डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उपेक्षितांच्या 'सवाई गंधर्व' ची 60 वर्षे

संगीतक्षेत्रात दबदबा असणाऱ्या मंडळींनीही येथे आपली कला सादर केली आहे, करीत आहेत. त्यात सनईवादक रामभाऊ व बबनराव हे अवसरीकर बंधू, प्रख्यात हलगीवादक अप्पासाहेब खुडे, सध्याचे ढोलकीसम्राट मोहनराव अडसूळ, संगीतकार राम साळवे अशी कितीतरी ज्ञात-अज्ञात नावे आहेत. याची संक्षिप्त नोंदही रिठे यांच्याकडे सापडते.

ते 1947 साल असावं. मी तेव्हा 17 वर्षांचा असेन. त्या वर्षीपासून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पहिल्यांदाच (आताच्या सोलापूर रस्त्याने जायला सुरवात झाली.) त्या आधी ब्रिटिश आमदानीत पालख्या गोळीबार मैदानापर्यंत येऊन पुढे कोंढवा रस्ता, बोपदेव घाटमार्गे सासवडच्या दिशेने जात. पुणे लष्कर (कॅन्टोमेंट) परिसरात पालख्यांना यायला मनाई होती.

1947 साली स्वातंत्र्याच्या चाहुलीमुळे ही बंदी शिथिल पडली. इतर प्रौढ मंडळींबरोबर त्याही वर्षी पालख्यांना वेशीपर्यंत पोहोचवायला मी गेलो. दरवर्षीप्रमाणे राज्यातील गावा-गावांतून आलेले कलाकारही ज्ञानोबा-तुकोबांच्या चरणी सेवा अर्पण करायला आले होते. कुणी सनई वाजवत होते, तर कुणी सुंद्री, कुणी सूरपेटी धरली होती, तर कुणाचा हात हलगीवर पडत होता. कुणी, ताशावर ताल धरला होता, तर कुणी ढोलकीवर साथ करत होते. भैरोबा नाल्यापासून सगळे परत फिरले. पूलगेट (आत्ताच्या म.गांधी बस स्थानक) मैदानावर सगळे एकत्र आले. तेथे सकाळी 10-11 पासून सुरू झालेल्या त्यांच्या मैफलीच्या सुरावटीने सूर्य अस्ताला जाईपर्यंत साथ केली.

भर उन्हात, घामाने निथळणाऱ्या या लोककलाकारांना साथ द्यायला समोर हजारोचा समुदाय होता. त्यावर्षी पहिल्यांदा रामभाऊ नवगिरे यांसारख्या ज्येष्ठांच्या पुढाकाराने आम्ही 1-1 पै वर्गणी काढून 5-6 रुपये जमविले. जमलेल्या 25-30 कलाकारांपैकी प्रत्येकाला 1-1 पैशांचा हार घालून कौतुक केले. हलगीवरील थापेने सगळा परिसर दुमदुमून टाकणाऱ्या नारायणगावच्या अप्पा खुडेंना व सांगलीच्या एका कलाकाराला सव्वा रुपयाचे चांदीचे पदक देऊन गौरविण्यात आले आणि कलाकार व इतर मंडळींसाठी 2 हंडे गुळाचा चहा देण्यात आला. असे 5-6 रुपये खर्च झाला. दरवर्षी वारीची सेवा करणाऱ्या कलाकारांचे ते पहिले औपचारिक स्वागत होते.' 77 वर्षांचे तरतरीत कोंडीराम विठ्ठल रिठे काल घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करावे तसे सांगत होते. त्यांच्या दोन तुटक वाक्यांमध्ये खूप मोठा सामाजिक-सांस्कृतिक आशय दडला होता.

खरं तर त्या आधीपासून आषाढी वारीच्या राज्यातील बहुजनांच्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक उत्सवात, गावोगावचे कलाकार आपले योगदान देत होते. कोंढवा रस्त्याने वारकरी दिंड्या जात, तेव्हाही हे कलाकार आपापल्या पालख्यांना निरोप द्यायला जायचे. त्यावेळी त्यांचे संमेलन गोळीबार मैदानाअलीकडील धोबी घाटाजवळ चिंचेच्या झाडाखाली भरायचे. ते कधीपासून? त्याची नेमकी माहिती नाही, पण त्याला 100 वर्ष तरी झाली असावीत. चिंचेच्या झाडाखाली उभे राहून आपापली कला ही मंडळी सादर करायची. पालखी पोहोचवून परतलेल्या गावकऱ्यांची मोठी गर्दी हे वादन ऐकायला व्हायची. पूलगेटवर हे संमेलन भरू लागले तरी 'स्वागत' सोडून स्टेज, मांडव, खुर्च्या, माईक असा इतर जामानिमा काही नव्हता. कलाकार व प्रेक्षक दोघेही उभ्या गावावरून आले, त्यावेळची नवगिरेंसारखी ज्येष्ठ मंडळी तरणेबांड कोंडीराम रिठे, भीवा नाथू लांडगे, बळी पवार हे कार्यकर्ते या कलाकारांची सरबराई करीत. यापैकी बहुतेक दिवंगत झाले असून, भीवा लांडगे सत्तरीत, तर बळी पवार 65 वर्षांचे आहेत. तेव्हापासून सतत 59 वर्षे संगीत संमेलनाची व त्याच्या स्वागताची ही परंपरा अखंडित चालू आहे. त्याला कोणतेही औपचारिक स्वरूप दिले गेले नाही, कसली संस्था स्थापन केली नाही की फेस्टिव्हल भरवला नाही.

स्वत:च्या व जवळच्या लोकांच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे लोकवर्गणी गोळा करायची. कला सादर करणाऱ्याला चहा पाणी वा फुलांचा हार, फार फार तर एखादे पदक किंवा कप हे बक्षीस द्यायचे. बाहेर एखादा फड किंवा मिरवणूक गाजविणारा कलाकारही कसल्याही बिदागीची अपेक्षा न ठेवता) वर्षानुवर्षे वारीतील 'आपली सेवा' म्हणूनच याच्याकडे बघतो. वारीला वेशीवर निरोप देऊन संगीत सोहळ्यात कला सादर करतो. गावोगावी लग्न, समारंभाच्या सुपाऱ्यांची आवतणं वैशाख-ज्येष्ठानंतर सुमार पडू लागतात. ती उरकून या कलाकारांची पावलं पुण्याची वाट धरतात. आषाढाच्या तोंडावर पालख्या देहू-आळंदीतून निघाल्या की हे कलाकार आपली सेवा रूजू करायला दरवर्षी पालख्यांना पुण्याच्या वेशीपर्यंत सोबत करतात. नंतर पुन्हा आपल्या गावी निघायच्या आधी भरते त्यांचे अनोखे संमेलन. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात संतांची मांदियाळी होण्याआधी विविध स्वर, वाद्यं, तालवाद्यांची मांदियाळी पूलगेटजवळ भरते. ही वाद्यं वाजविणारी मंडळी या दिवशी आपला (जीव फुंकून, स्वर आळवतात.) विविध वाद्यांची जुगलबंदी तेथे भरते, त्या सुरावटीने हजारो ऐकणारे तृप्त होतात. 

या कलाकारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न श्री.रिठे इत्यादी मंडळी करतात. 1955-60च्या सुमारास या संमेलनासाठी स्टेज टाकायला सुरवात झाली. नंतर मांडव आला, माईक आले, खुर्च्या टाकण्यात येऊ लागल्या. या संमेलनात दीर्घकाळापासून दरवर्षी छावणी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बापू गानलाही सहभागी होतात. काही वर्षांपासून त्यांनी हे संमेलन पुणे छावणी बोर्डाच्या बंदिस्त सभागृहात आणले. संमेलनास सनईनवाज दिवंगत बबनराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या शंभर वर्षांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला शासन संस्थांनी काही मदत दिली का? असं विचारता कोंडीराम रिठे म्हणतात, "आम्ही कधी मागितली नाही आणि त्यांनी कधी दिली नाही, आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतो."

संगीतक्षेत्रात दबदबा असणाऱ्या मंडळींनीही येथे आपली कला सादर केली आहे, करीत आहेत. त्यात सनईवादक रामभाऊ व बबनराव हे अवसरीकर बंधू, प्रख्यात हलगीवादक अप्पासाहेब खुडे, सध्याचे ढोलकीसम्राट मोहनराव अडसूळ, संगीतकार राम साळवे अशी कितीतरी ज्ञात-अज्ञात नावे आहेत. याची संक्षिप्त नोंदही रिठे यांच्याकडे सापडते. पालखीला पोहोचवून कला सादर करावयास येणाऱ्या कलाकाराचे नाव, गाव, वाजवत असलेले वाद्य, गेल्या काही वर्षातील नोंदी त्यांच्याकडे सापडतात. पूर्वी कोणताही फलक मागे न लावता साजरे होणाऱ्या संमेलनाने, काळाच्या ओघात मागासवर्गीय वाद्यकला परिषद, वादन कलामंच अशी रूपे धारण केली. सामाजिक स्थितीचे कलाकारांना किती नेमके आकलन होते, ते या नावांमुळे स्पष्ट होते.

अलीकडच्या उत्सवी वातावरणात या संमेलनाचे पाठीराखे व त्यामुळे लवाजमा वाढत आहे, पण अभिजनांच्या संगीत संमेलनास वेळ वाढवून देण्यासाठी कायदा वाकविणाऱ्या शासनास गेल्या 60 वर्षांत पूलगेटवरील शोषितांच्या उत्सवास 1 पैचीही मदत करावीशी वाटत नाही. उलट काही वर्षांपूर्वी या वादकांकडे वाजविण्याचा पास आहे का? अशी विचारणा करून खीळ आणण्याचा पोलिसी प्रयत्नही झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करीत दरवर्षी हे 40 ते 50 कलाकार आपली कला पंढरीच्या वारीला अर्पण करण्यासाठी येतात. यावर्षीही 22 जूनला पूलगेटजवळील कॅन्टोमेंट बोर्डाच्या हॉलमध्ये सकाळपासून हे संमेलन भरले.

'तुम्ही इथं दरवर्षी का येता?' असं या वादकांना विचारलं तर ते वरील कारण सांगतातच पण पुढे हेही म्हणतात, "आमच्या पणजोबाने, आजोबाने, वडिलाने इथं वाद्यं वाजवली म्हणून आम्ही पण येतो. 'लिवण बामणाचं, दाणं कुणब्याचं, गाणं महाराचं असतंय.'" चातुर्वर्ण्य स्पष्ट करणारी ही जुनी मराठी म्हण समाजव्यवस्थेत किती खोल रूतून बसली आहे. जातीनिहाय आरक्षणाच्या सध्याच्या गदारोळात या म्हणीतील सक्ती आपण कशी पुसणार? असा प्रश्न पाडत हे संमेलन पुढील वर्षासाठी पार करेल.

Tags: आरक्षण. जाती आळंदी देहू पारंपरिक संगीत चंद्रभागा वारी वारकरी नितीन पवार पंढरपूर Reservation. Castes Aalandi Dehu Traditional Music Chandrabhaga Vari Varkari Nitin Pawar Pandharpur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके