डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संध्याकाळी कार्यालयातून कितीही उशिरा आले तरी बाबा बादल्यांनी विहिरींतून पाणी काढून बादलीने वा भल्या मोठ्या झारीने सर्व बागेला पाणी घालायचे. संध्याकाळी पाणी घालताना गाणी ऐकायचे. सैगल, पंकज किंवा शास्त्रीय वा नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका व गीतरामायण आणि अमरभूपाळी यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्यावर त्या लावलेल्या असायच्या. रातराणी, गुलाब, मोगरा, पारिजात, जाई- जुई, चमेली अशा सुवासांनी पंकज मलिकची ‘महक रही फुलवारी’ प्रत्यक्षात अनुभवाला यायची आणि बाबांना एकदम ताजेतवाने वाटायचे. मग ते परत अंघोळ करून वाचायला बसायचे. बागेत आमचा कुत्रा टायगर आनंदाने उड्या मारत बाबांभोवती इकडून तिकडे पळत असायचा आणि बाबा लिहायला बसले की, त्यांच्या पायांवर डोके ठेवून झोपून जायचा.

बाबांना फुलांची आणि बागेची फार आवड होती. त्यांच्या काही पुस्तकांची नावे याचीच निदर्शक आहेत- बहर, सौरभ, पुष्पांजली, मधुघट. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ते एक सदर लिहीत असत, त्याचे नाव त्यांनी ‘फुलोरा’ असे दिले होते. बाबांची वृत्ती अतिशय कलात्मक होती. बाग लावण्याच्या वेगवेगळ्या सुंदर पद्धतींचे त्यांना आकर्षण होते. भारतीय, इंग्लिश, फ्रेंच, डच, मोगल, जपानी अशा अनेक पद्धती. ‘‘रेखीव आखणी करून झाडे लावायची; पण ती नैसर्गिकरीत्याच तशी उगवली आहेत, मुद्दाम ठरवून तशी लावलेली नाहीत असे वाटावे अशा कुशलतेने लावली, तर मनोवेधक निसर्गशोभा पाहिल्याचा आनंद मिळतो. रंगसंगती भडक, अंगावर येणारी नसावी. आपल्यावर गुलाबपाण्यासारखा सौम्य रंगांचा शिडकावा झाल्यासारखे सुखद, सुगंधी, चैतन्यदायी पण शांत वातावरण तयार व्हावे आणि आपण रमत गमत फिरावे, कशाची चिंता करू नये, अशी युरोपियन बगीच्याची एक पद्धत आहे’’, असे बाबा सांगत.

फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्याभोवतीची नक्षीदार गालिच्यासारखी नयनरम्य बागही त्यांना फार प्रसन्नदायक वाटायची आणि फ्रेंच चित्रकार क्लॉद मोनेच्या बागेचे तर त्यांना अपार प्रेम होते. विश्वेश्वरय्यांच्या नितांतसुंदर वृंदावन गार्डनचे त्यांना अतिशय कौतुक होते. आपल्या महाराष्ट्रात कोणालाही अजूनही असे काही करावेसे वाटत नाही, उगाच फालतू खर्च करीत बसतात, याची त्यांना नेहमी खंत वाटायची. झाडे मिळतील तेव्हा कशीही, कोठे तरी लावायची; त्याला ना ताळ, ना तंत्र, ना रंगसंगती, हे बाबांना पसंत नसायचे. रामायणात वर्णन आहे की, रामाने वनवासातसुद्धा ‘वनरामण्यकम्‌ यत्र जलरामण्यकम्‌ तथा’ अशी जागा निवडून तिथे पंचवटी पर्णशाला बांधायचा आदेश लक्ष्मणाला दिला होता. हे पंचवटीवर्णन व कालिदासाच्या ऋतुसंहार, मेघदूत तसेच इतर साहित्यातील लताकुसुमांची वर्णने बाबांना जवळीक वाटणारी होती. रामदासांनीसुद्धा परळीला बाग कशी करायची याबद्दल उपदेश केला होता.

आमची आजी (सौ. आईची आई) काही वर्षे आजारी व पलंगावरच होती. त्यामुळे आजी, आजोबांना मदत म्हणून आम्ही डोंबिवलीला आजीनानांच्या तीन मजली बंगल्यात राहायला गेलो. आजूबाजूला शेतमळे, हिरवी कुरणे, पायवाटा, छोटीशी टेकडी, एका बाजूला रान, दोनतीन मैलांवर खाडी व आठ-दहा मैलांवर हाजी मलंगचा डोंगर, असे डोंबिवली हे तेव्हा एक सुंदरसे टुमदार गाव होते आणि हे लहानशा गावामधले कौलारू घरही फार सुंदर होते. अंगण खूप मोठे होते. आजीनानांनी घर बांधले तेव्हा प्रथम आजी व बापूदादाने (आईचा सगळ्यात मोठा भाऊ) रत्नागिरी हापूस, अलाहाबादी खूप मोठे पेरू, रामफळ, सीताफळ, चिकू, सफेद वेलची केळी, नारळ, आवळे, पपई, फणस, तुती, मोहाच्या शेकटाच्या शेंगांचे झाड, बेल, तुळस अशी झाडे लावली होती. शिवाय अबोली, लाल चाफा, देवचाफा, नागचाफा, मोगरा, सुवासिक गोंडेरी तगर, कोरांटी, बूच अशी झाडेही होती. ही सर्व झाडे मागच्या बाजूला होती. त्यांना बाबांनी जीवदान दिले. आजीने पूर्वी गुलाब लावले होते, पण ती आजारी पडल्यावर ते राहिले नाहीत.

घर पश्चिमाभिमुख होते. पुढचे व बाजूचे अंगण मोकळेच होते. मग बाबांनी वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळ्या प्रकारची आखीव, रेखीव बाग लावली. घराच्या पुढच्या अंगणात बाबांनी प्रवेशद्वाराच्या कमानीवर चमेली लावली होती आणि तिच्या एका बाजूला मांडवावर जाईजुई व दुसऱ्या बाजूला सायली. पु. भा. भावेकाका यायचे तेव्हा चमेलीची फुले खुडून वास घेत गुणगुणत यायचे. ‘काली घटा छाय’, ‘जानूँ जानूँ रे’, ‘घटा घन घोर घोर’ किंवा ‘राधेरानी हे करो ना’ ही गाणी त्यांच्या विशेष आवडीची. माडीवरती बाबांची पुस्तकांची खोली होती. या अभ्यासिकेत सोफासेट व टी-पॉयबरोबर घेतलेल्या बांबूच्या हिरव्या उंच स्टँडवर बाबांनी काश्मीरहून आणलेला अक्रोडाच्या लाकडापासून बनवलेला कमळाच्या पाकळ्यांचा दिवा व त्याला पॅगोडाच्या आकाराची लाल शेड होती. कळ दाबून पाकळ्या कमी, जास्त उमलविता यायच्या. त्या अभ्यासिकेतील कोचात भावेकाका आणि बाबा अशी रविवारी व इतर वेळीही मैफल असायची. कोचाच्या गाद्यांसाठी सुंदर अभ्रे आईने शिवले होते. उन्हाळ्यात खिडक्यांना व दारांना वाळ्याचे पडदे असायचे. पावसाळ्यात केवडा आणला जायचा. असे सुगंधी, शीतल वातावरण फार आल्हाददायक वाटायचे.

गुढी पाडव्याला रेशमी वस्त्र आणि चांदीचा गडू काठीवर ठेवून आम्ही माडीवरच्या गॅलरीत गुढी उभारायचो. तिला घरच्याच बागेतल्या तांबड्या चाफ्याच्या फुलांची माळ व हलवायाकडून आणलेली रंगीत साखरेच्या पदकांची माळ घातली जायची. या पदकांची माळ आम्हीही गळ्यात घालायचो आणि खायचो. शिवाय त्या दिवशी सकाळी आई व आम्ही दोघी बाजारातून सुंदर, ताजी कमळे आणून त्यांचाही हार गुढीला घालायचो. खाली रांगोळी आणि फुले. या सुगंधाने वातावरण सुप्रसन्न व्हायचे. आई पाडव्यासाठी श्रीखंड, पुरी व बटाट्याची भाजी करायची.

‘आल्या वसंतगौरी, सांगे फुलांस वारा,

वाऱ्यास गंध येतो, म्हणती ढगास तारा!’

ही माडगूळकरकाकांची कविता बाबांना फार आवडायची. दामयमक साधून हिंदोळ्याचा आभास निर्माण झाला आहे आणि वाऱ्याने उंच आकाशात ढगांच्या हिंदोळ्यावरून ताऱ्यांपर्यंत परिमळु झुळकल्यामुळे सर्व आसमंतात सुगंधाचा शिडकावा झाला आहे, हे या ओळींनी सूचित होते, हा रसास्वादही त्यांनी आम्हाला उलगडून सांगितला होता. त्यावर बाबांनी लिहिलेही आहे. आम्हाला शाळेत यमक शिकवले होते, पण दामयमक मात्र बाबांमुळेच कळले. घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या, कुंपणाच्या  भिंतींना लागून रासतुरा (शंखासुर), देवानंत, शोभेच्या डाळिंबाच्या तांबड्या फुलांचे झाड, एक लांब दांड्यांच्या रंगीत पानांचे उंच रोप (त्याचे नाव आठवत नाही) व मोठ्या गोंडेदार फुलांची तांबडी जास्वंद होती. देवानंतावर निळ्या आणि श्वेत गोकर्णाची वेल चढवली होती. बाजूला पिवळे कर्णटोप आणि देवतगर. कोपऱ्यात रातराणी. दुसऱ्या टोकाला उत्तरेच्या कुंपणालागून सुरूच्या झाडावर मधुमालतीची वेल चढवली होती.

उत्तरेच्या कुंपणावर कुंद आणि वेलमोगरा होते. पावसाळ्याच्या दिवसांत कुंपणाच्या भिंतीलगतच्या सर्व झाडांखाली लाल, गुलाबी, शेंदरी, पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा अनेकविध रंगांच्या तेरड्यांची पखरण व्हायची, ती रांगोळी घातल्यासारखी दिसायची. पॅन्सी, जिरेनियम, स्वीट पी, ॲस्टर, कार्नेशन यांबरोबरच बट शेवंतीचीही रांगोळी होती. गुलाब, रातराणी व इतर सुगंधी फुले उमलली की, सर्व आसमंतात मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेल्या बसंत केदारातील ‘अतर सुगंध गुलाब’ दरवळला, असे बाबा म्हणत. दवबिंदूंचे अत्तर शिंपूनच प्रभात होते आणि मग हा फुलोरा दरवळतो. सृष्टीला अत्तर लावून बसायला आवडते, त्यावरून शिकून आपणही अत्तर लावावे, म्हणजे प्रसन्न वाटते. फुले वेचिता वेचिता कळ्याही बहरून आल्या की सुगंधाने आणि सृष्टीच्या लावण्यशोभेने मन बहरून जायचा सुयोग येतो, अशी बाबांची धारणा होती.

प्रवेशद्वारांतून आत आले की, घराच्या पुढचे अंगण व मग घराच्या पायऱ्यांचे दोन मोठे कट्टे होते. त्यांवर संध्याकाळी सूर्यास्ताचे रंग बघत, फुलांचे वास घेत आम्ही गप्पा मारत बसायचो. मे महिन्याच्या सुटीत रात्री आम्ही बाहेर पायऱ्यांवर बसून पत्ते खेळायचो. सुगंध झुळझुळणाऱ्या मंद, शीतल वाऱ्यात पत्ते खेळायला एकदम ताजेतवाने वाटायचे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंनासुद्धा दोन लांब पट्‌ट्या आखून वेगळी बाग केली होती. तिथे इक्झोरा, हजारी मोगरा, बंगाली जास्वंद, गुलाब, रंगीत कर्दळ, सदाफुली; खाली नाजुक पांढरी क्वीन ॲन्स लेस आणि लाजाळू. निरनिराळ्या रंगांच्या डेलियाची व झिनियाची मोठी, मोठी भरघोस फुले लक्ष वेधून घ्यायची. तिथे आणखी एक फार सुंदर झाड बाबांनी मुद्दाम आणून लावले होते, स्नो फ्लेक्स. त्याच्या नव्या कोवळ्या छोट्या पानांचे तुरे अतिशय नाजुक शुभ्र पांढरे, त्याखाली जरा गुलाबी पाने आणि त्याखाली मोठी पोपटी व हिरवी पाने. ते झाड आम्ही नंतर कोठेही पाहिले नाही.

घराच्या पुढच्या भिंतीवर एका बाजूला अबोली व पांढरी अशी दोन्ही रंगांची फुले येणारी मिश्र बोगनवेल वर माडीपर्यंत चढवलेली होती. तिचे फुलांनी डवरलेले, लोंबणारे घोस येणाऱ्या-जाणाऱ्यांचे मन मोहरून टाकायचे. दुसऱ्या बाजूला लाल फुलांची बोगनवेल, पिवळ्या फुलांची कर्णटोप आणि कृष्णकमळांच्या वेली होत्या. दक्षिणेला अंगणात बाजूला नळ होता. त्या शेजारी कुंपणाला लागून रातराणी, निळसर हिरवी अबोली व कण्हेर. फॉक्स ग्लोव्ह आणि धोत्राही होते. तिथे एक वेलही होती. तिच्या इवल्याशा गुलाबी फुलांचे लोंबणारे घोस अतिशय नाजुक आणि मोहक दिसायचे. तिचे नाव इंग्रजीत कोरल व्हाइन किंवा माउन्टन रोझ आहे. तिलाच चेन ऑफ लव्ह असेही म्हणतात. वनस्पतीशास्त्रात तिचे नाव ॲन्टिगोनॉन लेप्टोपस असे आहे. आमच्या आईने या वेलीचे नाव ‘प्रेमलता’ असे ठेवले होते आणि तिचे तणाव म्हणजे प्रेमरज्जू. वेलीची पोपटी पाने बदामी आकाराची होती आणि तिचे लांब पिवळे तणाव खांबाला व कुंपणाच्या तारेला गुंडाळून घेऊन वेलीला आधार देत. बंगालीत या वेलीला अनंतलता म्हणतात, असे नंतर समजले.

उत्तर बाजूच्या अंगणात बाबांनी नक्षीदार, आखीव, रेखीव बाग करायचे ठरवले. बैलगाड्या भरून माती आणून टाकली, गाडीभर विटाही आणल्या होत्या. मातीत रेघा मारून आयताकृती कोंदण आखण्यात आले. बाहेरच्या सीमेच्या रांगेत विटा तिरक्या, एकमेकींवर कललेल्या रोवल्या आणि त्यांना समांतर दीड-दोन फुटांवर आतील विटांची रांग रोवली. उत्तर, दक्षिण या दोन लांब बाजूंपैकी दक्षिणेच्या मधोमध प्रवेशद्वार करून तिथे खांब उभे करून वेल चढवण्यासाठी कमान उभारली होती. प्रवेशाच्या कमानीवर गुलाब होते. त्यांच्या दोन्ही बाजूंस शोभेची फुलझाडे, जमिनीतून दांड्यावर उमलणारे तांबडे मेफ्लॉवर, बर्ड ऑफ पॅरॅडाइज व काही दुर्मिळ फुले. आत प्रवेश केल्यावर मधोमध एक मोठे गोलाकार आळे केले होते आणि त्याच्या डाव्या बाजूला दोन व उजव्या बाजूला दोन गोलाकार छोटी आळी केली होती.

सर्व आळ्यांना विटा तिरक्या लावल्या होत्या. मग या सर्व गोलाकार व आयताकृती कोंदणांच्या विटांच्या बाहेरच्या बाजूस किरमिजी रंगाच्या छोट्या पानांची मेपलची वीतभर उंचीची छोटी रोपे लावली. कंटाळवाणे होऊ नये म्हणून  काही महिन्यांनी ही कोंदणांची पानावली बदलून कधी पोपटी पाने, कधी रंगीबेरंगी पाने, निळसर पाने, पिवळी पाने अशी होस्टाच्या जातीची वा कोलिअसची वेगळ्या रंगाची पानावली लावण्यात येई. सर्व गोलाकार आळ्यांत परिघावर शोभेची, इवलिशी, रंगीत फुलांची रोपे- बटशेवंती, शेवंती, डेझी, आयरीस, फ्लॉक्स, जांभळीलाल ग्लोब ॲमरँथ, होली हॉक, बेगोनिया, ब्लू बेल, प्रिमरोझ इत्यादी. आईला सर्व गुलाबांत सुवासिक गुलाबी गुलाब आवडता असल्यामुळे तो मधल्या मोठ्या वर्तुळात लावला होता. पश्चिमेला म्हणजे त्याच्या डाव्या बाजूच्या दोन वर्तुळांत मोतिया व मोरपंखीचे (थुजा) आकार देऊन वाढवलेले डौलदार, उंच झाड. उजव्या बाजूच्या दोन वर्तुळांत हिरव्या गोल पानांची झिपरी व हिरवट-पोपटी कातरलेल्या पानांची झिपरी.

या सर्वांना पार्श्वभूमी म्हणून उत्तरेच्या लांब कडेला मधोमध चार, पाच कुंदाच्या फुलांच्या झाडांचा मांडव होता. त्यांच्या शेजारी दोन्ही बाजूंना मोगरा, बटमोगरा, वेली मोगरा. आयताकृती कोंदणात पूर्व व पश्चिम कडांना सुवासिक लाल गुलाब, पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, नारिंगी व आणखी काही रंगांचे गुलाब आणि पश्चिमेला उत्तरेच्या कोपऱ्यावर संध्याकाळी उमलणाऱ्या सुवासिक शुभ्र पोपटाच्या (स्टार लिली) फुलांचे पसरट ताटवे, त्यांच्या मागे ग्लॅडिओलस व गुलछडीचे मध्यम उंचीचे ताटवे होते. त्यांना तोल म्हणून पूर्वेला उत्तरेच्या कोपऱ्यावर गवतीचहाचे पसरट ताटवे व त्यांच्या मागे सोनटक्क्यांचे मध्यम उंचीचे ताटवे होते. पसरट ताटव्यांची शोभा त्यांच्या मागील उंच ताटव्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलून दिसत होती. नवरात्रीच्या आसपास आयताच्या बाहेर लावलेल्या तिळाच्या (कॉसमॉस) सोनेरी पिवळ्या व नारिंगी फुलांचे थवे उमलायचे आणि दसऱ्याचे हे सोने दरवळायचे. झेंडूच्या लाल आणि पिवळ्या फुलांचे ताटवेही असायचे. शिवाय सूर्यफुले. आयताकृती कोंदणाबाहेर ही तिळाची व झेंडूची रोपे अशा रीतीने लावली होती की, ती आपोआपच नैसर्गिकरीत्या तिथे उगवली आहेत असे वाटावे. पुढच्या अंगणातील तेरड्यांची इवलिशी रोपेही याच पद्धतीने लावली होती, पण वाटायचे की ती आपोआप उगवली आहेत.

त्या, त्या मोसमानंतर ही तेरड्याची व तिळाची रोपे सुकून जायची, पण त्यांची बीजे पुढच्या वर्षी परत अंकुरायची व परत रंगोत्सव करायची. पावसाळ्यात तेरड्यांचे, गुलबक्षीचे व इतर इटुकल्या शोभेच्या फुलांचे गालिचे वेगळीच रंगशोभा आणायचे. कोंदणातील हिरवी झाडे व त्यांवरील रंगीबेरंगी फुले आणि नवरात्रात भोवतीची सोनेरी, लाल तिळाच्या व झेंडूच्या फुलांची किनार म्हणजे जणू हिरव्या भरजरी शालूस पिवळी किनार! अशी सुंदर बाग लावून सृष्टीला तिचा लावण्यगाभा अंकुरायला बाबांनी जणू आमंत्रण दिले आणि मग सस्यश्यामल, सर्वमंगल सृष्टिदेवी उल्हासाने उमलून, साजशृंगार करून व अनामिक सुगंध शिंपून या अभिनव उद्यानात थाटामाटाने, नित्यनूतन रूपाने दर्शन द्यायला लागली. ऋतुमानाप्रमाणे या मोहिनीची रंगभूषा व वस्त्राभरणे नवनवीन व सदा चैतन्यदायी असतात. ‘फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनि’ हे बंकिमचंद्रांनी केलेले वर्णन बाबांना फार आवडायचे.

आम्ही प्राथमिक शाळेत असता शेजारच्या अंजूच्या वडिलांनी एकदा शेजारपाजारच्या सर्व लहान मुलांचे स्नेहसंमेलन करायचे ठरविले. निरुपमाने सगळ्यांसाठी वेगवेगळे नाच बसविले. मेकअपचे सामान आणले होते. रंगमंचासारखा पडदा वगैरे केला होता. आईने निरुपमासाठी सोनेरी व सुषमासाठी पोपटी रंगाची सॅटिनची परकर, पोलकी शिवून घेतली. आमच्या गल्लीतील सर्व लोक संमेलनाला आले होते. खूप मजा आली. आम्ही माडगूळकाकांच्या भावगीतावर एक नाच केला.

हिरव्या साडीस पिवळी किनार ग

रानी लिंबास आला बहार ग।।

रानावनांतील या हिरव्या पिवळ्या रंगबहाराचे वर्णन बाबांच्या शारदीय उपवनाला अगदी जुळणारे होते. वाऱ्याने सूर धरून त्यातील झाडे, फुले डोलू लागली की, वाटायचे :

नाच झाला ग झाला सुरू

किती आनंद डोळां भरू।।

काही फुले व झाडे बारमास असतात व फुलतात, तर काही केवळ ठरावीक मोसमात फुलतात. बाबांनी बागेची रचना अशा सुरेख रीतीने केली होती की, वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळी फुले रंगसंगती साधून योग्य जागी फुलतील. त्यामुळे प्रत्येक मोसमात निराळेच नयनरम्य दृश्य दिसायचे. ऋतुसंहारमध्ये कालिदासाने निरनिराळ्या ऋतूंचे केलेले वर्णन आई-बाबांना फार आवडायचे. श्रावणमासी हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोहींकडे क्षणांत येतें सरसर शिरवें क्षणांत फिरुनी ऊन पडे! ही बालकवींची कविता आई नेहमी म्हणायची. सजल  कृष्णमेघ दाटून सरीवर सरी येऊन गेल्यावर पिवळ्या उन्हाचा शिडकावा, हे श्रावणातील क्षणोक्षणी बदलणारे सृष्टीचे रूप आईबाबांना मोहिनी घालायचे. स्थळ तेच पण प्रकाश कमी-अधिक, त्याची दिशाही वेगळी; यामुळे एखाद्या स्थळाचे सृष्टिसौंदर्य दिवसाच्या व ऋतूच्या वेगवेगळ्या समयी वेगवेगळे दिसते.

कांठोकांठ भरू द्या पेला, फेंस भराभर उसळूं द्या!

प्राशन करितां रंग जगाचे, क्षणोक्षणीं ते बदलूं द्या!!

असे केशवसुत म्हणतात. पण कुठलाही पेला प्राशन न करिताच रंग जगाचे क्षणोक्षणी बदलण्याची किमया रविकिरण सदोदित करीत असतात. हे स्फूर्तिदायक वाटून मोने, रेन्वा आदी फ्रेंच इंप्रेशनिस्ट चित्रकार एकाच स्थळाची निसर्गचित्रे वेगवेगळ्या वेळी चितारीत असत. बाबांच्या उपवनात बसून चित्रे रंगवायला त्यांना आकर्षक असे अनेक विषय व स्थळे मिळाली असती आणि आनंदाचा ठेवाच गवसला असता. रेन्वा व मोनेने तिथे अनेक सुंदर चित्रे रंगवून आनंदाची लूटी केली असती, असे बाबा म्हणायचे. या आयताकृती बागेच्या बाहेर पायवाट सोडल्यावर घराच्या उत्तर बाजूच्या भिंतीला समांतर, लांब अशी आणखी एक पट्टी विटांनी आखून त्यांत रातराणी, देवकापूस, रंगीबेरंगी गुलाब, बंगाली जास्वंद व रंगीबेरंगी जास्वंदीची झाडे लावली होती. लाल, नारिंगी, पांढरी, मिश्र अशा विविध रंगांच्या कर्दळीची झाडेही त्या पट्टीत होती. कोथिंबीर व मेथीचे वाफे केले होते. ओवाही लावला होता. या पट्टीच्या पुढच्या टोकाला एक पेरूचे झाड जिन्याच्या भिंतीला लागून होते. त्याला छोटे, छोटे पण अतिशय गोड पेरू यायचे, बिनबियांचे. त्याच्या फांद्या माडीच्याही वरपर्यंत पसरलेल्या होत्या. माडीवरच्या गॅलरीत त्या टोकाच्या कठड्यांना धरून आम्ही वाकून पेरूच्या फांद्या वळवून घ्यायचो आणि त्यांना लगडलेले ताजेताजे पेरू तोडून आवडीने खायचो. त्या झाडाला खूप पेरू यायचे. त्यापूर्वी नाजुक, सुंदर बहर यायचा. त्या झाडावर नेहमी खूप पोपट यायचे. त्या रांगेत अगदी मागच्या बाजूला परत रातराणी. त्यामागे मोठ्या आगरात सफेद वेलचीच्या केळीच्या झाडांवर केळ्यांचे घड आणि केळफुले लोंबत असायची.

काही दुर्मिळ फुलांची नावे माहीत नाहीत, पण रंगरूप लक्षात आहे. काही झाडे कुंड्यांमध्ये लावली होती. ती योग्य जागी रंगसंगतीप्रमाणे ठेवली जायची व बदल म्हणून कधी वेगळ्या जागी. क्रोटॉन, फर्न, नागफडा (सॅन्सिव्हियेरा), मखमल (कॉक्सकोंब) यांबरोबरच कुंड्यांमधून वेलींसारख्या, खाली लोंबणाऱ्या नाजुक फांद्यांवर लगडलेले गुलबाक्षी, तांबडे, पिवळे आणि पांढरे चिन्नी गुलाब (पोर्टुलाका ग्रॅन्डिओसा). चिन्नीचा हिंदीतील अर्थ छोटा असा आहे. आयताकृती कोंदणाच्या पुढे व मागे अंगण होते. पश्चिमेला कोंदणातील बागेत 8 ते 10 फूट उंच थुजा आणि पूर्वेला कोंदणाबाहेरील अंगणाच्या मागे खूप उंचच उंच बेलाचा वृक्ष, अशा उंच झाडांमुळे चित्रासारखा तोल साधला होता. बेलाचा भव्य वृक्ष फार मनोहर व भारदस्त होता. त्यालाही कापून आकार दिला जायचा. शुभ्र फुलांचा मोहर येऊन बहरल्यावर तो मोराच्या पिसाऱ्यासारखा डौलदार दिसायचा. पुढील नक्षीदार, शोभिवंत बागेच्या पार्श्वभूमीवर त्याचे सौंदर्य आणखीच खुलायचे. त्याला मोहोर आला व मग बेलफळे लगडली की, त्या समृद्धीचा मंद सुगंध चैतन्यदायी वाटायचा. खाली दवणा आणि मरवाही लावले होते. चंदन जेवीं भरला, अश्वत्थ फुलला असा बागेतील फुलांचा परिमळू झुळकायचा.

रस्त्यावरून येणारेजाणारे थांबून बाबांची ही बाग बघायचे व कौतुक करायचे. फ्रेंच चित्रकार मोनेच्या चित्रासारखी ही देखणी कलाकृतीच होती. अनेक जण बेलाची पाने घेऊन जायचे. बेलाच्या वृक्षाखाली छोटेसे तुळशी वृंदावन होते आणि त्यापुढे पारिजातक आणि हिरवा चाफा बहरलेले. पावसाळ्यात उष:काली, थोडे धुक्यासारखे अंधुक वातावरण, हवेत ओला गारवा, अजून तांबडे फुटलेले नाही, काळोख नुकताच सरायला लागून मंदसा प्रकाश अगदी हलकेच येत आहे, अशा वेळी बेलाच्या वृक्षाखाली जटांसारख्या सर्व बाजूंनी फांद्या खालपर्यंत लवणाऱ्या प्राजक्ताच्या झाडावर नाजुक मोत्यांचा फुलोरा येऊन ते पूर्णत: शुभ्र कुसुमित झाले की भस्मांगरागी ध्यानस्थ शिवासारखे पवित्र दिसते, असे आई म्हणायची. प्राजक्ताच्या नाजुक, सुवासिक फुलांचा सडाही खाली शिंपलेला असायचा. माणिक मोत्यांची पायांशी बरसात घालून बसलेल्या संन्यस्त पारिजाताचे कुसुमाग्रजांनी कौतुक केले आहे. कुमार गंधर्वांनाही प्राजक्ताची फुले खूप आवडायची, असे त्यांनी बाबांना सांगितले होते.

पुण्याला निरुपमा आणि बाबा भीमसेन जोशी यांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांची ‘रागेश्री’तील बाग, मोगरा, रातराणी बाबांना मुद्दाम  दाखवली होती. बेलाच्या झाडामागे दक्षिणाभिमुख बेडे होते. उत्तरेला बेड्याच्या डाव्या बाजूस छोटे अंगण होते. त्यात फणस, पपई, शेवगा आणि खाली लाल, पिवळी व मिश्ररंगी गुलबाक्षी, कृष्ण तुळस आणि रंगीत अळू (कॅलॅडियम) व भाजीचे अळू. शेवग्याला पांढरा शुभ्र मोहर आला की, ते झाड फार सुंदर दिसायचे. मोहाच्या शेंगांचे ते झाड होते, साध्या शेंगा नव्हे. त्यामुळे त्या शेकटाच्या शेंगा चांगल्या गरेवाल्या व गोड असायच्या. बाबांना शेकटाच्या शेंगा घातलेली आमटी खूप आवडायची.

ना. ग. गोऱ्यांनी पुण्यातील निरनिराळ्या फुलांचे लालित्यपूर्ण वर्णन केले आहे. त्यातील गुलबक्षीचे वर्णन बाबांना फार आवडले होते. पुष्पांजलीतील ‘नारायणं नमस्कृत्य’ या गोऱ्यांवरील आदरांजलीत बाबांनी त्यावर लिहिले आहे. बेड्याच्या उजव्या बाजूच्या (दक्षिणेच्या) अंगणात विहीर होती. बाजूच्या ओट्यावर कपडे धुण्यासाठी मोठा दगड, नळ आणि स्नानगृह बांधलेले होते. आजीचे कमोड साफ करणारा तुळशीदास फार भाविक होता. आल्याबरोबर विहिरीचे पाणी काढून, प्रथम हात, पाय धुऊन तो तुळशीला व बेलाला पाणी घालायचा, त्यांना नमस्कार करायचा व मगच सफाईकाम करायचा. त्याचे आईवडील सफाई कामगारांचे मुकादम होते. दर वर्षी ते सत्यनारायण करायचे व नानांना जेवायला बोलवायचे. आईला वेळ असेल तर आईला बोलवायचे. नाना दर वर्षी त्यांच्याकडे जायचे. आई वेळ मिळेल तेव्हा जायची. ते सर्व कुटुंब अतिशय चांगले होते. पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढी बेलाची पाने घेऊन जा, असे बाबांनी तुळशीदासला सांगितले होते. तो ओरबाडत नसे. काही अनोळखी लोक पोतेभर पाने ओरबाडून न्यायला लागले, तर मात्र बाबांना राग यायचा.

एक दिवस तुळशीदास विहिरीचे पाणी काढत होता व तुळशीला नमस्कार करीत होता. आमच्याकडे बाहेरगावाहून आलेल्या एकीने ते पाहिले व ती त्याला म्हणाली की, त्याने विहिरीचे पाणी काढायचे नाही व तुळशीची पूजा करायची नाही. आम्ही सर्व तिचे बोलणे ऐकून थक्कच झालो. तुळशीदासही थक्क झाला, कारण त्याला आमच्या घरात असे कोणी कधी वागविले नव्हते. आम्ही तेव्हा लहान होतो. बाबा माडीवर त्यांच्या खोलीत वाचत होते. त्यांनी पाहुणीचा मोठ्‌ठा आवाज ऐकला. त्यांना संतापच आला. बाबांनी तुळशीदासला वरून ओरडून सांगितले की, त्याला पाहिजे तेवढे पाणी त्याने काढावे आणि तुळशीची पूजा पाहिजे तेव्हा करावी व बेलाची पाने पाहिजे तेवढी घ्यावी, कोणीही त्याला काहीही बोलणार नाही. ती पाहुणी तुळशीदासला बोलली, हे आई व आजी-नानानांही आवडले नाही. आईने त्या पाहुणीला सांगितले की, तुळशीदासला किंवा कोणालाच असे बोलणे योग्य नाही. बाबांनी लगेचच त्याची बाजू घेतल्यामुळे तो नेहमीसारखा वावरायला लागला. इकडे अमेरिकेत आल्यावरही आईबाबा त्या घटनेबद्दल विषादाने बोलत.

घराच्या मागच्या परसात भले मोठे उंच नारळाचे झाड आणि दोन बाजूंना दोन अशी आवळ्याची मोठी चार झाडे होती. आवळ्याच्या झाडांच्या खाली एका बाजूला सुवासिक गोंडेरी तगर आणि मोगरा व दुसऱ्या बाजूला अबोली व मोगऱ्याची रोपे होती. आवळ्याला मोठमोठे आवळे यायचे. आंबट, आंबट आवळे झाडावर चढून खायला आम्हाला खूप मजा वाटायची. आई मोरावळा आणि आवळ्याची साखर करायची. आवळ्याच्या झाडांवर कारंद्याची वेल चढवली होती. घोसाळ्याची वेलही होती. नारळ आणि आवळा यांच्या खालच्या अंगणात बाबांनी छान मांडव करून दुधी भोपळा, पडवळ, काकडी, टोमॅटो, घेवडा इत्यादी लावले होते. मिरचीही होती. नारळाखाली सफेद वेलची केळ्याचे आणखी एक आगर होते. खाली सुरण लावला होता. कोहळाही होता. आई कारंद्याची खीर, दुधी हलवा, कोहळ्याचा हलवा, कोहळ्याच्या वड्या उत्तम करायची. भोपळा, पडवळ, सुरण, केळफूल यांच्या ताज्या, ताज्या भाज्या फार छान लागायच्या.

सीताफळ व चार रत्नागिरी हापूस आंब्याची झाडे डावीकडे होती. कैऱ्या खायला आम्हाला आवडायचे. बेड्याच्या पत्री छपरावर चढून आम्ही कैऱ्या व आंबे तोडायचो. गवत टाकून आंब्याची आढी घातली जाई. बाजारातून कैऱ्या आणून वेगवेगळ्या प्रकारचे लोणचेही केले जाई. मागील अंगणात बाबांनी नारळाची छोटी झाडे, आंब्याचे एक छोटे झाड व त्याशेजारी कढीलिंबाचे व लिंबाचे झाडही लावले होते. लिंबाचे डेरेदार झाड फार सुंदर होते. लिंबाला खूप लिंबे यायची. लिंबांच्या शीतल सुवासामुळे वातावरण ताजे व प्रसन्न वाटायचे. पानेही खुडली तर छान वास यायचा. सुभाषचंद्रांची मंडालेहून  पाठवलेली पत्रे अलीकडे वाचताना त्यात टिळकांनी मंडालेत असताना लिंबाचे झाड लावल्याचा उल्लेख वाचून बाबांना फार छान वाटले होते. सुभाषचंद्रांनी पाऊस आणि वादळाचे अप्रतिम वर्णन केले आहे, ते बाबांना आवडले. भावेकाकांनीही पावसाचे फार सुंदर वर्णन केले होते, हे आठवले. बंकिमचंद्रांनी ‘मलयज शीतलाम्‌’ अशा झुळुकेचे कौतुक केले आहे. सकाळी बागेत मलयमारुतम्‌ रागाची कर्नाटक संगीतातील त्यागराजाची कृती वा त्याच रागाचे रवी शंकर यांचे सतारवादन ऐकल्यावर असाच सुखद अनुभव येतो, असे बाबांना वाटे.

आंब्याच्या मोठ्या झाडांमागे लालचाफा, देवचाफा आणि नागचाफा होते. मागच्या कुंपणावर कोरांटी होती. तिच्या शेजारी हळदीकुंकूचे (लँटाना) झाड होते. त्याला पिवळ्या आणि तांबड्या रंगाच्या अगदी इटुकल्या नाजुक फुलांचे गुच्छ यायचे. अशा सुंदर फुलांना ‘घाणेरी’ हे रुक्ष नाव मराठी लोकांशिवाय कोणाला सुचणार नाही, असे बाबा म्हणत. कोपऱ्यांत उंच झाड होते बुचाचे (इंडियन कॉर्क). लांब दांड्याच्या नाजुक शुभ्र फुलांच्या लोंबणाऱ्या घोसांनी ते बहरून जायचे आणि ती अप्रतिम सुगंधी फुले वाऱ्याने जमिनीवर पडायची. देठे एकमेकांत गुंफून आम्ही त्या फुलांची वेणी करून केसांत घालायचो. विविध पाने व फुले रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांच्या पात्रांमध्ये बाबांसाठी त्यांच्या अभ्यासिकेत आई पुष्परचना करून ठेवायची. बुचाची झाडे गोव्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावली आहेत. त्यामुळे सावलीबरोबरच सुगंधी वातावरणात मन प्रसन्न होते. आपल्याकडे मुंबईला रस्त्यांवर अशी झाडे नाहीत याची बाबांना खंत वाटायची. या बुचाच्या फुलांना बंगलोरमध्ये ‘आकाशमल्लिका’ असे सुंदर नाव आहे. काही फुलांची मराठी नावे फार रुक्ष असतात, त्यांचीच बंगाली वा दुसरी काव्यमय नावे कळली की बाबांना फार आवडायची. बूच, सुरंगी, बकुळ, शिरीष, गुलमोहर, कॅशिया (पिवळा व गुलाबी) अशी सावली देणारी मोठी व सुंदर वा सुवासिक फुलांची झाडे रस्त्यांच्या कडेला लावावी, अशी त्यांनी सूचनाही केली होती.

घराच्या मागे विहिरीवर वाकलेले तुतीचे एक झाड होते. त्याला लाल लाल तुती यायच्या. आंबट लागायच्या. पिकल्या की त्या काळ्या व्हायच्या आणि गोड लागायच्या. कधी कधी माडीवरील बाबांच्या अभ्यासिकेतील खिडकीतून कौलांवर उतरून आम्ही तुतीची फांदी वाकवून तुती काढायचो. तुतीच्या पानावर रेशमाचे किडे बघितल्याचे आठवते. तुतीच्या बाजूच्या, दक्षिणेच्या कुंपणाजवळ रामफळ व अलाहाबादी पेरूची झाडे होती. त्यावर पोपट यायचे. रामफळे सुमधुर, सुंदर आणि छान गर असलेली. बाहेरची सालही एकदम पातळ, नाजुक, फुलासारखी गुलाबी. पेरूला भले मोठे, गोड पेरू यायचे.

पेरूची जाडजूड आडवी फांदी आम्हाला तीवर बसायला आणि लोंबकाळायला बोलवायची. आंबा, आवळा, पेरू, रामफळ या सर्व झाडांवर चढायला व लोंबकाळायला आम्हाला व आमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना खूप मजा वाटायची. आम्ही बागेत व या मोठ्या झाडांभोवती लपंडावही खेळायचो. अंगणात लंगडी, लगोरी, विटीदांडू, दोरीच्या उड्या, झिम्मा, फुगडी, भोवरा, चेंडू व क्रिकेट असे विविध खेळ आम्ही खेळायचो. संध्याकाळी कार्यालयातून कितीही उशिरा आले तरी बाबा बादल्यांनी विहिरींतून पाणी काढून बादलीने वा भल्या मोठ्या झारीने सर्व बागेला पाणी घालायचे. संध्याकाळी पाणी घालताना गाणी ऐकायचे. सैगल, पंकज किंवा शास्त्रीय वा नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका व गीतरामायण आणि अमरभूपाळी यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्यावर त्या लावलेल्या असायच्या. रातराणी, गुलाब, मोगरा, पारिजात, जाई-जुई, चमेली अशा सुवासांनी पंकज मलिकची ‘महक रही फुलवारी’ प्रत्यक्षात अनुभवाला यायची आणि बाबांना एकदम ताजेतवाने वाटायचे. मग ते परत अंघोळ करून वाचायला बसायचे. बागेत आमचा कुत्रा टायगर आनंदाने उड्या मारत बाबांभोवती इकडून तिकडे पळत असायचा आणि बाबा लिहायला बसले की, त्यांच्या पायांवर डोके ठेवून झोपून जायचा.

रविवारीसुद्धा बागकाम करताना अमरभूपाळी वगैरे ध्वनिमुद्रिका मोठ्याने लावलेल्या असायच्या. गल्लीतील सर्वांना ही गाणी ऐकायला आवडायचे. बाबा नवी झाडे लावायला खड्डा खणायला लागले की टायगरही पायाने माती उकरून बागकामात सामील व्हायचा. नंतर बेलाच्या वृक्षापुढे एका बाजूला पाणी साठवण्यासाठी टाकी बांधल्यावर तिच्या नळाला लांबलचक नळी व तिच्या टोकाला झरणी लावून पाणी घालणे सुरू झाले. यामुळे झारी उचलण्याची वा विहिरीचे पाणी काढण्याची गरज राहिली नाही. नळीने एकमेकांच्या अंगावर फवारा  उडवायलाही गंमत वाटायची. उन्हाळ्यात तर थंडगार, सुखद वाटायचे. लहानपणी रंगपंचमीला आम्ही त्या टाकीत पाणी भरून त्यांत रंग टाकायचो. सर्व मित्रमैत्रिणींसह त्यांतून पिचकाऱ्या भरून घेऊन एकमेकांवर रंग उडवायचो. नवरात्रात बेलाच्या झाडाखालच्या अंगणात लाल रंगाच्या सुबक पाटावर रांगोळीने हत्तीचे चित्र काढून त्याभोवती सुंदर फुलांची नक्षी करून आम्ही आमच्या सखयांबरोबर त्या पाटाभोवती भोंडला करायचो. भोंडल्याची गाणी रंगात येऊन मोठ्याने म्हणायला फार छान वाटायचे.

नवरात्रात आई रोज नवा खाऊ करायची. अनेक रंगांच्या व प्रकारच्या परड्या आईने घेतल्या होत्या. त्यांत आम्ही बागेतली फुले गोळा करायचो आणि मग गजरे, हार, वेण्या, पुष्परचना वगैरे करायचो. आईने हे आम्हाला शिकविले होते. घोसाळी सुकवून, बाहेरचे कठीण कवच व आतील बिया काढून टाकून घोसाळ्यांची छानदार, हलकीशी, सुबक परडी करायला आजीने शिकवले होते. परडीला घोसाळ्याच्याच एका जाळीदार भागाच्या किनारी लावून नक्षी केली होती. परडीची दांडीही अशीच नक्षीदार पण मऊ होती, तिला रेशमी कापडाचे वेष्टन शिवले होते. डोंबिवलीला आम्ही शाळेत रोज कुंद, मोगरा, चमेली, बुच वगैरे गजरे, वेण्या, गुलाबाची फुले केसांत घालून जायचो आणि आमच्या आवडत्या बार्इंनाही गजरे व फुले द्यायचो.

कोपऱ्यावर जोश्यांच्या घरी बकुळीचे प्रचंड मोठे झाड होते. त्या फुलांची पखरण नेहमी जमिनीवर असायची. त्यांचेही गजरे आम्ही करायचो. सुरंगीची फुले डोंबिवलीत नव्हती, पण सुरंगीच्या नाजुक, सुगंधी, सोनेरीपिवळ्या फुलांचे गजरे ठाण्याहून येताना शांतामावशी घेऊन यायची. डोंबिवलीला तसेच नंतर चर्चगेटलाही सुवासिक व शोभेच्या फुलांची सुबक पुष्परचना करून ठेवायची आईला हौस होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगांची व आकारांची धातूची, लाकडाची, काचेची अनेक पात्रे तिने घेतली होती. जपानी इकेबाना पुष्परचनाही करण्यात यायची. आमच्याकडे इकेबानाची चित्रे असलेली कॅलेन्डर्स नेहमी असायची.

कचरू व बाळू हे बागेत कामाला मदत करायचे. विटांची, मातीची व खताची गाडी आली की आळी करणे, खत घालणे वगैरेही करायचे. आधी मातीचे थर घालून, जमीन धोपटून मग शेणाने मागचे व पुढचे अंगण सारवणे, ही कामेही ते करायचे. आम्हीही अंगण सारवायला जायचो. अंगण धोपटण्याचे काम ते दोघे करायचे. ते आम्हा सर्वांना घरच्या नातलगांसारखे होते. अनेक वर्षांचे, नेहमीचे होते. आमच्या शेजारच्या बंगल्यातही ते काम करायचे. बाळू नारळाच्या उंचच उंच झाडावर सहज चढून नारळ काढायचा. शहाळे व त्याचे पाणी फार छान लागायचे. कचरू अतिशय प्रामाणिक होता. मे महिन्यात तो मीठ लावून चिंचेचे मोठे, मोठे गोळे करून माळ्यावर भल्या मोठ्या रांजणांत भरून ठेवायचा. आम्ही तेव्हा खूपच लहान होतो. गोळे करताना आम्ही त्याच्यासमोर बसायचो. मग तो आम्हाला ती मीठ लावलेली चिंच खायला द्यायचा, ती आम्ही मिटक्या मारत खूप आनंदाने खायचो. त्याच्याबरोबर माळ्यावरही जायचो, कारण माळ्याचा दरवाजा फार जड होता. तो झाकणासारखा वरती उघडला जायचा. आम्हाला उघडता यायचा नाही. त्यामुळे कचरू माळ्यावर गेला की, आम्हाला संधी मिळायची.

आमच्या समोरच्या वाड्यात चिंचेचे झाड होते. त्याच्या कच्च्या हिरव्या चिंचा तसेच पिकलेल्या गाभुळलेल्या चिंचा आम्हाला व सर्व मित्रमैत्रिणींना आवडायच्या. एवढेच काय, चिंचेची कोवळी, पोपटी इवलीशी आंबट, आंबट पानेही आम्ही आवडीने खायचो. पोंक्षेकाकांची व आणखी एकाची (त्यांचे नाव आठवत नाही) अशा दोन नर्सरी तेव्हा डोंबिवलीत होत्या. पोंक्षेकाकांना आणि नर्सरीवाल्यांना आमच्या बागेत आणून माती, खत वगैरेबद्दल बाबा सल्ला विचारायचे. त्यांच्याकडून झाडे विकत आणायचे. मुंबईमधील नर्सरीतूनही बाबा झाडे आणायचे. काही फुले, झाडे फक्त आमच्याकडेच होती. वेळोवेळी माती बदलली जायची, खते घातली जायची. रविवारी भावेकाका अनेकदा आमच्या बागेत फेरी मारून नवीन काय लावले आहे, हे बघत असत. गाणे गुणगुणत, वासाला मोगरा, गुलाब, चमेली खुडून घेत. माडगूळकरकाका आले की, त्यांनाही आमच्या बागेत फिरायला आवडायचे. आणखी कोणी लेखक, कलावंत मित्र येत, तेव्हा तेही आमच्या बागेचा दौरा करीत. आईसुद्धा त्यांना बाग दाखवीत असे.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा : https://weeklysadhana.in/archive/view_article/nirupama-sushma-on-flowers-02

Tags: ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर dnyanmurti govind talwalkar सुषमा निरुपमा sushma nirupama गोविंद तळवलकर flowers govind talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
stalwalkar@hotmail.com

लेखक, संपादक गोविंद तळवलकर यांच्या कन्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके