डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा बंडल अधिकारी उर्फ स्वयंसेवक उघडा पडला. पुंडलिक याच्या आयसीआयसीआय बँक खात्यातील 22 लाख 33 हजार रुपयांची आणि बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील 12 लाख 63 हजार रुपयांच्या उलाढालीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या घरातून आणि कार्यालयातून 65 आपत्तीजनक फाईल जप्त करण्यात आल्या आहेत.

बोला पुंडलिक वरदा... 
जेवणाच्या पंक्ती बसल्या की जेवायला सुरुवात करताना एक श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. त्या श्लोकाच्या शेवटी ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' असा आलाप लावला जातो. त्यानंतर जेवण चांगलं जातं, पचतं अशी जुन्या लोकांची समजूत. पण सध्या एका पुंडलिकाने नागपूरातल्या संघ परिवाराच्या लोकांच्या तोंडचं जेवण पळवलं आहे. अभय पुंडलिक, मंडल कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी या आसामीची ओळख. हा पुंडलिक केन्द्रीय दक्षता आयोगाचा मुख्य तपास अधिकारी असल्याचं सरकारी अधिकाऱ्यांना सांगायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना विठ्ठलाची भीती वाटून ते या पुंडलिकाला भरपूर दानही द्यायचे. या स्वयंसेवकाने भल्याभल्यांना भ्रमित करून 25 ते 30 लाख रुपयांची महामाया जमवल्याचे सामान्य नागपूरकर म्हणतो. हा संघस्वयंसेवक दारूची बनावट विक्री परवाने देऊनही पैसे उकळायचा. ‘पेट्रोलपंपही देतो' असं सांगूनही तो पैसे मिळवायचा. 

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा बंडल अधिकारी उर्फ स्वयंसेवक उघडा पडला. पुंडलिक याच्या आयसीआयसीआय बँक खात्यातील 22 लाख 33 हजार रुपयांची आणि बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील 12 लाख 63 हजार रुपयांच्या उलाढालीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या घरातून आणि कार्यालयातून 65 आपत्तीजनक फाईल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या विरोधात पूर्वी चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिल्ली येथे त्याचा फ्लॅट आहे. तेथेही त्याने गैरकृत्य केल्याचा संशय आहे. 

संघ परिवाराने मात्र या पुंडलिकबद्दल मौन बाळगलं आहे. पुंडलिकला आम्ही सरकारी अधिकारीच समजत होतो. त्याच्याशी आमची फारशी ओळख नाही, असा सूर मात्र परिवारातत्या काहींनी लावला. परंतु मग हा पुंडलिक मंडल कार्यवाह म्हणून कुणी नेमला ? याचे उत्तर खुद्द नितीन गडकऱ्यांनाही देता देऊ नये हे आश्चर्य. नागपूर हे संघ परिवाराचे नाक. तेथे दुसऱ्यांदा संघाचं नाक कापलं जात आहे. अहोरात्र चारित्र्य, नीती यांचा अखंड बोलयज्ञ चालविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि नागपुरात या प्रकरणामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

ऊस तोडणी कामगारांचे हाते कापणार ? :
दिवाळीचा सण झाला की मराठवाडा, नगर, सातपुडा या परिसरातले ऊस तोडणी कामगार दरवर्षी साखर कारखान्यांवर ऊस तोडण्यासाठी येतात. या कामगारांची संख्या सध्या दहा लाखांच्या घरात आहे. कामगारांची वर्षभराची रोजीरोटीची व्यवस्था या धंद्यात होते. त्यात उन्हात पाचट साळावं लागतं. एकूण कष्ट खूप. पण आगीपेक्षा फुफाटा बरा अशी परिस्थिती. परंतु आता ऊस तोडणीसाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातून 200 ऊसतोडणी यंत्रे आयात केली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 350 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

महाराष्ट्रात सध्या दोनच लोकनेते आहेत. ते म्हणजे शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे. या दोघांना साखरसम्राटांचे नेते म्हणूनही मान्यता आहे. या दोघांनी मिळून एकमताने हा यंत्र आयातीचा घाट घातला आहे. केन्द्रातल्या भाजप सरकारनं त्यांना पूर्ण मदत केली आहे. मुंडे-पवार या जोडगोळीने ‘एन्रॉन' या देशाच्या माथी मारून महाराष्ट्राला दरवर्षी 7,000 कोटी रुपयांच्या खड्यात गाडले. महाराष्ट्र खोल गाळात जातच आहे. जे एन्रॉनमुळे झाले तेच आता या यंत्रांमुळे होणार आहे. ऊसतोडणी कामगारांचे हात ही यंत्रे कापतीलच. पण साखर कारखान्यांनाही ही यंत्रे गिळतील. ही यंत्रे आणण्यात परदेशी हितसंबंधी, परदेशी कंपन्यांचा नफा आणि त्यामधील खरेदी दलाली हा भाग आताच चर्चेचा होत आहे. आजारी कारखान्यांना ही यंत्रे तिरडीवर नेणार, हे उघड आहे. पण बिचारे कामगार अधू होतील त्यांचं काय ? 

या यंत्रांचा आकार आणि क्षमता एवढी प्रचंड आहे की एका दिवसात ते 400 टन ऊस तोडू शकते. पण त्यासाठी लागते प्रचंड शेत ! इतकी जमीन कोणाकडे आहे ? मुळात ऊस उत्पादकांचे देणे देण्यासाठी साखर कारखान्यांकडे पैसे नाहीत. जवळपास सर्व साखर कारखाने विविध साखर सम्राटांनी खाद्य सहकारी चळवळ करून धुवून-चाटून खाल्ले आहेत. त्या साखर कारखान्यांना अशी यंत्रे परवडतील का, याचा विचार झाला नाही. कारण जागतिकीकरणात स्पर्धा आणि स्पर्धांत उतरलेच पाहिजे. त्याशिवाय जग आधुनिक कसं म्हणणार. साखर खपत नाही, कारखान्याचे आजार वाढत आहेत, त्यातच ‘अंगापेक्षा भोंगा मोठा' या न्यायानं पवार-मुंडे या यंत्रांच्या खरेदीत साखर कारखाने आणि ऊस तोडणी कामगारांना संपवणार असं दिसतंय.

Tags: गोपीनाथ मुंडे एन्रॉन नागपूर पेट्रोलपंप अभय पुंडलिक Gopinath Munde Enron Nagpur petrol pump Abhay Pundalik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके