डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नव्या युगाची चाहूल : पंचायत राज महिला मेळावा

आपण राजकारण करतो असे म्हणण्याची सुजाण माणसाला लाज वाटते याचे कारण त्या शब्दाला प्राप्त झालेला बदनामकारी अर्थ. स्त्रियांनी तर राजकारण हा आजपर्यंत आपला प्रांतच मानला नाही. पंचायत राजमध्ये महिला सदस्य कायद्याने निवडून येऊ लागल्या आणि या विषयाचा पोतच बदलला. या महिला सदस्यांना प्रशिक्षित करण्याचे काम गेली काही वर्षे डॉ. मंडलीक ट्रस्ट निष्ठेने करीत आहे. पंचायत राज सदस्य असलेल्या महिलांचा महाराष्ट्र पातळीवरील एक भव्य मेळावा अलीकडेच भरला होता. त्याचा हा प्रेरणादायी वृत्तांत.

डॉ.पी.व्ही. मंडलीक ट्रस्टतर्फे पंचायत राज महिला मेळावा बांठिया हायस्कूल, नवीन पनवेल येथे अलीकडेच भरविण्यात आला. डॉ. पी. व्ही. मंडलीक यांच्या जन्मशताब्दी- निमित्त ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. मंडलीक एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते आणि स्त्रिया स्वावलंबी झाल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाच्या कामात प्रभावीपणे काम करू शकणार नाहीत ही त्यांची दृष्टी होती. डॉ.मंडलीक ट्रस्ट गेली सहा वर्षे पंचायत राजमधील निर्वाचित महिला सदस्यांच्या प्रबोधनाचे काम करीत आहे. ट्रस्टने आजवर 165 शिबिरे, कार्यशाळा आदींचे आयोजन केले आहे आणि त्याचा लाभ 5000 महिलांनी घेतला आहे. काम करीत असताना महिलांपुढे येणाऱ्या अडचणी , समस्या जाणून घेणे, त्यावर उपाय शोधणे, अनुभवांची व विचारांची देवाण-घेवाण करणे हा या मेळाव्यामागील हेतू आहे.

मेळाव्यासाठी विविध जिल्ह्यांतून 350 महिला प्रतिनिधी उपस्थित राहिल्या. मेळाव्यासाठी इतर स्वयंसेवी संस्था आणि महिला मंडळांच्या प्रतिनिधींना खास आमंत्रित केले होते. महिला मंडळाच्या अनेक प्रतिनिधी मेळाव्याला उपस्थित राहिल्या ही फार आश्वासक बाब आहे. ट्रस्टच्या सेक्रेटरी श्रीमती नीला पटवर्धन या मेळावाप्रमुख होत्या.

मेळाव्यातील कार्यक्रमांची संकल्पना आणि नियोजन अ‍ॅड. सुरेखा दळवी यांचे होते. व्यवस्यापनेची मुख्य जबाबदारी श्री. उल्लाउद्दिन शेख यांनी सांभाळली. उपस्थित प्रतिनिधींनी व्यवस्था, कार्यक्रम आवडल्याचे आवर्जून सांगितले. 

वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन सोहळा 

25 तारखेला सकाळपासूनच महिला सदस्यांची रीघ सुरू झाली. औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता होता. समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करायचे अशी सर्वसाधारण प्रथा आहे. इथे मेळाव्याचे उद्घाटन झाले पणत्या प्रज्वलित करून. प्रत्येक तालुक्यातील दोन दोन महिला सरपंच, उपसरपंच... सदस्य यांच्या हस्ते या पणत्या उजळण्यात आल्या. व्यासपीठावर फुलांच्या रांगोळीत प्रत्येकजण ही एकएक पणती ठेवीत गेली. फुलांनीच सजवलेल्या द्रोणात मातीत ठेवलेली पणती. आमचे पाय मातीत आहेत, आमची ज्योत वर झेपावते आहे, देह जळो अन् जग उजळो असेच त्या 50 पणत्या सांगत होत्या. सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या विद्याताई वाळ आणि अध्यक्षस्थानी होते न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, विद्याताई म्हणाल्या, महिला जर राजकारणात आल्या तर पाण्याच्या प्रश्नासारखे किंवा दारूबंदीसारखे कळीचे विषय त्या हातात घेतात. मार्ग खूप कठीण आहे. आपल्याला निर्भयतेने पुढे जायला हवे. महिलांनी महिलांना आधार द्यायला हवा. बलात्कार हा अपघात समजला पाहिजे आणि आपला आत्मविश्वास आपण वाढवायला हवा. 

न्या. धर्माधिकारी यांनी मार्मिकपणे नेमके प्रश्न कोणते आणि त्यांची सोडवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितलेल्या तेलगू कवितेचा भावार्थ महिलांच्या स्थितीवर नेमके बोट ठेवणारा होता. तो असा. 

तुझी आई घरची महाराणी आहे, असे वडील आपल्या मुलीला नेहमी सांगत. स्वयंपाकघरात, घरात तिचंच साम्राज्य आहे. हे त्यांचे म्हणणे. मुलीने विचार केला बघू या तर खरं आपल्या आईचं साम्राज्य! तिला काय आढळलं ? महाराणी असलेली आपली आई रात्रंदिवस काबाडकष्ट करतेय. घरातल्या साध्या चमच्यापासून प्रत्येक वस्तूवर नाव आहे आपल्या वडिलांचे! 

आमचा दिवस 

मेळाव्याचा दुसरा दिवस गाजवला महिला प्रतिनिधींनी. सकाळच्या पहिल्याच कार्यक्रमापासून... हा कार्यक्रम होता - अनुभव जुन्या-नव्यांचे. सकाळच्या सत्रासाठी श्रीमती मृणालताई गोरे व श्रीमती हिरालक्ष्मी शहा या खास आमंत्रित होत्या. या दोघींनीही ग्रामपंचायतीचे सदस्यपद भूषविले होते. हिराबेन पालघर ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. घराणे सामाजिक आणि राजकीय चळवळीचे. त्यातून त्या या कामाकडे वळल्या. पुढे मात्र राजकारणात न पडता त्यांनी सामाजिक कार्यात अधिक रस घेतला मृणालताई तर चळवळीतल्याच कार्यकर्त्या. आता मुंबईचे एक उपनगर असलेले गोरेगाव तेव्हा ठाणे जिल्ह्यात मोडत असे मृणालताई गोरेगाव ग्रामपंचायतीवर निवडून गेल्या. निवडणुकीचा त्यांचा हा प्रवास महापालिका, विधानसभा असे टप्पे ओलांडत थेट संसदेपर्यंत गेला. त्यांचे अनुभव ऐकणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. शेजारणींची कुजबूज, हेटाळणी त्यांनाही कशी अनुभवावी लागली त्याचा किस्सा मृणालताईनी सांगितला. मात्र याच शेजारणी अनुभवांनी बदलल्या आणि पुढे अनेक कार्यक्रमात सहभागीही झाल्या. 

मृणालताई, हिराबेन या जुन्या जमान्यातल्या सदस्य. घटनादुरुस्तीनंतर आता सर्वच चित्र पालटले आणि एक तृतीयांश संख्येइतक्या महिला पंचायतीत निवडून आल्या. घटनादुरुस्तीनंतर झालेला मुख्य बदल म्हणजे महिला सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. या महिलांना काय अनुभव येताहेत? ते सांगण्यासाठीव्यासपीठावर आल्या सुनंदा म्हात्रे, आनंदी मरले, लता सुतार, चारुशीला चांदोलकर, सुचिता वेल्हाळ. वेगवेगळ्या वातावरणातून, परिस्थितीतून आलेल्या या महिला आजी-माजी सभापती, सरपंच, उपसरपंच कुणी शिकलेल्या, कुणाला जेमतेम सही करता येते, त्यांनी परखडपणे बोलून दाखविले. प्रकल्पग्रस्तांविषयी विचारविनिमय करणाऱ्या समितीवर प्रातिनिधित्व मिळाले पण मिटिंगाना मात्र डावलले जाते. असे एका सदस्याने सांगितले. आपल्या हक्कांसाठी जागरूक असणाऱ्या महिलांची संभावना भांडखोर, खाष्ट अशा शब्दांत केली जाते. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याची तरी माहिती आहे का, अशी हेटाळणी एकीच्या वाटेस आली तर प्रचारात एकीला ती विधवा आहे म्हणून हिणवलं गेलं.

महिलांच्या नानाविध अनुभवांचा हा सिलसिला पुढेही चालू राहिला. व्यासपीठ आणि श्रोते हे अंतर संपले. पुढे येऊन धिटाईने अनेकींनी आपले अनुभव, अडचणी सांगितल्या, डॉ. मंडलीक ट्रस्टच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक डॉ. रोहिणीताई गवाणकर, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांनी सदस्यांना प्रश्न विचारून बोलके केले . दुपारी गटचर्चेच्या वेळीही हाच प्रत्यय आला. गटचर्चेसाठी 15-20 महिलांचे 20 गट होते. ग्रामपंचायतीची कामकाजपद्धती, आरोग्य, शिक्षण, इतर योजना, महिलांनी हाती घेतलेली कामे आदी विषयांवर या दरम्यान चर्चा झाली. बहुतेक जणींनी चर्चेत समरसून भाग घेतला. चारचौघींसमोर मोकळेपणी बोलू न शकणारी एखाददुसरी या छोट्या गटातही भेटत होती. आपल्या अनुभवांविषयी, कामाविषयी बोलायला कचरणारी ही सदस्य प्रबोधनाची गरज अधोरेखित करीत होती. 

संध्याकाळच्या मिरवणुकीने मात्र महिलांचा संकोच दूर केला. ‘आमच्या गावात आम्ही सरकार, महिला करतील गावाचा कारभार’ आणि समानतेच्या घोषणा देत ही मिरवणूक बांठिया हायस्कूल येथून निघून गावातल्या मुख्य चौकापर्यंत गेली. तिथे जाहीर सभेत रूपांतर झाले. रायगडचे खासदार श्री. रामशेठ ठाकूर , ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे, श्रीमती प्रमिला दंडवते यांनी या सभेत आपले विचार मांडले. मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या महिला प्रतिनिधींनीही आपले विचार या जाहीर सभेत मांडले.

अनुभव वेगळ्या वाटा शोधणारांचे

तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे धारापुरी (ता. उरण, जि.रायगड) या संपूर्ण महिला सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी केलेली बातचीत, घटनादुरुस्तीपूर्वीही महाराष्ट्रात संपूर्ण महिला सदस्य असलेल्या 12 पंचायती होत्या. आताही विदाल (जि. सातारा) पपाळे (जि. सांगली), आरगाव (जि. रत्नागिरी), मोराणे (जि. धुळे) आणि घारापुरी आदी महिला पंचायती आपल्याकडे आहेत. घारापुरीच्या सदस्यांचे अनुभव रोहिणीताई गवाणकरांनी मुलाखतवजा कार्यक्रमातून सर्वांसमोर आणले.

घारापुरी हे बेट आहे. इथली लेणी जगप्रसिद्ध आहेत. बेटावर देशी-परदेशी पर्यटकांची सतत गर्दी असते. मात्र विजेसारखी अत्यंत गरजेची सोयही येथे नाही वीज मिळण्यासाठी आजवर आधीच्या पंचायतींनी केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. बेटाच्या म्हणून स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेतच. समुद्र खवळला की बाह्य जगाशी संपर्क तुटतो, विजेसारखी मूलभूत सुविधा नसल्यामुळे प्रत्येक बारीक- सारीक बाबतीत तालुक्यावर अवलंबून राहावे लागते. बेटावर पिठाची गिरणी नाही, शिंपी नाही, डॉक्टर तर नाहीच.

घारापुरीच्या माजी सरपंचांनी महिला ग्रामपंचायतीची कल्पना मांडली. महिला मंडळाने ही कल्पना उचलून धरली. निवडणूक लढवून या सदस्य निवडून आल्या आहेत. इतर महिलांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या इथेही थोड्याफार प्रमाणात आहेत, शिवाय या वेगळ्या समस्या आहेतच. वनखाते, शासकीय पर्यटन महामंडळ आणि पुरातत्त्व विभागाचा वेढा समुद्राप्रमाणेच घारापुरीभोवती पडला आहे आणि एक तिढा निर्माण झाला आहे.

वेगळ्या वाटा

ग्रामविकासाच्या वेगळ्या वाटा शोधणाऱ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम यानंतर झाला. विदर्भातील केळीवेळी या गावाने विनोबाजींच्या भूदान आंदोलनात ग्रामदान केले. गावातल्या समस्या, बेकारी दूर करण्यासाठी गावाने एक वेगळा मार्ग चोखाळला. ग्रामदानाची संकल्पना श्री. गोविंदराव शिंदे यांनी समजावून सांगितली. रायगड जिल्ह्यातल्या सावरसई (ता. पेण) या आदर्श गावचे सरपंच, श्री. महादेव दिवेकर यांनी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, कुटुंबनियोजन, श्रमदान अशा पंचसूर्त्रीच्या आधारे गावाचा विकास घडवून आणला. त्याचे प्रेरणादायी चित्रण दिवेकरांनी केले.

गावात नव्याने लग्न होऊन आलेल्या सुनांचे जाहीर स्वागत, वयोवृद्धांचे सत्कार असे जे कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण व्हायला मदत होते. ठाणे जिल्ह्यातील तलावली (ता.जव्हार) या आदिवासी गावाने निरिड या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पाणी नियोजनाचा कार्यक्रम राबविला आणि गावाने स्वावलंबन, स्वयंपूर्णता कशी मिळविली त्याचे वर्णन श्री. माधव लहांगे या तलावली ग्रामसभेच्या अध्यक्षांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वसंत नाचणे यांनी केले. उपस्थित प्रतिनिधींनी महिला सरपंचावरील अविश्वास ठराव, अकराव्या परिशिष्टातील पंचायतराज अधिकार क्षेत्रांची निश्चिती, वित्त आयोगाचा अहवाल उपलब्ध करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील गावाचा अधिकार आणि ग्रामसभेला अधिकार असे ठराव मंजूर केले. 

हसत-खेळत प्रबोधन 

दोन्ही रात्री करमणुकीचे कार्यक्रम झाले तेही वेगळ्या प्रकारचे. शाहीर लीलाधर हेगडे आणि सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिर या शाळेच्या विद्यार्थिनी यांनी स्वातंत्र्याची समरगाथा हा कार्यक्रम जोशपूर्णरीत्या सादर केला. 1857 ते 1947 या नव्वद वर्षातील कालावधीची ही झलक सगळ्यांनाच त्या काळच्या वातावरणात घेऊन गेली. दुसऱ्या रात्री श्री. उल्हास ठाकूर यांनी विषारी-बिनविषारी सर्पांचे प्रदर्शन करून सापांविषयीच्या असलेल्या नाना अंधश्रद्धा, समजुती कशा चुकीच्या आहेत हे सप्रयोग दाखविले. या दोन्ही कार्यक्रमांना महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. 

असाच प्रतिसाद मिळाला शैक्षणिक खेळांना... सापशिडी आणि रस्सीखेच ह्या दोन्ही खेळांत प्रतिनिधींनी हिरीरीने भाग घेतला. शिडी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले गुण आणि दुर्गुणांची सापाची तोंडे, सत्तेची रस्सीखेच याचे प्रत्यंतर या खेळातून मिळाले. ट्रस्टची कार्यकर्ती श्रीमती साधना वैराळे यांनी घेतलेले हे खेळ आणि त्यांच्या अनुषंगाने महिलांनी केलेली चर्चा, मतप्रदर्शन खूप रंगतदार झाले. 

समारोप 

तीन दिवस चाललेल्या या मेळाव्याचा समारोप झाला पुष्पा भावे, प्रा. मधु दंडवते आणि प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाने. स्त्रीमुक्तीची चळवळ तळागाळापर्यंत जायला हवी असे सांगत पुष्पाताई म्हणाल्या, गाव स्वच्छ, प्रदूषणमुक्त करत असतानाच स्वतःलाही आपल्याला मोठे व्हायचेय, रुंद व्हायचेय. उंबऱ्याबाहेर येऊन जग पहा आणि निर्णय घ्या. तर प्रा. मधु दंडवते यांनी ठराव, निर्णय, विकासाचे अधिकार जे मिळाले आहेत, ते अधिकार अमलात आणण्यासाठी पैसे मिळत नाहीत तोवर त्याचा उपयोग नाही, असे सांगितले. नियोजन मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना जो पैसा उपलब्ध करून दिला आहे. तो मिळविण्यासाठी प्रतिनिधींनी पाठपुरावा करायला हवा, अशी सूचना केली. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य पाटील यांनी सर्वप्रथम स्वतंत्र भारतात राज्यकर्त्या ही भूमिका निभावणाऱ्या महिला प्रतिनिधींचे अभिनंदन केले.

राजेशाहीत संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची कामे होती. आज विकासाची जबाबदारी राज्यकर्त्यांनी स्वीकारली आहे, ती प्रत्यक्ष लोकांकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे, याची जाणीव प्राचार्यांनी करून दिली. आज लोकशाहीत लोकांना मिळाला आहे फक्त मताचा अधिकार आणि सत्ता विधानभवनात आणि संसदेत, कोंडून राहिली आहे ही स्थिती कशी पालटावी याचे विवेचन त्यांनी केले. 

पोस्टर प्रदर्शन 

मेळाव्यानिमित्त भरवलेल्या पोस्टर प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मुक्ता दाभोलकर, विनिता बाळेकुंद्री यांनी प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. महिलांच्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना ही पोस्टर स्पर्श करीत होती. हुंडाबळी, महिलांवरील अत्याचार यांवरील माहिती देणारे कायदे, दारूबंदी, पंचायत राज्यातील महिलांचे स्थान आणि अधिकार, एकूण समाजातीलच स्त्रीचे स्थान, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण हे त्यापैकी काही विषय हातात वही पेन घेऊन टिपणे घेत प्रतिनिधी हे प्रदर्शन पाहत होत्या, विवाहितेला नवरा मारझोड करतोय, असे एक पोस्टर होते. हा अत्याचार आहे. नवरा-बायकोच्या भांडणात आपण कशाला पडायचे, अशी बघ्याची भूमिका घेऊ नका, असे ते चित्र सांगत होते. प्रदर्शन पाहणारा एक गट म्हणाला, पोलिसांत तक्रार केली तर पोलिस लक्ष देत नाहीत. खेडवळ दिसणारी एकजण तात्काळ बोलली, ‘अवो, एकट्यानं गानं गावून कसं चालंल?’ अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे हे तिने एका वाक्यातच सांगितले. 

गाव जेव्हा जागे होते 

उद्घाटन समारंभानंतर पहिल्याच दिवशी ‘गाव जेव्हा जागे होते’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अशोक वैराळे यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेत गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास कसा केला हे सांगणाऱ्या पाच कथा आहेत. नागेश हाटकर यांनी काढलेली चित्रे पुस्तिकेला अधिक सुबोध करतात. पुस्तिकेचं प्रकाशन श्रीमती कमल हिलम यांच्या हस्ते झाले. कमल ही कातकरी समाजातली पेण तालुक्यातील तरुणी. खुल्या जागेवर कमल निवडून आली आणि सरपंच झाली. कामकाजाची तिला चांगली माहिती होती. पंचायतीत चालणारा भ्रष्टाचार थांबवण्याचा तिने प्रयत्न केला. दारूबंदीचा प्रश्न हाती घेतला. व्यापार कारखानदारांचे गावच्या पाण्यावरचे आक्रमण थांबवले. हितसंबंधी त्यामुळे अस्वस्थ झाले आणि कारस्थाने करून त्यांनी कमलवर अविश्वासाचा ठराव आणला. कमलला सरपंचपद गमवावे लागले. तरी नाउमेद न होता कमल कामे करीत आहे.

नवा निर्धार, नवी निर्भयता 

या मेळाव्याने एका नव्या युगाची चाहूल दिली. घटनादुरुस्तीने दिलेल्या राखीव जागांच्या संधीतून अनेकजणी पंचायतीवर निवडून आल्या. सर्व जातीपातीच्या महिलांचा त्यात समावेश आहे. यात मागासवर्गीय आहेत. सवर्ण आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, बौद्ध आहेत, राजकारणाच्या प्रवाहात काही स्वेच्छेने उतरल्या आहेत तर बहुतेकजणी गावकऱ्यांनी , घरच्यांनी आग्रह केला म्हणून ओढल्या गेल्या आहेत. एकदा ओढले गेल्यावर मात्र पोहायचा प्रयत्न करताना त्या आढळून येतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील एक सरपंच, गेली साडेतीन वर्षे त्या या पदावर आहेत, कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नाहीत, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या या बाईंना राखीव जागेवर गावकऱ्यांनीच उभे केले. सभासद अडचणी आणतात... पैशाच्या भ्रष्टाचाराला आळा पडल्यामुळे. आम्ही केले नाही ते ही काय करणार, खुर्ची खाली करा म्हणतात. त्या म्हणाल्या, आमच्या पंचायतीचा, शाळेचा पहिला नंबर लागला. अडचणी खूप येतात हो. आपण ठाम राहिले पाहिजे.

हा ठामपणा, हा निर्धार याचे प्रत्यंतर वेळोवेळी येत होते. आपल्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या सभासदांना एका सभापतीने ठणकावून सांगितले हे पद मला मिळाले आहे ते दान, देणगी म्हणून नाही माझे अधिकार मी दुसऱ्याला वापरू देणार नाही. त्यांना त्रास देण्याच्या हेतूने पंचायत समितीची बैठक रात्रीचे अकरा वाजून गेले तरी चालू ठेवली. त्याही तितका वेळ बसून‌ राहिल्या. बाईमाणूस, रात्री-बेरात्री कशी थांबू म्हणाल्या नाहीत.

पुरुषप्रधान संस्कृतीत घडलेली महिलांची मानसिकताच बऱ्याच वेळा निवडणुकीला उभे राहणाऱ्यांना, राजकारणात प्रवेश करणाऱ्या महिलांना त्रासदायक ठरते. म्हणून हिणवलं गेल्याचा उल्लेख आधी आलाच आहे. परंतु सूक्ष्म बदल आता कुठेतरी होऊ लागले आहेत . अनुभवातून अडचणीतून महिला तावून, सुलाखून निघत आहेत , त्यांची आत्मनिर्भयता त्यांच्या मनोगतातून व्यक्त होत होती. नजरेतून चमकत होती. भाषणं ऐकताना , गटचर्चेतून, खेळताना, पोवाडे ऐकताना त्या समरसून गेल्या होत्या. आपले म्हणणे मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाल्याचा त्यांना विलक्षण आनंद झाला होता अनुभवकथनाच्या दरम्यान प्रतिनिधींशी‌ बोलताना प्रतिमाताई म्हणाल्या, आपण राजकारण करतो असे म्हणण्याची सुजाण माणसाला लाज वाटते.

राजकारण आजवर आपण स्त्रियांनी आपला प्रांतच मानला नाही. जीपा उडवणं, शह-काटशह हे पुरुषांचे काम. हा राजकारणाचा अर्थ आपल्याला बदलायचा आहे. ती होती कुटील नीती. त्यांनी कुणाच्या तरी पोटात अन्नाचा घास गेला नाही . या वास्तवाला सामोरे जात, राजकारणाचा रूढ अर्थ मोडीत काढत, स्वत्वाच्या कक्षा रुंदावत, स्वतःचे स्थान निर्माण करत महिलांची वाटचाल होत राहिली तर नव्या शतकाबरोबरच नव्या युगाचेही इथे आगमन होईल.ही क्षमता त्यांच्या ठायी नक्कीच आहे. त्याची एक झलक मेळाव्यात दिसली आणि हेच या मेळाव्याचे फलित आहे.

Tags: महिला प्रतिनिधी पंचायत राज मंडलिक ट्रस्ट पद्मावती गुप्ते Women Representatives Panchayat Raj Mandalik Trust Padmavati Gupte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके