डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'निर्वाचित कलाम': स्त्रीवादी साहित्यात मोलाची भर

प्रस्तुत पुस्तकात पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोग्यवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्रसुद्धा कशी बेडी अडकवू पाहते, एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे; व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पति-पत्नी संबंधात थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात पुरुषांची लालसा, हिंस्त्रपणा, अधिकार गाजविण्याची वृत्ती, लबाड़ी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते ह्याविषयी आपली मते लेखिकेने प्रस्तुत लेखांतून धीटपणाने मांडली आहेत.

तसलिमा नसरीन यांचे लेखन यापूर्वी 'लज्जा' या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला परिचित झाले आहेच. आता त्यांच्या 'निर्वाचित कलाम' या लेखसंग्रहाचाही मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकास साहित्यकृतीत प्रतिष्ठित समजला जाणारा ‘आनंद पुरस्कार’ मिळाला आहे.

“स्त्रीला मृत्यूशिवाय मुक्ती नाही, हेच केवळ सत्य आहे का?" तसलिमा नसरीन यांच्या 'निर्वाचित कलाम’ या पुस्तकाच्या प्रारंभीच असलेला हा प्रश्न अंतःकरण हेलावून टाकतो. प्रत्येक स्त्रीला समाजात वावरताना- मग ती सुशिक्षित असो वा अडाणी, नोकरी करणारी असो वा घरात असणारी असो तिला येणारे अनुभव हे विदारक असतात. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाप्रमाणेच हे अनुभव माणुसकीचा स्पर्शही नसणारे असतात. स्त्रिया हे अनुभव उघडपणे सांगूही शकत नाहीत किंवा त्याची चर्चा, तक्रार किंवा दाद मागणे तर अशक्य कोटीतील बाब आहे; हे एक कटुसत्य आपण नाकारू शकत नाही.

प्रस्तुत पुस्तकात पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोग्यवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्रसुद्धा कशी बेडी अडकवू पाहते, एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे; व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पति-पत्नी संबंधात थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात पुरुषांची लालसा, हिंस्त्रपणा, अधिकार गाजविण्याची वृत्ती, लबाड़ी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते ह्याविषयी आपली मते लेखिकेने प्रस्तुत लेखांतून धीटपणाने मांडली आहेत.

सर्वसाधारणपणे आपल्याकडे मुली उंच टाचेचे बूट व पायात चांदीच्या साखळ्या हौसेने घालतात. परंतु लेखिका यामागचे वेगळेच कारण आपल्यासमोर मांडते. नकळत या दोन्ही गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलल्याशिवाय राहत नाही. निदान विचार करायला तरी मन प्रवृत्त निश्चितच होते. लेखिका म्हणते गार्मन गीअर यांच्या 'फिमेल युनूक' या पुस्तकात स्त्रियांनी उंच टाचेचे बूट वापरण्यामागे एक चमत्कारिक कारण दिले आहे. एखाद्या स्त्रीचा पुरुष पाठलाग करू लागल्यास तिला फार जोरात पळता येऊ नये, म्हणून ही व्यवस्था केली आहे म्हणे!

मुली आवडीने पायाचे सौंदर्य खुलविण्यासाठी पायांत साखळ्या (तोरड्या, पैंजण) घालतात. हा दागिना घालण्यास देण्यामागे एक हेतू आहे. साखळ्या घातल्याने, बाई कुठे जाते, ते कळते. थोडक्यात तिची सर्व हालचाल साखळ्यांच्या आवाजाच्या अनुरोधाने समजते. लेखिका म्हणते, या बायका आपल्या पायांचे सौंदर्य वाढल्याच्या आनंदात आपण कैदी बनत आहोत हेही विसरतात.

सुशिक्षित स्त्रियाच 'गुलाम' होण्यास योग्य असतात. त्यांचा सततचा साजशृंगार त्यांचे सामाजिक कार्य, कलासंस्कृती, स्त्री-आंदोलन हे सर्व पतीला आकर्षित व संतुष्ट करण्यापुरतेच असते. मध्यम व उच्च वर्गातील मुली व स्त्रिया दोन-चार नातेवाईकांकडे जाऊन आल्या की, त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होतो. पण हे काही खरे नाही. बायकांच्या पायातील बेडी फारच मजबूत आहे.

आपल्याकडे सामाजिक शिक्षणाचा स्तर इतका उंच नाही की, ज्यामुळे मानसिक स्तरही उंचावेल. आमची संस्कृती इतकी प्रभावी नाही की, जिच्यामुळे बुद्धी शुद्ध होईल, आमचा संपूर्ण समाजच स्त्री पुरुष संबंधांकडे अश्लील संबंध, अ-शालीन संबंध म्हणूनच बघतो. विज्ञानामुळे आमची किती प्रगती होते, माहीत नाही. पण अज्ञान मात्र दूर होत नाही. शिक्षण रूढी, परंपरा ह्यातून किती मुक्तता देते माहीत नाही, पण अशिक्षितपणा मात्र कमी करीत नाही. असे लेखिका आवर्जून स्पष्ट करते.

'चारित्र्य' ही फार मौल्यवान गोष्ट आहे. पुरुषांना नाही पण स्त्रियांना ह्या गोष्टीची फार काळजी घ्यावी लागते. अनेक प्रकारच्या प्रसंगातून स्वतःला वाचवत जगावे लागते. या विषयावर विस्ताराने स्पष्टीकरण करताना लेखिका एक कविता आपल्यासमोर ठेवते- 

"तू एक स्त्री आहेस,
हे चांगले लक्षात असू दे, 
तू घराची चौकट ओलांडताच, 
लोक तुझ्याकडे वाकड्या नजरेने 
पाहतील.
गल्लीतून तू जाऊ लागलीस,
तर तुला 'चारित्र्यहीन' म्हणून
शिव्या देतील,
तू एक तुच्छ वस्तू आहेस बरं,
तेव्हा मागे फिर, नाहीतर
जशी चालली आहेस, तशीच जात रहा."

बंधनाचे पाश स्त्रियांच्या मानेभोवती आवळलेलेच आहेत. कसेही जगा तुमच्यावरील बंधने, तुमची घुसमट, तुमची हार ही ओघानेच आली हेच सुचविणाऱ्या या ओळी!

सासू-सूनेच्या वादात नेहमी असे म्हटले जाते की, स्त्री ही स्त्रीची शत्रू असते, पण अभ्यासपूर्ण निष्कर्षानंतर असे लक्षात आले की स्त्री ही एकाच वेळी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेची धारक-वाहक असते. पुरुषांचे प्रतिनिधित्व करताना तिला स्त्रीचाच छळ करावा लागतो. जे तिने सोसले असेल, जे तिच्या मुलीला सोसावे लागले, तेच ती पुरुषप्रधानव्यवस्था हातात येताच आपल्या सुनेला सोसायला भाग पाडते. हे दुष्टचक्र आहे. ह्या दुष्टचक्रातच माणसाला फिरावे लागते. काळ आणि परिस्थिती यांच्यातील बदलाबरोबरच पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या निरनिराळ्या पद्धतींच्या दुष्टचक्रात स्त्रीला फिरावे लागते.

जाहिरातीतील स्त्रियांचा सर्रास वापर यावर लेखिकेने आक्षेप घेतला आहे. जाहिरातीतील स्त्री तिच्या आकर्षक देहामुळे आणि साजशृंगारामुळे अशी काही उठावदार दिसते की वस्तूपेक्षा तीच प्रमुख आकर्षण ठरते आणि त्या स्त्रीमुळे ती विशिष्ट वस्तू लोकप्रिय होते. जाहिरातदार आणि व्यापारी, वस्तूपेक्षा स्त्रीलाच जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. पुरुषांचे शेव्हिंग क्रीम, ब्लेड, सिगारेट, शर्टिंग- सुटींग, बूट-मोजे, शाम्पू, साबण या सर्व जाहिरातींत आवश्यकता नसताना स्त्रीला वापरले जाते. इथे स्त्रीची काही जरूरी नाही, पण तिचा वापर फक्त करून घेतला जातो. जणू समाजात स्त्रीचे प्रमुख काम स्वतःचा वापर करून देणे हेच आहे! याची जाणीव खुद्द स्त्रियांनाही होत नाही हे तिचे आणि समाजाचे दुर्दैव मानावे लागेल. स्त्रियांनी कुठलेही काम करायचे ठरविले की, त्यांच्या स्त्रीत्वाचा काही ना काही उपयोग त्यांना करावाच लागतो. कधी त्यांना नजरेचा उपयोग करावा लागतो. कधी स्पर्शाचा तर कधी गोड आवाजाचा, तर काही वेळा हावभाव, हास्य यांचाही उपयोग करावा लागतो.

ज्या दिवशी समाज स्त्रीचे शरीर अंग-प्रत्यांग ह्यांच्याऐवजी तिची बुद्धी, श्रम ह्यांची किंमत करायला शिकेल त्याचदिवशी स्त्री खऱ्या अर्थाने, ‘माणूस' म्हणून मान्यता पावेल असा लेखिकेचा आशावाद आहे. विवाह दोघांचा होतो. स्त्री आणि पुरुष हे दोघेही विवाहबंधनात बांधले जातात. पण विवाहाची चिन्हे स्त्रीलाच वाहावी लागतात. पुरुषाला नाही. स्त्री विवाहित आहे का अविवाहित हे तिच्या नावावरून कळते, विवाह ही स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असते, पुरुषांच्या नाही. विवाहानंतर स्त्रीला ‘सौभाग्य चिन्हे' धारण करावी लागतात, पुरुषाला तसे काहीच बंधन नसते.

विधवा व विधूर यांच्यातही कमालीचा फरक करण्यात आला आहे. यात विधवेला सर्व बंधने, विधुराला काहीच नाही. स्त्री-पुरुष दोघेही 'माणूस' असूनही असा भेद का? स्त्रीने स्वत:ला एक संपूर्ण माणूस समजले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम तिने तिच्या नावातून आणि शरीरावरून सधवा वा विधवा असल्याच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत. स्त्री जर बुद्धिमान असेल, विचार करणारी असेल, हे अलंकार तिला कलंकित करू शकणार नाहीत. 'मिस', 'मिसेस' ही चिन्हे तिचे एका जड वस्तूत रूपांतर करणार नाहीत. पांढरंफटक वैधव्य तिला हीनदीन करणार नाही. या व अशा प्रकारच्या अन्यायाने, रूढी- परंपरांनी लेखिका पेटून उठते व म्हणते, 'स्त्रियांनो, सर्व खोट्या परंपरा मोडून तुम्ही प्रथम माणूस व्हा!

या पुस्तकातील 78 लेखांतून लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी कोणताही आडपडदा न ठेवता लिहिल्या आहेत यात शंका नाही. तसलिमा नसरीन यांची जनमानसातील प्रतिमा जरी रूढी न मानणाऱ्या वाद-विवादपटू आणि स्पष्टवक्त्या अशी असली तरी पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि 'स्त्री मुक्ती' यांबाबत तसलिमा नसरीन यांच्या अभ्यासाचा आवाका मोठा आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचे लेखन निश्चितच उल्लेखनीय व सृजनशील आहे. लेखिकेचे विचार मूळ संहितेला धक्का न लावता वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय अनुवादिका मृणालिनी गडकरी यांना जाते. त्यांचा बंगाली व मराठी भाषेचा व्यासंग निश्चितच मोठा आहे.

निर्वाचित कलाम
लेखिकाः तसलिमा नसरीन
अनुवादः मृणालिनी गडकरी
मेहता पब्लिकेशन हाउस, पुणे.
मूल्य : 150 रुपये.

Tags: गडकरी मृणालिनी कलाम निर्वाचिन नसरीन तसलिमा Gadkari Mrunalini Nasrin Taslima Upliftment Women weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके