डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हॉस्पिटलमध्ये बाबांचे डोळे तपासून आम्ही घरी यायचो, तेव्हा नेहमी खूप झाडी असलेल्या मार्गानेच यायचो. पण जर आम्हाला वाटेत कुठच्या दुकानात जायचे असेल, तर दुसऱ्या मार्गाने यायचो. त्या रस्त्यावर विशेष झाडे नाहीत. त्यामुळे बाबा लगेच म्हणायचे, ‘‘कोठच्या भागात तुम्ही मला घेऊन आला आहात? परत मी या भागात येणार नाही.’’ ऋतुमानाप्रमाणे जपानी चेरी, सफरचंद, मॅग्नोलिया (कवठी चाफ्याची एक जात), विस्टेरिया, डॉगवूड वगैरे झाडांचा बहरलेला फुलोरा बघायला आम्ही चौघे नेहमी जायचो. विविध रंगांच्या विस्टेरियाच्या फुलांचे लोंबणारे घोस मोनेच्या सुंदर चित्रांची आठवण करून देतात. शरद ऋतूत पानगळ सुरू होण्याआधी झाडांची हिरवी पाने तांबूस, लाल, पिवळी होऊन रंगांचा बहरच येतो. ‘‘ही झाडांची रंगपंचमी आहे, सृष्टीचे कौतुक आहे’’, असे आई-बाबा म्हणायचे. वॉशिंग्टन डी.सी.मधील जपानी चेरी ब्लॉसम दोघांना अतिशय आवडायचा.

 

(पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा: https://weeklysadhana.in/archive/view_article/nirupama-sushma-on-flowers-01 )

संपादक होऊन चर्चगेटला राहायला गेल्यावर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये बाबांनी धुरंधर यांना बागेबद्दल सदर लिहिण्यास सांगितले होते. त्यांच्याशीही बाबा फुलांबद्दल आवडीने चर्चा करायचे. फ्लोरीबंडाबद्दलचा धुरंधरकाकांचा लेख आम्हाला आवडला होता. ते आमच्या घरीही यायचे. जंगल व पशूपक्षी यांच्यावर बाबांचे नितांत प्रेम होते. एकंदरच सर्व निसर्गसंपत्तीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे, अशी बाबांची भावना होती. त्यामुळेच मारुती चितमपल्ली यांचेही लेख बाबांनी ‘म.टा.’त प्रसिद्ध केले होते. नागपूरच्या भागातील जंगले पाहण्यास बाबांनी यावे, अशी चितमपल्ली यांची इच्छा होती. बाबांनाही जायचे होते, पण ते राहूनच गेले. चंदनाचे झाड समृद्ध जमिनीत येते पण त्याला वास येत नाही, परंतु खडकाळ जमिनीतील चंदनाच्या झाडाला सर्वांत चांगला सुगंध येतो, ही चितमपल्लींनी दिलेली माहिती बाबांना आवडली होती.

चर्चगेटलाही आमच्या गॅलरीत गुलाब, मोगरा, वेलमोगरा, इक्झोरा, रंगीबेरंगी कर्दळ वगैरे होते. तिथे संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर आई व आम्ही दोघी असे तिघींसाठी केसांत घालायला मोगऱ्याचे गजरे रोज घेतले जायचे आणि एक बाबांना वास घ्यायला. चर्चगेटला एका रस्त्यावर लॅबर्नमची झाडे आहेत. त्याचे पिवळ्या रंगाचे लोंबणारे सुंदर घोस बाबांना अतिशय आवडायचे. त्या रस्त्याचे नावच लॅबर्नम स्ट्रीट आहे. आम्ही चर्चगेटला राम महालमध्ये राहायला आल्यावर बाबा आम्हाला ती झाडे दाखवायला लगेच घेऊन गेले होते. हँगिंग गार्डन व म्हातारीचा बूट बघायलाही त्यांनी आम्हाला नेले होते. राम महालच्यापुढे कॅशियाचे भले मोठे झाड होते. त्याला पिवळ्या फुलांचा बहर यायचा. तो बाबांना आवडायचा. पोपटांचे थवे त्यांवर बसायचे. तिथे बाबांना गुलमोहरही हवा होता. पुण्याला संभाजी पार्कमधील गुलमोहराची झाडे त्यांना फार आवडायची. मे महिन्याच्या सुटीत आम्ही पुण्याला जायचो, तेव्हा आई आम्हाला संभाजी बागेत व पेशवे बागेत रोज न्यायची. आम्ही दोघी गुलमोहराच्या फुलांची काटाकाटी खेळायचो.

दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातील बाग दाखवायला बाबा आम्हाला तिघींना घेऊन गेले होते. ती त्यांना फार आकर्षक वाटायची. भारतात अनेक निसर्गरम्य स्थळी आई-बाबा आम्हाला नेत असत. उत्तरेत सिमला, मसुरी, डेहराडून, पालमपूर, दिल्ली, आग्रा येथील सुंदर फुले आणि बागा आम्ही पाहिल्या, तसेच दक्षिणेतही वृंदावन गार्डन, उटी इत्यादी. बंगलोरजवळ एक चारशे वर्षांचा पुरातन, भला थोरला, सुंदर वटवृक्ष आहे. त्याचे आम्ही बरेच फोटो काढले होते. अनेक ठिकाणी आम्ही जंगल, उसाची शेते, कापसाची शेते, ज्वारी-बाजरीची शेते, द्राक्षांचे मळे, चहाचे मळे, कॉफीचे मळे, लिंबाच्या बागा, फळबागा, सिमल्याला बटाट्याची शेते बघायला गेलो होतो. तिथे काय नवीन, आधुनिक पद्धती वा यंत्रणा वापरतात, याबद्दल बाबांना उत्सुकता असायची. लिंबांच्या बागेतील तजेलदार, थंड सुगंधाच्या झुळकेने एकदम प्रसन्न वाटल्याची आठवण अजूनही ताजी आहे.

हिमालयाचे आम्हाला सर्वांना प्रेमादरपूर्वक आकर्षण होते. त्याची मेघमालांनी वेढलेली हिमाच्छादित शिखरे आणि सूर्यकिरणांचे त्यावरील गूढ नृत्य पाहिल्यावर ऋषीमुनींना, योग्यांना इथे ध्यानधारणा करायला का आवडले, याबद्दल संदेह राहत नाही. ‘अस्ति उत्तरस्याम्‌ दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।।’ असे कालिदासाने हिमालयाला गौरविले आहे. नास्तिक असतील तरी येथे काही तरी दैवी सौंदर्य आहे असे वाटेल, असे बाबा म्हणायचे. हेमंतकुमार या आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात सुभाषचंद्र म्हणतात : ‘‘दार्जिलिंगसारख्या ठिकाणी आपल्या भावना उचंबळून येतात. हिमालयाचे दर्शन होते. एकांतात राहून मनन, चिंतन करायचे असेल तर या भागासारखा भाग केव्हाही उत्तम. समोर कांचनगंगा आहे. आमचा बिनशिकलेला स्वयंपाकी म्हणाला की, स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता तिथून आहे. त्याचे ते म्हणणे इतर काहींना हास्यकारक वाटते, पण मला तसे वाटत नाही.’’ मधुघटमधील ‘सुभाषबाबूंचा काव्यशास्त्रविनोद’ या लेखात बाबांनी हे दिले आहे. नेहरूंनाही हिमालय फार आवडायचा. ‘आनंदयात्री आचार्य’ या पुष्पांजलीतील काका कालेलकरांवरील मृत्युलेखात कालेलकरांनी हिमालयातील वनश्रीचे केलेले मनोहारी वर्णन तसेच भारतातील नद्यांचे लोकमाता म्हणून केलेले मनोद्य रूपाचे चित्रण याबद्दल बाबांनी लिहिले आहे.

लोकमाता बाबांना फार आवडायचे. त्यांनी आम्हाला ते केव्हाच वाचायला सांगितले होते. आम्ही सिमल्याला कर्झनच्या घरी जाऊन त्याची बागही बघितली होती. अनेक रंगांच्या पॅन्सी तेथे होत्या. भली मोठी गोंडेदार डेलिया, झिनिया व झेंडूची फुले बघून प्रसन्न वाटले. मसुरीलाही अशीच गोंडेदार फुले पाहिली होती. सिमला, कुलू, मनालीला देवदार व पॉपलरच्या वृक्षांच्या रांगा आणि पार्श्वभूमीवर हिमालय हे दृश्य अवर्णनीय होते. पूर्वीच्या जमान्यातील प्रसिद्ध नटी देविकाराणी हिने रशियन चित्रकार निकोलस रोरिक याच्या मुलाशी लग्न केले होते. कुलूला निकोलस रोरिकचे चित्रसंग्रहालय आहे. ते बघायला बाबा आम्हाला घेऊन गेले होते. तिथे रोरिकने काढलेली हिमालयाची निसर्गचित्रे आहेत. ती आम्हाला खूप आवडली. निकोलस रोरिकने हिंदू व बौद्ध धर्मांचा अभ्यास व योगाभ्यास केला होता तसेच रामकृष्ण परमहंस, टागोर आदीही वाचले होते; नेहरू व गांधी यांची व्यक्तिचित्रेही काढली होती.

युरोप व अमेरिकेतील फुलांना आपल्या भारतातील फुलांसारखा सुगंध येत नाही. अगदी मोगऱ्याचे फूलसुद्धा नाकाला लावून वास घ्यायला लागतो. याउलट, भारतात ‘मोगरा फुलला’ हे लांबवर झुळूक येऊन आपल्याला सांगते. सुवासिक फुलांचा परिमळ सर्व आसमंतात दरवळलेला असतो, गगनावरी जाऊन ताऱ्यांनाही सांगतो. हा फरक अमेरिकेत प्रकर्षाने जाणवतो. बाबा यावर नेहमी बोलायचे. भारतातसुद्धा विलायती गुलाब आकाराने मोठे, डौलदार, अनेक रंगी आणि सुंदर दिसतात. असा थाट जोरदार, पण वास नावापुरता. आपले देशी गुलाब आकाराने किरकोळ असले तरी किती सुवासिक असतात. मोगरा, चमेली इत्यादी आपल्या फुलांचे हेच वैशिष्ट्य आहे आणि त्यांतही किती तऱ्हा! प्रत्येक फुलाचा परिमळु वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण. भारतातील आपल्या सर्वच सुवासिक फुलांना जगात तोड नाही, असे आई-बाबा कौतुकाने म्हणायचे.

आम्ही दोघी लंडनला होतो तेव्हा भावेकाकांना पत्रांतून कळवले होते की, इंग्लंडमधील फुले दिसायला सुंदर असली तरी त्यांना गंध नाही. भावेकाकांना फार आश्चर्य वाटले. ते कधी परदेशात गेले नव्हते. त्यांनी आम्हाला लिहिले की, पाश्चिमात्य लोकांच्या चेहऱ्यांवर जसे भाव नसतात तसेच तिथे फुलांनाही गंध नाही, असे दिसते. वनस्पती सजीव असून त्यांना संवेदना असतात, हे शास्त्रसिद्ध केल्यामुळे जगदीशचन्द्र बोसांना ‘वनस्पतींचे वाचस्पती’ म्हणतात. त्यांच्याबद्दल बाबांना आपुलकी वाटायची. ‘‘ग्रंथवाचनाप्रमाणे सृष्टिवाचनातही रस घेतला पाहिजे’’, असे बाबा सांगायचे. यांत वृक्षवल्ली,  प्राणिसृष्टी, पक्षीसृष्टी, निसर्ग या सर्वच सृष्टीचे वाचन त्यांना अभिप्रेत होते. सृष्टीची लावण्यशोभा आगळीच असते, तिला उपमा नाही, असे ते म्हणायचे.

आजकाल लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळू लागले आहे. बाबांनी यांत पहिल्यापासून रस घेतला होता. त्यावेळी पर्यावरण हा शब्दही एवढा प्रचलित नव्हता किंवा ती संकल्पनाही. सुभाषचंद्रांनी मंडालेतील तुरुंगातून पाठविलेल्या एका पत्रात लिहिले आहे की, त्यांच्याच बरोबरचा एक कैदी वेगवेगळे प्रयोग करून झाडे लावायचा. त्याला ते ‘जगदीशचन्द्र बोस’ असे कौतुकाने म्हणत असत. ते वाचून बाबांना फार हसायला आले. त्यांनी त्यांच्या ‘सुभाषचंद्रांचा काव्यशास्त्रविनोद’ लेखात हे लिहिले आहे.

निरुपमा 1978 च्या सुमारास लंडनमध्ये असता युरोपातील एका प्रयोगात असे आढळले की, वनस्पतींना पाश्चात्त्य शास्त्रीय वाद्यसंगीत आवडते आणि त्यातही विशिष्ट झाडांची काही विशिष्ट आवड असू शकते व ती लक्षात घेऊन तसे संगीत लावल्यास त्यांची वाढ जास्त चांगली होते; नावडणारे संगीत लावले तर त्यांची वाढ खुंटते. उदाहरणार्थ, काही झाडांना मोत्झार्टचे शास्त्रीय संगीत भावते, तर काहींना बेथोवेनचे, काहींना आणखी कोठले. हे निरुपमाने लगेच पत्राने बाबांना कळवल्यावर त्यांना फारच कुतूहल वाटले. आपल्याकडेही असे वेगवेगळे भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत मंदस्वरात लावून शेती व बागांना फायदा होत असेल, तर तसे प्रयोग करून बघायला हरकत नाही, असे त्यांचे मत झाले. प्रिन्स चार्ल्स झाडांशी बोलतो म्हणून अनेक जण त्याची चेष्टा करतात, पण त्यात चेष्टा करण्यासारखे काही नाही, असे आई-बाबा म्हणत.

झाडे, फुले, पाने वाऱ्याने हलतात तेव्हाची सळसळही बाबांना आवडायची. त्यातही संगीत असते, असे ते म्हणायचे. पक्षी जसे वेगवेगळ्या सुरांत गातात, तसेच वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या, पानेसुद्धा विशिष्ट रीतीने डोलतात, नर्तन करतात, सूर धरतात. नव्या कोमल पालवीची मंजुळ छुमछुम, पानगळ होण्यापूर्वी पानांचे रंग बदलून ती पिवळी, तांबूस होऊ लागली की त्या पानांची रुणझुण आणि मग सुकलेल्या पानांची सळसळ या सर्वांचे सूर नवे, सप्तक नवे याशिवाय वाऱ्याच्या जोराप्रमाणे द्रुत, मध्य वा विलंबित लय असते, वेगळाच ताल असतो, डोल असतो. काहींची छोटीशी ठुमरी तर काहींचा बडा  खयाल, काहींचा पंजाबी टप्पा, असे बाबा म्हणायचे. वेळूच्या श्यामलसुंदर बनात मुरलीचे मंजुळ सूर ऐकू येतात. सचिन देव बर्मन यांनी त्यांच्या अनेक गाण्यांत बंगालमधील वेळूच्या बनातील वाऱ्यामुळे होणाऱ्या आवाजाचा उपयोग केला आहे, असे बाबा कौतुकाने सांगायचे.

शेक्सपिअर, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, वर्डस्वर्थ हे बाबांच्या आवडत्या लेखक-कवींपैकी. त्यांच्या साहित्यात झाडांचे, फुलांचे अनेक उल्लेख आहेत. याशिवाय त्यांच्या घरांभोवतीच्या बागाही प्रेक्षणीय आहेत. ब्रिटिशांच्या बागा बाबांनी आवर्जून पाहिल्या होत्या. शेक्सपिअरची पत्नी ॲन हॅथवे हिचे घर 600 वर्षांचे जुने आहे. तिथे नऊ एकरांची बाग आहे. बाबा अगदी प्रथम इंग्लंडला गेले, तेव्हा स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हनला शेक्सपिअरच्या घराबरोबरच हे घरही त्यांनी पाहिले होते. तेथील बाग त्यांना फार आवडली. पितळेच्या एका गोलाकार पत्र्यावरील ॲन हॅथवेच्या घराची सोनेरी प्रतिकृती त्यांनी तिथून आणली. ती मुंबईला आमच्या घरात भिंतीवर लावली होती. टेबलावर ठेवायला एक प्लॅस्टिकचा छोटासा कलात्मक संचही बाबांनी आणला होता. त्याला खाली निळसर पाया होता. त्यावर भोके होती व छोट्या प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या आकारांच्या झाडांचा संच बरोबर होता. ती झाडे आम्ही त्या भोकांत उभी केली. मधोमध तळ्यासारखे निळसर होते. सर्व संच लावून झाल्यावर तयार होतो एक लहानसा, आखीवरेखीव इंग्लिश बगीचा. आमच्या घरात दिवाणखान्यातच शोकेसमध्ये हा ठेवला होता. तो नाशिकच्या घरात आहे.

शेक्सपिअर आठवून डोंबिवलीला घरच्या बागेत बाबा आम्हाला म्हणायचे- Hast thou the flower there? Welcome wanderer.

यावर आम्ही सांगायचो - Ay, there it is.

मग बाबा म्हणणार - I pray thee give it to me.

शेक्सपिअरच्या नाटकांतील व सुनीतांमधील फुलांचे आणि झाडांचे तसेच संगीताबद्दलचे उल्लेख त्यांचे आवडते होते. अनेक त्यांना पाठ होते आणि त्यांच्यामुळे काही आम्हाला. आमचे असे बरेच संवाद व्हायचे. पुण्याला गोपीनाथकाकांकडे सोनचाफ्याच्या झाडाखाली बसल्यावर शेक्सपिअरच्याच Under the greenwood Tree खाली बसल्याचा आनंद वाटायचा. गोपीनाथकाकांनाही बागेची आवड होती. त्यांच्या बालगीतांच्या संग्रहाचे नाव ‘सारसबाग’. पुण्याच्या सारसबागेचे नाव त्यांच्या सूचनेनुसार दिले गेले, हे येथे नमूद केले पाहिजे.

In the merry month of May,

Sitting in a pleasant shade

Which a grove of myrtles made,

Beasts did leap and birds did sing,

Trees did grow and plants did spring;

Every thing did banish moan

या शेक्सपिअरच्या कवितेतच वर्डस्वर्थच्या Merry month of March ची बीजे आहेत, असे बाबांचे मत होते. लंडनच्या रिजंट पार्कमधील क्वीन मेरीची रोझ गार्डन आई-बाबांची फार आवडती होती. तिथे आम्ही नेहमी जायचो. मार्च, एप्रिलमध्ये रिजंट पार्कमध्येच तळ्यावर झिरमिळ्यांसारख्या लोंबत्या, फिकट हिरव्यागार, लांब, नाजुक फांद्यांच्या विलोच्या झाडांची मंद झुलणारी माला, चेरीच्या शुभ्र फुलांचा बहर आणि मोहगंध. तळ्यात विहरणारे राजहंस, छोट्या नौका, धुक्याचे अवगुंठन, हे मोने, रेन्वा, पिसारो यांच्या चित्रांची आठवण करून देणारे तरल, जादूमय दृश्य बाबांना एकदम मोहून टाकायचे.

 

इंग्लंडची हवा गुलाबपाण्याचा शिडकावा केल्यासारखी सुखद, प्रसन्न, चैतन्यदायी आणि सुशांत असते, असे आई नेहमी म्हणायची. क्यु गार्डनमध्ये जगातल्या विविध वृक्षवल्ली वेगवेगळे विभाग करून लावल्या आहेत. हे बघायला आई-बाबांना दिवस पुरायचा नाही. उष्ण कटिबंधांतील झाडांसाठी एक स्वतंत्र विभागच आहे. तिथे कायम गरम हवा, दमटपणा वगैरे योग्य प्रमाणात ठेवल्यामुळे ही झाडे चांगली राहतात. नारळ, आंबा, रातराणी, जास्वंद अशी आपली ओळखीची, नात्याची, झाडे लंडनमध्ये बघून एकदम घरी आल्यासारखे छान वाटायचे.

लंडनजवळच केंटमध्ये चर्चिलचे चार्टवेल हे निवासस्थान आहे. तेथील बाग चर्चिलने स्वत:च लावली आहे. बाबांना या चार्टवेलबद्दल फार आपुलकी वाटायची. अगदी प्रथम ते लंडनला गेले, तेव्हा मुद्दाम चार्टवेलला जाऊन आले होते. त्याबद्दल त्यांनी लिहिलेला लेख परिक्रमात आहे. पुढे इंग्लंडला सर्जरीच्या उच्च शिक्षणासाठी निरुपमा गेली, तेव्हा प्रथम केंट  परगण्यातील मेडस्टन येथे हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. नुकतीच आल्यामुळे अजून मोटार घेतली नव्हती. मुंबईहून बाबांनी लिहिले की, तिने चार्टवेलला अवश्य जाऊन यायला पाहिजे. मग ती एका शनिवारी बसने त्या प्रवासाला निघाली. वाटेत बस बदलायला बसस्टॉपवर उभी होती, तर एका स्त्रीने येऊन तिला ‘कोठे जायचे आहे?’ हे विचारले. चार्टवेलला, असे सांगितल्यावर ती म्हणाली, चल, मी तुला माझ्या गाडीतून घेऊन जाते. मग गाडीत बोलता, बोलता तिने सांगितले की, ती पूर्वी चर्चिल यांची सेक्रेटरी होती. भारतातही ती येऊन गेली होती आणि तिथे तिला लोकांचा फार चांगला अनुभव आला, त्यामुळे शनिवारी निरुपमा एकटीच बसस्टॉपवर उभी असलेली बघून तिला मदत केली पाहिजे असे तिला वाटले. चर्चिल यांच्या संबंधातील प्रदर्शनासाठी ती नुकतीच ऑस्ट्रेलियात जाऊन आली होती.

आम्ही फ्रान्सला गेलो होतो तेव्हा व्हर्सायची गालिच्यासारखी नक्षीदार बाग आई-बाबांना आवडली होती. ती बाग इतकी दूरवर पसरली आहे की, कधी संपतच नाही, असे वाटते. त्यांतील सात घोड्यांच्या रथावरील सूर्य प्रेक्षणीय आहे. ‘गोएंका पुरस्कारा’च्या रूपाने पुढे सात घोड्यांच्या रथावरील सूर्यच बाबांना मिळाला व आमच्या घरी आला. टोकियोलाही बाबा बाग बघून आले होते व ती त्यांना आवडायची. मोनेसारख्या कलाकाराने त्याच्या बागेसाठी जपानी पद्धतीवरून स्फूर्ती घेतली होती, हे लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणायचे. सेन नदीच्या परिसरातील जिव्हार्नी येथील चित्रकार मोनेच्या त्याने स्वत:च आरेखून लावलेल्या बागेचे बाबांना फार कौतुक होते. तिथे जवळच एमिल झोला, चित्रकार पिसारो आदींचीही घरे होती.

आम्ही चर्चगेटला राहायला गेल्यावर जिव्हार्नीबद्दलचे पुस्तक बाबांनी घेतले होते. अमेरिकेत आल्यावरही बाबांनी मोने व जिव्हार्नीबद्दल आणखी काही पुस्तके विकत घेतली होती. मोनेने घराभोवतीची बरीच जमीन विकत घेतली आणि एका भागात खणून जवळच्याच ओहळाचा प्रवाह तिथे वळविला व दुसऱ्या बाजूने तो प्रवाह एप्ते या नदीत जाईल अशी व्यवस्था केली. अशा रीतीने हे कृत्रिम पण वाहते तळे होते, डबके नाही. त्या तळ्यावर मोनेने जपानी पद्धतीचा हिरव्या रंगाचा लाकडी पूल बांधला आणि तळ्यात मुख्यत: श्वेतकमळे व विविध रंगांची कमळे लावून कमलवनच फुलविले. बाजूच्या वेगवेगळ्या भागांत निरनिराळी झाडे रंगसंगती व मोसम लक्षात घेऊन लावली. काही झाडे अशा रीतीने लावली की, ती मुद्दाम लावली आहेत असे न वाटता आपोआपच तिथे उगवली आहेत, असे वाटावे. शिवाय वेगवेगळ्या भागांत व मोसमात वेगवेगळी रंगशोभा दिसेल असे बघितले होते. हे सर्व वाचून बाबा अफाट खूश झाले, कारण त्यांनी डोंबिवलीला बाग केली होती त्यामागे हेच सूत्र होते. अर्थात तेव्हा त्यांनी मोनेच्या बागेबद्दल वाचले नव्हते.

देखभाल न झाल्याने मोनेच्या मृत्यूनंतर त्याची बाग राहिली नाही. जिव्हार्नीच्या बागेतील कमलवनाची मोनेने काढलेली अप्रतिम चित्रे बाबांच्या विशेष प्रेमाची. डोंबिवलीतील बाबांची बाग मोनेला नक्कीच आवडली असती व तिथे बसून त्याने सुंदर चित्रे रंगविली असती, असे आम्हाला वाटले. मोनेच्या कमलवनातील तळ्यात आजूबाजूच्या विलो, विस्टेरिया आदी सुंदर झाडाफुलांचे प्रतिबिंब अतिशय मोहक दिसते. सृष्टिदेवीने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे आणि त्या लावण्याची मोहिनी पडून तिलासुद्धा स्वत:चे रूप त्या जलाशयात बघायला आवडते, असे बाबा म्हणायचे. टेक्सासमधील सॅन ॲन्जेलो या गावात एक कमलवन मुद्दाम तयार केले आहे. चहूबाजूंना कमी अधिक उतारांवर झाडे लावली आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मधोमध सिमेंटच्या 3-4 फूट उंचीच्या बांधांवर 20-30 फूट लांब व 10-15 फूट रुंद असे आयताकृती विभाग आखून त्यांत पाणी सोडून विविध रंगांची कमळे लावली आहेत.

असे वेगवेगळ्या आकारांचे वाफे आहेत. बांधांवर सर्व बाजूंनी जाळीचे उंच कुंपण आहे. या वाफ्यांभोवती फिरून ही कमळे जवळून बघता येतात, पण त्यांना हात लावता येत नाही. एका विभागात मधोमध दीडएक फूट लांबी-रुंदीची पिवळसर पोपटी-हिरवी सिमेंटचीच गोलाकार कृत्रिम पाने पाण्यात ठेवली आहेत. लांबून पाहिले तर खरीच वाटतात. चहूबाजूंच्या उंच उतारांवरूनही खाली हे कमलपुष्पांचे वाफे बघता येतात. लाल, गुलाबी, तांबूस, बदामी, पिवळी, निळी, जांभळी, हिरवी, शुभ्र आणि मिश्र अशी सर्व रंगांची व आकारांची कमळे असलेले असे मनुष्यनिर्मित कमलवन दुसरीकडे कोठे नाही, असे तेथील लोक म्हणतात. इतक्या विविध रंगांची कमळे आम्ही कोठे पाहिली नव्हती. पण हेच वाफे कमी उंचीच्या बांधांवर अधिक कलात्मकरीत्या, नैसर्गिक दिसतील असे लावले असते, तर जास्त शोभादायक व  सुखशांतिदायक दिसले असते. विविधरंगी अनेक कमळे असली, तरी या रांगड्या कमलवनाला मोनेच्या स्वप्नील, सुसंस्कृत, कलात्मक कमलवनाचा दर्जा व प्रतिष्ठा नाही, मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य नाही, आत्मा नाही, असे भाष्य बाबांनी लगेच केले.

श्रीमंती वा संख्या यांवर गुणवत्ता नसते. मोनेचे कमलवन हे एक नैसर्गिक काव्यच आहे, तर सॅन ॲन्जेलोचे सरधोपट गद्य. ग्लासगोत हार्ट सर्जरीच्या उच्च शिक्षणासाठी निरुपमा होती, तेव्हा आई-बाबा व आम्ही सुटीत लेक डिस्ट्रिक्टमध्ये वर्डस्वर्थच्या वेगवेगळ्या घरांना भेटी देऊन आलो. वाटेत त्याच्या कवितेतील ‘फोर्टी फीडिंग लाइक वन’ अशा मेंढ्या, गाई, वासरे दिसतात. ‘डोव्ह कॉटेज’ या त्याच्या घराभोवतीची बाग लहान आहे, पण ‘रायडल माउंट’ येथील घराभोवतीची पाच एकरांची बाग वर्डस्वर्थने स्वत: आराखडा काढून लावली आहे व ती आजही तशीच ठेवली आहे. बाबांना ती अतिशय आवडली. तिथे आम्हाला वर्डस्वर्थची नात भेटली. त्यामुळे बाबांना फार आनंद झाला.

जवळच ब्रेंटवूडला जॉन रस्किनचे त्यानेच आरेखन केलेले फार सुंदर घर व बाग आहे. प्रत्येक खोलीतून अतिशय नयनरम्य सृष्टिसौंदर्य दिसते. घराकडे जाणारी चढण वळणावळणाची व बरीच उंच, दमछाक करणारी आहे; पण वरती गेल्यावर अप्रतिम देखावा पाहिला की, शीण पार नाहीसा होतो. आम्ही ज्या ‘स्वान हॉटेल’मध्ये उतरलो होतो, ते मूळ हॉटेल 1623 मध्ये बांधले होते. त्यातील खोल्यांना वर्डस्वर्थ, रस्किन, कोलरिज, बायरन वगैरे सरोवरांच्या प्रदेशातील साहित्यिकांची नावे होती आणि भोजनालयास ‘मेलकोच इन’ हे नाव डिकन्सच्या पिकविक पेपर्स वरून दिले आहे. त्यामुळे बाबा एकदम खूश झाले. समोरच्या नदीत राजहंस होते. प्रांगणात बाकावर बसून बाबांनी ‘स्वप्नभूमी’ हा लेख लिहिला. त्यामुळे महाराष्ट्रात लोकांना लेक डिस्ट्रिक्टबद्दल कुतूहल निर्माण झाले व मराठी लोक तिथे जाऊ लागले.

थॉमस जेफर्सनचे लेखन, संशोधन, कलावृत्ती, रसिकता, बागेची आवड यांचे बाबांना फार प्रेम होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी आम्ही व्हर्जिनियातील शार्लटस्‌व्हिल येथील ‘मॉन्टेचेलो’ हे जेफर्सनचे घर बघायला मुद्दाम गेलो होतो. जेफर्सनने स्वत:च त्या घराचा आराखडाही काढला होता. आन्द्रिआ पॅलॅडिओ या इटालियन स्थापत्यविशारदाने सोळाव्या शतकात इटलीत बांधलेल्या एका इमारतीवरून जेफर्सनने ही कल्पना घेतली होती. मॉन्टेचेलो हा अतिशय सुंदर बंगला आहे. उंच टेकडीवर असल्यामुळे लांबपर्यंतचे विहंगम दृश्यही दिसते व आपल्याला जेफर्सनच्या काळात घेऊन जाते. एका टोकाला गेले की, लांबवरची त्यानेच स्थापन केलेली शार्लटस्‌व्हिलमधील व्हर्जिनिया विद्यापीठाची मॉन्टेचेलोच्याच धर्तीची इमारतही तेथून दिसते. आजारपणामुळे जेफर्सन त्या विद्यापीठाची इमारत बघायला कधीच जाऊ शकला नव्हता, पण मॉन्टेचेलोच्या आवाराच्या त्या टोकावर उभा राहून तो ती इमारत बघायचा. आम्ही तिथे उभे राहून ती बघत असता आता लवकरच जेफर्सन स्वत:च घोड्यावरून तिथे येईल आणि आपल्याला मेजवानीसाठी बोलावेल, वाईन घेता, घेता शेक्सपिअर, पुस्तके, लोकशाही व विविध विषयांवर चर्चा करेल आणि ही काव्यशास्त्रविनोदाची मैफल फार संस्मरणीय होईल, असे बाबा म्हणाले.

मॉन्टेचेलोच्या आवारात जेफर्सनने लावलेली बाग अजून तशीच ठेवली आहे. अनेक फुले, फळे आहेतच, पण 300 प्रकारच्या भाज्या आहेत. जेफर्सनला वाईन करण्यातही उत्साह असल्यामुळे त्याचे द्राक्षाचे मळेही आहेत. हे सर्व बघून बाबा फार खूश झाले आणि जेफर्सनशी असलेले आंतरिक नाते अधिकच दृढ झाले. जेफर्सनला अनेक कला अवगत होत्या. त्याने वाचनासाठी व लिहिण्यासाठी केलेले खास टेबल त्याच्या घरात आहे. पुस्तक वाचून झाल्यावर एक कळ दाबली की, टेबलाचा त्या भागाखालचा कप्पा उघडून ते पुस्तक त्या खणात पडेल, अशी व्यवस्था त्याने केली होती. यावरून त्याची कल्पकता दिसते. बाबांना ते फारच आवडले. मॉन्टेचेलोजवळच माँटेपेलिये येथे मॅडिसनचे घर आहे. तिथेही आम्ही गेलो होतो. पण ते मुळातले त्याचे घर नाही, ते केव्हाच पाडून तिथे प्रतिकृती उभारली आहे. त्यात अर्थ नाही. त्यामुळे निराशाच झाली. जॉर्ज वॉशिंग्टनचे घरही व्हर्जिनियातच माउंट व्हर्नन येथे आहे. ते घर व त्याची बागही बाबा बऱ्याच वर्षांपूर्वी बघून आले होते. तिथून दिसणारे पोटोमॅक नदीचे दृश्य त्यांना आवडले होते.

चेकॉव्ह आणि टॉलस्टॉय यांच्या बागांबद्दल व बागकामाबद्दल वाचून बाबांची त्यांच्याबद्दलची आपुलकी वाढली. चेकॉव्हचे चेरी ऑर्चर्ड त्यांना आवडायचे आणि टॉलस्टॉयचे यास्नाया पॉलियाना. जर्मनीत पॉट्‌स्डॅम येथील सुंदर उद्यान व भोवतीचे द्राक्षाचे  मळे त्यांना खूप आवडले होते. त्याबद्दल त्यांनी बदलता युरोपमध्ये लिहिलेही आहे. ह्युस्टनला आमच्यासमोरच बाग होती. ऱ्होड आयलंडमधील प्रॉव्हिडन्समध्ये दोन नद्या आहेत. त्यांना ‘टि्‌वन रिव्हर्स’ म्हणतात. त्यांच्याभोवती बरीच झाडी आहे. त्या आमच्या जवळच होत्या. आम्ही चौघे तिथे अनेक वेळा सहलीला जायचो.

आता आम्ही क्लीव्हलँडच्या उपनगरात राहतो. तिथे शेजारीच बाग आहे. तिथे मोठा पोहण्याचा तलाव, स्केटिंगसाठी आइस रिंक, झोपाळे आहेत. दाट झाडीही आहे. आम्ही चौघे अनेक वेळा तिथे जाऊन बसायचो. आमच्याच आवारात एक मोठे अवाढव्य झाड आहे. ते मोराच्या पिसाऱ्यासारखे दिसते. दिवाणखान्यात बाबा खिडकीजवळ बसून वाचायचे किंवा त्यांच्या अभ्यासिकेत लिहायला बसायचे, तेव्हा त्या झाडाकडे मधून, मधून बघायचे. ऋतुमानाप्रमाणे त्याच्या पानांचे बदलते रंग बघायला त्यांना आवडायचे. माधवराव आपटेकाका व शीलाताई आमच्याकडे आले होते, तेव्हा आपटेकाका ते झाड बघून फार खूश झाले. झाडे नसलेल्या भागात चालायला किंवा मोटारीने जायलासुद्धा बाबांना व आईला आवडत नसे.

आमच्या भागात खूप झाडी आहे. हॉस्पिटलमध्ये जाण्याचे दोन मार्ग होते. एका मार्गात खूप झाडी होती. हॉस्पिटलमध्ये बाबांचे डोळे तपासून आम्ही घरी यायचो, तेव्हा नेहमी खूप झाडी असलेल्या मार्गानेच यायचो. पण जर आम्हाला वाटेत कुठच्या दुकानात जायचे असेल, तर दुसऱ्या मार्गाने यायचो. त्या रस्त्यावर विशेष झाडे नाहीत. त्यामुळे बाबा लगेच म्हणायचे, ‘‘कोठच्या भागात तुम्ही मला घेऊन आला आहात? परत मी या भागात येणार नाही.’’ ऋतुमानाप्रमाणे जपानी चेरी, सफरचंद, मॅग्नोलिया (कवठी चाफ्याची एक जात), विस्टेरिया, डॉगवूड वगैरे झाडांचा बहरलेला फुलोरा बघायला आम्ही चौघे नेहमी जायचो. विविध रंगांच्या विस्टेरियाच्या फुलांचे लोंबणारे घोस मोनेच्या सुंदर चित्रांची आठवण करून देतात. शरद ऋतूत पानगळ सुरू होण्याआधी झाडांची हिरवी पाने तांबूस, लाल, पिवळी होऊन रंगांचा बहरच येतो. ‘‘ही झाडांची रंगपंचमी आहे, सृष्टीचे कौतुक आहे’’, असे आई-बाबा म्हणायचे.

वॉशिंग्टन डी.सी.मधील जपानी चेरी ब्लॉसम दोघांना अतिशय आवडायचा. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे । दावित सतत रूप आगळे।।’, ही कविता आई नेहमी म्हणायची. ‘वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती’ ही कविताही तिची आवडती होती. ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ हे माडगूळकरकाकांचे भावगीत आम्हाला पावसाळ्यात ऐकायला व गायला खूप आवडायचे. ‘टपटपटप काय बाहेर वाजतेय ते पाहू। चल ग आई, चल ग आई पावसात न्हाऊ।।’ हे गाणे म्हणून लहानपणी आम्ही आईचा हात धरला की, बाबा म्हणायचे, ‘‘चल ग आईच का फक्त म्हटले आहे?’’ आई म्हणायची, ‘‘मग काय, बाबा म्हणायचे आहे? बाबा कुठे नाचतात? आईच मुलांबरोबर नाचते.’’ पावसाळ्यात आम्ही पर्जन्यसूक्त ऐकायचो. पर्जन्यसूक्तावर बाबांनी लिहिले आहे. बहर या संग्रहात तो लेख आहे.

वर्षा ऋतूत पावसाने धरित्रीला मंगलस्नान घातल्यावर छान उटणे लावल्यासारखा सुवास सर्वत्र चैतन्य भरतो आणि मग लवकरच ‘धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही’ अशी सृष्टी नटून बसते. हा बाबांना आवडणारा ‘मालिनी वृत्तविचार’ होता. हे त्यांचे ‘सृष्टिवाचन’ होते. गोपीनाथकाकांना वृत्तविचाराची विशेष आवड होती. त्यावर त्यांनी लिहिलेही आहे.

'A thing of beauty is a joy forever’ असे कीट्‌सने म्हटले आहे. काश्मीरला बाबा फार पूर्वी आदिशंकराचार्यांची टेकडी व शिवालय बघून आले होते. शंकराचार्यांना आनंदलहरी व सौंदर्यलहरी लिहिण्याची स्फूर्ती त्या नयनरम्य वातावरणात झाली हे साहजिकच  आहे, असे बाबांना वाटले. ‘लोकसत्ता’त असताना बाबा प्रथम काश्मीरला गेले, तेव्हा चांदण्या रात्री दल सरोवरात काही पत्रकारांबरोबर सहलीला गेले होते. सरोवरात कमळे होती, बाजूला सुंदर झाडी, हिमालय. अशा जादूमय वातावरणात त्यांच्याबरोबरचे दोन बंगाली पत्रकार उत्स्फूर्तपणे द्विजेन्द्रनाथ यांची ‘धनधान्ने पुष्पेर भरा, आमादेर एई वसुंधरा’ ही कविता गाऊ लागले. ती कविता बाबांना मंत्रमुग्ध करणारी होती. बाबांनी लगेच ती लिहून घेतली. त्यावर त्यांनी तेव्हा लेखही लिहिला होता व ती कविता संपूर्ण छापली होती. तो लेखही बहरमध्ये आहे. हेमंतकुमारने गायलेली ही कविता येथे यू-ट्यूबवरून टी.व्ही.वर शेवटच्या आजारपणात बाबा रोज ऐकायचे.

झाडाखाली बसल्यावर Here shall you see no enemy असे शेक्सपिअरनेच बाबांना आश्वासन देऊन ठेवले होते. त्याचा बाबांना आधार वाटत असणार. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे’ हा तुकाराममहाराजांचा उपदेश बाबांनी तंतोतंत पाळला होता. लहानपणी त्यांचे जीवन अतिशय कष्टाचे होते. गोपीनाथकाकांशिवाय कोणाचाही आधार नव्हता. तेव्हा पुस्तके, वृक्षवल्ली, पशूपक्षी हेच सोयरे त्यांना एक प्रकारच्या स्वप्नभूमीत, आनंदवनभुवनी नेऊन सर्व चिंतांचे ओझे काही काळ तरी दूर करीत असावे. नंतर पुढे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अनेक अडथळे, त्यांच्यावरील खोटे आरोप, चिखलफेक यांकडे दुर्लक्ष केले व अखंड ज्ञानसाधना केली आणि विचारांचे, लेखनाचे, प्रतिभेचे कमलवनच फुलवले.

ढगांप्रमाणे भटकताना अचानक तळ्याशेजारी झाडाखाली वाऱ्याच्या झुळकेत आनंदाने नर्तन करीत असलेली डॅफोडिल्सची फुले बघून वर्डस्वर्थचे मन उल्हसित झाले. झाडा-फुलांमुळे मनाचा सगळा शीण जातो, असे आई-बाबांनाही वाटायचे.

शुद्ध जलाशय त्यात चांदणे पूर्ण चंद्रबिंब ।

तुझेच आई पडते आमुच्या जीवनी प्रतिबिंब ।।

ही कविता आम्ही प्राथमिक शाळेत म्हणायचो. आई आणि वडील, दोघांचेही आपल्या जीवनातील प्रतिबिंब असे असते. सुंदर फुले, बागा, वनश्री, पशूपक्षी, निसर्ग, संगीत, कला, इतिहास, साहित्य व रम्य आठवणींमुळे मन:शांती आणि उत्साह वाटून जीवनाचा प्रवास सुखावह होतो, याची शिकवण बाबांमुळे आम्हाला आपोआप मिळाली. आई व बाबा दोघांचीही त्वचा लहान बालकांसारखी अतिशय मृदु-मुलायम होती. हात सायीसारखे मऊ होते. हॉस्पिटलमधील लोकांना त्याचे फार कौतुक व नवल वाटायचे. सानुली, सुगंधी झुळुक, कोमल पाने-फुले आणि सुफलित वृक्षांची वत्सलता आता आम्हाला आई- बाबांच्या मृदुल, प्रेमळ हातांची, मायेच्या जिव्हाळ्याची अनुभूती देतात. डॅफोडिल्सचा फुलोरा आठवून वर्डस्वर्थ म्हणतो :

I gazed - and gazed - but little thought

What wealth the show to me had brought

यातील ‘शो’ हा शब्द ‘बाबांचे लेखन, वाचन, संशोधन यांचा फुलोरा, आई-बाबांच्या स्मृतिसुमनांचा फुलोरा’, अशा मथितार्थाने घ्यावा, असे आता आम्हाला वाटते. हा खरोखरच अनमोल ठेवा आहे.

वर्डस्वर्थ पुढे म्हणतो :

For oft upon my couch I lie

In vacant or in pensive mood,

They flash upon that inward eye

which is the bliss of solitude;

And then my heart with pleasure fills,

And dances with the daffodils.

बाबांनी आम्हाला ‘सृष्टिवाचन आणि सौरभसूत्र’ शिकवले. आई-बाबांच्या आठवणी आणि बाबांचे लेखन हीसुद्धा एक विशाल, रम्य सृष्टीच आहे. बाबांनी लिहिलेली पुस्तके व लेख ही या सृष्टीतील विवेकतरूंची अभिनव उद्याने आहेत. त्यांतील फुलांचे सौरभ्य तथा अर्थशोभा नित्यनूतन आहे. दर वेळी नव्याने काही उद्‌बोध होतो. डॅफोडिल्स आठवून वर्डस्वर्थची शून्यमनस्कता वा चिंता गळून जाऊन मन उल्हसित होते, तसेच बाबांच्या या उद्यानातील फुले वेचताना मनाचे शून्यपण वा सर्व चिंता गळून जातात आणि चित्त सुशांत, सुप्रसन्न होऊन उल्हासाने बहरून जाते, नव्या अर्थबोधाच्या कळ्याही बहरतात. असा हा सर्वांसाठी ज्ञानानंदाचा फुलोरा आहे. मग संतोष मांडिला मोठा आनंदवनभुवनी, हे निसर्गत:च आले.

Tags: ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर dnyanmurti govind talwalkar गोविंद तळवलकर तळवलकर सुषमा निरुपमा sushama nirupama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
stalwalkar@hotmail.com

लेखक, संपादक गोविंद तळवलकर यांच्या कन्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके