डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी मात्र या गुंतागुंतीच्या आणि निराशाजनक परिस्थितीपासून काय धडे घेता येतील हेच शिकण्याचा प्रयत्न करत होतो. तिची सगळी कथा सांगायची, तर छोटी ‘कादंबरिका’ सहज होईल; पण तिच्या फक्त एकाच पैलूबद्दल इथं सांगतो. तिची एक विशिष्ट खोड होती. प्रयत्न करूनही मी ती सुधारू शकलो नाही. तिचा ‘रिवर्स’ म्हणजे गाडी मागे घेण्याचा गिअर कामच करत नसे. अनेकदा दुरुस्त केला. पैसे खर्च केले, पण पुन:पुन्हा तो गिअर खराब झाला. अशी वेळ आली की माझी सहनशीलता संपली, पण करणार काय? मी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. रिवर्स गिअरशिवाय गाडी चालवायची. माझं मलाच हसू आलं. गंमत वाटली. अशा मूर्खपणापासून शहाणपणा कसा शोधायचा? पण माझ्या दृष्टीने ते फक्त आव्हान नव्हतं. एक ‘रूपक’ होतं. 

जपानमधून मी माझा तीन वर्षांचा कार्यकाल संपवून भारतात आलो, तेव्हा पगारातून घेतलेली माझी निस्सान (सनी) गाडी मी मोठ्या अभिमानाने घेऊन आलो. गाडी भारतात आली खरी, पण ती मुंबई बंदरात उतरताच गाडीचे आणि तिच्याबरोबर माझे हाल सुरू झाले. ड्यूटी किती लावायची, यावरून माझा व सीमाशुल्क अधिकाऱ्यांचा विवाद झाला. त्यांची ‘मागणी’ मी मान्य करू शकलो असतो तर ड्यूटी कमी झाली असती. 

शेवटी मागणी मान्य न करता, आवश्यकतेपेक्षा जास्त ड्यूटी भरून मी गाडी ताब्यात घेतली; पण तिची देखभाल करणं जड जाणार असं दिसताच, मी ती विकूनही टाकली. मित्रांना, नातेवाईकांना आपल्या त्या विदेशी गाडीतून फिरवण्याचं माझं स्वप्न हवेतच विरलं. त्या गाडीच्या जागी देखभाल करायला, शिवाय भारतात चालवायला सोपी म्हणून मी एक सेकंडहँड फियाट घेतली. दिल्लीच्या करोलबागमध्ये ती पंधरावीस वर्षं वापरलेली गाडी साधारण पस्तीस हजार रुपयांना घेतली. गाडी घेतली तेव्हा ठीकच होती. विक्रेत्याने ती चालवली तेव्हा तिचं वागणं, पळणं सगळंच देखणं होतं. 

तिच्यासाठी मी मनातल्या मनात एक चांगलं नावही शोधत होतो. ‘मल्लिका-ए-दिल्ली’पासून ‘उत्सव दे बाब्बा दी गड्डी’, असे बरेच पर्याय मनात घोळवत होतो. पण घरात आल्यापासून तिने कुरबूर करायला सुरुवात केली आणि आमच्या तीन वर्षांच्या दु:खद प्रवासाची सुरुवात झाली. तिच्या अनेक खोडी होत्या. गाडी अकारण तापायची. तिचं व्यक्तिमत्त्वच तापट असावं! पंक्चर होण्यात तिची चाकं फारच पटाईत होती. किती बदलली; पण तिचा पायगुण तोच! 

मागच्या सीटवरच्या माणसांना ती विलक्षण धक्के द्यायची. भूकंप झाल्यासारखी ती सगळी सीटच गदागदा हलायची. गाडी चालवताना जपानमध्ये मी शिकलेली काही गंमत करून दाखवतोय असं त्यांना वाटायचं... पण थोड्या वेळात ‘हमे डर है कि हम गिर ना जाये कहीं’ या भावनेने ते एकमेकांना घट्ट धरून बसायचे. तिचं मध्येच थांबणं, वेगवेगळ्या सबबी सांगत वारंवार मेकॅनिककडे जाणं, थंडीत तास न्‌ तास सुरू न होण्याचं नाटक करणं, कारण नसताना इंधन प्राशन करणं... सगळ्या गोष्टी माझं मानसिक संतुलन बिघडवण्याचा सतत प्रयत्न करत होत्या! 

मी मात्र या गुंतागुंतीच्या आणि निराशाजनक परिस्थितीपासून काय धडे घेता येतील हेच शिकण्याचा प्रयत्न करत होतो. तिची सगळी कथा सांगायची, तर छोटी ‘कादंबरिका’ सहज होईल; पण तिच्या फक्त एकाच पैलूबद्दल इथं सांगतो. तिची एक विशिष्ट खोड होती. प्रयत्न करूनही मी ती सुधारू शकलो नाही. तिचा ‘रिवर्स’ म्हणजे गाडी मागे घेण्याचा गिअर कामच करत नसे. अनेकदा दुरुस्त केला. पैसे खर्च केले, पण पुन:पुन्हा तो गिअर खराब झाला. अशी वेळ आली की माझी सहनशीलता संपली, पण करणार काय? मी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. रिवर्स गिअरशिवाय गाडी चालवायची. माझं मलाच हसू आलं. गंमत वाटली. अशा मूर्खपणापासून शहाणपणा कसा शोधायचा? पण माझ्या दृष्टीने ते फक्त आव्हान नव्हतं. एक ‘रूपक’ होतं. 

आपण मित्रांचे, आईवडिलांचे, नातेवाईकांचे एवढंच काय, आपल्या नेत्यांचे आणि देशाचे दोषही स्वीकारतो. त्या मानाने बऱ्यापैकी आज्ञाधारक असलेल्या या माझ्या ‘कृष्णसुंदरी’ फियाटचा ‘मी मागे वळून बघणार नाही’ हा हट्ट, स्वीकारायला काय हरकत आहे? त्यानंतरची दोन वर्षं माझ्या गाडीने मागे वळून पाहिलं नाही. 

मला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागायची. कुठेही गाडी पार्क करायची असेल तर ‘यू’ टर्नची सोय आहे हे पाहूनच करायची. ती सोय नसेल तर गाडी उलटी ढकलण्यासाठी आजूबाजूला कुणी ना कुणी मिळेल, अशी खात्री करूनच ती पार्क करायची. छोट्या रस्त्यांच्या आणि बंद बोळांच्या नादाला लागायचं नाही. सहनशीलता संपल्यानंतरच्या सहनशीलतेचा तो एक अजब प्रयोग होता. तेव्हाही आणि आजही मला ‘मागे न जाण्याच्या’ रूपकात अर्थ दिसतात. 

अनेकदा आपल्या आयुष्यात आपण मागे जाऊ शकत नाही. जायचं तर दूर जाऊन वळण घेऊन यावं लागतं. खरं तर आपण पुढे जातो (माणूस, समाज, देश किंवा संस्कृती म्हणून), तेव्हा मागचे अनेक दरवाजे कायमचे बंद होतात! उदा. माझ्या गावातील घरात जातं आणि दळण बंद झालं, मुसळ आणि उखळ गायब झालं, घरांच्या वाटण्या झाल्या, शेतांच्या वाटण्या झाल्या - परत फिरणं नाही! 

माझं गाव सुटलं, कोल्हापूर सुटलं, अधूनमधून देशही सुटतो; पण वळण घेऊन पुन:पुन्हा परत येण्याचा प्रयत्न सुटत नाही. आपल्या आवडीची, माहितीतली, नात्याची माणसं मरण पावतात. ‘नो रिवर्स गिअर.’ मृत्यूचं कारण अपघात असो, वा हृदयरोग, कर्करोग असो वा दीर्घ आजार - पर्यवसान एकच - ‘परत फिरणं नाही.’ 

गंमत म्हणजे 1976 मॉडेलची ती फियाट गाडी आजही कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कुठेतरी भटकते असं मी ऐकलं आहे. तिच्या रिवर्स गिअरचं काय झालं, याची खबर मला 1992 पासून नाही. मात्र मी अधूनमधून ‘मागे वळतो’ आणि तिच्या सहवासातले ते क्षण किती ‘विलक्षण’ होते ते आठवतो. 

तिला माझी आठवण येत असेल असं मात्र म्हणवत नाही. कारण ‘नो रिवर्स गिअर’ ही तिचीच तर शिकवण होती!! 

Tags: युटर्न ‘नो रिवर्स गिअर’ फियाट गाडी निस्सान (सनी) uturn 'no reverse gear' fiat car nissan (sunny) weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके