डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

द कलाम इफेक्ट : पी.एम.नायर, 2008 प्रकरण 18 वे

25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. या संपूर्ण पाच वर्षांच्या काळात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रपतींचे सचिव होते (1966 च्या बॅचचे आयएएस अधिकारी) पी.एम.नायर. त्यांनी लिहिलेले The Kalam Effect : My years with the Presidentहे पुस्तक ‘हार्पर कॉलिन्स’ या दिल्लीतील प्रकाशनसंस्थेने 2008 मध्ये प्रकाशित केले. विख्यात कायदेतज्ज्ञ फली एस.नरिमन यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘या पुस्तकाच्या मजकुराविषयी दोनच शब्द सांगायचे असतील तर Extremely readable हे शब्द मी वापरीन.’ जेमतेम दीडशे पानांच्या या पुस्तकातील 34 छोटी-छोटी प्रकरणे अतिशय साध्या, सोप्या व प्रवाही भाषेत लिहिली आहेत. त्यातील 18 वे प्रकरण (कलामांच्या ‘टर्निंग पॉइंट’ पुस्तकातील ‘त्या’ उल्लेखावरून) सध्या सुरू असलेल्या वादावर लख्ख प्रकाश टाकणारे आहे.

पण आश्चर्य हे आहे की, 2008 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची त्यानंतर अनेक पुनर्मुद्रणे झालेली असूनही या प्रकरणाचा उल्लेख (मराठी तर सोडाच) पण इंग्रजी माध्यमांत व इंटरनेटवरूनही कोणाकडून केला गेला नाही... म्हणून ते प्रकरण अनुवाद करून प्रसिद्ध करीत आहोत. सोबत, त्या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्रही.

2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल संमिश्र लागले. त्यामुळे नव्या सरकारच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपती कलामांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागली. पण त्या प्रक्रियेत, तर्कालाच सत्य म्हणून पुढे करणाऱ्यांच्यामुळे कलाम हे अनेकांच्या टिकेचे लक्ष बनले.

वस्तुस्थितीशी सुतराम संबंध नसलेल्या कपोलकल्पित गोष्टी रचल्या गेल्या. शेक्सपिअरने ‘किंग लिअर’मध्ये म्हटले आहे, ‘‘पाप न केल्यामुळेच मी पापी ठरलो.’’ तसे विधान कलाम यांनी केले तर ते योग्यच ठरेल, पण कलामांना स्वत:ची दया केलेली आवडत नाही.

निवडणुकांचे निकाल (13 मे रोजी) जाहीर झाले, पण कोणत्याही एका पक्षाला बहुत मिळाले नाही. नवे सरकार कधी स्थापन होतेय याची देश वाट पाहात होता. निकालानंतर चार दिवसांनी कलामांनी मला बोलावून त्यांचा आवडता प्रश्न विचारला, ‘आता काय करू या?’ या प्रश्नाचा मी अगोदरच विचार करून ठेवला होता, त्यासाठी बारून मित्रा यांच्याशी तपशीलवार चर्चा केली होती.

बारून मित्रा हे जरी आय.ए.एस. असले तरी कायदा आणि घटनात्मक तरतुदी याबाबतचा त्यांचा अभ्यास एखाद्या कायदेपंडितासारखाच आहे...

मी कलामांना म्हणालो, ‘‘सर, भारताचे राष्ट्रपती म्हणून तुमच्या स्वत:च्या दृष्टिकोनातून, कोणता पक्ष किंवा आघाडी देशाला स्थिर सरकार देऊ शकेल याबाबत तुमचे समाधान झाले पाहिजे आणि मग त्या पक्षाच्या वा आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले पाहिजे.’’

‘‘हो, तर मग आता काय करू या?’’ त्यांनी पुन्हा विचारले. ‘‘मी अनिश्चित काळासाठी वाट पाहू शकत नाही.’’

‘‘खरं आहे सर, पण परिस्थिती आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली आहे. तुम्ही व्यक्तिश: यावर समाधानी असायला हवं की, स्थिर सरकार बनू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत (गेल्या चार दिवसांत) तुमच्याशी संपर्क साधून सरकार स्थापन करण्याचा दावा कोणीही केलेला नाही, पण प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून येत असलेले वृत्तांत पाहता, काँग्रेस पक्ष इतर काही पक्षांच्या सहकार्याने सरकार बनवण्याच्या अवस्थेत आहे असे दिसते. आणि हीच माध्यमे सांगताहेत की, ‘काँग्रेसच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड झाली आहे.’ त्यामुळे मला वाटतं, आपण सोनिया गांधींना पत्र पाठवून भेटायला येण्याची विनंती करावी.’’

मग मी 17 मे 2004 अशी तारीख असलेले पत्र तयार केले. त्याच दिवशी सोनिया गांधींनी राष्ट्रपतींच्या भेटीला यावे असे निमंत्रण देणारे ते पत्र होते.

पुढे मी राष्ट्रपतींना म्हणालो, ‘‘सर, सोनिया गांधी इतर पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे घेऊन येतील, पण तुम्ही ती सर्व वाचण्याची आवश्यकता नाही. फक्त नजरेखालून घाला आणि बेल वाजवा. त्यावेळी मी (शेजारच्या) एडीसी रूममध्ये असेल. आणि तुमची स्वाक्षरी होणे बाकी असलेले- सोनियांच्या पंतप्रधानपदावरील  नियुक्तीचे- पत्र मी तयार ठेवलेले असेल. ते पत्र घेऊन मी आलो की त्यावर स्वाक्षरी करा, सोनियांशी हस्तांदोलन करून व शुभेच्छा देऊन ते पत्र त्यांच्या हाती द्या. त्यावेळी तुम्ही सोनियांना असेही विचारावे की, तुम्हाला पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला कधी व कोणत्या वेळी आवडेल.’’ ‘‘ओऽके...’’ कलाम म्हणाले.

मग सोनियांना राष्ट्रपतींच्या भेटीचे निमंत्रण देणारे पत्र रवाना केले गेले. त्यानंतर आम्हाला असे कळवण्यात आले की, दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे 2004 रोजी दुपारी 12.15 वाजता सोनिया गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला येणार आहेत.

मग मला माझा होमवर्क करायचा होता. तेव्हा मी सोनिया गांधींची पंतप्रधानपदावर नियुक्ती करणारे पत्र तयार केले. दुसऱ्या दिवशी दुपारी भेटीची वेळ आली. बरोबर 12.15 वाजता, सोनिया गांधी डॉ.मनमोहन सिंग यांच्या सोबत आल्या. मी एडीसी रूममध्ये बेल कधी वाजतेय याची प्रतीक्षा करीत बसलो. माझ्या हातात स्वाक्षरी होणे बाकी असलेले राष्ट्रपतींचे पत्र होते, पंतप्रधान म्हणून सोनियांची नियुक्ती करणारे राष्ट्रपतींचे पत्र. मिनिट काटा पुढे सरकत होता... बेल वाजली.

मी घाईघाईने कागदपत्रांसह एडीसी रूममधून बाहेर पडलो... तर सोनिया व मनमोहन सिंग राष्ट्रपतींच्या खोलीतून (स्टडी) बाहेर पडत होते. मी धावतच ‘स्टडी’मध्ये गेलो. राष्ट्रपती तिथेच होते. मला पाहिल्याबरोबर ते म्हणाले, ‘‘मिस्टर नायर, तुम्ही म्हणालात की, सोनिया गांधी इतर पक्षांच्या पाठिंब्यांची पत्रं घेऊन येतील. पण त्या फक्त चर्चेसाठी आल्या होत्या.

त्या म्हणाल्या की, ‘इतर पक्षांच्या पाठिंब्यांची पत्र घेऊन मी उद्या येईन.’

मी त्यांना म्हणालो, उद्यापर्यंत कशाला थांबायचे. मी आज दुपारी किंवा आज सायंकाळी कोणत्याही वेळी उपलब्ध आहे. तुमची पाठिंब्यांची पत्रं तयार झाली की शक्य तितक्या लवकर या. तुमच्यासाठीचे माझे पत्र तयार आहे.’’

‘‘बरोबर केलंत सर, आपण वाट पाहू या.’’ मी म्हणालो. आम्ही दुपारी व सायंकाळी वाट पाहिली.

नंतर निरोप आला की, दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी रात्री 8.15 वाजता सोनिया गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला येणार आहेत. दुसऱ्या दिवशी रात्री राष्ट्रपतींची फक्त स्वाक्षरी करणे बाकी असलेले पत्र घेऊन मी तयार राहिलो. बरोबर 8.15 वाजता सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्यासह आल्या.

त्यावेळी मी ‘ॲन्टीरूम’मध्ये प्रतीक्षा करीत होतो. तो क्षण आला. बेल वाजली, मी आत गेलो. राष्ट्रपतींनी मला सांगितले की, त्यांना असे कळवण्यात आले आहे की, डॉ.मनमोहन सिंग काँग्रेस पक्षाचे नेते असणार आहेत. त्यांच्याकडे आलेल्या पत्रात काँग्रेस पक्षाचे संसदीय नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मनमोहन सिंग यांचे  नाव आहे. इतर पक्षांच्या समर्थनाची पत्रंही सोबत आहेत... ते ऐकल्यावर मी माघारी वळलो, माझे पत्र बदलून घेण्यासाठी.

थोड्याच वेळात ‘मनमोहन सिंग यांची नियुक्ती पंतप्रधानपदावर करीत आहे’, असे राष्ट्रपतींचे पत्र मी तयार करून आणले. डॉ.मनमोहन सिंग यांनी अतिशय नम्रपणे उभे राहून सोनिया गांधींचे आभार मानले. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून ते पत्र मनमोहन सिंग यांच्या हाती दिले, त्यांचे अभिनंदन केले आणि ‘मी माझे कर्तव्य पार पाडले’ असे समाधानाचे उद्‌गार काढले.

मला वाटले, तिथेच सर्व काही संपले. पण नाही, ती तर फक्त सुरुवात होती. अफवांच्या गिरण्या अगोदरच सुरू झाल्या होत्या. त्या अफवा सांगत होत्या की, सोनिया गांधींना पंतप्रधानपदाची शपथ देण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला. काहीजण म्हणाले, ‘कलामांनी सोनियांना सल्ला दिला की, तुम्ही पंतप्रधानपदाच्या दाव्यावर अडून राहू नका.’

काहीजणांनी कलामांना ‘हिरो’ ठरवले, सोनियांची पंतप्रधानपदावर नियुक्ती न करून देशाची अब्रू राखली म्हणून! त्यावर कितीतरी अग्रलेख आणि ‘अभ्यासपूर्ण’ लेख प्रसिद्ध झाले. काय पाहिले, काय ऐकले आणि काय कळले याची वर्णने करणारे लेख आले. तिथे आसपास कोणीही नव्हते, पण भोळे-भाबडे वाचक-प्रेक्षक खूप असल्याने प्रिंट मीडियाने तिथे काय घडले यासाठी भरपूर जागा दिली आणि टीव्हीवर खूप काही दाखवले गेले.

सोनिया गांधींचे नागरिकत्व हा विषय त्या सर्वांच्या केंद्रस्थानी होता. असा विषय, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच निर्णय दिला होता. तरीही राष्ट्रपतींकडे या विषयावर अनेक तक्रारी, दावे-प्रतिदावे दाखल झाले होते. राष्ट्रपतीभवनातील आम्हा अधिकाऱ्यांसाठी तर फार पूर्वीच तो विषय ‘नॉनइश्यू’ झाला होता. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुस्पष्ट होता आणि राष्ट्रपती कलाम त्याबाबत पूर्णत: परिचित होते.

माध्यमांनी जे लिहिले, त्यामुळे कलाम व्यथित झाले. म्हणून राष्ट्रपतीभवनातून ताबडतोब एक पत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आले. त्यात म्हटले होते की, ‘‘सोनियांची पंतप्रधानपदावर नियुक्ती करण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या खऱ्या नाहीत.’’

मी राष्ट्रपतींना म्हणालो, ‘‘अशा प्रकारच्या वादात आपण अडकून पडू नये. अफवा पसरू देत. सत्य पुढे येईलच.’’

पण मला अजूनही वेदना होतात. कारण त्यानंतर तीन-चार वर्षे झाली तरी ते एक न सुटलेले कोडे राहिले आहे. (जरी ते कोडे आहे फक्त त्यांच्यासाठी, ज्यांना ते कोडे म्हणूनच ठेवायचे आहे.) त्यानंतर अशा अनेक वेळा आल्या. त्या मीटिंगच्या वेळी नेमके काय झाले, हे त्या तिघांपैकी कोणीही सांगू शकत होते. पण कोणीही ते सांगितले नाही.

तो प्रश्न अनेक प्रसंगी उपस्थित केला गेला. विशेषत: कलामांना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती तेव्हा. त्यावेळी अनेकांनी मला आग्रह केला की, मी कलामांशी बोलावे आणि त्यांना आग्रह करावा की, प्रत्यक्षात काय झाले ते त्यांनी सांगावे.

पण असा प्रयत्न मी केला नाही. कारण माझ्या मनात याबाबत अजिबातच शंका नाही की, त्या अफवांमुळे कलामांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचेल किंवा राष्ट्रपतींच्या कार्यालयाची अप्रतिष्ठा होईल. त्यामुळे तशा स्पष्टीकरणाची आवश्यकता मला वाटली नाही. आणि अशा संदर्भहीन वादात गुरफटण्याचीही गरजही वाटली नाही. कारण मला वाटते, राजकारण हे तर्कावरच जास्त चालत असावे, वस्तुस्थितीपेक्षा!

(अनुवाद : विनोद शिरसाठ)

(ता.क. - डॉ.कलाम यांचे Turning Points हे पुस्तक जुलैच्या पहिल्या आठवड्यात हार्पर कॉलिन्स प्रकाशनाकडूनच प्रकाशित झाले. त्या पुस्तकातील 13 वे प्रकरण Contraversial Decisionsया शीर्षकाचे आहे. त्यात कलामांनी ‘सोनियांना पंतप्रधानपद’ या विषयाची सांगितलेली हकीगत हेच स्पष्ट करते की, पी.एम.नायर यांचे सर्व विवेचन पूर्णत: बरोबर आहे.)   

Tags: विनोद शिरसाठ पी. एम. नायर डॉ.मनमोहन सिंग सोनिया गांधी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम Vinod Shirsath P. M. Nair Dr. Manmohan Singh Sonia Gandhi Dr. A.P.J. Abdul Kalam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पी. एम. नायर

माजी आय. ए. एस. अधिकारी व माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सेक्रेटरी. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके