डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एवढ्यात फिल्म तुटावी तसे काहीतरी घडले. सभा ऐन बहरात आलेली असतांना मागच्या बाजूला कुजबूज करणाऱ्या काही युवकांपैकी एक ‘दक्ष’ होऊन ताडकन उठला. श्री. कर्णिकांना त्याने मध्येच थांबवले. "एक शंका विचारायची आहे" असे म्हणत पाच मिनटे सलग बोलतच राहिला.  संयोजकांची परवानगी नाही. प्रमुख वक्त्याची अनुमती नाही.

 

सभा ऐन बहरात आलेली. प्रत्येक वाक्याच्या भावपूर्ण भाषणामुळे वातावरण ओथंबून आलेले. प्रमुख पाहुणे श्री. मधू मंगेश कर्णिक यांच्या मनमोकळ्या आणि मधाळ बोलण्यामुळे सभेची लज्जत आणखीनच वाढलेली. सभेचे निमित्त होते, पुस्तक प्रकाशनाचे. 

दलित लेखक श्री. माधव कोंडविलकर यांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकाचे प्रकाशन. चर्मकार जमातीतील श्री. कोंडविलकर प्राथमिक शिक्षक म्हणून कोकणातल्या ग्रामीण भागात काही वर्षे काम करत आहेत. पांढरपेशा लोकांकडून आणि स्वकीयांकडूनही त्यांची फार अवहेलना झाली. वाचनाचे, लेखनाचे त्यांना जबरदस्त वेड. पण त्यासाठी आवश्यक ते स्वास्थ्य आणि निवांत घर गेल्या दहापंधरा वर्षात त्यांना मिळाले नाही. काही मित्रांच्या प्रयत्नानंतर देवरूपात त्यांना घर मिळाले, बदली झाली, काहीसे स्वास्थ्य लाभले. अशा या लेखकाचे कौतुक करावे, त्यांच्या पुस्तकाचा उचित सम्मान करावा, म्हणून काही ‘साहित्य स्नेह्यां’नी हा समारंभ आयोजित केला होता.

श्री. कर्णिक मोठ्या आस्थापूर्वक हजर राहिले होते. श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती. प्रास्ताविक निवेदनानंतर कु. सुरेखा जोशीने पुस्तकाचे रसास्वादात्मक विवेचन केले. फार अंत:करणपूर्वक बोलली. पुस्तकातील दाहक अनुभवांमुळे व्याकुळ झाली होती. आपल्या पांढरपेशांच्या नाकर्तेपणाची खंत व्यक्त होत होती. पुस्तकाच्या अंतरंगाशी एकरूप होऊन बोलत होती.

‘आकाशात ढग ओथंबून यावेत, विहिरीत अलगद उतरावेत, तसं एक एक अनूभव कोंडविलकर उतरवतात' काहींच्या वाट्याला ‘सनीडेज’ रंगवावेत असे जीवन येते, तर कोंडविलकरांना अनुभवावे लागले ते फक्त ‘डार्कडेज’, ‘परीटघडीचे जीवन जगणाऱ्या पांढरपेशा मनाला ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' वाचून अक्षरशः तडे गेले!’

अशा भावव्याकुळ भाषेत सुरेखा बोलत होती आणि सभेचे अवघे वातावरण गदगदून जात होते. कोंडविलकरांच्या तर साऱ्या पूर्वस्मृती पुन्हा जाग्या होत होत्या. त्यांचा कंठ दाटून येत होता.

तशा अवस्थेत ते बोलायला उठले.

काय बोलणार?

सारे काही पुस्तकात मांडलेले आहे. पण कार्यक्रमानिमित्त काही तरी बोलले पाहिजे. शिवाय मित्रवर्यांचे ऋण मान्य करण्याचे तेच एक ठिकाण होते. त्यांनी स्वतःला सावरले. ते नेमके आणि मोजके बोलले. थोडीशी कुटुंब कहाणी सांगितली. पुस्तकाच्या लेखनपूर्व अवस्थेबद्दल बोलले. श्री. मधु मंगेशांनी कसे प्रोत्साहन दिले ते सांगितले. त्यांनी स्वतः जे सोसलेय ते ऐकुन श्रोत्यांची मने कासावीस झाली. विसाव्या शतकात विज्ञानयुगात एका निरुपद्रवी माणसाला केवळ जातीचा शिक्का कपाळी बसल्यामुळे एवढे सोसावे लागावे? सामाजिक विषमतेचे हे चटके अद्याप किती काळ सहन करावे लागणार? 'मुक्काम पोस्ट देवाच्या गोठण्या’त जे, तेच इतरत्र! असेच डोके भिरभिरत राहिले.

शेवटी मधू मंगेश कर्णिक बोलायला उठले. सदर पुस्तकावर व लेखकावर त्यांची प्रथमपासूनच ममता. पुस्तकाचे संगोपन त्यांनीच केलेले.  ती सर्व कहाणी त्यांनी सांगितली. कोंडविलकरांनी अभिव्यक्त केलेल्या सच्च्या अनुभवांचे कौतुक केले. असे लेखन करण्याची ऊर्मी आपणासही येते. पण ते जमले फक्त कोंडविलकरांना. कारण ते चटके त्यांनी सोसले आहेत. त्यांच्या अंतःकरणाच्या त्या जखमा आहेत. त्यांचा तो स्वाभाविक आविष्कार आहे. लेखनासाठी केलेले लेखन नव्हे, किंवा जगापुढे मांडलेली कैफियतही नव्हे. कडवटपणा टाळून ते लिहू शकले, हे मोठे नवल होय. त्यांच्या या पुस्तकाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांनी असेच कसदार लेखन करावे.

एवढ्यात फिल्म तुटावी तसे काहीतरी घडले. सभा ऐन बहरात आलेली असतांना मागच्या बाजूला कुजबूज करणाऱ्या काही युवकांपैकी एक ‘दक्ष’ होऊन ताडकन उठला. श्री. कर्णिकांना त्याने मध्येच थांबवले. "एक शंका विचारायची आहे" असे म्हणत पाच मिनटे सलग बोलतच राहिला.  संयोजकांची परवानगी नाही. प्रमुख वक्त्याची अनुमती नाही.

शेवटी कर्णिकांनीच त्याला थांबविले. सभेच्या संकेतांना डावलून असे मध्येच बोलायला उभे राहिल्याबद्दल त्याची कानउघडणी केली आणि सभेच्या शेवटी त्याच्या शंकेचे निरसन करू असे सांगितले. पुढे पाच दहा मिनिटांतच सभेचे कामकाज आटोपले. आयुष्यात प्रथमच एवढे तोंडभर कौतुक आणि जाहीर सन्मान वाट्याला आल्यामुळे श्री. कोंडविलकरांना थोडे बावरल्यासारखे वाटले असेल तर नवल नाही. पण ते थोडेसे अस्वस्थही वाटले. आपण या गावात, मध्यवस्तीत रहायला आल्यामुळे आता सामाजिक ताणवाण वाढणार की काय? जे इतर गावात आपण सोसले तेच या गावातही आणि आपल्याबरोबरच आपल्याला मदत करणाऱ्या मित्रांनाही सोसावे लागणार काय? 

अशा शंका त्यांच्यासारख्या होरपळलेल्या मनात उद्भवणे स्वाभाविक होते, कारण औधत्यपूर्ण प्रश्न विचारणाऱ्या त्या युवकाचा प्रश्न तसा धारदार होता, सामाजिक विषमतेमुळे आजवर निर्माण झालेल्या अनेक जखमा पुन्हा वाहावयास लावणारा होता. त्याचा बोलण्याचा थाटमाटच सांगत होता की संस्कृतिरक्षणाची आणि सामाजिक नीतिमत्तेची मक्तेदारी जणू आपल्याकडेच आहे, असे मानणाऱ्यांपैकी तो होता. त्याचे म्हणणे श्रोत्यांना कळले, ते असे. 'आपल्या समाजातच राहून कोंडविलकारांसारख्या लेखकांनी स्वतःच्या लेखन, वाचन, चिंतनाद्वारा आपल्या समाजाची अस्मिता जागृत करावी. पण हे दलित लेखक उच्चवर्णीय लोकांच्यात रहाण्यासाठी धडपडतात आणि स्वतःच्या समाजापासून फारकत करून घेतात!

त्या युवकाच्या प्रश्नाचा, बोलण्याचा रोख सरळच होता. एका दलित लेखकाचा उच्चवर्णीय समाजाकडून एवढा जाहीर सन्मान व्हावा म्हणजे काय? आम्हा उच्चवर्णीयांच्यातच राहण्यासाठी त्यांना घर कशाला हवे? ते आमची बरोबरी करू पाहातात म्हणजे काय? त्यांनी त्याच शापित वास्तूत आणि वस्तीत राहावे. नवे जग उभारण्याची स्वप्न पाहावीत दलित साहित्यातून रंगवावीन. आम्ही फार तर त्यांचे बाहेर राहून कौतुक करू. एखादे पारितोषिक द्यायला लावू. नाहीतरी सरकारने एवढ्या सवलती दलितांना दिलेल्याच आहेत. त्यामध्ये आणखी एक! पण त्यांनी आपली वस्ती सोडू नये. आम्ही आमची आळी सोडून त्यांच्या वस्तीत जातो काय? मग त्यांनी का धडपडावं? आणि त्यांच्या या वर्तणुकीचा ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनी, समतावाद्यांनी असा जाहीर गौरव करावा म्हणजे काय? असे बरेच काही तो युवक सुचवून गेला. 

नंतरच्या वादविवादात ह्याच्याबरोबरचे इतर काही युवक त्याच सुरात हुज्जत घालत होते. संयोजकांनी वेळेचे बंधन घालून तो चर्चापुढे फार वाढू दिली नाही. शिवाय श्री. कर्णिकांनाही लगेच मुंबईला परत जायचे होते. म्हणून ती सुबुद्ध चर्चा तेथेच थांबली! पण ज्यांच्या मनात वादळ निर्माण व्हायचे ते सुरु झालेच. खरे तर उपरोक्त आक्षेपांत सर्व असे काय होते? परंपरावादी विचार जोपसणाऱ्यांनी असे मुद्दे वारंवार, वेळोवेळी उपस्थित केले आहेत. दलितांबद्दलचा त्यांचा तिरस्कार, त्यांना मिळणाऱ्या शासकीय सवलतीबद्दलचा मत्सर आणि स्वतःच्या उच्चवर्णीय जातिसंस्कृतीबद्दल अहंगड त्यामधून व्यक्त झाला आहे!

पण एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात. एवढ्या अनौचित्याने ती मळमळ व्यक्त व्हावी? शिवाय, दलितांच्या उन्रतीचा कळवळा आपल्यालाच आहे, असा बुरखा पांघरून हे बोलले जाते! खरे तर या प्रश्नकर्त्यांनी पददलितांच्यासाठी आतापर्यंत खरोखर काय केलेय? निदान ज्या पुस्तकाचा गौरव चालू होता ते पुस्तक तरी त्यांनी वाचलेय का? (त्यापैकी एकाने हळूच लेखकाजवळ त्याची प्रत वाचावयास देण्याची विनंती केली. म्हणजे असली पुस्तके मोफतच वाचण्यासाठी असतात तर!) त्या लेखकाने खरोखर किती सोसलेय ते लक्षात घेतलेय का? आपण मोठा आव आणून त्या लेखकाला त्याच्या वस्तीवच राहायला सांगतो आहोत. तिचे कधी जवळून दर्शन घेतलेय का? पण ‘ओल्ड हेड ऑन यंग शोल्डर्स' असणारे हे यंगटर्कस् अशी विधायक भूमिका कधीच घेणार नाहीत. राष्ट्रवादाचा, शुद्ध चारित्र्याचा फक्त उदघोष करणार. 'गतजन्माची पापे घोरे, क्षालयाला तुमची रुधिरे' असे कळवळून म्हणणाऱ्या कविरायाच्या रत्नागिरी जिल्हयात अद्याप हे घडतेय!

आनंदाची गोष्ट एवढीच की, हा कार्यक्रम आयोजित करणारेही युवकच होते. त्यांनी समता संगराचे हे आव्हान स्वीकारले आहे. तशा अगांतुकांशी टक्कर देत देत नवे नवे समता उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. समता संगराचे पाईक होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देवरुखसारख्या आडगावात घडलेल्या या छोट्याशा घटनेने स्फुर्लिंग पेटवला आहे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके