटफॉर्मवर जायचं. रेस्टॉरंटच्या खिडकीत खाद्यपदार्थ प्लॅस्टिक वापरून केलेले. दिसायला अगदी हुबेहूब, त्यांच्याकडे बोट दाखवून माझं जेवण मागण्याचं काम सोपं झालं. आयुष्यात मी कधी चहा न पिणारी. परंतु चिनी जेवणाबरोबर त्यांचा जास्मिन, ख्रिसॅन्यमम वगैरे कोरा चहा प्यायला आवडू सागलं होतं. म्हटलं, जपानमधील कोरा हिरवा चहा पिऊन बघू या. एका टिवल्पाशा कपामध्ये घोटभर चहा आला. त्याची किंमत होती 480 येन. म्हणजे साडेतीन डॉलर्स. बापरे! त्या वेळी एका डॉलरची किंमत 138 येन. म्हणूनच अमेरिकेत जपानी मोटारींची, कॅमेऱ्यांची, वस्तूंची किंमत खूपच वाढली होती.

जपानमध्ये भात व मासे खूप, परंतु बाकीच्या वस्तू सर्व बाहेरील देशांतून यातात. कॅलिफोर्नियातून मोठमोठ्या बिंग चेरी, सुंदर ऑरेंजेस, टरबूज-खरबूज असा खूप माल विक्रीला होता. चार केळ्यांची किंमत अमेरिकन 12 डॉलर्स, टरबुजाची किंमत 17 डॉलर्स, एका संत्र्याची किंमत 3 डॉलर्स. ही भयानक महागाई म्हणजे परदेशी माणसाची छाती दडपणारी. मी विचार केला की खाताना पैशांचा विचार करून आपलं डोकं खराब करायचं नाही. भूक लागेल तेव्हा मस्तपैकी जे खाद्यपदार्थ खाऊन पाहायचे आहेत ते खायचे. त्याच्यावरील किंमत पाहायची नाही. प्रत्येक वस्तू ही अगदी निवडक व उच्च दर्जाची होती. काम करणाऱ्यांनी बक्षिसी स्वीकारायची नाही ही शिस्त. एकदा कुमामोटो ह्या गावात मी टेबलावर बक्षीस म्हणून पैसे ठेवले. तर वेट्रेस माझ्या मागून चालत पार रस्त्यावर आली. माझे पैसे परत माझ्या हातात कोंबत म्हणाली, ‘‘तू तुझे पैसे विसरलीस.’’ मी म्हटलं, ‘‘मला तू आवडलीस म्हणून तुझ्यासाठी मी पैसे ठेवले.’’ ती म्हणाली, ‘‘जपान, नो टिप.’’ 

जेटलंग आणि रात्रीची झोप फारशी न मिळाल्यामुळे मी बरीच दमले होते, तरी सकाळपासून खूप खूप भटकले होते. संध्याकाळचे साधारण सहा वाजले होते आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. हॉटेलमध्ये परत जावं या विचाराने गाडीतून मी माझ्या हॉटेलजवळील स्टेशनावर उतरले. स्टेशनच्या बाहेर आले. पावसामुळे आभाळात खूप काळोख दाटून आला होता. काय करावं ते समजेना. जवळच टॅक्सीचा तळ दिसला. सगळे ड्रायव्हर त्यांच्या छोट्या ऑफिसमध्ये दाटीवाटीने उभे राहिले होते. पावसात भिजण्यापेक्षा ही गर्दी बरी. सिगारेटच्या धुराचा प्रचंड ढग त्यांच्या डोक्यावर घुटमळत होता. त्यांना दोन-तीन वाक्यांपलीकडे इंग्लिश येत नव्हतं व मलाही माझ्या ठरावीक वाक्यांपलीकडे जपानी भाषेचं ज्ञान नव्हतं.

मी नेहमी ज्या हॉटेलमध्ये राहते त्याचं व्हिजिटिंग कार्ड पर्समध्ये ठेवते. लगेच ते कार्ड त्यांना दाखविलं. एका बाजूला इंग्लिशमध्ये व दुसऱ्या बाजूला जपानी भाषेत हॉटेलचं नाव-पत्ता वगैरे माहिती होती. ती वाचल्यावर ते मला काहीतरी सांगत होते. शेवटी माझ्या लक्षात आलं की मी स्टेशनच्या उलट्‌या बाजूने बाहेर पडले होते. तेथून वळसा घालून पाच मिनिटांत माझ हॉटेल होतं. परंतु त्या रस्त्याला नो एन्ट्री असल्यामुळे टॅक्सीला दोन मैलांचा फेरा घालावा लागला असता. म्हणून ते सुचवत होते की मी चालत जावं. दुसऱ्या एखाद्या देशात गोंधळलेला प्रवासी व पाऊस बघून त्याला छान घुमवून भरपूर पैसे चढविले असते. मी जायला निघाले, तसं एका टॅक्सीड्रायव्हरने ‘थांब, थांब’ अशा खुणा करत तो ऑफिसच्या आतल्या खोलीत गेला व हातात एक छान नवी कोरी छत्री घेऊन एका मिनिटात बाहेर आला. ती छत्री त्याने माझ्या हातात दिली व कमरेतून झुकून

अभिवादन करत म्हणाता, 'गिफ्ट! वेलकम् टु जपान !’ ती छत्री मी क्योटोपर्यंत सांभाळली व वापरली. क्योटोतील टूरिस्ट डिपार्टमेंटमध्ये माहिती विचारायला गेले असताना त्यांच्या नियमाप्रमाणे दाराजवळील बादलीत मी छत्री ठेवली. ऑफिसमध्ये एक रशियन प्रवासी उभा होता. त्याने माझे लक्ष नाही पाहून पटकन माझी छत्री उचलली व जायला निघाला. भलामोठा, उंच दांडगा माणूस! मला जोर चढला. त्याला मी एकदम अडविलं आणि म्हटलं की, ही माझी छत्री आहे. तसा तो डरकाळी फोडत म्हणाला, की ही छत्री त्याची आहे.

एका हाताने मला जोराने धक्का मारून तो ऑफिसच्या बाहेर पडला. टोकियोत जपानी ड्रायव्हरने 'वेलकम टु जपान' म्हणून ती छत्री मला दिली होती. मी त्या रशियन माणसाच्या मागं जायचं ठरविलं. तेवढ्‌यात त्या ऑफिसमध्ये मला मदत करणाऱ्या जपानी माणसाने माझा हात पकडला व अतिशय शांतपणे म्हणाला. ‘‘जाऊ दे’’. त्याच्या टेबलाखालून त्याची स्वतःची छान छत्री त्याने बाहेर काढली व माझ्या हातात देऊन म्हणाला, ‘‘जपानला भेट देणारी सर्व माणसं आम्हांला प्रिय आहेत. तुझी छत्री या देशात चोरीला गेली ना! ठीक आहे. जपान परत तुला दुसरी छत्री भेट देत आहे." जपानमधील पूर्ण प्रथासात 'अतिथी देवो भव' हे त्यांच्या प्रवृत्तीचं छत्र मला नेहमी विसावा देत राहिले.

जपानमध्ये दररोज आठ ते दहा किलोमीटर्स सहज चालणं होत होतं. विशेषतः टोकियोबाहेर व टोकियोतही सगळीकडे प्रचंड जिनेच्या जिनेच दिसत. एस्कलेटर्स फारसे दिसले नाहीत. म्हातारी माणसं खुरडत खुरडत, घसटत घसटत पायऱ्या चढताना-उतरताना दिसायची. ते बघून मी चकित झाले. कारण जपानसारख्या प्रगत व श्रीमंत देशाने म्हाताऱ्या माणसांची सोय कशी केली नाही ह्याचं आश्चर्य वाटलं. मग मी दररोज किती पायऱ्या चढले उतरले ह्याची खुळी नोंद करायला सुरुवात केली. दिवसाला सगळ्यात जास्त म्हणजे अठराशे पंच्याहत्तर आणि सगळ्यांत कमी चारशेतीस पायऱ्या चढले-उतरले. मोजकं जेवण व इतका चालण्याचा व्यायाम, तरी बारीक झाले नाही ही गोष्ट खरीच.

सबंध आयुष्यात बारीक हा शब्द माझ्या शब्दकोशात कधी गुंफला गेला नाही. परंतु इतकं चालल्याशिवाय तो देश बघणं झालंच नसतं. टूरिस्ट ऑफिसर मला त्या त्या शहराचे नकाशे फुकट द्यायचे. फारच सुंदर नकाशे, कोठे चूक कधी सापडणार नाही. रस्त्यांची नावं जपानी लिपीत व इंग्लिशमध्ये नकाशावर असायची. परंतु रस्त्यांच्या पाटीवर फक्त जपानी लिपीतच नावं लिहिलेली असायची. परंतु त्या वेळेस मला चिनी भाषेत तीनशे वाक्यं लिहायची सवय झाली होती. त्यामुळे रस्त्यांच्या पाटीवरची जपानी अक्षरं मी हातातल्या नकाशांवरील अक्षरांशी झटकन जुळवू शकायची, त्यामुळे इतकं चालूनही मी रस्ते कधी चुकले नाही. कधीकधी गल्लीबोळातून जवळचा रस्ता मी पकडायची, त्यामुळे जपानी जीवन जास्त जवळून दिसायचं. सुरक्षितता तर इतकी वाटायची की एकदा प्रचंड बागेत दुपारच्या वेळेस एकही माणूस नजरेला आला नाही. मी एकटीच, परंतु आपल्यावर कोणी हल्ला करेल अशी भीती एक क्षणही वाटली नाही. दुर्दैवाने आजचा जपान एवढा सुरक्षित नाही. 

सगळीकडे स्वच्छता असली तरी कारखानदारी भयंकर वेगात वाढत्यामुळे हवा फारच दूषित व पाण्यामध्येही रसायनं मिसळून गेल्यामुळे तेही दूषित. टोकियोत तर टेलिफोनच्या बूधसारखे दिसणारे ऑक्सिजनचे बूथ जागोजागी दिसले. त्यात काही नाणी घातली की शुद्ध ऑक्सिजन तोंडाला लावायच्या मास्कमधून दोन सेकंद मिळायचा. तो मेंदूला क्षणभर झिणझिण्या देऊन फुप्फुसं भरायचा. मीही एकदा तो घेऊन पाहिला. एका दिवसात टोकियोतील बरीच प्रेक्षणीय स्थळं पाहिली होती. लगेच दुसऱ्या दिवशी बुलेट ट्रेन पकडली. शिनकानसेन तिचं नाव. दुर्दैवाने माझ्याकडे वसंत बापटांची प्रतिभा नाही. नाहीतर शिनकानसेन राणीवर कविता रचली असती. काय तिचा वेग! परंतु आत असलेल्या माणसाला धक्केसुद्धा बसत नाहीत! इतक्या वेगवान गाडीत मी अजूनपर्यंत कधी बसले नव्हते.

बाथरूमपासून सर्व स्वच्छ. गाडीच्या प्रवासात खूप खूप छान माणसं भेटत गेली व जपानबद्दल माहिती सांगत गेली. एकदा एक राजकारणातला मंत्री शेजारी बसला होता, त्याने राजकारणातल्या घडामोडी, आर्थिक परिस्थितीवर विश्लेषण छान केलं. माझ्या प्रवासाचा बेत सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘तू कोबेला जाणार तर त्याची माहिती आहे का तुला ?’’ मग त्याने कोबेला जपानी माफियाच्या मुख्य फॅमिली कशा आहेत; त्याचे विश्वासू गुंड, आपली नेकी दाखवायला हाताची करंगळी सगळ्यांसमोर कापून, ती करंगळी गॉडफादरला अर्पण कशी करतात; त्यांची सबंध शरीरे पूर्णपणे गोंदलेली कशी असतात, याचं खूप वर्णन केलं, तेव्हा मी घाबरून म्हटलं की, मला जपान हा सर्वांत सुरक्षित देश वाटला. तसा तो हसून म्हणाला, ‘‘तुझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांच्याकडून मुळीच धोका नाही. त्यांचे गुन्हे व गुंडगिरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर व कोट्यवधी येनच्या उलाढालीवर चाललेली असते.’’

पुढे थायलंडमधील पटाया या शहरातील प्रसिद्ध किनाऱ्यावर दोन गुंड सुट्टीला आलेले (?) दिसले. त्यांची गोंदलेली, कमावलेली व पिळदार शरीरं आणि हाताची बोटं तुटलेली पाहून लगेच लक्षात आलं की ते जपानहून आलेले गुंड होते. बोलता बोलता तो म्हणाला, की पुराव्यांअभावी सरकार माहिती असूनही यांना पकडू शकत नाही. त्याने जेव्हा सांगितलं की, ‘किटारो’ एका प्रसिद्ध गॉडफादरचा जावई असून कोबेत राहतो.; तेव्हा मला फार वाईट वाटले. कारण किटारो हा माझा फार आवडता संगीतकार. न्यू एज हा संगीतप्रकार त्याने प्रसिद्ध व आवडता केला. पुढे यानी वगैरे संगीतकार झाले. अमेरिकेत त्याचं बरचसं संगीत मी गोळा केलं होतं. दोनतीन वर्षांपूर्वी कोबेला भयंकर धरणीकंप झाला. टीव्हीवर ते सुंदर नीटनेटकं शहर उद्ध्वस्त झालेले पाहतानाही वाईट वाटलंच. माफिया असो, वा कोणी असो निसर्गाच्या कोपाचे सर्वच बळी. 

एकदा माझ्या डब्यात, माझ्याहून जरा दूर एक पाच-सहा वर्षांची गोड मुलगी जोरजोरात गाणं म्हणत होती. गाण्याचे शब्द जरी जपानी होते तरी चालीवरून मी ओळखलं की ते साउंड ऑफ म्युझिक या सिनेमातलं 'डो रे मी' हे गाणं होतं, तिचं गाणं संपलं, माझ्या मनात विचार चमकला की ह्या डब्यात आपल्याला कोणीच ओळखत नाही, तर लाज वाटायचं काहीच कारण नाही. म्हणून मी खुल्या आवाजात मोठ्याने 'डो अ डिअर’ करून ‘डो रे मी’ गाणं म्हटलं, जसं गाणं संपलं तसं डब्यातल्या सगळ्यांनी जोरांनी टाळ्या वाजविल्या. तशी ती मुलगी धावत धावत माझ्याकडे आली व गळ्यात आपले चिमुकले हात घालून तिने मिठी मारली . सबंध प्रवासात तिने माझी पाठ सोडली नाही. तिला व तिच्या आईवडिलांना इंग्लिश येत नव्हतं. परंतु त्या मुलीबरोबर मी तिच्या छोट्याशा पत्त्यांचा खेळ खूप खेळले. खेळता खेळता मी तिला ‘डो रे मी’ हे गाणंही शिकविलं. साउंड ऑफ म्युझिकचा हा आविष्कार. सगळ्या जगाला आनंदानं एकत्र जोडणारं माध्यम म्हणजे संगीत ! देशोदेशी फिरत, तेथील सुंदर संगीत मी माझ्या मनाच्या कप्प्यात गोळा करीत माझं स्वतःचं जीवन आनंदमय करते.

(क्रमशः)

Tags: ऑक्सिजन बूथ शिनकानसेन टोकियो जपान प्रवास वर्णन आठवणी oxygen booth shincansen tokyo japan tour diary memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके