डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जोतिबांचं लेखन वाचून मी चांगलाच सरसरलो. त्यातील स्फोटकता, उत्कटता, आक्रमकता, रसरशीतपणा हा लेखनात इतका आहे तर प्रत्यक्षात त्या व्यक्तिमत्त्वाची धार काय असेल हा अंदाज मी हळूहळू बांधू लागलो. ब्राह्मण्यवादी दहशत काय असेल असा विचारदेखील मनात येऊ लागला. त्याचबरोबर स्वकल्पित इतिहासामधून लोकांच्या मनावर नेमका आशय बिंबवणारी जोतिबांची खास मराठी व्यंजनात्मक शैली काम करताना लक्षात ठेवली पाहिजे असं वाटलं. जोतिबांचं लिखाण हे काही नाजूक, तलम, कलाकुसर केलेलं काव्य नाही. एका अत्यंत तीव्र आंतरिक गरजेपोटी, एका विशिष्ट हेतूसाठी लिहिलं गेलेलं आहे ते, तरीही ते संख्यात्मकदृष्ट्यादेखील खूप आहे. आपले हेतू व म्हणणे स्पष्ट असेल तर आपण प्रतिभेचे गुलाम न राहाता, एका नैसर्गिक शैलीत कसं लिहू शकतो ह्याचा अप्रतिम दस्तऐवज म्हणजे जोतिबांचं लिखाण आहे. ती आंतरिक ओढ, तो राग, ती उत्कटता समजून ती अंतर्भूत करायचा प्रयत्न करणं हा एक नट म्हणून माझ्या प्रवासातला महत्त्वाचा भाग होता.   

3 जानेवारी 2013 रोजी ‘सत्यशोधक’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग होताना मला अतिशय आनंद होतोय. प्रयोगशील नाटकाचे एका वर्षाच्या आत (प्रथम प्रयोग 8 जानेवारी 2012 ) शंभर प्रयोग होणं ही निश्चितपणे अपूर्वाईची, नवलाची आणि समाधानाची गोष्ट आहे. पण मला वाटतं, हा आनंद तीन पातळ्यांवरचा आहे. एका प्रयोगशील नाटकाचे शंभर प्रयोग होणं, ‘सत्यशोधक’ या जोतिबा फुले यांच्या विचारांचा (केवळ उदोउदो न करता) वेध घेणाऱ्या पुरोगामी नाटकाचे शंभर प्रयोग होणं आणि ज्या कष्टकरी- वंचित बहुजन समाजासाठी जोतिबांनी आयुष्यभर लढा दिला त्यांच्याच हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’निर्मित ‘सत्यशोधक’ या नाटकाचे शंभर प्रयोग होणं ह्या त्या आनंदाच्या तीन पातळ्या होत. ‘सत्यशोधक’ नाटकाच्या अगदी सुरुवातीच्या प्रक्रियेपासून मी त्यात सहभागी होतो आणि आज शंभराव्या प्रयोगापर्यंतदेखील चालूच असलेली ही प्रक्रिया एकंदरीत दीड वर्षाची आहे. या प्रक्रियेत मला आलेले अनुभव आणि माझी काही निरीक्षणं इथे मांडणार आहे. सोयीसाठी या प्रक्रियेचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग करून माझं म्हणणं मांडायचा प्रयत्न करतो. 

पूर्वार्ध :- माझ्यासाठी पूर्वार्ध सुरू होतो तो अतुल पेठे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीमध्ये. यामध्ये जोतिबा फुले यांच्यावर काहीतरी नाटकीय सादरीकरणाचं अतुल पेठे यांच्या मनात घाटत होतं. पण ते नाटक असेल की ‘शेतकऱ्याचा असूड’मधले काही भाग सादर करणं असेल किंवा आणखी काही, हे अजून निश्चित नव्हतं. पण असं काही करायचं असल्यास इच्छा आणि वेळ आहे का? तर ‘आहे’. मग काही दिवसांनी ‘सत्यशोधक’ नाटक करायचं असं त्यांनी ठरवलं आणि मला कळवलं. या दरम्यान मी, अतुल पेठे यांच्या सूचनेनुसार धनंजय कीर यांनी लिहिलेलं जोतिबा फुल्यांचं चरित्र वाचून काढलं होतं. ‘सत्यशोधक’ या नाटकात जोतिबा फुल्यांची भूमिका करण्यासाठी मला विचारलं गेलं. मी लगेचच होकार दिला, पण होकार देताना ‘ही प्रक्रिया दीर्घ आहे, तेवढा वेळ देता येणार का?’ या गोष्टीचा विचार मात्र केला होता. एक ऐतिहासिक महत्त्वाचं पात्र करायला मिळणं, जोतिबा फुल्यांसारखं गुंतागुंतीचं पात्र करायला मिळणं हे मला फार आव्हानात्मक वाटलं. तो इतिहास या निमित्तानं आणखी खोलात जाऊन समजून घेणं, भाषिक, कायिक अर्थानं एका माहीत असलेल्या पात्राचे संदर्भ शोधणं, पात्राची उत्कटता, व्याकुळता व मुळात राजकीय भूमिका पचवण्यासाठी तयारी करणं या सर्व गोष्टीदेखील त्या होकारात होत्या असं आता वाटतं, आणि अतुल पेठे यांच्याबरोबर काम करायची इच्छा तर होतीच.  

मग ‘सत्यशोधक’ या नाटकाचं वाचन मी केलं. त्या वेळेला मला जाणवलं ते एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा पट केवळ ऐतिहासिक गौरवशाली दृष्टीनं न मांडता त्याच्या विचारांचा घेतलेला परामर्श आणि अर्थातच गो.पुं.ची त्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची पूर्वग्रहविरहित व स्वच्छ दृष्टी. अर्थात हे सर्व आता मी लिहू शकतो आहे असं मला वाटतं. तेव्हा हे कुठंतरी नेणिवेत असणार. असो. आणि अर्थातच त्यात असलेले प्रसंग आव्हानात्मक वाटतच होते. आणि हे सर्व होत असताना ‘सत्यशोधक’ नाटकाची प्रक्रिया हा एक अतिशय आनंददायी टप्पा सुरू झाला होता. 

‘सत्यशोधक’ नाटकाचं वेगळेपण अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा नटसंच. ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’च्या कलापथकातील 70 टक्के कलाकार व इतर 30 टक्के कलाकारांपैकी काहीजण शिकणारे, काहीजण पहिल्यांदाच नाटक करणारे आणि काहीजण नाट्यमाध्यमाचा (मर्यादित) अनुभव गाठीशी असणारे, अशा संयोगातून निर्माण झालेला हा गट आहे. या आमच्या गटाचं काम सुरू झालं. सुरुवातीला तर नाटकाला आम्ही हातही घातला नव्हता. नुसतं दररोज जमत होतो, गप्पा मारत होतो, काही पोवाडे, गवळणी म्हणून पाहात होतो, झालंच तर श्वासाचे व्यायाम, हलकेहलके शारीरिक व्यायाम करत होतो आणि हळूहळू एकमेकांची ओळख करून घेत होतो. हा एक महत्त्वाचा असा सुरुवातीचा टप्पा मला वाटतो. कारण दोन परस्परविरोधी शैलींत जगत असलेले गट एकत्र येत असताना (दोहोंनाही) एकमेकांची ओळख होणं, आदानप्रदान करता येणं ही गोष्ट एकंदरीतच नाटकाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार होती (व ठरली देखील). 

‘सत्यशोधक’ नाटकातील 70 टक्के कलाकार पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आहेत हे तर एव्हाना सर्वांना माहीतच आहे. तर या गटाबरोबर काम करताना माझी ‘नट म्हणून प्रतिक्रिया काय?’ या प्रश्नाचं सुरुवातीच्या टप्प्यातलं उत्तर म्हणजे ही प्रतिक्रिया एक माणूस म्हणून जास्त होती असं आहे. नट असणं (किंवा नसणं) हा भाग त्यात नंतर आलेला आहे. आपण वावरत असलेल्या साडेतीन टक्के स्तरातून उरलेल्या समूहाशी सहअनुभूत व्हायचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे हे मला माहीत नव्हतं असं नाही, पण इतका व्यक्तिगत पातळीवरचा संपर्क व एवढा मोठा काळ एकत्र घालवणं या दोन्ही अनुभवांना मी पारखा होतो. तो अत्यंत महत्त्वाचा जिवंत, रसरशीत, अंतर्मुख करणारा अनुभव मला ‘सत्यशोधक’नं दिला हे नक्की. या प्रथम टप्प्यावर त्या अनुभवाची प्रतिक्रिया बरीचशी आश्चर्याची आणि धक्के देणारी होती. ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून लोक आलेले होते, ज्या समस्यांना तोंड देऊन ते तालमींना येत होते, ज्या तोडीचं पारंपरिक व लोककलांचं संचित त्यांच्याकडं होतं, ते सर्वच मला प्रथमदर्शनी अनुभव (first hand experience) म्हणून नवीन होतं. पण मला हे देखील वाटतं की, या प्रक्रियेला मी कुठंतरी आतून तयार होतो. हा अनुभव मी माझ्या परीनं संपूर्ण प्रामाणिक राहून, शंभर टक्के घ्यायचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. असो. 

महात्मा फुले यांच्यावर धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरित्राचं सामूहिक वाचन आम्ही सुरू केलं. रोज वीस पानं. ते वाचन आणि मग त्यावर चर्चा . माहितीच्या पातळीवर सर्वांना एक करण्याचा तो प्रयत्न होता. या दरम्यान मी ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘गुलामगिरी’ ही पुस्तकं वाचून काढली आणि माझ्यासाठी म्हणून ‘सत्यशोधक’ची संहिता दररोज वाचायला सुरुवात केली. जोतिबांचं लेखन वाचून मी चांगलाच सरसरलो. त्यातील स्फोटकता, उत्कटता, आक्रमकता, रसरशीतपणा हा लेखनात इतका आहे तर प्रत्यक्षात त्या व्यक्तिमत्त्वाची धार काय असेल हा अंदाज मी हळूहळू बांधू लागलो. ब्राह्मण्यवादी दहशत काय असेल असा विचारदेखील मनात येऊ लागला. त्याचबरोबर स्वकल्पित इतिहासामधून लोकांच्या मनावर नेमका आशय बिंबवणारी जोतिबांची खास मराठी व्यंजनात्मक शैली काम करताना लक्षात ठेवली पाहिजे असं वाटलं. जोतिबांचं लिखाण हे काही नाजूक, तलम, कलाकुसर केलेलं काव्य नाही. एका अत्यंत तीव्र आंतरिक गरजेपोटी, एका विशिष्ट हेतूसाठी लिहिलं गेलेलं आहे ते, तरीही ते संख्यात्मकदृष्ट्यादेखील खूप आहे. आपले हेतू व म्हणणे स्पष्ट असेल तर आपण प्रतिभेचे गुलाम न राहता, एका नैसर्गिक शैलीत कसं लिहू शकतो ह्याचा अप्रतिम दस्तऐवज म्हणजे जोतिबांचं लिखाण आहे. ती आंतरिक ओढ, तो राग, ती उत्कटता समजून ती अंतर्भूत करायचा प्रयत्न करणं हा एक नट म्हणून माझ्या प्रवासातला महत्त्वाचा भाग होता. 

आता आम्ही नाटकाच्या वाचनाला सुरुवात केली. या दरम्यान एक निवासी कार्यशाळा (सिंहगड पायथा येथे) झाली. त्यात आपलं शरीरशास्त्र समजून घेणं, गाणी रचणं, चित्र किंवा छायाचित्राचं रसग्रहण करणं आणि सिंहगड चढून जाऊन मजा करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. या निमित्ताने राजू इनामदार या अत्यंत समरसतेने काम करणाऱ्या माणसाशी ओळख व मैत्री झाली. मग पुण्यात डॉ.राजीव शारंगपाणी यांचं एक सत्र, मकरंद साठे यांचं एक सत्र- ज्यामध्ये मराठी रंगभूीचा इतिहास, ‘तृतीय रत्न’ या जोतिबांच्या नाटकाभोवती कार्यरत असणारं राजकारण, कामगार रंगभूमी या गोष्टींची एक जुजबी माहिती सर्वांना मिळाली. वाचनाला सुरुवात करताना सर्वांना मिळून (सुरुवातीला) सव्वादोन तास बसवून वाचन करणं हा एक नाटकाच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा भाग होता. मग या वाचनांच्या दरम्यान गाणीदेखील रचली जाऊ लागली. शाहीर भिसे, नागनाथ गायकवाड, भीमराव बनसोडे यांच्याकडे असलेल्या पारंपरिक चालींमध्ये त्यांतील बहुतांश गाणी बसली. ही एक अतिशय मनोरंजक आणि आनंददायी प्रक्रिया पार पडली आणि आज सत्यशोधक नाटकातली सर्व गाणी आम्ही सर्वांनी मिळून रचली व संगीतबद्ध केलेली आहेत हे म्हणताना मला फार आनंद होतो आहे.

नाटकाची सुरू असलेली वाचनं आणि मग काही दिवसांनी सुरू झालेल्या उभ्या तालमी या टप्प्यावर माझा अतुल पेठे यांच्या  दिग्दर्शन शैलीशी परिचय व्हायला सुरुवात झाली. मी करत असलेलं वाचन आणि त्यांना अपेक्षित वाचन यांत सुरुवातीला बराच फरक होता. माझं वाचन (माझ्या निरीक्षणानुसार) हे फक्त नैसर्गिक शैलीनं चाललं होतं, पण या नाटकाचा पोत फक्त तेवढाच नव्हता. इथे आवश्यक होता नैसर्गिकपणाबरोबरच शैलीदार शब्दप्रवाह. अर्थात जोतिबांना देव बनवायचं नाही हे पक्कं माहीत असल्यानं हा प्रकार आक्रस्ताळी होऊन चालणार नव्हतं. सुरुवातीला हा बदल अंगभूत करताना मला कष्ट पडले हे खरंच, पण जसजसा त्याच्या परिणामाचा अंदाज येऊ लगाला तसतसा मी हा बदल अधिक आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि अजूनही हा प्रयत्न चालूच आहे. याबरोबरच मला जाणवलं ते असं की अतुल पेठे यांच्या पद्धतीमध्ये नाटकीय परिणामकारकता आणि नैसर्गिकता यांचा एक मिलाफ आहे. आणि तो मला तरी नवीन होता. 

वास्तववादी अभिनय पण तो नाटकीय परिणामासकट करणं ही एक महत्त्वाची गोष्ट मी शिकायला सुरुवात केली होती. याच्या जोडीने मग प्रसंगाविषयी चर्चा, सतत चर्चा, अखंड गप्पा, नुसत्याच गप्पा हे घडतच होतं. जोतिबांच्या म्हणण्याचा किंबहुना गो.पु.देशपांडे यांच्या जोतिबांचा आजचा अर्थ काय, त्यातून नेमकं काय पोचवायचं आहे, ते आजच्या परिस्थितीत कसं महत्त्वाचं आहे, याविषयी बोलणं होतच होतं. गो.पुं.शीही काही भेटी झाल्या. जोतिबांच्या भाषेला हलका ग्रामीण हेल द्यावा असंही या दरम्यान कुठेतरी ठरलं. अर्थात हे सर्व इतक्या सुविहित, सलगपणे घडलं नाही. यात अनेक गोष्टी आल्या. पुढेमागे झाल्या. अनेक तालमी झाल्या, हळूहळू गोष्टींना आकार येऊ लागला. अनेक लोकांना नाटक, त्याच्या तालमी या गोष्टी नवीन होत्या. मग त्या फार ताण न देता चालू करणं, एकएक प्रसंग बसवणं हे होत होतं, त्या दरम्यान काही प्रसंगांमधलं लोकांचं फक्त ‘असणं’ किती बोलकं होतं हे जाणवत होतं. सगळ्यांच्याच उत्स्फूर्त क्षमतांचा चांगलाच प्रत्यय येत होता, पण केवळ त्यावरच गोष्टी न सोडता त्याला एक योग्य, निश्चित दिशा अतुल पेठे देत होते. अनेक तालमी करून नाटक घोटवून घेत होते. सलग तालमी सुरू झाल्या. एका प्रसंगानंतर दुसरा प्रसंग, गाणी ते शेवट असं नाटक बऱ्याच जणांसाठी नवीन होतं. त्यांना त्याची सवय लावणं, सलग पावणेदोन तास आपली दक्षता कायम ठेवणं यावरही सगळेच जण कळत नकळत काम करू लागले. 

सलग तालमींमधून मला एक आंतरिक सलगता हळूहळू मिळू लागली. त्याचबरोबर प्रमुख भूमिका करताना टिकवावा लागणारा दमसास, आवश्यक ऊर्जा याचा पण अंदाज येऊ लागला. जोतिबांचा आवाका ध्यानात येऊ लागला. जरा जरा भरल्यासारखं वाटू लागलं. पण ती उत्कटता, व्याकुळता शोधण्याचं शोधकाम आजही चालूच आहे. संवादफेक, देहबोली, दमसास, उत्कटता, सहजता, व्याकुळता अशा गोष्टींनी भारलेला तो तालमींचा काळ होता. मग कपडे, रंगीत तालमी, आणि पहिला प्रयोगांकडे एकंदरीत सहा महिन्यांनंतर आम्ही येऊन ठेपलो, आणि माझा पूर्वार्ध (अनेक गोष्टी सांगायच्या राहूनसुद्धा) इथं मी संपवतो. आता सुरू होणार आहे तोदेखील तितकाच आनंदायी, दमवणारा, समाधान देणारा दुसरा टप्पा. 

उत्तरार्ध :- 8 जानेवारी 2012 रोजी ‘सत्यशोधक’ नाटकाचा पहिला प्रयोग भरत नाट्य मंदिर पुणे इथे झाला. पहिल्या प्रयोगाच्या आधीची स्थिती सर्वांचीच असते तशी माझीही होती हे सांगायला नकोच. प्रयोग सुरू झाला, उत्तरोत्तर रंगतच गेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपला. अतिशय समाधान देणारा क्षण आम्ही सर्वांनी पकडला होता. अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या. सर्व गटाचं अभिनंदन होत होतं. लगेचच दुसरा प्रयोग होता, तोदेखील असाच पूर्वोक्त पद्धतीनं संपला आणि 8 जानेवारीच्या रात्री आम्ही सगळे अत्यंत आनंदानं, समाधानानं झोपी गेलो. 

पुढच्या दोन-तीन दिवसांत पुण्यात प्रयोग करून आम्ही निघालो दौऱ्यावर आणि माझा उत्तरार्ध इथे सुरू झाला. नाटक हे आता निर्मितीकडून नाट्यव्यवहाराचा भाग होणार होतं. आम्ही गावोगावी फिरणार होतो. प्रयोग करणार होतो, वेगवेगळ्या प्रेक्षकांना सामोरं जाणार होतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहणार, खाणार-पिणार होतो.  दौरा हा कायमच नाटकवाल्यांच्या दृष्टीनं आनंददायी भाग. आम्हीदेखील 100 प्रयोगांपैकी किमान 70 प्रयोग बाहेरगावी केलेले आहेत. हे 70 प्रयोग व पुण्यातील उरलेले प्रयोग यांध्ये मला जो अनुभव आला तो समृद्ध करणारा, नाट्यव्यवस्थेचं भान आणणारा, स्वत:ला प्रश्न पाडणारा, स्वत:ला बळकटी देणारा, नाटक माध्यमाची ताकद अधोरेखित करणारा आणि इतर अनेक गोष्टींची शिदोरी देणारा होता. 

आमचे प्रयोग कुठे कुठे झाले? तर पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, म्हैसूर अशा ठिकाणी तर झालेच, परंतु अगदी महाराष्ट्रातदेखील, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा या प्रयोगांच्या निमित्ताने ‘पादाक्रांत’ केले. अनेक संस्था-संघटनांसाठी प्रयोग केले. ‘सर्वहारा जनआंदोलना’च्या व्यासपीठावर भर सकाळी प्रयोग केला, पुण्यात आझम कॅम्पसमध्ये मुसलमान मुली व शिक्षक यांच्यासमोर नाटक केलं. अशा सर्व प्रयोगाचं विवरण देणं इथे शक्य नाही, पण प्रयोगा-प्रयोगामध्ये जे जे वाटत गेलं ते ते आता मांडतो. 

नट म्हणून मला या प्रयोगांमध्ये जोतिबांच्या भूमिकेचे आणखी तपशील सापडू लागले. त्याचबरोबर प्रयोग करण्यासाठी पावणेदोन तास परिणामकारकरीत्या वेगवेगळ्या प्रेक्षक समूहांसमोर आपली ऊर्जा टिकवणं, दमसास टिकवणं हा एक फार मोठा आणि महत्त्वाचा धडा मी शिकायला सुरुवात केली. तसंच प्रयोगांची संख्या व वारंवारता जास्त असल्याने एखाद्या प्रयोगात न जमलेली वा नंतर सुचलेली (किंवा दिग्दर्शकानं सुचवलेली) सुधारणा करून पाहण्यासाठी पुढचा प्रयोग लगेच मिळणं ही फार महत्त्वाची उपलब्धी ‘सत्यशोधक’ नाटकानं दिली. अशी संधी व एवढे प्रयोग मिळणं ही प्रयोगशील रंगभूमीवर तर फारच दुर्मीळ घटना आहे. यामुळे मला नट म्हणून ‘हलकं’ होण्याला मदत झाली. तसंच अनेकदा ‘नाटक’ या माध्यमाशी पूर्णपणे तुटलेल्या वा संबंधित नसलेल्या प्रेक्षकांना आपला आशय संपूर्णपणे समजावण्यासाठी संहितेवर जो विश्वास ठेवावा लागतो तो या प्रयोगसंख्येुळे आणखीनच दृढ झाला. तसंच सर्व प्रयोग हे काही बंदिस्त रंगमंचावर नव्हते. अनेक प्रयोग आम्ही खुल्या रंगमंचावर दोन-तीन हजारांच्या गर्दीसमोर केलेले आहेत. (उदा. मालेगाव, अमळनेर वा शनिवारवाडा, पुणे येथील प्रयोग) हे करत असताना ऊर्जा तीच ठेवणं, आवाजाची पट्टी सांभाळणं, आवाजाची फेक संभाळणं, नाटकीय शांततेच्या जागा धरून ठेवणं या आणि अशा अनेक गोष्टी मी शिकायला सुरुवात केली. ‘नाटक ही जिवंत कला आहे’ या बुद्धीला समजलेल्या वाक्याचं पूर्णत: प्रत्यंतर ‘सत्यशोधक’नं दिलं असं मला वाटतं. 

या सर्व गोष्टींबरोबरच एक अतिशय महत्त्वाचा अनुभव मला नाटकानं दिला आणि तो म्हणजे नाट्यव्यवहाराचं व नाट्यव्यवस्थेचं भान. हा अनुभव मात्र अंतर्मुख करणारा, बऱ्याच प्रसंगी अस्वस्थ करणारा होता. ज्या पुरोगामी (म्हटल्या जाणाऱ्या) महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्रातली ‘नाटक’ या माध्यमाबद्दलची उदासीनता जागोजागी दिसत होती. गावोगावच्या नाट्यगृहांची भीषण अवस्था, अस्वच्छता, ह्याचं वर्णन तर आणखी एक लेख लिहावा असं आहे आणि ही स्थिती केवळ इतरत्र आहे असं नाही तर पुण्या- मुंबईतदेखील थोड्याफार फरकानं हेच चित्र जाणवतं. नाट्यानुकूल व्यवस्थाही फारच कमी, अगदी अपवादात्मक ठिकाणी दृष्टीस पडली. तसंच अनेक गावांत पंधरा-वीस वर्षं नाटक झालेलं नसणं, मालिकांवर पोसलेला प्रेक्षकवर्ग, तथाकथित नाट्यचळवळीचं पुणे- मुंबई भागात झालेलं केंद्रीकरण, या सगळ्यांतून कायम अधोरेखित होणारी पूर्णपणे तुटलेपणाची विखंडितपणाची जाणीव हे फार त्रासदायक होतं व आहे. एका 40-45 वयाच्या प्रेक्षकानं मला, ‘आपण आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहात आहोत.’ असं सांगितलं. आता असे प्रेक्षक कुठेही असतील, पुण्या-मुंबईतसुद्धा. पण ‘नाटक पाहावंसं का वाटत नाही?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नाही. हा निराशावादी दृष्टिकोन आपल्याला कुठे घेऊन जाणार? 

असो, पण या सर्व गोष्टी मनात आत्ता कुठे सुरू झाल्यात. ज्यांची उत्तरं सहज सापडणार नाहीत असे प्रश्न ‘सत्यशोधक’नं मनात निर्माण केलेले आहेत. हे प्रश्न दिशादर्शक व दिशाभूल करणारे, दोनही प्रकारचे आहेत. हा उत्तरार्ध अजून माझ्यासाठी संपलेला नाही. तो मनातच घोळत रहाणार व कृतीची मागणी करतच राहणार. मी त्याला पुरा पडेन की नाही कोण जाणे? पण हे प्रश्न घेऊन जगणं हा अस्वस्थ पण समृद्ध करणारा भाग आहे हे नक्की. 

आता थोडंसं (किंवा पुष्कळसं) अतुल पेठे यांच्याविषयी. कोणत्याही नाटकात दिग्दर्शक हा कायमच महत्त्वाचा भाग असतो हे तर खरंच, पण अतुल पेठे यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव हे फार मोलाचे आहेत असं मला नक्की वाटतं. नाटकाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आमच्यामधला संवाद आहे आणि तो जसजसा प्रगत होत आलेला आहे तो माझ्यासाठी एक समृद्ध अनुभव आहे. गेल्या पावणेदोन वर्षांतील जवळजवळ प्रत्येक दिवस आम्ही बरोबर होतो. आमचा संवाद होता. नाटकातील प्रत्येक प्रसंगाबद्दल केलेल्या घमासान चर्चा, बारकावे शोधण्याबद्दलच्या चर्चा, एकंदरीत रोज होणाऱ्या गप्पा (यात चेष्टा, मस्करी सर्व आलंच) मला मोठं संचित बहाल करून गेलेल्या आहेत. 

याचबरोबर पेठे यांना असलेलं नाट्यव्यवहाराचं भान व ज्ञान, माहितीचं विकेंद्रीकरण करण्याचं त्यांचं तत्त्व, नाट्यसमूहाला जोडून घेण्याचा त्यांचा आत्यंतिक आग्रह, एकंदरीत सामाजिक, राजकीय भान यांचा फार मोठा फायदा नाटकाला, आमच्या गटाला व व्यक्तिश: मला झालेला आहे. ‘सत्यशोधक’ या नाटकाची सर्व व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील त्यांनी पार पाडणं व ती पार पाडताना त्यांचा वेगवेगळ्या लोकांशी होणारा संवाद बघणं, ऐकणं हा एक मोठाच अनुभव होता यात शंका नाही. ‘सत्यशोधक’ नाटकाविषयी काही वेळेस आलेल्या विरोधी व विद्वेषी जातीय टीकांबद्दल आम्ही सर्वजण अविचल राहू शकलो, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अतुल पेठे  यांनी त्या सर्व बाबतींच्या माहितीबद्दल व भूमिकेबद्दल आणलेली पारदर्शकता होय. असा अत्यंत नाट्यसकारात्मक, ऊर्जावाहक दिग्दर्शक व ज्येष्ठ मित्र मला ‘सत्यशोधक’नं दिला हेदेखील या नाटकानं मला दिलेलं संचित आहे असं मी समजतो. 

याचबरोबर एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापुरतं शोधायचा प्रयत्न करतो तो प्रश्न म्हणजे, ‘जोतिबांनी माझ्यात काही बदल घडवला का?’ आता असा बदल घडवणं हे नाट्यनिर्मितीचं काम आहे का, ते असायला हवं का, ह्या भागात मी या नाटकापुरता तरी शिरू इच्छित नाही. मला असं वाटतं की, एक ‘नाटक करता करता नाट्यकर्मींचं शिक्षणही करणाऱ्या (इति गो.पु.)’ Didactic नाटकाकडून हे मागणं असतंच आणि माझ्या बाबतीतही हे लागू पडलेलं आहे असं वाटतं. आता हा फरक एकास एक या पद्धतीने मला दाखवता येणार नाही, हे खरं असलं तरी जोतिबांनी मला माझं आजवरचं आणि यापुढचं आयुष्य तपासून पाहायला लावलेलं आहे असं मला वाटतं. जोतिबांविषयी, सावित्रीबार्इंविषयी आदर पहिल्यापासून होताच, तो या निमित्तानं अधिक खोल झालेला आहे. खाजगी व सार्वजनिक वावरण्यात येत असणारे ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचे प्रसंग’ आता आणखी गुंतागुंतीचे झालेले आहेत, वाढलेले आहेत असं वाटतं. आजच्या विस्कटलेल्या काळात स्थिर व्हायला जोतिबा साहाय्यभूत ठरतील असंही वाटून जातं. आपली सहानुभूती कोणाच्या पारड्यात हे तर माहीतच होतं पण वेळ आल्यास आपली बाजू कोणती याचा विचार मात्र फार आतून सुरू झालेला आहे. 

असो, एकाच गोष्टीचा मला इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे या नाटकादरम्यान मला मिळालेल्या ‘विनोद दोशी अभ्यासवृत्ती’चा. या अभ्यासवृत्तीमुळे मी अत्यंत निश्चिंतपणे व स्वच्छपणे सत्यशोधक नाटकासाठी माझा संपूर्ण वेळ देऊ शकलो. तर माझा लेख मी इथे संपवतो. पण तो माझ्या मनात मात्र संपलेला नाही. उलट आणखीन प्रश्न पाडू लागलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न मी माझ्या परीने करेनच. आता एवढंच. पुन्हा एकदा सर्व ‘सत्यशोधक’ गटाचं अभिनंदन!

Tags: पुरोगामी महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आसूड तृतीय रत्न धनंजय कीर सत्यशोधक महात्मा फुले अतुल पेठे ओंकार गोवर्धन Purogami Maharashtra Shekaryaancha Asud Trutiy Ratn Dhananjay Kir Satyshodhak Mhatama Phule Atul Pethe Omkar Govarhdhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ओंकार गोवर्धन
omkar.govardhan@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके