डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

8 मार्चच्या निमित्ताने...

जन्माने निर्माण होणाऱ्या सर्वच विषमतेविरुद्ध आपण जो लढा देत आहोत, त्यातला हा लिंगभेदाविरुद्धचा लढा गाभ्याच्या ठिकाणी आहे. पण म्हणूनच तो एकारलेपणे- अलगाववादी भूमिका घेऊन लढता येत नाही. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यात स्त्री-प्रश्नातही खूप गुंतागुंत निर्माण झाली आहे. ती समजावून घेऊन व्यावहारिक पातळीवरचे अग्रक्रमही ठरवावे लागतात. चळवळीची गतिकी समजून घ्यावी लागते. पण दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञानाचे वा चिंतनाचे आव्हानही नजरेआड करता येत नाही.

 

 

‘स्त्रीत्वा’चा विचार हा बाईच्या जगण्याशीच निगडित आहे. मुलीपणापासून तो तिला जाणवत असतो. स्वतःमध्ये... स्वतःच्या शरीर-मनात आणि दुसऱ्यांच्या नजरांमधून ! सतत तिला नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्या पुरुषसत्ताक प्रयत्नांत स्त्रियाही कधी कळत, कधी नकळत सामील होताना ती पाहत असते. तिच्यासाठी समाज वेगवेगळ्या भूमिका निश्चित करीत असतो. त्या भूमिका म्हणजे ‘तू’ असे सांगत असतो, त्या वेळी ती मात्र स्वतःची वेगळी ओळख शोधत असते. बहिणाबाईंच्या शब्दांत ‘निजखुण’ शोधीत असते. स्त्री-पुरुष द्वंद्वांचा विचार करताना, ते तर निसर्गदत्त आहे, असे तिला समजुतीच्या सुरात पटविले जाते. मग कधीकधी त्याने फसून ती एकतर आपल्या शरीराचा रागराग करू लागते किंवा हट्टाने पुरुषासारखे होण्याचा प्रयत्न करू लागते. समानता म्हणजे सारखेपणा नव्हे, हे तिला हळूहळू समजू लागते. त्याचबरोबर स्त्री-पुरुष विषमता समाजनिर्मितच नव्हे तर ‘रचित’ आहे हेही लक्षात येते. म्हणून इंग्रजीमध्ये Sex आणि gender हा फरक करून समाजाच्या स्त्रीविषयक विषमतामूलक विचार आचाराला gender Bias असे म्हटले जाते. पण हा लिंगग्रह परस्परविरुद्धच असतो असे मानता येत नाही, कारण सामाजिक पर्यावरणामुळे स्त्री स्त्रीविषयक विचार करताना अथवा पुरुष पुरुषविषयक विचार करताना कळत नकळत तो बाळगत असतो. म्हणजेच एका बाजूला स्त्री जन्माने स्त्रीवादी नसते; तिला स्त्रीवादाचे ज्ञान जगण्यातून होते. दुसऱ्या बाजूला पुरुष, पुरुष आहे म्हणून पुरुषवर्चस्ववादी असेलच असे म्हणता येत नाही. समाजाच्या इतिहासात माणसाने विषमतेचे वेगवेगळे घटक शोधले आणि तरीही समाजाच्या इतिहासात सातत्याने मानवमुक्तीचा अथक लढा सुरू राहिला आणि सुरूच आहे. हा मानवमुक्तीचा लढा म्हणजे माणसाला अधिक माणूस (वजा प्राणी) करण्याचा यत्न आहे. स्त्रीमुक्ती-दलितमुक्ती- वेठबिगारमुक्ती या साऱ्या कल्पना आणि त्यासाठी सुरू असलेले लढे हा या अखंड मानवमुक्तीचा भाग आहेत. म्हणजे पाहा की, स्त्रीचे ‘स्व’त्व शोधण्याची धडपड ही व्यक्तिवादी म्हणता येईल.

पण या शोधाचे नाते आहे ते आत्मकेंद्रिततेशी नाही. आत्मभान होत असतानाच ती ‘माजघरा’त कोंडलेल्या अवस्थेतून, कोंझ्या नजरेपासून मुक्त होते आणि तिला विश्वभान होते. हे विश्वभान केवळ माहिती-ज्ञानाच्या पातळीवरचे नाही, तर मानवी अन्वयाचे. म्हणून 8 मार्चला ‘जगातल्या स्त्रियांनो एक व्हा!’ ची हाक ऐकू येते. स्त्रीच्या अस्तित्वाचा लढा, अणुविरोधी लढा, विकासाच्या रेट्याने हटविल्या जाणाऱ्या विस्थापितांचा लढा एक होतो. म्हणजे स्त्रीवादी चळवळीत स्त्रीच्या शरीराचे खाजगीपणही जपावे लागते. कारण त्या शरीरावर, त्याच्या जननक्षमतेवर हक्क सांगणारे- नियंत्रण करू पाहणारे अनेक आहेत. त्यात पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्था, वंशवाद, वर्णवाद, विज्ञान असे अनेक घटक आहेत. पण हे जपतानाच एकूण व्यवस्थेतील स्त्रीवर अन्याय करणारी परिभाषिते (डिस्कोर्स), व्यवस्था यांविरुद्ध लढावे लागते. म्हणून गांधीजींच्या तत्त्वज्ञानातील व्यक्ती आणि व्यवस्था या दोन्हींत परिवर्तन आणण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्यात संतुलन साधावे लागते.

 स्त्रीमुक्ती : न्याय्य समाजव्यवस्थेची पायाभरणी
म्हणजे स्त्रीमुक्ती हे कोणा एका व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवून देणारे वा तरुण मुलींच्या स्वातंत्र्याचा विचार करणारे तत्त्वज्ञान नसून, समाजव्यवस्थेतील न्यायाचा विचार करणारे, समाजातील सत्तेच्या उतरंडीविरुद्ध काही म्हणणारे- प्रत्यक्षात ती उतरंड बदलू पाहणारे तत्त्वज्ञान आहे. स्त्री-पुरुषांतील नाते अधिक नितळ करण्याचा यत्न करणारे तत्त्वज्ञान आहे. स्त्रियांमधील परस्पर नाते पुरुषनिरपेक्ष करू पाहणारे तत्त्वज्ञान आहे. स्त्रीमुक्ती हा शब्द उच्चारताच काही जणांना कुटुंब या संस्थेला तडे गेल्यासारखे वाटतात. सोसण्यावर कुटुंबसंस्थेची इमारत उभी आहे हे ते कबूल करतात. पण प्रश्न जरा वेगळा आहे. स्त्रीवादालाही कुटुंब ही संस्था हवीशी वाटते, आजच्या काळात विशेष वाटते. कारण शासनासारख्या अनेक संस्था जेव्हा हुकूमशाही, दडपशाही करणाऱ्या होतात तेव्हा सामान्य माणसाला कुटुंबांतर्गत लोकशाहीचा, एकमेकाच्या जपणुकीचा आधार वाटतो. पण त्यासाठी कुटुंबसंस्था एका पुरुषकेंद्राभोवती फिरत राहता कामा नये. मतस्वातंत्र्याशी सतत तडजोड करून, मन मारून कुटुंब उभे ठेवून काय उपयोग? एका कुटुंबाला अनेक स्वभाव, अनेक मते, अनेक वेळापत्रके आणि प्रसंगी अनेक धर्म वा धर्म नसणे, अशी अंगे असतात. लोकशाही कुटुंबात जिथे प्रत्येक माणसाच्या डोळ्यांत माणुसकीचे तेज आहे, तिथे 
स्त्री-पुरुष नातेही सत्तेचे-मत्तेचे राहणार नाही. मुक्त स्त्रीचे आपल्या पतीशी असणारे नाते अधिक गहन असणार हे स्पष्ट आहे.

स्त्रीप्रश्रावर बोलू लागले की कोणीतरी, अ नावाच्या सुनेचे वा क नावाच्या मुलीचे कसे चुकले, यावर तावातावाने बोलू लागते. स्त्रीमुक्ती वा दलितमुक्ती यांचा असा आग्रहच नाही की विषमतेने नाडला गेलेला प्रत्येक माणूस आदर्श आहे. ते कधी चुकत नाही. माणसांच्या व्यवहारात असे अवास्तव गृहीतक कसे असेल ? याशिवाय हे अगदी प्राथमिक मानसशास्त्र आहे, की ज्या व्यक्तीला नाडले, छळले गेले आहे; जिच्यावर बळाचा प्रयोग झाला आहे, जिला सतत न्यूनत्वाची जाणीव दिली गेली आहे, तिच्या वृत्ती सरल राहणार नाहीत. त्यामुळे चुका पुरुषसत्ताक व्यवस्था, आणि ती चालविण्याचा अधिकार प्राप्त होणाऱ्या व्यक्ती यांच्या होतात आणि त्या सत्तेच्या टाचेखाली वावरणाऱ्यांशी होतात. प्रश्न मानवी चुकांचा आहे पण ते संदर्भ थोडे वेगळे आहेत. स्त्रीस्वातंत्र्य ही द्यायची गोष्ट नाही- उदार होऊनही नाही- अटी घालत तर मुळीच नाही. जन्मतः वेगळ्या स्वरूपाच्या शरीरात असणारे स्त्री-पुरुष दोये स्वतंत्र आहेतच, आणि ते आजच्या राज्यव्यवस्थत समान नागरिक आहेत हे सर्वांना मान्य व्हावयास हवे.

स्त्रीवाद : वास्तवाचे आकलन करून येणारी परिदृष्टी 
आतापर्यंत या लेखात स्त्री आणि स्त्रीवाद हे शब्द एकवचनी वापरले असले तरी स्त्री ही कल्पना त्यातील अंतर्गत भेदांना लपवून वापरता येत नाही. आणि स्त्रीवाद तर एकाकार नाहीच. विषमतेचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे स्त्रीवाद अनेक आहेत. स्त्रीवाद ही वास्तवाचे आकलन करून घेणारी परिदृष्टी असेल तर हे आकलन एकाच एका चाकोरीतील कसे असणार? कालमान परिस्थितीप्रमाणे तत्त्वज्ञानाची मांडणी, त्यातील संकल्पनाव्यूह हा बदलत जातो. शतकानुशतके ज्ञानक्षेत्रापासून किंबहुना सर्वच सार्वजनिक क्षेत्रापासून ज्या स्त्रियांना दूर ठेवण्यात आले होते, त्या क्षेत्रातील प्रस्थापित ज्ञान आणि स्त्रियांची नजर यांचा अन्वय जडला. स्त्रियांच्या अभ्यासात जुन्या मांडणीला नवा आशय मिळाला किंवा मांडणीच नव्याने करण्यात आली. स्त्री-अभ्यास वा Women's Studies ही ज्ञानशाखा जन्माला आली, ती केवळ स्त्रीप्रश्नांचा अभ्यास करणारी शाखा नसून स्त्रीवादी परिदृष्टीने अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, वाङ्मयीन समीक्षा पुन्हा तपासणारी, काही संकल्पना डोक्यावर उभ्या करणारी अभ्यासकीय शिस्त आहे. त्यात स्त्रीच्या आत्मभानाचा आणि विश्वमानाचा आविष्कार होत आहे. स्त्री जसजसा जग बदलण्याचा विचार करीत गेली, तसतशा तिच्या परिवर्तनाच्या कल्पनांना पुरुषी जगाच्या प्रतिक्रिया येत गेल्या. बाहेर जगही बदलत होते, त्याचा संस्कार दोघांवरही होत होता.

शिवाय वातावरणात राजकारण, धर्माचे राजकारण, बाजारपेठेचे राजकारण, हुशारीने बाईचे जागृत होणारे मन आणि संघटित होऊ पाहणारी शक्ती आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. स्त्रियांच्या चळवळीतील शब्दसंकल्पनाही पळवून नेऊन आपल्याशा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्त्री-पुरुष हे एक मूलभूत वेगळेपण मानले तरी, इतर अनेक प्रकारचे वेगळेपण आहेत. ‘स्त्री’ अशी संकल्पनाच योजित राहिले की ती फारच धूसर होते. एकतर स्त्री सर्व वर्गांत-वर्णांत आहे. त्यामुळे स्त्रीत्वाची वेदना जगातल्या स्त्रियांना एकत्र आणते असे म्हणणे मर्यादित अर्थाने खरे आहे. वर्णांतील-जातींतील परस्पर ताणतणाव, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील भिन्न हितसंबंध यांमुळे त्या त्या गटातील स्त्रीचे आकलन घडत असते आणि तिच्या चळवळीचे अग्रक्रमही ठरत असतात. हे सारे दृश्य पाहत असताना स्त्री ही केवळ परिस्थितीची बळी आहे असा दृष्टिकोन घेणे योग्य नाही. कारण माणूस कितीही प्रतिकूल परिस्थितीत जगत असला तरी त्याच्याकडे जसे एक परिस्थितीशी लढण्याचे कर्तेपण असते, तसे वेगवेगळ्या दडपणांत जगणाऱ्या स्त्रियांनी कोंदटलेल्या वातावरणातही स्वतःचा अवकाश निर्माण करण्याचे सतत प्रयत्न केले आहेत आणि आजही ते सुरू आहेत. (कारण त्या काही वेळा अधिक चिवट ‘माणूस’ असतात.) जन्माने निर्माण होणाऱ्या सर्वच विषमतेविरुद्ध आपण जो लढा देत आहोत, त्यातला हा लिंगभेदाविरुद्धचा लढा गाभ्याच्या ठिकाणी आहे. पण म्हणूनच तो एकारलेपणे- अलगाववादी भूमिका घेऊन लढता येत नाही. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यात स्त्री-प्रश्नातही खूप गुंतागुंत निर्माण झाली आहे. ती समजावून घेऊन व्यावहारिक पातळीवरचे अग्रक्रमही ठरवावे लागतात. चळवळीची गतिकी समजून घ्यावी सागते. पण दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञानाचे वा चिंतनाचे आव्हानही नजरेआड करता येत नाही.

स्त्री आणि वास्तव
आज ऐरणीवर असणारे प्रश्न कोणते असे विचारले तर पुढील परिस्थिती नजरेसमोर येते.
 

0 व्यक्तिगत हेच ‘राजकीय’ आहे ही स्त्रीवादातील घोषणा बाजूला सारून आता एका मोठ्या राजकारणाचा वेध घ्यावा लागतो आहे. जागतिकीकरणाच्या नावाने जागतिक बँकेचे जे अधिराज्य आहे, त्यामुळे Feminization of Poverty - दारिद्र्याचे स्त्रीकरण झाले. कोणी प्रकल्पविस्थपित झाले; कोणी व्यवसाय विस्थापित, कोणी निसर्गदत्त जगण्याच्या साधनांपासून दूर लोटले गेले. या वेळी कुटुंबांतर्गत शोधणे ही वस्तुस्थिती असली तरी स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करणे तातडीचे झाले आहे.
 

0 हिंसाचार : हिंसाचारांची संस्कृती हा प्रश्न कौटुंबिक, नोकरीच्या ठिकाणी आणि समाजपातळीवर वेगवेगळ्या स्वरूपांत जाणवत आहे. निसर्ग आणि मानव या नात्याचा ढळलेला तोल स्पर्धा-इच्छा, वासना यांना दिलेला महत्त्वाकांक्षेचा मुलामा, स्वतःत जोपासलेली अतृप्ती, यांमुळे हिंसाचार वाढतो, तसाच तो धार्मिक जातीय नेतृत्वाने निर्माण केलेल्या समूह उन्मादानेही वाढतो. या दोन्हींची शिकार तर स्त्रिया होतातच. पण गेल्या काही वर्षांत स्त्रिया हिंसेत सामीलही होताना दिसतात. त्यामुळे जागतिकीकरणाने वाढणारे दारिद्र्य आणि समाजात वाढणारी हिंसक मनोवृत्ती (या दोन्हींचे परस्पर नातेही आहे.) या दोन्हींचा सामना करण्यासाठी 17 ऑक्टो. 2000 रोजी 140 देशांतील स्त्रिया एकत्र आल्या- महिला जागरण 2000 साठी!

0 या दोन प्रश्नांइतकाच महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे घर्म आणि जात वापरून पुरुषसत्ताक राजकारणाने स्त्रियांमध्ये निर्माण केलेली फूट, ‘आमच्या स्त्रिया’ हा शब्दप्रयोग नसून एक चलाख संकल्पना आहे हे अनेक स्त्रियांच्या लक्षात आलेले नाही. एकूणच वेगवेगळ्या छटांच्या धार्मिक मूलतत्त्ववादाने खरे म्हणजे राजकारण्यांनी धर्मभावनेचा केलेला जो वापर आहे, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धार्मिक प्रतीकांचा वापर करून स्त्रीला काळात मागे लोटण्याचा आणि हिंसेचे समर्थन करण्याचा जो यत्न आहे; त्याविरुद्ध उभे राहणे अगत्याचे आहे. स्त्रियांचा लढा एका बाजूला धार्मिक नियंत्रणाविरुद्ध, धार्मिक कायद्यांविरुद्ध आहे आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने चाललेल्या हिंसाचाराविरुद्ध आहे!
 

0 स्त्री सार्वजनिक क्षेत्रात आली तेव्हापासून खाजगी विरुद्ध सार्वजनिक हा वाद सर्व देशांत चालू आहे. आपल्याकडे तूर्तास निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क ती मागते आहे. 74व्या घटनादुरुस्तीपासून 33% आरक्षणांच्या वादापर्यंत त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. पण ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींनी तिला सहभागी करून घेतले, त्या लढ्याची मूल्येच नाकारण्याचा यत्न सुरू आहे. अनेक वर्षे वाट पाहत थांबलेल्या समाजाच्या आकांक्षा जागृत झाल्या आहेत, त्यामुळे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत.

स्त्रियांच्या चळवळीतील हुंडा, बलात्कार, हिंसाचार, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न कमी होत नाहीत. त्यांची दाहकता वाढतेच आहे. वर उल्लेखिलेल्या धर्माच्या सामूहिक वापरामुळे अंधश्रद्धाही वाढतेच आहे. 
0 वातावरणात जो शब्द गाजतो आहे तो सबलीकरण (एम्पॉवरमेंट) सत्ता आणि सत्तेची उतरंड यांना प्रश्न विचारून त्या भूमिकेवर उभ्या असणाऱ्या स्त्रीवादाला या सबलीकरणाच्या जाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न आहे. पुरवले जात आहे ते कृतक सबलीकरण! पुरवले जाणे असा शब्द जाणीवपूर्वक वापरला- पुरुष स्वतःकडे कुटुंबाच्या गरजा पुरविण्याची भूमिका घेतो, त्याचीच ही विस्तारित भूमिका आहे. पण आपल्या देशात जिथे घराजवळ पाणी नाही-शरीरधर्माला आडोसा नाही-जळणाला लाकूड नाही आणि अन्नाची सुरक्षितता नाही अशी अनेकानेक स्त्रियांची अवस्था आहे, तिथे या लौकिक पुरवठ्याला नाही तरी कसे म्हणणार?
 

0 स्त्री ‘अदृश्य’ आहे अशी एके काळी स्त्रीवादाची तक्रार होती. आज ती भरपूर दृश्यमान झाली आहे ती बाजारपेठी जाहिरातींमध्ये, फॅशन शोच्या बोर्डावर वा सौंदर्यस्पर्धांत. पण कष्टकरी स्त्री मात्र नकाशावरून अदृश्य होते आहे. स्त्री-पुरुष प्रमाणही स्त्रियांच्या संदर्भात घटते आहे. किती, ते नव्या जनगणनेत कळेल. या परिस्थितीत उभे असताना ‘मी कोण?’ हा प्रश्न विचारताना आठवण येते जोतीराव आणि सावित्रीबाईंची, ताराबाई शिंद्यांची, आगरकर, कर्व्यांची, र.धों.कर्व्यांची, विठ्ठल रामजी शिंदे-बाबासाहेब आंबेडकरांची, गांधींची, दादा धर्माधिकारी यांची, डॉ. लोहियांची. हे केवळ नामस्मरण नाही. या सर्वांनी स्त्रीच्या आत्मबळाची- ‘स्वरक्षणीया’ असण्याची जी कल्पना मांडली तिच्याशी आजही संवाद चालू आहे. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील पुरुषस्वभाव आणि स्त्रीस्वभाव यांतील परस्पर नाते आणि आज मांडली जाणारी स्त्री-पुरुष द्वंद्वाच्या पलीकडे जाण्याची कल्पना यांत संवाद होऊ शकतो. पाश्चात्त्य स्त्रीवाद तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून, अभ्यासकीय शिस्तीतून समोर आला. त्यातील अनेक वादांनी खूप प्रश्न विचारायला भाग पाडले. पण समृद्ध विचारविश्वाचेही एक दडपण असते- ते बाजूला सारून जरा आपली माती तपासली पाहिजे. म्हणजे ‘शक्ती’चा विचार करणारा ‘हिंदू’ विचार मात्र निश्चित नाही. या देशाच्या इतिहासाच्या अनेक प्रवाहांत व्यक्त झालेला विचार शोधून त्याची व्यवस्था लावणे आणि एक नवे सूत्र मांडणे याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे.

हे नवे सूत्र कशासाठी?
आपण अशा एका स्त्रीच्या शोधात आहोत जी स्त्रीत्वाने वाकलेली नाही. जगात अंग चोरून वावरायला हवे, असे जी मानत नाही. स्वतःची ओळख स्वतः शोधणारी पण स्वतःतच रमून न गेलेली स्त्री आपण शोधत आहोत. कारण ज्याला ‘स्व’ निरोगी जाणीव झाली आहे, तोच दुसऱ्याशी निरामय नाते जोडू शकतो. नव्या स्त्रीचा शोध हा एका प्रकारे नव्या जगाचा शोध आहे. मला स्वतःला युटोपिया- आदर्श जगाची कल्पना भयावह वाटते. कारण ती कल्पना नियतत्त्ववादी असते. एका प्रकारे हुकुमशाही गाजविणारी असते. तरीही मूल्यविचार करताना आपण एका नव्या जगाचा विचार करतोच. ज्या जगात निसर्गदत्त घटकांची न्याय्य वाटणी आहे, ज्या जगात जगण्याला यश-स्पर्धा-महत्त्वाकांक्षा यांचे कुंपण नाही, चांगले असणे हे पहिले येण्यापेक्षा महत्त्वाचे आहे, मी आणि माझे' यापेक्षा ‘आम्ही व आमचे’ महत्त्वाचे आहे. तरीही वैयक्तिक अवकाशाचा संकोच झालेला नाही; बळ-जबरदस्ती-हिंसा हे जगातले कुरूप आहे ते नागरी जगण्याला रानाकडे नेणारे आहे म्हणून त्याला अधिक माणूस होण्याच्या प्रवासात जागाच नाही, ज्यासाठी मी श्रम केले नाहीत त्या कशाचीही मी इच्छाच करू शकत नाही हे भान स्वाभाविकपणे आपलेसे होईल, ते आत्मबल किती सुंदर! माणसाच्या जगण्यात नात्याला, जपणुकीला, सहभागी होण्याला महत्त्व आहे. ते कुटुंब या पातळीवरही आणि मोठ्या कुटुंबाच्या पातळीवरही! स्त्रीवादी स्त्री हे सौंदर्य आपलेसे करू पाहते. स्त्रीच का? कोणीही संवेदनाक्षम पुरुषही या भूमीवर स्त्री-पुरुष एकत्र येऊ शकतात.
 

Tags: जागतिक महिला दिवस स्त्रीमुक्ती न्याय्य समाजव्यवस्था ‘स्त्री’त्व universal lady day just social order feminism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पुष्पा भावे

समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका. 
माजी प्राध्यापक, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई.   दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके