डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सवंग साहित्याचा गंभीर विचार- भारतीय तौलनिक साहित्य संघटना

लोकरंजक साहित्य हा प्रतिष्ठित समीक्षकांच्या विचारमंथनात आजपर्यंत नेहमीच फक्त कुचेष्टेचा, तुच्छतेचा आणि उपेक्षेचा विषय राहिला आहे. परंतु लाखो वाचकांना आकृष्ट करणाऱ्या या साहित्याने प्रतिष्ठित साहित्यसमीक्षेच्या प्रस्थापित मानदंडास आव्हाने उभी केली आहेत... दिल्ली येथील या विषयावरील जागतिक चर्चासत्रातील विचारांचा मागोवा.

मार्च महिन्याचे शेवटचे तीन दिवस दिल्लीमध्ये भारतीय तौलनिक साहित्य संघटनेचे चौथे द्वैवार्षिक अधिवेशन साजरे झाले. या अधिवेशनात दिल्लीतील तौलनिक साहित्याभ्यासाचे प्राध्यापक आणि अभ्यासक सहभागी होतेच, शिवाय कोलकता, सुरत, बारडोली, इंदूर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, मंगलुरू, गोवा, त्रिची, राजकोट, मद्रास, पतियाळा, झाबुआ, मीरत अशा भारताच्या चारही दिशांमधील दूरदूरच्या ठिकाणांहून आणि कॅनडा, पोर्तुगाल, डेन्मार्क या विदेशांतूनदेखील तौलनिक साहित्याभ्यासाचे विद्वान आणि अभ्यासक सहभागी झालेले होते. 'भारतीय तौलनिक साहित्य संघटनेचे चौथे द्वैवार्षिक अधिवेशन' म्हणजे नेमके काय, ते समजण्यासाठी थोडासा इतिहास देणे आवश्यक आहे. 

संघटनेची क्षमता 

तौलनिक साहित्याभ्यासात रुची असणारे दिल्लीतील तीन विद्यापीठांतील (दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ) अनेक प्राध्यापक एकत्र येऊन त्यांनी जुलै 1980 मध्ये एक संघटना स्थापन केली. जवळजवळ त्याच वेळी कोलकत्याच्या जादवपूर विद्यापीठाच्या तौलनिक साहित्याभ्यास विभागाच्या प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी कोलकत्यामध्ये एक संघटना स्थापन केली. या दोन्ही संघटनांनी एकमेकांच्या सहकार्याने व परस्परांना पूरक असे कार्यक्रम काही वर्षे केले आणि त्यानंतर एकत्र अधिवेशने भरविण्याचे ठरविले. अशी दोन द्वैवार्षिक अधिवेशने पार पडली.

पहिले 1987 मध्ये जामिया मिलिया इस्लामियामध्ये आणि दुसरे हैदराबादला तेलुगू विद्यापीठामध्ये. या दुसऱ्या अधिवेशनाच्या वेळी असा विचार पुढे आला की, दोन्ही संघटनांची उद्दिष्टे समान असल्यामुळे दोन्ही संघटनांचा परस्परांत विलय करून एकच मोठी संघटना तयार करावी आणि अशा तऱ्हेने भारतीय तौलनिक साहित्य संघटना (Comparative Literature Association of India) जन्मास आली.

विख्यात कवी आणि कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती हे तिचे पहिले अध्यक्ष बनले आणि केरळमध्ये कोट्टायम येथील महात्मा गांधी विद्यापीठात तिचे पहिले द्वैवार्षिक अधिवेशन झाले. सध्या या संघटनेचे दोनशेहून अधिक आजीव सदस्य असून ते जगात विविध देशांमध्ये विखुरलेले आहेत. ही संघटना ‘आंतरराष्ट्रीय तौलनिक साहित्य संघटने’ला (International Comparative Literature Association) संलग्न आहे. विविध भाषांमधील साहित्यांचा परस्परांच्या संदर्भात अभ्यास करण्यामध्ये अथवा विविध कलांमधील पारस्परिक संबंधांचा शोध घेण्यामध्ये अथवा साहित्य आणि अन्य बौद्धिक अनुसंधानांचा पारस्परिक संबंध शोधण्यामध्ये ज्या कोणाला रुची असेल, अशा व्यक्तीला या संघटनेत मुक्तद्वार आहे.

विख्यात शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि पत्रकार या संघटनेचे सदस्य आहेत. संघटनेचे रजिस्टर्ड कार्यालय दिल्लीमध्ये आहे. परंतु तिच्या घटनेमध्येच अशी सोय करून ठेवलेली आहे की देशातील वेगवेगळ्या प्रदेशांत तिच्या स्वतंत्र शाखा उघडता येतील आणि तिथल्या तिथल्या बौद्धिक वातावरणानुसार आणि शैक्षणिक गरजेनुसार कार्यक्रम आखता येतील. - सध्या संघटनेच्या दोन शाखा कार्यरत आहेत. एक दिल्लीमध्ये आणि दुसरी कोलकता येथे. दोन्ही शाखा आपले कार्यक्रम स्वतंत्रपणे आखतात आणि त्यांकरिता पैशांची व्यवस्थाही स्वतंत्रपणे करतात. द्वैवार्षिक अधिवेशन मात्र एकत्र भरविण्यात येते. 

वाङ्मय व्यासपीठ

ही संघटना म्हणजे वाङ्मयाच्या सर्व अभ्यासकांसाठी एक व्यासपीठ आहे. कोणत्याही एका विवक्षित भाषेला अथवा साहित्याला या संघटनेत प्राधान्य दिले जात नाही. कोणत्याही तऱ्हेच्या भाषिक वर्चस्वाच्या दिशेने केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना येथे विरोध केला जातो. वाङ्मयीन भूमिकांच्या अनेकत्वावर संघटनेचा विश्वास आहे. अनुभवांच्या विविधतेच्या ठोसपणाला ती मानते. भाषा, भूगोल आणि राष्ट्रीयत्व यांच्या अडथळ्यांवर मात करून वाङ्मयकलेच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी ही संघटना सर्वांना आवाहन करते. तौलनिक साहित्याभ्यासाची भारतातील वाटचाल जवळजवळ नव्वद वर्षांची आहे.

1906 मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी कोलकत्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनमध्ये तौलनिक साहित्यावर व्याख्यान दिले होते. 1920 मध्ये श्री अरविंदांनी 'आर्य’ मध्ये 'इंडियन लिटरेचर’ या शीर्षकाखाली चार निबंध लिहिले. 1949-52 मध्ये रॉल्फ हंक्ले यांनी कलकत्ता विद्यापीठात तौलनिक साहित्यावर व्याख्याने दिली. ही व्याख्याने विद्यापीठाने ‘द स्टडी ऑफ कंपरेटिव्ह लिटरेचर' या शीर्षकाने प्रकाशित केली. 1956 मध्ये जादवपूर विद्यापीठात तौलनिक साहित्य विभागाची स्थापना झाली. बुद्धदेव बोस हे त्या विभागाचे पहिले विभागप्रमुख बनले. तौलनिक साहित्य या विषयात या विभागाने लगेच एम.ए.चा अभ्यासक्रम सुरू केला. 1961 मध्ये 'जादवपूर जर्नल ऑफ कंपरेटिव्ह लिटरेचर' प्रकाशित झाले.

1974 मध्ये दिल्ली विद्यापीठात ‘तौलनिक भारतीय साहित्य’ या विषयाचा एम.लिट.चा अभ्यासक्रम सुरू झाला. त्याचेच नंतर 1978 मध्ये एम.फिल.च्या अभ्यासक्रमात रूपांतर झाले. 1979 मध्ये चेन्नई येथे ‘अॅकॅडेमी ऑफ कंपरेटिव्ह लिटरेचर’ची स्थापना झाली. 1985 मध्ये तिरुअनंतपुरम (केरळ) येथे आणि मदुरै येथे अनुक्रमे कंपरेटिव्ह लिटररी सोसायटी आणि द्रविडीयन कंपरेटिव लिटरेचर असोसिएशन स्थापन झाल्या. 1994 मध्ये तिरुअनंतपुरम (केरळ) येथे युनिव्हर्सिटी ऑफ केरळमध्ये सेंटर फॉर कंपरेटिव्ह लिटरेचर स्थापन झाले. 1995 मध्ये हैदराबादच्या तेलुगू विद्यापीठात तौलनिक साहित्य विभाग स्थापन झाला. 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठात तौलनिक भारतीय साहित्य या विषयाचा एम.ए.चा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू झाला. आता या वर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) येथे तौलनिक भाषाविभाग सुरू होत आहे. 

लोकरंजक साहित्याची गंभीर दखल 

परवा नुकती दिल्लीमध्ये तौलनिक साहित्याची जी परिषद झाली, तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चर्चासत्राचा मुख्य विषय ‘पॉप्युलर लिटरेचर' म्हणजे 'लोकप्रिय साहित्य' अथवा ‘लोकरंजक साहित्य' हा होता. लोकरंजक साहित्य हा प्रतिष्ठित समीक्षकांच्या विचारमंथनात आजपर्यंत नेहमीच फक्त कुचेष्टेचा, तुच्छतेचा आणि उपेक्षेचा विषय राहिलेला आहे. परंतु शेकडो वाचकांना आकृष्ट करणाऱ्या या साहित्याने प्रतिष्ठित साहित्यसमीक्षेच्या प्रस्थापित मानदंडांस आव्हाने उभी केलेली आहेत. मराठीतच, अथवा भारतातच नव्हे, तर सगळ्या जगामध्येच त्यामुळे प्रतिष्ठित साहित्यसमीक्षेनेही या आव्हानांचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.

तौलनिक साहित्याच्या या चर्चासत्रात या आव्हानांचा अनेक अंगांनी, कोणतेही पूर्वग्रह प्रभावी होऊ न देता, गांभीर्याने आणि सूक्ष्मतेने विचार केला गेला आणि हा असा विचार करणाऱ्यांमध्ये तौलनिक साहित्याच्या क्षेत्रातले अगदी बुजुर्ग, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समीक्षक आणि अगदी तरुण, अननुभवी, उत्साही अभ्यासक समानतेने एकाच मंचावर वावरले. विचारांची मनमोकळी देवाणघेवाण झाली. काही तरुण अभ्यासकांनी केलेल्या विश्लेषणात विस्मयकारक परिपक्वता होती. उदाहरणार्थ, जादवपूर विद्यापीठातील कुर्ची सरकार या तरुण विद्यार्थिनीने ‘रहस्यकथा आणि भारत’ या विषयावर फार सुंदर निबंध वाचला.

रहस्यकथा हा अत्यंत लोकप्रिय साहित्यप्रकार भारतातील सर्वाधिक भाषांमध्ये फोफावलेला आहे. तरीदेखील विविध भारतीय भाषांमधील रहस्यकथांमध्ये फारच कमी प्रमाणात देवाणघेवाण अथवा भाषांतरे आढळतात. रहस्यकथांना साहित्यिक मानदंडांचे स्वरूप प्राप्त न होणे, भारतीय मानसिकतेचे वसाहतीकरण अजून ओसरलेले नसणे, आणि या देशात रहस्यकथा अजून वयात आलेली नसणे, यांपैकी कशामध्ये याची कारणे शोधता येतील, याची चर्चा कुर्ची सरकारने आपल्या निबंधात केली होती. 

लोकप्रिय आणि अभिजात  

‘दोन ध्रुवांवर नव्हेत' या प्रा. भरत गुप्त (दिल्ली) यांनी वाचलेल्या निबंधात तर लोकप्रिय साहित्याला बाजूला ठेवून तुच्छ मानण्याच्या अभिजात समीक्षकांच्या प्रवृत्तीला मुळातूनच आव्हान दिलेले होते. त्यांच्या मते, साहित्याच्या दोन रूपांमधील हा आज केला जाणारा तथाकथित फरक म्हणजे आधुनिक तंत्रविज्ञानाची निर्मिती आहे. कुठल्याही आधुनिक तंत्रविज्ञानाप्रमाणे तिचे मूळही युरोप-अमेरिकेत आहे. कारण तंत्रविज्ञानपूर्व संस्कृतीमध्ये उच्च आणि लोकप्रिय कलांचा वेगवेगळा रसिकवर्ग नव्हता, तर एकच सरसकट रसिकवर्ग होता. उच्चभ्रू कला आणि लोकप्रिय कला यांच्यातील फरक मानदंडांचा नव्हता, तर आविष्काराचा होता, म्हणजे एखाद्या विशिष्ट कलेतील तंत्राच्या साधेपणाचा आणि जटिलपणाचा होता.

भरत गुप्त यांनी ठासून प्रतिपादन केले की लोककला विरुद्ध अभिजात कला, लोकप्रिय विरुद्ध उच्चभ्रू, आर्य विरुद्ध द्रविड, ब्राह्मणी विरुद्ध अवैदिक, थोर परंपरा विरुद्ध थिटी परंपरा असल्या द्वंद्वात्मक विरोधात भारतीय संस्कृतीचे वर्गीकरण करण्याची रीत युरोपिअन समीक्षकांनी आपल्या माथी मारली आहे. याचा प्रभाव इतका पडला की नाट्यधर्मी आणि लोकधर्मी अथवा मार्गी आणि देशी यांसारख्या कलाविष्काराच्या पारिभाषिक शब्दांनाही आपण अभिजात आणि लोककला यांना समानार्थक मानू लागलो आहोत. वस्तुतः कलाविष्काराच्या प्राचीन उपपत्तींमध्ये या पारिभाषिक शब्दांचा अर्थ अगदी भिन्न आहे. प्राचीन समीक्षकांच्या लेखी 'अभिजात' (अथवा ‘शास्त्रीय’) यांसारख्या पारिभाषिक संज्ञा अस्तित्वातच नव्हत्या.

कलांचे स्वरूप, आशय आणि उपयोग यांच्या आधारे कलाप्रकारांचे वर्णन केले जात असे. ग्रीकांनी 'उपयुक्त’ (युटिलिटेरिअन) आणि 'आनंददायी’ कलांमध्ये फरक केला होता. भारतीयांनी प्रतिपादन केले होते की कलात्मक आनंद हेच एक स्वायत्त उपयोगितामूल्य आहे. कलावंत उच्च वर्गात जन्मलेले अथवा खालच्या वर्गात जन्मलेले असू शकतात. एखाद्या विशिष्ट कलाप्रकाराच्या प्रतिष्ठेशी ते प्राचीन काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर संबद्ध असू शकतात. परंतु तरीही प्रत्येक कलावंत हा एक प्रजापती मानला जात होता.

आपल्या परीने गूढ उकलणारा सृष्टिकर्ता. त्याची बरोबरी द्रष्ट्याशी, प्रेषिताशी आणि अध्यात्मसाक्षात्कारी पुरुषाशी केली जात होती. भरत गुप्त यांनी प्रभावीपणे आपल्या निबंधात मांडले की लोकप्रिय (अथवा लोकरंजक) आणि उच्चभ्रू लोककलांतर्गत आणि अभिजात हे फरक कलेचे आर्थिक मूल स्रोत ठरविण्यासाठी केले जात आहेत. कलेचे वैश्विक मूल स्रोत ठरविण्यासाठी नाही.

कलावंताला प्रजापती मानणे आणि प्रजापतीला कलावंत मानणे ही धार्मिक दृष्टी आहे. निधर्मी दृष्टीच्या विरुद्ध ती आहे. निधर्मी दृष्टी मानववंशकेंद्रित असते आणि तिच्यामुळे वर्गीय, गटवार, लिंगसापेक्ष, धार्मिक, भाषिक, राष्ट्रीय अथया जागतिक विरोधकेंद्रे निर्माण होतात. तिची परिणती कलेला बाजारू बनविण्यात होते आणि कलेला क्रांती बनविण्याचा टप्पा ओलांडल्यावर आता जगभर तेच चाललेले आहे. भरत गुप्त यांच्या निबंधाने अनेक सोईस्कर प्रस्थापित समजुतींना चांगलेच धक्के दिले आणि निबंधावर चांगलीच वादळी चर्चा झाली. 

'क्लास' कडून 'मास'कडे 

डेन्मार्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्‌समधून आलेल्या माड्स रोजंदाल थॉम्सन यांनीही एक महत्त्वाचा निबंध वाचला. 'व्हाय क्लास-मास सो रेअर?' असे त्याचे शीर्षक होते. 'उंची साधारण इतकी विरळ का?' असे त्याचे मराठीत भाषांतर करता येईल.

'क्लास मास (उच्चसाधारण?) ही संज्ञा ज्याची पुस्तके जगभर सर्वाधिक खपतात अशा पीटर होएग या डॅनिश लेखकाच्या अमेरिकन प्रकाशकांनी तयार केली. विद्वान समीक्षक आणि साधारण वाचकवर्गाचा अफाट विस्तार या दोहोंना एकाच वेळी भावणाऱ्या दुर्मीळ कृतीचा समावेश या संज्ञेत त्यांना करावयाचा होता. अशा दर्जाच्या कलाकृती अगदी विरळ का असतात याची समाजशास्त्रीय चिकित्सा तर प्रा. थॉम्सन यांनी आपल्या निबंधात केलीच, पण शिवाय, उच्च आणि साधारण अशा द्विध्रुवीकरणात्मक सवंग साहित्यविचाराऐवजी वाङ्‌मयीन क्षेत्रातील जटिलता आणि गतिमानता ध्यानात घेऊन नव्या साहित्यविचारांचा अंगीकार करणे कसे आवश्यक आहे, इकडेही मार्मिकपणे लक्ष वेधले. 

होएगची कादंबरी

‘बॉर्डरलाईनर्स’ (1993) प्रसिद्ध झाली आणि साधारण वाचकवर्गाला भावणारा एक महान लेखक अवतरल्याची साक्ष पाश्चात्त्य जगाला पटली. परंतु त्याचीच 'दि वुमन अँड दि एप' (1996) त्याच्या सर्जनशील पातळीच्या खूपच खाली घसरणारी कादंबरी ठरली. याउलट आधीच्या त्याच्या कादंबऱ्या 'स्मिलाज़ सेन्स ऑफ स्नो' आणि 'ए हिस्टरी ऑफ डॅनिश ड्रीम्स' (1988) म्हणजे एकदमच उच्च दर्जाच्या कलाकृती होत्या. म्हणजे ‘क्लास’ कडून 'क्लासमास’कडे आणि तिथून केवळ 'मास’कडे असा हा प्रवास झाला.

'क्लासमास' ही संकल्पना अस्थिर ठरली. (आपल्याकडे गडकरी, कुसुमाग्रज, उद्धव शेळके, इंदिरा संत, बोरकर यांच्यासारख्या साहित्यिकांच्या वर्जनशीलतेचे अशा प्रकारचे वाङ्‌मयीन-समाजशास्त्रीय विश्लेषण करून आपल्याकडची वस्तुस्थिती जोखायला हरकत नाही, असा विचार थॉम्सनचा निबंध ऐकताना सारखा माझ्या मनात येत होता. पण अशी मुलुखावेगळी मुलुखगिरी करण्याचे धाडस आपल्याकडे दाखवतो कोण?) तीन दिवसांच्या या चर्चासत्रात एकूण चोपन्न निबंध वाचले गेले. त्यांवर चर्चा झाल्या. या सगळ्याचा वृत्तपत्रीय वृत्तान्त देणे हा या लेखाचा हेतू नाही. ते शक्यही (स्थळाभावी) नाही आणि इष्टही नाही. मराठी वाङ्मयीन क्षेत्राला सर्वसाधारणपणे अपरिचित असलेल्या वाङ्मयीन संघटना, त्यांचे उपक्रम आणि वाङ्मयीन विचारमंथनाच्या काही नव्या दिशा यांचा नुसता स्थूल परिचयच या निमित्ताने येथे करून दिलेला आहे. 

वर उल्लेखिलेल्या तीन निबंधांखेरीज पोर्तुगालच्या अ‍ॅना पावला गुइमारिस या कार्लोस ऑगस्टो रिबेरो यांनी एका पोर्तुगीज लोककथेच्या निमित्ताने सादर केलेला 'दि फ्रॉस्टबिटन फूट' हा संयुक्त निबंध, सुरतच्या साउथ गुजरात युनिव्हर्सिटीचे प्रा. आश्विन के. देसाई यांचा 'सम पॉप्युलर गुजराती नॉव्हेलिस्ट्‌स : मोस्ट निग्लेक्टेड बाय दि क्लास ऑफ क्रिटिस, बट मोस्ट अ‍ॅक्सेप्टेड बाय दि मास ऑफ रीडर्स : ए लिटररी डायलेमा' हा निबंध, भारतीदासन युनिव्हर्सिटीचे डॉ. के. राजा यांचा 'आयरनी ऑफ सायंटिफिक फिक्शन इन इंडियन काँटेक्स्ट' आणि दिल्लीचे डॉ. डी. के. पब्बी यांचा 'विदिन अँड आउटसाइड दि कॅनन : तेंडुलकर्स घाशीराम कोतवाल' हे निबंध मराठी साहित्यक्षेत्राला कुतूहलाचे वाटण्यासारखे होते.

Tags: वृत्तान्त साहित्य परिषद आंतरराष्ट्रीय तौलनिक साहित्य संघटना भारतीय तौलनिक साहित्य संघटना लोकरंजक साहित्य साहित्य समीक्षा report literature confereance international comparative literature association comparative literature association of india popular literature  literature review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके