डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रा. तारा शास्त्री : एक सेवाव्रती व्यक्तिमत्व

समाजाने नाकारलेल्या अपराधी महिला, परित्यक्ता, विधवा, उपेक्षित महिला, गरीब गरजू मुले, मुली यांच्याकडे त्यांचे सतत लक्ष असे. दारावर भाजी विकायला येणाऱ्या बाईच्या मुलाच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी स्वतः आर्थिक मदत देऊन आपल्या मुलीलाही हातभार लावण्यास प्रवृत्त केले. समाजासाठी सतत काही करत राहण्याची धडपड व ध्यास त्यांनी घेतला होता. आपल्याबरोबर इतरांनाही कामास प्रवृत्त करून त्यांच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या सोपवून कामातील नवनवीन कल्पनांना स्वतःच्या कृतीतून साकार करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते.

प्रा. तारा शास्त्री यांचे सोमवार 28 जानेवारी 2002 रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. त्या एम.ए.,बी.टी व अमेरिकेतील ओहियो विद्यापीठातून समाजशास्त्रातील मास्टर ऑफ सोशल वर्कच्या पदवीधारक होत्या. सुरुवातीला दादर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तारा शास्त्री पुढे आपल्या कर्तृत्वावर सेंट्रल सोशल वेल्फेअर बोर्ड, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, निर्मला निकेतन, कर्वे सामाजिक संस्था आणि निरंतर शिक्षण विभाग एस.एन.डी.टी. अशा अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांवर संचालक म्हणून राहिल्या. 1987 ते 1994 पर्यंत त्यांनी तळेगाव येथील सरकारी रुग्णालयाच्या आवारात अपंग व अस्थिव्यंग मुलांसाठी संस्था चालविली होती व त्यानंतर 1995 पासून ते अंतापर्यंत एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या नानासाहेब गोरे अकादमीमध्ये सल्लागार होत्या. याच काळात मुळशी तालुक्यात मुक्ताबाई स्वयंविकास प्रतिष्ठान ही संस्था काढून त्यांनी खेड्यांतील महिलांना प्रशिक्षण देऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ स्तर) पुणे महानगरपालिका, वुमेन्स ऑफ अचिव्हमेंट (यु.के) व दलितमित्र पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या हाताखालून गेलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आज त्यांच्या प्रेरणेने महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत.

प्रा. तारा शास्त्री या माहेरच्या दामले. शास्त्रींशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबई येथे गेल्या. त्यांनी पुढील सर्व शिक्षण लग्नानंतर मुंबई येथे घेतले. निवृत्तीनंतर पुण्यात कर्वेनगर भागात त्यांनी स्वतःचे घर बांधले होते. मुलगी व जावई, नातवंडे हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनमध्ये त्या प्रशिक्षण सल्लागार म्हणून आल्यावर त्यांचा व माझा परिचय झाला. बाईच्या बुद्धीची झेप काही वेगळीच आहे असे मला जाणवले. कारण 79व्या वर्षीही त्यांची बुद्धी तल्लख होती. कोणताही प्रशिक्षण कार्यक्रम तयार करताना त्याचा सर्व आराखडा, उद्देश हा त्यांच्या नजरेसमोर तयार असे. आर्थिक मदत मिळविण्यात त्यांचा वाटा मोठा असे. मुकुंदशेठ लोहिया, विश्वस्त, पूना हॉस्पिटल, जॉर्ज चिरा, तेरे देस होम्स, हेल्पेज इंडिया, किर्लोस्कर गुप, जयश्रीबाई वैद्य वगैरे मोठ्या व्यक्तींचा त्यांच्यावर अतिशय लोभ असे. तारा शास्त्रींनी मागितलेल्या मदतीला त्यांनी कधी नकार दिला नव्हता.

समाजाने नाकारलेल्या अपराधी महिला, परित्यक्ता, विधवा, उपेक्षित महिला, गरीब गरजू मुले, मुली यांच्याकडे त्यांचे सतत लक्ष असे. दारावर भाजी विकायला येणाऱ्या बाईच्या मुलाच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी स्वतः आर्थिक मदत देऊन आपल्या मुलीलाही हातभार लावण्यास प्रवृत्त केले. समाजासाठी सतत काही करत राहण्याची धडपड व ध्यास त्यांनी घेतला होता. आपल्याबरोबर इतरांनाही कामास प्रवृत्त करून त्यांच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या सोपवून कामातील नवनवीन कल्पनांना स्वतःच्या कृतीतून साकार करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते.

त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी संस्थांतून जाण्याचा योग मला आला. वाघोली येथील स्नेहालय अपंगांच्या संस्थेसारख्या ख्रिश्चन मिशनरी संस्थेतही त्यांच्या शब्दाला असलेला मान व त्यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी तत्पर असलेली माणसे मी पाहिली. आपल्या विद्यार्थ्यांना सतत आदेश देऊनच त्यांच्याकडून काम त्या करवून घेत असत. “तू हे काम करशील का?” असे न विचारता, “तुला हे काम करायचे आहे.” अशी त्यांची फर्माइश असे. पण त्यांचा अवमान कधी कोणी केला नाही. विविध समाजातील आणि व्यवसायातील प्रतिष्ठित मैत्रिणी त्यांना मिळाल्या. त्यांचा स्नेह मला जवळून पाहायला मिळाला. काही वेळा कटू व रागावूनही त्या बोलत असत; पण क्षणिक रागानंतर पुन्हा माया व स्नेहही त्यांच्यातून झिरपत असे.

शेवटी हॉस्पिटलमध्ये असतानाही आदल्या दिवशी फाउंडेशन समाजकार्य पदविकेचे विद्यार्थी त्यांना भेटावयास गेले असताना पुढे आपल्याला कसे फिल्डवर्क करायचे आहे व मला अजून काय काय करायचे आहे, याची उजळणी चालू होती. कधी वृद्धत्वातून अंताविषयी बोलताना मला त्यांच्यात निराशा दिसली नाही. मी त्यांना म्हणायची की “तुम्हाला अजून जायला 5 ते 6 वर्षे आहेत. मी सांगेन तेव्हा तुम्हाला जायचे आहे.” पण हे न ऐकता पहाटेच्या संधिसमयी कोणालाही न सांगता हळूच, शांतपणे उजळणाऱ्या पूर्व दिशेकडे त्या निघून गेल्या. परत एका नव्या विश्वात अखंड सेवेसाठी. माझे व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या परिवाराचे प्रा. तारा शास्त्री यांच्या स्मृतींना प्रणाम!

Tags: नानासाहेब गोरे अकादमी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन प्रा. तारा शास्त्री प्रभा गोगावले nanasaheb Gore Academy SM Joshi socialist Foundation professor Tara Shastri Prabha gogawale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके