डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंनिसपूर्वीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर

सामाजिक अन्यायाच्या बाबतीतल्या अशा विविध चळवळी दाभोलकरांनी सातारा परिसरात सुरू केल्या होत्या. शेतमजुरांची संघटना बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण अपुऱ्या माहितीमुळं तो त्यांना यशस्वी करता आला नाही. साताऱ्यात हमाल संघटन बांधण्याचा प्रयत्नही असाच फसला; पण एक चांगला यशस्वी प्रयत्न दलितांना पाणवठा खुला करण्याबाबतीत घडला. साताऱ्याजवळच्या त्रिपुटी येथे एक तळं आहे. या तळ्यात गुरांना पाणी प्यायला मोकळीक; पण दलितांना नाही, अशी स्थिती होती. दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजूबाजूच्या गावातून जनजागरण केलं आणि या तळ्यातील पाणी वापरण्यासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात त्यांना यश आलं.

‘विवेक परिवारा’तील सर्व युवक आणि युवती बरोबर वेळेत हजर झाल्या. तर्कशीलनं त्याचा मित्र सम्यक्‌ला बरोबर आणलं होतं. ‘विवेक मंडळा’त डॉ. दाभोलकरांचं शौर्य आणि कर्तृत्व याबद्दल सर सांगणार आहेत, असं सांगताच सिद्धांतही निर्भयबरोबर यायला तयार झाला होता. 

सगळे युवक आणि युवती समोर बसल्या. मी बोलायला सुरुवात करणार एवढ्यात त्यांचं लक्ष श्रद्धेकडं गेलं. तिचे डोळे पाण्यानं भरले होते, रडायचंच तेवढं बाकी होतं. मी तिच्या जवळ गेलो आणि पाठीवरून हात फिरवत तिचं सांत्वन करीत म्हणालो, ‘‘श्रद्धा, अशी डोळ्यांत पाणी आणून अस्वस्थ का आहेस? सांग पाहू- नक्की काय झालंय ते?’’

श्रद्धाला कंठ फुटला आणि तिनं सांगायला सुरुवात केली. ‘‘सर, गेल्या रविवारी मी घरी गेल्यावर ‘विवेक परिवारा’त तुम्ही काय सांगितलं, ते आईला सांगत होते. आमचं बोलणं पप्पांनी ऐकलं आणि ते माझ्या अंगावर जोरात ओरडले, ‘कारटेऽऽ तेथे जाऊन हे ऐकतेस काय? दाभोलकर हिंदू धर्मावर टीका करीत होते. सत्यनारायणाच्या पूजेला नावं ठेवत होते. पंढरपूरच्या वारीला वारकऱ्यांनी जाऊ नये म्हणत होते. हिंदू धर्मातील चाली-रीतींच्या विरोधात कायदा करण्यासाठी ते चळवळ करत होते.’

‘‘मी म्हणाले, नाही पप्पा! सर सांगत होते की, दाभोलकर विचारांची लढाई लढत होते. ते सर्व धर्मांतील अंधश्रद्धांना विरोध करीत होते. चांगले विचार आणि चांगली वर्तणूक यांच्या विरोधात नव्हते. दाभोलकर अंधश्रद्धेच्या विरोधात होते.’ एवढ्यात आईनं तोंड मधे घातलं. ‘अहो, भारत सरकारनं दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री बहाल केली, हे मी दूरचित्रवाहिनीवर पाहिलंय. दाभोलकर जर वाईट असते, तर सरकार त्यांचा असा गौरव कशाला करेल? आपण दाभोलकरांना नीट समजून घ्यायला हवं. जाऊ द्या तिला. खरं-खोटं ती समजून घेईल.’ आईनं माझी बाजू घेतली. पप्पांनी रागानं पाय आपटत कपडे घातले आणि ऑफिसला जाण्यासाठी स्कूटरवर टांग टाकली. माझी आई मला समजून घेते म्हणून बरं. तिनं मला साथ दिल्यामुळंच मी आज ‘विवेक परिवारा’त कार्यक्रमाला येऊ शकले.’’

मी श्रद्धाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणालो, ‘‘अशीच निर्भय हो आणि इतर काय सांगतात किंवा बोलतात, ते नीट समजून घेऊन मग निर्णय घ्यायला शिक. दाभोलकर हेच सांगत होते. खरंच, दाभोलकर म्हणजे ‘पृथ्वीमोलाचा माणूस’!’’ 

एवढ्यात तर्कशीलनं हात वर केला आणि तो म्हणाला, ‘‘सर, माझे वडील असंच म्हणतात. आमच्या घरात त्यांनी छान-छान पुस्तकं विकत आणली आहेत. मी त्यातील मला आवडलेली पुस्तकं वाचतो. कालच मला आमच्या कपाटात दाभोलकरांचा मुखपृष्ठावर फोटो असलेलं पुस्तक मिळालं. त्याचं नाव होतं, ‘पृथ्वीमोलाचा माणूस.’ दाभोलकरांना एवढा ‘ग्रेट’ माणूस का म्हणतात, हे आम्हाला सांगा.’’ 

मी मग बोलायला सुरुवात केली... 

‘‘पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हल्लेखोरांनी दाभोलकरांना पाठीमागून गोळ्या घातल्या आणि त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातील आणि जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. अशा विचारवंतांच्या प्रतिक्रियेतून दाभोलकर हे ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ कसे होते, त्याची साक्ष पटते. डॉक्टरांच्या हत्येनंतर एका कवीनं त्याच्या कवितेत लिहिलं आहे – 

    ‘दाभोलकर ऊन, पाऊस, वारा पीत
    ओठी घेऊन समतेचं गीत
    प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत
    मस्तकातले धर्मांध किडे काढत
    अंधश्रद्धेची भूते गाडत
    अहोरात्र चालत राहिले...
    काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
    मसणवट्यातून भोंदूंच्या मठापर्यंत
    ‘एक गाव-एक पाणवठ्या’पासून
    जातपंचायतीच्या उच्चाटनापर्यंत
    दाभोलकर अखंड लढत राहिले....
    हा असा एक जगावेगळा माणूस होऊन गेला....

‘‘या कवितेतून दाभोलकरांच्या जीवनकार्याचा परिचय प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. स्वत:चा संसार कावळे-चिमण्याही करतात. कुटुंबाचं रक्षण, शिक्षण आणि विकास यात आपण सगळे गुंतलेले असतो. ते गरजेचं आहेच; पण यात विशेष काय? थोर माणसं आपल्या कुटुंबाच्या परिघाबाहेर पडतात. अवघा समाज हेच त्यांचं कुटुंब बनतं. अशा माणसांना आपण जगावेगळे म्हणतो.’’

दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा युवकांमध्ये होतीच, पण त्याचबरोबर आणखी काही प्रश्न त्यांच्या मनात होते. 

‘‘सर, आम्हाला डॉक्टरांचं बालपण, शिक्षण याबद्दलदेखील उत्सुकता आहे. याविषयी आम्हाला सांगा,’’ अशी चौकसरावानं मला विनंती केली. जिज्ञासेला त्यांचं शिक्षण आणि व्यवसायाबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. सम्यक्‌ला त्यांच्या कुटुंबातील वातावरण कसं होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. 

‘‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या अगोदर इतर कोणत्या सामाजिक कार्यात दाभोलकर लक्ष घालीत?’’ असा प्रश्न तर्कशीलनं विचारला; तर ‘‘सामाजिक कामाबाबत कुटुंबातील पत्नी, मुले, भावंडे व आई-वडील यांचा त्यांना कधी विरोध झाला होता का?’’ अशी शंका शबानानं व्यक्त केली. 

दाभोलकरांच्या जीवनकार्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या चरित्राबद्दल मुलांना प्रचंड कुतूहल आहे, हे लक्षात येताच मला आनंद झाला. दाभोलकरांचं कौटुंबिक वातावरण, तसंच शैक्षणिक जडण-घडण आणि ‘अंनिस’पूर्वीचं त्यांचं सामाजिक कार्य याविषयी मी बोलायला सुरुवात केली...

‘‘दाभोलकर हे मूळचे साताऱ्याचे. ज्या सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी इंग्रजांच्या विरोधात संग्राम सुरू केला, त्याच जिल्ह्यात दाभोलकरांनी नव्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केली. शिक्षणक्षेत्रात ज्यांनी दलित, वंचित आणि सामान्य यांच्या शिक्षणाची क्रांती केली, त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची कर्मभूमी साताराच. नरेंद्र दाभोलकरांनीसुद्धा एक प्रकारे समाजशिक्षणाचंच कार्य केलं. लोकांचा विवेक जागृत करून सामाजिक परिवर्तन घडून यावं, हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा होती.

‘‘नरेंद्रचे वडील अच्युत दाभोलकर हे व्यवसायाने वकील होते. सर्व भावंडांत व बहिणीत नरेंद्र हे शेवटचं अपत्य. नरेंद्रचे एक भाऊ प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवदत्त, तर त्यांचे दुसरे भाऊ दत्तप्रसाद हे प्रख्यात वैज्ञानिक आणि साहित्यिक. अंटार्क्टिका संशोधनाची जी मोहीम भारतीय तुकडीने केली, त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. नरेंद्रचे दुसरे एक भाऊ श्री.अ. दाभोलकर हे प्रख्यात शेतीतज्ज्ञ होते. त्यांनी ‘प्रयोग परिवार’ ही शेतीशी निगडित संस्था गतिमान करून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीबद्दल गोडी निर्माण केली. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात द्राक्षशेतीला जो बहर आला आहे, त्याची प्रेरणा नरेंद्रचे भाऊच होते.

‘‘ही सर्व भावंडं आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी होतीच; पण या सर्वांवर कडी केली, ती नरेंद्रनं. स्वत: देवदत्त दाभोलकर यांनी आम्हा भावंडांतील ‘सर्वोत्तम कडे’ अशी भावना नरेंद्रबद्दल व्यक्त केली. ’’ 

‘‘एकाच कुटुंबातील अशी सर्वच मुलं कर्तृत्ववान निपजणं, याचं खूप कौतुक वाटतं.’’ श्रद्धा म्हणाली. ‘‘नाही तर बऱ्याच वेळा एक भाऊ कर्तृृत्ववान, तर दुसरा रड्या- अशीच परिस्थिती बघायला मिळते.’’ 

‘‘मग तुझा भाऊ रड्या आहे का? ’’ चौकसरावानं टोमणा मारला.

‘‘मला भाऊच नाही; पण तुझा भाऊ नक्कीच रड्या असणार!’’ श्रद्धेच्या या प्रतिटोल्यानं एकच हशा उडाला.

‘‘बस्स, आता पुरे!’’ मी पुढे बोलू लागलो. ‘‘नरेंद्रचा जन्म 1 नोव्हेंबर 1945चा. 

नरेंद्रच्या बालपणीचे काही किस्से त्यांची बहीण अमरजा नेरूरकर यांनी सांगितले आहेत. नरेंद्रचे कौतुक करायला आलेले लोक त्याची पप्पी घेऊन त्याला हैराण करायचे. एके दिवशी नरेंद्रला यावर नामी युक्ती सापडली. चार-पाच वर्षांचा असताना त्यानं कर्मवीर भाऊराव पाटलांना पाहिलं आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. ‘मी या आजोबांसारखीच मोठी दाढी वाढवीन. मग कोण कशी घेईल माझी पप्पी?’ लहान मुलाला दाढी येत नाही, हे त्या वयात नरेंद्रला कुठं माहीत होतं!

नरेंद्रचे वडील हे मोठे दत्तभक्त होते. त्यांच्या सर्व भावंडांची नावं दत्तावरून ठेवली होती. शेवटी नाव शिल्लक नाही म्हणून दाभोलकरांचं नाव ‘नरेंद्र’ ठेवलंं गेलं. ‘नरेंद्र’मधला इंद्र हा वज्र नावाचे अस्त्र वापरायचा. नरेंद्रनेसुद्धा अंधश्रद्धेवर वज्राप्रमाणे कठोर प्रहार केले आणि आपले ‘नरेंद्र’ हे नाव सार्थ केले.’’

‘‘पण दाभोलकर हे नास्तिक होते, असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं.’’

तर्कशीलच्या या शंकेवर मी होकारार्थी मान हलवली. 

‘‘दाभोलकर कुटुंबीयांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलं विचारस्वातंत्र्य जपण्यासाठी अनुमती होती. नरेंद्र दहा वर्षांचा असतानाच त्यांचे वडील वारले. त्यामुळं वडिलांचे संस्कार त्याच्यावर झालेच नाहीत. पुढे स्वतंत्र विचारसरणीच्या नरेंद्रनं देव-धर्माबद्दल आपली स्वतंत्र भूमिका स्वीकारली.

‘‘नरेंद्रचं माध्यमिक शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. इतर भावंडांप्रमाणेच नरेंद्रला काव्याची खूप आवड होती. माधव ज्युलियन यांची एक कविता त्यांना खूप आवडे –

‘‘वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे
    भ्रांत तुम्हा का पडे?
    कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
    थांबला तो संपला!’’

‘‘पुढं आपल्या खास शैलीत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत भाषण देताना नरेंद्रच्या तोंडून विविध कवींची सुभाषितं अस्खलितपणे श्रोत्यांना ऐकायला मिळत. त्यांना केशवसुतांच्या कविताही खूप आवडायच्या. 

    ‘‘नव्या जगातील नव्या मनूचा शूर शिपाई आहे,
    कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे।
    हिंदूही नाही, मुस्लिम नाही न मी एक पंथाचा
    तोचि पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा॥

‘‘अशा कवितांनी नरेंद्रच्या विवेकनिष्ठ विचारांची पायाभरणी झाली असावी. मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज यांच्या विवेकाला आवाहन करणाऱ्या कविताही नरेंद्रला मुखोद्‌गत होत्या.’’

‘‘शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डॉक्टरांना साहित्यप्रेमाबरोबरच दुसरा एखादा छंद होता काय?’’ 

सम्यक्‌च्या या प्रश्नावर मी म्हणालो, ‘‘बरं झालं, तू हा प्रश्न विचारलास. नरेंद्रला खेळाची आवड होती. साताऱ्याला बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवाजी उदय मंडळ’ ही क्रीडा संस्था सुरू होती. या संस्थेत नरेंद्र कबड्डी खेळायला जात असे. वयाच्या अठराव्या वर्षी डॉ. दाभोलकरांनी कबड्डीच्या मैदानावर पाऊल ठेवलं आणि मातीशी इमान राखत या खेळावर विलक्षण प्रभुत्व मिळवलं. ‘शिवाजी उदय मंडळा’तर्फे त्यांनी कबड्डीच्या अनेक स्पर्धा गाजवल्या. अनेक विद्यापीठस्तरीय स्पर्धा, तसंच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चतुरस्र खेळ करून मंडळाचा लौकिक भारतभर पोचवला.

‘‘... ‘हनुमान उडी’ घेत प्रतिस्पर्ध्यांच्या घेऱ्यातून बाहेर पडण्याचं त्यांचं कौशल्य सर्वत्र गाजलं. दाभोलकरांच्या कबड्डीकौशल्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना छत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं. ज्या क्षेत्रात पाऊल टाकायचे, तिथं सर्वोच्च यश प्राप्त करायचे- हे दाभोलकरांचं खास वैशिष्ट्य नंतर त्यांच्या सामाजिक कार्यातही दिसून आलं.’’

‘‘डॉक्टरांचं पुढचं शिक्षण कुठं झालं?’’ - चौकसरावानं विचारलं. 

‘‘नरेंद्रचे थोरले भाऊ देवदत्त दाभोलकर हे सांगलीच्या कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य होते. नरेंद्र पुढील शिक्षणासाठी देवदत्तांकडे सांगलीला आले. तिथं मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम.बी.बी.एस.चं शिक्षण पूर्ण केलं. ते वर्ष होतं 1970. त्यानंतर बारा वर्षें त्यांनी सातारा परिसरात वैद्यकीय व्यवसाय केला; पण या व्यवसायात ते फारसं रमले नाहीत. दलित, पीडित आणि अन्यायग्रस्त समाजाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कणव होती. परिणामी, वैद्यकीय सेवेच्या छोट्या विश्वात न रमता ते सामाजिक क्षेत्रात उतरले.’’ 

‘‘पण मग नोकरी नाही, तर चरितार्थ कसा चालविला?’’

चौकसरावाच्या या प्रश्नाला मी उत्तर दिलं, ‘‘शैलातार्इंच्या सहकार्यानं. शैला या नरेंद्रच्या सुविद्य पत्नी. त्यांचा विवाहाचा किस्साही मोठा मजेशीर आहे. जितका मजेशीर, तितकाच आपणासमोर आदर्श ठेवणारा.

‘‘बहुतेक जण आपला सगळा वेळ आपल्या कुटुंबासाठी खर्च करतात. मोठं घर, मुलांचं शिक्षण, चैनीच्या वस्तू हेच त्यांचं विश्व बनतं; पण डॉ. दाभोलकर असे केवळ आपल्या कुटुंबात रमले नाहीत. त्यांनी विवाह केला खरा, त्यांना मुक्ता आणि हमीद अशी दोन मुलेही झाली; पण पत्नी शैला, मुले मुक्ता आणि हमीद एवढ्या परिघातच डॉक्टर रमले नाहीत. शैलाताई यांनी डॉक्टरांच्या व त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल खूप चांगली आठवण सांगितली आहे.’’

‘‘सांगा आम्हालाऽ सांगा आम्हालाऽऽ’’ सगळे जण एकसूरात म्हणाले. 

‘‘शैलाताई यांचं एम.बी.बी.एस. शिक्षण बेळगावला झालं. आईनं शैलाताईंच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावला. आईच्या मैत्रिणीनं दाभोलकरांचं स्थळ सुचवलं. 

शैलाताईंची मावस बहीण, आई आणि त्या साताऱ्याला दाभोलकरांच्या घरी पोचल्या. मुलीनं मुलाच्या घरी बघायच्या कार्यक्रमासाठी जाणं हे शैला आणि नरेंद्र दोघांनाही आवडत नव्हतं, तरीदेखील आईच्या हट्टामुळे शैलानं बघण्याच्या कार्यक्रमाला संमती दिली. नरेंद्रनं शैलाला विचारलं, ‘तू सगळी प्रॅक्टिस करू शकशील का? मला समाजकार्य करायचं आहे. तुला सगळं येतं का? सिझेरियन करायला येतं का? कारण इथं फक्त बायकांचीच प्रॅक्टिस चालते.’

‘‘यानंतर शैला आणि नरेंद्र सातारा रेल्वे स्टेशनवर जाऊन दोन तास बोलत बसले; पण तिथंही नरेंद्र एकटेच बोलत होते. ‘मला पाहिजे तर मी लिखाण करेन, वाचेन- हे वाचेन, ते करेन. तुला हे करावं लागेल, तुला ते करावं लागेल आणि तुला या अटी मान्य असतील; तरच तू माझ्याशी लग्न कर, नाही तर करू नकोस.’

‘‘बेळगावला परतल्यावर शैलाताई आईला म्हणाल्या, ‘ब्रह्मदेवानं त्यांच्यासाठी बायको तयार केली असेल; पण ती मी नाही. पुढं अनेक श्रीमंत मुलं शैलांना पाहायला यायची. शैलाताई म्हणतात, त्यांची त्यांना किळस आली आणि नरेंद्रबरोबर लग्न करायची त्यांनी तयारी दर्शविली. बेळगावला झालेल्या दुसऱ्या भेटीत डॉक्टरांनी आपल्या अटी शैलाताईंना सांगितल्या. ‘मी प्रॅक्टिस करणार नाही. मी डॉक्टर झालो, कारण माझ्या मोठ्या भावानं सांगितलंय की, अडी-अडचणीला हातात एक डिग्री असावी. मला पूर्ण वेळ कार्यकर्ताच व्हायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे, घर चालवण्यासाठी पैसे तुला मिळवावे लागणार आहेत.’

‘‘यावर शैलाताई म्हणाल्या, ‘पैसे मिळवायला मला काही अडचण वाटत नाही. कारण माझ्या कुठल्याच गरजा श्रीमंतीच्या नाहीत, त्या आवडतही नाहीत. भाजी-भाकरी खायची सवय आहे. साध्या घरात राहायची सवय आहे. त्यामुळं मला काही प्रॉब्लेम येणार नाही.’

‘‘या संवादानंतर शैला आणि नरेंद्रचं लग्न ठरलं. दोघांनीही हा अलिखित करार आयुष्यभर जसाच्या तसा पाळला.’’

एवढ्यात सिद्धांत उठला आणि त्यानं मला एक प्रश्न केला,

‘‘सर, माझी आई दागिन्यांची खूप हौशी आहे. ती सारखे नवनवे सोन्याचे दागिने मिळण्यासाठी पप्पांकडे हट्ट धरते.’’

‘‘आमची आईसुद्धा अशीच आहे!’’ स्वरदा म्हणाली. ‘‘तिनं जुने मंगळसूत्र मोडून छानपैकी नवे मंगळसूत्र बनवलं आहे. एक नव्हे, तर एक छोटं आणि एक मोठं. शैलाकाकूंना असली हौस नव्हती का?’’

‘‘पुढचं ऐका आणि आचरणात आणा.  

‘‘साताऱ्यातील शैलाताईंच्या दवाखान्यासमोर सोन्याचं एक दुकान आहे. मनात आणलं असतं, तर शैलाताईंना त्या दुकानातून भरपूर सोनं खरेदी करता आलं असतं; पण त्यांनी विवाहानंतर सबंध आयुष्यात एक गुंजभरही सोनं विकत घेतलं नाही. नवनव्या भरजरी साड्यांची हौस त्यांनी कधी केली नाही. नरेंद्रनंदेखील खादीचा स्वच्छ शर्ट आणि खादीची पँट अन्‌ पायात साधी चप्पल असा पेहराव आयुष्यभर वापरला.’’ 

‘‘ग्रेटच! जगावेगळी बायको आणि जगावेगळा नवरा!’’ तर्कशील उद्‌गारला. ‘‘माझे वडीलसुद्धा साधेच कपडे वापरतात; पण आमचे कपाट आईच्या साड्यांनी गच्च भरलं आहे. परवा तर यावर आईचं आणि बाबांचं कडाक्याचं भांडण झालं. साड्यांनी भरलेल्या कपाटात जागा नाही, हे पाहून आईनं बाबांच्या पुस्तकाच्या कपाटात आहेराच्या साड्या घुसवल्या, त्यावरून हा वाद झाला.’’ 

सगळे जण हसू लागले. 

‘‘शैलाताईंना स्वत:लाही समाजकार्याची आवड होती; पण अर्थार्जन, मुलांचे संगोपन आणि इतर कौटुंबिक कर्तव्यं यांची जबाबदारी नरेंद्रने त्यांच्यावर सोपविली होती. ही सल शैलाताईंच्या मनात कायम राहिली. पण आपल्या पतीच्या समाजकार्याला घरची आघाडी सांभाळून त्यांनी दिलेलं योगदान अपूर्व असं आहे. लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात जशी साथ दिली आणि प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या पत्नी साधना यांनी आदिवासी भागात नवऱ्याबरोबर आनंदानं वनवास पत्करला, त्याच तोडीचा शैलाताईंचा हा त्याग प्रेरणादायी आहे. महिन्यातील पंधरा-वीस दिवस डॉक्टर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर दौरे करीत. साहजिकच मुलांची जबाबदारी शैलाताईंनाच पार पाडावी लागे. हमीद आणि मुक्ता ही नरेंद्र आणि शैलाताईंची दोन्ही मुलं कर्तृत्ववान निघाली. आज ती वडिलांच्या पश्चात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभागी असतात.’’

‘‘सर, तुम्ही मघाशी सांगितले की, डॉक्टरांनी एम.बी.बी.एस. झाल्यानंतर बारा वर्षं वैद्यकीय सेवेत काम केलं. नंतर त्यांनी नोकरीतून बाहेर पडून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत झोकून दिले काय?’’ सम्यक्‌ने विचारलं. 

‘‘नाही! अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत उडी घेण्यापूर्वी डॉक्टरांनी विविध सामाजिक चळवळींत स्वत:ला झोकून दिलं. हे कार्य ते वैद्यकीय व्यवसायाच्या जोडीनेच करत राहिले. वैद्यकीय सेवेतून 1982 मध्ये बाजूला होऊन त्यांनी ‘अंनिस’ चळवळीत काम करण्यास सुरुवात केली.’’

तर्कशीलनं यावर महात्मा फुलेंची एक आठवण सांगितली- 

‘‘आपल्या ब्राह्मण मित्राच्या विवाहाच्या वरातीत महात्मा फुले सहभागी झाले होते. त्या प्रसंगी एका कर्मठ ब्राह्मणानं, ‘तू मागून चाल’, अशी शेरेबाजी केली. हा प्रसंग त्यांच्या जिव्हारी लागला. महात्मा फुले हे माळी. माळ्यांना ब्राह्मण हीन समजतात. अशा गैरसमजुती नष्ट केल्या पाहिजेत, या विचारानं प्रेरित होऊन महात्मा फुलेंनी जातिभेदाविरोधात आवाज उठविला. असा काही प्रसंग नरेंद्रच्या जीवनात घडला काय- की, ज्यामुळं ते कुटुंबीयांपेक्षा मोठ्या समाजात अन्यायाच्या विरोधात संघर्ष करू लागले?’’

‘‘असं काही घडले नाही. पण नरेंद्रचे थोरले भाऊ देवदत्त हे समाजवादी विचारांचे होते. जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहिया; तसेच नानासाहेब गोरे आणि एस. एम. जोशी यांच्या समाजवादी विचारांवर व चळवळीवर त्यांची निष्ठा होती. भावाच्या सान्निध्यात आणि कदाचित मुळातच अंतरंगातील कणव प्रभावी असल्यानं जिथे अन्याय, तिथे उडी घेण्याचा त्यांचा स्वभाव बनला असावा. या स्वभावानुसार त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये योगदान देण्यास सुरुवात केली. कुमार सप्तर्षी हे ‘युवक क्रांती दल’ नावाच्या संघटनेचं तरुण नेतृत्व. त्यांचं नाव पुण्यात गाजत होतं. सांगलीमध्ये त्यांची व्याख्यानं दाभोलकरांनी आयोजित केली. रोखठोक विचार व आकर्षक मांडणी, यामुळं दाभोलकरांवर त्यांचा प्रभाव पडला आणि त्यांनी पुढे साताऱ्यात युवक क्रांती दलाचं काम सुरू केलं.

‘‘जयप्रकाश नारायण 1969 मध्ये सांगलीला येणार होते. त्यांची राहण्याची सोय देवदत्त दाभोलकरांच्या सांगलीतील बंगल्याजवळच गेस्ट हाऊसमध्ये केली होती. पुढच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात नरेंद्र देखभालीसाठी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर होते. शेवटी सांगलीतून निघताना जयप्रकाशजींनी नरेंद्रचा हातात हात घेऊन स्वयंसेवकाच्या सेवेबद्दल त्यांना धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, ‘कुछ बनो.’

‘‘जे. पीं.च्या या वाक्यानं नरेंद्र प्रेरित होऊन एका समर्थ चळवळीचा नायक बनला.’’

‘‘दाभोलकरांनी ‘एक गाव-एक पाणवठा’ या चळवळीत काम केलं आहे, असं माझे बाबा काल मला सांगत होते. या कार्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली असावी?’’ 

‘‘दलितांबद्दल असलेली कणव आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा संवेदनशील दाभोलकरांमध्ये होतीच. एक प्रसंग असा घडला की, ते या चळवळीत कार्यरत झाले. त्या वेळी डॉक्टर साताऱ्याजवळचे परळी येथे वैद्यकीय अधिकारी होते. परळीच्या केंद्राला सहा उपकेंद्रे होती. त्यातील मानेवाडी हे एक उपकेंद्र. या उपकेंद्रात काम करणारी आया दलित होती. तिचं नाव कांबळे. तिला गावातल्या विहिरीवर पाणी भरायला मिळत नाही, असे डॉक्टरांना समजलं. त्याच वेळी डॉ. बाबा आढावांची ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळ महाराष्ट्रात गाजत होती. नरेंद्रनं मानेवाडीत ‘एक गाव-एक पाणवठा’ मोहीम राबवायची ठरवलं. दलित वस्तीत बैठका घेतल्या. गावात दबाव बराच होता. मंडळी तयारच होईनात. शेवटी काही बैठकांनंतर त्यांना विश्वास आला. मिरवणुकीनं जाऊन पाणी भरलं. दुसऱ्या दिवसापासून गावात दलितांवर कडकडीत बहिष्कार! काम मिळंना, गावात धान्य मिळेना. मंडळी सैरभैर होऊन साताऱ्याला आली. त्यांना घेऊन दाभोलकर कलेक्टरकडे गेले, पण कलेक्टरांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मग डॉक्टर साताऱ्याच्या आमदारांना भेटले. आमदार म्हणाले, ‘महात्मा फुलेंनी या प्रकरणात गुडघे टेकले, महात्मा गांधींनी हात टेकले आणि तुम्ही पोरं निघालात शहाणपणा करायला!’’ या उद्‌गारानं डॉक्टरांच्या लक्षात आले की, मानेवाडीतील मराठा मतदारांना या आमदाराला दुखवायचं नव्हतं. नाव फुले-आंबेडकर यांचं घ्यायचं; पण कृती काहीच नाही! राज्यकर्त्यांचा हा दुटप्पीपणा याच वेळी डॉक्टरांच्या लक्षात आला. अवघा समाज अंधश्रद्धापीडित, तर राज्यकर्ते उदासीन. यातून सामाजिक न्यायाची चळवळ कशी अवघड आहे, याचा हा अनुभव दाहक होता; पण दाभोलकरांनी हार मानली नाही. चारच दिवसांनी समाजकल्याणमंत्री दादासाहेब रूपवते साताऱ्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी डी. एस. पी.ला कणखर भूमिका घेण्यास भाग पाडलं. सरकारी नोकरी असल्यानं डॉक्टरांवर कारवाईचा धोका होता; पण तो टळला. असेच जीवावरचे अनेक धोके पुढील आयुष्यात डॉक्टरांनी पत्करले, जीवाची पर्वा न करता.’’ 

‘‘ग्रेटच!’’ अमिर उद्‌गारला

‘‘आणीबाणीच्या काळात डॉक्टरांनी पत्रकं वाटणं, भिंती रंगवणं, भूमिगत कार्यकर्त्यांना आश्रय देणं, पैसे जमवणं- अशी कामे पार पाडली. खरं तर या काळात सामाजिक काम कसं करावं, याबद्दलची डॉक्टरांची जाणीव अनुभवाविना अपुरी होती; पण ऊर्मी अफाट. त्यामुळे कामात ते स्वत:ला झोकून देत. काही वेळेला यश येत असे, तर काही वेळा काम अर्धवट सोडावं लागे; पण यातूनच धडे घेत एखादी चळवळ करताना काय तयारी करावी, याचं भान डॉक्टरांना आलं- जे पुढं त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत उपयोगी पडलं.

‘‘साताऱ्याजवळ गवडी नावाचं गाव. या गावातील दलितांची जमीन एका माणसाच्या ताब्यात गहाण होती. ती बारा एकर जमीन दलितांना परत मिळवून देण्यासाठी दाभोलकरांनी प्रयत्न सुरू केले. एस. एम. जोशी त्या वेळी साताऱ्याला आले होते. त्यांना या दलितांच्या गावी घेऊन जाण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. ज्या सहकारी बँकेने दलितांना जमीन कसण्यासाठी मदत केली होती, ती बँक काँग्रेसच्या ताब्यात होती. एस. एम. जोशी हे समाजवादी, म्हणून बँकेने आर्थिक नाडी आवळण्याची दलितांना धमकी दिली. परिणामी, एस. एम. जोशी यांचा कार्यक्रम डॉक्टरांना रद्द करावा लागला. चळवळ करताना राजकीय विचारसरणीतील भिन्नता विचारात घेतली पाहिजे, हा धडा दाभोलकरांना या अनुभवातून मिळाला. 

‘‘सामाजिक अन्यायाच्या बाबतीतल्या अशा विविध चळवळी दाभोलकरांनी सातारा परिसरात सुरू केल्या होत्या. शेतमजुरांची संघटना बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण अपुऱ्या माहितीमुळं तो त्यांना यशस्वी करता आला नाही. साताऱ्यात हमाल संघटन बांधण्याचा प्रयत्नही असाच फसला; पण एक चांगला यशस्वी प्रयत्न दलितांना पाणवठा खुला करण्याबाबतीत घडला. साताऱ्याजवळच्या त्रिपुटी येथे एक तळं आहे. या तळ्यात गुरांना पाणी प्यायला मोकळीक; पण दलितांना नाही, अशी स्थिती होती. दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजूबाजूच्या गावातून जनजागरण केलं आणि या तळ्यातील पाणी वापरण्यासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात त्यांना यश आलं.

‘‘दाभोलकरांनी स्त्रियांवरील अत्याचारांबाबत एक यशस्वी मोहीम राबवली. सातारा जिल्ह्यात फलटण येथे महानुभाव पंथाचं मोठं केंद्र आहे.’’

‘‘महानुभाव म्हणजे काय?’’ स्वरदेनं शंका विचारली. 

‘‘हा एक धार्मिक पंथ आहे. या पंथात अल्पवयीन मुलींचे देवाबरोबर लग्न लावतात. त्यानंतर मुलीचं कुंकू पुसून तिच्या अंगावर काळी वस्त्रे चढवली जातात. केसांचा चमनगोटा केला जातो आणि स्त्रीसुलभ भावनांचा होम करीत आयुष्यभर संन्यासी वृत्तीनं कुढत राहावं लागतं. दाभोलकरांनी यासंदर्भात देवदासी प्रतिबंधक कायदा 1932 शोधला आणि या प्रथेविरोधात कोर्टात गुन्हा दाखल केला. महानुभाव पंथाच्या लोकांनी दाभोलकरांच्या निषेधाचे मोर्चे काढले, दहशतही घातली; पण दाभोलकर घाबरले नाहीत. या घटनेतून कायद्याचा आधार घेऊन सामाजिक चळवळ यशस्वी करता येते, हा अनुभव डॉक्टरांना मिळाला.’’

‘‘दाभोलकरांच्या धैर्याची कमाल आहे!’’ शबाना उद्‌गारली.

‘‘खरं तर लहान मूल मोठं होत असताना धडपडतं, रांगतं, पडतं... उत्साहाच्या भरात पुढे तारुण्यात, भावना आवेगात धाडस करतं; तसंच नरेंद्रचे अनुभव त्याला सजग करत गेले. या अनुभवांच्या सामर्थ्यावर नरेंद्र एका यशस्वी चळवळीचा नायक बनला. 

‘‘कायद्याचा आधार नसलेली झुंज तर अधिकच अवघड असते. अशी झुंज ज्या व्यक्तिविरोधात करायची, ती व्यक्ती पूजनीय असेल, तर अधिकच अवघड बनते. कांची कामकोटीचे शंकरचार्य म्हणजे ‘वॉकिंग गॉड.’ ते साताऱ्याला आले होते. शंकराचार्य हे वर्णव्यवस्थेचे समर्थन करीत. भारतीय घटनेने वर्णव्यवस्थेस नकार दिलेला आहे, म्हणून नरेंद्रनं साताऱ्यात शंकराचार्यांना विरोध करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मदतीने शंकराचार्यांची मुलाखत मागितली. पण शंकराचार्यांनी आपल्या विरोधात ही मुलाखत जाईल, हे ओळखलं आणि मुलाखतीचा टेप बंद करायला सांगितला; पण त्यांनी पिशवीमध्ये टेप गुपचूपपणे तसाच सुरू ठेवला आणि शंकराचार्यांचं वर्णव्यवस्थेचं समर्थन टेपद्वारे पुरावा म्हणून हाती आल्यावर साताऱ्यात त्या संंबंधात बोर्ड लागले गेले. जाहीर सभा पुकारली. काहींनी अंडी फेकून मारण्याचा प्रयत्न केला, पण सामान्य लोकांनी त्यांना साथ दिली नाही. हा अनुभव आश्वासक होता. चळवळीचा विचार प्रामाणिक असला, तर बहुसंख्य लोक त्याला साथ देतात आणि परिवर्तन घडू शकते, असा हा अनुभव होता.’’ 

‘‘अशा अनुभवातून शिकत-शिकत दाभोलकर अखेरीस अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे वळले असावेत.’’ तर्कशीलचा निष्कर्ष बरोबर होता. 

‘‘दाभोलकरांनी या चळवळीला साताऱ्यातून 1982 पासून सुरुवात केली. पुढं काय घडलं, त्याचा इतिहास आपण प्रत्येक रविवारी समजून घेऊ या.’’

('तरुणाईसाठी डॉ . नरेंद्र दाभोलकर' हे नवे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचे प्रकाशन 12 जानेवारी ( राष्ट्रीय युवक दिवस) रोजी, सांगली येथे हार्वर्ड विद्यापीठाचा स्कॉलर डॉ. सूरज येंगडे व  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांच्या हस्ते झाले. त्या पुस्तकातील हे एक प्रकरण आहे.)

‘तरुणाईसाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर’ हे पुस्तक AMAZON वर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके