डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाबांना प्राणी संग्रहालयात जायला खूप आवडायचे. लहानपणी पुण्याला पेशवेबागेत आम्हाला आई-बाबा न्यायचे. तेथील सुमित्रा हत्तिणीबरोबर अनेक वर्षांची मैत्री जुळली होती. हत्ती, वाघ, सिंह, मोर, काकाकुआ, महाप्लव वगैरे सगळेच बाबांचे जुने प्रिय मित्र होते. दिल्ली, लंडन, बर्लिनमधील प्राणी संग्रहालये ते हमखास पाहत. नैसर्गिक वाटेल अशा परिसरात या प्राणी संग्रहालयांतले वाघ, सिंह वगैरे आहेत, हे बाबांना फार पसंत होते. मुंबईला राणीच्या बागेत, तसेच दिल्ली, लंडन इत्यादी ठिकाणी आम्हीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. वाघ, सिंह, हत्ती, मोर, राजहंस हे तर लाडके होतेच. पुण्याजवळ एका ठिकाणी आम्ही मुद्दाम राहिलो होतो. तिथे मोर पाळले होते, ते बाबांना आवडायचे. निळा निळा मखमली पिसारा फुलवून ते सवंगडी नाचायला लागले की, आई-बाबा मंत्रमुग्ध होऊन बघायचे. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे माडगूळकरकाकांचे, पुलकाकांनी दिलेल्या चालीवर आशाने गायलेले गीत आई-बाबांना फार आवडायचे.

रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा,

गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा।

‘रानपाखरा’ ही गोपीनाथकाकांची कविता आईबाबांना खूप आवडायची. सर्व पशुपक्षी व निसर्ग यांच्याशी आपले ‘मैत्र जीवाचे’ आहे, अशी बाबांची धारणा होती. अगदी लहानपणापासून बाबांचे पशुपक्ष्यांशी आणि वृक्षवल्लींशी आंतरिक नाते होते. डोंबिवलीला आमच्याकडे नेहमीच कुत्रे पाळलेले असायचे. हे सगळेच कुत्रे दिसायला चांगले, रुबाबदार आणि भरदार आवाजाचे होते. पिचक्या आवाजाचे कोणी नव्हते. गायकांसारखे आवाजाचे घराणे उत्तम होते, असे म्हणायला हरकत नाही. आमच्या अगदी लहानपणीचा पहिला कुत्रा म्हणजे सिली. पु. भा. भावेकाकांना कुत्र्यांचे फार प्रेम. त्यांच्याकडेही कुत्रे होते. पण हा आमचा कुत्रा भावेकाका आले की नेहमी त्यांच्या अंगावर भुंकायचा, याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे. त्याच्या या मूर्खपणामुळे भावेकाकांनी त्याचे नाव सिली ठेवले. तो पांढरा शुभ्र व दिसायला छान, एकदम आवडेल असा होता. त्याच्या पाठीवर मधोमध एक भला मोठा काळाभोर गोलाकार ठिपका होता. (भावेकाकांनी त्यांच्या कुत्र्यांपैकी एकाचे नाव ‘बेगऱ्या’ ठेवले होते. तो खायला मिळेल अशा अपेक्षेने अधाश्यासारखा बघायचा, म्हणून हे नाव भावेकाकांनी त्याला दिले होते, असे त्यांनी आम्हाला सांगितले होते.)

आमच्या सगळ्याच कुत्र्यांना आमरस, श्रीखंड वगैरे गोड पदार्थ आवडायचे. सिलीला आमरस आवडायचा. त्यामुळे सौ. आई आमच्याबरोबर त्यालाही आमरसपोळीचे जेवण द्यायची. बाहेरचे कोणी आले तर सिली लगेच भुंकायचा, पण तो फार प्रेमळ होता. निरुपमा अगदी लहान बाळ होती तेव्हा ती झोपली असेल, त्यावेळी तो तिच्याशेजारी बसून राखण करायचा, असे आई कौतुकाने सांगायची. बाबा घरी आले की, तो आनंदाने उड्या मारायचा आणि त्यांच्या जवळपास राहायचा. त्याचे वय होऊन तो गेला. आम्ही आईच्या आईवडिलांच्या (आजीनानांच्या) गोरे बंगल्यात राहायला गेलो, तेव्हा तिथे आम्ही दुसरा कुत्रा पाळला होता. त्याचे नाव मोती. तो तपकिरी रंगाचा, गुबगुबीत, छानदार होता. शांत व गंभीर होता. आम्ही अगदी लहान होतो. तो अंगणात, बागेत आमची पाठराखण करायचा. बाबा कार्यालयातून यायची वाट बघायचा आणि ते आल्यावर त्यांच्या शेजारी शेपटी  हलवत आनंदाने बसायचा. तो बागेतली गवती चहाची पाने खायला लागला; तेव्हा त्याला बरे नाही की काय, अशी बाबांना काळजी वाटायला लागली. प्राण्यांच्या डॉक्टरला आणण्यात आले. बाबांच्या मांडीवर मोतीचे डोके ठेवून, गुंगीचे औषध देऊन, त्याने त्याचे ऑपरेशन केले. त्याला सर्व औषधपाणी आईबाबांनी प्रेमाने केले. तो बरा होऊन पूर्वीसारखा खेळायलाही लागला.

बाबांचे बागकामातील मित्र पोंक्षेकाका यांचे जावई प्राण्यांचे डॉक्टर होते. ते मोतीला तपासायला दर आठवड्याला यायचे. त्याला टाल्कम पावडर कशी लावायची, हे त्यांनी सांगितल्याचे आठवते. नंतर परत आजारी पडून मोती निधन पावला. आम्हा सर्वांना जवळचा आप्त गेल्याचे दु:ख झाले. मग एक काळ्याशार रंगाचा सुंदर लॅब्रेडॉर कुत्रा पाळला होता. त्याचे नाव टायगर. त्याचा आवाज चांगला भरदार होता. शेपटी गोंडेदार होती. बाबांशी त्याची विशेष दोस्ती होती. बाबांभोवती बागेत इकडून तिकडे पळायला त्याला आवडायचे. वर्षभरातच आजारी पडून तो गेला. यानंतर महिन्यादोन महिन्याचे एक छोटे लॅब्रेडॉर कुत्र्याचे छानसे पिल्लू आणले. त्याचा रंग तपकिरी होता, कान काळे. नाकावर पांढऱ्या उभ्या रेघा होत्या. दिसायला फार डौलदार, लोभस असा हा टायगर सगळ्यांनाच फार आवडला. त्याची खाण्यापिण्याची बडदास्त ठेवली जायची. शेजाऱ्यांकडेही त्याचे कायम अगत्याने स्वागत होत असे. तो आमच्या आवारात तसेच शेजारच्या आवारातही मुक्तपणे पळत असे. बाबांवर त्याचा विशेष लोभ होता. वर्षभरात तो चांगला मोठा झाला. रुबाबदार दिसायचा.

माडीवरील गॅलरीत बाकावर बसून तो सगळीकडे देखरेख ठेवायचा. थंडी-पावसात तो तिथे येऊन बसला की, बाबांनी त्याच्यासाठी खास आणून ठेवलेली घोंगडी आम्ही त्याच्या अंगावर घालायचो. तिच्याखाली तो आरामात झोपून मधेच डोके उंच करून बघायचा. या टायगरचा आवाज नावाला साजेसा भरदार, घुमणारा होता. गल्लीच्या टोकापर्यंत लांबवर ऐकू जायचा व ओळखू यायचा. आमच्या सगळ्या कुत्र्यांत हा सर्वांत खेळकर, खोडकर आणि लाडावलेला. त्याला गोड पदार्थ आवडायचे, श्रीखंड सगळ्यात जास्त. त्याला जेवायला बोलावून वाढायचे, तर त्याच्या ताटलीत त्याच्या भाकऱ्यांची चळत व इतर पदार्थ अगदी माणसांना वाढू तशा आदराने वाढून मग त्याच्या पाण्याच्या भांड्यात पाणी ठेवले की, तो जेवायचा. घरच्या माणसासारखे त्याला वाढले जायचे. आईनेच तसे वळण लावले होते. तो तर कुत्रा आहे, त्याचे कशाला एवढे लाड; म्हणून आमच्याकडच्या एखाद्या पाहुण्याने कधी त्याच्या ताटलीत भाकऱ्या फेकल्या, तर तो जेवायचा नाही, निघून जायचा. रानटीपणाचा निषेध टायगर अशा रीतीने नोंदवायचा. त्याला मान-अपमान फार जाणवायचा. त्याच्याशी सुसंस्कृतपणे, रीतभात पाळून वागावे, अशी अपेक्षा होती.

सकाळी बाबा कार्यालयात जायला निघाले की, गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत टायगर त्यांना पोचवायला जायचा. कधी कधी आम्हालाही शाळेपर्यंत पोचवायला यायचा. पुढे निरुपमा रेल्वेगाडीने माटुंग्याला रुईया कॉलेजला जाऊ लागली, तेव्हा कधी कधी तो सकाळी तिच्याबरोबर थेट रेल्वेच्या पुलावर पायऱ्या चढून, उतरून प्लॅटफॉर्मवर जाऊन तिच्या शेजारी शेपटी हलवीत उभा राहायचा. तो खाली रुळांवर उडी मारतो की गाडीत चढतो, अशी निरुपमाला सारखी धास्ती वाटायची व चिंता लागून राहायची. ती घरापासूनच त्याला ‘येऊ नको, घरी जा’ म्हणून पुन: पुन्हा सांगायची, पण तो जरासुद्धा मनावर घ्यायचा नाही. त्याने ठरवले असेल त्या दिवशी तो स्टेशनवर जाणारच. कधी रुळावर उडी मारून अपघात करून घेतला नाही, हे नशीब! निरुपमा गाडीत बसली की, तो आरामात घरी परत यायचा.

संध्याकाळ झाली की, तो बाबा परत येण्याची वाट बघायचा. बाबांच्या बुटांचा वेगळाच आवाज तो लांबूनही ओळखायचा आणि गल्लीच्या टोकापर्यंत धावत जाऊन बाबांच्या अंगावर उड्या मारत, मारत बाबांबरोबर घरी यायचा. बाबांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला की त्याला एकदम छान वाटायचे, डोळ्यांत आनंद ओसंडून जायचा. बाबा नेहमी सकाऴी व संध्याकाळी अशी दोनदा अंघोळ करायचे. संध्याकाळी आल्यावर बाबा बागेला पाणी घालायचे, तेव्हा टायगर कायम इकडून तिकडे उड्या मारत त्यांच्या पुढेमागे पळत रहायचा. पाणी घालून झाल्यावर सुखद, शीतल झुळुकेत थंड जमिनीवर ताणून देऊन आराम करायला त्याला आवडायचे. मग अंघोळ करून बाबा जेवायला बसले की, तो त्यांच्या पायांवर डोके ठेवून शेपटी हलवत बसायचा. रविवारी बाबांचे बागकाम आणि पाणी घालणे हे बराच वेळ चालायचे. नळीने झाडांना पाणी घालताना आम्ही दोघी कधी कधी  एकमेकींवर आणि टायगरवरही पाणी उडवायचो. त्याला मजा वाटायची. एक मोठा चेंडू त्याच्यासाठी बाबांनी आणला होता. तो फेकला की, धावत जाऊन तोंडात धरून तो घेऊन यायचा; मग आम्ही तो चेंडू परत लांब फेकून त्याच्याशी खेळावे, अशी त्याची अपेक्षा असायची.

नवे झाड लावण्यासाठी बाबा बागेत खड्डा खणायला लागले की, तो लगेच पुढच्या दोन पायांनी भराभर माती उकरायला लागायचा. त्याला कुदळफावडे लागू नये म्हणून मग खणण्याचे थोडा वेळ थांबवून त्याला जरा दुसरीकडे खेळायला न्यायचे व हे काम पूर्ण करायचे, असे चालायचे. आपण किती भरभर माती उकरून खड्डा खणतो, हे दाखवून सगळ्यांची शाबासकी मिळवणे आणि कौतुक करून घेणे त्याला आवडत असावे; आणि बाबा तर त्याचे कौतुक करायला नेहमी उत्सुकच होते. शेजारच्या घरचा नोकर रत्न्या टायगरला बोलवायचा. ‘‘ए मोनालिसा, ए राज कपूर, देवानंद, दिलीपकुमार’’, अशा वेगवेगळ्या नावाने मोठमोठ्याने हाका मारायचा. टायगरला समजायचे की, ही सगळी नावे त्यालाच उद्देशून पुकारली जात आहेत. तो धावत तिकडे हजर व्हायचा. आम्ही खूप हसायचो. ‘अनेक नावे तुला तुझी रे दाही दिशांना घर’ या कवितेच्या ओळी अजाण लोकांना कधी समजणार नाहीत, पण टायगरला ती कविता पुरती समजली होती, असे बाबा म्हणायचे.

या टायगरची एक सवय फार विस्मयकारक वाटते. दिवाळीत आम्ही समोरच्या अंगणात मोठ्ठी रांगोळी काढून त्यात रंग भरायचो. काही तास हे चालायचे. तोपर्यंत टायगर आजूबाजूलाच रांगोळीच्या अधेमधे येणार नाही, अशा रीतीने काही अंतर राखून बसलेला असायचा. सगळे रंग आत नेऊन ठेवले की रांगोळी संपूर्ण झाली, हे त्याला समजत असावे. मग तो उठून सरळ त्या रांगोळीवरच जाऊन आरामात अतिशय आनंदाने, सिंहासनावर बसल्यासारखा डौलात, ताठ मानेने बसायचा. अगदी प्रथम त्याने अशी बैठक मारली, तेव्हा आपले सर्व परिश्रम फुकट गेले आणि रांगोळी पार विस्कटून गेली, असे वाटून आम्हाला हळहळ वाटली आणि टायगरचा थोडा रागही आला. त्याला रांगोळीवरून उठायला सांगितले, तर त्याने जरासुद्धा लक्ष दिले नाही. पण मग जरा वेळाने आणखी दुसरे कोणी येणार नाही आणि रांगोळी विस्कटणार नाही अशी त्याची बहुधा खात्री झाली असावी. म्हणूनच की काय, तो रांगोळीवरून उठला आणि आम्हाला दिसले  की, रांगोळी आम्ही घातली होती तशीच्या तशी सर्व रंगरेखांसकट आहे, जरासुद्धा टिपूसभरही इकडची तिकडे झालेली नाही. हा विश्वास बसणार नाही असा चमत्कार सगळ्यांना फार चकित करून सोडणारा होता.

त्या दिवशी वसुबारस असल्यामुळे आम्ही गाय व वासरू अशी रांगोळी काढली होती. ही दोन प्राण्यांची चित्रे बघून टायगरला आपुलकी वाटली की काय, अशी आम्ही चर्चा केली; पण दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या रांगोळीत तर कमळांची चित्रे काढली होती, तरी ती रांगोळी पूर्ण झाल्यावर टायगर त्या आसनावर आरामात स्थानापन्न झालाच. नंतर नव्या रांगोळीवर असे काही वेळ बसायचे, हा त्याचा नियमच झाला आहे असे दिसले. दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता रांगोळीची राखण करण्याची जबाबदारी या घरच्या कुत्र्याने जणू स्वत:कडे घेतली होती. रांगोळी पूर्ण झाली हे समजणे व नंतर तिची राखण करणे, ती व्यवस्थित राहील हे बघणे, हे सर्व त्याला कसे काय समजत होते, हे गूढ वाटते. पुनर्जन्म असतो की नाही, हा प्रश्न आहे; पण असेल, तर तो पूर्वजन्मीचा कलाकार होता काय? याउलट, काही लोक मात्र दिवाळीत आमच्याकडे यायचे तेव्हा खाली रांगोळी आहे याची पर्वा न करता सरळ तिच्यावर पाय देऊन चांगली रांगोळी फरकटून टाकायचे, तेव्हा आम्हाला राग यायचा. या मनुष्यप्राण्यांना आमच्या सुसंस्कृत टायगरकडून शिकण्यासारखे पुष्कळ होते.

जेम्स हॅरियट यांच्या श्वानांसंबधीच्या पुस्तकावर ‘श्वानशौकिनांच्या कथा’ असा लेख बाबांनी लिहिला होता. तो ‘बहर’ या संग्रहात आहे. त्यात बाबांनी म्हटले आहे, ‘‘कुत्र्यांना माणसाचे विशेष प्रेम असते आणि ज्यांना कुत्रे आवडते, ते त्याच्याशी अतिशय प्रेमाने बोलतात; अनेकदा दोघांना एकमेकांच्या भावनाही कळतात. सर्व जग प्रेमिकांवर प्रेम करते असे म्हणतात, पण कुत्र्यावर असामान्य प्रेम करणाऱ्या हॅरियट यांच्या या कथा मात्र कोणाच्याही आवडीचा विषय ठरतील.’’ कुत्र्याचाही स्वभाव असतो. त्याचे राग-लोभाचे विषय असतात. इतकेच नव्हे तर मालक, मालकीण यांच्या स्वभावाचा व वर्तनाचा परिणाम कुत्र्याच्या स्वभावावर व वर्तनावर होत असतो. घरातल्या मुलांवर संस्कार होतात, तसेच कुत्र्यांवर. कुत्रे आपले मनोगत जाणतात. आपण आजारी वा दु:खी झालो, तर ते आपल्याला उमगते आहे याची कल्पनाही देण्याची त्यांची पद्धत असते, असे बाबांचे मत होते.

बाबांनी अभिजातमध्ये ‘आल्हाददायक मैफल’ हा लेख व्हर्जिनिया वूल्फवर लिहिला आहे. याशिवाय तिच्यावर आणखी लेखही लिहिले आहेत. कुत्र्यांची आवड या समान धाग्यामुळे बाबांना तिच्याबद्दल विशेष आपुलकी वाटायची. तिने कुत्रे, खार वगैरे पाळले होते. तिच्या घरात तिला शेळी या टोपणनावाने हाक मारली जाई व बहिणीला डॉल्फिन. कवयित्री एलिझाबेथ बॅरट ब्राउनिंगने कवी रॉबर्ट ब्राउनिंगशी लग्न केले होते. त्यांच्या प्रेमपत्रांत तिच्या फ्लश या कुत्र्याबद्दल बरेच आहे. ही प्रेमपत्रे वाचल्यावर व्हर्जिनिया वूल्फने त्यावर फ्लश हे पुस्तक लिहिले. एलिझाबेथने फ्लशवर दोन कविताही केल्या होत्या. त्याच्याशी आपले भावनिक नाते आहे, फ्लश बुद्धिमान असून त्याला काही अक्षरे समजतात, तो पूर्णत: साक्षर होईल, असेही तिला वाटायचे. इटलीत स्वातंत्र्याची ओळख झाल्यावर साखळीच्या बंधनापेक्षा मुक्तपणे स्वतंत्र हिंडणे फ्लशला आवडू लागले. वयोमानाप्रमाणे फ्लशचा स्वभाव बदलला, एक प्रकारे अलिप्तता आली, या निरीक्षणाबद्दल बाबांना ममत्व वाटले होते. फ्लशचा स्वभाव इत्यादींबद्दलची मते बाबांच्या स्वत:च्या कुत्र्यांबद्दलच्या निरीक्षणांसारखीच होती. बाबांना फ्लश खूप आवडायचे. इथे अमेरिकेतील त्यांच्या संग्रहातही ते आहे. मुंबईलाच आम्हाला त्यांनी वाचायला सांगितले होते. ‘प्रेमजीवनाचा साक्षीदार’ हा सौरभमधील लेख फ्लशवर आहे. त्यात बाबा लिहितात : ‘व्हर्जिनिया वूल्फची सर्व पुस्तके माझ्यापाशी आहेत. फ्लश हे पुस्तक मुंबई, कलकत्ता येथे मिळत नव्हते. इतकेच नव्हे, तर लंडनमध्ये केलेला शोध वाया जात होता. पण 1986 मध्ये लंडनच्या चॅरिंग क्रॉस या भागातील जुन्या पुस्तकांच्या दुकानांपैकी एका दुकानात ते मिळाले. त्या दुकानातही एकच प्रत शिल्लक होती. 1933 च्या नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेली ती दुसरी आवृत्ती होती. आता त्या आवृत्तीला सत्तर वर्षे झाली.’’

शिवाजीमहाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. या स्वामिनिष्ठ कुत्र्याने महाराजांचे देहावसान झाल्यावर त्यांच्या चितेत उडी घेतली होती, याचे बाबांना फार कौतुक होते. गडकऱ्यांनी राजसंन्यास हे नाटक महाराजांच्या त्या इमानदार खंड्या कुत्र्याला अर्पण केले आहे, हे बाबांना प्रसंशनीय वाटायचे. सौरभमधील वर उल्लेखिलेल्या लेखात त्यांनी हे नमूद केले आहे.  ‘हिज मॅजेस्टीज व्हॉइस’ या कंपनीच्या ध्वनिमुद्रिकांवर ग्रामोफोनच्या कर्ण्यासमोर एक कुत्रा मान वाकडी करून, कान टवकारून आपल्या मालकाचा आवाज उत्सुकतेने, आपुलकीने व आनंदाने ऐकत आहे, असे चित्र असायचे. ते बाबांना फार आवडायचे. कुत्र्याचा स्वभाव, मनोवृत्ती आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव व लकब त्या चित्रात अगदी बरोबर टिपली आहे, असे त्यांचे मत होते. आमचा टायगरही तशीच मान वाकडी करून, सर्व लक्ष एकवटून, बाबांचे बोलणे आनंदाने ऐकायचा आणि दिसण्यातही त्या कुत्र्यासारखाच लोभस होता, अंगचण, चेहरा, कान तसेच होते. ध्वनिमुद्रिकेवर आपल्या टायगरचेच चित्र असते, असे बाबा म्हणायचे. एक कुत्रा मागच्या दोन पायांवर उभा राहून पुढचे दोन पाय पुस्तकांच्या स्टँडला वरच्या फळीला लावून त्यातली पुस्तके बघत आहे, असे चित्र निरुपमाने एकदा बाबांसाठी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम काढले होते. पुस्तके आणि कुत्रा हे दोन्ही अतिशय प्रिय असल्यामुळे बाबा भलतेच खूश झाले.

डोंबिवलीला आमच्या बागेत कधी तरी खारी पळताना दिसल्या की, आम्हाला फार नवलाई वाटायची. टायगर लगेच त्यांचा पाठलाग करायला धावायचा. विहिरीच्या आजूबाजूला आणि बागेतही पावसाळ्याच्या दिवसांत पोपटी व पिवळ्या रंगाचे बेडूक टुण्‌कन उड्या मारून जाताना दिसायचे. टायगर त्यांच्याही मागे धावायचा. झाडांच्या बुंध्यांवर बसलेल्या सरड्यांचे रंग बदलताना पाहून मजा वाटायची. पेरूच्या झाडांवर पोपट यायचे. बागेतल्या फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे नाचायची, भुंगेही गुंजारव करायचे. ‘मधुकर बन बन फिरत करी गुंजारवाला’, ही चीज आई नेहमी गुणगुणायची. चिमण्या, कबुतरे आणि मैना तर नेहमीच अंगणात बागडत असायच्या. मैनांबरोबर जलसा करायला कधी कधी बुलबुलही यायचे. नारळाच्या उंच झाडावर घारी असायच्या. आई या सर्वांना दाणापाणी ठेवायची. बाबाही खाद्य टाकायचे. आजी जेवायला बसली की एक घास कावळ्याला, एक चिमणीला, एक कुत्र्याला अशा अनेक पशूपक्ष्यांसाठी घास काढून ठेवायची. आंब्याच्या झाडावरील कोकिळांच्या कूजनाने पहाटे जाग यायची. कोंबड्यांचे आरवणे आणि पक्ष्यांची धांदल सुरू व्हायची.

पावसाळ्यात उंच झाडांवर बगळ्यांचे थवे बसायचे. काळे काळे ढग दाटून आले की, त्यांच्या पार्श्वभूमीवर आकाशात उडणारी शुभ्र बलाकमाला बाबांना मेघदूतची आठवण करून द्यायची. घटा घन घोर घोर, गरजत बरसत सावन आयो रे, काली घटा छाय, देखो बिजली डोले बिन बादलकी इत्यादी पावसाची गाणी; तसेच भीमसेन, अमीरखाँ, मालविका कानन, रवी शंकर, निखिल बॅनर्जी यांचे गौड मल्हार, मियाँकी मल्हार, मेघमल्हार यांच्या ध्वनिफिती ऐकायला अशा वातावरणात फार छान वाटायचे. घटा घन घोर घोर, हे भावेकाकांचे फार आवडते होते. पावसाळ्यात बागेत नाकतोडेही दिसायचे, आम्ही दूर पळायचो. सुषमा वर्डस्वर्थची Grasshoper green is a funny little chap  ही कविता म्हणून खूप हसायची. मग बाबा तिलाच ‘फनी लिटिल चॅप’ म्हणून हाक मारायचे.

‘गा रे कोकिळा गा’ हे भावगीत, बेगम अख्तरने आळवलेले ‘बरसन लागी सावन बुंदियाँ’ आणि ‘कोयलिया मत करे पुकार’ आई-बाबांना अतिशय आवडायचे. लता आणि रफीचे ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ हे गाणे आम्ही नेहमी गायचो. ‘झुलना झुलाये आओ री, अंबुवाकी डारीपे कोयल बोले’, हे गाणे सैगलबरोबर बाबा नेहमी गुणगुणायचे. ‘मी बाई कोकिळ वनची राणी’ या कवितेवर निरुपमाने शाळेत असताना नाच केला होता. त्यासाठी आईने एक छान सिल्कचा काळ्या रंगाचा, घेरदार फ्रॉक शिवून घेतला होता. त्यावर मधून, मधून नाजुक सोनेरी जरीच्या तारेने भरलेली दोन पाने आणि त्यामध्ये मोगऱ्याची टपोरी कळी, अशी छानदार नक्षी होती. पुण्याच्या कँपातील दुकानातून बाबांनी आमच्यासाठी आणलेला बक्रम त्या फ्रॉकच्या आतमध्ये घातल्यामुळे फ्रॉकचा घेर फुगीरदार राहायचा, बॅले नर्तकीच्या फ्रॉकसारखा. त्या कवितेतील कोकिळा म्हणते, ‘‘गाईन पंचम सुरांमधे, येईल कां कुणी पण ऐकायला?’ आतां काय करू? कुणा हांका मारू?’’ आता आईबाबा गेल्यावर आम्हालाही असाच प्रश्न पडला आहे.

बाबा ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाल्यावर आम्ही मुंबईला राम महालमध्ये राहायला आलो. त्या घरापुढे भले मोठे कॅशियाचे झाड होते. त्याला पिवळ्या फुलांचा बहर यायचा आणि हिरवे हिरवे पोपटांचे थवे त्यांवर बसायचे. त्यांतलेच काही पोपट आमच्याकडे गॅलरीत बाबांच्या बागेतही पाहुणचाराला यायचे. त्यांच्यासाठी आई डाळिंबाचे दाणे, पेरू वगैरे ठेवायची. बाबांना हे  पाहुणे फार प्रिय. हिरव्या रंगाच्या पक्ष्यांना हिरवी फुले, फळे आवडणार, म्हणून पोपटांना ते व आई पिस्ते द्यायचे. तिथे आम्हाला कुत्रा बाळगणे शक्य नव्हते, परंतु आम्ही चौघे दर वर्षी नेमाने ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ‘डॉग शो’ला जायचो. चर्चगेटच्या या भागात त्या वेळी सचिवालय, आयुर्विमा, ‘हिंदू’सारखी कार्यालये, ब्रेबॉर्न स्टेडियम, इरॉस सिनेमा, बँका, ब्रिटिश कौन्सिलचे ग्रंथालय, के. सी. कॉलेज, लॉ कॉलेज होते; बाकी सर्व निवासी वस्तीच होती, तीही फार कमी. त्यामुळे संध्याकाळी ही कार्यालये बंद झाली की, एकंदर सर्व शांत वातावरण असायचे. तेव्हा आमच्या भागात डाससुद्धा नव्हते, ते पुढे आले. पहाटे चारच्या सुमारास प्रथम कोकिळांचे कूजन ऐकू यायला लागायचे आणि नंतर वेगवेगळ्या पक्ष्यांचा कलरव. हे कोकिळांचे कुहू कुहू बाबांना फार आवडायचे.

सकाळी जेवायच्या आधी प्रथम पशूपक्ष्यांना दाणापाणी द्यायचे, असा आईचा तिच्या लहानपणापासूनचा नियम होता. त्यामुळे गॅलरीत पक्ष्यांसाठी नेहमीच फळे वा इतर पदार्थ ठेवलेले असायचे. चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट, मैना, एवढेच काय, एक घारसुद्धा पाहुणचाराला यायची. कधी कधी शाळा भरल्यासारखे पाच-सहा पोपट एका रांगेत गॅलरीच्या कठड्यावर येऊन बसायचे. मोगरा, गुलाब, कर्दळ, जास्वंद या रंगीबेरंगी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे नाचत असायची. आतासारख्या त्या भागात तेव्हा कुरूप, उंच इमारती नव्हत्या. त्यामुळे समोर समुद्र दिसायचा. त्यावर बुडणारा सोन्याचा गोळा, सूर्यास्ताचे मनोहर रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आकाशात उडणारे पक्षी, बलाकमाला असे चित्रासारखे मनोवेधक दृश्य.

बाबांना प्राणी संग्रहालयात जायला खूप आवडायचे. लहानपणी पुण्याला पेशवेबागेत आम्हाला आई-बाबा न्यायचे. तेथील सुमित्रा हत्तिणीबरोबर अनेक वर्षांची मैत्री जुळली होती. हत्ती, वाघ, सिंह, मोर, काकाकुआ, महाप्लव वगैरे सगळेच बाबांचे जुने प्रिय मित्र होते. दिल्ली, लंडन, बर्लिनमधील प्राणी संग्रहालये ते हमखास पाहत. नैसर्गिक वाटेल अशा परिसरात या प्राणी संग्रहालयांतले वाघ, सिंह वगैरे आहेत, हे बाबांना फार पसंत होते. मुंबईला राणीच्या बागेत, तसेच दिल्ली, लंडन इत्यादी ठिकाणी आम्हीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. वाघ, सिंह, हत्ती, मोर, राजहंस हे तर लाडके होतेच. पुण्याजवळ एका ठिकाणी आम्ही मुद्दाम राहिलो होतो. तिथे मोर पाळले होते, ते बाबांना आवडायचे. निळा निळा मखमली पिसारा फुलवून ते सवंगडी नाचायला लागले की, आई-बाबा मंत्रमुग्ध होऊन बघायचे. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे माडगूळकरकाकांचे, पुलकाकांनी दिलेल्या चालीवर आशाने गायलेले गीत आई-बाबांना फार आवडायचे.

मुंबईला आमच्या घरी लाकडाच्या हत्तींचे भारदस्त बुक होल्डर्स व मोराची पिसे सुंदर पात्रांत पुस्तकांच्या दोन बाजूंना ठेवली होती. त्यांच्या शेजारी गरुडाच्या आकाराच्या सोनेरी रंगाच्या दोन गोल्डन ईगल्सच्या राजस बाटल्या होत्या, त्या नाशिकच्या घरात आहेत. ते हत्ती आता पुण्याला भांडारकर संस्थेतील बाबांच्या दालनात आहेत. गरुडही तिथे ठेवण्यात येतील. पुण्याला झाडाखाली बाबांना भारद्वाज पक्षी दिसले होते आणि नाशिकला चक्रवाक. खूश होऊन त्यांनी आम्हाला लगेच सांगितले. गीरच्या जंगलात ते सिंह बघायला गेले होते. त्यांच्याबरोबर तिथे असलेले विख्यात छायाचित्रकार सुलेमान पटेल यांनी बाबांना सिंहांच्या कुटुंबाचा फार सुंदर फोटो भेट म्हणून दिला होता. तो आमच्या नाशिकच्या घरात आहे. पटेल यांचे गीरच्या जंगलावरील पुस्तकही बाबांच्या ग्रंथसंग्रहात आहे. बाबांनी सुलेमान पटेल यांच्या छायाचित्रांवर लेखही लिहिला होता. ‘लासी’, ‘लासी कम होम’, ‘नॅशनल व्हेलवेट’, ‘हतारी’, ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ हे सर्व चित्रपट बाबांनी आम्हाला आम्ही लहान असताना दाखविले. नंतरसुद्धा आम्ही सर्वांनी ते अनेक वेळा पाहिले.

रोझी इज माय रिलेटिव्ह हे एका हत्तिणीवरील पुस्तक बाबांनी मुंबईला घेतले. बाबा आणि सुषमा त्या पुस्तकावर बेहद्द खूश झाले. आई व निरुपमा यांना ती अतिरंजित कपोलकल्पित कथा वाटली. रोझी नावाची हत्तीण बिअरची भोक्ती होती. कोणी बिअर पीत असेल, तर दारावर सोंडेने वाजवून तिलासुद्धा बिअर द्यावी अशी मागणी ती करायची. बाबांना तो भाग फारच पसंत पडला. त्यावर सिनेमा काढायला पाहिजे, असे त्यांचे मत होते. खरंच कोणी काढला असता, तर बाबांनी तो अनेक वेळा पाहिला असता. काही वर्षांपूवी ‘बेथोवेन’ नावाचा एक सिनेमा निघाला. ‘बेथोवेन’ हे त्यातील कुत्र्याचे नाव आहे. ‘बेथोवेन’च्या अद्‌भुत लीला बाबांना फार आवडत असत व एखाद्या लहान मुलासारखे ते हसत. आई म्हणायची  की, या ‘बेथोवेन’ला एवढे समजते, असे फक्त तुम्हालाच वाटत असेल.

अलीकडे अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालयात ज्या भागात गोरिला ठेवला होता, त्या समोरच्या पाण्यात एक छोटा मुलगा पडला. त्याच्या आईने त्याच्यावर लक्ष ठेवले नव्हते. पाण्यात गटांगळ्या खात असलेला तो लहान मुलगा पाहून हरांबे या नावाचा भला मोठा धिप्पाड गोरिला तो मुलगा पाण्यात बुडू नये म्हणून धावत आला आणि त्याने त्या मुलाचा हात धरून त्याला पाण्यात इकडून तिकडे ओढले. हरांबे मुलाला वाचवायला गेला, काहीही इजा करीत नव्हता; पण प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज होऊन त्यांनी त्याला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. हे टी. व्ही.वर बघितल्यावर बाबांना अतीव दु:ख झाले व अधिकाऱ्यांच्या दुष्टपणाचा संताप आला. माणुसकी आणि दयेने प्रेरित होऊन हरांबे हा गोरिला जिव्हाळ्याने आणि काळजीने त्या लहान मुलाच्या रक्षणासाठी धावला होता, त्याला वेगळ्या उपायांनी दूर करणे वा गोळी मारून बेशुद्ध पाडणे, असे काही न करता एकदम ठार मारण्याचा खुनशीपणा केवळ मनुष्यप्राणीच करू शकतात. ‘‘ही पशुवृत्ती केवळ मनुष्यप्राण्यांतच दिसते. ‘माणसा, माणसा, कधी होशील माणूस?’ हा बहिणाबाईचा प्रश्न यांना आणि अनेकांना विचारला पाहिजे’’, असे भाष्य बाबांनी केले. लक्षात घेण्याची गोष्ट ही की, असाच प्रकार इंग्लंडमध्ये आधी झाला होता तेव्हा तेथील प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गोरिलास गुंगीच्या गोळ्या मारून बेशुद्ध केले होते, ठार मारले नव्हते. नंतर काही लोकांनी हरांबेचे नाव अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

मांजरासारखा अपवाद सोडता इतर प्राणी दुसऱ्या प्राण्यांना केवळ स्वत:च्या आनंदासाठी मारत नाहीत, भूक लागली असेल तर खाण्यासाठी मारतात. मनुष्यप्राणी हा एक असा प्राणी आहे, जो दुसऱ्या माणसाला काहीही कारण नसता मारतो किंवा छळतो आणि असे करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. बाबांना असे ‘आसुरी संपत्तीचे मालक’ नेहमीच भेटले. येथील हॉस्पिटलमध्ये आईला अमानुष वागणूक दिली, तेव्हा ‘नरेचि केला हीन किती नर’ असे आम्हाला नेहमी वाटायचे. कुत्र्यांचे बाबांना अतिशय प्रेम होते, पण मांजरे मात्र त्यांना मुळीच आवडत नसत. ती लबाड असल्यामुळे त्यांच्यापासून नेहमी लांबच राहावे, असे त्यांना अगदी लहानपणापासून वाटायचे. बाबांना आणि गोपीनाथकाकांना, दोघांनाही मांजरे कधी आवडली नाहीत. ती अंगावर येतील आणि ओरबाडतील, असे वाटायचे. त्यामुळे आमच्याकडे मांजर कधीही नव्हते. पुण्याला गोपीनाथकाकांकडेही एक लाडका मोती कुत्रा होता. नेहरूंकडे एक छोटे प्राणी संग्रहालयच होते, असे म्हणायला हरकत नाही. सुभाषचंद्रांनाही मांजरे आवडत नव्हती, याचा उल्लेख बाबांनी ‘सुभाषबाबूंचा काव्यशास्त्रविनोद’ या मधुघटमधील लेखात केला आहे.

व्यंकटेश माडगूळकरकाका, जयंतराव टिळक व रणजित देसाई यांना शिकारीची हौस होती. जंगलांतील पशूपक्ष्यांबद्दलच्या त्यांच्या निरीक्षणात बाबांना फार रस होता. ते त्यांच्याशी या विषयावर बोलताना रंगून जायचे. बाबांनी त्यांना ‘म.टा.’त लिहिण्यासही सांगितले होते. वसंतराव नाईक त्यांच्या शिकारीच्या कथा बाबांना सांगत. त्यांनाही बाबांनी ‘म.टा.’त त्यावर लिहायला सांगितले होते. आर्थर कोस्लर मुंबईला आले होते, तेव्हा त्यांच्यावर बाबांनी लिहिलेल्या लेखावर कोस्लर यांचा त्यांच्या कुत्र्याबरोबरचा फोटो छापला होता, ते कोस्लर यांना फार आवडले, असे त्यांनी बाबांना सांगितले होते. समान विचारसरणीबरोबरच कुत्र्यांची आवड हा दोघांतील समान धागा होता. बाबा 1975 मध्ये प्रथम अमेरिकेत गेले, तेव्हा एका सफारी पार्कमध्ये गेले होते. एक सिंह डुलत डुलत त्यांच्या मोटारीच्या टपावरच येऊन बसला. जणू बाबांना भेटायलाच आला होता! थोडा वेळ बसून तो गेला. बाबा अफाट खूश झाले होते. वृक्षवल्ली आणि वन्य प्राणी यांनाच सगेसोयरे मानून राहणाऱ्या जॉय ॲडम्सन आणि जॉर्ज ॲडम्सन या दांपत्याने आफ्रिकेत सिंह पाळले होते. त्यापैकी एल्सा या सिंहिणीवर त्यांनी लिहिलेल्या बॉर्न फ्री, लिव्हिंग फ्री, फॉरएव्हर फ्री, तसेच चित्तिणीवरील पिपा या पुस्तकांवर बाबांनी लिहिले होते. ती त्यांची आवडती पुस्तके होती. ती सर्व बाबांच्या ग्रंथसंग्रहात आहेत. त्यावरील चित्रपटही त्यांनी आम्हाला लहानपणी दाखविले होते. जॉर्जचे निधन झाल्यावर ‘वनराज ॲडम्सन’ असा अग्रलेख त्यांनी लिहिला होता, तो पुष्पांजलीत आहे. जॉर्ज यांनी जे 15 सिंह कोरा जंगलात सोडले होते, ते सर्व एकाच वेळी जॉर्ज यांचा खून झाला त्याच्या आदल्या रात्री त्यांच्याकडे आले होते, असे जॉर्ज यांच्या पाहुण्यांनी सांगितल्याचे बाबांनी या अग्रलेखात लिहिले होते. तुमच्या तत्त्वज्ञानात न कल्पिलेल्या अनेक गोष्टी स्वर्गात आणि पृथ्वीवर आहेत, या हॅम्लेटच्या वाक्याची यावरून आठवण झाली, असे भाष्यही केले होते.

बाबासाहेब बूट नावाचे एक वनाधिकारी होते. त्यांची व बाबांची मैत्री होती. ते आमच्या घरी नेहमी यायचे. जंगलच्या कथा सांगायचे. त्यांच्या ओळखीने आम्ही जंगले बघायला गेलो होतो. बाबांना डाकबंगल्यात राहायला फार आवडायचे. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी डाक बंगल्यात राहायचो. नदी, सरोवर, समुद्र यांच्या काठावर तसेच डोंगरावर, जंगलात राहायलाही बाबांना आवडायचे. ‘सुखालागि आरण्य सेवीत जावे’ असा अग्रलेखही त्यांनी लिहिला होता. व्याघ्रसंवर्धन प्रकल्पाची कल्पना बाबांना अतिशय आवडली होती. बांदीपूरच्या जंगलात आम्ही राहिलो होतो. जंगलात आतमध्ये जीपने जाऊन हत्तींना त्यांच्या नैसर्गिक परिसरात पाहिले. एक भली मोठी हत्तीण तिच्या पिल्लाबरोबर झाडाखाली उभी होती. आमची जीप आल्याबरोबर ते पिल्लू कोणाला दिसणार नाही अशा रीतीने त्याला आडोसा करून त्याच्या संरक्षणासाठी ती त्याच्या समोर उभी राहिली. त्या मातेचे हे अपत्यप्रेम आम्हाला फार कौतुकास्पद वाटले. आई-बाबांना तर तिच्याबद्दल फारच ममत्व निर्माण झाले. निरुपमा अमेरिकेच्या ईसीएफएमजी या परीक्षेसाठी क्वालालंपूरला गेली होती तेव्हा सिंगापूरला तेथील पक्षीशाला बघून यायला बाबांनी सांगितले होते.

नंतर आम्ही दोघी इंग्लंडमध्ये शिकत असता आई-बाबा आले होते, तेव्हा आम्ही चौघे लंडनच्या प्राणी संग्रहालयात जायचो. तेथील पोलर अस्वल आई-बाबांचे आवडते होते. आम्ही कापूस भरलेले पिंगट तपकिरी रंगाचे टेडीबेअर व पांढरा शुभ्र स्नूपी डॉग घेतले होते. ते नाशिकच्या घरात आहेत. ब्रिस्टलच्या प्राणी संग्रहालयात रेवाच्या महाराजांनी दिलेले पांढरे वाघ आम्ही पाहिले होते. ब्रिस्टलजवळच्या स्लिमब्रिज येथे जलचरपक्षीशाला ((Water Bird Sanctuary) बघायलाही मुद्दाम गेलो होतो. फ्लेमिंगो, राजहंस, विविध आकारांची व रंगांची बदके वगैरे पाहण्यात वेळ केव्हाच संपून गेला. त्यांना खायला देण्यासाठी गव्हाच्या पिशव्या विकत घेतल्या होत्या. या  राजस पक्ष्यांच्या थव्यांचे विहंगम दृश्य बघून बाबा फारच उल्हसित झाले होते. फ्लेमिंगोंचा एक थवा तेवढ्यात उडून आकाशात भरारी घेऊ लागला. तो नाचरा आनंदोद्रेक पाहून बाबांनी आम्हाला लगेच फोटो काढायची घाई केली, पण कॅमेराचा ट्रायपॉड लावेपर्यंत फ्लेमिंगो दुसऱ्या तळ्यात जाऊन बसलेसुद्धा. युद्धात सत्यपक्षाचा विजय झाल्यावर देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, अशी वर्णने पुराणकथांतून लहानपणी वाचली होती. हे तांबूस गुलाबी फ्लेमिंगो आकाशातून खाली उतरताना पाहून तशाच पुष्पवृष्टीचा भास झाला. गोजिरा गुलाबी, सुंदर सोहळा!

सैबेरियातून हजारो राजहंस काही ऋतूंमध्ये स्लिमब्रिजला येतात आणि मग तिकडे परत जातात. हे राजहंस केव्हा, कोठे व कसे जातात, हे आईला बरोबर माहिती होते. तिने त्यावर वाचले होते. अनेक रंगांची आणि आकारांची बदके तिथे आहेत. त्यांच्या पंखांचे रंग, चोचींचे रंग, डोक्याचे रंग इतक्या नाना प्रकारचे बघून आपण थक्क होतो. सूर्यास्ताच्या तांबूस गुलाबी पार्श्वभूमीवर शेकडो फ्लेमिंगोंच्या तांबूस गुलाबी थव्याचे दृश्य अविस्मरणीय होते.

राजहंस आणि मोर यांचे बाबांना विशेष प्रेम. इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये जागोजागी अगदी छोट्या तळ्यांमध्येही राणीच्या मालकीचे राजहंस असतात. सुखद, थंड हवा, हिरवीगार सृष्टी आणि राजहंस हे दृश्य बाबांना मोहून टाकायचे. रिजंट्‌स पार्कमध्ये दोन काळे राजहंस होते. त्यांवरून बाबांना हॅन्स ख्रिश्चन अँडरसनची ‘अग्ली डकलिंग’ ही गोष्ट व ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ही माडगूळकरकाकांची कविता आठवायची. एफआरसीएस झाल्यावर हार्ट सर्जरीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी निरुपमा ग्लासगोला राहत होती. तिथे घरासमोरील छोट्या तळ्यातही राजहंस होते. स्वित्झर्लंडमध्ये लेक ल्युसर्नला आम्ही गेलो होतो, तिथेही तळ्यात राजहंसांचे थवे पाहून बाबांचे मन सुप्रसन्न झाले होते. प्रत्येक तासाला छोटे दार उघडून बाहेर येऊन कूजन करणाऱ्या कोकिळेचे घड्याळ आम्ही तिथून मुद्दाम घेतले होते. ते नाशिकच्या घरात आहे.

काही वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंडवर पोर्ट वॉशिंग्टनला राहत होतो. रविवारी तिथे डक पाँडवर जाऊन रंगीत बदके बघणे, त्यांना खायला देणे आणि तिथेच झाडाखाली बाकावर बसून वर्तमानपत्रे वाचणे, असा बाबांचा क्रम होता. तेथील समुद्रात राजहंस होते. आम्ही त्या लाँग आयलंड साउंडवरही फिरायला जायचो. लाँग आयलंड साउंडवर बसूनच लाँगफेलोने त्याची ‘दि गोल्डन सनसेट’ ही कविता रचली होती, त्यामुळे तो समुद्र बाबांना आणखीच आवडायचा. ‘सुनील नभ हे, सुंदर नभ हे’, ही सावरकरांची कविता याच कवितेवर आधारित आहे. ह्युस्टनमध्ये ब्लू जे जागोजाग दिसायचे. राइस युनिव्हर्सिटीच्या फॉन्ड्रन लायब्ररीत बाबा रोज सकाळी जायचे. तिथे झुडुपांखाली ब्लू जे नाचत असायचे. आमच्या आवारातील झाडांखालीही असायचे. आई त्यांना धान्याचे दाणे टाकायची. आम्ही उत्तर प्रॉव्हिडन्समध्ये राहत होतो, त्या भागात खूप झाडी होती. ब्लू जे आणि तांबडे कार्डिनल खूपच होते. तिथे बाबा रोज दोन-अडीच मैल फिरायला जायचे. घरी परत आले की, किती कार्डिनल दिसले ते आम्हाला सांगायचे. बालकवींचा ‘बालविहग’ होता, तर माझा हा ‘लालविहग’ आहे, असे बाबा गमतीने म्हणायचे.

गेली काही वर्षे आम्ही अमेरिकेत क्लीव्हलँडला राहत आहोत. आमच्या भागात खूप दाट झाडी आहे. त्यात हरणे असतात. मोटारीतून बाबांना ग्रंथालयात घेऊन जाताना झाडीतून बाहेर येऊन रस्त्याच्या बाजूने जाणारी किंवा कधी रस्ता ओलांडून जाणारी हरणे दिसली की, आई-बाबांना फार आनंद वाटायचा. ते आम्हाला गाडी जरा हळूहळू न्यायला सांगायचे. कधी कधी ती हरणेही थांबून बघत राहायची. आमच्या जवळच्या ग्रंथालयात कधी कधी आम्ही चालत जायचो. वाटेत दोन तीन हरणे पदपथावरच भेटायची. आमच्या आवारातही ती कधी कधी येतात. खारी, ब्लू जे, तांबडे कार्डीनल, फिंच, रॉबिन आणि काही पोपटी, तांबूस वगैरे रंगीबेरंगी चिमुकले पक्षी आमच्यासमोरच्या भल्या मोठ्या झाडावर असतात. आरामखुर्चीत बसून वाचता वाचता खिडकीतून बाहेर बघितले की, बाबांना हे चिमुकले मित्र दिसायचे. ते बाबा आम्हाला दाखवायचे. इथे अमेरिकेत वा इंग्लंडमध्येही पोपट मात्र कोठेच दिसले नाहीत. मैनाही नाहीत. भारतात पोपट सगळीकडे असतात. जवळच ईरी नावाचे प्रचंड मोठे तळे आहे. तेथील बदकांचे थवे सकाळी तळ्यावरून इकडे आमच्या बाजूला आणि संध्याकाळी परत तळ्यावर जाताना फार सुंदर दिसतात. नियमितपणे ठरावीक वेळी त्यांचे हे येणे जाणे बाबांना अतिशय कौतुकास्पद वाटायचे. आईला तर त्यांच्या नेमक्या वेळाही माहीत होत्या आणि प्रत्येक मोसमात पक्ष्यांच्या वेळा कशा बदलायच्या, हेही तिला माहित होते. या पक्ष्यांकडून लोकांनी शिकण्यासारखे खूप आहे, त्यांच्यासारखी शिस्त पाळून वेळच्या वेळी काम केले पाहिजे, असे बाबा म्हणत.

रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर असे गोपीनाथकाकांनी रोज सकाळी वेळच्या वेळी येणाऱ्या चिमुकल्या निळ्या रानपाखराचे कौतुक केले आहे. यासंबंधात एक नमूद करावेसे वाटते. बाबांना 2017 च्या फेब्रुवारीत दुबईहून एक ई-मेल आली. पार्किन्सन या रोगामुळे हालचालींत दोष निर्माण झालेल्यांची हालचाल सुधारण्यासाठी उपचार म्हणून कथ्थक शिकत असता एका विद्यार्थिनीने रंगात येऊन गोपीनाथकाकांची ‘रानपाखरा’ ही कविता गाण्यास सुरुवात केली. हालचाल करण्यास त्यामुळे सगळ्यांना अधिक उत्साह वाटला. चित्रपटनिर्मिती शिकवणाऱ्या संस्थेची एक विद्यार्थिनी अनुबोधपट तयार करीत असता तिला हे समजले, म्हणून तिने ती कविता समाविष्ट करण्याबद्दल बाबांची परवानगी मागितली.

अनेक वर्षांपूर्वी जिम कॉर्बेट यांच्या माय इंडिया या पुस्तकाचे बाबांनी मराठीत भाषांतर केले होते. त्याचे हस्तलिखित लक्ष्मणशास्त्रीजीकाकांनी हरविले. कॉर्बेट यांची सर्व पुस्तके बाबांनी आणली होती. जिम कॉर्बेट यांची शताब्दी 1975 मध्ये होती. तेव्हा बाबांनी नैनिताल व मुक्तेश्वरला जाऊन तो सर्व प्रदेश पाहिला. परत येताना वाटेत कालाढुंगीला जाऊन कॉर्बेटचे घर व त्यांच्या कुत्र्याची समाधी पाहिली. कुमाऊंच्या जंगलातही ते गेले होते. त्या प्रदेशावर व कॉर्बेट यांच्या पुस्तकांवरील ‘जिम कॉर्बेटचा प्रदेश’ हा लेख वाचता वाचतामध्ये आहे. कॉर्बेट यांच्या जन्मशताब्दीनिमित्तच्या अक्षयमधील ‘वन्य प्राणिमित्र कॉर्बेट’ या लेखात बाबा लिहितात : ‘‘बंदुकीप्रमाणेच शब्दांवर त्यांची हुकमत होती. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक तशीच शब्दांची निवड. गोळीबंद बंदुक व गोळीबंद वाक्ये, त्यामुळे कुमाऊंचा प्रदेश हा तिथे न जाताच आपल्या माहितीचा होतो. तेथील लोक, त्यांच्या चालीरीती, भावना, जंगले आणि भूप्रदेश, नद्या हे सारे त्यांनी शब्दरूप केले आहे. एवढेच कशाला त्यांच्या कुवरसिंगाप्रमाणेच ‘पवळागडचा ब्रह्मचारी’ म्हणून ओळखला जाणारा नरभक्षक वाघ किंवा धाकची नरभक्षक वाघीण हीसुद्धा आपल्या अगदी ओळखीतील  आहे, असे वाटते. सतत त्यांच्याबरोबर असणारा रॉबिन कुत्रा असो किंवा कुवरसिंगसारखा शिकारीतील सांगाती असो, सर्वांशी आपली जानपहचान होऊन जाते. कॉर्बेट यांच्याशी जंगल बोलते व ती भाषा ते आपल्यालाही ऐकवितात. वाघ, बिबटे यांच्या सवयी त्यांना अवगत होत्याच; पण पावलांच्या ठशांवरून वाघाची लांबी काय असेल, तो जखमी आहे काय, हेसुद्धा कॉर्बेट ओळखत. हे सर्व शास्त्र त्यांनी कलात्मकरीत्या मांडले आहे.’’ असे गोळीबंद वर्णन करून बाबाही आपल्याला कॉर्बेट, जंगल आणि त्यांचे वन्य प्राणिमित्र यांच्या जगात नेऊन त्यांच्याशी आपले मैत्र जुळवतात. कॉर्बेटबद्दल बाबा नेहमी इतक्या आपुलकीने बोलायचे की, ते आमचे अगदी परिचयाचे, नेहमीचे येण्याजाण्यातलेच आहेत, नात्यातलेच आहेत, असे आम्हाला वाटायचे.

बहरमधील ‘विचारवंत पंडितजी’ या लेखात बाबांनी लिहिले आहे की, सुंदरतेवर नेहरूंचे प्रेम होते, ज्ञानाचा हा मार्ग असेल अशी त्यांची धारणा होती. बाबांचेही सुंदरतेवर प्रेम होते, असुरीवृत्तींवर सुंदरता मात करेल व अंतिम विजय ‘सत्यं शिवं सुंदरं’ यांचाच होईल, अशी त्यांची धारणा होती. वृक्षवल्ली, पशूपक्षी आणि निसर्ग हा सृष्टीने आपल्याला बहाल केलेला सुंदरनिधी आहे. त्याचा उपभोग घेऊन तो ठेवा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना होती. सृष्टीच्या सुंदरतेप्रमाणेच मनाची, विचारांची, लेखनाचीही सुंदरता असते. बाबांनी युरिपिडिसच्या पुढील काव्यपंक्ती उद्‌धृत केल्या आहेत :

What else is Wisdom?

What of man’s endeavour Or God’s high grace, so lovely and so great?

To stand from fear set free, to breathe and wait;

To hold a hand uplifted over Hate;

And shall not Loveliness be loved for ever?  

पशूपक्ष्यांमधील माणुसकी, मैत्री, प्रेम, कृतज्ञता यांचे बाबांना अतिशय कौतुक होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल फार जिव्हाळा होता. माणसांच्या कृतघ्न आणि दुष्ट प्रवृत्तीचा अनुभव आला की, हे अधिकच प्रकर्षाने जाणवत असे. ‘पक्षीमित्र सलीम अली’ या अग्रलेखाची सुरुवात बाबांनी पुढीलप्रमाणे केली होती

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

पक्षीही सुस्वरें आळविती

येणे सुखें रुचे एकांताचा वास

नाही गुणदोष अंगा येत

आकाश मंडप पृथिवी आसन रमे

तेथें मन क्रीडा करी –

संत तुकाराम बाबाही सर्व चिंता विसरून या जीवाभावाच्या सोयऱ्यांत मनापासून रमत. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे थोडा एकांत, थोडा गलबला हे बाबांना आवडायचे. पूर्वी ऋषी मुनी दूर एकांतात, निसर्गरम्य स्थळी ध्यानधारणा आणि ज्ञानोपासना करीत. बाबांनी सर्व गलबल्यात राहूनही पुस्तके, साहित्य, विचार, कला, वृक्षवल्ली, पशूपक्षी यांच्या विश्वात रमून अखंड ज्ञानसाधना चालू ठेवली. ते आधुनिक काळातील ऋषीच होते, ज्ञानतपस्वी होते, असे आम्हाला वाटते. कोकिळेचे कूजन आठवून वर्डस्वर्थ म्हणतो :

And I can listen to thee yet:

Can lie upon the plain And listen,

till I do beget

That golden time again.  

आता आमचे आई-बाबा नाहीत; पण अजूनही पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकली, ब्लू जे, कार्डिनल व रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे स्वछंद नाचताना, पंख फडफडवताना दिसली, समोरच अंगणात वा रस्त्यांत हरणे बागडताना दिसली, खारी, कुत्रे वगैरे प्राणीमित्र भेटले, ठरावीक वेळेला बदकांची मालिका आकाशात दिसली, मोर नाचताना पाहिला व कोकिळेचे सुस्वर गायन ऐकले की, आई-बाबाही सदैव आमच्यातच आहेत, आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते. आईच्या हातातील कंकणांची किणकिण, बाबांच्या हातातील पुस्तके खणातून काढल्याची, पुस्तकाची पाने उलटल्याची फडफड ऐकू येते. आई-बाबांबरोबरचे मंतरलेले दिवस, सुंदरतेची मैफल आठवून आमचे मन उल्हसित होते, रमून जाते आणि त्याच वेळी व्याकूळही होते.

Tags: ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर dnyanmurti govind talwalkar sushma talwalkar सुषमा तळवलकर गोविंद तळवलकर govind talwalkar nirupama talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
stalwalkar@hotmail.com

लेखक, संपादक गोविंद तळवलकर यांच्या कन्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके